पावलों पंढरी वैकुंठभुवन । धन्य अजि दिन सोनियाचा ॥१॥ पावलों पंढरी आनंदगजरें । वाजतील तुरें शंख भेरी ॥२॥ पावलों पंढरी क्षेमआलिंगनीं । संत या सज्जनीं निवविलों ॥३॥ पावलों पंढरी पार नाहीं सुखा । भेटला हा सखा मायबाप ॥४॥ पावलों पंढरी येरझार खुंटली । माउली वोळली प्रेमपान्हा ॥५॥ पावलों पंढरी आपुले माहेर । नाहीं संवसार तुका म्हणे ॥६॥
No comments:
Post a Comment