February 24, 2023
February 22, 2023
मीन राशीत गुरु-शुक्र युती
तेजस्वी नृपतिप्रियोSतिमतिमान् शूर:
( गुरुच्या राशीत शुक्र असलेला,अभ्यासू )अमोल 📝
सशुक्रे गुरौ!
अगदी सध्याची जी राजकीय धुमश्चक्री चाललीय तेच उदाहरण घेऊ. दोन लोकप्रिय नेते, जनमानसात प्रसिद्ध, कर्तबगार, कर्तृत्ववान वगैरे वगैरे
पण एकमेकांचे शत्रू. एकाचा विधानसभेचा मतदारसंघ हक्काचा,दुसरा मात्र लोकसभेला पहिल्याच्याच मतदारसंघातून जास्त मताधिक्य घेणारा.
थोडक्यात 'तुझं माझं जमेना परी तुझ्यावाचून करमेना' असं काहीसं
(लांब कशाला जायचं, मुंबई, ठाण्यात जरा हुडकलंत तर सहज कळून येईल)
मीन राशीत होणा-या गुरु-शुक्र ग्रहांच्या युतीचे वर्णन हे असेच करता येईल.
हे दोन्ही ग्रह सात्विक ग्रह किंवा शुभ ग्रह.पण एकमेकांशी न पटणारे. एकमेकांमधील शत्रूत्वाचा विचार केला तर गुरु शुक्राला आपला शत्रू मानतो पण शुक्र गुरूला अगदी शत्रू नाही पण मित्र ही नाही कारण त्याच्याकडून ( मतदारसंघातून) फायदा होत असेल तर कुणाला नको?
म्हणूनच गुरुच्या मीन राशीत शुक्र उच्चीचा असतो.
शास्त्रात मीन- तुळ आणि वृषभ- धनू या गुरु शुक्राच्या राशीत षडाष्टक ( मृत्यू) योग होतो म्हणून ही ते एकमेकांचे मित्र नाहीत. पत्रिका मीलनात याचा अवश्य विचार होतो
अनेक बुध्दिजीवींच्या पत्रिकेत गुरू-शुक्र युती आढळते ..
उदा. आचार्य अत्रे,महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, श्री.ल.र.पांगारकर,ह.भ.पं धुंडामहाराज देगलूकर, वासुदेव शिवराम कोल्हटकर, स्वामी रामतीर्थ, जे.कृष्णमूर्ती, श्री व्ही शांताराम
विद्यया भवति पंडित: सदा पंडितैरपि करोति विवादम् |
पुत्रमित्रधनसौख्य संयुतो मानव: सुरगुरौ भृगुयुक्तै ||
अशी ही देव आणि दैत्यांच्या गुरुंची अंशात्मक युती २ मार्च ला रेवती नक्षत्र चरण १ म्हणजेच गुरुच्या मीन राशीतील गुरुच्याच धनू नवमांशात पहायला मिळेल.
February 8, 2023
गजानन विजय अध्यायातील देवस्तुती
श्री गजानन महाराज प्रकट दिन जवळ येत आहे. यानिमित्याने अनेक जण ' श्री गजानन विजय पोथीचे पारायण करतात. एकूण २१ अध्याय असणारा हा पवित्र ग्रंथ वाचनाने भक्तांना अनेक प्रकारचे लाभ प्रत्यक्ष /अप्रत्यक्षपणे झाले आहेत.
श्री दासगणू महाराजांनी प्रत्येक अध्यायात गजानन महाराजांच्या लीला, चमत्कार, शिकवण यांची सांगड घातली आहे , तसेच प्रत्येक अध्यायाच्या सुरवतीला परमेश्वराची स्तुतीही खूप छान रचली आहे.
ती एकत्र अनुदिनीत असावी असा विचार मनात आला आणि गजानन कृपेने सुरुवातही केली
*गजानन विजय अध्यायातील देवस्तुती* चा संग्रह
( अध्याय १ )
॥ श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी उदारकीर्ती । जयजयाजी प्रतापज्योती ।
जयजयाजी हे गणपती ! । गौरीपुत्रा मयूरेश्वरा ! ॥१॥
कार्यारंभीं तुझें स्मरण । करित आले जन ।
मोठमोठाले विद्वान । साधुसंत सत्पुरुष ॥२॥
तुझ्या कृपेची अगाध शक्ति । विघ्नें अवघीं भस्म होतीं ।
कापुसाचा पाड किती । अग्नीपुढें दयाघना ! ॥३॥
म्हणून आदरें वंदना । करीतसे मी तुझ्या चरणां ।
सुरस करवी पद्मरचना । दासगणूच्या मुखानें ॥४॥
मी अज्ञान मंदमती । नाहीं काव्यव्युत्पत्ति ।
परी तूं वास केल्या चित्तीं । कार्य माझें होईल हें ॥५॥
आतां आदि माया सरस्वती । जी ब्रह्माची होय प्रकृती ।
जी कविवरांची ध्येयमूर्ती । ब्रह्मकुमारी शारदा ॥६॥
त्या जगदंबेकारण । असो माझें साष्टांग नमन ।
मी लेंकरुं आहें अजाण । अभिमान माझा धरावा ॥७॥
तुझ्या कृपेची अगाध थोरी । पांगळाही चढे गिरी ।
मुका सभेमाझारीं । देई व्याख्यान अस्खलित ॥८॥
त्या तुझ्या कीर्तीला । कमीपणा न आणी भला ।
साह्य दासगणूला । ग्रंथरचनेस करी या ॥९॥
आतां हे पुराणपुरुषा । पांडुरंगा पंढरीशा ।
सच्चिदानंदा रमेशा । "पाहि माम्" दिनबंधो ॥१०॥
तूं सर्वसाक्षी जगदाधार । तूं व्यापक चराचर ।
कर्ता करविता सर्वेश्वर । अवघे कांहीं तूंच तूं ॥११॥
जग, जन आणि जनार्दन । तूंच एक परिपूर्ण ।
सगुण आणि निर्गुण । तूंच कीं रे मायबापा ॥१२॥
ऐसा तुझा अगाध महिमा । जो न कळे निगमागमा ।
तेथें काय पुरुषोत्तमा । या गणूचा पाड असे ॥१३॥
रामकृपा जेव्हां झाली । तेव्हां माकडां शक्ति आली ।
गोप तेही बनले बली । यमुनातीरीं गोकुळांत ॥१४॥
तुझी कृपा व्हाया जाण । नाहीं धनाचें प्रयोजन ।
चरणीं होतां अनन्य । तूं त्यातें साह्य करिशी ॥१५॥
ऐसा संतांनीं डांगोरा । तुझा पिटला रमावरा ।
म्हणून आलों तुझ्या द्वारां । आतां विन्मुख लावूं नको ॥१६॥
हें संतचरित्र रचावया । साह्य करी पंढरीराया ।
माझ्या चित्तीं बसोनिया । ग्रंथ कळसा नेई हा ॥१७॥
हे भवभवान्तक भवानीवरा । हे नीलकंठा गंगाधरा ।
ओंकाररुपा त्र्यंबकेश्वरा । वरदपाणी ठेवा शिरीं ॥१८॥
तुझें साह्य असल्यावर । काळाचाही नाहीं दर ।
लोखंडासी भांगार । परीस करुन ठेवीतसे ॥१९॥
तुझी कृपा हाच परीस । लोखंड मी गणूदास ।
साह्य करी लेंकरास । परतें मजला लोटूं नको ॥२०॥
तुला अशक्य कांहीं नाहीं । अवघेंच आहे तुझ्या ठाईं ।
लेंकरासाठीं धांव घेई । ग्रंथ सुगम वदवावया ॥२१॥
माझ्या कुळीची कुलदेवता । कोल्हापुरवासिनी जगन्माता ।
तिच्या पदीं ठेवितों माथा । मंगल व्हाया कारणें ॥२२॥
हे दुर्गे तुळजे भवानी । हे अपर्णे अंबे मृडानी ।
ठेवी तुझा वरदपाणी । दासगणूच्या शिरावर ॥२३॥
आतां वंदन दत्तात्रया । पाव वेगीं मसीं सदया ।
गजाननचरित्र गाया । प्रसादासह स्फूर्ति दे ॥२४॥
आतां शांडिल्यादि ऋषीश्वर । वसिष्ठ गौतम पाराशर ।
ज्ञाननभीं जो दिनकर । त्या शंकराचार्या नमन असो ॥२५॥
आतां अवघ्या संतमहंता । नमन माझें सर्वथा ।
दासगणूच्या धरुन हाता । ग्रंथ करवा लेखन ॥२६॥
गहिनी निवृत्ति ज्ञानेश्वर । श्रीतुकाराम देहूकर ।
हे भवाब्धीचें तारुं थोर । त्या श्रीरामदासा नमन असो ॥२७॥
हे शिर्डिकर सांई समर्था । वामनशास्त्री पुण्यवंता ।
दासगणूसी अभय आतां । तुमचें असो द्या संत हो ॥२८॥
तुम्हां अवघ्यांच्या कृपेनें । मी हें करीन बोलणें ।
दासगणू मी तुमचें तान्हें । कठोर मजविषयीं होऊं नका ॥२९॥
जी कां खरी माया असते । तीच बोलाया शिकविते ।
तुमचें माझें असें नातें । मायलेंकापरी हो ॥३०॥
लेखणी काढी अक्षर । परी तो तिच्यांत नाहीं जोर ।
ती निमित्तकारण साचार । लेखनरुपी कार्याला ॥३१॥
दासगणू लेखणी येथ । तुम्ही धारण करा ती अवघे संत ।
ग्रंथरचना रसभरित । हीच आहे प्रार्थना ॥३२॥
( अध्याय २)
॥ श्रीगणेशाय नमः ॥
जयजय अज अजिता सर्वेश्वरा । हेचंद्रभागातटविहारा ।
पूर्णब्रह्मा रुक्मिणीवरा । दीनबंधो पाहि माम् ॥१॥
तुझ्या वशिल्यावांचून । अवघेंच देवा आहे शीण ।
कुडीमाजीं नसल्या प्राण । कोण विचारी मढयातें ॥२॥
सरोवराची दिव्य शोभा । तोयामुळें पद्मनाभा ।
रसभरीत आंतला गाभा । टरफलातें महत्त्व आणी ॥३॥
तुझी कृपा त्याच परी । शरणांगतातें समर्थ करी ।
पाप ताप दैन्य वारी । हेंच आहे मागणें ॥४॥
( अध्याय ३ )
॥ श्रीगणेशाय नमः ॥
जय जय सच्चिदानंदा श्रीहरी । कृपा करावी लौकरी ।
तुम्ही पदनताच्या वरी । कधीं न कठोर झालांत ॥१॥
तूं करुणेचा सागर । तूं दीन जनाचें माहेर ।
तूं भक्तासी साचार । कल्पतरु वा चिंतामणी ॥२॥
ऐसा तुझा अगाध महिमा । संत गाती राघवा रामा ।
दासगणूसी पुरुषोत्तमा । पावा वेळ करुं नका ॥३॥
( अध्याय ४ )
॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा । नीलकंठा गंगाधरा ।
महाकाल त्र्यबंकेश्वरा । श्रीओंकारा पाव मशी ॥१॥
तूं आणि रुक्मिणीशा । एक तत्त्व आहां खास ।
तोय वारी म्हटल्यास । काय जलीं भेद होतो ? ॥२॥
तैसी तुमची आहे स्थिती । तंतोतंत जगत्पति ।
जैसी ज्याची मानेल मति । तैसा तो तुज बाहत ॥३॥
अनन्यभावें बाहतां । तूं पावसी आपुल्या भक्तां ।
माता न धरी निष्ठुरता । आपल्या वत्साविषयीं कधीं ॥४॥
मी तुझें अजाण लेंकरुं । नको माया पाताळ करुं ।
तूं साक्षात् कल्पतरु । इच्छा पूर्ण करी हरा ॥५॥
*गजानन विजय अध्यायातील देवस्तुती* चा संग्रह.
( अध्याय ५,६,७,८ ) 🪷
॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे अज अजित अद्वया । सच्चिदानंदा करुणालया ।
दासगणू लागला पायां । आतां अभय असूं दे ॥१॥
मी हीन दीन पातकी नर । नाहीं कोणता अधिकार ।
सर्व बाजूंनीं लाचार । आहें मी देव देवा ॥२॥
परी अत्यंत हीनावरी । थोर सर्वदा कृपा करी ।
पाहा अंगीं लाविली खरी । विभूति श्रीशंकरानें ॥३॥
तो हीनांचा हीनपणा । थोरा न आणि कमीपणा ।
हें जाणोन नारायणा । गणू हा ठेवा संग्रहीं ॥४॥
सर्व लाड लेंकराचे । माता ती पुरवि साचे ।
आहे दासगणूचें । ओझें सर्व तुझ्या शिरीं ॥५॥
जैसें करशील तैसें करी । परी दया असूं दे अंतरीं ।
देवा तुझ्या बळावरी । दासगणूच्या सार्या उडया ॥६॥
//
॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे परममंगला श्रीहरी । तुझी कृपा झालियावरी ।
अशुभ अवघें जातें दुरी । हा अनुभव संतांचा ॥१॥
त्या संतवाक्यीं भरंवसा । मी ठेवून श्रीनिवासा ।
मंगलाची धरुन आशा । तुझ्या दारीं पातलों ॥२॥
आतां विन्मुख लावल्यास । त्याचा तुला लागेल दोष ।
आणि बट्टा वाक्यास । लागेल कीं संतांच्या ॥३॥
म्हणोन हे माधवा ! । अभिमान माझा धरावा ।
रोष कधीं ना करावा । या अजाण लेंकरावर ॥४॥
बालकांचें हीनपण । मातेलागीं दूषण ।
हें मनांत आणून करणें असेल तें करी ॥५॥
//
॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे वसुदेवदेवकीनंदना । हे गोपगोपीमनरंजना ।
हे दुष्टदानवमर्दना । श्रीहरी पाव मातें ॥१॥
तुझ्या प्राप्तीचें साधन । कर्मादिकांचें अनुष्ठान ।
परा भक्तीचें सेवन । करण्या आहे अपात्र मी ॥२॥
तुझीं ज्ञानदात्रीं शास्त्रें सारीं । गीर्वाण भाषेभीतरीं ।
त्यांचें सांग करुं हरी । सेवन तें कवण्या रीतीं ॥३॥
गीर्वाणाचा नसे गंध । त्यांतून माझी मती मंद ।
कमलांतील मकरंद । बेडुकाला मिळतो कसा ? ॥४॥
अन्नदानें तुझी प्राप्ति । जरी करुन घेऊं श्रीपती ।
तरी धनाचा अभाव निश्चिती । दारिद्रय पदरीं बांधिलें त्वां ॥५॥
जरी करुं मी तीर्थयात्रा । तरी सामर्थ्य नाहीं गात्रां ।
तशांतही अंधत्व आतां । आलें आहे दृष्टीतें ॥६॥
ऐसा सर्व बाजूंनीं । मी हीनदीन चक्रपाणी ।
दारिद्रयाचे मनीच्या मनीं । जाती जिरोनी मनोरथ ॥७॥
हें व्यावहारिक दृष्टया खरें जरी । परी तुझी कृपा झाल्यावरी ।
स्वानंदाच्या सागरीं । पोहत राहे अहोरात्र ॥८॥
तुझ्या कृपेचें महिमान । आगळें आहे सर्वांहून ।
घनाच्या पाण्यालागून । दाम देण्याची गरज नसे ॥९॥
मेघांनीं आणिल्या मनांत । तळीं विहिरी भरतात ।
निवळ खडकास फुटतात । पाट पाण्याचे पांडुरंगा ! ॥१०॥
ऐशा त्या तव कृपेचा । दासगणू हा भुकेला साचा ।
घास एखादा तरी त्याचा । घाल माझ्या मुखांत ॥११॥
तेणें मी तृप्त होईन । अवघ्या सुखातें पावेन ।
अमृताचा लाभतां कण । रोग सारे दूर होती ॥१२॥
*गजानन विजय अध्यायातील देवस्तुती* चा संग्रह.
( अध्याय ९,१०,११,१२) 🪷
॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा । हे चंद्रभागातटविहारा ।
श्रीसंतवरदा शारंगधरा । पतितपावना दयानिधे ॥१॥
लहानावांचून मोठ्याचा । मोठेपणा न टिके साचा ।
पतिताविण परमेश्वराचा । बोलबाला होणें नसे ॥२॥
आम्ही आहों पतित । म्हणून तुला म्हणतात ।
पावनकर्ता रुक्मिणीकांत । हें आतां विसरूं नको ॥३॥
परिस लोहाला सोनें करी । म्हणुनी त्याचें महत्त्व भूमीवरी ।
ओहोळ पोटीं घे गोदावरी । म्हणून म्हणती तीर्थ तिला ॥४॥
याचा विचार करावा । चित्तीं आपुल्या माधवा ।
दासगणूला हात द्यावा । बुडूं न द्यावें कोठेंही ॥५॥
//
॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे अरुपा अव्यया । पूर्णब्रह्मा पंढरीराया ।
सज्जनाच्या विसाविया । मजला परते लोटूं नको ॥१॥
देवा हा दासगणू । नको परक्याचा आतां म्हणूं ।
माझ्या पातकाचा नको आणूं । विचार चित्तीं नारायणा ॥२॥
माझ्या करें न झालें पुण्य । हें ठाउकें मजलागून ।
फाय काय तुला वदन । दावण्या मी योग्य नसे ॥३॥
ऐसी स्थिति आहे जरी । परि देवा कृपा करी ।
ओहळास गोदावरी । पोटीं आपल्या घेतसे ॥४॥
तैसें तुवां करावें । दुःख अवघें निवारावें ।
पातकाला न उरुं द्यावें । माझ्या ठायीं यत्किंचित् ॥५॥
तूं आणिल्या मनांत । अवघेंच कांहीं घडून येत ।
रंकाचाही राव होत । तुझा लाधतां वशीला ॥६॥
//
॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे ओंकाररुपा पशुपती । हे भवानीवरा दक्षिणामूर्ति ।
ब्रह्मांडांत जितुक्या विभूति । तितकीं रुपें तुझीं देखा ॥१॥
तुझें रुप जें निराकार । जेणें हें व्यापक चराचर ।
जें सर्वस्वीं आधार । अविद्या माया ॥
प्रकृतीला ॥२॥
तें स्वरुप जाणावया । अशक्य आहे देवराया ।
म्हणून तूं करण्या दया । सगुण रुपें धरलींस ॥३॥
जैसें ज्याला वाटत । तैसें तो तुला भाग देत ।
नामामुळें तुजप्रत । भिन्नत्व ये ना कधींही ॥४॥
शैव तुला शिव म्हणती । ब्रह्म बोलती वेदान्ती ।
रामानुजांचा सीतापती । वैष्णवांचा विष्णू तूं ॥५॥
उपासनेप्रमाणें । नांवें मिळालीं तुजकारणें ।
परी तूं अभिन्नपणें । सर्वांठायींच गवससी ॥६॥
तूं सोमनाथ विश्वेश्वर । हीम केदार ओंकार ।
क्षिप्रातटाकीं साचार । महांकाल तूंच कीं ॥७॥
नागनाथ वैजनाथ । घृष्णेश्वर वेरुळांत ।
त्र्यंबक तुला म्हणतात । गोदावरीच्या तटाकीं ॥८॥
तूं भीमाशंकर । मल्लिकार्जुन रामेश्वर ।
तूं गोकर्णरुपी शंकर । तूं महादेव शिंगणापुरीं ॥९॥
त्या अवघ्यांकारण । असो माझें साष्टांग नमन ।
माझ्या त्रितापांचें हरण । शीघ्र करी दीनबंधो ॥१०॥
//
॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे गणाधीशा गणपती । मयुरेश्वरा विमलकीर्ति ।
माझ्या हृदयीं करून वस्ती । ग्रंथ कळसास नेई हा ॥१॥
तूं ज्ञानबुध्दीचा दाता । तूं भक्तमनोरथ पुरविता ।
विघ्ननगातें संहारिता । तूंच एक गणराया ॥२॥
तूं साक्षात् चिंतामणी । चिंतिलेलें देशी जाणी ।
आपुल्या भक्तांलागूनी । ऐसें पुराणें म्हणतात ॥३॥
माझ्या मनींची अवघी चिंता । लयास नेई एकदंता ।
लंबोदरा पार्वतीसुता । भालचंद्रा सिंदुरारे ॥४॥
*गजानन विजय अध्यायातील देवस्तुती* चा संग्रह.
( अध्याय १३,१४,१५,१६ ) 🪷
॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे संतवरदा श्रीधरा । हे दयेच्या सागरा ।
हे गोपगोपीप्रियकरा । तमालनीळा पाव हरी ॥१॥
तुझें ईशत्व पाहण्याकरितां । जेव्हां झाला विधाता ।
गाई-वासरें चोरितां । यमुनातटीं गोकुळांत ॥२॥
तेव्हां तूं निजलीलेंकरुन । गाई वासरें होऊन ।
ब्रह्मदेवाकारण । आपलें ईशत्व दाविलें ॥३॥
दुष्ट ऐशा कालियाला । यमुनेमाजीं तुडवून भला ।
रमणकद्वीपा धाडिला । गोप निर्भय करण्यास ॥४॥
तेवीं माझ्या दुर्दैवा । तुडवूनी या वासुदेवा ।
दासगणू हा करावा । निर्भय सर्व बाजूंनीं ॥५॥
मी अजाणभक्त तुझा हरी । परी देवा कृपा करी ।
मी आहे अनाधिकारी । योग्य न तुझ्या कृपेस ॥६॥
ऐसें जरी आहे सत्य । परी नको पाहूंस अंत ।
माझी चिंता वार त्वरित । आपुल्या कृपाकटाक्षें ॥७॥
//
॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे कौसल्यात्मज रामराया । हे रघुकुलभूषणा करुणालया ।
सीतापते करा दया । आतां या लेंकरासी ॥१॥
ताटिका त्वां उध्दरली । अहिल्या शिळा सजीव केली ।
शबरीची पुरवली । इच्छा तूं दशरथे ॥२॥
भक्तरक्षणा कारण । सोडिलें नृपसिंहासन ।
वानर केलेसे बलवान् । केवळ आपल्या कृपेनें ॥३॥
शिळा तरल्या सागरीम । तुझ्या नामें रावणारी ।
बसविलास गादीवरी । भक्त आपला बिभीषण ॥४॥
जो जो आला शरण पदा । तुझ्या कीं हे आनंदकंदा ।
दैन्य, दुःख, आपदा । त्याच्या त्वां वारिल्यास ॥५॥
हें मनीं आणावें । दासगणूस सांभाळावें ।
बालकानें धांवावें । जननिविण कोणाकडे ? ॥६॥
तूं जननी जनिता सद्गुरु । तूं भक्तांना कल्पतरु ।
भवनदीचें भव्य तारूं । तूंच कीं रे रामराया ! ॥७॥
//
॥श्रीगणेशाय नमः ॥
हे कश्यपात्मज वामना । हे बटुरुपधारी नारायणा ।
तूं बलीच्या घेऊन दाना । कृतार्थ त्याला केलेंस ॥१॥
राज्य मृत्युलोकीचें । घेतलें त्वां जरी साचें ।
तरी दिलें पाताळाचें । राज्य बलीकारणें ॥२॥
आंवळा घेऊन नारळ दिला । तुम्ही त्या पुण्यवंत बलीला ।
आणि त्याच्या भक्तीस्तव झाला । द्वारपाळ द्वारीं तुम्ही ॥३॥
या मन्वंतरानंतर । बलीच आहे होणार ।
देवांचा राजराजेश्वर । देवा तुझ्या वरानें ॥४॥
एक घटकेंत अनंता । चहूं वेदांच्या संहिता ।
पठण केल्या बुद्धिमत्ता । केवढी तुझी अगाध तरी ! ॥५॥
अवघ्यां तुझ्या अवतारीं । हा सोंवळा अवतार श्रीहरी ।
कोणाचाही भूमीवरी । वध न तुम्ही केलांत ॥६॥
शत्रुमित्राच्या घरीं दिवा । ये अवतारीं लाविला बरवा ।
देव आणि दानवा । तूं वंद्य सारखाच ॥७॥
देव तेही आनंदविले । राक्षस तेही रक्षिलें ।
आपलें ईशत्व सांभाळिलें । याच अवतारीं देवा तूं ॥८॥
तुला माझा नमस्कार । असो वामना वारंवार ।
मस्तकीं ठेवा वरद कर । तुम्ही दासगणूच्या ॥९॥
//
॥ श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी परशुधरा । हे जमदग्नीच्या कुमारा ।
परशुरामा परमेश्वरा । आतां उपेक्षा करूं नको ॥१॥
तूं सहस्त्रार्जुनातें दंडून । केलें द्विजांचें संरक्षण ।
ब्राह्मणांचा अपमान । सहन झाला नाहीं तुला ॥२॥
आतां मात्र डोळे मिटिसी । कां रे देवा ब्राह्मणांविशीं ? ।
काय आहे लागली तुसी । गाढ निद्रा येधवां ॥३॥
म्हणून डोळे मिटूं नका । स्वस्थ ऐसें बसूं नका ।
आणीबाणीचा प्रसंग देखा । आहे हरी सांप्रत ॥४॥
तुझ्या वशिल्यावांचून । अवघीं कृत्यें आहेत शीण ।
आर्यसंस्कृतीचें रक्षण । होणें नाहीं तुझ्याविण ॥५॥
*गजानन विजय अध्यायातील देवस्तुती* चा संग्रह.
( अध्याय १७,१८,१९,२०,२१ ) 🪷
॥ श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी महामंगला । जयजयाजी भक्तपाला ।
जयजयाजी तमालनीला । पतितपावन नरहरे ॥१॥
हिरण्यकश्यपु महाक्रूर । सज्जनाचा शत्रू थोर ।
तयाचें तूं फाडून उदर । मरण त्याचें साधिलें ॥२॥
प्रल्हादरक्षणासाठीं । तूं जन्मलास स्तंभापोटीं ।
रुप अनुपम जगजेठी । धारण तें करुन ॥३॥
दांत दाढा भयंकर । आयाळ रुळे मानेवर ।
नेत्र जेवीं खदिरांगार । ब्रह्मांड जाळूं पहाती ॥४॥
त्या भयंकर रुपाची । भीति नसे भक्ता साची ।
पिलें जेवीं वाघिणीचीं । अंगावर खेळती तिच्या ॥५॥
तुम्हां पाहून देवराया । लक्ष्मी न धजे पुढें यावया ।
ऐशा स्थितींत लागला पाया । भक्त तुझा नरहरे ॥६॥
तूं भक्तवत्सल लक्ष्मीकांत । ऐसें सांगत आले संत ।
पुरविशी भक्तमनोरथ । नाहीं न त्यासी म्हणसी कदा ॥७॥
त्या आपुल्या ब्रीदासी । जाग आतां हृषीकेशी ।
दासगणू लागला पायांसी । अभय असूं दे पांडुरंगा ॥८॥
//
॥ श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी चिद्रिलासा । हे गोविंदा श्रीनिवासा ।
हे आनंदकंदा परेशा । पाहि माम् दीनबंधो ॥१॥
हे केशवा केशीमर्दना । हे माधवा मधूसुदना ।
हे पूतनाप्राणशोषणा । पांडुरंगा रुक्मिणीपते ॥२॥
काय माझ्या आहे मनीं । तें तूं जाणसी चक्रपाणी ।
तेंच का रे तुजलागुनी । बोलून दावूं पद्मनाभा ॥३॥
भक्त जी जी इच्छा करी । ती तूं पुरविसी श्रीहरी ।
ऐसें पुराणाभीतरीं । आहे वर्ण्न बहुसाळ ॥४॥
म्हणून माझ्या मनोरथा । पूर्ण करा पंढरीनाथा ।
सोडा मनींची कठोरता । दासगणू हा तुझा असे ॥५॥
//
॥ श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी आनंदकंदा । जयजयादि अभेदा ।
माझें नमन तुझ्या पदा । असो सर्वदा अनन्यभावें ॥१॥
हे राघवा रघुपती । पाव आतां शीघ्र गती ।
माझा अंत पहाशी किती ? । हें कांहीं कळेना ॥२॥
खर्या थोरांशी कठोरता । नाहीं शोभत अनंता ।
याचा विचार कांहीं चित्ता । करा आपुल्या ये काळीं ॥३॥
मी दीनवाणें मारितों हांका । मला दगा देऊं नका ।
हे जगदीशा जगन्नायका । पावा दासगणूस ॥४॥
//
॥ श्रीगणेशाय नमः ॥
जय जयाजी रुक्मिणीवरा । हे चंद्रभागातटविहारा ।
देवा वरदपाणी धरा । दासगणूच्या मस्तकीं ॥१॥
तूं भूपांचा भूपती । अवघेंच आहे तुझ्या हातीं ।
मग माझी फजीती । कां रे ऐसी मांडलीस ? ॥२॥
माझें पाप ताप दहन । करा कृपाकृशानें करून ।
राहो आनंदी सदा मन । तुझें भजन करावया ॥३॥
यांत अंतर केल्यास । वृथा तुला लागेल दोष ।
खर्या थोरांनीं आपणांस । बट्टा लावून घेऊं नये ॥४॥
म्हणून हे श्यामसुंदरा । राही रुक्मिणीच्या वरा ।
पांडुरंगा परम उदारा । माझी इच्छा पूर्ण करी ॥५॥
//
॥ श्रीगणेशाय नमः ॥
जय जयाजी अनंतवेषा । जय जयाजी अविनाशा ।
जय जयाजी परेशा । ब्रह्मांडाधीशा नमो तुशीं ॥१॥
देवा तूं आपणांस । पतितपावन नाम खास ।
सर्वदा आहे धरिलेंस । याचा विचार करीं गा ॥२॥
पाप्यावरी प्रेम अमित । तुझें देवा असतें सत्य ।
पापीजनांनीं तुजप्रत । महत्त्व आणिलें कृपाळा ॥३॥
म्हणून माझ्या पातकासी । पाहूं नका हो हृषीकेशी ।
धुणें येतें जलापासीं । स्वच्छ होतें म्हणून ॥४॥
म्हणून पतितांचा कंटाळा । करुं नको रे घननीळा ।
काय भूमीनें सांवरिला । दिलें आहे टाकून ॥५॥
तूंच पतितपावन । तूंच पुण्यपावन ।
या दोन्ही दोषांपासून । तुम्ही अलग सर्वदा ॥६॥
सूर्य नाशी तमाप्रत । म्हणून कां तो कष्टी होत ।
कांहीं न करावें लागत । तम नासण्या रवीशीं ॥७॥
तम जों जों भेटण्या येई । तों तों तेथें प्रकाश होई ।
अंधारत्व अवघें जाई । त्याचें तमाचें नारायणा ॥८॥
पापपुण्याची वासना । तूंच उपजविशी नारायणा ।
आपला रक्षण्या मोठेपणा । पापी तूंच निर्मिशी ॥९॥
कांहीं असो आतां तरी । चिंता रहित मजला करी ।
दासगणू हा घ्यावा पदरीं । हेंच आहे मागणें ॥१०॥
तुझ्यावांचून मजप्रत । नाहीं वशिला जगतांत ।
अवघेंच तुझ्या हातांत । आहे कीं रे पांडुरंगा ॥११
*देवा तुझ्या द्वारी आलो*
kelkaramol.blogspot.com