October 21, 2024

कृत्तिका हर्षल

मुळात केवळ एका ग्रहयोगावर निदान करणे चूकच तरीही कृत्तिका ( उग्र नक्षत्र) नक्षत्रातील ( वृषभेतील) वक्री हर्षल , राशी स्वामी शुक्र वृश्चिकेत म्हणजे शत्रू राशीत. त्याचवेळी वृश्चिकेचा मालक मंगळ कर्केत निच राशीत, निचेच्या मंगळाची शनीवर दृष्टी, शनीची शुक्रावर दृष्टी आणि काल/ आज कर्केचा मालक चंद्र वृषभेत हर्षल बरोबर एक सर्कल ( अशुभ) पूर्ण .

 परिणाम 🔥 

 (अभ्यासू) अमोल

August 29, 2024

Two card tarot

१) गुरुवार, श्रावण कृ एकादशी,आद्रा नक्षत्र



   Two card tarot


June 21, 2024

श्री_महादबा_पाटील_महाराज_ह्यांचे_संक्षिप्त_चरित्र

.#श्री_महादबा_पाटील_महाराज_ह्यांचे_संक्षिप्त_चरित्र

:-
            श्री दत्त संप्रदायातील राजधानी असलेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे गेल्यावर दत्त मंदिराच्या वरील बाजुस, देवस्थानाच्या भक्तनिवासाच्या अगदी जवळ आपल्याला एक भव्य असं मंदिर लागतं ते मंदीर म्हणजे श्रीमहादबा पाटील महाराजांचे समाधी मंदिर आहे.दत्तसंप्रदायातील प सिद्ध अवतारी सत्पुरुष म्हणजे श्री महादबा पाटील महाराज.

#जन्म_कथे_विषयी :- धुळगाव (सोनी) तालुका.तासगाव,जिल्हा सांगली या गावी श्री बाबगोंडा पाटील व सौ.बायाक्का माता या दत्तभक्त दांपत्यापोटी जन्मसिद्ध असलेल्या महादबा पाटील महाराजांनी अश्विन शुद्ध त्रयोदशी सोमवार दि.९ अॉक्टोबर १९१६ साली जन्म घेतला. महाराजांच्या घराण्याला पाटीलकी आधीपासुनच होती आणि त्यांचे संपूर्ण घराणे हे पूर्वापार दत्तभक्त होते.जणु दत्तभक्तांच्या या शुद्ध बिजापोटी महाराजांसारखे सिद्ध अवतारी महात्मे फलस्वरुप त्यांना प्राप्त झाले होते. महाराजांचे वडील श्री.बाबगोंडा पाटील हे अखंड ४० वर्षे प्रत्येक पौर्णिमेला श्रीक्षेत्र नृसिंहवाडीची पायी वारी करीत असत. या सेवेचा परिपाकच जणु महाराजांसारखे सिद्ध त्यांना पुत्ररुपाने प्राप्त झाले. पुढे श्रीमहादबा महाराजांनी सुद्धा ही पौर्णिमेला पायी वाडीला जाण्याची परंपरा अखंडपणे चालु ठेवली.श्रीमहादबा महाराज हे लहानपणापासूनच वाचासिद्ध होते. एकंदर त्यांच्या लहानपणाच्या लिलांवरुन,त्यांच्या दिव्य प्रतिभेवरुन पाटील घराण्यात सिद्ध जन्माला आले याची लोकांना जाणिव होवु लागली होती.महाराज वयाच्या सातव्या वर्षापर्यंत अधूनमधून घराबाहेत जात असत.पुढे बाराव्या वर्षी त्यांनी घर सोडले ते कायमचेच.श्रीमहादबा महाराज हे नैष्ठिक ब्रह्मचारी,स्वेच्छाविहारी,पूर्ण विदेही,एकांतप्रेमी,आत्मानंदात लिन,भक्तांनी आठवण काढताच भक्ताकडे धाव घेणारे असे अलौकिक सत्पुरुष होते.अन्य सत्पुरुष,संतांप्रमाणे साधना करुन आत्मज्ञान व आत्मसामर्थ्य प्राप्त करण्याची त्यांना आवश्यकता नव्हती. ते म्हणत, `मी शिकुन आलोय' ते जन्मसिद्ध असल्यामुळे त्यांना बाह्य गोष्टींची गरज नव्हती.महादबा महाराज हे स्वयंभू सिद्ध व आत्मज्ञानी होते.

#गुरुपरंपरा
खटाव (नांद्रे) येथील प.पू.श्रीरामानंद महाराज खटावकर यांचा महादबा महाराजांवर अनुग्रह झाला होता.तरी महाराजांच्या जिवनात साधकावस्था आढळत नाही.श्रीरामानंद महाराज हे नाथ परंपरेतील असल्यामुळे पाटील महाराज हे नाथ परंपरेशी अनुबंधित असावेत.औपचारिकदृष्ट्या बघितले तर महाराजांचे शिक्षण हे मराठी चौथी पर्यंत झाले होते परंतु आश्चर्य म्हणजे ते भक्तांना दासबोध ,ज्ञानेश्वरीतील एखादा अध्याय काढायला लावून त्यांच्याकडून एखादी ओवी वाचुन घेत आणि आपण त्या ओवीचा अर्थ सोदाहरण समजावुन सांगत.त्यांना अशा सर्व ग्रंथांचे ज्ञान होते व ग्रंथातील सर्व श्लोक,ओव्या ही त्यांना माहीत असत.श्रीमहाराजांचा अधिकार फार उच्च कोटीतील होता.महाराज त्रिकालज्ञानी होते.ते भक्तांना सांसारीक,पारमार्थीक आणि भौतीक मार्गदर्शन करीत व त्यांच्या अडीअडचणी सोडवत असत.क्वचितच लोक त्यांच्या कडे अध्यात्मिक ज्ञान घेण्यासाठी येत.त्यांनाही महाराज कृतकृत्य करत.महाराजांकडे सर्व जातीधर्माचे लोक येत असत.गरीब श्रीमंत असा भेदभाव त्यांच्याकडे नव्हता.कर्मकांडाचा प्रचार त्यांनी कधीही केला नाही.महाराजांच्या भक्ताबद्दल बोलायचे झाले तर असंख्य लोकांचा ते आधार होते.भक्त त्यांना बस,सायकलवरुन,पायी तसेच मोटारसायकलवरुन किंवा बैलगाडीने महाराजांच्या इच्छेनुसार सोडत असत व त्यांना मिळेल त्या वाहनाने अगदी विमानानेसुद्धा भक्त त्यांना नेत असत. पाटीलबाबा हे योगी पुरुष होते तसेच ते राजयोगी ही होते. महाराजांच्या खिशात सदैव एक डबी ठेवलेली असे त्यात नृसिंहवाडीचा अंगारा सदैव त्यांच्या बरोबर असे.भक्तांनी आपल्या अडचणी सांगीतल्या की महाराज त्या डबीतील अंगारा काढुन भक्तांला लावत आणि त्यामुळे भक्तांच्या अडचणी दुर होत असत. महाराजांनी कधीही पैशाला स्पर्श केला नाही.ते कधीही धनाला शिवले नाही. ते देवावतारी असुन सुद्धा सामान्यासारखे राहिले.अखंड ५० ते ५५ वर्षे ते मिळेल त्या साधनाने भक्तांकडे जाऊन त्यांना आशिर्वाद व अंगारा देऊन अडचणीतुन सुटका करीत.भक्तांचे मनोरथ पूर्ण करणे हेच आपले काम आहे असे ते मानत असत.भक्तसुद्धा महाराजांच्या बरोबर राहुन त्यांची सेवा करण्यात धन्यता मानत असत.महाराज पौर्णिमेस नरसोबा वाडीला व संकष्टीला मिरजेतील थोर संत अण्णाबुवांच्या मठात नेमाने जात व राहत असत.मुंबई,पुणे,बंगळुरु,आंध्रप्रदेश,गुजरात,मध्य प्रदेश अशा लांबच्या गावी सुद्धा भक्तांनी त्यांना नेऊन यात्रा केल्या आहेत.

#श्रींचे_व्यक्ती_दर्शन :- महाराज मितभाषी होते,मोजकेच बोलत.ते शाकाहारी होते.महाराजांची राहणी अत्यंत साधी होती. धोतर,शर्ट,करवतकाठी उपरणे,वुलनचा कोट,डोक्याला लाल रुमाल असा त्यांचा वेश असायचा.त्यांच्या हातात सदैव एक काठी असायची.चेहर्यावर लहान मुलासारखी निरागसता होती.ते सदैव धोतराचा सोगा तोंडात धरुन आकाशाकडे नजर लावून आत्ममग्न स्थितीत बसलेले असत.
         त्यांनी अनेक भक्तांना आणि संतांना आपले चैतन्य स्वरुपाचे दर्शन घडविले होते.महाजांच्या समकालीन असलेले अनेक संत म्हणत , `पाटील महाराज हे त्रिकालज्ञानी व चालते बोलते ब्रह्म आहेत.विदेही असुन ज्ञानी व राजयोगी थाटात वागणारे सिद्ध पुरुष आहेत.ते साक्षात दत्तगुरुच आहेत.' महाराजांचे श्रीसद्गुरु केशवनाथ महाराज,दत्तावतारी श्रीसद्गुरु मामा महाराज  देशपांडे यांच्याशी फार प्रेमाचे नाते होते. महादबा महाराज भक्तांना नामस्मरण करायला,सदग्रंथाचे वाचन,प्रवचन-किर्तन ऐकायला सांगत असत. `सच्चाने वागा,लबाडी करु नका.कुणाला फसवु नका. फुकटचे खाऊ नका,संपत्तीचे प्रदर्शन करु नका.माणुसकीने वागा.' हाच आपल्या भक्तांना त्यांचा उपदेश असे.बुवाबाजी करणार्यांच्या अंगावर ते धावून जात.समाधी घेण्याच्या वर्षभर आधी ते स्वत: प्रत्यक्ष भक्तांच्या घरी जाऊन अगदी भक्तांना शोधुन काढून त्यांना आपल्या सेवेची संधी दिली.आशिर्वाद व अंगारारुपी सामर्थ्य दिले येथुन पुढे नृसिंहवाडीला या असा आदेश सर्व भक्तांना दिला.भक्ताच्या कल्याणासाठी मी अनंतकाळ अखंड चिरंतन वाडीत वास्तव्य करुन आहे असा भक्तांना भरवसा दिला.महाराजांनी वाडीत स्वत: मठ बांधून घेतला,पण कोणासही शिष्य केले नाही.त्यांनी स्वत: १९८१ साली ट्रस्टची स्थापना केली व मठाची व्यवस्था ट्रस्ट कडे सोपवली.मठामध्ये त्यांनी समाधीची जागा निश्चित करुन या ठिकाणी समाधीस्त करा असा आदेश दिला होता.


#महासमाधी :-
पुढे दिवस व वेळ ठरवून ,सर्वांना अगोदर सांगून व टिपून ठेवून परमपूज्य सद्गुरु श्री महादबा पाटील महाराजांनी नृसिंहवाडीच्या अधिकृत मठात जेष्ठ महिन्यातील वटपौर्णिमेस  शके १९०४ रविवार दि.६ जुन १९८२ राजी सकाळी ६ वाजुन ५ मिनीटांनी दत्त मंदिरात घंटानाद होत असतांना समाधी घेतली.अशा या सिद्ध दत्तावतारी श्रीमहादबा पाटील महाराजांची आज पुण्यतिथी .या पावन दिनी त्यांच्या चरित्राचे स्मरण करुन महाराजांच्या चरणी सांष्टांग दंडवत करुयात.महादबा पाटील महाराजांच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत प्रणाम.

माहिती संकलन :- श्रींच्या प्रासादिक नित्यपाठ मालिकेतील प्रस्तावना. 

June 8, 2024

पावसाळी वाहन २०२४

शेतकरी मित्रांसाठी प्रतिवार्षिक पावसाळी वाहन माहिती रवीचा मृग नक्षत्र प्रवेश ( ७ जून २४) वाहन : कोल्हा रवीचा आद्रा नक्षत्र प्रवेश ( २१ जून २४) वाहन : मोर रवीचा पुनर्वसू नक्षत्र प्रवेश ( ५ जुलै २४) वाहन : *हत्ती* रवीचा पुष्य नक्षत्र प्रवेश ( १९ जुलै २४) वाहन : *बेडूक* रवीचा अश्लेषा नक्षत्र प्रवेश( २ आँगस्ट २४) वाहन : गाढव रवीचा मघा नक्षत्र प्रवेश( १६ आँगस्ट २४) वाहन : कोल्हा रवीचा पू.फाल्गुनी नक्षत्र प्रवेश( २० आँगस्ट २४) वाहन : उंदीर रवीचा उ.फाल्गुनी नक्षत्र प्रवेश( १३ सप्टेंबर २४) वाहन : हत्ती रवीचा हस्त नक्षत्र प्रवेश ( २६ सप्टेंबर २४) वाहन : मोर रवीचा चित्रा नक्षत्र प्रवेश ( १० आँक्टोबर २४) वाहन : *म्हैस* रवीचा स्वाती नक्षत्र प्रवेश ( २३ आँक्टोबर २४) वाहन : कोल्हा #देवा_तुझ्या_द्वारी_आलो 📝 kelkaramol.blogspot.com

May 10, 2024

अक्षय तृतीया

.श्रध्दा आणि सबुरी
सर्व गोष्टींवर भारी


अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा 💐

#अक्षय_दर्शन
देवा तुझ्या द्वारी आलो 📝
kelkaramol.blogspot.com 

January 23, 2024

प्राण प्रतिष्ठापना आणि सिझेरियन

प्राण प्रतिष्ठापना आणी सिझेरियन काल २२ जानेवारीला प्रभू श्रीरामचंद्रांची अयोध्येत नवीन मंदिरात प्राण- प्रतिष्ठापना झाली. संपूर्ण भारतखंडात दिपावली साजरी झाली. या नेत्रदीपक सोहळ्याच्या निमित्याने देशातील काना-कोपर्यात साजरा झालेल्या उत्सवाच्या बातम्या बघताना एका बातमीने लक्ष वेधले आणि हसू आवरले नाही. ज्या स्त्रियांची डिलेव्हरी जवळ आली होती अशा अनेकांनी ( जोडप्यांनी) २२ तारखेला सिझेरियन करून बाळाला जन्म द्यायची इच्छा व्यक्त केली होती.
हे एकून काहीशी अशी प्रतिक्रिया आपसूक आली. 🤦🏻‍♂️ २२ जानेवारीचा काढिव मुहूर्त हा प्रभू श्रीरामांच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा होता. आपल्या पोटी श्रीरामा सारखे बाळ जन्माला यावे ही इच्छा होणे साहजिक आहे. पण नियतिची ही काही योजना असते. त्यात ढवळाढवळ करणे योग्य नाही. नैसर्गिक प्रसूती किंवा डाँक्टरांनी २२ तारखेला सिझरींग करु असे सांगितले असेल ( ही पण नियतीचीच योजना) तर गोष्ट वेगळी. पण तसे काही नसताना भावनेपोटी सिझेरियन करायचा निर्णय घेतलेल्या जोडप्यांना शुभेच्छा आणि सर्व नवजात बालकांना प्रेमळ आशीर्वाद 💐 ज्योतिष अभ्यासकांसाठी:- २२ जाने २०२४ ,दुपारी १२:३२ ची मेष लग्नाची पत्रिका. राशीस्वामी शुक्र जो द्वितीयेश आणि सप्तमेश ( मारकेश) आहे तो धनू ( शत्रू राशीत) मुळ नक्षत्रात आहे. चंद्रापासून आठवा आहे. आज पासून २५ -३० वर्षांनी या बालकांच्या विवाहासंबंधीचे प्रश्ण येणार आहेत. तुमच्याकडे ही अशी एखादी पत्रिका येईलच. त्यावेळी या ग्रहस्थितीचा सप्तम स्थानाच्या दृष्टीने अवश्य विचार करावा षष्ठेश - अष्टमेश युतीत भाग्य स्थानी इतर ग्रहयोग चंद्र-शुक्र प्रतियोग, चंद्र - नेपच्यून केंद्र योग अर्थात लग्न बदलले, भाव बदलले की परिणाम बदलतील. काही चांगले योग पत्रिकेत, नवमांश कुंडलीत आहेत. आपणासही काही विशेष योग आढळल्यास अवश्य सांगा श्रीराम 🙏 ( ज्योतिष अभ्यासक) अमोल केळकर 📝 पौष. शु. त्रयोदशी २३/०१/२०२४

January 7, 2024

पंचक

पंचक निमित्याने :- 🖐🏼

ज्योतिष शास्त्रातील एक  संकल्पना ( प्रचलित नियम)  घेऊन  विनोदी ढंगाने मराठी सिनेमाची निर्मिती केलीत याबद्दल सर्वप्रथम श्री व सौ माधुरी  नेने  यांचे अभिनंदन 💐💐
 
पंचकात विशाखा नक्षत्र नसते  पण काल  रात्री आम्हाला विशाखा या त्रिपाद नक्षत्रावरच पंचक लागले.
पंचक लागले खरे पण  "पंचक भावले" असे मात्र म्हणणार नाही


कोकणातील एका गावात खोतांच्या एकत्र कुटुंबात घडलेली गोष्ट. 
कोकणातील  डुक्करला मांजर आडवे गेल्यानंतर ही डुक्कर ( आपल्या भाषेत टमटम)  मागे घेऊ न देता पुढे दमटवणा-या  नायकाच्या वडीलांचे तो घरी पोहोचण्या आधी निधन झालेले असते. नायक आणि त्याचे वडील नास्तिक. सहा महिन्यापूर्वीच वडिलांनी ' देहदानाचा ' संकल्प केलेला आहे . त्यात  जोशी बुवा येऊन 'पंचक ' लागले आहे असे डिक्लेअर करतात आणि खोत कुटुंब दुहेरी संकटात सापडते.

तेथून पुढे श्रध्दा/ अंधश्रध्दा , आस्तिक /नास्तिक याचा झालेला गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. पण तो गुंता व्यवस्थित सुटला असे वाटत नाही.  शेवटपर्यंत विषय तसाच अधांतरीच राहिला आहे असे वाटत राहिले

कलाकारांमधे विद्याधर जोशींनी साकारलेले गुरुजींचे पात्र जाम आवडले. 
पंचक शांती वेळचे त्यांच्यावर चित्रीत झालेले इंग्रजी गाण्यावरचे विडंबन तर अफलातून क्रिएटिविटी. 
प्रासंगिक विनोद,  इतर कलाकारांच्या भूमिका ठिकठाक.  

'माधुरी दिक्षीतचा एक ही सिनेमा आम्ही सोडलेला नाही!'  हे ती नायिका असताना ठिक होते,  इथे ती ( माधुरी नेने ) फक्त निर्माती आहे 😬 
 तेंव्हा दोन तास खर्च करुन थेटरात जाऊन सिनेमा पहावा एवढा काही खास नाही , टीव्हीवर लागेलच. 
 ( त्यापेक्षा २ तास वेळ काढून उत्तम ज्योतिषाने कडे जाऊन आपली पत्रिका काढा किंवा काढलेली दाखवा 😷) 

 या शास्त्रातील  अभ्यासकांकडून, या विषयाची आवड असणा-यांकडून किंवा या विषयी जुजबी / ऐकीव माहिती असल्याने घरातील कुणी गेल्यानंतर तातडीने 'पंचक' लागलंय का? अशी विचारणा करणा-यांकडून भावना दुखावली जाणे, निषेध वगैरेंची शक्यता असताना  कुठेही शास्त्राची खिल्ली उडवली जाणार नाही याची मात्र काळजी घेतली आहे
संवेदनशील विषयात आजकाल कधी, केंव्हा ,कशा, कुणाच्या भावना दुखावल्या जातील याचा नेम राहिलेला नाही.  

नेंने दांपत्यांच्या निर्मीतीच्या या पहिल्याच प्रयत्नाला कितपत यश येईल हे सांगणे अवघड आहे. ही सुरवात आहे, पुढे एखादा आणखी  उत्तम मुहूर्त पाहून नवीन निर्मितीसाठी सुरुवात करा हे त्यांना सांगणे.  काय सांगा मराठी/ हिंदी सिनेमा निर्मितीचे 'पंचक' तुमच्या नशिबात लिहिलेले असेल.
त्यासाठी शुभेच्छा 💐💐 

पुढील काही निर्मितीसाठी  काही उपयुक्त विषय / नाव सुचवून ठेवतो.

१) ' बेटा मंगळवाला'
२) '  तेजाब भरी पनौती '
३) '  साजन एक प्रीती षडाष्टक '
४) ' दशा' तो 'पागल' है
५)  'कर्क तेरा गुरु दिवाना'
६)  'राहू खरा-नायक'

( ज्योतिष अभ्यासक)  अमोल 

#पंचक
#माझी_टवाळखोरी 📝
मार्गशीर्ष कृ एकादशी 
०७/०१/२०२४
-------------------------------------------
इतरांसाठी  महत्चाची गोष्ट : धनिष्ठा नक्षत्र चरण ३ व ४, शततारका,पू. भाद्रपदा ,उ.भाद्रपदा आणि रेवती या नक्षत्रावर कुणी गेले तर पंचक लागते आणि याची शांती वगैरे जी शास्त्रात सांगितली आहे ती करणे आवश्यकच असे एक अभ्यासक म्हणून आवर्जून नमूद करु इच्छितो.