July 15, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १५ जुलै २०१४

१५ जुलै

तळमळ लागल्यावर गुरुभेट निश्चित ! 

 




काय करावे हे मनुष्याला कळते, पण त्याचे मन त्याला आवरत नाही. विषयाचा उपभोग घेताना आपले मन त्यामध्ये रंगून जाते, आणि त्याचे सुखदुःख निस्तरताना मात्र आपली भ्रमिष्टासारखी चित्तवृत्ती होते. आपल्याला झालेला भ्रम नाहीसा करायला तीन गोष्टी आवश्यक आहेत : एक सद्विचार, दुसरी नामस्मरण, आणि तिसरी सत्संगती. संत ओळखणे फार कठीण आहे. आपण त्याच्यासारखे व्हावे तेव्हांच तो कळायचा. त्यापेक्षा सद्विचार बाळगणे सोपे. भगवंताचा विचार तोच सुविचार होय. भगवंताच्या कथा ऐकाव्यात, त्याच्या लीला वर्णन कराव्यात, त्याच्या वर्णनाचे ग्रंथ वाचावेत, पण याहीपेक्षा, आपल्याजवळ राहणारे असे त्याचे नाम घ्यावे. तुम्ही नेहमी नाम घेत गेलात, तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची जरूर न पडता, संतच - अगदी हिमालयातले संत, तुम्हाला धुंडीत येऊन तुमचे काम करतील. अहो, खडीसाखर ठेवली की मुंगळ्यांना आमंत्रण करायला नको ! तुम्ही म्हणाल, 'आम्हाला ते करता येत नाही.' पण आपण आपल्या मुलाला शाळेत घालतो, आणि तो न शिकला किंवा त्याला अभ्यास येत नसला, तर पुन्हा त्याच वर्गात त्याला बळजबरीने ठेवतोच की नाही ? त्याला एखादी विद्या आली नाही, तर दुसरी कोणती येईल ती शिकवतोच की नाही ? आणि त्याने आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करायला तयार व्हावे म्हणून आपल्याला तळमळ लागतेच की नाही ? तशी परमेश्वर मिळावा म्हणून आपल्याला तळमळ लागली आहे का ? तशी तळमळ लागली म्हणजे तुमचा गुरू प्रत्यक्ष जमिनीतून वर येईल. तो सारखा तुमच्याकरिता वाट पाहात असतो.
आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंत, म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करील; पण गुरू हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे. त्याला देह नसला, तरी तो नाही असे समजू नका. तुम्ही दुश्चित्त झाला म्हणजे तो दुश्चित्त होतो. म्हणून तुम्ही केव्हांही दुश्चित्त होऊ नका. देहाचे भोग येतील-जातील, पण तुम्ही सदा आनंदात राहा. तुम्हाला आता काही करणे उरले आहे असे मानू नका. गुरुभेट झाली म्हणजे तुम्ही तुम्हीपणाने उरतच नाही. मात्र, गुरूला अनन्य शरण जा. एक शिष्य मला भेटला, तेव्हा तो आनंदाने नाचू लागला. मी त्याला विचारले, "तुला एवढा कसला आनंद झाला आहे ?" त्यावर तो म्हणाला, "मला आता आनंदाशिवाय दुसरे काही उरलेच नाही, कारण मला आज गुरू भेटले !" जो असा झाला, त्यालाच खरी गुरूची भेट झाली. तरी, तुम्ही गुरूला अनन्य शरण जा, म्हणजे तुम्ही आणखी काही करण्याची जरूरी नाही.

१९७. भगवंताची तळमळ हा साधकपणाचा प्राण आहे.


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

No comments:

Post a Comment