September 27, 2011

सर्वपित्री अमावस्या

स्मरण पितरांचं.........
भाद्रपद वद्य प्रतिपदा ते सर्वपित्री अमावस्या हा कालावधी पितृपक्ष म्हणून मानला जातो. या अवधीत पितृलोकातील पितर पंधरवडय़ासाठी भूतलावर अज्ञातपणे वास करतात, अशी संकल्पना आहे.प्राचीन काळात यज्ञाद्वारे पितरांना अन्न देण्याची प्रथा होती. बदलत्या काळाबरोबर मानवी जीवनही बदलत गेलं. धावत्या जीवनशैलीत ‘यज्ञ’ संकल्पना सहज साकारणं कठीण झालं. म्हणून आजच्या काळात घरीच अन्नाचा नैवेद्य करून कावग्राम घातलेला दिसतो.ज्योतिषशास्त्रातही एखाद्याच्या जन्मपत्रिकेत ‘पितृदोष’ असल्यास निवारणार्थ शांत करावी, असा नियम आहे.पितरांविषयी श्रद्धेने केलं जातं ते श्राद्ध. या काळात पितरविषयक आपली श्रद्धा त्यांना अर्पण केली जाते. पितरकार्य करण्यास उचित मानला गेलेला हा पितृपक्ष शास्त्रसंमत असून तो वर्षातून एकदाच प्राप्त होतो.
‘अपत्यांचं पोषण-रक्षण करणारा तो पिता’ असं म्हटलं जातं. हे पितृपण पिढय़ान्पिढय़ा जपलं जातं. आपल्याला सर्वसाधारणपणे ‘खापरपणजोबांपर्यंत’चे पूर्वज माहीत असतात. त्या आधीच्या पूर्वजांनी अव्याहत कष्ट करून धर्म, संस्कार, भरण, पोषण या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडून संस्कारवर्तनांची योग्य वहिवाट घालून दिलेली असते. यास्तव आपण त्यांचे ऋणी असतो. या ऋणातूनच त्यांच्याविषयी असलेला आदरभाव व भक्तीपायी आपलीही काही कर्तव्य असतात. ती पार पाडण्यासाठी हा ‘पितृपक्ष’ व ‘सर्वपित्री अमावस्या’ पाळली जाते.

No comments:

Post a Comment