May 2, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २ मे २०१४

२ मे

साधनात अत्यंत सावधगिरी पाहिजे. 

 



शेताची मशागत झाली, बी उत्तम पेरले, पाऊस चांगला पडला, आणि रोपही जोराने वर आले, तरी काम झाले असे नाही. कारण जसजशी एकेक पायरी पुढे जाईल तसतशी काळजी घेण्याची गरज असते. शेत वाढले तरी त्याचा नाश दोन कारणांनी होऊ शकतो, एक म्हणजे गुरेढोरे शेतात घुसून नाश करतील, किंवा दुसरे म्हणजे कीड पडून किंवा टोळधाडीसारखा उपद्रव होऊन शेत साफ नाहीसे होईल. यांपैकी पहिले कारण थोडे स्थूल आहे, तर दुसरे थोडे सूक्ष्म अहे. शेतात गुरेढोरे शिरली तर वरवर दृष्टी टाकूनही सहज समजते, किंवा त्यांना हाकलताही येते. पण कीड पडली तर जवळ जाऊन बारकाईने पाहावे लागेल. शेताला कुंपण घालून ढोरे आत शिरणार नाहीत असा बंदोबस्त करता येतो, आणि राख, शेण, औषधे, वगैरे टाकून, कीड न लागेल अशी तजवीज करता येते. हे सर्व करताना शेतकर्‍याला सतत जागृत राहावे लागते. म्हणजेच, एकसारखे शेतावर लक्ष ठेवावे लागते. हाच नियम परमार्थातही लागू पडतो. साधकाने अत्यंत काळजीने वागणे जरूर आहे.
शेताचे रक्षण व्हावे म्हणून जसे कुंपण, तसा संसार हा परमार्थाला कुंपण म्हणून असावा. कुंपणालाच जर खतपाणी मिळाले तर कुंपणच शेत खाऊन टाकते. तसे न होईल इतक्या बेताने संसाराला खतपाणी घालावे. शेताला कीड लागली की काय हे जसे बारकाईने पाहावे लागते, त्याप्रमाणे आपली वृत्ती कुठे गुंतते की काय याकडे बारकाईने लक्ष असावे. अशा सावधगिरीने वागले तर पीक येईपर्यंतचे काम झाले. पण 'पीक हातात आले, आता काय काळजीचे कारण ?' असे म्हणून भागणार नाही. पीक हातात आले तरी त्याची झोडणी झाली पाहिजे. पुढे दाणा दास्तानांत जपून ठेवले पाहिजेत; नाहीतर उंदीर, घुशी धान्य फस्त करतील. नंतर पुढे, जरूर लागेल तेव्हा ते कांडले पाहिजे. कांडतांनासुद्धा, दाणा फुटणार नाही इतक्या बेताने कांडले पाहिजे. अशा तर्‍हेने, आरंभपासून शेवटपर्यंत अगदी जागरूकतेने वागले पाहिजे, तरच साधकाची शेवटपर्यंत तग लागेल. नाहीतर मध्येच निष्काळजीपणामुळे, आणि सर्व काही हाती आले अशा भ्रमाने वागले, तर प्रगती थांबेल. अशी उदाहरणे फार आढळतात. म्हणुन अतिशय सावधगिरीने वागावे. जो साधक प्रपंचामध्ये असेल त्याला प्रपंची लोकांच्या संगतीत राहावे लागणार; पण त्याने फार सांभाळून राहायला पाहिजे. आपली वृत्ती केव्हा बदलेल याचा नेम नसतो. खरोखर, परमार्थ ही कठीण शिकारच आहे. शिकार अशी मारली पाहिजे, की आपल्या मीपणाला मारून आपण जिवंत राहिले पाहिजे, आणि आपल्याला नको तेवढेच गळून पडले पाहिजे.


१२३. सावधानता ठेवून नाम घ्यावे.
नामाची सतत धार धरावी. म्हणजे ते वृत्तीपर्यंत पोहोचते.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

No comments:

Post a Comment