September 5, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ५ सप्टेंबर २०१४

५ सप्टेंबर

नाम म्हणजे जादूचा दिवाच. 

 

 



एकदा एक बाई सोवळे नेसून स्वयंपाक करीत होती. बाईचे मूल झोपून उठल्यावर, अंथरूणातच ’आई, मला घे,’ म्हणून रडू लागले. आई म्हणाली, ’बाळा, मी तुला घ्यायला आतुर झाले आहे रे, पण तू कपडे तेवढे काढून ये’. परंतु मुलगा कपडे काढायला तयार होईना, आणि ’आई, आई’ म्हणून रडू लागला. तेव्हा शेजारच्या बाईने येऊन मुलाचे कपडे काढले, आणि मग आईने मुलाला पोटाशी घेतले. आपलेही त्या लहान मुलाप्रमाणे झाले आहे. वासना, विकार, अहंभाव इत्यादींचे कपडे न काढताच आपण परमेश्वराला भेटायची इच्छा करतो, मग त्याची नि आपली भेट कशी होणार ? परमेश्वर मातेप्रमाणेच अत्यंत प्रेमळ आणि ममताळू आहे, त्याला आपल्याला भेटायची अतिशय इच्छा आहे; परंतु जोपर्यंत आपण आपल्या अंगावरची अपवित्र आवरणे काढून टाकीत नाही, तोपर्यंत परमेश्वर आपल्याला जवळ घेत नाही.
संत आपल्याला परमेश्वराकडे जायचा रस्ता सांगतात. त्या मार्गाने गेलो तर आपल्याला खचितच भगवंताची प्राप्ती होईल. आपण पुराणात वाचलेच असेल की, श्रीकृष्णाकडे दुर्योधन आणि अर्जुन गेले असताना, श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितले की, ’ज्याला मी हवा असेन त्याला माझे सैन्य आणि इतर गोष्टी मिळणार नाहीत’. हे ऐकून, दुर्योधनाने त्याचे सर्व सैन्य मागून घेतले. अर्जुनाला खरा आनंद झाला की आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळते आहे, कारण तो हे जाणून होता की, एका परमेश्वरावाचून बाकी सर्व व्यर्थ आहे. प्राणावाचून हजारो शरीरांचा काय उपयोग ?
कोणी आपल्याला सांगतीलही की परमेश्वर साता समुद्रापलीकडे आहे, तो शेषशायी आहे. तेव्हा आपल्यासारख्या सामान्य माणसाला तो प्राप्त होणे अत्यंत कठीण आहे. परंतु संतांनी आपल्यावर फार मोठे उपकार करून ठेवले आहेत. त्यांनी नामरूपी जादूचा दिवाच आपल्या हाती दिला आहे; त्यात सत्संगतीचे तेल घातले म्हणजे झाले. हा दिवा विझू नये म्हणून फार काळजी घ्यावी लागते. मी त्रिवार सत्य सांगतो की, नीतीने वागून जो नामात राहील त्याला नामाचे प्रेम लागल्याशिवाय राहणार नाही. नीती हा सर्वांचा पाया आहे. त्या पायाशिवाय इमारत टिकू शकणार नाही. तीन गोष्टी अत्यंत जपा : परस्त्री मातेसमान माना, परधन आणि परनिंदा विष्ठेसारखी माना, आणि कशाही परिस्थितीत नामस्मरणाला सोडू नका; तुम्हाला भगवंताचे प्रेम खात्रीने लागेल.

२४९. मुखात नाम ठेवावे आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

No comments:

Post a Comment