May 5, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ५ मे २०१४

५ मे

अभिमान न धरता कर्तव्यकर्म करावे. 

 



'मला कळत नाही' असे वाटणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे. आपण अभिमानाने, 'मला सर्व समजते' असे मानून जगात वावरत असतो. खरोखर, अभिमानासारखा परमार्थाचा दुसरा मोठा शत्रू नाही. अभिमान हा हरळीसारखा नाश करणारा आहे असे म्हणणेसुद्धा थोडे अपुरेच पडेल; कारण हरळी वाढली तर ती दिसते, आणि म्हणून ती उपटून तरी टाकता ह्येते. तशी अभिमानाची गोष्ट नाही. तो दिसत नाही, आणि म्हणून तो केव्हा आणि कसा डोके वर काढील याचा पत्ताच लागणार नाही. चित्तशुद्धीच्या मार्गांत मोठी धोंड कोणती असेल तर ती अभिमानाची आहे; आणि स्वतःच्या कर्तबगारीने आपण त्याच्या तावडीतून सुटू असे म्हणणेही वेडेपणाचे होईल. त्याच्या कचाट्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे सद्‍गुरूला अनन्यभावाने शरण जाऊन, अभिमानाच्या तावडीतून सोडविण्याबद्दल त्याची सतत प्रार्थना करणे हाच होय.
चित्तशुद्धी झाली की शेताची मशागत पुरी झाली असे म्हणायला हरकत नाही. पुढे प्रश्न, बी उत्तम असणे जरूर आहे. उत्तम बी कोणते हे कदाचित्‌ आपल्याला समजणार नाही परंतु फळ चांगले कोणते हे सहज समजते. आता असे समजा, जी फळे गोड लागली त्यांचीच लागवड केली. तरीपण पुढे असे अनुभवाला येते की, काही काळ लोटल्यानंतर कालमर्यादेप्रमाणे ते झाड मरते आणि अर्थात्‌ फळे मिळायची बंद होतात, आणि त्यामुळे मन कष्टी होते. यावरून असे दिसते की, आता गोड लागलेली फळे ही कालांतराने दुःखालाच कारणीभूत होतात. तर मग बी निवडताना असे पाहणे जरूर आहे की, ज्याची झाडे कायम टिकणारी आहेत आणि फळे अक्षय सुखाचा लाभ करून देणारी आहेत. जगात उत्पन्न झालेली अशी कोणती वस्तू आहे की जी अक्षय टिकेल ? 'कोणतीही नाही' असेच उत्तर येईल. म्हणून विनाशी फळाच्या आशेने केलेले कोणतेही कार्य सुखाला नेत नाही, असे म्हणावे लागते. याकरिताच, भगवंताशिवाय दुसर्‍या कोणत्याही फळाची आशा न ठेवता कर्तव्यकर्म करीत राहणे, हाच सुखाचा मार्ग आहे, आणि हीच उत्तम बीजाची पेरणी आहे. भगवंताची मनोभावे प्रार्थना करावी की, 'हे देवा, तुझी भक्ति तुझ्याशिवाय इतर कोणत्याही फळाच्या आशेने न होईल अशी कृपा कर.' त्या दृष्टीने आपणही प्रयत्‍न करणे जरूर आहे. ज्याप्रमाणे किडके आणि चांगले एकत्र झालेले धान्य आपण सुपात घालून पाखडतो, आणि किडके धान्य बाहेर उडवून लावून मागे उत्तम धान्य शिल्लक ठेवतो, त्याप्रमाणे भगवंताची भक्ति करता करता, भगवत्प्राप्तीशिवाय इतर होणार्‍या इच्छा काढून टाकण्याचा क्रम ठेवावा म्हणजे कालांतराने भगवंताकरिताच भगवत्प्राप्ती अशी भावना दृढ होत जाईल.


१२६ खरे सुख हे कायम टिकणारे पाहिजे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

No comments:

Post a Comment