December 18, 2013

श्री स्वामी चरित्र सारामृत-अध्याय 16




श्री गणेशाय नमः ॥ भक्तजन तारणार्थ । यतिरुपे श्रीदत्त । भूवरी प्रगट होत । अक्कलकोटी वास केला ॥१॥
जे जे झाले त्यांचे भक्त । त्यात श्रेष्ठ स्वामीसुत । ऐकता त्यांचे चरित्र । महादोष जातील ॥२॥
प्रसिद्ध मुंबई शहरात । हरीभाऊ नामे विख्यात । आनंदे होते नांदत । निर्वाह करीत नौकरीने ॥३॥
कोकणप्रांती राजापूर । तालुक्यात इटिया गाव सुंदर । हरीभाऊ तेथील राहणार । जात मराठे तयांची ॥४॥
ते खोत त्या गावचे । होते संपन्न पूर्वीचे । त्याच गावी तयांचे । माता - बंधू राहती ॥५॥
मुंबईत तयांचे मित्र । ब्राह्मण उपनाव पंडित । ते करिता व्यापार त्यात । तोटा आला तयांसी ॥६॥
एके समयी पंडितांनी । स्वामीकीर्ति ऐकिली कानी । तेव्हा भाव धरोनी मनी । नवस केला स्वामीते ॥७॥
जरी आठ दिवसात । मी होईन कर्जमुक्त । तरी दर्शना त्वरित । अक्कलकोटी येईन ॥८॥
यासी सात दिवस झाले । काही  अनुभव न आले । तो नवल एक वर्तले । ऐका चित्त देउनि ॥९॥
हरीभाऊ आणि त्यांचे मित्र । अफूचा व्यापार करिता त्यात । आपणा नुकसान सत्य । येईल ऐसे वाटले ॥१०॥
त्यांनी काढिली एक युक्ती । बोलावुनी पंडिताप्रती । सर्व वर्तमान त्या सांगती । म्हणती काय करावे ॥११॥
हे नुकसान भरावयासी । द्रव्य नाही आम्हांपाशी । फिर्याद होता अब्रुसी । बट्टा लागेल आमुच्या ॥१२॥
तेव्हा पंडित बोलले । मलाही कर्ज काही झाले । निघाले माझे दिवाळे । यात संशय असेना ॥१३॥
तुम्ही व्हावया कर्जमुक्त । यासी करावी युक्ती एक । तुमचा होउनी मी मालक । लिहून देतो पेढीवर ॥१४॥
उभयतांसी ते मानले । तत्काळ तयांपरी केले । तो नवल एक वर्तले । ऐका सादर होवोनी ॥१५॥
अफूचा भाव वाढला । व्यापारात नफा जाहला । हे सांगावया पंडिताला । मारवाडी आला आनंदे ॥१६॥
पंडित ऐकोन वर्तमान । आनंद झाला त्यालागोन । हरीभाऊते भेटोन । वृत्त निवेदन केले ॥१७॥
अक्कलकोटी स्वामी समर्थ । सांप्रतकाळी वास करीत । त्यांचीच कृपा ही सत्य । कर्जमुक्त झालो आम्ही ॥१८॥
नवस केला तयांसी । जाऊ आता दर्शनासी । वार्ता ऐकूनी उभयतांसी । चमत्कार वाटला ॥१९॥
ज्यांनी आपुले मनोरथ । पूर्ण केले असती सत्य । ऐसे जे का समर्थ । अक्कलकोटी नांदती ॥२०॥
तरी अक्कलकोटाप्रती । येतो तुमच्या सांगाती । आम्ही पाहुनिया स्वामीमूर्ती । जन्म सार्थक करु की ॥२१॥
गजानन हरिभाऊ पंडित । त्रिवर्ग अक्कलकोटी जात । समर्थांचे दर्शन घेत । पूजन करीत भक्तीने ॥२२॥
पाहूनी समर्थांची मूर्ती । तल्लीन हरीभाऊंची वृत्ती । मुख पाहता नयनपाती । न लवती तयांची ॥२३॥
तेव्हा समर्थे तयांसी । शिव, राम, मारुती ऐसी । नामे दिधली त्रिवर्गासी । आणिक मंत्र दिधले ॥२४॥
पंडिता राम म्हटले । गजानना शिवनाम दिधले । मारुती हरीभाऊस म्हटले । तिघे केले एकरुप ॥२५॥
मग समर्थे त्या वेळे । त्रिवर्गा जवळ बोलाविले । तिघांशी तीन श्लोक दिधले । मंत्र म्हणोनी ते ऐका ॥२६॥
॥ श्लोक ॥ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णूः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुर्देवपरब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥१॥
ऐसा मंत्र हरीभाऊते । दिधला असे समर्थे । तेव्हा तयाच्या आनंदाते । पारावार नसेची ॥२७॥
दुसरा मंत्र गजाननाला । तया वेळी श्रींनी दिधला । तेव्हा तयांच्या मनाला । आनंद झाला बहुसाळ ॥२८॥
॥ श्लोक ॥ आकाशात् पतित तोय यथा गच्छति सागरम् ॥ सर्व - देव - नमस्कारः केशव प्रति गच्छति ॥२॥
संतोषले त्याचे मन । मग पंडिता जवळ घेवोन । एक मंत्र उपदेशोन । केले पावन तयाते ॥२९॥
॥ श्लोक ॥ इदमेव शिवम् इदमेव शिवम् । इदमेव शिवम् इदमेव शिवः ॥३॥
तीनशे रुपये तयांनी । आणिले होते मुंबईहूनी । त्यांचे काय करावे म्हणोनी । विचारिले समर्थांते ॥३०॥
ऐसा प्रश्न ऐकोनी । समर्थ बोलले त्या लागोनी । त्यांच्या पादुका बनवोनी । येथे आणाव्या सत्वर ॥३१॥
स्वामीसन्निध काही दिन । त्रिवर्ग राहिले आनंदाने । हरिभाऊंचे तनमन । स्वामींचरणी दृढ जडले ॥३२॥
काही दिवस गेल्यावरी । त्रिवर्ग एके अवसरी । उभे राहूनी जोडल्या करी । आज्ञा मागती जावया ॥३३॥
आज्ञा मिळता तयांसी । आनंदे आले मुंबईसी । हरीभाऊंच्या मानसी । ध्यास लागला स्वामींचा ॥३४॥
व्यवहारी वर्तता । स्वस्थता नसेची चित्ता । गोड न लागती संसारवार्ता । चैन नसे क्षणभरी ॥३५॥
असो पुढे त्रिवर्गानी । चांदीच्या पादुका करवोनी । अर्पावया स्वामींचरणी । आले अक्कलकोटाते ॥३६॥
भक्तजनांचा कैवारी । पाहोनिया डोळेभरी । माथा ठेविला चरणांवरी । बहुत अंतरी सुखावले ॥३७॥
चांदीच्या पादुका आणिल्या । त्या श्री चरणीं अर्पण केल्या । समर्थे आदरे घेतल्या । पायी घातल्या त्याच वेळी ॥३८॥
त्या आत्मलिंग पादुका । चौदा दिवसांपर्यंत देखा । पायी वागवी भक्तसखा । दिधल्या नाही कोणाते ॥३९॥
हरीभाऊ एके दिनी । समर्थांसन्निध येवोनी । दर्शन घेवोन श्रीचरणी । मस्तक त्यांनी ठेविले ॥४०॥
तो समर्थे त्याप्रती । घेवोनिया मांडीवरती । वरदहस्त सत्वरगती । मस्तकी त्यांचे ठेविला ॥४१॥
म्हणती तू माझा सूत । झालासी आता निश्चित । परिधान करी भगवे वस्त्र । संसार देई सोडोनी ॥४२॥
मग छाटी कफनी झोळी । समर्थे तयांसी दिधली । ती घेवोनी तया वेळी । परिधान केली सत्वर ॥४३॥
आत्मलिंग पादुका सत्वरी । देती हरीभाऊंचे करी । म्हणती जाऊनी सागरतीरी । किल्ला बांधोनी राहावे ॥४४॥
धरु नको आता लाज । उभार माझा यशध्वज । नको करु अन्य काज । जन भजना लावावे ॥४५॥
जाऊनी आता सत्वर । लुटवी आपुला संसार । लोभ मोह अणुमात्र । चित्ती तुवा न धरावा ॥४६॥
आज्ञा ऐकोनिया ऐसी । आनंद झाला मानसी । सत्वर आले मुंबईसी । साधूवेष घेवोनी ॥४७॥
सदगुरुने मस्तकी हस्त । ठेविता झाले ज्ञानवंत । धन्य धन्य ते स्वामीसुत । धन्य स्वामी दयाळ ॥४८॥
सदगुरुचा उपदेश होता । तात्काळ गेली भवव्यथा । उपरती झाली चित्ता । षडविकार निमाले ॥४९॥
बहुत गुरु जगी असती । नाना मंत्र उपदेशिती । द्रव्यप्राप्तीस्तव निश्चिती । ढोंग माजविती बहुत ॥५०॥
तयांचा उपदेश न फळे । आत्मरुपी मन न वळे । सत्यज्ञान काही न कळे । मन न चळे प्रपंची ॥५१॥
तयांसी न म्हणावे गुरु । ते केवळ पोटभरु । भवसागर पैलतीरु । उतरतील ते कैसे ॥५२॥
तैसे नव्हेची समर्थ । जे परमेश्वर साक्षात । मस्तकी ठेविता वरदहस्त । दिव्यज्ञान शिष्यांते ॥५३॥
असो हरीभाऊंनी काय केले । ब्राह्मणांसी बोलाविले । संकल्प करोनी ठेविले । तुळसीपत्र घरावरी ॥५४॥
हरीभाऊ घर लुटविता । तारा नामे त्यांची कांता । ती करी बहुत आकांता । घेत ऊर बडवोनी ॥५५॥
म्हणे जोडोनिया कर । लुटविता तुम्ही संसार । हा नव्हे विचार । दुःख लागेल भोगावे ॥५६॥
आजवर अब्रूने । दिवस काढिले आपण । परी आता अवलक्षण । आपणा काय आठवले ॥५७॥
हांसतील सकल जन । धिक्कारतील पिशून । उपास पडता कोण । खावयाते घालील ॥५८॥
अल्पवयी आपणासी । बुद्धी सुचली ही कैसी । त्यागोनिया संसारसुखासी । दुःखडोही का पडता ॥५९॥
संसारसुख भोगोन । पुढे येता वृद्धपण । मग करावे मोक्षसाधन । सेवावे वन तपार्थ ॥६०॥
आपल्या वडिलांची थोरवी । मनामाजी आणावी । त्यांची कीर्ति मळवावी । उचित नसे आपणा ॥६१॥
तुम्ही संसार सोडोनी । जाऊनी बसाल जरी वनी । तरी मग सांगा कोणी । मजलागी पोसावे ॥६२॥
माझे करिता पाणिग्रहण । अग्नि ब्राह्मण साक्ष ठेवोन । आपण वाहिली असे आण । स्मरण करावे मानसी ॥६३॥
तुम्ही म्हणाल मजसवे । तूहि घरदार सोडावे । मजसमागमे फिरावे । भिक्षा मागत घरोघरी ॥६४॥
तरी संसारसुखासक्त । मी असे जी सत्य सत्य । संसारी मन विरक्त । माझे न होय कदाही ॥६५॥
आता जरी आपण । संसार टाकिला लुटोन । हे केले महत्पुण्य । ऐसे कोण म्हणेल ॥६६॥
कुटुंबा उपवासी मारावे । सर्वस्व धर्म करावे । यासी काय पुण्य कार्य म्हणावे । पाप उलटे होतसे ॥६७॥
विनविते जोडोनी कर । अद्यापि स्वस्थ करा अंतर । आपला हा विचार । सोडोनी द्यावा प्राणप्रिया ॥६८॥
ऐशी तियेची उत्तरे । ऐकोनिया स्वामीकुमरे । समाधान बहुत प्रकारे । करीतसे तियेचे ॥६९॥
परी तारेच्या चित्तात । षडरिपु होते जागत । संसाराचे मिथ्यत्त्व । तियेलागी कळेना ॥७०॥
आशा, मनीषा, भ्रांती आणि । कल्पना वासना या डाकिणी । त्यांनी तिजला झडपोनी । आपणाधीन केलेसे ॥७१॥
त्यायोगे सद्विचार । तियेसी न सुचे अणुमात्र । धरोनिया दुराग्रह । स्वामीसुता बोधीतसे ॥७२॥
षडविकार त्यागोनी । रतला जो स्वामीचरणी । दृढ निश्चय केला मनी । संसार त्याग करावा ॥७३॥
स्त्रियेच्या अंगावरी अलंकार । तेहि लुटविले समग्र । तिये दिधले शुभ्र वस्त्र । परिधान करावया ॥७४॥
आत्मलिंग समर्थे । स्वामीसुताते दिधले होते । त्या पादुका स्वहस्ते । मठामाजी स्थापिल्या ॥७५॥
कामाठीपुर्‍यात त्या समयी । मठ स्थापिला असे पाही । हरीभाऊ होऊनी गोसावी । मठामाजी राहिले ॥७६॥
धन्य धन्य ते स्वामीसुत । गुर्वाज्ञेने झाले विरक्त । परी जन त्याते निंदित । नाना दोष देवोनी ॥७७॥
पूर्वजन्मी तप केले । त्याचे फळ प्राप्त झाले । सदगुरुचरणी विनटले । सर्व फिटले भवदुःख ॥७८॥
इति श्री स्वामीचरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा भाविक भक्त परिसोत । षोडशोऽध्याय गोड हा ॥८०॥
श्रीरस्तु । शुभं भवतु ॥ 

No comments:

Post a Comment