November 18, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १८ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १८ नोव्हेंबर २०१४

श्रद्धा ही मोठी शक्ति आहे. 

 

    

फार चिकित्सा करीत बसणे हे मानवी देहबुद्धीचे लक्षण आहे. दुकानात गिर्‍हाईक आले आणि मालाची फार चिकित्सा करू लागले की, ' हे गिर्‍हाईक काही विकत घेणार नाही ' असे दुकानदार समजतो. परमार्थातही अती चिकित्सा करणार्‍या माणसाचे तसेच आहे. रणांगणावर गुरूंना कसे मारावे या चिकित्सेत अर्जुन पडला. भगवंतांनी अर्जुनाला आपले रूप दाखविले. त्यात पुढे होणार्‍या सर्व गोष्टी अर्जुनाला दिसू लागल्या. देहबुद्धीच्या, अभिमानाच्या आहारी जाऊन मायेत सापडल्यामुळे झालेला गोंधळ या विश्वरूपदर्शनामुळे नाहीसा झाला.
मायेचे मूळ लक्षण म्हणजे 'मी कर्ता आहे’ असे वाटणे. 'अभिमानाशिवाय कार्य तरी कसे होईल ?' असे आपण म्हणतो, आणि पापाचरण करायलाही मागे पुढे पाहात नाही. देहबुद्धीने केलेला धर्म उपयोगी पडत नाही. अभिमानाने पुण्यकर्मे जरी केली तरी तीही पुढल्या जन्माला कारण होतात. सर्व काही देवाला अर्पण केले, ही आपली आठवण काही जात नाही. दुःखात असताना, आपण आपले जीवन प्रारब्धाच्या, ग्रहांच्या, संचिताच्या किंवा भविष्याच्या हाती आहे असे म्हणतो. परंतु ते भगवंताच्या हाती आहे ही श्रद्धा उडून, आपण त्याला विसरतो. आपण आपल्या शंकेचे समाधान करू शकत नाही. त्यासाठी आपण कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे. आपण आजपर्यंत जगलो याला काय कारण सांगता येईल ? आपण मेलो नाही म्हणून जगलो इतकेच ! 'मी कसा जगलो' याचे कारण कुणालाही सांगता येणार नाही. म्हणून, राखणारा भगवंत आहे ही श्रद्धा असावी.
ही सृष्टी भगवंताने उत्पन्न केली. सृष्टीमध्ये भगवंत सर्व ठिकाणी भरलेला आहे. तो आनंदमय आहे, आपण त्याचे अंश आहोत, मग आपण दुःखी का ? याचे उत्तर असे की, 'देव आहे' असे खर्‍या अर्थाने आपण वागत नाही, जिथे भगवंत आहे तिथे आपण त्याला पाहात नाही, श्रद्धेने साधन करीत नाही. श्रद्धेशिवाय कधी कुणाला परमार्थ साधायचा नाही. श्रद्धा ही फार बळकट आणि मोठी शक्ति आहे. श्रद्धेने जे काम होईल ते कृतीने होणे कठीण जाते. विद्या, बुद्धी, कला, इत्यादि गोष्टी बिळासारख्या आहेत, त्यांच्यामधून श्रद्धा झिरपत जाते. विद्वानांची मते आपापसांत जमत नाहीत आणि त्यामुळे आपली श्रद्धा डळमळते, आणि मग आपल्याला आणखी वाचन केल्याशिवाय चैनच पडत नाही. आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा, म्हणजे धीर पाहिजे. आपण आपल्या स्वतःवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली, तरी आपले काम होईल. नामात भगवंत आहे ही श्रद्धा ठेवावी, आणि अखंड भगवंताच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा, हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे.

३२३. भगवंतावर निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा, भगवंत कष्टसाध्य नसून सहजसाध्य आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

No comments:

Post a Comment