February 13, 2015

समर्थ रामदास नवमी

१३ फेब्रुवारी  - समर्थ रामदास नवमी

सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मांदार शृंगापरी
नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी|
साकेताधिपती कपि भगवती, हे देव ज्याचे शिरी
तेथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी॥


२२ जानेवारी १६८८ माघ वद्य नवमी या दिवशी देहत्याग करण्याचे समर्थांनी मनी ठरविले. त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. परंतु जीवनाचे प्रयोजन संपले, असे मानून त्यांनी सज्जनगडावर देहत्याग केला. ही समर्थ समाधी आणि समर्थांचा दासबोध आजही नवजीवन व नवप्रेरणा देणारे आहेत.

माझी काया आणि वाणी
गेली म्हणाल अंत:करणी|
परि मी आहे जगज्जीवनी निरंतर॥

जय जय रघुवीर समर्थ !

समर्थ रामदास स्वामींनी बारा वर्षं तपश्चर्या केली. त्याचवेळी श्रीराम आणि हनुमानानं त्यांना दर्शन दिलं आणि 'कृष्णातीरी जगदुद्धार कर असा आदेश दिला. त्यानंतर रामदासांनी भारतभर पायी भ्रमण केलं. हिंदू जनतेची मनं रामभक्तीकडे वळवून त्यांना दूरवस्थेतून बाहेर काढण्याचं त्यांनी ठरवलं. त्याचबरोबर रामाचा संदेश पोहोचवणारा सर्वश्रेष्ठ दास मारूतीकडच्या बलाची उपासनादेखील लोकांना शिकवावी असंही त्यांनी ठरवलं. त्यासाठी गरज होती लोकसंग्रहाची आणि लोकजागृतीची. म्हणूनच त्यांनी गावोगावी भ्रमण केलं आणि ११ मारुतींची स्थापना केली.

श्रीक्षेत्र शहापूर 

समर्थांच्या अकरा मारुतींपैकी हा मारुती कालानुक्रमे पहिला मानला जातो. शके १५६६ सन १६४५ मध्ये त्याची स्थापना झाली. 

शहापूर हे गाव तेव्हा आदिलशाहीत होतं. तेथील बाजीपंत कुळकर्णी देवभक्त होते. कामात एकदम चोख. समर्थांचा मुक्काम त्यावेळी तिथूनच जवळ असलेल्या चंद्रगिरी डोंगरावर असायचा व ते शहापुरात माधुकरी मागायला यायचे. ते बाजीपंत कुळकर्ण्यांच्या घरासमोर येताच पंतांची पत्नी सतीबाई तणतणत बाहेर यायची ,समर्थांची गोसावडा ्हणून अवहेलना करायची. परंतु एक दिवस कुळकर्ण्यांच्या घरात काहीसं दुःखी वातावरण होतं. कारण गावकीच्या हिशोबावरून बाजीपंतांना मुसलमानांनी पकडून विजापुरास नेले होते. 

सतीबाईंची अवस्था रामदासांना पाहवेना. तेव्हा समर्थ सतीबाईंना म्हणाले , " आजपासून पाचव्या दिवशी बाजीपंत सुखरूप परत आले तर तुम्ही रामनामाचा जप कराल काय ?" सतीबाई म्हणाल्या , " तसे झाले तर एकदाच का हजारदा जप करीन. त्यानंतर रामदास निघून गेले. 

ते कारकुनाच्या वेषात आदिलशहासमोर हजर झाले आणि बाजीपंतांच्या सास-यांनी व पत्नीनं आपल्याला हिशोबसमजावून सांगायला पाठवल्याचं सांगितलं. आपलं नाव त्यांनी दासोपंत सांगितलं आणि अधिका-यांना हिशोब समजावून बाजीपंतांची सुटका केली. बाजीपंतांना काहीच कळायला मार्ग नव्हता. गावाच्या वेशीवर येताच रामदास स्वामी अदृश्य झाले. बाजीपंत घरी आले तेव्हा दासोपंतांची कथा ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले. अचानक सतीबाईंना गोसाव्याची आठवण झाली आणि त्याचं दर्शन होईपर्यंत त्यांनी अन्नपाण्याचा त्याग केला. रामदासांना हे कळताच ते कुळकर्ण्यांच्या घरी गेले. तेव्हा सतीबाईंना त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. त्यांनी समर्थांकडून अनुग्रह घेतला. 

एकदा त्या रामदासांच्या दर्शनासाठी एका डोंगरावर गेल्या. रामदास नैवेद्य दाखवत असताना त्यांना मागे वळून पाहिलं तेव्हा त्यांना प्रखर तेजस्वी हनुमानाची मूर्ती दिसली. ती पाहून सतीबाई मुर्च्छित पडल्या. त्या शुद्धीवर येताच समर्थ म्हणाले तुमच्या थोर पूर्वपुण्याईमुळे तुम्हाला आज मारुतीरायांचे दर्शन घडले. 

त्यानंतर समर्थांनी एक चुन्याची मारूतीची मूर्ती तयार केली व सतीबाईंच्याच गावात एका योग्य ठिकाणी तिची प्रतिष्ठापना केली. तीच ही शहापूरच्या देवळातली मारुतीची मूर्ती. हा मारुतीला शहापूरचा चुन्याचा मारुती 'असंच म्हणतात. मूर्तीचा चेहरा उग्र वाटतो आणि त्याच्या डोक्याला एक गोंड्याची टोपी आहे. येथ चैत्र शुद्ध १५ या तिथीला हनुमानजयंतीचा उत्सव साजरा केला जातो. 

श्रीक्षेत्र मसूर 

समर्थांच्या भ्रमणामुळे त्यांच्या रसाळ कीर्तनांमुळे आणि त्यांच्या सिद्धिसामर्थ्यांमुळे त्यांचा शिष्यसंप्रदाय वाढतचालला. आपल्या शिष्यांना व आपल्याकडे आकर्षित होणा-या लोकांना एकत्र आणून त्यांच्यात परस्परांविषयी आत्मियता निर्माण व्हावी म्हणून त्यांनी रामजन्माचे व हनुमानजयंतीचे उत्सव सुरू केले. अशा उत्सवांसाठी त्यांनी काही मोक्याच्या ठिकाणी मारुतीची स्थापना केली त्यातलाच एक मसूरचा मारुती होय. मसूर येथील ब्रह्मपुरी भागातील कुलकर्णी घराण्याला समर्थांनी अनुग्रह दिला होता. म्हणून या ब्रह्मपुरी भागातच शके १५६७सन १६४६ मध्ये मारुतीची स्थापना केली. हा मारुती मसूरचा मारूती म्हणून ओळखला जातो. त्याला 'महारुद्र हनुमान ही म्हणतात. 

ही मूर्तीसुद्धा चुन्याची आहे. समर्थांच्या अकरा मारुतीत सर्वात देखणी ही मूर्ती आहे. तिची मुद्रा सौम्य प्रसन्न आहे आणि डोक्यावर सुरेख मुकूट आहे. गळ्यातील माळा हार जानवे कटि-मेखला लंगोटाचे काठ हाताची बोटं बारकाव्याने रंगवलेली आहेत. मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजूला शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची चित्रं काढलेली आहेत. 

समर्थ रामदासांनी या मारूतीची स्थापना केल्यानंतर सतत चार वर्षे येथे रामनवमीचा उत्सव केला. तिथेच समर्थांना कल्याण या शिष्याची प्राप्ती झाली होती. 

चाफळचे मारुती 

समर्थ रामदासांच्या जीवनकार्यात चाफळचे महत्त्व फार मोठे आहे. चाफळचं प्रसिद्ध राममंदिर रामदासांनी शके १५६९ सन १६४८ मध्ये आपले शिष्य व गावकरी यांच्या मदतीने बांधलं. प्रभू रामचंद्रांनी दिलेल्या दृष्टांताप्रमाणे चाफळपासून जवळच असलेल्या अंगापूरच्या डोहातील रामाची मूर्ती त्यांनी बाहेर काढली व तिची या देवळात प्रतिष्ठापना केली. पंचवटीचा राम कृष्णेच्या खो-यात आला आणि समर्थ संप्रदायाच्या मुख्य मठाचे स्थान चाफळ हे ठरले. 

अशी आख्यायिका आहे की ज्यावेळी प्रभू रामचंद्रांनी समर्थांना अंगापूरच्या डोहातील मूर्तीविषयी दृष्टान्त दिला त्याच वेळी मारुतीनेही समर्थांना दर्शन देऊन सांगितले की या रामाच्या समोर माझी मूर्ती स्थापन करून तू त्या मूर्तीत प्रवेश कर आणि माझी भीममूर्ती रामाच्या देवळाच्या मागे स्थापन कर. मारुतीच्या या आदेशाप्रमाणे समर्थांनी राममंदिराच्या पुढे हात जोडून उभा असलेला दासमारुती आणि मंदिराच्या मागे प्रतापमारुती अशा दोन मूर्तींची स्थापना शके १५७० सन १६४९ मध्ये केली. 

दासमारुती 

हा श्रीरामाच्या समोर दोन्ही कर जोडोनि उभा आहे. श्रीरामासमोर नम्र हनुमंताची मूर्ती असली पाहिजे म्हणून समर्थांनी सुंदर दगडी मंदिर बांधून त्यात दासमारुतीची स्थापना केली. ही मूर्ती सुमारे सहा फूट उंच आहे. चेह-यावर अत्यंत विनम्र भाव समोर असलेल्या प्रभू श्रीरामाच्या चरणांवर विसावलेले नेत्र अशी ही मूर्ती आहे. तिचे अवयव रेखीव व प्रमाणबद्ध आहेत. या दासमारूतीसाठी समर्थांनी बांधलेले मंदिर आज सुमारे सव्वातीनशे वर्षांनंतरही उत्तम स्थितीत आहे. १९६७ सालच्या भूकंपातही या मंदिरास कोठे धक्का लागला नाही साधा तडाही गेला नाही. राममंदिराचे मात्र या भूकंपाने मोठं नुकसान झालं. त्यामुळे त्याची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. परंतु समर्थकालीन सर्व शिल्प व वास्तू कायम ठेवण्यात आली आहे. 

प्रतापमारुती 

श्रीराम मंदिराच्या मागे सुमारे तीनशे फूट अंतरावर प्रतापमारुतीचे मंदिर आहे. या मारुतीला भीममारुती ', 'प्रताप-मारुती किंवा वीर-मारुती अशी तीन नावं आहेत. प्रताप-मारुतीची उंची सुमारे सात-आठ फूट आहे.मूर्ती अत्यंत भव्य उंच व रेखीव आहे. भीमरुपी महारुद्रा या स्तोत्रात समर्थांनी वर्णन केल्याप्रमाणे पुच्छ माथा मुरडिले आहे. मस्तकावर मुकूट कानात कुंडले आहेत. कटिभोवती सुवर्णाची कासोटी व तिला रुणझुण करणा-या घंटा आहेत. टकाराचे ठाण मांडून बसलेली ही मूर्ती नेटकी व सडपातळ आहे. समर्थांनी आपल्या विशिष्ट शैलीत ठसकेबाज वर्णन केलेली ही मूर्ती पुण्यवान भक्तांना परितोषविणारी व दुष्टांना काळाग्नी व काळरुद्राग्नी सारखी भासते. 

चाफळ मठात वास्तव्य असलं की समर्थ या मूर्तीच्या चरणतलाशी बराच वेळ बसून समोर असलेल्या बकुलवृक्षावरील वानरांच्या लीला पाहात. चाफळ गावावर आलेले कोणतेही दैवी संकट या मूर्तीच्या पूजेने दूर होते अशी या भागातील भाविक जनतेची श्रद्धा आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात महारुद्र मूर्तीला महारुद्राभिषेक करण्यात येतो व अनुष्ठानाची सांगता वद्य ३० ला यथासंग साजरी केली जाते. 

श्रीक्षेत्र शिंगणवाडी 

चाफळच्या नैऋत्येला अर्ध्या मैलावर शिंगणवाडीची टेकडी आहे. तेथील गुहेत समर्थ रामदास जप करायला जात म्हणून त्यांनी आपलं आराध्य दैवत मारुतीची तिथे स्थापना केली. चाफळच्या दोन मारुतींपाठोपाठ शके१५७१ सन १६५० मध्ये या मूर्तीची स्थापना झाली असावी असे मानले जाते. चाफळ येथे मुख्य मठ स्थापन करण्यापूर्वी समर्थांचा मठ येथे होता. शिवाजी महाराज व समर्थ रामदासांची भेट या मठालगतच्या बागेतील एका शेवरीच्या झाडाखाली झाली होती. या भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांकडून गुरुदक्षिणेदाखल मिळालेले होन समर्थांनी जमलेल्या लोकांवर उधळले होते त्यातील काही नाणी अगदी परवा-परवापर्यंत सापडत होती. 

इथून जवळच रामघळ हे समर्थांचं चिंतनाला बसण्याचं ठिकाण आहे. तसंच शिवाजी महाराजांची तहान भागवण्यासाठी समर्थांनी आपल्या कुबडीनं दगड उलथून दगडाखाली पाण्याचा झरा दाखवला ते कुबडीतीर्थ ही जवळच आहे. 

या मारुतीला खडीचा मारुती किंवा बालमारुती असंही म्हणतात. मारुतीच्या डाव्या हातात त्रिशुळासारखी वस्तू आहे आणि दुसरा हात उगारलेला आहे. रामदासांच्या अकरा मारुतींमध्ये हे देऊळ सर्वात छोटं आहे. 

श्रीक्षेत्र उंब्रज 

समर्थ रामदासस्वामी चाफळहून रोज उब्रज येथे स्नानाला जात असत म्हणून येथील मारुतीची स्थापना झाली असावी. मंदिराच्या जवळ कृष्णा नदीचा घाट आहे. तिथे स्नान करायचं आणि मारुतीच्या मूर्तीची पूजा करायची असा समर्थांचा नित्यक्रम असे. या मूर्तीची स्थापना शके १५७१ सन १६५० मध्ये झाली. या मूर्तीच्या स्थापनेनंतर समर्थांनी सतत १३ दिवस कीर्तन केलं असा उल्लेख आहे. समर्थांना शके १५७० मध्ये उंब्रजमध्ये काही जमीन इनाम म्हणून मिळाली होती. त्यामुळे त्यांनी येथे मारुती मंदिर व त्यापाठोपाठ मठही स्थापन केला. 

समर्थांच्या अकरा मारुतींमध्ये ही मूर्ती वयानं सगळ्यात लहान वाटते. तो बालमारूती वाटतो. या मूर्तीला चांदीचे डोळे आहेत. त्याला उंब्रजचा मारुती किंवा मठातील मारुती अशी नावं आहेत. हनुमानाचं पाऊल आणि खडकावर उमटलेला श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र या दोन्हीच्या खुणा अजून इथे आहेत. रामदास बुडत असताना मारुतीनं त्यांना वाचवलं त्यावेळी उमटलेलं ते हनुमानाचं पाऊल असल्याचं मानलं जातं. 

श्रीक्षेत्र माजगाव 

माजगावच्या शिवेवर साधारण घोड्याच्या आकाराचा एक मोठा धोंडा होता. लोक त्या धोंड्यालाच ग्रामरक्षक मारुती म्हणून पूजीत असत. एकदा समर्थ त्या गावी गेले असताना त्यांना गावक-यांनी तो धोंडा दाखवला व 'तुमच्या पवित्र हातांनी या मारुतीची प्रतिष्ठापना व्हावी अशी विनंती केली. 

गावक-यांची श्रद्धा पाहून समर्थांनी त्या धोंड्यावर मारुतीची प्रतिमा कोरून घेतली व शके १५७१ सन १६५० मध्ये त्या मारुतीची उत्सवपूर्वक स्थापना केली व तेथे देऊळही उभे केले. आजचं तिथलं देऊळ श्रीधरस्वामींनी बांधलेले आहे. माजगावचा मारुती याच नावानं हा मारुती ओळखला जातो. 

सध्या तिथे असणारे मारुतीचे मंदिर श्रीधरस्वामींनी उभारले आहे. मूर्ती पाच फूट उंचीची आहे. मूर्तीचे तोंड पश्चिमेला म्हणजे चाफळच्या मारुतीकडे आहे. देवळाच्या पूर्वेकडील बाहेरच्या भिंतींवर आकाशोड्डाण करणा-या हनुमंताचे सुंदर चित्र रेखाटले आहे. 

श्रीक्षेत्र बहे बोरगाव 

कृष्णा नदीकाठी वाळवे तालुक्यात असलेल्या बहे-बोरगाव हे समर्थस्थापित मारुतीचे जागृत आणि रम्य स्थान आहे. येथील नदीत रामलिंग नावाचे बेट आहे. तेथे एक राममंदिर असून राममूर्तीच्या पुढ्यात शिवलिंग आहे. या मारुतीचे हात कृष्णेचा प्रवाह अडवण्याच्या स्थितीत आहेत असे वाटतात. आकाराने भव्य असलेल्या या मूर्तीची स्थापना समर्थांनी इसवीसन १६५२ मध्ये केली असे मानले जाते. 

या स्थानाबद्दल एक अख्यायिका सांगितली जाते. रावणवध करुन सीतेसह परत येत असताना रामलक्ष्मणांनी बाहे गावात मुक्काम केला. सीतामाईंना गावात ठेवले आणि ते कृष्णेत स्नानासाठी गेले. स्नानानंतर श्रीराम शिवलिंगाची पूजा करण्यात मग्न असताना नदीचा प्रवाह एकदम वाढू लागला. मारुतीरायांनी लगेचच रामाच्या मागे नदीत उभे राहून दोन्ही हातांनी कृष्णेचा प्रवाह रोखला. मारुतीने प्रवाह रोखल्यामुळे प्रवाह दोन बाजूंनी पुढे गेला आणि मध्ये बेट तयार झाले. म्हणूनच या स्थानाला बाहे असे नाव पडले. 

समर्थ तिथे आले तेव्हा त्यांना ही लोकांकडून ही हकीगत कळली. मारुती नदीत उडी मारुन बसला आहे असा गावक-यांचा समज होता. जेथे रामाने वास केला तेथे मारुती असणारच असे समर्थांनीही मानले. समर्थांनी डोहात उडी मारली. काही काळ ते डोहात होते. पण त्यावेळी गावरक-यांकडून पूजेची तयारी झाली नव्हती. त्यामुळे मारुतीराय पुन्हा डोहात लुप्त झाले. समर्थांनी ते रुप आठवून दुसरी मूर्ती तयार केली आणि तिची रामाच्या मूर्तीमागे स्थापना केली. 

अत्यंत निसर्गरम्य असणा-या या क्षेत्राचा कृष्ण महात्म्यात बाहुक्षेत्र असा उल्लेख आढळतो. 


श्रीक्षेत्र मनपाडळे 

ज्योतिबाचा डोंगर आणि पन्हाळगड येथून जवळ असलेला आणि सर्वात दक्षिणेकडचा समर्थस्थापित मारुती म्हणजे श्रीक्षेत्र मनपाडळे. पन्हाळगडाचे राजकीय महत्त्व लक्षात घेऊन समर्थांनी या मारुतीची स्थापना केली असावी. 

नदीच्या अगदी टोकावर वसलेल्या या मारुती मंदिराचा गाभारा ७ ६ फूट असून त्याभोवती २६ १५ फूट असा सभामंडप आहे. मंदिर कौलारू आहे आणि त्याच्याजवळून ओढा वाहतो. बलभीम मारुतीची मूर्ती उत्तराभिमुख आहे. साधारणतः साडेपाच फूटाची ही मूर्ती साधी पण सुबक आहे. 

श्रीक्षेत्र शिरोळे 

नागपंचमीच्या सणासाठी प्रसिद्ध असलेल्या शिराळे या गावात महादजी साबाजी देशपांडे हे समर्थशिष्य राहत असत. त्यांच्या आग्रहास्तव समर्थांनी इसवीसन १६५५ मध्ये येथे मारुतीची स्थापना केली. तेव्हापासून या मारुतीच्या पूजेची जबाबदारी देशपांडे कुटुंबांकडे आहे. 

हे देऊळ उत्तराभिमुख असून मूर्तीचे तोंडही उत्तरेकडे आहे. ही सात फूट उंचीची वीरमारुतीची मूर्ती असून तिच्या कंबरपट्ट्यात घंटा कटिवस्त्र आणि गोंडा चितारलेला आहे. मूर्तीच्या मस्तकाच्या डाव्या-उजव्या बाजूला झरोके असून त्यातून मूर्तीभोवती हवा खेळती राहते. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी या झरोक्यातून मूर्तीवर प्रकाश पडतो आणि फार सुंदर दृश्य दिसते. देवळाच्या दक्षिण दिशेलाही एक प्रवेशद्वार आहे. 

श्रीक्षेत्र पारगाव 

क-हाड कोल्हापूर रस्त्यावरील वाठार गावापासून वारणा साखर कारखान्याकडे जाणा-या रस्त्यावर नवे पारगाव आहे. या नव्या पारगावाच्या उत्तरेस दोन मैलावर जुने पारगाव आहे. या जुन्या पारगावचा मारुती म्हणजेच समर्थांनी स्थापलेला शेवटचा मारुती. 

अकरा मारुतींपैकी या मारुतीची मूर्ती सर्वात लहान मानली जाते. या मूर्तीची उंची फक्त दीड फूट आहे. एका सपाट दगडावर ही मूर्ती कोरलेली असून या मारुतीने केसाची शेंडी बांधलेली आहे. तो डावीकडून तोंड करुन धावत निघालेला आहे. समर्थाच्या इतर मूर्तीहून ही मूर्ती इतकी निराळी आहे की ही मूर्ती समर्थांची नव्हे अशी शंका यावी. 

या पारगावाबद्दल असेही सांगतात की राजकीय खलबतांसाठी शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास येथे येत असत असे म्हणतात. 
समर्थांचे हे अकरा मारूती जागृत देवस्थाने आहेत असे मानले जाते. हया अकरा मारूतींना 'वारीचे मारूती' असेही म्हणतात.
संदर्भग्रंथ - समर्थ स्थापित अकरा मारुती
(लेखक - पु. वि. हर्षे)

No comments:

Post a Comment