March 13, 2020

हर्षल

प्रिय हर्षल,

सर्वप्रथम तूला वाढदिवसाच्या शुभेच्छा 📝

खरं म्हणजे कालच १२ मार्चला 'आजचे दिनविशेष ' या रेडिओ वरच्या कार्यक्रमात तूझा वाढदिवस ( तेही १९७२ वगैरे साल) म्हणून सांगितले गेले. पण तूझा वाढदिवस आजच. १३ मार्च १७८१ ला "विल्यम हर्षल" ने तूला शोधले. 'बुध' ग्रहाची विस्तारित आवृत्ती म्हणजे तू. म्हणूनच वाढदिवसाच्या तारखेत ही 'संभ्रमावस्था' ही खरंच तूलाच शोभून दिसली. असो.

पाश्चिमात्य खगोलशास्त्रज्ञाने तूला शोधून त्याचेच नाव तूला दिले गेले. 'यूरेनस' असेही तुझे इंग्रजी नाव आहे. पण इकडच्यांनी पण तूला खास नावं दिली आहेत

प्रजापती- कै. जनार्दन मोडक यांनी केलेले नामकरण

अरुण -कै. व्यंकटेश केतकर यांनी दिलेले नाव

खरं म्हणजे ९ ग्रहांच्या कारकत्वा पलीकडे पहायची अजूनही
ब-याच जणांना सवय नाही म्हणूनच की काय तू, वरुण ( नेपच्यून)  आणि यम ( प्लूटो)  या ग्रहांचा जातकाच्या एकंदर  जीवनात होणा-या घडामोडींबद्दल फारसे लिहिलेले नाही ( काही अपवाद वगळता) . मुख्य म्हणजे महा-दशेत ही तुम्हाला स्थान नाही. पण जीवनातील अनेक महत्वाच्या मुख्यत: विचित्र घडामोडीं घडण्यात तुमचा वाटा आहे.

पत्रिकेतील १२ राशीत/ १२ स्थानातून  नक्की कुठे, कसा , कुणाबरोबर तू  उपस्थित असता जातकाला 'हर्ष ' होईल हे कळणे थोडे अवघडच. कारण मुळातच तुझी गणना पापग्रहात झाली आहे . तरीही एका राशीत ७ वर्षे काढणारा तू, विविध ग्रहांशी योगात काय विविध चमत्कार करतोस हे अभ्यासणे ही एक मोठी गोष्ट वाटते.

काही उदाहरणे

अल्बर्ट आईनस्टाईनच्या कुंडलीतील बुध ग्रहाच्या त्रिकोणयोगातील 'हर्षल ' सापेक्ष सिध्दांत मांडतो.

न्यूटनच्या कुंडलीतील गुरुच्या त्रिकोण योगातील हर्षल ' गुरूत्वाकर्षणाचा ' शोध लावतो

तर एडीसनच्या कुंडलीत गुरुच्या लाभयोगातील हर्षल जगाला तारायंत्राच्या विश्वात नेऊन सोडतो.

महर्षी धोंडो केशव कर्वे - शनी सारखा परंपरा सांभाळणारा पुराणमतवादी ग्रह हर्षल बरोबर लाभयोगात. त्याकाळात जुन्या परंपरांचे आव्हान स्विकारुन विधवा- विवाह केला

पंडीता रमाबाई - शनी हर्षल लाभयोग. बिपिन मेधावी यांच्याशी रजिस्टर पद्धतीने विवाह, नंतर विलायतेत मुलीसह ख्रिस्ती धर्माची शिक्षा

गो.ग.आगरकर - रवि हर्षल लाभयोग. सर्व अंधश्रध्दा, ओंगळ रुढि व अविवेकी परंपरा यावर सुधारक पत्रातून टिका

थोडक्यात श्राध्द व श्रावणी न करणारे, देव न मानणारे, सोयर सुतक न पाळणारे, आंतरजातीय विवाह करणारे छोटे मोठे सुधारक तूझ्या अंमलाखाली येतात.

म.दा भट यांनी तुझ्याबद्दल एका पुस्तकात लिहिले आहे.
हा हर्षल मोठा स्फोटक ग्रह आहे. हायड्रोजन सारख्या स्फोटक वायूची हर्षल देवता आहे. मोठा चौकस व बुध्दिमान ग्रह आहे.
ब-याच वेळा हा चौकसपणा विघ्नसंतोषी असतो. काही तरी विचित्र करावयाचे, उडी  मारायची, नाश झाला तरी चालेल, आगे कूच करावयाची.

सर्व नवीन संहारक अस्त्रे तूझ्याच अंमलाखाली येतात. याचा उपयोग शेवटी जगाच्या कल्याणासाठी करायचा की संहारासाठी हे सर्व तुझ्या लहरीपणावर अवलंबून.

अतिरेकी स्वार्थामुळे, अविवेकामुळे वा सत्तास्पर्धेमुळे हा हर्षल रुद्र रुप धारण करुन भविष्यकाळात कोणा राष्ट्रप्रमुखाच्या शरिरात प्रवेश करता झालाच तर पुराणामध्ये वर्णिलेला प्रलय वा विश्वलय अशक्य नाही अशी निश्चिती शास्त्रीय प्रगतीमुळे येत आहे.

 तेंव्हा थोडंस ' *डरो ना*  असे यानिमित्ताने तमाम सृष्टीतील अविवेकी जनतेस सांगावेसे वाटते.

इतर ग्रहांप्रमाणेच तुमचे ही  सध्याचे  मेष राशीतील भ्रमण बारा राशीच्या लोकांना *आरोग्यदायी जावो* या तुमच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 🙏🏻💐

वायो विजांचे तडाखे !
तेणे पृथ्वी अवघी तरखे!
कठिणत्व अवघेंचि फांके!
चहूंकडे !!

तेथें मेरुची कोण गणना!
कोण सांभाळिल कोणा!
चंद्र सूर्य तारंगणा!
मूस झाली !!

पृथ्वीने विरी सांडिली!  अवघी धगधगायमान जाली!
ब्रम्हांडभटी जळोन गेली!  येकसरां!!

📝 ( ग्रहांचा मित्र)  अमोल
१३/०३/२०२०

*
( ग्रह योग संदर्भ : म.दा. भट यांचे पुस्तक)

March 4, 2020

प्लूटो - ग्रह बदल

*प्लूटो* ग्रह - राशी बदल

१९३० साली शोध लागलेला हा ग्रह. आज ४ मार्चला धनू राशीतून मकर राशीत आला आहे.

एका राशीत तब्बल २४ वर्ष मुक्काम करणारा हा ग्रह. म्हणजे बघा आपला ७४/ ७५/७६/७७ जन्म आहे  त्यांच्या सगळ्यांच्या पत्रिकेत प्लुटो ग्रह 'कन्या' राशीतच असेल.

शोध लागल्यापासून अजून या ग्रहाची संपूर्ण राशीचक्रातून फेरीही झालेली नाही.

या ग्रहाचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो याचा संपूर्ण अभ्यास व्हायचाय. त्यामुळेच की काय पत्रिकेत या ग्रहाबद्दल फारसा विचार केला गेलेला दिसत नाही

एकटा जोतिषी या ग्रहाच्या संपूर्ण राशीचक्रातील भ्रमणाचा अभ्यास करणे ही शक्य नाही. आज वयाने ४० वर्षाचे जे जोतिषी आहेत ते फारफार तर अजून 'मकर',  कुंभ' राशीतील प्लुटोचा अभ्यास करु शकतील. मात्र हे ज्ञान पुढच्या पिढीला म्हणजे अजून ५० वर्षानंतर जे जोतिषी असतील त्यांच्यापर्यत पोहोचले पाहिजे. त्यासाठी मकरेतील प्लूटो किंवा कुंभेतील प्लूटो असे लिखाण कायमस्वरूपी पुस्तक रुपात राहणे आवश्यक आहे.

प्लूटोचे व्यक्तीपेक्षा राष्ट्राच्या व सामूहिक जीवनाच्या दृष्टीने जास्त महत्व आहे. सामाजिक क्रांती,  लढाया, संक्रमणे, राजकीय उलाढाली वगैरे गोष्टी प्लूटोच्या कारकत्वाखाली येतात. या ग्रहाबाबत अद्याप बरेच संशोधन होणे बाकी आहे.

आपल्या भारत देशाची रास 'मकर' मानली जाते. आज प्लूटो 'मकर' राशीत आलाय आणि त्याचा मुक्काम साधाएण २४ वर्षे इथे असेल.
भारतासाठी आणि प्लूटो अभ्यासकांसाठी त्याचे मकर राशीतून भ्रमण सुखावह जावो या शुभेच्छा 💐

📝( ग्रहांकीत) अमोल