२३ मार्च, २०२२

अशी ही थट्टा

अशी ही थट्टा 

आज एकनाथ षष्ठी  ( फाल्गुन कृ षष्ठी) . आजच्या तिथीला संत एकनाथ महाराजांनी  देह ठेवला. आजच्या दिवसाच्या निमित्याने त्यांची एक मला आवडलेली विशेष रचना  "अशी ही थट्टा" इथे देत आहे


यातील मेसेज ज्याने त्याने आपल्या पद्धतीने घ्यावा. समजायला तशी सोपीच आहे.

बरी नव्हे थट्टा, बरी नव्हे थट्टा, बरी नव्हे थट्टा
भलभल्यास लाविला बट्टा, अशी ही थट्टा

ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधी
थट्टेने हरवली बुद्धी
केली नारदाची नारदी
अशी ही थट्टा

थट्टा दुर्योधनानं हो केली
पांचाळी सभेत गांजिली
गदाघावे मांडी फोडिली
अशी ही थट्टा

थट्टेने दुर्योधन मेला
भस्मासुर भस्म की हो झाला
वालीही मुकला प्राणाला
अशी ही थट्टा

थट्टा रावणाने त्या केली
सोन्याची लंका बुडविली
थट्टा ज्याची त्यास भोवली
बरी नव्हे थट्टा

थट्टेतून सुटले चौघेजण
शुक, भीष्म आणि हनुमान
चौथा कार्तिकस्वामी जाण
त्याला नाही बट्टा

एका जनार्दन सर्वांला
थट्टेला भिऊन तुम्ही चाला
नाहीं तर नरककुंडाला
अशी ही थट्टा
//
थोडं अवांतर: संत एकनाथ महाराजांनी ज्या अनेक रचना केल्यात त्या प्रत्येक रचनेत शेवटच्या कडव्यात ते स्वतःसाठी 'एका जनार्दनी' असा उल्लेख करतात. वरच्या रचनेतही तसा उल्लेख आहे. आणखी काही
उदाहरणे-

माझ्या मना 
लागो छंद, गोविंद नित्य गोविंद!
यात शेवटी ते म्हणतात
गोविंद हा जनीं-वनीं
म्हणे एका जनार्दनीं !
//
काया ही पंढरी ,आत्मा हा विठ्ठल
नांदतो केवळ पांडुरंग!
देखिली पंढरी देही-जनी-वनीं
एका जनार्दनी वारी करी!!
//
संत एकनाथ महाराजांना विनम्र 🙏🌸

फाल्गुन कृ षष्ठी
(नाथषष्ठी)
२३/३/२२
Kelkaramol.blogspot.com 📝
देवा तुझ्या द्वारी आलो 🙏🌸 

२२ मार्च, २०२२

तारीख का तिथी

तारीख का तिथी?

हिंदू आहात ना?  मग लाज का वाटते तिथीने उत्सव साजरे करायची?


शिवजयंती  खरं म्हणजे ३६५ दिवस साजरी व्हायला पाहिजे हे टिपिकल राजकीय भाष्य कृपया नको. आम्ही ३६५ दिवस देवघरातील गणपतीचे पूजन करतो, १२ संकष्ट्या तेवढ्याच विनायकी ही करतो. पण भाद्रपद शु.चतुर्थीचा गणेशोत्सव किंवा माघ शु चतुर्थीची गणेश जयंती अत्यंत उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरी करतो. त्यामुळे ३६५ दिवस महाराजांना स्मरून शिवजयंती तिथीने साजरी करायला का कमीपणा वाटतोय?

 तारखेने १९ फेब्रुवारीलाच गोंदवलेकर महाराजांचा जन्मदिवस पण आपण जन्मोत्सव तिथीने करतो ना?

काल शिवजयंतीला दोन राजकीय नेते तारीख -तिथीवरुन भांडत होते. एकानं मुद्दा उपस्थित केला की तुम्ही तुमचे वाढदिवस तिथीने करता का?

मी म्हणतो असा विचार करायला काय हरकत आहे? अहो तुम्ही मेल्यावर तुमची मुले तुमचे श्राध्द तिथीने करतात मग वाढदिवस ही तिथीने करायला काय हरकत आहे?

आजकाल तुम्हाला एवढ्या सोई-सुविधा आहेत ( गुगल/ अँप वगैरे)  की समजा एखाद्याला आपली तिथी माहित नसेल तर शोधायला फारसे कष्ट ही पडत नाहीत.

आमचे नवीन वर्ष गुढी-पाडव्यालाच हा विचार जर दिवसेंदिवस रूजू शकतो तर आमचे उत्सव/ वाढदिवस पण तिथीनेच करणार हा नव-विचार रूजवायला काय हरकत आहे?

हिंदू आहात ना?🚩

( विचार पटले असल्यास ५ जणांना सांगायला हरकत नाही) 

अमोल 📝
#रंगपंचमी_🌈 

५ मार्च, २०२२

मकरेत शनी- मंगळ

.मकरेत स्वत:च्या राशीतच शनी असताना आता मंगळ ही नुकताच मकरेत आलाय

२ मार्च, २०२२

फुलपूडा

फुलपूडा ☘️🌿🌸🌺🌼🍃

आमच्याकडे रोज फुलपूडा येतो. म्हणजे आम्ही आमच्या फुलवाल्याला सांगितलंय रोज ५ रु चा फुलपूडा टाकत जा. जास्त फुले नसतात पण देवघरातील प्रत्येक देवाला एक फूल ,  विष्णूला तुळस, शंकराला बेल इतपत असतं आणि काम होऊन जातं.  गवाकडे पहाटे लवकर उठून, फिरून येताना बागेतील विविध ताजी फुले पूजेत मिळण्याचे आमच्या देवघरातील देवांच्या तरी नशिबात नाही.



तर आमच्याकडे फुलपुड्याचे एक वैशिष्ट्ये सांगतो. जेंव्हा एखादा महत्वाचा दिवस असतो त्याच्या आदल्यादिवशी हा फुलपूडा रजा घेतो.  फुलवाल्याला इतक्यांदा बजावून सांगितलयं की धार्मिक सणाच्या दिवशी तरी व्यवस्थित  फुले मिळावीत म्हणून आम्ही तुझ्याकडून महिनाभर फुले घेतो. पण जेंव्हा पाहिजेत तेंव्हा मिळाली नाही तर काय उपयोग? 
पण नाही. 
 
आता बहुतेक आमच्या देवांनाही सवय झालीयं. कालचंच उदाहरण. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी बरोबर फुलपूड्याची रजा. कापसाचे वस्त्र , आणि अक्षता महादेवांवर वाहून आम्ही समाधान करुन घेतले. 
पण आजच्या फूलपुड्यात संपूर्ण देव्हारा भरेल एवढा बेल. कालची उणीव भरून निघाली. 

 त्या त्या दिवसाचे महत्व वगैरे असते हे सगळं मान्य. पण आजही शंकराला बेल वाहताना तेवढाच आनंद वाटला जेवढा काल झाला असता. 

आता आमचं  ठरलय!  वेगळंच करायचं. उदा. मंदिरात देव दर्शनाला जाताना ही देव जरा निंवात असेल तेंव्हाच जायचे. म्हणजे गुरूवारी दत्त महाराजांना अजिबात भरायचे नाही, शनिवारी मारूती राया नकोत, मंगळवारी गणपती बाप्पा नकोत 
जरा दिवस बदलून गेलो तर मंदिरात निवांतपणे बसून  गप्पा तरी होतील छान.
आज बुधवार आज परत विश्वेश्वराच्याच मंदिरात जाऊन आज निवांत असणाऱ्या महादेवांना भेटून येतो.

मोगरा फुलला.. मोगरा फुलला

अमोल 📝
माघी. अमावस्या
२/३/२२