December 25, 2013

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २५ नोव्हेंबर २०१४

विषय, वासना, इत्यादि सोडून भगवंताला शरण जावे. 

 



भगवंताचे अस्तित्व जिथे पाहावे तिथे आहे. भगवंताचे मर्म ओळखायला, मी कसे वागावे हे प्रथम पाहावे. भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरिता आपल्याला बुद्धी दिलेली आहे. भगवंत निश्चित आहे हे काहींना अनुभवाने कळले. आपण त्यांचे आप्तवाक्य प्रमाण मानले. भगवंताचे अस्तित्व जर निश्चित आहे तर त्याची ओळख तरी कशी करून घ्यावी ? बीजगणितामध्ये उदाहरण सोडविताना एक अज्ञात 'क्ष' घ्यावा लागतो. उदाहरणाचे उत्तर येईपर्यंत त्या 'क्ष' ची खरी किंमत काय आहे हे आपल्याला कळत नाही. पण तो घेतल्याशिवाय चालत नाही. त्याप्रमाणे, जीवनाचे कोडे सोडविण्यासाठी आज अज्ञात असा भगवंत आपल्याला गृहीत धरलाच पाहिजे. त्या भगवंताचे खरे स्वरूप, जीवनाचे कोडे सुटेल त्यावेळी आपल्याला कळेल. खरोखर, जन्ममरणातून मुक्त होण्याचा मार्ग जो आपल्याला दाखवितो तो खरा आप्त. भगवंताला सर्वात अधिक काय आवडते हे संतांनी सांगून टाकले. ते म्हणजे ' आपण विषय, वासना इत्यादि सर्व काही सोडून भगवंताला शरण जावे. ' आपण नेहमी विषयांनाच शरण जातो. भगवंताला जो शरण गेला त्याला जगाची भितीच नाही उरत. सर्व चमत्कार करता येतात, पण भगवंताला शरण जाणे फार कठीण आहे.
आपण जिना चढतो ते जिन्यासाठी नसून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असते. वरच्या मजल्यावर जाणे हे साध्य असून, जिना हे त्याचे साधन आहे. त्याप्रमाणे तीर्थयात्रा, व्रते, नेमधर्म ही साधने असून, परमेश्वरप्राप्ती हे आपले साध्य आहे. पण परमेश्वरप्राप्ती बाजूलाच राहिली आणि आपण साधनालाच घट्ट धरून बसलो आहोत याला काय करावे ? मूळ भगवंत हा निर्गुण, निराकार आणि अव्यक्त आहे, पण मनुष्य त्याला आपल्या कल्पनेमध्ये आणतो. आपल्या ठिकाणी असणारे गुण पूर्णत्वाने त्या भगवंताच्या ठिकाणी आहेत अशी आपण कल्पना करतो. याचा अर्थ असा की, आपण प्रथम भगवंताला जडामध्ये पाहतो, आणि मग त्याच्या नामाकडे जातो. भगवंताने केलेली ही सृष्टी, आहे तशीच सर्व जरूर आहे. तिच्यामध्ये बदल करायला नको, बदल आपल्यामध्ये करायला हवा. आपले सगळे जीवन जर भगवंताच्या हातामध्ये आहे, तर मग जीवनातल्या सर्व घडामोडी त्याच्याच हातात आहेत यात शंका कोणती ? झाडाच्या मुळांना पाणी घातले की त्याच्या सर्व भागांना ते पोहोचते, तसे, भगवंताचा विसर पडू न दिला म्हणजे सर्व काही बरोबर होते. भगवंत हवासा वाटणे, यामध्ये सर्व मर्म आहे. आत्मा हा समुद्रासारखा आहे; त्याचा अगदी लहान थेंब, त्याप्रमाणे हा जीव आहे. त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे, हेच खरे तत्त्वज्ञान आहे. या आत्म्याचे नित्य स्मरण ठेवून आनंदात असावे.


३३०. संतांनी नामस्मरणरूपी नाव आपणास दिली आहे.
त्यात विश्वासाने बसू. संत हे कर्णधार आहेत, ते आपणास पैलपार नेतील.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

December 24, 2013

श्री स्वामी चरित्र सारामृत -अध्याय २१



 श्री गणेशाय नमः ॥ निर्मिली सुंदर देवमंदिरे । चौक बैठका नाना प्रकारे । कळस ठेवल्यावरी सारे । पूर्ण झाले
म्हणती त्या ॥१॥ स्वामीचरित्र सारामृत । झाले वीस अध्यायापर्यंत । करोनी माझे मुख निमित्त । वदले
श्रीस्वामीराज ॥२॥ आता कळसाध्याय एकविसावा । कृपा करोनी वदवावा । हा ग्रंथ संपूर्ण करा...वा । 
भक्तजनांकारणे ॥३॥ संपवावा अवतार आता । ऐसे मनामाजी येता । जडदेह त्यागोनि तत्त्वता । गेले 
स्वस्थानी यतिराज ॥४॥ शके अठराशे पूर्ण । संवत्सर ते बहुधान्य । मास चैत्र पक्ष कृष्ण । त्रयोदशी मंगळवार 
॥५॥ दिवस गेला तीन प्रहर । चतुर्थ प्रहाराचा अवसर । चित्त करोनी एकाग्र । निमग्न झाले निजरुपी ॥६॥ 
षटचक्राते भेदोन । ब्रह्मरंध्रा छेदून । आत्मज्योत निघाली पूर्ण । हदयामधुनी तेधवा ॥७॥ जवळ होते सेवेकरी 
। त्यांच्या दुःख झाले अंतरी । शोक करीता नानापरी । तो वर्णिला न जाय ॥८॥ अक्कलकोटीचे जन समस्त । 
दुःखे करुन आक्रंदत । तो वृत्तान्त वर्णिता ग्रंथ । वाढेल समुद्रसा ॥९॥ असो स्वामींच्या अनंत लीला । जना 
सन्मार्ग दाविला । उद्धरिले जडमूढाला । तो महिमा कोण वर्णी ॥१०॥ कोकणांत समुद्रतीरी । प्रसिद्ध जिल्हा 
रत्नागिरी । पालशेत ग्रामामाझारी । जन्म माझा झालासे ॥११॥ श्रेष्ठ चित्तपावन ज्ञातीत । उपनाम असे थोरात
। बळवंत पार्वतीसुत । नाम माझे विष्णू असे ॥१२॥ तेथेचि बाळपण गेले । आता कोपरलीस येणे केले । 
उपशिक्षक पद मिळाले । विद्यालयी सांप्रत ॥१३॥ वाणी मारवाडी श्रेष्ठ । नाम ज्यांचे शंकरशेट । त्यांसी स्नेह 
झाला निकट । आश्रयदाते ते माझे ॥१४॥ त्यांची स्वामीचरणी भक्ती । भावार्थे पूजन करिती । दिवसा उपजली 
चित्ती । स्वामीचरित्र श्रवणाची ॥१५॥ ते मजला सांगितले । मी स्वामी गुणानुवाद गाइले । हे स्वामी चरित्र 
लिहिले । अल्प मतीने अत्यल्प ॥१६॥ शब्द सोपे व्यावहारिक भाषा । प्रत्येक अध्याय लहानसा । आबालवृद्धा
समजे असा । लघु ग्रंथ्र रचिला हा ॥१७॥ प्रथमाध्यायी मंगलाचरण । कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन । आधार 
स्वामी चरित्रास कोण । हेचि कथन केलेसे ॥१८॥ श्रीगुरु कर्दळीवनातूनी आले । स्वामीरुपे प्रगटले । भुवरी 
प्रख्यात झाले । हे कथन द्वितीयाध्यायी ॥१९॥ तारावया भक्तजनांला । अक्कलकोटी प्रवेश केला । तेथीचा 
महिमा वर्णिला । तृतीयाध्यायी निश्चये ॥२०॥ स्वामींचा करावया छळ । आले दोन संन्यासी खल । तेचि वृत्त 
सकल । चवथ्यामाजी वर्णिले ॥२१॥ मल्हारराव राजा बडोद्यासी । त्याने न्यावया स्वामीसी । पाठविले 
कारभार्‍यासी । पाचव्यांत ते कथा ॥२२॥ यशवंतराव सरदार । त्यासी दाविला चमत्कार । तयांचे वृत्त समग्र । 
सहाव्यात वर्णिले ॥२३॥ विष्णुबुवा ब्रह्मचारी । त्यांची स्वामीचरणांवरी । भक्ती जडली कोणे प्रकारी । ते 
सातव्यात सांगितले ॥२४॥ शंकर नामे एक गृहस्थ । होता ब्रह्मासमधे ग्रस्त । त्यासी केले दुःखमुक्त । 
आठव्यात ते कथा ॥२५॥ खर्चोनिया द्रव्य बहुत । त्यांनी बांधिला सुंदर मठ । ते वर्णन समस्त । नवव्यात 
केलेसे ॥२६॥ चिदंबर दीक्षितांचे वृत्त । वर्णिले दशमाध्यायात । ते ऐकता पुनीत । होती सत्यचि ॥२७॥ 
अकरावा आणि बारावा । तैसाचि अध्याय तेरावा । बाळाप्पाचा इतिहास बरवा । त्यामाजी निरुपिला ॥२८॥ 
भक्तिमार्ग निरुपण । संकलित केले वर्णन । तो चवदावा अध्याय पूर्ण । सत्तारक भाविका ॥२९॥ बसप्पा तेली 
सदभक्त । तो कैसा झाला भाग्यवंत । त्याची कथा गोड बहुत । पंधराव्यांत वर्णिली ॥३०॥ हरीभाऊ मराठे 
गृहस्थ । कैसे झाले स्वामीभक्त । सोळा सतरा यात निश्चित । वृत्त त्यांचे वर्णिले ॥३१॥ स्वामीसुतांचा कनिष्ठ 
बंधू । त्यासी लागला भजनछंदू । जे दादाबुवा प्रसिद्धु । अठाराव्यात वृत्त त्यांचे ॥३२॥ वासुदेव फडक्यांची गोष्ट 
। आणि तात्यांचे वृत्त । वर्णिले एकोणविसाव्यांत । सारांशरुपे सत्य पै ॥३३॥ एक गृहस्थ निर्धन । त्यासी आले 
भाग्य पूर्ण । तेचि केले वर्णन । विसाव्यांत निर्धारे ॥३४॥ स्वामी समाधिस्त झाले । एकविसाव्यांत वर्णिले ।
ग्रंथप्रयोजन कविवृत्त निवेदिले । पूर्ण केले स्वामीचरित्र ॥३५॥ शके अठराशे एकोणवीस । वसंतऋतू चैत्र मास । 
गुरुवार वद्य त्रयोदशीस । पूर्ण केला ग्रंथ हा ॥३६॥ बळवंत नामे माझा पिता । पार्वती माता पतिव्रता । वंदोनी 
त्या उभयंता । ग्रंथ समाप्त केलासे ॥३७॥ स्वामीनी दिधला हा वर । जो भावे वाचील हे चरित्र । त्यासी 
आयुरारोग्य अपार । संपत्ती, संतति प्राप्त होय ॥३८॥ त्याची वाढो विमल कीर्ति । मुखी वसो सरस्वती ।
भवसागर तरोन अंती । मोक्षपद मिळो त्या ॥३९॥ अंगी सर्वदा विनय वसो । वृथाभिमान तो नसो । सर्व 
विद्यासागर गवसो । भक्तश्रेष्ठा लागूनी ॥४०॥ ज्या कारणे ग्रंथ रचिला । जिही प्रसिद्धीस आणिला । त्यासी 
रक्षावे दयाळा । कृपाघना समर्था ॥४१॥ मी केवळ मतिमंद । परी भावे घेतला छंद । कृपाळू तू सच्चिदानंद । 
पूर्ण केला दयाळुवा ॥४२॥ दोन्ही कर जोडोनी । आता हेचि विनवणी । ग्रंथसंरक्षकालोगोनि । सुखी ठेवी 
दयाळा ॥४३॥ आता ज्ञानी वाचक असती । त्यास करु एक विनंती । मी केवळ हीनमति । कवित्व करु नेणेची ॥
॥४४॥ परी माझी ही आर्ष उत्तरे । वाचावी ऐकावी आदरे । उबग न मानावा चतुरे । स्वामीचरित्र म्हणोनी 
॥४५॥ जयजयाजी परमानंदा । वैकुंठवासी श्रीगोविंदा । भक्ततारका आनंदकंदा । अनामातीता अभेदा ॥४६॥
अरिमर्दना सर्वेशा । विश्वंभरा अविनाशा । पुराणपुरुषा अनंतवेशा । भवपाशा सोडवी ॥४७॥ जयजयाजी 
कमलासना । कमलावरा कमलनयना । विधितात कमलवदना । हदयकमली वसावे ॥४८॥ मत्स्य कूर्म वराह 
जाण । नृसिंह आणि वामन । परशुराम दशरथनंदन । कृष्ण बौद्ध कलंकी तू ॥४९॥ स्वामीचरित्र सुंदर उद्यान । 
त्यातील कुसुमे वेचून । सुंदर माळ करोन । आला घेवोनी विष्णू कवि ॥५०॥ आपुल्या कंठी तात्काळ । 
घालोनी चरणी ठेविला भाल । सदोदित याचा प्रतिपाल । करावा बाळ आपुले ॥५१॥ इति श्री स्वामीचरित्र 
सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा परिसोत भाविक भक्त । एकविसावा अध्याय गोड हा ॥५२॥ श्री 
स्वामीचरणार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

December 23, 2013

श्री स्वामी चरित्र सारामृत,अध्याय २०





श्री गणेशाय नमः ॥ जयजयाजी करुणाकरा । जयजयाजी यतिवरा । भक्तजन संतापहरा । सर्वेश्वरा गुरुराया ॥१॥
लीलावेषधारी दत्ता । सर्वसाक्षी अनंता । विमलरुपा गुरुनाथा । परब्रह्म सनातना ॥२॥
तुझे चरित्र अगाध । केवी व...र्णू मी मतिमंद । परी घेतला असे छंद । पूर्ण केला पाहिजे ॥३॥
तुझ्या गुणांचे वर्णन । करिता भागे सहस्त्रवदन । निगमागमासहि जाण । नसे पार लागला ॥४॥
तुझे वर्णावया चरित्र । तुजसम कवी पाहिजेत । तरी अल्पमतीने अत्यल्प । गुणानुवाद का न गावे ॥५॥
वर्णिता समर्थांचे गुण । नाना दोष होती दहन । सांगता ऐकता पावन । वक्ता श्रोता दोघेहि ॥६॥
अक्कलकोटी वास केला । जना दाखविल्या अनंत लीला । उद्धरिले कैक पाप्यला । अदभुत चरित्र स्वामींचे ॥७॥
असो कोणे एके दिवशी । इच्छा धरोनी मानसी । गृहस्थ एक दर्शनासी । समर्थांच्या पातला ॥८॥
करोनिया श्रीची स्तुती । माथा ठेविला चरणावती । तेव्हा समर्थ त्याते वदती । हास्यवदने करोनी ॥९॥
फकिराते देई खाना । तेणे पुरतील सर्व कामना । पक्वान्ने करोनी नाना । यथेच्छ भोजन देईजे ॥१०॥
गृहस्थे आज्ञा म्हणोन । केली नाना पक्वान्ने । फकीर बोलाविले पाच जण । जेवू घातले तयाते ॥११॥
फकीर तृप्त होवोन जाती । उच्छिष्ट उरले पात्रावरती । तेव्ह समर्थ आज्ञापिती । गृहस्थाते सत्वर ॥१२॥
शेष अन्न करी ग्रहण । तुझे मनोरथ होतील पूर्ण । परी त्या गृहस्थाचे मन । साशंक झाले तेधवा ॥१३॥
म्हणे यवन यती अपवित्र । त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट । याती मध्ये पावेन कष्ट । कळता स्वजना गोष्ट हे ॥१४॥
आला मनी ऐसा विचार । तो समर्थास कळला सत्वर । म्हणती हा अभाविक नर । विकल्प चित्ती याचिया ॥१५॥
इतक्यामाजी साहजिक । कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक । येवोन स्वामीसन्मुख । स्वस्थ उभा राहिला ॥१६॥
दारिद्र्ये ग्रस्त झाला म्हणोन । भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन । द्रव्य मेळवाया साधन । त्याजवळी नसे परी ॥१७॥
त्यासी देखोन समर्थ । म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित । तो निःशंक मनांत । पात्रावरी बैसला ॥१८॥
त्यासी बोलले समर्थ । तु मुंबापुरी जाई त्वरित । सफल होतील मनोरथ । द्रव्यप्राप्ती होईल ॥१९॥
स्वामीवचनी भाव धरिला । तात्काळ मुंबईस आला । उगाच भटको लागला । द्रव्य मिळेल म्हणोनी ॥२०॥
प्रभात समयी एके दिवशी । गृहस्थ निघाला फिरायासी । येऊन एका घरापाशी । स्वस्थ उभा राहिला ॥२१॥
तो घरातून एक वृद्ध बाई । दार उघडोन घाईघाई । बाहेर येवोनिया पाही । गृहस्थ पडला दृष्टीसी ॥२२॥
तिने बोलाविले त्याला । आसनावरी बैसविला । दहा हजारांच्या दिधल्या । नोटा आणून सत्वरी ॥२३॥
गृहस्थ मनी आनंदला । बाईते आशीर्वाद दिधला । द्रव्यलाभ होता आला । शुद्धीवर सत्वर ॥२४॥
समर्थाचे वचन सत्य । गृहस्था आली प्रचीत । वारंवार स्तुती करीत । स्तोत्र गत स्वामीचे ॥२५॥
समर्थांचे लीला विचित्र । केवी वंदू शके मी पामर । ज्या वर्णिता थोर थोर । श्रमित झाले कविराज ॥२६॥
कोणी दाता नृपवर । दान कराया भांडार । मोकळे करी परी शक्त्यनुसार । याचक नेती बांधोनी ॥२७॥
षड्रस अन्नाचे ढीग पडले । क्षुधित जन तेथे आले । त्यांनी त्यातून भक्षिले । क्षुधा शांत होई तो ॥२८॥
स्वामीचरित्र भांडारातून । रत्ने घेतली निवडोन । प्रेमादरे माळ करोन । श्रोतयांचे कंठी घातली ॥२९॥
श्री स्वामीचरणसरोजी । विष्णुभ्रमर घाली रुंजी । अत्यादरे चरण पूजी । स्तोत्र गातसे ॥३०॥
इति श्री स्वामीचरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा ऐकोत भाविक भक्त । विसावा अध्याय गोड हा ॥३१॥
॥ श्रीरस्तु ॥ शुभं भवतु ॥

December 22, 2013

श्री स्वामी चरित्र सारामृत - अध्याय १९






श्री गणेशाय नमः ॥ एकाग्रचित्ते करिता श्रवण । तेणे होय दिव्य ज्ञान । त्या ज्ञाने परमार्थसाधन । पंथ सुलभ होतसे ॥१॥
सच्चरित्रे श्रवण करिता । परमानंद होय चित्ता । ओळखू ये सत्यासत्यता । परमार्थ प्रपंचाची ॥२...॥ 
या नरदेहा येवोन । काय करावे आपण । जेणे होईल सुगम । दुस्तर हा भवपंथ ॥३॥ 
ज्यांसी वानिती भले । सज्जन ज्या मार्गे गेले । सर्व दुःखमुक्त झाले । तो पंथ धरावा ॥४॥ 
बोलणे असो हे आता । वर्णूं पुढे स्वामीचरिता । अत्त्यादरे श्रवण करिता । सर्वार्थ पाविजे निश्चये ॥५॥
प्रसिद्ध आळंदी क्षेत्री । नामे नृसिंहसरस्वती । जयांची सर्वत्र ख्याती । अजरामर राहिली ॥६॥ 
कृष्णातटाकी क्षेत्रे पवित्र । ती देखिली त्यांनी समस्त । नाना योग्याभासी बहुत । महासाधू देखिले ॥७॥
करावे हठयोगसाधन । ऐसी इच्छा बहुत दिन । नाना स्थाने फिरोन । शोध करीती गुरुचा ॥८॥ 
जपी तपी संन्यासी । देखिले अनेक तापसी । जे सदा अरण्यवासी । योगाभ्यासी बैसले ॥९॥ 
एक सूर्यमंडळ विलोकिती । एक पंचाग्निसाधन करिती । एक वायू भक्षिताती । मौन धरिती कितीएक ॥१०॥
एक झाले दिगंबर । एकी केला उर्ध्व कर । एक घालिती नमस्कार । एक ध्यानस्थ बैसले ॥११॥ 
एक आश्रमी राहोन । शिष्या सांगती गुह्यज्ञान । एक करिती तीर्थाटन । एक पूजनी बैसले ॥१२॥ 
ऐसे असंख्य देखिले । ज्ञान तयांचे पाहिले । कित्येकांचे चरण धरिले । परि गेले व्यर्थची ॥१३॥
ठयोग परम कठीण । कैसा करावा साध्य आपण । याविषयी पूर्ण ज्ञान । कोणी तयाते सांगेना ॥१४॥ 
एके समयी अक्कलकोटी । स्वामीदर्शनेच्छा । धरुनी पोटी । आले नृसिंहसरस्वती । महिमा श्रीचा ऐकोनी ॥१५॥ 
नृसिंहसरस्वती दर्शनासी । येती कळले समर्थांसी । जाणिले त्यांच्या हदगतासी । अंतरामाजी आधीच ॥१६॥ 
सन्मुख पाहोनी तयांना । आज्ञाचक्र भेदांतला । एक श्लोक सत्वर म्हटला । श्रवणी पडला तयांच्या ॥१७॥ 
श्लोक ऐकता तेथेचि । समाधी लागली साची । स्मृति न राहिली देहाची । ब्रह्मारंध्री प्राणवायू ॥१८॥ 
आश्चर्य करिती सकळ । असो झालिया काही वेळ । समाधी उतरोनी तत्काळ । नृसिंहसरस्वती धावले ॥१९॥ 
स्वामी पदांबुजांवरी । मस्तक ठेविले झडकरी । सदगदित झाले अंतरी । हर्ष पोटी न सामावे ॥२०॥ 
उठोनिया करिती स्तुती । धन्य धन्य हे यतिमूर्ती । केवळ परमेश्वर असती । रुप घेती मानवाचे ॥२१॥ 
मी आज कित्येक दिवस । हठयोगसाधन करायास । केले बहुत सायास । परी सर्व व्यर्थ गेले ॥२२॥ 
स्वामीकृपा आज झाली । तेणे माझी इच्छा पुरली । चिंता सकल दूर झाली । कार्यभाग साधला ॥२३॥ 
असो नृसिंहसरस्वती । आळंदी क्षेत्री परतोन येती । तेथेचि वास्तव्य करिती । सिद्धी प्रसन्न जयांना ॥२४॥
बहुत धर्मकृत्ये केली । दूरदूर कीर्ति गेली । काही दिवशी एकेवेळी । अक्कलकोटी पातले ॥२५॥
घेतले समर्थाचे दर्शन । उभे राहिले कर जोडोनि । झाले बहुत समाधान ॥२६॥ 
पाहोनी नृसिंहसरस्वतीसी । समर्थ बोलले त्या समयासी । लोकी धन्यता पावलासी । वारयोषिता पाळोनी ॥२७॥ 
तियेसी द्यावे सोडोनी । तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी । मग सहजचि सुरभुवनी । अंती जासी सुखाने ॥२८॥ 
ऐकोनी समर्थांची वाणी । आश्चर्य वाटले सकला मनी । नृसिंहसरस्वती स्वामी असोनी । विपरीत केवी करितील ॥२९॥ 
परी अंतरीची खूण । यति तत्काळ जाणोन । पाहो लागले अधोवदन । शब्द एक न बोलवे ॥३०॥ 
सिद्धी करोनी प्रसन्न । वाढविले आपुले महिमान । तेचि वारयोषितेसमान । अर्थ स्वामीवचनाचा ॥३१॥
असो तेव्हापासोनि । सिद्धी दिधली सोडोनी । येवोनी राहिले स्वस्थानी । धर्मकृत्ये बहु केली ॥३२॥ 
यशवंतराव भोसेकर । नामे देव मामलेदार । त्यासीही ज्ञान साचार । समर्थकृपेने जहाले ॥३३॥ 
ऐसे सच्छिष्य अनेक । श्रीकृपेने ज्ञानी विशेष । ज्यांनी ओळखिले आत्मस्वरुप । महिमा त्यांचा न वर्णवे ॥३४॥ 
वासुदेव ब्राह्मण थोर । ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र । इंग्रजी अंमलात अनिवार । होऊनी बंड केले ज्यांनी ॥३५॥ 
समर्थांची कृपा होता । इच्छित कार्य साधेल तत्त्वता । ऐसे वाटले त्याचे चित्ता । दर्शनाते पातला ॥३६॥ 
करी नग्न तलवार । घेवोन आला श्रीसमोर । घालोन साष्टांग नमस्कार । मनामाजी प्रार्थीत ॥३७॥ 
स्वकार्य चिंतोनि अंतरीं । खङ्ग दिधले श्रीच्या करी । म्हणे मजवरी कृपा जरी । तरी खङ्ग हाती देतील ॥३८॥ 
जावोनि बैसला दूर । श्रीनी जाणिले अंतर । त्यांचे पाहोनि कर्म घोर । राजद्रोह मानसी ॥३९॥ 
लगबगे उठली स्वारी । सत्वर आली बाहेरी । तरवडाचे झाडावरी । तलवार दिली टाकोनी ॥४०॥ 
वासुदेवराव पाहोनी । खिन्न झाला अंतः करणी । समर्थांते आपुली करणी । नावडे सर्वथा म्हणतसे ॥४१॥ 
कार्य आपण योजिले । ते शेवटा न जाय भले । ऐसे समर्थे दर्शविले । म्हणूनी न दिले खङ्ग करी ॥४२॥ 
परी तो अभिमानी पुरुष । खङ्ग घेवोनि तैसेच । आला परत स्वस्थानास । झेंडा उभारिला बंडाचा ॥४३॥
त्यात त्यासी यश न आले । सर्व हेतू निष्फळ झाले । शेवटी पारिपत्य भोगले । कष्ट गेले व्यर्थचि ॥४४॥
असो स्वामीचे भक्त । तात्या भोसले विख्यात । राहती अक्कलकोटात । राजाश्रित सरदार ॥४५॥
काही कारण जहाले । संसारी मन विटले । मग प्रपंचाते सोडिले । भक्त झाले स्वामींचे ॥४६॥ 
मायापाश तोडोनी । दृढ झाले स्वामीचरणी । भजन पूजन निशिदिनी । करिताती आनंदे ॥४७॥
अकस्मात एके दिवशी । भयभीत झाले मानसी । यमदूत दिसती दृष्टीसी । मृत्यूसमय पातला ॥४८॥
पाहोनिया विपरीत परी । श्रीचरण धरिले झडकरी । उभा राहिला काळ दूरी । नवलपरी जाहले ॥४९॥
दीन वदन होवोनी । दृढ घातली मिठी चरणी । तात्या करिती विनवणी । मरण माझे चुकवावे ॥५०॥
ते पाहोनी श्रीसमर्थ । कृतान्तासी काय सांगत । हा असे माझा भक्त । आयुष्य याचे न सरले ॥५१॥
पैल तो वृषभ दिसत । त्याचा आज असे अंत । त्यासी न्यावे त्वा त्वरित । स्पर्श याते करु नको ॥५२॥
ऐसे समर्थ बोलले । तोची नवल वर्तले । तत्काळ वृषभाचे प्राण गेले । धरणी पडले कलेवर ॥५३॥
जन पाहोनी आश्चर्य करिती । धन्यता थोर वर्णिताती । बैलाप्रती दिधली मुक्ती । मरण चुकले तात्यांचे ॥५४॥
ऐशा लीला असंख्य । वर्णू जाता वाढेल ग्रंथ । हे स्वामीचरित्र सारामृत । चरित्रसारमात्र येथे ॥५५॥
जयाची लीला अगम्य । ध्याती ज्याते निगमागम । सुर - नर वर्णिताती गुण । अनादिसिद्ध परमात्मा ॥५६॥
नानारुपे नटोनी । स्वेच्छे विचरे जो या जनी । भक्ता सन्मार्ग दाखवोनी । भवसागरी तारीत ॥५७॥
त्या परमात्म्याचा अवतार । श्रीस्वामी यति दिगंबर । प्रगट झाले धरणीवर । जगदुद्धाराकारणे ॥५८॥
त्यांची पदसेवा निशिदिनी । करोनी तत्पर सदा भजनी । विष्णू शंकराचे मनी । हेचि वसो सदैव ॥५९॥
इति श्री स्वामीचरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा परिसोत प्रेमळ भक्त । एकोणविसावा अध्याय गोड हा ॥६०॥
॥ श्रीरस्तु ॥ शुभं भवतु ॥

December 21, 2013

संकष्टी चतुर्थी



आज    संकष्टी चतुर्थी  

चंद्रोदय ९.२९ वाजता

सांगलीच्या बागेतल्या ' गणपतीचे '

December 20, 2013

श्री स्वामी चरित्र सारामृत-अध्याय १८



श्री गणेशाय नमः ॥ स्वामीसुताच्या गादीवरी । कोण नेमावा अधिकारी । ऐसा प्रश्न सेवेकरी । करिताती समर्थांते ॥१॥
तेव्हा बोलले समर्थ । सेवेकरी असती सांप्रत । परी एकही मजला त्यात । योग्य कोणी दिसेना ॥२॥
जेव्हा येईल आमुच्या मानसी । त्या समयी मोर पांखरासी । अधिकारी नेमू गादीसी । चिंता तुम्ही न करावी ॥३॥
मोर पांखरा मोर पांखरा । समर्थ म्हणती वेळोवेळा । रात्रंदिन तोची चाळा । मोठमोठ्याने ओरडती ॥४॥
आमुची पायाची वीट । जतन करावी नीट । वारंवार म्हणती समर्थ । काकूबाईलागोनी ॥५॥
लपवूनी ठेविले विटेसी । ती दिली पाहिजे आम्हांसी । याचा अर्थ करणासी । स्पष्ट काही कळेना ॥६॥
असो स्वामीसुताचा भ्राता । कोकणांत राहात होता । स्वामीसुत मृत्यु पावता । वर्तमान कळले त्या ॥७॥
तो केवळ अज्ञान । दादा तयांचे अभिधान । त्याचे शरीरी असमाधान । कृश होत चालला ॥८॥
काकूबाईने तयासी । आणविले आपणापासी । एके दिवशी समर्थांसी । दादाप्रती दाखविले ॥९॥
बाळ चालले वाळोनी । यासी अमृतदृष्टीने पाहोनी । निरोगी करावे जी स्वामी । बाई विनवी समर्थांते ॥१०॥
समर्थ बोलले बाईसी । चार वेळा जेवू घाला यासी । आरोग्य होईल बाळासी । चिंता मानसी करु नको ॥११॥
त्याप्रमाणे बाई करिता । दादासी झाली आरोग्यता । समर्थांची कृपा होता । रोग कोठे राहील ॥१२॥
केजगांव मोगलाईत । तेथे नानासाहेब भक्त । त्यांनी बांधिला श्रींचा मठ । द्रव्य बहुत खर्चिले ॥१३॥
श्रींची आज्ञा घेऊनी सत्य । पादुका स्थापाव्या मठात । याकारणे अक्कलकोटी येत । दर्शन घेत समर्थांचे ॥१४॥
ते म्हणती काकूबाईसी । पादुका स्थापन करायासी । तुम्ही पाठवा दादासी । समागमे आमुच्या ॥१५॥
बाई म्हणे तो अज्ञान । तशात शरीरी असमाधान । त्याची काळजी घेईल कोण । सत्य सांगा मजलागी ॥१६॥
परी आज्ञा देतील समर्थ । तरी पाठवीन मी सत्य । मग समर्थांजवळी येत । घेवोनिया दादासी ॥१७॥
समर्थे वृत्त एकोन । म्हणती द्यावे पाठवून । बाळ जरी आहे अज्ञ । तरी सांभाळू तयासी ॥१८॥
काकूबाई बहुत प्रकारे । समर्था सांगे मधुरोत्तरे । दादासी पाठविणे नाही बरे । वर्जावे आपण सर्वाते ॥१९॥
समर्थ तियेसी बोलले । त्यात तुमचे काय गेले । आम्हांसी दिसेल जे भले । तेच आम्ही करु की ॥२०॥
शेवटी मंडळी सांगाती । दादासी पाठविले केजेप्रती । पादुका स्थापन झाल्यावरती । दादा आला परतोनी ॥२१॥
पुढे सेवेकर्‍यां सांगाती । त्यासी मुंबईस पाठविती । ब्रह्मचार्‍यांसी आज्ञा करिती । यासी स्थापा गादीवरी ॥२२॥
ब्रह्मचारीबुवांजवळी । दादासी नेत मंडळीं । जी समर्थे आज्ञा केली । ती सांगितली तत्काळ ॥२३॥
दादासी करुनी गोसावी । मुंबईची गादी चालवावी । स्वामीसुताची यासी द्यावी । कफनी झोळी निशाण ॥२४॥
ब्रह्मचारी दादासी । उपदेशिती दिवस निशी । गोसावी होऊनी गादीसी । चालवावे आपण ॥२५॥
दादा जरी अज्ञान होता । तरी ऐशा गोष्टीकरीता । नकार म्हणेची सर्वथा । न रुचे चित्ता त्याचिया ॥२६॥
यापरी ब्रह्मचार्‍यांनी । पाहिली खटपट करोनी । शेवटी दादांसी मुंबईहूनी । अक्कलकोटा पाठविले ॥२७॥
दादास घेऊनी सत्वरी । श्रीसन्निध आले टाळकरी । तेव्हा दादा घेवोनी तुंबरी । भजन करीत आनंदे ॥२८॥
समर्थे ऐसा समयासी । आज्ञा केली भुजंगासी । घेऊनी माझ्या पादुकांसी । मस्तकी ठेव दादाच्या ॥२९॥
मोर्चेल आणूनि सत्वरी । धरा म्हणती त्यावरी । आज्ञेपमाणे सेवेकरी । करिताती तैसेचि ॥३०॥
श्रींच्या पादुका शिरी पडता । उपरती झाली त्याच्या चित्ता । हदयी प्रगटला ज्ञानसविता । अज्ञान गेले लयाते ॥३१॥
दादा भजनी रंगला । देहभानहि विसरला । स्वस्वरुपी लीन झाला । सर्व पळाला अहंभाव ॥३२॥
धन्य गुरुचे महिमान । पादुका स्पर्श करोन । जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान । काय धन्यता वर्णावी ॥३३॥
असो दादांची पाहून वृत्ती । काकूबाई दचकली चित्ती । म्हणे समर्थे दादांप्रती । वेड खचित लाविले ॥३४॥
ती म्हणे जी समर्था । आपण हे काय करता । दादांचिया शिरी ठेविता । पादुका काय म्हणोनी ॥३५॥
समर्थ बोलले तयेसी । जे बरे वाटले आम्हासी । तेचि करु या समयासी । व्यर्थ बडबड करु नको ॥३६॥
काकूबाई बोले वचन । एकासी गोसावी बनवोन । टाकिला आपण मारुन । इतुकेचि पुरे झाले ॥३७॥
ऐकोन ऐशा वचनाला । समर्थांसी क्रोध आला । घाला म्हणती बाईला । खोड्यामाजी सत्वर ॥३८॥
काकूबाईने आकांत । करुनिया मांडिला अनर्थ । नाना अपशब्द बोलत । भाळ पिटीत स्वहस्ते ॥३९॥
परी समर्थे त्या समयीं । लक्ष तिकडे दिले नाही । दादांसी बनविले गोसावी । कफनी झोळी अर्पिली ॥४०॥
दुसरे दिवशी दादांसी । समर्थ पाठविती भिक्षेसी । ते पाहूनी काकूबाईसी । दुःख झाले अपार ॥४१॥
लोळे समर्थांच्या चरणांवरी । करुणा भाकी पदर पसरी । विनवीतसे नानापरी । शोक करी अपार ॥४२॥
समर्थांसी हसू आले । अधिकचि कौतुक मांडिले । दादांसी जवळ बोलाविले । काय सांगितले तयासी ॥४३॥
अनुसया तुझी माता । तिजपाशी भिक्षा माग आता । अवश्य म्हणोनी तत्त्वता । जननीजवळ पातला ॥४४॥
ऐसे बाईंने पाहोनी । क्रोधाविष्ट अंतःकरणी । म्हणे तुझी ही करणी । लोकापवादाकारण ॥४५॥
भिक्षान्न आपण सेवावे । हे नव्हेची जाण बरवे । चाळे अवघे सोडावे । संसारी व्हावे सुखाने ॥४६॥
ऐकोनी वचन । उदास झाले तिचे मन । असो दादा गोसावी होवोन । स्वामीभजनी रंगले ॥४८॥
काही दिवस झाल्यावरी । मग आले मुंबापुरी । स्वामीसुताच्या गादीवरी । बसोन संस्था चालविली ॥४९॥
कलियुगी दिवसेदिवस । वाढेल स्वामी महिमा विशेष । ऐसे बोलले स्वामीदास । येथे विश्वास धरावा ॥५०॥
दोघा बंधूंचे ऐसे वृत्त । वर्णिले असे संकलित । केला नाही विस्तार येथ । सार मात्र घेतले ॥५१॥
इति श्री स्वामीचरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा प्रेमळ परिसोत ।
अष्टदशोऽध्याय गोड हा ॥५३॥ श्रीरस्तु ॥ शुभं भवतु ॥

December 19, 2013

श्री स्वामी चरित्र सारामृत-अध्याय 17




श्री गणेशाय नमः ॥ मागील अध्यायी कथा सुंदर । प्रख्यात जे मुंबई शहर । तेथे येऊनी स्वामीकुमर । मठ स्थापिती समर्थांचा ॥१॥
षडविकार जिंकिले । संसाराते त्यागिले । रात्रंदिन रत झाले । स्वामी भजनी सुखाने ॥२॥
स...्वात्मसुखी तल्लीन वृत्ती । तेणे हरली संसृति । कवणाची नाही भीती । सदा चित्ती आनंद ॥३॥ 
स्वामीनामाचे भजन । त्यांचिया चरित्राचे कीर्तन । त्याहुनी व्यवसाय अन्य । स्वामीसुत नेणती ॥४॥ 
संसाराते सोडोन । बैसले गोसावी होवोन । हे पाहूनी कित्येकजण । हांसताती तयाते ॥५॥ 
परी त्याचा विषाद चित्ती । स्वामीसुत न मानिती । अंगी बाणली पूर्ण विरक्ति । विषयासक्ति नसेची ॥६॥ 
स्वामीसुताची जननी । काकूबाई नामे करोनी । तिने हे वृत्त ऐकोनी । दुःख केले अनिवार ॥७॥ 
मोहावर्ती सापडले । मायावश जे झाले । त्यांसी प्रपंचावेगळे । गोड काही न लागेची ॥८॥ 
पुत्रवात्सल्येकरोनी पाही । शोक करीत काकूबाई । मुंबईत लवलाही । सुताजवळी पातल्या ॥९॥ 
गोसावी निजसुता पाहोनी । वक्षःस्थळ घेती बडवोनी । अंग टाकीयले धरणी । बहुत आक्रोश मांडीला ॥१०॥ 
निजमातेचा शोक पाहोन । दुःखित झाले अंतःकरण । तियेलागी सावरुन । धरिले सत्वर प्रेमाने ॥११॥ 
तुझ्या उदरी जन्मास आलो । सदगुरुपायी विनटलो । जन्ममरणाते चुकलो । मुक्त झालो सहजची ॥१२॥
धन्य धन्य तू गे जननी । मजलागी प्रसवोनी । मान्य झालीस त्रिभुवनी । काय धन्यता वर्णावी ॥१३॥ 
अशा प्रकारे स्वामीसुत । मातेचे समाधान करीत । मधुर शब्दे समजावीत । परमार्थ गोष्टी सांगोनी ॥१४॥ 
परी त्याच्या या गोष्टी । तियेसी गोड न लागती । म्हणे याची भ्रष्ट मती । खचित असे जाहली ॥१५॥ 
यासी पिशाच्चबाधा झाली । किंवा कोणी करणी केली । याची सोय पाहिजे पाहिली । पंचाक्षरी आणोनी ॥१६॥ 
त्या समयी प्रख्यात थोर । यशवंतराव भोसेकर । जयांसी देव मामलेदार । सर्व लोक बोलती ॥१७॥ 
तयांची घेवोन भेटी । विचारावी काही युक्ती । ते जरी कृपा करिती । तरी होय आरोग्य ॥१८॥ 
ऐसा विचार करोनी पोटी । दर्शना आल्या उठाउठी । सांगितल्या सुताच्या गोष्टी । मुळापासोन सर्वहि ॥१९॥
होवोनिया दीनवदन । करिती विनंती कर जोडोन । म्हणती सर्वज्ञ आपण । उपाय यासी सांगावा ॥२०॥ 
ऐकोनिया देव मामलेदार । हांसोनी देती उत्तर । त्यासी पिशाच्च लागले थोर । माझेनी दूर नोहेची ॥२१॥ 
ऐसे उत्तर ऐकोनि । दुःखित झाले अंतःकरणी । मग ते स्वामीसुताची जननी । अक्कलकोटी येतसे ॥२२॥ 
म्हणे ज्याने वेड लाविले । त्याचीच धरावी पाउले । येणे उपाये आपुले । कार्य सत्य होईल ॥२३॥ 
असो इकडे स्वामीसुत । मुंबईमाजी वास्तव्य करीत । हिंदू पारसी स्वामीभक्त । त्यांच्या उपदेशे जहाले ॥२४॥ 
मठ होता कामाठीपुर्‍यात । तेथे जागा नव्हती प्रशस्त । मग दिली कांदेवाडीत । जागा एक भक्तिणीने ॥२५॥ 
निस्सीम जे स्वामीभक्त । आनंदे भजनी नाचत । कुटील जन त्याते हासत । ढोंग अवघे म्हणती हे ॥२६॥ 
परी निंदा आणि स्तुती । दोन्ही समान जे मानिती । श्रीचरणांवीण आसक्ति । अन्य विषयावरी नसे ॥२७॥ 
जन निंदा करिताती । अनेक प्रकारे दूषण देती । परी शांत चित्ते त्याप्रती । उपदेशिती स्वामीसुत ॥२८॥ 
जे अहंकारे बुडले । सत्य पथाचरण चुकले । नित्य कार्यांते विसरले । मोहे पडले भवजाली ॥२९॥ 
ऐसे जे का मूढ जन । ते भक्ता देती दूषण । परी तेणे अंतःकरण । दुःखित नोहे तयांचे ॥३०॥ 
तारा नामे त्यांची कांता । तेही त्रास देती स्वामीसुता । परी तयांच्या चित्ता । दुःख खेद नसेची ॥३१॥ 
प्रथम मुंबई शहरात । शके सत्राशे त्र्याण्णवात । फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस । स्वामी जयंती केलीसे ॥३२॥ 
कोणे एके समयासी । नगरकर नाना जोशी । सहज आले मुंबईसी । त्यांनी ऐकिले वर्तमान ॥३३॥ 
या नगरांत सांप्रत । स्वामीसुत स्वामीभक्त । गोसावी होऊनी राहात । महाज्ञानी असती ते ॥३४॥ 
एकवार पहावे तयांसी । इच्छा झाली नानांसी । मग कोणे एके समयासी । मठामाजी पातले ॥३५॥ 
पाहुनी स्वामीसुताप्रती । आनंदले नाना चित्ती । प्रेमानंदे चरण वंदिती । स्तवन करिती तयांचे ॥३६॥ 
स्वामीसुते तयासी । लावियले स्वामीभक्तीसी । धन्य झाले नाना जोशी । रंगले भजनी समर्थांच्या ॥३७॥ 
ऐसे कित्येक सज्जन । स्वामीसुते शिष्य करोन । वाढविले महात्म्य पूर्ण । श्रीसमर्थ भक्तींचे ॥३८॥ 
पुढे जोशी बुवांनी स्वामीची पत्रिका करोनी । ती अर्पावया श्रीचरणी । अक्कलकोटी पातले ॥३९॥ 
पत्रिका श्रीचरनी अर्पिली । स्वामीमूर्ती आनंदली । समर्थे त्यांसी आज्ञा केली । नगारा वाजवा म्हणोनी ॥४०॥ 
नगारा वाजविता जोशी । हसू आले समर्थांसी । पाहोनिया स्वभक्तासी । परमानंद जाहला ॥४१॥ 
अक्कलकोटी स्वामीसुत । श्रीसन्निध भजन करीत । कीर्तनी आनंदे नाचत । लोकलज्जा सोडोनी ॥४२॥ 
लोकापवादाचे मनी भय । तो भक्ती करील काय । प्रेमानंद चित्त नोहे । भजनी मन लागेना ॥४३॥ 
त्रिविध जन नानारीती । निंदा स्तुति करिताती । खेदानंद मानिता चित्ती । चित्तवृत्ति द्विधा होय ॥४४॥ 
असो अक्कलकोट नगरांत । शके सतराशे त्र्याण्णवात । प्रथम स्वामी जयंती करीत । स्वामीसुत आनंदे ॥४५॥ 
छेली खेडे ग्रामांत । प्रथम स्वामी प्रगट होत । विजयसिंग नामे भक्त । गोट्या खेळत त्यांसवे ॥४६॥ 
ऐसे स्वामीसुताचे मत । परी दिसे आधाररहित । सत्यासत्य जाणती समर्थ । आपण तेथे अज्ञानी ॥४७॥ 
स्वामीसुत दिवसेदिवस । स्वामीभक्ती करी विशेष । जन लाविले भजनास । कीर्तिध्वज उभारीला ॥४८॥ 
मनामाजी धरुनी कामना । कोणी येताचि दर्शना । त्यासी समर्थ करिती आज्ञा । सुताकडे जावयाची ॥४९॥
स्वामीसुतहि त्यांप्रती । मनांतील खूण सांगती । ऐकोनी जन चकित होती । वर्णिती ख्याती सुताची ॥५०॥ 
एकदा सहज स्वामीसुत । अक्कलकोटी दर्शना येत । तेव्हा समर्थ राजवाड्यात । राहिले होते आनंदे ॥५१॥ 
राणीचिये आज्ञेवाचोनि । दर्शन नोहे कोणालागोनी । ऐसे वर्तमान ऐकोनी । खिन्न मनी स्वामीसुत ॥५२॥ 
स्वामीदर्शन घेतल्याविण । तो न सेवी उदकान्न । ऐसे दिवस झाले तीन । निराहार राहिला ॥५३॥ 
मग वाड्यासमोर जावोन । आरंभिले प्रेमळ भजन । जे करुणरसे भरले पूर्ण । ऐकिले आंतून राणीने ॥५४॥ 
हा समर्थांचा निस्सीम भक्त । आनंदे भजनी नाचत । समर्थ दर्शनाची धरित । दृढ इच्छा अंतरी ॥५५॥ 
सेवकांसी म्हणे सत्वरी । तुम्ही जाऊनी या अवसरी । त्य साधूते मंदिरी । प्रार्थोनिया आणावे ॥५६॥
ऐसी राणीची आज्ञा होता । सेवक धावले तत्त्वता । प्रार्थूनिया स्वामीसुता । मंदिरामाजी आणिले ॥५७॥
पाहोनिया समर्थांसी । उल्हास सुताचे मानसी । धावोनिया वेगेसी । मिठी चरणी घातली ॥५८॥ 
सदगदित अंतःकरणी । चरण क्षाळिले नयनाश्रूंनी । देहभान गेले विसरोनी । स्वामीपदी सुखावला ॥५९॥
बाळ चुकले मातेसी । ते भेटले बहुत दिवसी । मग तयांच्या आनंदासी । पारावार नसेची ॥६०॥ 
निजसुताते पाहोनी । आनंदले समर्थ मनी । कर फिरविला मुखावरुनी । हस्ती धरुनी उठविले ॥६१॥ 
अक्कलकोटी त्या अवसरी । बहुत होते सेवेकरी । परी समर्थांची प्रीति खरी । स्वामीसुतावरी होती ॥६२॥ 
त्यांत होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहोन । दूषित होय त्यांचे मन । द्वेष पूर्ण करिताती ॥६३॥ 
काही उपाय करोन । फिरवोन समर्थांचे मन । स्वामीसुतावरचे प्रेम । कमी करु पाहताती ॥६४॥ 
स्वामीसुत रात्रंदिन । समर्थांपुढे करिती भजन । पायी खडावा घालोन । प्रेमरंगे नाचती ॥६५॥ 
एके दिवशी श्रीसमर्थ । बैसले असता आनंदात । स्वामीसुत भजन करीत । पायी खडावा घालोन ॥६६॥ 
ऐशी वेळ साधोनी । समर्थां सांगितले दुर्जनी । स्वामीसुत हे करणी । योग्य नसे सर्वथा ॥६७॥ 
बैसला असता आपण । पायी खडावा घालोन । हा नाचतो काय म्हणून । आपुला अपमान करावया ॥६८॥ 
परकी आणि निजसुत । समान लेखिती जे सत्य । जे सर्वांसी आलिप्त । श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्यांते ॥६९॥ 
आता खडावा काढोनी । मग नाचावे त्वां भजनी । ऐशी आज्ञा सुतालागोनी । केली समर्थे त्या वेळी ॥७०॥ 
तोच उठले कित्येकजण । खडावा घेतल्या काढोन । स्वामीसुताचा अपमान । केला ऐशा प्रकारे ॥७१॥ 
पाहोनिया ऐशी परी । खिन्न झाला सुत अंतरी । काळजात बोचली सुरी । अपमान दुःखे दुखावला ॥७२॥ 
मरणाहुनी परम कठीण । दुःख देतसे अपमान । उतरले सुताचे वदन । निस्तेज झाले सत्वर ॥७३॥ 
तयाते होते जे वैरी । ते आनंदले अंतरी । म्हणती मोडली खोड बरी । अभिमान उतरला ॥७४॥ 
असो मग स्वामीसुत । ते स्थळ सोडोनी त्वरित । नगराबाहेर येत । मार्ग धरीत मुंबईचा ॥७५॥ 
अपमान दुःखे दुखावला । अंतरी बहू खिन्न झाला । परतोनी नाही आला । जन्मभरी अक्कलकोटी ॥७६॥ 
स्वाभिमानी जो नर । त्याचे दुखविता अंतर । ते दुःख जन्मभर । त्याच्या मनी जाचतसे ॥७७॥ 
त्या दुःखे उत्तरोत्तर । क्षीण झाला स्वामीकुमर । दुःख करी दिवसरात्र । चैन नसे क्षणभरी ॥७८॥ 
तोची रोग लागला । शेवटी आजारी पडला । ऐसा समाचार समजला । अक्कलकोटी समर्थाते ॥७९॥ 
स्वामीसुताची जननी । राहातसे त्या स्थानी । तिने हे वर्तमान ऐकोनी । विनवीत समर्थाते ॥८०॥ 
म्हणे कृपा करोनिया । सुतात ए आणावे या ठाया । कृपादृष्टी पाहोनिया । आरोग्य तया करावे ॥८१॥ 
मग समर्थे त्या अवसरी । मुंबईस पाठविले सेवेकरी । म्हणती सुताते सत्वरी । मजसन्निध आणावे ॥८२॥ 
परी सुत त्या सांगाती । आला नाही अक्कलकोटी । अपमान दुःख त्याचे पोटी । रात्रंदिन सलतसे ॥८३॥ 
सेवेकरी परतोनी आले । समर्थांते वृत्त कथिले । आणखी दुसरे पाठविले । त्यांची गती तीच झाली ॥८४॥ 
मग सांगती समर्थ । त्यासी घालोनि पेटीत । घेवोनि यावे त्वरित । कोणी तरी जावोनि ॥८५॥ 
तथापि स्वामीसुत पाही । अक्कलकोटी आला नाही । दिवसेदिवस देही । क्षीण होत चालला ॥८६॥ 
शेवटी बोलले समर्थ । आता जरी न ये सत्य । तरी तोफ भरुनी यथार्थ । ठेविली ती उडवू की ॥८७॥ 
याचा अर्थ स्पष्ट होता । तो समजला स्वामीसुता । परी तो न आला अक्कलकोटा । जीवितपर्वा न केली ॥८८॥ 
आजार वाढला विशेष । श्रावण शुद्ध प्रतिपदेस । केला असे कैलासवास । सर्व लोक हळहळती ॥८९॥ 
त्या समयी मुंबईत । तयांचे जे शिष्य होत । त्यांसी झाले दुःख अमित । शोकसागरी बुडाले ॥९०॥ 
अक्कलकोटी त्या दिनी । समर्थ करिती विचित्र करणी । बैसले स्नान करोनी । परी गंध न लाविती ॥९१॥ 
भोजनाते न उठती । धरणीवरी अंग टाकिती । कोणासंगे न बोलती । रुदन करिती क्षणोक्षणी ॥९२॥ 
इतुक्यामाजी सत्वर । मुंबईहूनी आली तार । श्रुत झाला समाचार । स्वामीसुत गत झाला ॥९३॥ 
उदासिनता त्या दिवशी । आली सर्व नगरासी । चैन न पडे काकूबाईंसी । पुसती समर्था क्षणोक्षणी ॥९४॥ 
मग काकूबाईंने सत्वर । जवळी केले मुंबापूर । तेथे समजला समाचार । परत्र पावला आत्मज ॥९५॥ 
निजपुत्रमरणवार्ता । ऐकुनी करिती आकांता । तो दुःखद समय वर्णिता । दुःख अंतरी होतसे ॥९६॥ 
असो मग काकूबाई । अक्कलकोटी लवलाही । परतोनी आल्या पाही । बोलल्या काय समर्थांते ॥९७॥ 
सुत आपुला भक्त असोन । अकाली पावला का मरण । मग स्मरती जे हे चरण । त्यांचे तारण होय कैसे ॥९८॥ 
समर्थ बोलले तियेसी । उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी । संधी सापडली काळासी । ओढूनी बळेची मग नेला ॥९९॥ 
पुत्रशोके करोन । दुःख करी रात्रंदिन । समर्थ तियेचे समाधान । परोपरी करिताती ॥१००॥ 
नरजन्मा येऊनी सत्य । भक्ती केली एकनिष्ठ । केले जन्माचे सार्थक । परमपदा पावले ॥१०१॥ 
उच्च नीच भगवंती । नसे काही निश्चिती । ज्याची असेल जैसी भक्ती । श्रेष्ठ कनिष्ठ तेणेचि ॥१०२॥ 
धन्य धन्य स्वामीकुमर । उतरला भवौदधि दुस्तर । ख्याती झाली सर्वत्र । कीर्ति अमर राहिली ॥१०३॥ 
स्वामीसुताच्या गादीवर । कोण नेमावा अधिकारी । ऐसा प्रश्न एके अवसरी । पुसती सेवेकरी समर्थाते ॥१०४॥ 
ते कथा रसाळ अत्यंत । वर्णिले पुढील अध्यायात । श्रोते होऊनी सावधचित्त । अवधान द्यावे कथेसी ॥१०५॥ 
जयजय श्रीभक्तपालका । जयजयाजी परम मंगला । विष्णू शंकराची विमला । कीर्ति पसरो सर्वत्र ॥१०६॥ 
इति श्री स्वामीचरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । भाविक भक्त परिसोत । सप्तदशोऽध्याय गोड हा ॥१०७॥ 
श्री भगवच्चरणार्पणमस्तु ॥ श्रीरस्तु ॥ शुभं भवतुं ॥