July 1, 2021

निघालो घेऊन संतांची पालखी

.निघालो घेऊन 'संतांची पालखी' 🚩

महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचा अभूतपूर्व सोहळा म्हणजे अनेक संत महात्म्यांच्या दिंडी आषाढी एकादशी साठी पंढरपूर कडे प्रस्थान होणे. जिथून पालखी निघते ते ठिकाण आणि पंढरपूरला पोहोचायला लागणारे दिवस यानुसार पालखी प्रस्थानाची " तिथी " ठरलेली असते.

त्यानुसार आज संत तुकाराम महाराजांची पालखी देहू मधून निघायचा तिथीप्रमाणे दिवस. 

 त्याच्या दुस-या दिवशी निघते देहू पासून जवळच असणा-या आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी.

 तसेच महाराष्ट्रातील अनेक प्रमुख पुण्यभूमीतून जसे शेगाव, नाशिक, सज्जनगड इथून निघालेल्या पालख्या पंढरपूर कडे त्या त्या तिथीला निघतात आणि आषाढी एकादशीच्या आधी सुनियोजित वेळेत पोहोचतात.
वारकरी भक्तांची मनस्थिती जणू

मागे पुढे अवघा दिसे रिता ठाव
ठेवूनि पायी भाव वाट पाहे!

अशी होते.

अनेक वर्षाची ही परंपरा. लहान मुले खेळायला बाहेर पडली की, एकमेकांना भेटल्यावर जसे आनंदित होतात तसेच हे भक्त ही

खेळ मांडियेला, वाळवंटी  घाई
नाचती वैष्णव भाई रे!

विठूरायाच्या गजरात हे सगळे इतके रममाण होतात की त्यांचा
क्रोध अभिमान गेला पावटणी
एक एका लागतील पायी रे !

सगळ्यांच्या उद्देश एकच,
जाऊ देवाचिया गावा
घेऊ तेथेचि विसावा! 
देवा सांगे सुख दु:ख
देव निवारील भूक!

हाच विश्वास वारक-यांना पुरेसे ठरतो पुढच्या आयुष्याच्या वाटचालीसाठी

मुंबईतील डबेवाल्यांचे जसे मँनेजमेंट उत्तम तसेच या दिंडीचेही. व्यवस्थापनाचा उत्तम नमुना इथेही दिसून येतो

 देहू, आळंदीच्या दिंड्या या पुण्यापासून दोन वेगळ्या मार्गाने पंढरपूरला पोहोचतात. हे मला महाबळेश्वरला उगम पावलेल्या कृष्णा - कोयना जशा वेगळ्या मार्गाने निघून कराडला जसा त्यांचा 'प्रिती संगम' होतो अगदी तसे वाटते. 

कृष्णा कोयना - भगिनी
तुकोबा- ज्ञानेश्वर - बंधू

प्रिती- भक्ती संगमाचे खूप छान उदाहरण यात बघायला मिळते. 
इतर पालख्या यात सामील होणे म्हणजे इतर नद्या कृष्णा- कोयनेला मिळण्यासारखे

"भेटी लागे जीवा, लागलीस आस"
अशी अवस्था होऊन जेंव्हा माऊलीच्या भेटीचा क्षण येतो तेंव्हा सगळ्यांना अगदी धन्य झाल्यासारखे वाटते.

आणी शेवटी उरते ते नतमस्तक होणे

काय तुझे उपकार पांडुरंगा
सांगो मी या जगामाजी आता!

जतन हे माझे करोनि संचित
दिले अवचित आणूनियां !

घडलिया दोषांचे न घाली भरी
आली यास थोरी कृपा देवा!

नव्हते ठाऊकें आइकिलें नाही
न मागता पाही दान दिले!

तुका म्हणे याच्या उपकारासाठी
नाही माझें गाठी काहीं एक!
//

'मानस पूजे' सारखी यंदाही परिस्थितीमुळे आषाढीपर्यत 'मानस वारी ' करावी लागतीय. हरकत नाही तरीपण

'विठ्ठल आवडी प्रेमभावो " 🚩🙏🌺

देवा तुझ्या द्वारी आलो 📝
ज्येष्ठ कृ. सप्तमी
१ जुलै २०२१
www.kelkaramol.blogspot.com 

No comments:

Post a Comment