September 16, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १६ सप्टेंबर २०१४

१६ सप्टेंबर

भगवंताकडे मन लावावे व देह प्रारब्धावर सोपवावा. 

 



खरोखर, प्रारब्धाचे भोग कुणालाही टळत नाहीत. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो, मनाशी नाही. देहास सुखदुःख प्रारब्धाने मिळते. दुःख कोणालाही नको आहे, पण ते येते. सुखाचेही तसेच आहे. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ. हे चांगले वा वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो, "मी देवाचे एवढे केले, मी अमक्या अमक्या सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते ?" पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे. त्याला देव किंवा संत काय करील ? समजा, आपल्याला काही पैशाची जरूरी आहे आणि आपल्या ओळखीचा माणूस किंवा अगदी जवळचा नातेवाईक एखाद्या मोठ्या बँकेचा मनेजर आहे; पण आपल्या स्वतःच्या नावावर बँकेत जर पैसे नसले तर तो काहीही करू शकत नाही. फारच झाले तर तो आपल्या स्वतःच्या खिशातून काही पैसे देईल. त्याचप्रमाणे, आपल्या प्रारब्धात जर सुख नसेल तर ते कुठून मिळणार ? संत फार तर जरूरीप्रमाणे आपले दुःख स्वतः सोसून आपला भार हलका करील इतकेच. म्हणून आपल्या प्रारब्धाने आलेल्या बर्‍यावाईट गोष्टी देहाने भोगाव्या आणि मनाने भगवंताचे स्मरण ठेवावे. खरा भक्त हा देहाला विसरलेला असल्याने देहाचे भोग भोगणे वा न भोगणे या दोन्हीची त्याला फिकीर नसते. म्हणून तो भोग टाळत नाही.
मनुष्याच्या देहाच्या अवयवात जसा कमीजास्तपणा असतो, त्याचप्रमाणे मनुष्याचे विकार आणि गुण पुर्वजन्माच्या संस्काराप्रमाणे, म्हणजेच प्रारब्धाप्रमाणे, कमीजास्त प्रमाणात येतात. आपल्या देहाला होणारे भोग आपल्या कर्माचेच फळ असते, पण ते अमुक कर्माचे फळ आहे असे कळत नसल्यामुळे आपण त्याला प्रारब्ध असे नाव देतो. जगातल्या घडामोडी जशा चालतात, तशाच आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धानेच चालतात. आपल्याला येणार्‍या आपत्ती आपल्या प्रारब्धाच्या असतात; त्या भगवंताच्या नसतात; त्या पाहुण्यासारख्या असतात. त्या जशा येतात तशा जातात देखील. आपण होऊन त्या आणू नयेत, आणि प्रारब्धाने आल्या तर त्यांना घाबरू नये. प्रारब्धाची आणि ग्रहांची गती देहापर्यंतच आहे, मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही. जो संताची किंवा सद्‍गुरूची आज्ञा पाळतो, त्याचे प्रारब्ध हे प्रारब्धरूपाने राहात नाही. भगवंताच्या अनुसंधानाची सवय लावून घ्यावी, म्हणजे आपण प्रारब्धावर विजय मिळवल्यासारखेच आहे.



२६०. भगवंताचा जो झाला । त्याला देह प्रारब्धावर टाकता आला ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

No comments:

Post a Comment