September 21, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २१ सप्टेंबर २०१४

२१ सप्टेंबर

अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी. 

 



दुसर्‍याच्या मनातले ओळखणे ही फारशी मोठी विद्या नाही. ज्याच्या मनातले ओळखायचे आहे त्याच्या मनाशी एकरूप झाले की आपल्याला कळायला लागते; पण अंतःकरण शुद्ध असेल तरच हे साधेल. हे साधण्याच्या काही क्रिया असतात. त्या क्रिया चालू असतात तोपर्यंत ती शक्ती राहते. त्या क्रिया बंद झाल्या की ती नाहीशी होते. जो मनुष्य या शक्तीचा बाजार मांडतो, त्याच्याजवळ भगवंताची कृपा असेलच असे मात्र नाही; आणि ती नाही म्हणजे काहीच नाही ! मनोगत कळायला एकमेकांना एकमेकांची भाषा कळायला पाहिजेच असे नाही. समजा, तेलंगणातला एक भिकारी आपल्या दारी भीक मागायला आला आणि तो एक तेलंगी गाणे म्हणू लागला. त्या गाण्याचा अर्थ आपल्याला मुळीच कळत नाही; पण हा भीक मागतो आहे, हे आपण ओळखतो. त्याचप्रमाणे मनोगताचा भावार्थ कळतो. प्रत्यक्ष वाक्याचा अर्थ कळला नाही तरी हरकत नसते. ऐकणारा खर्‍या उत्सुकतेने आला असेल, तर सांगणार्‍याचा भावार्थ त्याला आपोआप कळेल. पण ऐकणारा तसा आला नसेल, तर सांगणार्‍याने स्पष्ट सांगूनसुद्धा त्याला कळायचे नाही. तत्वज्ञान हे कायम आणि कधीही न बदलणारे आहे. स्थलकालानुसार निराळ्या भाषेत ते मांडावे लागते इतकेच. समजा, आपण गाडीत बसून दिल्लीला चाललो. गाडी दर क्षणी पुढे पुढे जाते, पण आपण आपल्या जागेवर बसूनच असतो. त्याप्रमाणे परिस्थिती सारखी बदलत असते; पण आपण जर भगवंतालाच चिकटून राहिलो तर खात्रीने आपण आपल्या नियोजित स्थळी पोहोचू शकू; मग परिस्थिती कितीही बदलू दे !
देहाला आल्यावर आपले ज्याच्याशी जे जे कर्तव्य आहे ते बरोबर करणे हे रामचरित्राचे सार आहे आणि हे प्रत्येकाने जाणले पाहिजे. रामासमोर जाऊन, 'मी अमुक अमुक करीत आहे' असे त्याला सांगावे, आणि आपल्या कार्याला लागावे. भगवंताला स्मरून काम करीत असताना, जे योग्य दिसेल ते त्याच्याच इच्छेने आहे असे समजून काम करावे. जो असे करील त्याला समाधान झालेच पाहिजे. 'भगवत्कृपेने मी सर्व कॄत्ये करतो' म्हटले म्हणजे अभिमान कशाला वाढेल ? अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरूवात करावी. माझे चुकते कुठे हे पाहावे. तर्कशास्त्र शिकून तर्कटी बनू नये; तसेच संतांच्या अनुभवी वचनांकडे फर चिकित्सेने पाहू नये. संतांचे सांगणे अगदी सोप्या भाषेत असते. गंमत अशी की, 'भगवंत आहे की नाही' इथपासून लोक चिकित्सेला सुरूवात करतात, आणि मोठ्या घोटाळ्यात पडतात; आणि शेवटी, आहे तिथेच थांबण्याची त्यांच्यावर पाळी येते, म्हणजे, त्यांची प्रगती खुंटते. याकरिता भगवंताचे बूड कायम ठेवून चिकित्सा करावी.


२६५. देहरूप गावाहून रामरूप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

No comments:

Post a Comment