August 22, 2020

धन्य_तुम्हारो_दर्शन_मेरा_मन_रमता

#धन्य_तुम्हारो_दर्शन_मेरा_मन_रमता



खूप छान वाटलं आज. गेल्या ५ एक संकष्ट्या, आणि २० एक मंगळवार तुझ्या दर्शनासाठी आम्ही रांग लावू शकलो नाही. परिस्थितीच अशी आलीय. पण सालाबादाप्रमाणे तू मात्र आज प्रत्येकाच्या घरी एव्हान स्थानापन्न झाला आहेस. जमेल तशी तयारी, सजावट, मिळतील तशी फूले ,फळे, जमेल ते साहित्य घेऊन सगळ्यांनी यथा शक्ती यथा ज्ञाने तुझी सेवा केली आहेच, कुठे काही कमी झालं असलं तरी तू रागावणार नाहीस याची खात्रीच आहे. कारण त्यामागची भावना महत्वाची आहे.

"भाव तिथे देव "

यंदा अनेकांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला. अनेकांनी आपल्या हातांनी तुझे ॐ कार स्वरुप घडविले. काहींनी शब्द,काव्य,चित्र, स्वर,हस्तकला या माध्यमातून तुझी सेवा केली. खरं म्हणजे या गोष्टी कळण्यासारख्या असतात पण इतर ही अनेक कलेतून/ गोष्टीतून  इतरांनी तुझी आळवणी केली असेल पण ते सहजा सहजी आमच्या लक्षात आले नाही. पण तुझे आशीर्वाद त्यांच्या पाठिशी नक्की असतील. उगाच नाही ६४ कलांचा तुला अधिपती म्हणतात

यातील काही कला मात्र सध्या थोड्या बदल्यात बरं का बाप्पा , म्हणजे हे माझं मतं.

संपाठ्य ही कला. - म्हणजे
 दुस-याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे करणे ( या कलेत थोडस बदल झालाय. आज आम्हीफक्त दुस-याचे बोलणे/ लिहिणे जसेच्या तसे पुढे ढकलतो. किंवा नुसतेच हसतो)

"म्लेंछीतकला विकल्प"- परकीय भाषा ठाऊक असणे. 
👆🏻हे मात्र इमाने इतबारे अंमलात आणतोय 

किंवा एकवेळ

 "शुकसारिका प्रलापन"- पोपट व मैना यांना मानवी बोली शिकवणे. इथे पोपट, मैना एवजी  डाॅग, कॅट ला शिकवतोय.

पण बाप्पा या गडबडीत समभाषीक मित्रांबरोबर स्वभाषेत बोलणे/ लिहिणे हेच विसरलोय.जिथे तिथे परकीय भाषा एकमेकांशी संभाषणात पण.

बाप्पा गेल्या काही महिन्यात 'चित्रशब्दापूपभक्षविपाक क्रिया' 
( उत्तम स्वयंपाक करणे)  ही कला ही अनेकांनी करुन दाखवली मुख्य म्हणजे घरातील प्रत्येकाने या कामात हिरिरीने भाग घेतला. त्यातही मध्यंतरी डॅल्गोना काॅफीची " पानक रस तथा रागषाडव योजना" - (सरबत व इतर पेय तयार करणे) ही कला ही अनेक कलाकारांनी शिकून घेतली.

देवा, या ६४ कलांचा उल्लेख कुठल्या क्रमाने घ्यायचा याची कल्पना नाही पण दोन तीन संदर्भ बघितले असता

५६ नंबर वर 💪🏻 . नाट्य आख्यायिकादर्शन-  असं होतं. 

हे वरच उदाहरण म्हणजे 
वाचणा-यांसाठी एक "प्रहेलिका" च आहे. त्याचा अर्थ  या कलेचे खरे "भक्तच" जाणतील 😎

विनायका,
  "वैनायिकी विद्याज्ञान","अभिधान कोष छंदोज्ञान", "मानसी काव्यक्रिया " ," दुर्वाच योग" या कलेमधे तुझ्या कृपेने गोडी लागो ही सदिच्छा मात्र
" पुष्पशकटिका निमित्त ज्ञान " कलेत मात्र तुझ्या कृपेने यश मिळो ही तुझ्या चरणी प्रार्थना

या असंख्य कलेत प्राविण्य मिळवलेले कलाकार , यांची सुरवात ही एखाद्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यक्रमातून तुझ्या कृपा-आशिर्वादानेच झाली असणार यात शंका नाही.

यासगळ्यांवर तसेच आमच्या सारख्या "शब्द-कारांवर" तुझा वरद-हस्त कायम राहो.

तुझे नुसते दर्शन झाल्यावर मनातील सर्व इच्छा पुर्ण होतात म्हणूनच तुझ्या आरतीत 
" दर्शन मात्रे नाम कामनापुर्ती" असे म्हणले आहे.

वय्यक्तिक मागणे जसे सर्वजण तुझ्याकडे करतीलच तसेच सर्वजण आज संपूर्ण  'विश्वाचे मंगल ' होऊ दे आणि सध्याचे संकट टळू दे ही मागणी ही करत असतील.

योग्य वेळी तू सर्वांना म्हणणारच आहेस "तथास्तु " 🙏🏻🌺

📝अमोल केळकर
भाद्रपद शु. चतुर्थी

#सादर करितो कला गजमुखा

No comments:

Post a Comment