September 8, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ८ सप्टेंबर २०१४

 ८ सप्टेंबर

 थोडेच वाचावे, पण त्याचे मनन व आचरण करावे

 


 माया म्हणजे काय, तर जे परमात्म्याशिवाय असते ती माया. जे दिसते आणि नासते ती सर्व माया. आपण जोपर्यंत नामस्मरणात आहोत, तोपर्यंत आपण मायेच्या बाहेर आहोत, आणि जेव्हा त्याचे विस्मरण होते तेव्हा आपण मायेच्या अधीन आहोत असे समजावे. सर्व काही करण्यामध्ये आहे, सांगण्यात आणि ऐकण्यात नाही. निर्गुणाचे कितीही वर्णन केले तरी निर्गुणरूप समजायचे नाही. म्हणून सगुण रूपच आपण पाहावे आणि त्याचेच पूजन करावे. ’मी निर्गुणाची उपासना करतो’ असे जो म्हणतो, त्याला खरे म्हटले म्हणजे निर्गुण हे काय ते समजलेच नाही; कारण तिथे सांगायलाच कुणी उरत नाही. एकाने मला सांगितले की, "मी सर्व वेदांतग्रंथ वाचले आहेत." त्यावर मी त्याला म्हटले की, "तर मग तुम्हाला समाधान मिळालेच आहे!" त्यावर तो म्हणाला, "तेवढेच काय ते मिळाले नाही." मग एवढे वाचून काय उपयोग झाला ? आपल्याला त्या वेदांताला घेऊन मग काय करायचे आहे ? आपण आपली भोळीभाबडी भक्तीच करावी. देवाला अनन्य शरण जाऊन, त्याचे नामस्मरण करीत जावे, म्हणजे सर्व काही मिळते. जो जेवायला बसतो, तो ’माझे पोट भरावे’ असे कधी शब्दांनी म्हणतो का ? पण जेवण झाले की आपोआपच पोट भरते ! आपण ग्रंथामध्ये जे वाचतो ते जर आचरणामध्ये आणले नाही तर त्या वाचनाचा उपयोग काय ? म्हणून आपण फारसे वाचनाच्या वगैरे नादी लागू नये, कारण त्याने खरे साधन बाजूलाच राहते आणि त्या वाचनाचाच अभिमान वाटू लागतो. म्हणून थोडेच वाचावे आणि त्याचे मनन करावे. शरीराच्या अगदी लहान भागाला लागले तरी सबंध देहाला वेदना होतात, त्याप्रमाणे दिवसाची एक घटका जरी आपण भगवंताच्या स्मरणात घालविली तरी सबंध दिवस त्यामध्ये जाईल; आणि दिवसांचेच महिने, महिन्यांचेच वर्ष, आणि वर्षांचेच आपले आयुष्य बनलेले असते, या दृष्टीने आपले सर्व आयुष्य भगवंताच्या स्मरणात जाईल. प्रपंचाची आवड असू नये, पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी. प्रपंचातली कर्तव्ये करणे हे पवित्र आहे खरे पण त्यामध्ये गुंतून राहणे बरे नव्हे. म्हणून आपण मनाने भगवंताचे होऊन राहावे. आपण मनापासून भगवंताला स्मरले तर तो आपल्याला सुखासमाधानात ठेवल्याशिवाय राहणार नाही. प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणेच होय. देवाला मानावे आणि त्याला आवडेल तेच करावे, हेच परमार्थाचे सार आहे.

२५२. देह केव्हा जाईल याचा नियम नाही. म्हणून, ’वृद्धापकाळी नामस्मरण करू’ असे म्हणू नये.

No comments:

Post a Comment