December 15, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १५ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १५ डिसेंबर २०१४

नामस्मरणात राहणारालाच खरे दर्शन होते. 

  


श्रीकृष्ण परमात्म्यांनासुद्धा देह ठेवावा लागलाच ना ? निराकार असले, तरी साकार झाल्यावर त्याला सर्व काही आलेच की ! रूप आले, गुण आले, सर्व काही आले, आणि मग व्यवहारामध्ये सर्व करणे आले. तसेच ते साकारात आले म्हणून त्यांना जाणे हेही आलेच. श्रीकृष्ण व्यवहाराप्रमाणे वागले. वास्तविक पाहता, ते आलेही नाहीत आणि गेलेही नाहीत. त्यांना येणे जाणे नाहीच; ते कायमच आहेत. साकाराचे रूप पहावेसे वाटते, पण तेच सर्व काही नव्हे हे समजून चालले पाहिजे. भगवंताला पहायचे असेल तर त्याला देहात पाहून चालणार नाही, असे श्रीकृष्णांनी उद्धवाला सांगितले, आणि त्याला ज्ञानाने समजावले. उद्धवाला हे ज्ञान झाल्यावर, त्यांनी त्याला "आता जाऊन गोपींचे समाधान कर" असे सांगितले. त्याप्रमाणे गोकुळात जाऊन तो गोपींना सांगू लागला की, " तुम्ही श्रीकृष्णाला देहात पाहून प्रेम केले, हे योग्य झाले नाही, तुमची चूक झाली." अशा रीतीने, देहाबद्दल त्याने तिरस्कार उत्पन्न करण्याचा प्रयत्‍न केला. त्यावर गोपींनी त्याला म्हटले की, " तू आपला वेदांत जिथे कुणी नाही तिथे जाऊन सांग; श्रीकृष्णाला देहात पाहून आम्हाला जे मिळाले ते आमचे आम्हालाच ठाऊक. ते तुला मिळणे शक्य नाही." गोपींनी श्रीकृष्णावर जे प्रेम केले ते देहाला विसरून केले, त्याच्यापुढे त्यांनी सर्वस्व तुच्छ मानले; आणि त्यामुळेच श्रीकृष्णालाही गोपींवर तसेच प्रेम करणे भाग पडले. गोपी त्याला अनन्यशरण होऊन राहिल्या. तसे प्रेम करावे.
जो नाम घेतो तोच खरा स्मरणात राहतो आणि त्यालाच खरे दर्शन होते' आणि ते रोज सतेज होत असते. देहाचे दर्शन हे विसरणारे असते. म्हणून नाम घेत राहा, म्हणजे खऱ्या दर्शनात राहाल. सगुणमूर्ति नेहमीच आपल्याजवळ राहणे शक्य नसते. पण तिची खूण भगवंताच्या नामात आहे. म्हणून आपण नाम घेतल्यावर, भगवंत आपल्याजवळ आल्यासारखा आहे. भगवंत सगुणामध्ये असताना रावणाची किंवा दुर्योधनाची बुद्धी पालटू शकले नाहीत. सगुण अवताराने वासना किंवा बुद्धी पालटण्याचे कार्य होऊ शकत नाही. सद्‌बुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे. व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो की रूप गेले तरी नाम शिल्लक राहते. म्हणूनच राम, कृष्ण, इत्यादि सर्वजण शेवटी नाहीसे होऊन, केवळ नाम तेवढे शिल्लक राहिले. नाम हे स्थिर आहे, रूप हे सारखे बदलणारे आहे. कलियुगात सगुण अवतार नसला तरी 'नामावतार' आहे, आणि तोच खरा तारक आहे. नामाकरिता नाम घ्या कीं त्यात राम आहे हे कळेल.


३५०. भगवंताजवळ काय मागावे ? 'तुझे प्रेम मला लागू दे.' हेच त्याच्याजवळ मागावे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

No comments:

Post a Comment