March 26, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २६ मार्च २०१४

 २६ मार्च

प्रपंचातले विषयसुख हे खरे सुख नाही.



मनुष्य जगात कितीही मोठा असला तरी त्याच्या प्रपंचात काहीतरी न्यून असतेच. न्यूनता नाही असा प्रपंचच नाही. एखादा प्रापंचिक 'माझा प्रपंच पूर्ण आहे ' म्हणून सांगणारा भेटेल, परंतु 'चालले आहे असेच चालावे, यात कमी तर नाही ना कधी पडणार?' अशी त्याला काळजी असतेच; म्हणजे त्याला खरे सुख असे नसतेच. एखादा अत्यंत विषयी, त्याला कदाचित् काळजी नसेल. दारूच्या धुंदीत असणाऱ्याला राजाचीही पर्वा नसते, वस्त्राचीही शुद्ध नसते, आणि तो आपल्याच धुंदीत, आनंदात असतो; पण हे सर्व त्याची धुंदी उतरली नाही तोपर्यंतच. विषयातले सुख परावलंबी, विषयांवर अवलंबून असते. विषय हे नश्वर, आपल्यापासून कधी तरी जाणार; निदान आपल्याला तरी त्यांच्यापासून एक दिवस जावे लागणार. दुसरी गोष्ट म्हणजे, विषयाचे सुख इंद्रियाधीन असते. इंद्रिये विकल झाली म्हणजे सुख कसे मिळणार ? उद्या आपण मरणार हे समजले की कोणते विषय आपल्याला सुख देतील ? सारांश, विषयात सुख नाही. जे सुख होतेसे वाटते ते आपल्यातच असते, आणि ते विषयापासून मिळते अशी आपली फसवणूक मात्र होते.
तर मग सुख कशात आहे ? पुष्कळ वस्तू पुष्कळ मिळाल्या तर पुष्कळ सुख मिळते हा भ्रम आहे. खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे, सनातन सुख होय. ते सनातन वस्तूपाशीच, म्हणजे भगवंतापाशीच असते. आपल्याप्रमाणे पशूंनाही विषयसुख आहे; त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो कोणता ? मी कोण, कशासाठी आलो, असा विचार करणे याला सारासार विचार म्हणतात. प्रपंचातही आपण विचार करतोच; कशात आपला फायदा आहे, कशात आपला तोटा आहे, हे बघतो. पण सर्वच असार, त्यात सार ते कुठुन, कसे येणार ? असलेल्या परिस्थितीत आपण समाधान मानीत नाही. त्याहून अधिक सुखाच्या स्थितीची इच्छा धरतो. देवाची भक्ति करणे, संतांकडे जाणे, हे सुद्धा विषय मिळविण्याकरिता आपण करतो; मग ही आपली सेवा, भक्ति विषयांची झाली का संतांची ? देव, संत, यांचा उपयोग इतर गोष्टींप्रमाणे विषय मिळविण्याचे साधन म्हणून नाही का आपण करीत ? मांजर आडवे गेले की, आपले काम होणार नाही, ही भगवंताची सूचना आहे, असे समजून आपण परततो; पण एक बायको मेली की दुसरी करण्याच्या विचाराला लागतो ! सारांश, आपले ध्येयच विषय हे असते, आणि ते मिळविण्याची आपली खटपट असते. खरोखर, जो मनुष्य प्रपंचातला आपला अनुभव जमेस धरीत नाही, तो कशानेच शहाणा होत नाही.

८६. प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणे होय.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

No comments:

Post a Comment