May 28, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २८ मे २०१४

२८ मे

प्रपंच भगवंताचा मानून करावा. 

 



अमुक एक हवे किंवा अमुक एक नको असे न वाटणे याचे नाव वैराग्य. संकटकाळी, हे संकट नसावे असे न वाटता, परमेश्वराचे स्मरण असावे आणि त्याच्याजवळ हे मागावे की, 'देवा तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा देऊ नको.' देहाला मुद्दाम कष्ट देऊ नयेत, पण जेव्हा ते आपोआप येतात, तेव्हा मात्र ते आनंदाने सोसावेत. पुरूरव्याने दुष्कृत्य केले आणि त्यामुळे त्याला वैराग्य प्राप्त झाले; तेव्हा त्याला दुष्कृत्य म्हणावे की सत्कृत्य ? तरीही, वैराग्यप्राप्तीचा वास्तविक हा काही मार्ग नव्हे हे खरेच. आपण शास्त्रविरुद्ध कर्म करू नये. आणि दुसर्‍याने केले तर नावे ठेवू नयेत. न जाणो, परमात्म्याची इच्छा असेल तर त्यातूनच चांगले होण्याचा संभव आहे. प्रपंच मिथ्या मानावा आणि जो मिथ्या तो बरा असे वाटण्यात काय अर्थ ? तो जसा असेल तसा असू द्यावा. नाटकात नट जसे काम करतो, त्याप्रमाणे प्रपंचात आपण आपले काम करावे. तुमचा परमार्थही तुमच्या स्वाधीन नाही; सद्‍गुरूच तो तुमच्याकरिता करीत असतात; तेव्हा तुम्ही कशाचीही काळजी करू नये. जे होईल त्यात आनंद मानीत राहावे. सद्‍गुरुदर्शनाने पूर्वकर्मे, पापे, जळून जातात. तुमची पुढची काळजी सद्‍गुरू घेतात. तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसून नये आणि काळजी करू नये, समाधानात आणि आनंदात असावे.
प्रपंच देवाचा मानून अभिमानरहितपणे तो करणे हा परमार्थ. परमेश्वराचे स्मरण ठेवून तोच कर्ता आहे असे मानणे, आणि सर्व काही त्याच्याकरिता करणे, म्हणजे देवाला अर्पण केल्यासारखेच आहे. फक्त कर्माच्या शेवटीच कृष्णार्पण म्हणणे, म्हणजे इतर वेळ त्याला विसरला असे नाही का होत ? देवापाशी 'मला तू आपला म्हण. हे मन तुझ्या चरणी अर्पण केले. मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न होवो.' असे मागावे. नाही तर, जो राज्य द्यायला समर्थ आहे त्याच्याजवळ केरसुणी मागितल्याप्रमाणे होईल. भगवंताची मनापासून प्रार्थना करावी. आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवितो. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे, मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते. 'तू जे देशील ते मला आवडेल,' असे आपण भगवंताला सांगावे, आणि भगवंताचे अखंड स्मरण ठेवावे. यापेक्षा भगवंताजवळ जायला दुसरा मार्ग कोणता असणार ?


१४९. ज्याच्या प्रपंचामधे पाठीराखा परमात्मा आहे,
त्याचा तोच परमार्थ होतो; ज्याचा पाठीराखा अभिमान आहे तो प्रपंच समजावा.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

No comments:

Post a Comment