January 31, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३१ जानेवारी २०१४

प्रवचनाची ध्वनी फीत ऐकण्यासाठी खालील बटनावर टिचकी मारावी


 ३१ जानेवारी 
नाम हाच भगवंताचा अवतार. 



 आजच्या युगात नाम हाच भगवंताचा अवतार आहे. "सुष्टांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्याकरिता मी अवतार घेतो" असे भगवंतांनी गीतेत सांगितले आहे; त्यावरून असे ठरते की सुष्ट आणि दुष्ट या दोघांचेही अस्तित्व असून, त्यांत दुष्टांकडून सुष्टांना त्रास होण्यातच भगवंताच्या अवताराची उत्पत्ती आहे. आजकाल पाहू गेले तर असे दिसते की, सुष्टांचे अस्तित्वच जवळजवळ दुर्मिळ झाले आहे. म्हणजे, ज्यांचा छळ झाला असता भगवंताने अवतार घ्यावा, ते सुष्टच नामशेष झाले आहेत. मग अवतार तरी कुणासाठी, कसा व्हावा ? याचा अर्थ, अवतार होणारच नाही असे नाही; पण वस्तुस्थिती काय आहे ते यावरून आपल्याला समजेल. आजची परिस्थिती आणि पूर्वीच्या काळची परिस्थिती यांत फरक आहे. पूर्वी सद्‍वासना जिवंत होती, पण ती उघडपणे कृतीत आणणे कठीण होते. आता सद्‍वासनाच नाहीशी झाली आहे, म्हणजे पायाच ढासळला आहे, तिथे कृतीचा प्रश्नच उदभवत नाही. पूर्वी सद्‍वासना सूक्ष्मपणे का होईना जिवंत होती, पण स्थूल प्रकट कृती दुर्घट झाली होती; त्या वेळी भगवंताला स्थूलात येऊन कार्य करणेच जरूर होते, आणि अशा वेळी अवतार घेऊन, म्हणजे सगुण रूप धारण करून, भगवंताने कार्य केलेही. आताचा प्रश्न, दुर्वासना जाऊन सद्‍वासना कशी उत्पन्न होईल हा आहे; म्हणजेच कार्य सूक्ष्मातले आहे. म्हणजे 'जसा रोग तसे औषध' किंवा 'काटयाने काटा काढावा' या न्यायाने, उपाययोजना सूक्ष्मातच केली पाहिजे. वासना बदलायला वासनेइतकाच जबरदस्त इलाज पाहिजे; आणि तो म्हणजे भगवंताचे नाम. चालू परिस्थितीशी झगडून मार्ग काढून देणारा असा जर कोणता अवतार असेल तर तो भगवंताच्या नामाचाच आहे, आणि त्याकरिता सर्वांनी भगवंताच्या नामाचा टाहो फोडणेच जरूर आहे. हे कार्य भगवंताने सगुणरूप धारण करून होणे कठीण आहे; ज्या अर्थी कारण सूक्ष्मातले आहे त्या अर्थी त्याला इलाजही सूक्ष्मांतला पाहिजे, म्हणून नामावताराची आज गरज आहे. प्रत्येक नामागणिक त्याचा अवतार आहे, आणि त्याची कास धरणे, म्हणजेच नाम घेणे, हे आमचे आजचे मुख्य कर्तव्य आहे. तेवढे केले की नाम आपले अवतारकार्य करून दाखवील. आपण आपले प्रेम प्रपंचाकडे लावले आहे, ते नामाकडे लावावे, म्हणजे नामस्मरणात फार आनंद येईल. मनाला नामाची चटक लागली आणि नामाच्या प्रेमातच मन रंगून गेले म्हणजे जन्म सफल झाला.


३१. नामाने कलीची सत्ता नाहीशी होते. म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

January 30, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३० जानेवारी २०१४

प्रवचनाची ध्वनी फीत ऐकण्यासाठी खालील बटनावर टिचकी मारावी


 ३० जानेवारी 
जेथे नाम तेथे परमात्मा आहेच. 


तुम्ही सर्व भाविकजन । ऐकावे माझे वचन ॥
माझे भेटी सदा राहावे । मुखाने रामनाम घ्यावे ॥
जो नामात राहिला । तो अखंड माझ्या दर्शनात बसला ॥
जेथे नामाचे स्मरण । ते माझे वसतिस्थान ॥
जेथे रामाचे नाव । तेथे माझा ठाव ॥
 हे आणून चित्ती । सुखे राहावे प्रपंचाप्रति ॥
नामात ठेवा मन । हेच माझे खरे दर्शन ॥
नेहमी रामाचा ध्यास । हाच माझा सहवास ॥
 तुम्ही सुज्ञ माझे प्राण । नाम करा तेवढे जतन ॥
नामात ठेवावे प्रेम । तेथे माझी वसति जाण ॥
ज्याने ज्याने इच्छा धरावी व्हावे माझे । त्याने नाम कधी न सोडावे वाचे ॥
एवढे देईल जो नामदान । त्याला अर्पण करून घेईन जाण ॥
 जेथे नाम । तेथे माझे धाम ॥
 नामापरते न मानी सुख । तेथेच माझे राहणे देख ॥
 तुम्ही शक्य तितके राहावे नामात । हेच माझे सांगणे तुम्हांस ॥
शक्य तो नामस्मरण करावे । म्हणजे मी तुमचेजवळ अखंड आहे असे समजावे ॥
जेथे परमात्म्याचे नाव । तेथे माझा आहे ठाव ॥
जेथे नाम तेथेच मी । हा भरवसा बाळगून असावे तुम्ही ॥
नाही केले वेदपठण । शास्त्राचे नाही झाले ज्ञान ।
 श्रुतिस्मृति उपनिषदे यांची नाही ओळखण । असा मी अज्ञान जाण ॥
तरी एक भजावे रघुनाथासी । अर्पण होऊन जावे त्यासी ।
 ऐसे जाणून चित्ती । खंड नाही समाधानवृत्ति ॥
 मी सतत आहे तुमच्यापाशी हा ठेवा निर्धार । न सोडावा आता धीर ॥
ठेवावा एक विश्वास । मी आहे तुम्हाजवळ खास ॥
श्रीदासबोध नामस्मरण । याचे असावे वाचन । मी त्यातच मानावे जाण । कृपा करील रघुनंदन ॥
 मी तेथे आहे हे नक्की समजावे । राम सर्व ठिकाणी आहे हे लक्षात ठेवावे ॥
उपाधिरहित मी तुमचेजवळ सतत आहे ॥
 मी नाही अशी कल्पना करू नये । तुमचे जवळ आहे हे खात्रीने समजावे ॥
 मी नाही सोडून गेलो कोणाला दूर । माझी वसति तुमच्या शेजारी जाण ॥
 माझे येणे जाणे तुमचे हाती । तुम्हा सर्वांहून नाही परती ॥
 रामापरता मी । जैसा प्राणापरता देह जाण ॥
सदा सर्वकाळ माझ्याशी वास । हाच धरावा हव्यास ॥
त्याला न जावे लागे कोठे । घरबसल्या राम भेटे ॥
जे जे करणे आणिले मनी । रामकृपे पावलो जनी ॥
आता पाहा मला रामात । आनंद मानावा नामात ॥
सर्वांनी राखावे समाधान । जे माझे प्राणाहून प्राण जाण ॥
माझे ऐकावे सर्वांनी । सदा राहावे समाधानी ॥

३०. जेथे नामाचे प्रेम । तेथेच मी सतत जाण ॥


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

January 29, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २९ जानेवारी २०१४

प्रवचनाची ध्वनी फीत ऐकण्यासाठी खालील बटनावर टिचकी मारावी


 २९ जानेवारी
 नामात दृढभाव कसा येईल ? 



नामात प्रेम नामानेच येणार. हे प्रेम यायला विषयावरचे प्रेम कमी करायला पाहिजे. दृढनिष्ठा पाहिजे. नामच तारील, नामच सर्व काही करील, असा दृढभाव पाहिजे. तो ठेवून व्यवहारातले प्रयत्‍न चालू ठेवावेत, पण यश देणारा परमात्मा असा भाव पाहिजे. वैद्याकडचे औषध आपण गड्याकडून आणवतो, पण गुण गड्याने दिला असे नाही म्हणत. याच्याही पुढे जाऊन, वैद्याच्या औषधाने आलेला गुण परमात्म्यानेच दिला, असे का मानत नाही ? परमात्म्याला शरण जाणे म्हणजे परमात्मा आपला आहे, त्याच्यावाचून आपल्याला दुसरे कुणी नाही, आपण काही करीत नसून सर्व तोच आपल्या हिताकरिता करतो आहे, असा दृढ विश्वास ठेवणे. आपण आपल्या बायकोमुलांवर प्रेम करतो, कारण त्यांना 'आपले' म्हटले म्हणून. म्हणजे प्रेम हे आपलेपणात आहे, मग परमात्म्याला आपले म्हटले म्हणजे सहजच त्याच्यावर प्रेम बसणार नाही का ? दुसरे असे की, भगवंत हा आपला जिवलग सखा आहे, तो सर्व काही आपल्या हिताकरिताच करतो आहे, असा विश्वास धरल्यावर काळजीला तरी जागा कुठे उरली ? आपली देहबुद्धी नाहीशी होण्यातच आपले हित आहे. परमात्म्याच्या ठिकाणी आपलेपणा उत्पन्न व्हायला त्याच्या नामाशी पुष्कळ सहवास पाहिजे. सिद्धीच्या, चमत्काराच्या पाठीस लागू नये; ती आपल्या मार्गात विघ्ने आहेत. उलट, त्यांनी आपल्या पाठीस लागले पाहिजे. एखाद्याला साप चावत नाही, पण त्यात विशेष ते काय आहे ? सापात काय किंवा कशातही काय, भगवद्‍भाव, आपलेपणा पाहता यावा, म्हणजे कोणीही आपले शत्रू होणार नाहीत. आई आपल्याजवळ आहे या भावनेने मूल जसे निर्भय असते, तसे भगवंत आपल्यापाशी आहे या भावनेने आपण निर्धास्त व्हावे. आपल्याला ज्या गावाला जायचे आहे, त्या गावाची गाडी आली की नाही एवढे पाहावे; गाडीत कोण भेटतो याला फारसे महत्त्व नाही. समजा, गाडीत आपल्याला कोणीच भेटले नाही, तर आपण स्वस्थ झोप घेत आपल्या गावी जातो, त्याप्रमाणे आपण आपले साधन करावे. सृष्टीची तत्त्वे किती आहेत वगैरेच्या भानगडीत पडू नये, त्याचा निकाल कधीच लागायचा नाही. शंका गेल्याशिवाय नाम स्थिरच होत नाही हे लक्षात ठेवावे. देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचे महत्त्व कळणार नाही. आपला उद्धार व्हावा असे वाटत असेल तर नामस्मरण सोडू नये.

२९. परमात्मा जसा निरूपाधिक आहे तसे नामही निरूपाधिक आहे. ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

January 28, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २८ जानेवारी २०१४

प्रवचनाची ध्वनी फीत ऐकण्यासाठी खालील बटनावर टिचकी मारावी


 २८ जानेवारी 
अकर्तेपणाने नाम घ्यावे. 



काही न करणे, आपण काही करीत आहो किंवा आपल्याला करावयाचे आहे असे न वाटणे, हाच परमार्थ. पण स्वस्थ बसायला लावणे ही तुरूंगात मोठी शिक्षा समजतात. देहाने, मनाने, एकसारखी चळवळ करण्याची आपल्याला सवय लागली आहे. देहाला स्वस्थ बसायला लावणे कठीण, मनाला स्वस्थ बसायला लावणे त्यापेक्षा कठीण, आणि देह कर्म करीत असताना मनाला स्वस्थ बसविणे हे अत्यंत कठीण. मनाला खरे म्हटले तर स्वास्थ्य हवे. पण ते मिळविण्याकरता साधन करणे, म्हणजे प्रयत्‍न करणे, जरूर आहे. मनाचे स्वास्थ्य बिघडायला कारणे काय ती पाहू. पहिले, आपल्या इच्छेविरूद्ध गोष्ट होणे; दुसरे, आपल्या बऱ्यावाईट कर्मांची आठवण होणे; आणि तिसरे, उद्याची काळजी करणे. जो तो आपल्या इच्छेप्रमाणे व्हावे असे म्हणणार; सर्वजण तुमच्याच इच्छेप्रमाणे कसे चालतील ? तुमच्या इच्छेविरूद्ध गोष्टी होणारच. तेव्हा स्वास्थ्य बिघडू न द्यायला, आपली इच्छाच नाहीशी करावी. कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धी नाही ठेवू. हाव सोडावी. लोकांची आस सोडावी. अभिमान सोडून कर्म करीत राहावे. प्रयत्‍न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते, स्वास्थ्य बिघडते; मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठले दुःख ? प्रयत्‍न करून जे काही होते ते रामाच्या इच्छेने झाले म्हणावे. प्रत्येक गोष्ट रामाने केली म्हणणे म्हणजे भगवंताच्या अखंड अनुसंधानात राहणे. हे साधण्यासाठी अखंड नामस्मरण करावे. जे झाले, जे होते आहे, आणि जे होईल, ते भगवंताचेच आपल्या हिताकरिता करणे आहे. आपण कर्ते नाही, असे मानणे, याला अखंड भगवन्नामस्मरण पाहिजे. सारांश, जे जे काही झाले, ते ते भगवंतानेच आपल्या हिताकरिता केले. उद्याची काळजी भगवंतालाच आहे. त्याला काय योग्य वाटेल ते तो करील. म्हणून, झाल्याची म्हणजे कालची आठवण करू नये, होणाऱ्याची म्हणजे उद्याची काळजी करू नये, आणि चालू क्षण वाया जाऊ देऊ नये, नामस्मरणात राहावे. सगळया प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणातच आहे. आहे त्या परिस्थितीत समाधान नसणे हा जो देहबुद्धीचा स्वभाव तो आपण सगळीकडे लावतो. सर्व गोष्टींचे ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण काही करणार नाही, असे आपण म्हणतो; सर्व गोष्टींचे ज्ञान मरेपर्यंत आपल्याला होत नाही, आणि आपण काही करीत नाही ! देहबुद्धी आपल्याला भगवंताचा विसर पाडते. या देहबुद्धीवर आपण नामाच्या मंत्राचे पाणी शिंपडू या म्हणजे तिची वाढ होणार नाही.

 २८. मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

January 27, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २७ जानेवारी २०१४

प्रवचनाची ध्वनी फीत ऐकण्यासाठी खालील बटनावर टिचकी मारावी


 २७ जानेवारी 
नाम हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग आहे. 



 सर्व साधनांत श्रेष्ठ साधन नामस्मरणच आहे. पण त्याचे महत्त्व कळत नाही. ते कळायला खरोखर भगवत्‌कृपाच पाहिजे. आपल्या शरीरात मुख्य जसे हृदय, आणि बाकीचे अवयव गौण आहेत, तसे परमार्थात मुख्य साधन नामस्मरण हे आहे आणि दुसरी साधने गौण आहेत. नाम हे मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र आहे. आपले जीवन देवाच्या हाती आहे, आणि देव नामाच्या स्वाधीन आहे हे पक्के लक्षात ठेवा. योगात, योग करीपर्यंतच समाधान असते; पण नामस्मरणाच्या अनुसंधानात सतत समाधान असते. स्वतः निर्गुण झाल्याशिवाय निर्गुण उपासना होत नाही. तेज दिसणे, नाद ऐकणे, या सर्व गोष्टी गुणातच नाही का आल्या ? निर्गुण व्हायला देहबुद्धी सुटायला पाहिजे. सर्वव्यापी परमेश्वराला सर्वांभूतीं पाहणे ही निर्गुण उपासनाच होय. योग नामस्मरणाला पोषक तितकाच करावा; केवळ त्यालाच प्राधान्य देऊ नये. योग नामस्मरणाला पोषक आहे, पण नामस्मरण योगाच्या पलीकडे आहे; म्हणून नामस्मरणात योग येतो, योगात नामस्मरण येत नाही. सर्व साधनांचा अंत नामस्मरणात आहे. नामाचे साधन हे जलद गाडीप्रमाणे आहे. रंग दिसणे, प्रकाश दिसणे, आवाज ऐकू येणे, ही मधली स्टेशने सोडून नाम एकदम भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवते. इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल, पण ते तात्पुरते असते. नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचे साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते. नामस्मरण हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग होय. नामात एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही. नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल. तुकारामबुवांची वाचा त्यांना अनावर झाली, ती सारखी नाम घेऊ लागली; याचा अर्थ असा की, त्यांच्या कल्पनेच्या बाहेर नाम येऊ लागले. गाडी उताराला लागली की जशी अतिवेगात येते आणि आवरत नाही, तसे हे आहे. आपल्या शक्तीच्या बाहेर कार्य होणे ही भगवंताची कृपा होय. चार माणसे होती, त्या सर्वांना एकच रोग झाला होता. पण त्यांची सांपत्तिक स्थिती सारखी नव्हती. वैद्याने त्यांपैकी अगदी गरीब माणसाला एक औषध तुळशीच्या रसात घ्यायला सांगितले, त्याच्यापेक्षा पैसेवाल्याला तेच औषध मधात घ्यायला सांगितले, त्याच्याहीपेक्षा पैसेवाल्याला तेच औषध केशरात घ्यायला सांगितले, आणि सर्वात जो श्रीमंत होता त्याला तेच औषध कस्तुरीत घ्यायला सांगितले. त्याचप्रमाणे, ज्याचा जसा अधिकार तसे त्याने नाम घ्यावे. नाम नुसते तोंडाने घ्यावे, नाम श्रद्धेने घ्यावे, नाम वृत्ती सांभाळून घ्यावे, नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही, अशा दृढ भावनेने घ्यावे; सर्वांना फळ सारखेच मिळेल.

२७. सर्व साधनांचा अंत नामस्मरणात आहे. 

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

January 26, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २६ जानेवारी २०१४

प्रवचनाची ध्वनी फीत ऐकण्यासाठी खालील बटनावर टिचकी मारावी


 २६ जानेवारी 
अंतकाळ साधण्यासाठी नामस्मरण


. अंतकाळी नामस्मरण होणे म्हणजे अंतकाळ साधणे; आणि हा साधण्यासाठी आधी नामस्मरण करायला पाहिजे. अंतकाळ साधण्यासाठीच जगावे. भगवंत जिथे राहतो तेच आपले खरे घर आहे. सध्या आपण राहतो ते भाडयाचे घर आहे. भाडयाचे घर सोडून स्वतःच्या मालकीच्या घरात राहायला जाताना जसा आनंद वाटतो, तसाच शरीर सोडताना वाटायला पाहिजे. भगवंताचे घर तेच आपले घर आहे, याची खात्री झाली म्हणजे ते जमेल. त्यासाठी आपण सतत भगवंताच्या नामात राहावे. "मला तू आपला म्हण, माझे मन तुझ्या चरणी अर्पण केले, आता मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न होवो," असे मागावे. परमेश्वर आपल्या मागेपुढे आहे असे अखंड मानावे. भगवंताचे स्मरण करणे, म्हणजे जे काही आपल्या हातून घडते आहे ते त्याच्याच इच्छेने घडते आहे असे समजणे. प्रपंच हा देवाचा मानून अभिमान रहितपणे तो करणे, हा परमार्थ; आणि परमात्म्यावाचून आपल्याला कोणी नाही याचा दृढनिश्चय होणे याचे नाव ज्ञान. हे ज्ञान बाणले म्हणजे मनुष्य खऱ्या अर्थाने परमात्मप्राप्तीच्या मार्गाला म्हणजे साधनाला लागला. या साधनाने परमात्म्यावाचून दुसरे काही आवडेनासे होते; आणि ही जी अत्यंत आवड तिलाच भक्ती म्हणतात. या भक्तीची परिपूर्णता अंतकाळ साधण्यात होते; त्यासाठी सतत नामस्मरण किंवा अखंड अनुसंधान हेच एकमेव साधन सांगितले आहे. अंतकाळी ज्याने नाम घेतले त्याच्या विषयवासना मेल्या असे नसते; तो काही एकदम मुक्त होत नाही, पण पुढच्या जन्मी तो अती सात्त्विक म्हणून जन्माला येईल. सात्त्विक म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घ्यावी अशी वृत्ती असणारा होय. साधन प्राणाबरोबर असावे; प्राण जसे अभिमानरहित, अखंड चालतात त्याप्रमाणे साधन अभिमानरहित, अखंड चालावे. ते 'करता' कामा नये; 'करणे' म्हणजे अभिमान आला. सहज प्राणाबरोबर झाले म्हणजे अखंड चाललेलेच असते. प्रपंचातली तळमळ सोडून वागावे. गुरूआज्ञेत असावे. अनंत जन्मांचा देहाशी सहवास, म्हणून देहावर प्रेम जडून देहबुद्धी होते; तसाच नामाचा सहवास पुष्कळ करावा, म्हणजे विषयाची आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जडते. योगात कष्ट फार, या युगात तो साधणे अशक्यप्रायच; आणि कर्मात तर अभिमान असतो आणि वाढतो. भक्तीत कष्ट नसतात, आणि ती करताना अभिमान आपोआप गळत जातो. योग आणि कर्म ही साधने परमात्म्याच्या दत्तकपुत्राप्रमाणे आहेत, तर भक्तीचे साधन हे परमात्म्याच्या औरस मुलाप्रमाणे आहे. भगवंताला दृष्टीआड होऊ न देणे हीच खरी भक्ती, हेच खरे अनुसंधान, हाच खरा परमार्थ, आणि हेच खरे आपले सर्वस्व आहे.

 २६. नुसते देहाने तीर्थस्नान, पूजापाठ, वगैरे करून परमार्थ घडत नाही; आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

January 25, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २५ जानेवारी २०१४

प्रवचनाची ध्वनी फीत ऐकण्यासाठी खालील बटनावर टिचकी मारावी


 २५ जानेवारी
 अनुसंधानासाठी सतत नामस्मरण करावे. 




नामस्मरण हे प्रपंचाकरिता, म्हणजे तो चांगला व्हावा म्हणून नाही, तर प्रपंचाची आसक्ति कमी करण्यासाठी आहे. तरी पण त्याने प्रपंच बिघडणार नाही. जे होईल ते आपल्या बऱ्याकरिता आहे असे मानून परमात्म्यावर विश्वास ठेवून राहावे. एक गृहस्थ मला भेटले तेव्हा म्हणाले, 'मी रिकाम्या वेळात नामस्मरण करतो.' त्यावर मी म्हटले,"सार्‍या जन्मात महत्त्वाचा आणि सार्थकी लागलेला वेळ असेल तर तो हाच; त्याला तुम्ही रिकामा वेळ कसा म्हणता ?" पुढे ते म्हणाले, "प्रारब्धाचे भोग काही केल्या टळत नाहीत, ते भोगावेच लागतात, असे सर्व संत सांगतात. हे जर खरे, तर प्रारब्धाचे भोग आपण भोगत असताना त्यामध्ये भगवंताच्या स्मरणाची काय गरज आहे ?" खरोखर हा प्रश्न अगदी बरोबर आहे. आपल्या कर्माचे भोग आपल्यालाच भोगावे लागतात हे खरे. पण भोग आले की, आपल्या मनाला चैन पडत नाही, तिथे मनाला भगवंताच्या स्मरणात गुंतवून ठेवले की आपले समाधान टिकते. आपल्या सध्याच्या अवस्थेमध्ये, 'भगवंताच्या इच्छेने घडायचे ते घडते' असे मानणे, किंवा 'भगवंत चांगले करील' असा विश्वास ठेवून वागणे, हेच सोपे जाईल. हे दिसायला साधे दिसले तरी यात फार मोठे मर्म साठविले आहे हे ध्यानात धरा. "भगवंताच्या इच्छेने घडणार ते घडू द्यावे" अशी निष्ठा उत्पन्न व्हायला त्याचे अनुसंधान सतत ठेवले पाहिजे. "आहे त्यात समाधान, आणि भगवंताचे अनुसंधान," एवढीच सदगुरूची आज्ञा असते. दुसर्‍याने आपल्याला दु:ख दिले असता आपले अनुसंधान चुकते ही त्याची नव्हे, आपली चूक आहे. 'विषय कसा सुटेल ? मन एकाग्र कसे होईल ?' हे न कळले तरी चालेल. सोडण्याच्या गोष्टीचा अभ्यास करण्यापेक्षा धरण्याच्या गोष्टीचा, म्हणजे अनुसंधानाचा, अभ्यास करावा. एक भगवंताचे अनुसंधान ठेवले की सर्व गुण आपोआपच वाढतील; ते कसे, तर शरीराचे अवयव सारख्या प्रमाणात वाढतात तसे. झाडाच्या मुळाला पाणी घातले की, त्याच्या सर्व भागांना ते पोहोचते, तसे भगवंताचा विसर पडू न दिला तर सर्व काही बरोबर होते. "अज्ञानाच्या अंधकाराने दुःख भोगत असताना तू माझे स्मरण, माझे अनुसंधान ठेव, म्हणजे तुला पुढे उजेड दिसेल," असे गीतेमध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्णच अर्जुनाला सुचवीत आहेत. दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे, तसे भगवंताचे अनुसंधान सारखे राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे. ज्याचे अनुसंधान अखंड टिकले, त्याचे खाणे, पिणे, उठणे, बसणे, वगैरे सर्व क्रिया भगवंताची सेवाच बनतात.

२५. भगवंताचे अनुसंधान हे आपले ध्येय. त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करू या.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

January 24, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २४ जानेवारी २०१४

प्रवचनाची ध्वनी फीत ऐकण्यासाठी खालील बटनावर टिचकी मारावी


 २४ जानेवारी 
नामसाधन कसे करावे ? 



नामाचे साधन कसे करावे ? एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तर तो दगड भिजेल आणि पाणी निघून जाऊन कोरडा होईल. पण तेच पाणी थेंब थेंब असे एकाच ठिकाणी आणि अखंड पडत राहिले तर त्या दगडाला भोक पडेल, आणि काही दिवसांनी दगड फुटूनही जाईल; त्याप्रमाणे, केव्हातरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्यनेमाने, ठराविक वेळी, आणि शक्य तर ठराविक स्थळी, जर नामाचे साधन केले तर ते जास्त परिणामकारक होते. जात्याला दोन पेठी असतात; त्यातले एक स्थिर राहून दुसरे फिरत राहिले तर दळण दळले जाऊन पीठ बाहेर पडते. पण जर दोन्ही पेठी फिरत राहिली तर दळण दळले न जाता फुकट श्रम मात्र होतात. माणसाचे शरीर आणि मन अशा दोन पेठी आहेत. त्यांतले मन हे स्थिर आहे आणि देह हे फिरणारे पेठे आहे. मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे, आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो. प्रारब्धरूपी खुंटा देहरूपी पेठयात बसून तो त्याला फिरवतो, आणि मनरूपी पेठे स्थिर असते. देह प्रारब्धावर सोडावा, आणि मन भगवंताच्या स्मरणात स्थिर ठेवावे, याहून नामाचे साधन दुसरे काय ? हे साधन अमक्यालाच साधेल असे नाही, तर ते कोणालाही साधेल. गरिबाला गरिबीचे दु:ख होते म्हणून साधत नाही, तर श्रीमंताला पैशाचा अभिमान आणि लोभ असतो म्हणून साधत नाही; विद्वानाला विद्येचा अभिमान होतो म्हणून साधत नाही, तर अडाण्याला काय करावे हे समजत नाही म्हणून साधत नाही. साशंक वृत्तीने कितीही साधन केले, कितीही नामस्मरण केले, तरी कधी समाधान होणार नाही. नीतिधर्माचे आचरण, शास्त्रशुध्द वर्तन, शुद्ध अंतःकरण, आणि भगवंताचे स्मरण, इतक्या गोष्टी असतील तरच साधक शेवटपर्यंत पोहोचेल; आणि शेवटपर्यंत तो पोहोचला तरच फायदा. 'घरी पोहोचल्यावर पत्र लिहा' असे म्हणतात, याचा अर्थ हाच आहे. प्रपंच करीत असताना वाईट विचार मनात येतात, त्याचप्रमाणे परमार्थ करीत असतानाही वाईट विचार आले म्हणून घाबरण्याचे कारण नाही. ज्यावेळी वाईट विचार मनात येतील त्यावेळी भगवंताचे नाम घेतले तर त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही. दृढ विश्वासाने नाम चालू ठेवावे. जिथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृति आहे तिथेच समाधानाची प्राप्ती होते. 'भगवंता, मी तुझा आहे' असे रात्रंदिवस म्हणत गेल्याने भगवंत प्रकट होत जाईल; आणि भगवंत जितका प्रकट होत जाईल तितके 'मी' पणाचे दडपण आपोआप कमी होत जाईल.

२४. प्रारब्धाची व ग्रहांची गती देहापर्यंतच आहे. मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही.
 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

January 23, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २३ जानेवारी २०१४

 २३ जानेवारी
प्रवचनाची ध्वनी फीत ऐकण्यासाठी खालील बटनावर टिचकी मारावी


 नामस्मरणरूपी शेताची मशागत.



 नामस्मरणरूपी शेतात उत्तम पीक येण्यासाठी प्रथमत: सदाचरणाची आवश्यकता आहे. सदाचरण हे शेताचे रक्षण करण्याकरिता लागणार्‍या कुंपणासारखे आहे. दुसरी गोष्ट, शुद्ध अंतःकरण म्हणजे उत्तम काळी भुसभुशीत जमीन. या जमिनीमधले दगड, हरळी, वगैरे काढून ती साफ करावी; म्हणजेच, अंतःकरणात कोणाबद्दलही द्वेष, मत्सर, वगैरे ठेवू नये. शुद्ध अंतःकरणानंतर नामस्मरणाचे महत्त्व आहे. नामस्मरण हे त्या जमिनीत पेरण्याचे बी आहे. हे बी किडके नसावे; म्हणजे, नाम सकाम नसावे. उत्तम बीज म्हणजे 'नामाकरिताच नाम' हे आहे. त्यानंतर तीर्थयात्रा, संतांचे आशीर्वाद, त्यांची कृपादृष्टी, यांची आवश्यकता आहे. या सर्व गोष्टी पाटाच्या पाण्यासारख्या आहेत. यामुळे शेत चांगले यायला मदत होते. शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवत्‌कृपा होय. भगवत्‌कृपा ही पावसाच्या पाण्यासारखी आहे. पाटाच्या पाण्यापेक्षा पावसाच्या पाण्याची गोष्ट काही और आहे. पण तो पडणे न पडणे आपल्या हाती नाही. शेताला लावण्याकरिता पाटाचे पाणी एखादी विहीर, तलाव किंवा नदी यामधून नेता येणे शक्य असते; परंतु पावसाच्या बाबतीत कोणाला काहीच करता येत नाही. त्यामुळे एखाद्याने शेताची उत्तम निगा राखली, उत्तम बी पेरले, तरी पावसाच्या अभावी पीक न येण्याचा संभव असतो. नामस्मरणरूपी शेताचे एक वैशिष्टय आहे. ते हे की, त्याच्या अंगी लोहचुंबकासारखी आकर्षणशक्ती आहे. म्हणून हे शेत वाया गेले असे कधीच होत नाही. आपण असे पाहू की, दोन शेतकरी आहेत; एक कर्तव्यकर्म म्हणून वेळ झाली की आपल्या शेताची मशागत करणारा आहे, तर दुसरा आळशी म्हणजे मशागत न करणारा आहे. आता जेव्हा पाऊस पडेल तेव्हा, ज्याने मशागत केली त्याचे शेत उत्तम वाढेल, पण दुसऱ्याचे वाढणार नाही. भगवंताच्या कृपेने जो पाऊस पडणार, त्याचा एकाला फायदा मिळेल; तो दुसर्‍याला मिळणार नाही. म्हणजे जो नियम प्रपंचात लागू तोच परमार्थात लागू. भगवंताची कृपा सर्वांवर सारखाच वर्षाव करीत असते. ज्याने ज्या प्रमाणात चित्तशुद्धी केली असेल, त्या प्रमाणात त्याला फायदा होईल, दुसर्‍याला नाही होणार. भगवंत किंवा संत समदृष्टी असतात ते असे. भगवंत निःपक्षपाती आहे. त्याच्यापाशी कोणताही भेद नाही. आपण तयार झालो की त्याची कृपा आपोआप होते. कृपेला योग्य अशी भावना तयार करणे आपले काम आहे. संतांनी नुसते आपल्याला सांगून भागत नाही, आपण काय करायला पाहिजे हे कळून आपण ते स्वतः करायला पाहिजे. त्यांच्या ठिकाणी जर विषमता दिसली तर तिचा उगम किंवा कारण आपल्यातच आहे हेच यावरून दिसते.

२३. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

January 22, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २२ जानेवारी २०१४

प्रवचनाची ध्वनी फीत ऐकण्यासाठी खालील बटनावर टिचकी मारावी


 २२ जानेवारी 
भवसागर तरून जाण्यासाठी नाम हेच साधन. 

नाम हे स्वत:सिद्ध आहे म्हणूनच ते अत्यंत उपाधिरहित आहे. नाम घेताना आपण पुष्कळदा त्याच्या मागे उपाधी लावतो; उदाहरणार्थ आपण ऐहिक सुखाच्या प्राप्तीकरिता नाम घेतो; किंवा मी नाम घेतो ही अहंकाराची भावना बाळगतो. या उपाधीमुळे आपल्या प्रगतीला बरेच अडथळे येतात. म्हणून नामाकरिताच नामस्मरण करावे आणि तेही सदगुरूच आपल्याकडून करवून घेतात या भावनेने करावे. त्या योगाने अहंकार नष्ट होऊन शरणागती येईल. शरणागती यायला रामनाम हाच रामबाण उपाय आहे . तो आपण करावा. नामाचा महिमा वाचेने सांगणे अशक्य आहे पण हे सांगण्याकरिता तरी बोलावे लागते इतकेच. मनुष्यप्राणी भवसागरात गटांगळया खातो आहे; समुद्रातून तरून जाण्यासाठी जशी नाव तसे भवसागरातून तरून जाण्यासाठी भगवंताचे नाम आहे. फक्त एकच दक्षता घेणे जरूर आहे ती ही की नावेत समुद्राचे पाणी येऊ देऊ नये नाहीतर नावेसकट आपण बुडून जाऊ; त्याप्रमाणे संसाररूपी समुद्राचे पाणी नामरूपी नावेत येऊ देऊ नये. म्हणजे कोणत्याही प्रापंचिक अडचणीमुळे नामात व्यत्यय येऊ देऊ नये. तसेच नामाचा उपयोग संसारातल्या अडचणी दूर होण्याकरिता व्हावा ही बुद्धी न ठेवता नामाकरिताच नाम घ्यावे म्हणजे नावेत पाणी न शिरता सुखरूपपणे पैलतीराला म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचता येते. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते. देह केव्हा जाईल याचा नेम नाही मग म्हणून म्हातारपणी नामस्मरण करू असे म्हणू नये. अगदी उद्यापासून नामस्मरण करू म्हटले तर उद्याची खात्री आहे का ? आयुष्य क्षणभंगुर आहे ही खात्री प्रत्येकाला आहे म्हणून तर प्रत्येकजण आयुष्याचा विमा उतरवतो. लग्नाला आलेल्या पाहुण्याला लग्न कसे पार पडेल ही काळजी नसते पण घरातल्या माणसाला फार काळजी वाटते. आपल्या प्रपंचात आपण पाहुण्यासारखे वागू या. देहादिक सर्व रामाला अर्पण करून निश्चिंत होऊ या. सोन्यामोत्याचे दागिने घालणारी श्रीमंताची बाई असू द्या बेताचे लहान दागिने घालणारी मध्यम स्थितीतली बाई असू द्या किंवा चांदीची जोडवी आणि नुसते मंगळसूत्र घालणारी अगदी गरिबाची बाई असू द्या त्या सर्वांना कुंकू ज्याप्रमाणे सारखेच असते त्याप्रमाणे कसलाही भेद न ठेवता नाम हे सर्वांना सारखेच साधन आहे. सूर्य हा फक्त प्रकाश देतो पण त्यामुळे अंधार आपोआप नाहीसा होतो. तसेच नाम हे भगवंताचे प्रेम वाढविते; मग आपले दोष आपोआपच नाहीसे होतात. भगवंताचे अस्तित्व आपल्याला जास्त पटत चालले किंवा भगवंताच्या कर्तृत्वाची साक्ष जास्त जास्त अनुभवास येऊ लागली की परमार्थामध्ये आपली प्रगती झाली असे समजावे.

२२. जगण्याकरता श्वास घेणे जसे मनुष्यास जरूरीचे आहे तसेच भगवंताच्या भेटीसाठी प्रत्येक श्वासाबरोबर नाम घेणे अगत्याचे आहे. 

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

January 21, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २१ जानेवारी २०१४

 २१ जानेवारी 

नामाचा अनुभव 



नामाचा अनुभव कोणता ? नामाचा अनुभव नामाव्यतिरिक्त दुसर्‍या कशात पाहू नये; म्हणजे नामापासून दुसरे काही मिळवायचे आहे ही कल्पनाच नसावी. नाम मुखी येते हाच नामाचा अनुभव. ज्या प्रमाणात आपल्या हातून नामस्मरण घडले त्या प्रमाणात आपल्याला नामाचा अनुभव आला असे समजावे. अखंड नामस्मरण टिकले की पुरा अनुभव आला. नामस्मरण करता करता चित्त एकाग्र होते. देहबुध्दी विसरून नाम घेणे हेच निर्गुण होणे आहे. मी कोण आहे हे कसे ओळखावे? मी कोण आहे हे ओळखायला जडाने म्हणजे वाचेनेच नाम घेण्यास सुरूवात करावी आणि ते नाम अखंड घेण्याचा प्रयत्‍न करावा. मग ते मनाने आतल्याआत होऊ लागते. पहिल्यानेच आपल्या प्रयत्‍नाने मनाला नामाचे वळण लावण्याच्या नादी लागू नये कारण ते फारच अवघड आहे. नाम घेता घेता देहाचा विसर पडल्यावर मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळेल. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दु:खाची जाणीव नसल्यावर दु:ख असले म्हणून बिघडले कुठे ? काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आहे. खाचखळगे काठीच्या योगाने टाळता येतात तसे मोह लोभ इत्यादि संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात. विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे. हाच नामाचा अनुभव. पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत; जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाहीत त्याचे मनन करीत नाहीत; आणि मनन करून ज्यांना ते पटले ते पटले असूनही नाम घेत नाहीत. अडचणी असल्या तरी नाम घेता येते. म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका. सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो. आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा. स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्याच पण त्यांच्यावाचून अडून बसू नये. भगवंताचे स्मरण हे मुख्य आहे. अखंड नामस्मरण ठेवायला सोवळयाओवळयाचे बंधन नाही. अखंड स्मरणच सोवळे आहे. उपासना कोणतीही असली तरी नामाशिवाय ती पचनी पडत नाही. महत्त्व नामाला आहे. निरनिराळया देशातले अन्न निरनिराळे असू शकते पण ते पचविण्याकरिता लागणारे पाणी इथून तिथून सर्व सारखेच. पाण्याशिवाय कोणतेही अन्न पचणार नाही. त्याप्रमाणे उपासनारूपी अन्नाला पचविण्यासाठी नामरूपी पाण्याची जरूरी आहे. म्हणून नामाला महत्त्व देऊन ते सतत घेण्याचा अभ्यास करावा. कसाही प्रसंग आला तरी नामस्मरण सोडू नका. त्यातून परमात्मा हात देईल.

२१. नाम घ्यायला स्वत:चीच आडकाठी असते. ती दूर केली तर नामाचा अनुभव आल्यावाचून राहणार नाही.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

January 20, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २० जानेवारी २०१४

प्रवचनाची ध्वनी फीत ऐकण्यासाठी खालील बटनावर टिचकी मारावी
 २० जानेवारी 
जेथे नाम तेथे राम । 



नामाशिवाय जो जो विश्वास । ते ते अविश्वासाचे कारण आहे खास ॥
नामाविण मानी सत्य । नाही त्याने जोडला भगवंत ॥
नामाविण मानी जग । त्याचा होऊ देऊ नये विटाळ ॥
नामाची जेथे मस्ती । तेथे रामाची वस्ती ॥
याहून जे जे वाटले सुख । ते तेच दु:खाला कारण ॥
 देवळे सभामंडपे न येत कामा । ज्याने नाही ठेविले हृदयी रामा ॥
राम करून घ्या आपुलासा । तोडा तोडा जन्ममरणाचा फासा ॥
 राम एक दाता । त्याचेवाचून नाही कोणी देता ॥
नामाचे अनुसंधान । प्रपंचात सर्वांचे समाधान ॥
 जे जे होईल समाधानाचेच कारण । रामास व्हावे अर्पण ॥
 मोह ममता देहाचा अभिमान । हा संसाराचा पसारा जाण । तेथे ठेवू नये मन ॥
नाही देहाला कष्ट देऊ । अनुसंधान न द्यावे बिघडू ॥
 नामात आहे समाधान । हा विश्वास ठेवावा पूर्ण ॥
 मी मागतसे एक दान । ते द्यावे तुम्ही सर्वांनी ॥
 नामापरते नका मानू सुख । रामापायी करून घ्यावे आपणास अर्पण ॥
 याहून नको मज काही । एवढी भीक घालावी सर्वांनी ॥
 व्यवहार लौकिक विषयाची आवड । हेच परमार्थाला मुख्य येई आड ॥
त्यांना सारावे बाजूस । एक भजावे भगवंतास ॥
नाही सत्य मानू जगी काही । रामाचा आसरा घ्यावा हृदयी ॥
जोपर्यंत देहाचा संबंध । तोपर्यंत लौकिकाची चाड ॥
प्रपंचाच्या थोडया सुखासाठी । नाही अंतर देऊ जगजेठी ॥
चार वेद सहा शास्त्रे । सर्व केल्या स्मृति पारायण ।
तरी पण जोवरी मन नाही झाले स्थिर । तोवर तेथे कोठे समाधान ? ॥
सर्व शास्त्रांचे सार । एक भजावा रघुवीर ॥
 नामी ठेवावे लक्ष पूर्ण । तेणे होईल समाधान ॥
 नामाची धरावी कास । देहादिक प्रपंचात न व्हावे उदास । हे सर्व साधे राखता अनुसंधान ॥
 आता करण्याचे उरले काही । हे किंचितही न आणावे मनी ॥
 मनाने व्हावे रामार्पण । सर्व सत्कर्म साधनांचा कळस जाण ॥
चित्त ठेवावे रामापाशी । ध्यास असावा त्याचा अहर्निशी ॥
 देहाने नाही करता आले । मन रामापायी गुंतवले । रामाने त्याचे कल्याण केले ॥
 राम ठेवील त्यात समाधान । हेच खरे भक्तीचे लक्षण जाण ॥
गुरूकडून घेतलेले नाम । पावन करील जगास ।
हाच ठेवावा विश्वास । राम कृपा करील खास ॥
देहाची स्थिती । कायम न राहे निश्चित ॥
 ते सांभाळणे आहे जरूर । न विसरता रघुवीर ॥
 रामा तुझ्याकरिता राहिलो । हा भाव ठेवावा निश्चित ।शक्य तो स्मरावा रघुपति ॥

२०. रामचरणी लावावे मन । इतुके करावे तुम्ही थोडेफार । नाही करू दुसरी यातायात जाण ॥ 

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

January 19, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १९ जानेवारी २०१४

प्रवचनाची ध्वनी फीत ऐकण्यासाठी खालील बटनावर टिचकी मारावी
 
 १९ जानेवारी
 नाम व प्रारब्धभोग.



 नामाचा संबंध प्रारब्धाशी कसा आहे असे पुष्कळ लोक विचारतात. हा प्रश्न एका दृष्टीने फार महत्वाचा आहे. बहुतेक लोक प्रारब्ध टळावे म्हणून नाम घेतात. देहाचे सुखदु:ख हे माझेच सुखदु:ख आहे किंबहुना देह सुखी तर मी सुखी आणि देह दु:खी तर मी दु:खी अशी सामान्य मनुष्याची अवस्था असते. बरे प्रारब्धाचे भोग हे आजपर्यंत कोणालाही चुकले नाहीत. मग कसे करावे ? इथे असे लक्षात ठेवावे की प्रारब्धाची गती फक्त देहापुरतीच असते; म्हणून ज्याची देहबुध्दी कमी झाली तो देहाच्या सुखदु:खाने सुखी वा दु:खी होत नाही. नामाने देहबुध्दी कमी होते. म्हणून नामात राहणारा मनुष्य प्रारब्धाचे भोग भोगीत असताना देखील आनंदात असतो. नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहात नाही. नामाचे सामर्थ्य फार विलक्षण आहे. पूर्वी घडलेले अपराध नाम नाहीसे करते. वाया गेलेल्या माणसांना नाम तारते. नाम हा सर्व प्रार्थनांचा सेवेचा पूजेचा राजा आहे. आनंदमय अशा भगवंताचे सान्निध्य नामाने लाभते आणि त्याची कृपा व्हायला वेळ लागत नाही; किंबहुना ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याच्याच मुखात नाम येते. सर्व काळी सर्व ठिकाणी सर्व अवस्थांमध्ये कोणालाही करता येण्यासारखे नाम हेच एक साधन आहे. नामाला उपाधी अत्यंत कमी असल्याने निरूपाधिक भगवंताशी नाते जोडायला नामासारखे साधन नाही. खरोखर किती प्रकारांनी तुम्हांला मी सांगू ! अखंड नामात राहणे यालाच मोक्ष म्हणतात. अखंड नामात जगणे यालाच पराभक्ती म्हणतात. जो नामात अखंड गुंतला त्यालाच संत म्हणतात. नामात प्रेम येणे ही संतांची खरी खूणच आहे. तेव्हा माझे एवढे ऐका: नामाला कदापिही विसरू नका. प्रारब्धाच्या भोगांना न कंटाळता भगवंताने ज्या स्थितीत आपल्याला ठेवले असेल त्यामध्ये समाधान माना पण केव्हाही त्याच्या नामाला विसरू नका. नामाने पापी माणसे पुण्यवान बनतात. देहबुध्दी कमी होणे हेच पुण्य होय, आणि ते नामाने प्राप्त होते. नामाने कलीची सत्ता नाहीशी होते. वाईट किंवा विषयाच्या वासनेने बुद्धी भ्रष्ट करणे हेच कलीचे मुख्य लक्षण होय. त्याच्या मुळावर घाव घालण्याचे काम नाम घेतल्याने होते म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही आणि प्रारब्धाची क्षिती नाही. नामाने पुण्यशरीर बनते. ज्याच्या अंतरात नाम असते तिथे भगवंताला यावे लागल्याने त्याच्या शरीरात सत्त्वगुणाची वाढ होते आणि तो पुण्यवान बनतो. देह प्रारब्धावर टाकून आणि आपण त्याहून निराळे राहून जे होईल त्यात आनंद मानावा. भोग प्रारब्धाने येतात असे म्हणण्यापेक्षा ते भगवंताच्या इच्छेने येतात असे म्हटले की समाधान मिळेल.

 १९. भगवंताला स्मरून काम करीत असताना जे योग्य दिसेल ते त्याच्या इच्छेनेच आहे असे समजून काम करावे. जो असे करील त्याला समाधान झालेच पाहिजे.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

January 18, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १८ जानेवारी २०१४

प्रवचनाची ध्वनी फीत ऐकण्यासाठी खालील बटनावर टिचकी मारावी



१८ जानेवारी
 नाम निष्ठेने घ्यावे.



 नाम श्रध्देने घेणे म्हणजे काय ? तर आपल्या गुरूने किंवा ज्याच्याबद्दल आपली पूज्य भावना असते अशा व्यक्तीने सांगितले म्हणून घेणे. अशा श्रद्धेने नाम घेणार्‍याच्या मनात शंका येत नाही. ही स्थिती फार भाग्याची पण तितकीच दुर्मिळ. निष्ठेने नाम घेणे म्हणजे शंकारहित नाम घेणे. शंका अनेक तर्‍हेच्या असतात. नाम घेताना भगवंताकडे लक्ष नसले तर त्या नामाचा उपयोग आहे की नाही, नाम घेताना बैठक कोणती असावी, दृष्टि कशी असावी, शुचिर्भूतपणेच नाम घ्यावे किंवा कसे, अशा तर्‍हेच्या अनेक शंका मनात येतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, आपण जे नाम घेतो ते भगवंतापर्यंत पोहोचते की नाही, ह्या एका शंकेत सर्व शंकांचा समावेश होतो. भगवंत आणि त्याचे नाम एकरूपच असल्याने त्या दोहोंच्या आड काहीच येऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागून आपण चाललो असताना आपल्या तोंडून त्याचे नाव उच्चारले गेले तर तो लगेच मागे वळून बघतो. ही जर मनुष्याची स्थिती तर भगवंताच्या बाबतीत त्याचे नाव त्याच्यापर्यंत पोहोचत नाही हे कसे शक्य आहे? खरे पाहिले तर भगवंताचे नाव त्याच्याच कृपेने आपल्या मुखात येते; म्हणजे त्याचे नाव तोच घेत असतो; मग नाम भगवंतापर्यंत पोहोचते की नाही ह्या शंकेला वावच कोठे राहिला ? समजा दोन माणसे जेवायला बसली. त्यांतल्या एकाच्या मनात काही विचार घोळत असून त्याचे जेवणाकडे लक्ष नव्हते, पण हाताने तोंडात एकेक घास घालण्याचे काम चालू होते. दुसरा इसम मात्र लक्षपूर्वक जेवण जेवीत होता. दोघेही जेवून उठले. ह्यात उपाशी कोण राहिला ? दोघांचीही पोटे भरलीच ! तसे नाम घेतल्यानंतर त्याचा उपयोग झाला नाही असे कसे होईल ? समजा आपण परगावच्या एका अनोळखी इसमाला पत्र लिहून त्याला बोलाविले; तो आला आणि त्याने सांगितले की, 'तुम्ही ज्याला पत्र पाठविले तोच मी', तर त्याच्या वचनावर विश्वास ठेवून आपण त्याला जवळ करतो. तसे, भगवंताने सांगितले आहे की 'जेथे माझे नाम तेथे मी पुरूषोत्तम'; तर मग या वचनावर विश्वास ठेवून नाम घ्यावे आणि त्यातच त्याला पहावे, असे का करता येऊ नये ? हीच श्रध्दा. आपण ज्याचे पोटी जन्माला आलो त्याचेच नाव आपल्या पुढे लावतो तसे भगवंताच्या बाबतीत करावे. त्याचेच नावाने जगावे; म्हणजे माझा सर्व कर्ता, रक्षिता तो एकच असून त्याच्याशिवाय माझे या जगात दुसरे कोणीही नाही, या भावनेने राहावे. असा जो भगवंताचा होतो त्याचे महत्व भगवंत स्वत:पेक्षाही वाढवतो.

 १८. नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी. 

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

January 17, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १७ जानेवारी २०१४

प्रवचनाची ध्वनी फीत ऐकण्यासाठी खालील बटनावर टिचकी मारावी



 १७  जानेवारी
 नाम व इतर साधने.



 नवविधा भक्तीचा श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण इत्यादि क्रम हा सृष्टिक्रमाला धरून आहे. मनुष्यप्राणी जन्माला आला की शिकायला सुरूवात करतो ती श्रवणापासूनच. मुके लोक बहिरे असलेच पाहिजेत, कारण श्रवण न झाल्याकारणानेच त्यांना बोलता येत नाही. मनुष्यप्राणी ज्या देशात जन्माला येतो त्या देशाची भाषा बोलतो. म्हणून श्रवणानंतर कीर्तन म्हणजे बोलणे; आणि बोलणे झाल्यानंतर कृती म्हणजे नामस्मरण असा स्वाभाविक क्रम लागतो. नामस्मरण होऊ लागले की आपले काम झाले कारण पुढल्या सर्व भक्ती नामस्मरणात येतात. त्यांच्याकरिता निराळी खटपट करण्याचे कारण नाही. एका इसमाला दुसर्‍या एकाला भेटण्यासाठी नऊ मैल अंतरावर असलेल्या ठिकाणी जायचे होते म्हणून तो घरातून निघाला. पण तीन मैल चालून गेल्यावर ज्याला भेटायचे होते तोच मनुष्य त्याला भेटला. अशा वेळी आपले काम झाले म्हणून तो जसा पुढे जाण्याच्या खटपटीत पडणार नाही, त्याचप्रमाणे तिसरी म्हणजे नामस्मरणभक्ती केल्याने पुढल्या सहाही प्रकारच्या भक्तींचे फळ मिळते. भगवंताच्या स्मरणात सर्वस्व आहे ही अगदी खूणगाठ बांधून ठेवा. भगवंताचे स्मरण कसे आहे ? बाकी सगळया गोष्टी, सगळी सत्कर्मे, दानधर्म म्हणा, तीर्थयात्रा म्हणा, पारायण म्हणा, बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या इंद्रियांसारख्या आहेत. ही सगळी इंद्रिये मानली तर भगवंताचे स्मरण हा प्राण आहे. बाकीची सर्व इंद्रिये जरी असली आणि प्राण नसेल तर इंद्रियांचा काही उपयोग नाही. तेव्हा नामस्मरण हा प्राण समजून तुम्ही प्रपंचात सुखी राहा. कर्तव्याला चुकू नका, कर्तव्य करीत असताना परमात्म्याचे स्मरण राखा; मुखामध्ये राम असू द्या. भक्ताने उपाधी बेताची, म्हणजे गरजेपुरतीच ठेवावी. भगवंताचे अनुसंधान न चुकेल एवढीच उपाधी असावी. तसेच पचेल तेवढेच म्हणजे आनंदाने जेवढे करवेल तितकेच नामस्मरण करावे. ते कष्टाने करू नये कारण त्यापासून आनंद होणार नाही. नामात प्रेम येणे जरूर आहे, याकरिता ते नाम अत्यंत आवडीने आणि त्याच्याशिवाय दुसरे काही साधायचे नाही आहे अशा भावनेने घेतले पाहिजे, म्हणजे त्यात प्रेम येईल. नामात प्रेम येणे ही फार उच्च कोटीची स्थिती आहे. ती अगदी सहजासहजी प्राप्त होणारी नाही. म्हणून यातले मर्म ओळखून योग्य तर्‍हेने आणि चिकाटीने सतत नामस्मरणाचा अभ्यास ठेवणे जरूर आहे. भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही असे ज्याला कळले त्याला सर्व कळले.

१७. नामस्मरणाची बुध्दी झाली की आपले काम झाले 
 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

January 16, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १६जानेवारी २०१४

प्रवचनाची ध्वनी फीत ऐकण्यासाठी खालील बटनावर टिचकी मारावी




 १६ जानेवारी 
नामाकरताच नाम घ्यावे. 

 नाम हे निसरडयासारखे आहे. निसरडयावर गवत वाढत नाही आणि त्याच्यावर पाय पडला तर घसरतो त्याप्रमाणे नाम आपल्यावर उपाधी ठरू देत नाही. त्याला कोणत्याही उपकरणाची गरज लागत नाही. रोगी-निरोगी, विद्वान-अडाणी, श्रीमंत-गरीब, लहान-थोर, स्त्री-पुरूष, जात-गोत, यांपैकी कोणतीही गोष्ट असली तरी अडत नाही, नसली तरीही अडत नाही. नामाशिवाय दुसर्‍या कोणत्याही साधनाला शक्ती, बळ, पैसा वगैरे कोणत्या तरी गोष्टीची मदत लागते. असे हे अत्यंत उपाधिरहित असलेले नाम आपणही अत्यंत उपाधिरहित होऊन घेतले तरच त्यात आपल्याला प्रेम येईल. आपण उपाधिरहित होणे म्हणजे नाम हे केवळ नामाकरिताच, स्वत:च्या कल्याणाकरिताच घेणे, जगातल्या दुसर्‍या कशाहीकरिता न घेणे. आपण जर ते सकाम बुद्धीने घेतले तर इच्छित कार्यभागही साध्य होत नाही आणि आपले कल्याणही साधत नाही. सकाम नाम घेणे हे किती वाईट आहे हे सांगणे फार कठीण आहे. असे पहा की स्त्री ही अत्यंत पवित्र आहे, कारण देव, संत यांसारख्या विभूतिही तिच्यापोटी जन्म घेतात; अशा स्त्रियांना पळवून नेऊन अनीतीने वागायला भाग पाडून त्यावर पैसे मिळविण्याचा धंदा काही लोक करतात ही किती निंद्य गोष्ट आहे बरे ! पण सकाम नाम घेणे ही गोष्ट त्याच्याहीपेक्षा कितीतरी पटीने अधिक निंद्य आहे. म्हणून नाम हे नामाकरिताच घ्यावे, त्याचा संबंध आपल्या इच्छा-अपेक्षांशी ठेवू नये. नामाकरिता नाम घेतल्याने मन आपोआप अंतर्मुख होऊन जाते. नामाच्या साहाय्याने मन अंतर्मुख केल्यावर आनंद सापडतो. आपल्या हृदयातच तो सापडतो. आपण तीन गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. पहिली, आचरण अगदी शुध्द ठेवावे; दुसरी, नामाला कधीही सोडू नये; आणि तिसरी, माझा सांभाळ करणारा कुणीतरी -म्हणजे सदगुरू - आहे ही जाणीव जागृत ठेवावी. प्रत्येक माणसाला कशाचीतरी विशेष आवड असते; त्या आवडीमध्ये राहावे आणि त्यात जबरीने नाम घ्यावे. आत्मज्ञान व्हावे म्हणून त्याच्या मागे लागले तर ते लवकर होत नाही. भगवंताकडे लक्ष लागले म्हणजे ते आपोआप होते. भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे. उत्तम वस्तू नेहमी थोडीच असते. श्रीखंडामध्ये चक्का आणि साखर कितीतरी असते पण केशर किती थोडे घालावे लागते! तसे भगवंताच्या नामाचे आहे. रोज थोडे पण अगदी मनापासून आणि मोबदल्याची अपेक्षा न करता नाम घ्यावे ते फार काम करील. भगवंत हा सर्वसत्ताधीश खरा पण एका बाबतीत तो लुळापांगळा होतो व सहज अडकतो. भुंगा जसा लाकूड पोखरतो पण कमळांत अडकतो तीच स्थिती नामाच्या बाबतीत भगवंताची होते.

१६. पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन आहे.
 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

January 15, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १५ जानेवारी २०१४


प्रवचनाची ध्वनी फीत ऐकण्यासाठी खालील बटनावर टिचकी मारावी


 १५ जानेवारी
 नामात असणे म्हणजे शुद्धीवर असणे.


 दारूड्यांच्या मेळाव्यात सारेच धुंदीत असतात. पण त्यांतला एखादा दारू न प्यालेला असला तर बाकीचे दारूडे त्याला 'हा शुध्दीवर नाही' असे म्हणत असतात. वास्तविक तोच एकटा शुध्दीवर असून बाकीचेच खरे गैरसावध असतात. त्याप्रमाणे आपण सर्वजण विषयात दंग असल्याकारणाने, जो नामात असतो त्याला आपण 'हा शुध्दीवर नाही' असे म्हणत असतो. वास्तविक पाहता, 'नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही' अशी ज्याची दृढ भावना असते तोच खरा शुद्धीवर असतो, व आपण मात्र भ्रमात असतो. आपल्याला झालेला हा भ्रम नाहीसा करायला तीन उपाय आहेत. एक सद्विचार, दुसरा सत्संगती, आणि तिसरा नामस्मरण. भगवंताचा विचार हाच खरा सद्‌विचार. एखाद्या माणसाला म्हटले की तुझे अवयव आणि रंग यांच्याशिवाय ये, तर त्याला येता येणार नाही; कारण तो जिथे आहे तिथे त्याचा रंग आणि अवयव हे असणारच. त्याचप्रमाणे नाम, संत, आणि भगवंत हे एकमेकांना चिकटूनच आहेत, त्यामुळे जिथे नाम आहे तिथे सत्संगती आणि भगवंत असतातच. वासरू घेऊन गेले म्हणजे जशी गाय पाठीमागून आपोआप येते, त्याप्रमाणे नाम घेतले की भगवंत त्यामागे येतोच. आजकाल इतकी यंत्रे निघाली आहेत, मग भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांनी एखादे यंत्र शोधून काढले नाही का, असा प्रश्न एखाद्याच्या मनात येईल, तर त्याचे उत्तर सोपे आहे. असे यंत्र संतांनी केव्हाच शोधून काढले नाही का असा प्रश्न एखाद्याच्या मनात येईल तर त्याचे उत्तर सोपे आहे. असे यंत्र संतांनी केव्हाच शोधून काढले आहे. त्या यंत्राचे नाव आहे 'रामनाम.' हे यंत्र सर्वांना मिळू शकते, सर्वांना वापरता येते, शिवाय ते कधीच गंजत नाही. भक्त, भगवंत आणि नाम हे तिन्ही एकरूपच आहेत. जिथे नाम आहे तिथे भक्त आहे, आणि तिथेच भगवंत आहे. म्हणून नाम सर्वांत श्रेष्ठ आहे. ते नाम अनन्य होऊन आपण घेऊ या. नाल्यातून, गटारातून पाणी वाहते, ते किती घाण असते ! पण ते नदीला मिळते आणि ती सागराला मिळते. सागर त्या सर्वांना सागररूप करून टाकतो. तसे मनुष्य कितीही पापी, दोषी, अपराधी असू द्या, त्याने नामनदीची कास धरली की तो रामसागररूप झालाच म्हणून समजा. भगवंताला विसरणे हे सर्वांत मोठे पाप आहे. नामाने भगवंताचे स्मरण होते म्हणून नामाने पाप नाहीसे होईल. अनाथ शब्द नाथावाचून नाही, आणि नाथाला अनाथावाचून नाथत्व नाही. राम सर्वांचा नाथ आहे. त्याच्या अखंड स्मरणात आपण राहू या. प्रपंच वनवासासारखा आहे. रामाच्या स्मरणात प्रपंचातली संकटे आणि दु:खे कस्पटाप्रमाणे वाटतील. .

१५. तुम्ही नाम घेत गेलात तर तुम्हांला संत धुंडीत जाण्याची जरूरीच नाही, तेच तुम्हांला धुंडीत येतील.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

January 14, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १४ जानेवारी २०१४

प्रवचनाची ध्वनी फीत ऐकण्यासाठी खालील बटनावर टिचकी मारावी


 १४ जानेवारी 
नाम घेण्याला काहीही आड येत नाही.



 आपण असे पाहू की नामात प्रेम येण्याकरता एक एक सत्कर्म करीत राहणे सुलभ, की ते नामच विचाराने, सर्व संतांनी कळवळ्याने सांगितले आहे म्हणून, जरूर तर बळजबरीनेसुद्धा घेत राहणे हे सुलभ. समजा एक यंत्र आहे त्यात पुष्कळ चक्रे आहेत, आणि ते यंत्र चालू करण्याचा हेतू धरला आहे. आता एखाद्याने त्यातले एखादेच चक्र चालू करू म्हटले तर ते चालू होईलच असा भरवसा नाही. पण त्या सर्व चक्रांचा संबंध असणारी कळ आपण दाबली तर मात्र बिनतक्रार आणि अत्यंत अल्प प्रयासाने ते य्रंत्र सहज चालू करता येईल. त्याप्रमाणे, नाम ही कळ जर धरली तर सत्कर्मरूपी सर्व चक्रे एकदम फिरू लागून आपले काम निश्चितपणे आणि सुलभपणे होईल. म्हणून, हमखास आणि सहज रीतीने काम व्हावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने कशाही रीतीने का होईना नाम घ्यायला लागावे. नाम घ्यायचे एकदा पक्के ठरविले म्हणजे काहीही आड येत नाही. व्यवहारात आपण पाहतोच की एखादी गोष्ट समर्थनीय नसली तरी करायचा निश्चय केला की मनुष्य ती करतोच. मग नाम घेण्याचा निश्चय केला तर का नाही होणार ? काहीही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही; तर मग ते घेण्यात विलंब किंवा चालढकल करण्यात काय अर्थ आहे ? म्हणून कोणत्याही तऱ्हेच्या शंकाकुशंका न घेता कशाही तऱ्हेने पण नाम घेत राहावे हे उत्तम; म्हणजे विनाकारण काळ फुकट घालविला अशी पश्चातापाची वेळ येणार नाही. जग हे अनेक मोहक वस्तूंनी भरले आहे. त्या वस्तू आपण पाहिल्या किंवा नुसत्या ऐकल्या तरी हव्याशा वाटतात; आणि त्या मिळविण्याचा आपण प्रयत्‍न करतो. म्हणून देवाजवळ आपण अशी प्रार्थना करावी की, 'देवा मोहक वस्तू मला दाखवूच नकोस, कारण माझी इच्छा तिकडे जाईल आणि मी फसेन. देवा, माझे खरे हित आहे तेच मला दिसो, तेच मी ऐको, त्याचेच मला स्मरण होवो, आणि त्याचीच मला गोडी लागो. प्रल्हाद द्रौपदी यांसारख्या भक्तांनी देवाजवळ काय मागितले ? तेच आपण मागावे, आणि त्यांनी निष्ठा ठेवली तशीच आपणही ठेवावी. त्यांच्या ठिकाणी जसे वैराग्य होते, तसे आपल्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्‍न करावा. प्रयत्‍न करीत असताना प्रथम चुका होतील पण त्या झाल्या तर पश्चाताप व्हावा. 'देवा, मी फार दोषी, अपराधी आहे, मला क्षमा कर आणि तुझ्या कृपेला पात्र कर. पश्चाताप खराच झाला तर राम कृपा करीलच. मुखाने नाम घ्यावे, हाताने प्रपंचाचे काम करावे, आणि अंत:करणात समाधान ठेवावे.

१४. जो नाम घेऊ लागेल त्याचे मन बाहेर धावण्याचे हळूहळू कमी होते. 

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

January 13, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १३ जानेवारी २०१४

प्रवचनाची ध्वनी फीत ऐकण्यासाठी खालील बटनावर टिचकी मारावी

 १३ जानेवारी
 नाम आणि सत्कर्म. 


नाम हा सत्कर्माचा पाया आहे तसाच कळसही आहे. भगवंताच्या स्मरणात केलेले सत्कर्म या सदरात पडू शकते; भगवंताच्या विस्मरणात केलेले कर्म सत्कर्म ठरू शकत नाही. समजा एखादा मनुष्य नुसते तोंडाने 'राम राम' म्हणतो आहे परंतु भगवंताच्या स्मरणात नाही, तर मग 'राम राम' म्हणण्याची त्याची क्रिया सत्कर्म म्हणता येईल का ? वास्तविक, नाम हे स्वतःसिद्ध असल्याने ते जाणता वा अजाणता म्हटले तरी ते सत्कर्म याच सदरात पडते, कारण 'जेथे माझे नाम तेथे मी पुरूषोत्तम' असे भगवंताचेच वचन आहे. म्हणून नामाचा उच्चार आणि भगवंत या दोन्ही गोष्टी निराळया असूच शकत नाहीत. मुखाने नाम घेणाऱ्याचे लक्ष भगवंताकडे असो वा नसो, ते सत्कृत्य याच सदरात पडते. इतर कर्मे आणि नाम घेण्याचे कर्म यांत जो मोठा फरक आहे तो हाच की इतर कर्मांना पूर्णत्व किंवा सत्यत्व नामाने येते, तर उलटपक्षी नाम आणि अपूर्णत्व या गोष्टी एकत्र संभवतच नाहीत. म्हणून नाम भगवंताच्या स्मरणात घेतले किंवा कसे हा प्रश्नच उद्‍भवत नाही. किंबहुना नाम मुखी आले की सत्कर्मे होऊच लागतात. मूल झाले की मुलाच्या आईला पान्हा फुटणे, मुलाचे लाड करणे, त्याच्यावर सर्वतोपरीने प्रेम करणे, या गोष्टी जशा न शिकविता सहजच होतात, तशीच स्थिती नाम घेणाराची सत्कर्माच्या बाबतीत होते. इतकेच नव्हे तर, त्या आईला जर म्हटले की तू मुलाला जवळ ठेव, पण त्याच्यावर प्रेम वगैरे काही करू नकोस, तर ते जसे तिला शक्य नाही, त्याचप्रमाणे नाम घेणाराला सत्कर्मे टाळू म्हटले तरी टाळता येणार नाहीत. सत्कर्मे फळाला आली असे केव्हा म्हणता येईल, तर भगवंताचे नाम मुखी येईल तेव्हाच. परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे की, "तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना ? मग तू प्रपंच अती दक्षतेने कर, प्रयत्‍नाला कधी मागे पाहू नकोस, पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस, आणि मी जे सांगतो ते औषध घे, ते तुला सर्व रोगांतून मुक्त करील; आणि ते औषध जर कोणते असेल तर ते माझे 'नाम' हे होय." त्या नामाचा खरोखर तुम्ही अभ्यास करा. तुम्ही सर्वांनी असा निश्चय करा की नामाशिवाय जगणे हे खरे नाही. नामाशिवाय जगू नये असे मला खरोखर मनापासून वाटते. नामावरची निष्ठा कसे काम करते हे निष्ठेने नाम घेणारालाच कळेल. नामाचे प्रेम ज्याला लागले त्याच्या मागे परमात्मा उभा राहिला हे अगदी सत्य सत्य, त्रिवाचा सत्य सांगतो. म्हणून आवडीने आणि प्रेमाने भगवंताचे नाम घ्या, एकदा तरी त्याला कळकळीने 'रामा !' अशी हाक मारा, की भगवंताला तुम्हाला येऊन भेटावेसे वाटले पाहिजे.

१३. सत्कर्माचा शेवट भगवंताच्या नामाचे प्रेम उत्पन्न होण्यातच होणे जरूर आहे. 

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

January 12, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १२ जानेवारी २०१४

प्रवचनाची ध्वनी फीत ऐकण्यासाठी खालील बटनावर टिचकी मारावी

 १२ जानेवारी 
नाम व भगवंत. 



 'राम राम' म्हणून राम कसा भेटेल या विचारण्यात काहीच अर्थ नाही. उलट असे म्हणता येईल की, 'राम राम' म्हटल्याशिवाय राम भेटणेच शक्य नाही. व्यवहारातही आपला हाच अनुभव आहे. समजा, आपल्याला एका गावाला जायचे आहे म्हणून आपण स्टेशनवर गेलो, आणि जिथे जायचे आहे त्याचे सर्व वर्णन केले पण नाव सांगता आले नाही, तर आपल्याला तिकीट मिळेल का ? उलट, त्या गावातली माहिती काही नाही पण नाव ठाऊक आहे, तर आपल्याला तिकीट मिळून तिथे जाता येईल. म्हणजे ठिकाण माहितीचे आहे पण नाव तेवढेच न आठवले तर काहीही उपयोग होत नाही. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, बाकी सर्व केले पण नाम नाही घेतले तर काही उपयोग होत नाही; म्हणून नाम घेणेच जरूर आहे. नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी. भगवंताच्या नामाची गरज दोन तर्‍हेने आहे; एक प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी, आणि दुसरी, भगवंताच्या प्राप्तीसाठी. खायला-प्यायला पोटभर, बायकोमुले, घरदार वगैरे सर्व गोष्टी असल्या तरीसुध्दा आपल्याला काळजी आणि तळमळ का असते हे आपल्याला कळत नाही. याचा अर्थ, दुःखाचे खरे स्थान कुठे आहे हे कळत नाही. ते कळण्याकरिता भगवंताच्या नामाची गरज आहे. भगवंताची तळमळ लागेपर्यंत नामाची जरूरी आहे; नंतर, भगवंतावाचून आपल्याला दुसरा आधार नाही म्हणून नाम घ्यायला पाहिजे; आणि शेवटी, भगवंताच्या दर्शनानंतर नाम संवयीने आपोआप येते. एकूण, आरंभापासून शेवटपर्यंत भगवंताचे नामच शिल्लक राहते. जो नामस्मरण करील आणि त्याचे अनुसंधान ठेवील त्याला भगवंताची जिज्ञासा आपोआप उत्पन्न होईल. नामाकरिता नाम घ्या की त्यात राम आहे हे कळेल. नाम घेताना जे घडेल ते चांगले आणि आपल्या कल्याणाचे आहे असा भरवसा ठेवा. भगवंताचे नाम हीच सच्चिदानंदस्वरूप सद्‍वस्तू होय. भगवंताच्या नामात जो स्वत:ला विसरला तो खरा जीवनमुक्त होय. जे काय साधायचे ते हेच. बाकीच्या गोष्टी स्वप्नासारख्या समजाव्यात. त्या प्रचीतीस येतात पण नसतात. देहाशी असलेले आपले तादात्म्य हे एक प्रकारच्या सवयीने आणि अभ्यासानेच झाले आहे. याच्या उलट अभ्यास करून भगवंताचे चिंतन केले तर जसे आज देहाशी तादात्म्य आहे त्याचप्रमाणे भगवंताशी आपले तादात्म्य होईल.

१२. सकाळी उठताना रात्री निजताना जेवायच्या आधी नाम घ्यायचेच आणि भगवंताची आठवण करायचीच असा नियम करावा. तो आयुष्यात फार उपयोगी पडेल. 

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )