September 11, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ११ सप्टेंबर २०१४

११ सप्टेंबर

चिकित्सा मर्यादेपर्यंतच करावी. 

 



भगवंत आपलासा करून घेण्याचा प्रयत्‍न करावा. अभिमान सोडून जर असा प्रयत्‍न चालू ठेवला तर सद्‌गुरूकृपा झाल्याशिवाय राहात नाही. अमुक एक साधन करीत जा म्हणून सद्‌गुरूने सांगितले, आपण ते अट्टाहासाने करू लागलो, पण आपले विचार जर आहेत तसेच राहिले, तर भगवंताचे प्रेम येणार कसे ? चारपाच वर्षे खूप कष्ट केले, विषय बाजूला ठेवले, पण अजून कसा अनुभव येत नाही असे म्हणू लागलो, तर साधनाचा जोर कमी होतो आणि निष्ठा घसरायला लागते. जे काही होणार ते सद्‌गुरूच्याच इच्छेने, त्याच्याच प्रेरणेने होते, अशी आपली ठाम श्रद्धा पाहिजे. साधनाचे प्रेम तो भगवंतच देतो, हे आपण विसरून जातो. आपण पूर्वी काही साधन करीत नव्हतो, ते आता करू लागलो, असा साधनाबद्दलचा अभिमान बाळगू लागलो तर काय उपयोग ? सद्‌गुरूच्या पायावर एकदा डोके ठेवले की काहींचे काम होते, यात सद्‌गुरू पक्षपात करतात असे कसे म्हणता येईल ? आपलेच कुठेतरी चुकत असले पाहिजे याचा विचार करावा. आजवर देवाचे नाव घेणे बरे असे वाटत होते, परंतु घ्यायचे काही जमले नाही; ते आता घेऊ लागलो हे त्याच्या कृपेने घेऊ लागलो हे नाही का समजू ?
प्रपंचात मनुष्याला धीर हवा. आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावे. फार चिकित्सा करण्याने नुकसान होते. विद्येचे फळ काय, तर आपल्या मनाला जे बरे वाटेल त्याची चिकित्सा न करता ते करायचे आणि आपल्याला जे करायचे नाही त्याची चिकित्सा करित बसायचे ! चिकित्सा मर्यादेपर्यंतच असावी. ती मर्यादेबाहेर गेली की आपण काय बोलतो हे आपले आपल्यालाच कळत नाही.
एक मुलगा रोज तालमीत जातो आणि चांगले दूध, तूप खातो; पण तो जर दिवसेंदिवस वाळू लागला आणि हडकुळा दिसू लागला तर त्याला काही तरी रोग आहे असे नक्की समजावे. त्याचप्रमाणे, सध्याच्या सुधारणेने माणूस पाण्यावर, हवेत, जिकडे तिकडे वेगाने जाऊ लागला आहे खरा, पण दिवसेंदिवस जास्त असमाधानी बनत चालला आहे; हे काही खर्‍या सुधारणेचे लक्षण नाही. परिस्थिती वाईट आली म्हणून रडू नका, कारण ती बाधतच नसते. कोणत्याही काळात, कशाही परिस्थितीत, आपल्याला आनंदरूप बनता येईल. आजपर्यंतचा आपला अनुभव पाहिला तर ’आपण केले’ असे थोडेच असते; म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपण आपले कर्तव्य तेवढे करावे, आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नये. अभ्यास केला तर थोड्या दिवसात हे साधेल.

२५५. ’कर्ता राम आहे’ असे ज्याला वाटले, त्याने सर्व काही साधले.


No comments:

Post a Comment