गीताजयंतीच्या शुभेच्छा...
.
जय योगेश्वर
.
परब्रह्म साकार होऊनी आत्मज्ञान सांगती,
जाण मनुजा, जाण जाण रे, गीतेची महती |
.
आप्तजना त्या, समोर पाहून, युद्ध नकोशा पार्था जाणून,
परमपूज्य, पुरुषोत्तम प्रेमळ, स्वधर्म समजावती |
.
'पिंडी आणिक ब्रह्मांडी केवळ, आत्मतत्व विलसे,
ईशावास्यच सर्व जगत हे, भेदबुद्धी का असे? |
.
माहित नाही, पूजाविधी, अन्यदेव जरी भजती,
असेल श्रद्धाभाव तर ते, मलाच हो पूजती |
.
भक्तीने ते, ज्ञान मिळूनीया, भक्त मला मिळतो,
बुद्धीहीन अन, श्रद्धाहीन जो, नाशच तो पावतो |
.
नका म्हणू हो , मनुष्यधारी, परमेशाचे रूप,
प्रतीकांच्या त्या पलीकडचे सत्य अव्यक्त स्वरूप |
.
सोडून आशा कर्मफलाची, कर्मे आचरसी,
परमेशार्पण करसी ती मग, परम सिद्धी पावसी |
.
बुद्धीनेच अध्यात्म जाणणे क्लेशाचे आहे,
श्रद्धेने, अन भक्तीने ते, सहजसाध्य आहे |
.
विभूती जाणून माझी, जे जन, मजप्रती चित्त ठेविती,
मत्परायण होऊनी कर्मे करती , मलाच ते मिळती |
.
'निश्चय करूनी मला शरण ये, मिळव तू मुक्ती '
सुलभ मार्ग भक्तीचा हा, योगेश्वर वदती |
.
जाण मनुजा, जाण जाण रे, गीतेची महती |
.
.
(सौ. शैलजा शेवडे)
No comments:
Post a Comment