November 30, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३० नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३० नोव्हेंबर २०१४

लोभाच्या चित्तीं धन । तैसें राखावें अनुसंधान ॥

 



मंगलांत मंगल, शुद्धांत शुद्ध जाण । एक परमात्म्याचें अनुसंधान ॥
हें बीज लावले ज्यांनी । धन्य धन्य झाले जनीं ॥
अचूक प्रयत्‍न तोच जाण । ज्या प्रयत्नांत न चुकतें अनुसंधान ॥
सत्य करावें भगवंताचे अनुसंधान । जेणें दूर होईल मीपण ॥
'मी माझे' म्हणून सर्व काही करीत जावें । परि भगवंतापासून चित्त दूर न करावें ॥
मारुतिरायाचे घ्यावे दर्शन । त्याच्याच कृपेने राखावे अनुसंधान ॥
लोभ्याच्या चित्तीं धन । तैसे राखावे अनुसंधान ॥
दूर गेला प्राणी । परत येण्याची वेळ ठेवी मनीं ।
तैसे राहणे आहे जगांत । मी परमात्म्याचा होण्याचा ठेवावा हेत ॥
म्हणून न सोडावे अनुसंधान । कशापेक्षांही जास्ती करावें जतन ॥
कोणाचेंच न दुखवावें अंतःकरण । व्यवहार करीत असावा जतन ।
व्यवहारांतील मानअपमान । हे टाकावे गिळून ॥
अखंड राखावें रामाचें अनुसंधान । जेणें सदाचरणाकडे लागेल वळण ॥

माझें नातेगोतें राम । हा भाव ठेवून जावें रामास शरण ॥
हें ऐका माझें वचन । मनानें व्हावे रामार्पण ॥
अनन्य व्हावें भगवंती । जो कृपेची साक्षात् मूर्ती ॥
आपले कर्तेपण टाकावें । म्हणजे शरण जातां येते ॥
ज्याने धरलें भगवंताचे पाय । तोच त्याला झाला उपाय ॥
मी आता झालों रामाचा । त्याला अर्पावी सर्व चिंता ॥
मी ज्याचा झालो त्याला माझी काळजी । हा ठेवावा भाव चित्तीं ॥
माझे हित तो जाणे । हें जाणून स्वस्थचि राहणें ॥
विषयवासना सुटण्यास उपाय जाण । आपण जावें रामास शरण ॥
जें जें करणें आपलें हाती । तें करून न झाली शांति । आतां शरण जावें रघुपति ॥
जावें रघुनाथास शरण । तोच दुःख करील निवारण ॥
एक राम माझा धनी । त्याहून दुजें आपले न आणी मनीं ॥
अभिमानरहित जावें रामाला शरण । त्यानेंच राम होईल आपला जाण ॥
आतां जगांत माझे नाही कोणी । एका प्रभु रामावांचुनी ॥
निर्धार ठेवा मनीं । शरण जावें राघवचरणीं ॥
जें जें केले आजवर आपण । तें तें करावें रामास अर्पण ॥
जें जें होते तें राम करी । ते स्वभावें होय हितकारी ।
म्हणून जी स्थिति रामाने दिली । ती मानावी आपण भली ॥
गंगेच्या प्रवाहांत पडले । गंगा नेईल तिकडे गेले ॥
गंगा जाते योग्य ठिकाणी । याचे जाणे सहजासहजी ॥
तैसे असावे भगवंताचे स्मरणात । राम ठेवील त्यांत मानावें हित ॥
सर्व जगत् ज्यानें जाणले मिथ्या । हे जाणून शरण जावे रघुनाथा ॥
कारण परमात्म्याला जाणे शरण । याहून दुजा मार्ग न उरला जाण ॥
धन्य तो व्यावहारिक जाण । जेणे केलें रामास स्वतःला अर्पण ॥

३३५. रामापरतें सत्य नाही । श्रुतिस्मृति सांगतात हेंच पाही ॥
रामसत्तेविण न हाले पान । हें सर्व जाणती थोर लहान ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

No comments:

Post a Comment