August 15, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १५ ऑगस्ट २०१४

१५ ऑगस्ट

वृत्तिचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण. 

 



आपला देह पंचमहाभूतांचा आहे. यामधला 'मी' कोण हे पाहावे, जे नासणार ते 'मी' कधी असणार नाही; म्हणजे पंचमहाभूतांचा 'मी' नाही हे ठरले. जो शाश्वत असतो तोच सच्चिदानंद असतो. मी भगवंतस्वरूप व्हावे अशी प्रत्येक मनुष्याची सुप्त अगर प्रगट इच्छा असते; तेव्हा त्यापैकी थोडा तरी 'मी' असल्याशिवाय मला असे वाटणार नाही. भगवंताचे स्वरूप आनंदमय आहे, आणि आपण सर्व लोक आनंदात राहावे असे म्हणतो. मी या आनंदापासून वेगळा होतो तेव्हा कुठेतरी चुकले असे समजावे. अपूर्ण सृष्टी पूर्ण करण्यासाठीच मनुष्याची उत्पत्ती भगवंताने आपल्या अंशरूपाने केली. आपल्या आनंदात व्यत्यय आणणारे विषय जाणून घेतले, म्हणजे मग आनंदात बिघाड नाही येणार. या वाटेने चोर आहेत असे समजले, म्हणजे त्या तयारीनेच आपण जातो. जो भक्त झाला त्याला विघ्ने येत नाहीत. भगवंताचे म्हणून कोणतेही काम केले म्हणजे त्रास नाही होत.
आनंदाचा साठा कुठे निश्चित असेल तर तो भगवंताजवळ आहे. नाटकात राजाचे काम करणारा माणूस जसा मी खरा भिकारीच आहे हे ओळखून काम करतो, त्याप्रमाणे आपण आपले खरे स्वरूप ओळखून प्रपंच करावा. नाशवंत वस्तूवर आपण प्रेम करतो, तसेच लहानसहान गोष्टीत अभिमान धरतो, इथेच तर आमचे चुकते. मी जे नाही ते व्हावे यात सुख आहे, असे वाटते. कामधेनूजवळ आपण विषय मागतो, आणि मग दुःख झाले म्हणून रडत बसतो, याला काय करावे ? जो परमार्थात जाणता, तोच खरा जाणता होय. परमार्थ म्हणजे बावळटपणा कसा असेल ? अनेक बुद्धिमान, विद्वान लोकांना जिथे आपल्या बाजूला वळवायचे असते, तिथे बावळटपणाला वावच नाही.
विद्वान लोक वेदान्त अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवतात. मग सामान्य माणसाला असे वाटते की, 'अरे, हा वेदान्त आपल्यासाठी नाही.' परंतु ही चूक आहे. वेदान्त हा सर्वांसाठी, सर्व मनुष्यमात्रासाठी आहे. वेदान्ताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही. घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान लहान खोल्या येतात, त्याप्रमाणे वेदान्तात इतर सर्व शास्त्रे येतात. शास्त्राचे मार्ग हे वृत्तीला भटकू न देण्यासाठी आहेत. ते वृत्तीला हलू देत नाहीत; त्यात नामाची गाठ पडली की भगवंतापर्यंत साखळी जोडली जाते. आपण व्यवहारासाठी जन्माला आलो नसून भगवंतासाठी आलो आहोत. म्हणून, आपण अमुक एक वस्तू नाही म्हणून कष्टी होण्यापेक्षा, दुसरी एखादी वस्तू आहे म्हणून समाधानात राहावे. समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळ मिळते, आणि ती मिळवण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही.

२२८. वृत्तीचे समाधान असणे ही भगवंताच्या कृपेची खूण आहे,
आणि त्याकरिता भगवंताचे सतत अनुसंधान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

No comments:

Post a Comment