May 8, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ८ मे २०१४

८ मे

भगवंताचे अनुसंधान राखावे.

 

  

फार दिवस वापरून जोडा फाटला की तो कितीही दुरुस्त केला तरी पुनः पुनः फाटतोच. तसेच शरीराचे आहे. शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काही तरी होतच राहते. दुरुस्त केलेल्या जोड्यातला एखादा खिळा जर पायाला टोचू लागला तर मात्र त्याला जपावे लागते. तसे, आजारपणामुळे मनाला टोचणी लागली तर जपावे आणि त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. आपल्या आजाराचा, म्हातारपणाचा आपण फायदा करून घ्यावा. एखादी शहाणी सुगरण बाई ज्याप्रमाणे कोंड्याचा मांडा करते, त्याप्रमाणे आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताचे अनुसंधान टिकवायला शिकले पाहिजे. अनुसंधानात असलो की प्रपंचात मजा आहे; अडचणी आणि संकटे यांचीसुद्धा मजा वाटेल. पोहायला येणार्‍या एखाद्याला नुसते सरळ पोहायला सांगितले तर आवडणार नाही. तो उड्या मारील, बुड्या मारील, वाकडातिकडा पोहेल, तसे भगवंताच्या अनुसंधानात राहिले तर प्रपंचाची मजा वाटेल. कोणतीही गोष्ट एकदा ओळखली की मग तिची भिती वाटत नाही. विषय जोवर ओळखले जात नाहीत तोवरच ते आपल्याला त्रास देतात. याकरिता, ज्या ज्या गोष्टी होत असतात, त्या त्या भगवंताच्या इच्छेनेच होत आहेत, ही जाणीव ठेवून वृत्ती आवरण्याचा प्रयत्‍न करावा. परमार्थाच्या आड आपले आपणच येत असतो. आपली वृत्ती जिथे जिथे वावरते तिथे भगवंताची वस्ती असते. म्हणून वृत्ती जरी कोणतीही उठली तरी तिथे भगवंताची आठवण केली तर ती चटकन मावळते. आपण नेहमी आपल्या उपास्य देवतेचे स्मरण करीत असावे. त्याच्या पायावर मस्तक ठेवावे, आणि त्याची अनन्य भावाने प्रार्थना करावी की, "हे भगवंता, तुझ्या आड येणारे हे विषय तुझ्या कृपेशिवाय नाही दूर होणार. आजवर जगाचा मी अनुभव पाहून घेतला. तुझ्या प्राप्तीशिवाय कशातही सुख नाही असे भासू लागले, तरी वृत्ती आड आल्याशिवाय रहात नाही. माझ्या अज्ञानाने मी आज स्वतःच्याच आड येत आहे. तरी तुझी, म्हणजे पर्यायाने माझीच, ओळख पटावी, आणि त्यात मी तुला पाहावे, हीच माझ्या जीवितातली शेवटची इच्छा आहे. ही इच्छा तुझ्या कृपेशिवाय पूर्ण होणे शक्य नाही. तरी, हे भगवंता, माझे मन तुझ्या चरणी राहो असे कर. यापेक्षा मला जगात दुसरे काहीही नको. आता मी तुझा झालो. यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन, आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्‍न करीन. तू मला आपला म्हण. "



१२९. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

No comments:

Post a Comment