March 31, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३१ मार्च २०१४


३१ मार्च

स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच.



'आपणच काय ते सर्व करणारे' अशी भावना आपण ठेवतो, आणि पुढे दुःख वाट्याला आले म्हणजे वाईट वाटून घेतो. ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म 'मी' केले असे म्हणण्यात काय पुरूषार्थ आहे ? 'मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो' असे म्हणतो, याचासुद्धा अभिमान आपल्याला होतो. जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात, पण 'मी करतो' हा अभिमान त्यांचाही सुटत नाही. खरोखर, नुसत्या कर्माने परमार्थ साधत नाही; 'कर्ता मी नाही' हे समजले म्हणजे सर्व साधते. नसलेले कर्तेपण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो. ज्याच्याकडे कर्तेपण आहे त्याला ते देऊन आपण सुखदुःखातीत राहावे.
खोलीतल्या खोलीत जो सुख मानून घेतो तो कैदी खरा सुखात असेल असे आपल्याला वाटते. देहाच्या पलीकडे काही नाही असे मानू लागलो आणि विषयातच सुख पाहू लागलो, तर ते त्या कैद्याप्रमाणेच नाही का ? पण त्याच्यापलीकडे काही आहे हे त्याला समजले नाही तोपर्यंतच हे सुख वाटेल. एकदा का बाहेरची हवा कैद्याला लागली म्हणजे तो नाही म्हणणार कैदीपणाच चांगला म्हणून ! त्याचप्रमाणे एकदा भगवंताच्या आनंदाची हवा कैद्याला लागली म्हणजे माणूस नाही विषयात राहणार. चित्त आपल्याला निर्विषय करता येणार नाही, पण ते भगवंताकडे लावता येणार नाही असे नाही. बुजार घोडयाला जसे चुचकारून घेतात, तसे मनाला करावे. वृत्ती जिथे पालटायला लागते तिथे सावध राहावे. भगवंताचे स्मरण चुकले की काही तरी अवघड वाटायला हवे. आज नको वाटणारे नामस्मरण बळजबरीने करावे, म्हणजे हवेसे वाटणारे विषय जातात. प्रापंचिक अडचणीतून जर आपण मार्ग काढतो तर मग परमार्थातल्या अडचणींना का भ्यावे ? जर आज आपल्याला विवेकाने सुखी राहता आले नाही तर आपल्याला सुख कधीच मिळणार नाही. नुसते गिरिकंदरात जाऊन कुठे परमार्थ साधत असतो का ? तसे असते तर तो माकडांनाही साधला असता ! खालच्या प्राण्यांना आपले विकार आवरण्याचा विचार नसतो. पण मनुष्याला चांगलेवाईट कळते, त्याला सारासार विचार करण्याची शक्ती आहे, ही त्याच्यावर भगवंताची कृपाच आहे. जग सुधारण्याच्या नादी आपण लागू नये; त्या कामासाठी लोक जन्माला यावे लागतात. अगदी आपला मुलगा जरी झाला तरी त्याला योग्य ते सांगून पाहावे, पण 'मी त्याला सुधारीनच' हा भ्रम नसावा. स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच.

९१. कर्तव्य म्हणून वकील जसा भांडतो, त्याप्रमाणे कर्तव्य म्हणून
प्रामाणिकपणे आपण प्रपंच करावा. त्यामध्ये भगवंताला विसरू नये.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

March 30, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३० मार्च २०१४

३० मार्च

ज्या घरात शांति । त्या घरात भगवंताची वस्ती ॥




गृहस्थाश्रमासारखा आश्रम । दुसरा नाही खास ॥
नीतिधर्माचे रक्षण । यासाठीच विवाहाचे कारण ॥
ज्या घरात राहते शांति । त्या घरात भगवंताची वस्ती ॥
कृतीवर मनुष्याची परीक्षा । जैसी वासावर पदार्थाची परीक्षा ॥
कोणाचा न करावा घात । ऐसे वागावे जगात ।
आपण आपले करून घ्यावे हित । त्यालाच म्हणतात संभावित ॥
न कधी व्हावे आपण निराश । व्यवहार हात देईल खास ॥
व्यवहारातील करावा प्रयत्‍न । प्रपंचात न पडू द्यावे न्यून ॥
रोगाची भीति । न ठेवावी चित्ती ।
रोगाला उपचार करावे जरी बहुत । तरी कष्टी न होऊ द्यावे चित्त ॥
आप्त इष्ट सखे सज्जन । यांचे राखावे समाधान । परि न व्हावे त्यांचे अधीन ॥
सर्वांशी राहावे प्रेमाने । चित्त दुश्चित न व्हावे कशाने ॥
आपलेपणा ठेवला जेथे । प्रेम लागत असे तेथे ॥
ज्या घरात स्वार्थाचे मान बळावले । तेथे समाधानाचे मान कमी झाले ॥
मन राखता आले । तरच प्रत्येकाला सुख लागले ॥
सुखाने नांदावे नवराबायकोंनी । राम आणावा ध्यानी ॥
दोघांनी रहावे प्रेमाने । सदा वागावे आनंदाने ॥
एकमेकांनी दुसऱ्यास दुःख होईल असे न करावे । काळजी वाटेल असे न वागावे ॥
घरांतील माणूस मार्गाने चुकले । त्यास प्रायश्चित्त हवे खरे ।
पण ते नसावे जन्माचे । तेवढयापुरते असावे साचे ॥
एखाद्याचे हातून करू नये असे कर्म झाले ।
तरी त्याला सुधारण्याच्या मार्गाने सर्वांनी वागावे ॥
आचरण शुद्ध असावे । एकपत्‍नीव्रत सांभाळावे ।
प्राण गेला तरी परद्वार करू नये ॥
कोणतेही व्यसन करू नये । नीच संगत धरू नये ॥
भलते काम करू नये । गृहछिद्र कोणा सांगू नये ।
आपला बोज आपण घालवू नये । विश्वासघात कोणाचा करू नये ॥
परदुःखे हसू नये । देहदुःखे त्रासू नये । केला उपकार बोलूं नये ॥
मुलाबाळांस सांभाळून राहावे । प्रपंचात कधी उदास न व्हावे ॥
प्रेमाने वागावे सर्वांशी । सुख राहे निःस्वार्थापाशी ॥
आईवडिलांची आज्ञा पाळावी । चांगल्यांची संगत धरावी ॥
अभ्यासांत लक्ष ठेवून राहावे । भगवंताचे नामस्मरण करावे ॥
नामापरते न माना दुजे साधन । जैसे पतिव्रतेस प्रमाण ॥
नामापरते न मानावे सत्य । ज्याने राम होईल अंकित ॥
हेच साधुसंतांचे बोल । कोणीही न मानावे फोल ॥

९०. कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांति ॥

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

March 29, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २९ मार्च २०१४

 २९ मार्च

प्रपंचात आपण साक्षित्वाने वागावे.

    

सत्य वस्तू ओळखणे हा परमार्थ, आणि असत्य वस्तूला सत्य मानून चालणे हा प्रपंच होय. आपल्याला वस्तू दिसते ती खरी असेलच असे नाही. पण ती मुळीच नाही असे मात्र नाही; ती काहीतरी आहे. एका दृष्टीने सत्य वस्तू अशी आहे की, प्रत्येकजण जे गुण त्या वस्तूला लावतो ते सर्व गुण तिच्या ठिकाणी आहेतच, शिवाय आणखी कितीतरी गुण तिच्या ठिकाणी आहेत; म्हणून ती निर्गुण आहे. दुसऱ्या दृष्टीने ती अशी आहे की, प्रत्येकजण जो गुण तिला लावतो तो कल्पनेनेच तिच्या ठिकाणी आहे असे आपण म्हणतो; म्हणून ती वस्तू गुणांच्या पलीकडे आहे. या अर्थानेसुद्धा ती निर्गुणच आहे. जशी आपल्या देहाची रचना, तशीच सर्व सृष्टीची रचना आहे. देहामधले पंचकोश सृष्टीमध्ये देखील आहेत. फरक एवढाच की, देहामध्ये ते मूर्त आहेत तर सृष्टीमध्ये ते अमूर्त स्वरूपात आहेत. भगवंताला एकट्याला करमेना म्हणून तो एकाचा अनेक झाला. त्याचा हा गुण माणसाने घेतला. आपण हौसेसाठी आपला व्याप वाढवितो. पण फरक हा की, भगवंताने व्याप वाढविला तरी त्यामध्ये तो साक्षित्वाने राहिला, आणि आपण मात्र व्यापामध्ये सापडलो. भगवंत सुखदुःखाच्या पलीकडे राहिला, आणि आपण मात्र दुःखामध्ये राहिलो. व्यापाच्या म्हणजे परिस्थितीच्या बाहेर जो राहील त्याला दुःख होणार नाही. खरे पाहिले तर व्यापातून वेगळेपणाने राहण्यासाठीच सर्व धडपड आहे. व्याप दुःखदायक न व्हावा असे वाटत असेल तर आपण साक्षित्वाने राहायला शिकले पाहिजे.
आपण जगामध्ये व्याप वाढवितो, तो आनंदासाठी वाढवितो. पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय. म्हणून खरा आनंद कोठे मिळतो ते पाहावे.
जगणे म्हणजे शरीरात चैतन्य असणे होय. चैतन्य हे केवळ सच्चिदानंदात्मक आहे. म्हणून, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत स्वाभाविक आनंद असलाच पाहिजे. हा आनंद आपण भोगावा. ब्रह्मानंद आणि सुषुप्ती यांमध्ये फरक आहे. ब्रह्मानंद हा आहेपणाने आहे, तर सुषुप्तीचा आनंद हा नाहीपणाने आहे. आपल्याला झोप लागली की काय 'जाते' आणि जागे झालो की काय 'येते' हे नित्याचे असूनसुद्धा आपल्याला कळत नाही. भगवंताच्या इच्छेने सर्व होते आणि तोच सर्व करतो अशी भावना ठेवणे यासारखे समाधान नाही. कृतीमध्ये आनंद आहे, फळात किंवा फळाच्या आशेत तो नाही. नामस्मरणरूपी कृती केली असता शाश्वत आनंदाचा सहज लाभ होईल.

८९. भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होतो.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

March 28, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २८ मार्च २०१४

 २८ मार्च

भगवंताची स्मृति आणि कर्तव्याची जागृति.



प्रत्येक मनुष्य बोलताना 'मी' आणि 'माझे' अशा भाषेत बोलत असतो; म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ह्या दोन्ही बाबतींत काही कर्तव्ये असतात. 'माझे' या शब्दात शरीर आणि तत्संबंधी सर्व गोष्टी येतात. आयुष्यात 'मी' चे कर्तव्य परमेश्वरप्राप्ती हे आहे; आणि देहाचे कर्तव्य देहाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दलचे असते. देहाच्या कर्तव्यात धर्म, शास्त्र आणि नीति यांना धरून, संबंधित व्यक्तीशी करण्याच्या आचरणाचा समावेश होतो; म्हणजेच, ज्याच्याशी जसा आपला संबंध असेल त्याप्रमाणे त्याच्या बाबतीत आपले कर्तव्य चोख पार पाडणे. 'कर्तव्य' याचा अर्थ मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ज्या ज्या बाबतीत जे करणे योग्य असेल ते करणे, असा आहे. मनुष्याने 'मी' आणि देह या दोहोंच्या बाबतींतली कर्तव्ये समान चालीने करीत राहिले पाहिजे. 'मी' चे कर्तव्य करीन पण देहाने कसाही वागेन, असे म्हणून चालणार नाही. याचे कारण असे आहे की, समजा, एखादा मनुष्य नोकरी करीत आहे; तो ती नोकरी कशाकरिता करतो याचा विचार केला तर असे दिसते की, ती नोकरी करायला दुसरे कोणी नव्हते म्हणून तो ती नोकरी करीत नसतो, तर त्या नोकरीतून मिळणारा पैसा कुटुंबरक्षणाकरिता उपयोगी पडेल म्हणून तो ती नोकरी करीत असतो. समजा, त्याने नोकरी केली पण मिळणारा पैसा घरात दिला नाही, तर त्या नोकरीचा काही उपयोग नाही. तसे, 'मी' चे कर्तव्य, म्हणजे भगवंताचे अनुसंधान केले, पण देहाचे कर्तव्य, म्हणजे सदाचरण आणि संबंधित व्यक्तीशी असलेली कर्तव्ये न केली, तर नोकरी करून पैसे घरी न दिल्यासारखे होईल. म्हणून प्रत्येक व्यक्तीने भगवंताची स्मृती आणि कर्तव्याची जागृती ठेवावी; आणि या दृष्टीने आपले कुठे चुकते आहे याचा शोध दर वाढदिवसाच्या निमित्ताने घेऊन, प्रत्येकाने आपली उन्नति करून घ्यावी. जेवताना भोवती उदबत्तीचा सुंदर वास आणि तोंडात गोड घास जसा असावा, त्याप्रमाणे आपण बाहेर गोड बोलावे आणि आत भगवंताचे गोड नाम घ्यावे; म्हणजेच, आपण आतबाहेर गोड असावे.
ज्याप्रमाणे एखादा गवई पुष्कळ ताना मारतो, पण शेवटी समेवर येतो, त्याचप्रमाणे भगवंताजवळ लक्ष ठेवून मग आपण काहीही केले तरी हरकत नाही. समेला विसरून मात्र उपयोग नाही. इथे तबला वाजविणारा भगवंतच आहे; म्हणून त्याचा ठेका बरोबर चालतो. ठेक्याप्रमाणे, म्हणजे भगवंताच्या ठेक्याला अनुसरून, म्हणजेच त्याच्या स्मरणात, जो गवई गाईल तो बरोबर मार्गावर राहील आणि शेवटी समेवर येईल.

८८. फळाची अपेक्षा सोडून कर्म करणे याचे नाव कर्तव्य होय.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

March 27, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २७ मार्च २०१४

२७ मार्च

प्रपंचातले सुखदुःख हे केवळ जाणिवेत आहे.



प्रापंचिकाच्या मनात नेहमी एक शंका येते की, खोटे करूनसुद्धा जर सुखी होता येते तर तसे करायला काय हरकत आहे ? सन्मार्गाने गेला तरी माणूस दुःखी का होतो, अशीही शंका आपल्याला येते. मी देवाला भिऊन वागलो, का, तर प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून. देवाची एवढी खटपट करूनही जर सुखी होता येत नाही तर काय उपयोग ? किती विचित्र आहे पाहा, खेळातले घर बांधायला आपण गवंडी बोलावण्यासारखा हा प्रकार आहे ! प्रपंचात दक्षता ठेवणे जरूर आहे; ते जर आपण केले नाही तर देवाने काय करावे ? भगवंताचा 'साधन' म्हणून आपण उपयोग करतो, आणि शेवटी साधनालाच दोष देतो, साध्य बाजूलाच राहते. भगवंत विषय देईल, पण त्याबरोबर त्याचे दुःखही देईल. एकजण मारूतिरायाला सांगून चोरी करीत असे. तो एकदा पकडला गेला आणि त्याला शिक्षाही झाली; तेव्हा तीही मारूतीच्या संमतीनेच झाली असे नाही का ?
'मी कोण' हे जोवर आपण ओळखत नाही तोवर, वैभवाच्या शिखरावर जरी गेलो तरी आपल्याला समाधान मिळणार नाही. ज्याच्यापासून प्रपंच झाला, त्याला ओळखता आले पाहिजे. देहच सत्य नाही तर त्यावर उभारलेली इमारत कुठून सत्य असणार? ठिगळे लावून आपण प्रपंच करतो; मग त्यात कमतरता आल्याशिवाय नाही राहात ! कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे, तसे प्रपंचात सुख मिळवीन हे म्हणणे आहे. सुखदुःख हे जाणिवेत आहे. आपल्याला मिळायचे तेवढेच मिळते, पण आपले हवेनकोपण, म्हणजे आपली वासना गेली की सुखदुःख राहात नाही. वासना मारायला, भगवंताचे अधिष्ठान हाच एक उपाय आहे. वासना ही लाडावलेल्या श्वानाप्रमाणे आहे, त्याला नुसते हड्‌हड्‌ करून ते बाजूला जात नाही. पण तेही बरोबरच आहे, कारण आपणच त्याला लाडावून ठेवले आहे, म्हणून भगवंताच्या पूजेच्या वेळीसुद्धा ते देवघरात येते. बरे, चांगली वासना तेवढीच आत येऊ द्यावी असे म्हणावे, तर तिच्याबरोबर वाईट वासनाही हळूच आत येते. शिवाय, वाईट वासनेमध्ये चांगल्या वासनेला मारण्याचे बळ आहे, कारण आपण स्वतः वाईट वासनेच्या बाजूचेच आहोत ! वासना ही कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून, आपण जर भगवंताजवळ 'वास' ठेवला तरच ती नष्ट होते. 'मी कर्ता नसून परमात्मा कर्ता आहे' अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही; ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही; आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही.

८७. वासना म्हणजे देवाच्या विरूद्ध असलेली आपली इच्छा.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

March 26, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २६ मार्च २०१४

 २६ मार्च

प्रपंचातले विषयसुख हे खरे सुख नाही.



मनुष्य जगात कितीही मोठा असला तरी त्याच्या प्रपंचात काहीतरी न्यून असतेच. न्यूनता नाही असा प्रपंचच नाही. एखादा प्रापंचिक 'माझा प्रपंच पूर्ण आहे ' म्हणून सांगणारा भेटेल, परंतु 'चालले आहे असेच चालावे, यात कमी तर नाही ना कधी पडणार?' अशी त्याला काळजी असतेच; म्हणजे त्याला खरे सुख असे नसतेच. एखादा अत्यंत विषयी, त्याला कदाचित् काळजी नसेल. दारूच्या धुंदीत असणाऱ्याला राजाचीही पर्वा नसते, वस्त्राचीही शुद्ध नसते, आणि तो आपल्याच धुंदीत, आनंदात असतो; पण हे सर्व त्याची धुंदी उतरली नाही तोपर्यंतच. विषयातले सुख परावलंबी, विषयांवर अवलंबून असते. विषय हे नश्वर, आपल्यापासून कधी तरी जाणार; निदान आपल्याला तरी त्यांच्यापासून एक दिवस जावे लागणार. दुसरी गोष्ट म्हणजे, विषयाचे सुख इंद्रियाधीन असते. इंद्रिये विकल झाली म्हणजे सुख कसे मिळणार ? उद्या आपण मरणार हे समजले की कोणते विषय आपल्याला सुख देतील ? सारांश, विषयात सुख नाही. जे सुख होतेसे वाटते ते आपल्यातच असते, आणि ते विषयापासून मिळते अशी आपली फसवणूक मात्र होते.
तर मग सुख कशात आहे ? पुष्कळ वस्तू पुष्कळ मिळाल्या तर पुष्कळ सुख मिळते हा भ्रम आहे. खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे, सनातन सुख होय. ते सनातन वस्तूपाशीच, म्हणजे भगवंतापाशीच असते. आपल्याप्रमाणे पशूंनाही विषयसुख आहे; त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो कोणता ? मी कोण, कशासाठी आलो, असा विचार करणे याला सारासार विचार म्हणतात. प्रपंचातही आपण विचार करतोच; कशात आपला फायदा आहे, कशात आपला तोटा आहे, हे बघतो. पण सर्वच असार, त्यात सार ते कुठुन, कसे येणार ? असलेल्या परिस्थितीत आपण समाधान मानीत नाही. त्याहून अधिक सुखाच्या स्थितीची इच्छा धरतो. देवाची भक्ति करणे, संतांकडे जाणे, हे सुद्धा विषय मिळविण्याकरिता आपण करतो; मग ही आपली सेवा, भक्ति विषयांची झाली का संतांची ? देव, संत, यांचा उपयोग इतर गोष्टींप्रमाणे विषय मिळविण्याचे साधन म्हणून नाही का आपण करीत ? मांजर आडवे गेले की, आपले काम होणार नाही, ही भगवंताची सूचना आहे, असे समजून आपण परततो; पण एक बायको मेली की दुसरी करण्याच्या विचाराला लागतो ! सारांश, आपले ध्येयच विषय हे असते, आणि ते मिळविण्याची आपली खटपट असते. खरोखर, जो मनुष्य प्रपंचातला आपला अनुभव जमेस धरीत नाही, तो कशानेच शहाणा होत नाही.

८६. प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणे होय.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

March 25, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २५ मार्च २०१४

 २५ मार्च

प्रपंच केवळ कर्तव्यकर्म म्हणून करा.



एका माणसाला विडी ओढण्याचे फार व्यसन होते. तो आजारी पडल्यावर त्याने डॉक्टरांना सांगितले, "मला तुम्ही औषध दिले तरी मी विडी सोडणार नाही." त्याचा डॉक्टर फार हुशार होता. त्याने त्याला एक गोळी देऊन, विडी ओढण्यापूर्वी ती तोंडात धरीत जा म्हणून सांगितले. त्या गोळीमुळे विडीच्या तंबाखूचे विष त्याला बाधत नसे. तसे आपण प्रपंच करताना वागले पाहिजे. प्रपंच आम्हांला सुख देईल ही आमची कल्पनाच नाहीशी झाली पाहिजे. म्हणजे प्रपंचाची हावही कमी होईल, आणि नंतर कर्तव्यापुरतेच आम्ही प्रपंचात राहू. जोपर्यंत प्रपंचाकडे आमची दृष्टी आहे तोपर्यंत आम्हाला समाधान कालत्रयीही मिळणे शक्य नाही. प्रारब्धाने प्रपंच आला आहे, तो कर्तव्यकर्म म्हणून करीत जा, पण त्यात सुख मिळणार आहे या कल्पनेने तो करू नका. प्रपंची लोकांचा स्वभाव फार विचित्र आहे; त्यांना खरे सांगितले तर ते आवडत नाही. वास्तविक आपण प्रपंचातले संबंधी लोक कामापुरते एकत्र जमलो आहोत. ज्याप्रमाणे आगगाडीत पुष्कळ प्रवासी एकत्र जमतात, त्याप्रमाणे प्रपंचात आपण एकत्र जमतो. पाचजण मिळून प्रपंच बनतो. त्यामध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो. मग सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे ? नुसता प्रपंच तापदायक नाहीं, आकुंचित प्रपंच तापदायक आहे.
आपले खरे समाधान भगवंताजवळ आहे ही खूणगाठ पक्की बांधून प्रपंचात वागा. ज्याप्रमाणे व्यापारात नफा व्हावा म्हणून व्यापार करतात, तो होत नसेल तर व्यापारात काहीच तथ्य नाही, तसेच प्रपंचात समाधान हा नफा आहे; तो जर मिळत नसेल तर प्रपंचाचा लोभ धरण्यात काय फायदा आहे? "तुझ्या असमाधानाचे कारण नक्की सांग," असे जर आपण एखाद्याला विचारले, तर त्याला खात्रीलायक कारण सांगता येणार नाही. याचा अर्थ असा की, तत्त्वदृष्टया समाधान व्हायला खरोखरीच कशाची जरूरी नाही; पण ही गोष्ट कुणाला पटत नाही. आहे त्या अवस्थेमध्ये आपले समाधान टिकत नाही, आणि पाहिजे ती वस्तू मिळाली तरी आपण पूर्ण सुखी होत नाही. कैदेतल्या माणसाला 'मी सुखी आहे' असे वाटणे कधी शक्य आहे का ? तशी प्रपंची माणसाची अवस्था आहे. खरोखर, प्रपंचात समाधान, आनंद, मिळत नाही हे अगदी सर्वांना कळते; परंतु शहरातले लोक केवळ अभिमानामुळे, आणि खेडयातले लोक अज्ञानामुळे, जसे वागायला पाहिजे तसे वागत नाहीत. या प्रपंचात राहूनसुद्धा भगवंताचे प्रेम आणि समाधान आम्हांला कसे मिळविता येईल, याचा आपण आधी विचार करायला पाहिजे. नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम आपोआप नष्ट होईल, आणि मग देहाने मांडलेल्या प्रपंचावरचेही प्रेम कमी होईल, आणि पुढे त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल.

८५. प्रपंच सुखाचा करणे याचेच नाव परमार्थ होय.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

March 24, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २४ मार्च २०१४

 

२४ मार्च

प्रपंच हा परमार्थाला साधन म्हणून वापरावा.



आपले खरे समाधान भगवंताजवळ आहे, आणि ते मिळण्यासाठी भगवंताचे प्रेम आम्हांला लागणे जरूर आहे. ते प्रेम आपल्याला कसे मिळेल याचा आपण विचार करू. वास्तविक, आईचे तिच्या मुलावरचे प्रेम स्वाभाविक असते, तिला मुलावर प्रेम कर म्हणून शिकविण्याची जरूरी नसते; त्याप्रमाणे भगवंतावर आपले प्रेम असणे जरूर आहे. मनुष्यजन्म हा भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. ईश्वराने एवढी सृष्टी निर्माण केली, पण मनुष्यदेह निर्माण केल्यावर त्याला फार आनंद झाला. त्याला वाटले, खरोखर या योनीमध्ये जन्म घेणाऱ्याला माझे प्रेम मिळविता येऊन मला ओळखता येईल. असे असताना मनुष्यप्राण्याला भगवंताचे प्रेम स्वाभाविक का बरे असू नये ? मनुष्यप्राणी हा नेहमी आनंदासाठी धडपडत असतो; मग या धडपडीतून भगवंताचे प्रेम त्याला का बरे येऊ नये ? मला वाटते, ज्या ध्येयासाठी आपण ते ध्येय ठरविताना आम्ही चुकत असलो पाहिजे खास. आमचे ध्येय असे असले पाहिजे की, त्यातून आम्हांला शाश्वत आनंद मिळविता आला पाहिजे. तो आनंद जर एवढया कष्टाने, मेहनतीनेसुद्धा आम्हांला मिळत नसेल, तर आमचे ध्येयच चुकले असे म्हणायला कोणती अडचण आहे ? तुम्ही सांगा. आज प्रपंच आम्हांला हवासा वाटतो, प्रपंचातल्या नाना तऱ्हेच्या गोष्टी आम्हांला सुख देतील असे वाटत असते, आणि त्या मिळविण्यासाठी आम्ही अहर्निश झटत असतो. वस्तूसाठी चाललेली आमची धडपड ही खरे पाहता त्या वस्तूसाठी नसून, त्यातून मला आनंद मिळेल या कल्पनेने, त्या आनंदासाठी, आम्हांला ती वस्तू हवी असते. त्या वस्तूत मला समाधान मिळेल ही कल्पना नाहीशी व्हायला पाहिजे. आज प्रपंचात मला समाधान मिळेल असे वाटते; ती माझी कल्पना नाहीशी होणे जरूर आहे. ही प्रपंचाची आस जोपर्यंत आहे तोवर भगवंताचे दास आम्हांला होता येणार नाही, आणि शाश्वत समाधान आम्हांला मिळणार नाही. "तूं जगाची आस सोडून दे, मी तुला शाश्वत आनंद देतो, " असे भगवंत आम्हांस सांगत आहे. ही जगाची आस, हे प्रपंचाचे प्रेम, आम्हांला कसे सुटेल ? प्रपंच सोडल्याशिवाय भगवंताचे प्रेम आम्हांला येणारच नाही का ? प्रपंच सोडून देण्याची आज आमची तयारी नाही. तो न सोडता भगवंताचे कसे होता येईल, ह्यासाठी संतांनी मार्ग सांगितला आहे. त्या मार्गाने आम्ही जाणे जरूर आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या या खिशातील पैसे त्या खिशामध्ये ठेवतो, त्याचप्रमाणे प्रपंचातील आपले मन आपण काढून भगवंताकडे लावावे. तसे करण्यात समाधान आहे. भगवंताला अशी प्रार्थना करावी कीं, " देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस. "

८४. दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे, तसे भगवंताचे
अनुसंधान सारखे राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

March 23, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २३ मार्च २०१४

 

२३ मार्च

प्रपंचात भगवंताची नड आहे असे वाटले पाहिजे.



प्रत्येक माणसाला आपण सुखी असावे असे वाटते; भगवंताची कृपा आपल्यावर असावी, नामाचे प्रेम आपल्याला यावे, असे वाटते. पण हा अनुभव आपल्याला का बरे येत नाही ? जगामध्ये पाहताना कुणी मनुष्य सुखी आहे, समाधानी आहे, असे आपल्याला का बरे दिसत नाही ? अशी अवस्था असायला काय कारण असावे ? आपण सर्वजण सदाचाराने वागतो असे आपल्याला वाटते. भगवंताचे भजनपूजन आपण सर्वजण करतो, पण तरी ते समाधान आपल्याला का बरे मिळत नाही ? ते समाधान न मिळायला खरे कारण कोणते असेल तर, आम्हांला अजून भगवंताची नड आहे असे वाटत नाही. भगवंत नसेल तर माझे चालणार नाही, माझ्या समाधानाला त्याची अत्यंत गरज आहे, असे आपल्याला मनापासून वाटतच नाही. प्रपंचात पैसाअडका असावा, बायकोमुले असावीत, शेतीवाडी, नोकरीधंदा, इतर वैभव असावे, आणि त्याचबरोबर भगवंतही असावा, असे आपल्याला वाटते. प्रपंचाची स्थिती कशीही असो, मला भगवंत हवाच, असे आम्हांला तळमळीने मनापासून वाटत नाही. आज, प्रपंचात आम्हांला समाधान मिळेल या आशेने आम्ही प्रपंच करतो, पण इतका प्रपंच करूनही आम्हांला समाधान किती मिळाले याचा तुम्ही विचार करा. अगदी दूर, एका डोंगरावर जाऊन बसा, आणि लहानपणापासून आतापर्यंत केलेल्या खटाटोपात समाधान किती मिळाले याचा आढावा घ्या, आणि निश्चयाने ठरवा की प्रपंचात मला किती सुख मिळाले. आज इतकी वर्षे प्रपंच करूनही तो आम्हांला सुख देत नाही, हे अनुभवाला येऊनसुद्धा तो टाकावा असे आम्हांला वाटत नाही. प्रपंचात आम्हांला सुख मिळेल ही आमची कल्पनाच नाहीशी व्हायला पाहिजे. प्रपंच आम्हांला शाश्वत समाधान देऊ शकत नाही हे एकदा निश्चयाने ठरले, आणि हा निश्चय एकदा दृढ झाला, म्हणजे मग भगवंताची गरज आम्हांला भासू लागेल, आणि मग त्याच्या प्राप्तीसाठी आम्ही केलेल्या प्रयत्‍नाच्या आड जग, परिस्थिती, वगैरे काहीही येऊ शकाणार नाही. भगवंत मला पाहिजेच हे विचाराने ठरल्यावर, त्याचे प्रेम आम्हांला यावे असे आपल्याला वाटू लागेल, आणि त्याचीच आपल्याला आज खरी गरज आहे. हे भगवंताचे प्रेम कशाने बरे निर्माण करता येईल ? भगवंताचे प्रेम यायला एकंदर तीन मार्ग आहेत : पहिला मार्ग म्हणजे संतांची संगती करणे; दुसरा मार्ग म्हणजे सद्विचाराची जोपासना करणे; आणि तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे. त्यांपैकी ज्याला जो जुळेल तो त्याने करावा.

८३. भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

March 22, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २२ मार्च २०१४

 

२२ मार्च

भगवंतास स्मरून प्रपंच केल्यास तो नीटनेटका होईल.



नारदांनी एकदा श्रीकृष्णांना विचारले, " तुम्ही कुठे सापडाल ?" त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, "नारदा, मी वैकुंठात नाही, रखुमाईपाशी सापडेन असेही नाही, तर मी माझ्या भक्तांपाशी सापडेन." भक्त नाही तरी देवाशिवाय कसे राहणार ? देवाला देवपण तरी कुणी आणले ? भक्त जर नाहीत तर देव तरी कुठचे आले ? देव आहे असे जे मानतात त्यांनाच देवाचे अस्तित्व समजते. नास्तिकाला देव कुठला ? त्याला विचारले, "तुझे कोण आहे या जगात ?" तर तो सांगेल, "हे जे सर्व काही आहे, आपले भाऊ, बहीण, बायको, मुले, वगैरे नातेवाईक, तसेच प्रपंचात ज्या काही गोष्टी लागतात, त्या सर्व माझ्या आहेत." परंतु मग देवाघरची वाट काय ? ज्याने जग निर्माण केले त्याला विसरायचे, आणि जे उत्पन्न केले ते माझे म्हणायचे, हा परमार्थ होईल काय ? तेव्हा, 'देव आहे' अशी भावना धरा आणि देवाला दार उघडा, म्हणजे तो सदासर्वकाळ तुमच्या जवळच आहे. भावनेने देव आपलासा केला पाहिजे. आपण कुठेही गेलो तरी आपल्या रामाला बरोबर घेऊन जात जा, म्हणजे तुम्हाला काही भिती नाही. 'रामाला बरोबर नेणे' हे बोलणे लोकांना चमत्कारिक वाटेल, पण ज्यांना देवच नाही असे वाटते त्यांच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही.
जो देवाच्या नादी लागला त्याचा प्रपंच बिघडला असे काहीजण म्हणतात. परंतु ज्याने प्रपंच निर्माण केला, त्याला विसरून तो प्रपंच नीट होईल का ? कधीही होणे शक्य नाही; तर त्याला स्मरूनच प्रपंच केल्याने तो नीटनेटका होईल. प्रपंच सोडून परमार्थ होणार नाही. प्रपंच करा, पण त्यातली आसक्ती सोडा म्हणजे झाले. तुम्हां सर्वांना जडभरताची गोष्ट माहीत आहेच. भरत जरी सर्व घरदार सोडून वनात गेला तरी तिथे हरीणाची आसक्ती धरलीच. तर हरीण काय आणि माणसे काय, आसक्तीच्या दृष्टीने दोन्ही सारखीच. जोपर्यंत आसक्ती सुटत नाही तोपर्यंत परमार्थ करणे व्यर्थ होय. तरी आसक्ती सोडण्याचा प्रयत्‍न करा. आणि माझा राम सदासर्वकाळ माझ्या मागेपुढे आहे ही भावना धरा. एकाने विचारले, "तुम्ही सर्वांना मानसपूजा करायला सांगता, पण एकटा राम सर्वांच्या जवळ कसा जाणार ?" मी त्याला सांगितले, "तू मानसपूजा कर म्हणजे तुझ्याजवळ तो राहील." तो जर सर्व ठिकाणी भरलेला आहे, तर त्याला जाणेयेणे नाहीच. आपण मात्र त्याला पाहणे जरूर आहे. भगवंताचे नामस्मरण हा उंबरठयावरचा दिवा आहे. त्याने भगवंत आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल.

८२. देवावर सर्व सोपवून निश्चिंत होणे हेच अनुसंधान समजावे.


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

March 21, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २१ मार्च २०१४

 

२१ मार्च

माणसाला कितीही मिळाले तरी त्याची हाव कायमच राहते.



जगात दोन प्रकारचे रोग माणसाला नेहमी सतावीत असतात. एक रोग असा की त्याने भूकच लागत नाही. कितीही औषधपाणी करा, काही उपयोग होत नाही. अशा माणसाला पंचपक्वानांचे जेवण तयार असूनही काय फायदा ? तो म्हणतो, 'खायला खूप आहे, परंतु मला भूकच नाही, त्याला काय करू ?' दुसरा रोग असा की, कितीही खाल्ले तरी खाण्याची हाव काही पुरी होत नाही. काहीही खा, त्याचे भस्म होते. तद्वत्‌ आपले आहे. मात्र, आपल्याला एकच रोग नसून दोन्ही रोग आहेत. इतका परमार्थाचा हाट भरला आहे, भजनपूजन चालू आहे, परंतु आपल्याला त्याचे प्रेम नाही. त्याची आवडच वाटत नाही. आपल्याला त्याची खरी भूकच लागलेली नाही. उलटपक्षी, भगवंताने आपल्याला कल्पनेपेक्षा खरोखर कितीतरी जास्त दिले : बायको, मुले, नोकरीधंदा, घरदार, इत्यादि कितीतरी गोष्टी, की ज्यांपासून सुख मिळेल असे आपल्याला वाटते, त्या गोष्टी पुरविल्या; पण अजून आपली हाव या सर्वांना पुरून, या सर्वांचे भस्म करून, कायमच आहे, आणि परमेश्वराचे प्रेम मात्र काही लागत नाही. हे असे किती दिवस चालणार ? आपण नीतिधर्माने चालतो, आपली वागणूक वाईट नाही, हे खरे. पण याचे कारण, वाईट वागलो तर आपल्याला लोक नावे ठेवतील ही भिती. असा हा दिखाऊ चांगुलपणा, ही वरवरची सुधारणा, काय कामाची ? मानवी जीवन सुखी झाले तर ती सुधारणा म्हणायची. उलट आजची स्थिती पाहावी, तर 'सुधारणा' जितक्या जास्त तितका माणूस जास्त असमाधानी झाला आहे. परमेश्वराचे प्रेम लागल्याशिवाय आणि इतर गोष्टींची हाव कमी झाल्याशिवाय काही फायदा नाही. तीर्थयात्रा, पूजा, भजन, ही परमार्थाची नुसती आठवण देतील, पण अंतरंग सुधारेलच असे नाही; आणि अंतरंग सुधारले नाही तर बाकीच्याचा उपयोग नाही. आपण दरवर्षी वारी करतो, आणि जन्मभर वारी करीतच राहणार, परंतु परमेश्वराचे प्रेम मात्र काही लागत नाही. खरोखर, मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही; आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानले की जे आहे ते पुरेल. परमार्थ 'समजून' जो त्याचे आचरण करील त्याला तो लवकर साधेल. अशा माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे कारण उरणार नाही. मनात भगवंताचे प्रेम नसले तरी देहाने म्हणजे बाहेरून त्याची पूजाअर्चा करावी आणि त्याचे नामस्मरण करावे. पहिल्याने स्मरण बळजबरीने करावे लागेल, पण सवयीने ते तोंडात बसेल. याच स्मरणाने पुढे ध्यास लागेल. 'मी पूर्वीचा नाही, आता मी भगवंताचा आहे' असे वाटणे जरूर आहे.

८१. ज्याची हाव, म्हणजे वासना, पुरी झाली नाही तो आशेवर
अवलंबून असतो. या कारणाने त्याला समाधान मिळत नाही.


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

March 20, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २० मार्च २०१४

 

२० मार्च

माझे मीपण हेच दुःखाला कारण.



भीति न बाळगावी चित्ती । रक्षण करणारा आहे रघुपति ॥
भीति न बाळगावी कशाची काही । राम रक्षिता आहे हे हृदयी जाणून राही ॥
सर्वस्वी झाल्यास रामाचे । राम उभा राहिला तेथे । काळजीचे कारण न उरे साचे ॥
राम म्हणावा दाता खरा । न द्यावा भीतिकाळजीला थारा ।
काळजी करू नये । प्रयत्‍न सोडू नये । कोणत्याही कारणाने रामास विसरू नये ॥
म्हणावा प्रपंच रामाचा झाला । मनाने परमात्म्याचे होणे हा उपाय भला ।
तेथे ठाव नाही काळजीला तळमळीला ॥
देहाशी ठेवता माझेमीपण । तेच होते दुःखाचे अधिष्ठान ॥
आजवर जे जे काही केले । ते ते मीपणाने झाले ॥
जे जे मीपणाने केले । ते ते दुःखाला कारण झाले ॥
बाह्य वस्तु जरी मीपणाने सोडली । तरी अभिमानाने वृत्ति बळावली ।
तेथेच घाताला सुरूवात झाली ॥
आग्रह आणि हट्टीपण । हेच अभिमानाचे लक्षण ॥
कर्तेपणाचा अभिमान । हाच दु:खाला कारण जाण ||
प्रपंचाचे दु:ख भोगणे । ते मीपणा असल्याची खूण जाणणे ।
मीमाझेपणाने जोपर्यंत धडपड जाण । तोपर्यंत नाही समाधान ॥
देहबुध्दीचे प्रेम । स्वार्थाला वाढविते जाण ॥
स्वार्थाचे आपलेपण । हेच घाताला कारण ॥
आजवर जो जो प्रयत्‍न झाला । तो तो देहबुध्दी वाढवीतच गेला ॥
देहबुध्दीचा भाव । तो मुळीच दुःखाचा ठाव ॥
जोपर्यंत आपला नाही देहभाव विसरला । तोवर देहदुःखे पस्तावला गेला ॥
म्हणून देहबुद्धी धरून राही । त्याला कोठे सुख नाही ॥
रामाविण अन्य प्रीति । उपजे देहबुध्दीचे संगती ॥
म्हणून मीपणाचे न व्हावे अधीन । जेणे भंगेल आपले समाधान ।
कारण जेथे मीपणाचे ठाणे । तेथे दुःखाचे साम्राज्य असणे ॥
पापपुण्याची भीति । ही देहबुद्धीची संगति ॥
वासनेत जीव गुंतला । कष्टी फार फार झाला ॥
आजवर वासना पोटी धरून राहिला । आपल्या हिताला नागवला ॥
नदी जशी अखंड वाहते । वासना तशी सारखी वाहते ॥
वासना भोगाने कमी होत नाही । त्यागाने नाहीशी होत नाही ॥
आपण देहधारी । देहदु:ख न सोसवे क्षणभरी ॥
ज्याला म्हणावे मी माझे । त्यावर माझी सत्ता न गाजे ॥
माझे इच्छेने माझे मलाच ठेवता येत नाही ।
जगाने माझे इच्छेने वागावे हे म्हणणे खरे नाही ॥
सर्व काही देता येते दान । पण उर्वरित राहतो अभिमान ॥
कर्तेपणाचा अभिमान । हेच भगवंताच्या आड मुख्य जाण ॥
म्हणून माझेमीपण । हेच दु:खाला कारण । रामाचे होण्याने होईल निवारण ॥

८०. सर्व बंधनाचे दु:खाचे कारण । कर्माचा कर्ता मी होणे जाण ॥


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

March 19, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन - १९ मार्च २०१४


१९ मार्च

प्रपंचात परस्परांशी प्रेमभाव कसा वाढेल ?



निसर्गतःच प्रेम हे प्रत्येक व्यक्तीत आणि प्राणिमात्रांत असते. फार काय, प्रेमाशिवाय मनुष्यप्राणी जिवंत राहू शकणार नाही. प्रेमाने सर्व जग वश करून घेता येते. प्रेम ठेवण्यात पैसा खर्च होत नाही, कष्ट होत नाहीत. परंतु प्रत्येकाचा अनुभव पाहावा तर प्रेम करणे तितकेसे सोपे आहे असे दिसत नाही. याचे कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव निराळा, आवड निराळी, आणि दैवयोगाने आलेले ऋणानुबंध निरनिराळे असतात. आपल्या विचाराचे लोक असतील त्यांच्यावर स्वाभाविकच प्रेमच जडते; विरूद्ध असतील त्यांच्याबद्दल प्रेम वाटत नाही, किंबहुना द्वेषही उत्पन्न होतो. द्वेष उत्पन्न का होतो तर आपला आणि दुसऱ्याचा विचार आणि आवड जमत नाही म्हणून. परंतु थोडा विचार केला तर असे दिसते की, आपण ज्या कारणामुळे दुसऱ्याचा द्वेष करतो, तेच कारण दुसऱ्याने आपला द्वेष करायला पुरेसे होते. उदाहरणार्थ, एखादी गोष्ट आपल्याला न आवडली आणि तीच दुसऱ्याला आवडली, तर मला न आवडलेली गोष्ट दुसऱ्याला आवडल्यामुळे दुसऱ्याचा द्वेष करायला मला तेवढे कारण पुरेसे होते. मग त्याच न्यायाने, त्याला न आवडलेली गोष्ट मला आवडते हेच कारण त्याने माझा द्वेष करायला पुरेसे नाही का? 'व्यक्ती तितक्या प्रकृती' अशी म्हण आहे. त्याचा अर्थच असा की, स्वभावाप्रमाणे प्रत्येकाची आवड ही निराळी असणारच. म्हणून द्वेषबुद्धी नाहीशी करण्याकरिता प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी सवलत ठेवणे जरूर आहे; आणि प्रेम जडण्याकरिता, सर्वांना आवडणारी जी गोष्ट असेल तिकडे लक्ष देणे जरूर आहे. प्रेम करण्याचा धडा गिरवताना सुरूवात आपल्या घरापासून करावी; घरातली माणसे, नंतर शेजारी, आणि त्यानंतर आजूबाजूला, आपलेपणाची भावना आपल्या कृतीने वाढवावी; म्हणजे क्रमाक्रमाने प्रेमाची वाढ होऊन सर्व वातावरण प्रेममय होऊन जाईल. सर्वांशी निष्कपट प्रेमाने वागावे; आपल्या बोलण्यामध्ये, नव्हे, पाहण्यामध्येसुद्धा प्रेम असावे. आपले बोलणे अगदी गोड असावे. आपल्या अंगी सहजता यावी. घरामध्ये 'अमुक एक गोष्ट कराच' किंवा 'नकाच करू' असे हट्टाने न म्हणता आपण राहावे. जसे घडेल तसे घडू द्यावे. देह असा प्रारब्धावर टाकणे मला फार आवडते.
प्रेम करायला गरिबी आड येत नाही, किंवा श्रीमंती असेल तर फार द्यावे लागत नाही. जसे आई आणि मुलाचे प्रेम असते तसे भगवंताचे प्रेम लागावे. ज्याला भगवंताचे प्रेम येईल, तो सृष्टीकडे कौतुकाने पाहील. भगवंताचे प्रेम हे कोणत्याही साधनाचा प्राण आहे; ते मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी, आणि त्याच्या अनुसंधानात राहण्याचा प्रयत्‍न ठेवावा.

७९. घरामध्ये काय किंवा बाहेर काय, प्रेमाचा धाक असावा, भीतीचा असू नये.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

March 18, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १८ मार्च २०१४

 

१८ मार्च

प्रपंचात भगवंताचे अनुसंधान ठेवा.



तुम्ही इथे इतकेजण जमला आहात, त्यांपैकी कुणीही मला सांगावे की, आपली सर्व धडपड कशाकरिता असते ? प्रत्येकजण सुखासाठी खटपट करीत असतो. प्रपंचात सुख मिळावे असे सर्वांना वाटत असते, आणि त्याकरिता जो तो प्रयत्‍न करीत असतो. परंतु आजपर्यंत प्रपंचात कुणाला सुख मिळाले आहे ? ज्याला मिळाले असेल त्याने तसे सांगावे. कुणी म्हणतो, मजजवळ संपत्ती आहे, पण संतान नाही; कुणी दारिद्र्य आहे म्हणून रडतो; कुणी काही, कुणी काही, सांगतच असतो, आणि म्हणतो की, माझी इच्छा पूर्ण झाल्यावर मी सुखी होईन. पण ती इच्छा तृप्त झाल्यावर दुसरी तयारच असते. म्हणजेच, आपली हाव कधीच तृप्त होणे शक्य नाही. मृगजळ पिऊन कुणी कधी तृप्त झाला आहे का ? प्रपंचच जिथे खोटा तिथे सुख कसले मागता ? याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा; पण तो सुखाचा कसा होईल हे पाहात जावे. मी तुम्हांला खात्रीने सांगतो की, प्रपंच जर सुखाचा करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे. तो अगदी सोपा आहे, पण आचरणात आणायला अत्यंत कठीण आहे; ते परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय साधायचे नाही. याकरिता रामाला अनन्यभावे शरण जावे म्हणजे त्याची कृपा होईल. त्याच्या कृपेला तुम्ही देहबुद्धीचा बंधारा घालू नका. सर्व विसरून भगवंताला आळवावे. भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असे म्हणावे. ती काम करीतच असते, आपण आपल्या शंकेने ती झाकून टाकू नये. आपण भगवंताला म्हणावे, 'भगवंता, मी सर्वस्वी तुझा आहे. माझा प्रपंच हा तुझाच आहे. तुझी भक्ती कशी करावी हे मला माहीत नाही. तू मला मार्ग दाखव. तू जे करशील त्यात मी सामील होईन.' अशी अगदी मनापासून प्रार्थना करावी. मग तो ठेवील त्या परिस्थितीमध्ये आपण अगदी आनंदात राहावे.
तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता, पण रिकामे परत जाता हे पाहून मला वाईट वाटते. माझ्याजवळ जे आहे ते तुम्हांला व्यावहारिक जगात कुठेही मिळायचे नाही. ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम होय. जे संतांनी सांगितले आहे तेच मी सांगतो; ते सत्य आहे असे मनापासून समजा, खरोखर राम तुम्हांला सुखी करील. तुम्हांला माझा आशिर्वाद आहे की तुम्हांला भगवंताचे प्रेम खात्रीने लाभेल.

७८. सुखाने प्रपंच करा, पण त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

March 17, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १७ मार्च २०१४

 

१७ मार्च

काळजी आपल्याला भगवंतापासून दूर करते.



सत्त्वगुणात भगवंत असतो; तेव्हा त्या मार्गाने आपण जावे. सर्व कर्मे चांगल्या प्रकारे केली तरी ती भगवंतार्पण बुद्धीने करावी. व्यवहार सोडू नये, प्रयत्‍नही कसून करावा; परंतु त्याबरोबर मन भगवंताकडे कसे लागेल इकडे लक्ष द्यावे. आपण प्रपंचाची जितकी काळजी घेतो, तितकी जरी देवाची घेतली तरी खूप होईल. आपण किती परस्वाधीन आहोत हे आजारी पडलो म्हणजे समजते. तेव्हा आपल्या हातात किती सत्ता आहे हे ओळखून राहावे. काळजी न करतादेखील प्रयत्‍न
होणार नाही असे नाही. उलट, प्रयत्‍न दुप्पट करावेत; पण जे फळ येईल ते भगवंताच्या इच्छेने आले या भावनेने समाधान मानायला पहिल्यांदा आपण शिकावे. आपण स्वतःबद्दल काळजी करतो याचे कारण असे की, आपण आपल्यापेक्षा जास्त दुःखी असलेल्या माणसाकडे पाहात नाही. एक म्हणतो की, मला लोकांच्या 'देण्याची' काळजी आहे; दुसरा म्हणतो की, मला लोकांकडून माझे येणे 'येण्याची' काळजी आहे; तर तिसरा म्हणतो की, मला माझ्या मुलाबाळांची काळजी आहे. पण काळजीच्या या सर्व घोटाळयामध्ये आपली स्वतःची काळजी कुणालाच नाही. मागल्या आठवणींनी आणि उद्याच्या भीतीने आपण काळजी करीत बसतो. ही काळजी आपल्याला भगवंतापासून दूर करते. उद्याच्या काळजीने आजची भाकरी आपल्याला गोड लागत नाही याला काय करावे ? यावर रामबाण असा एकच उपाय आहे; तो म्हणजे, आजपासून काळजी करण्याचे अजिबात सोडून देऊन तेवढा वेळ भगवंताच्या नामस्मरणात घालविणे.
एका माणसाने माझ्यापाशी तक्रार केली की, "काय करावे, हा माझा मुलगा कशाचीच काळजी करीत नाही, नुसता हसतखेळत दिवस घालवितो; पुढे याचे कसे व्हायचे ?" मी म्हटले, "तुमचे म्हणणे वरवर खरे दिसते; पण वास्तविक पाहता ते खरे नाही. तुम्ही आजपर्यंत इतकी काळजी करून काय मिळविले? शारीरिक आणि मानसिक त्रास भोगला, आणि भगवंताला विसरला, इतकेच ना ? मग तेच तुमच्या मुलाला का शिकविता ? त्याने आपले कर्तव्य जरूर करावे आणि आनंदात राहावे; पण काळजी करू नये असेच मी त्याला सांगेन." तुम्ही प्रपंचाची काळजी करता तोपर्यंत देवाची सेवा करता असे कसे म्हणावे ? 'असले तर असू दे आणि नसले तर नसू दे,' अशा मनाच्या अवस्थेत जो राहील त्यालाच काळजी सुटेल.

७७. ज्याने भगवंत आपलासा करून घेतला त्याला काळजी नाही.


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

March 16, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १६ मार्च २०१४

 

१६ मार्च

प्रपंचातील आसक्‍ति कमी कशी होईल ?



आज आमची स्थिती कशी झाली आहे पाहा; प्रपंच आम्हाला सुटत नाही; भगवंताचे प्रेम आम्हाला पाहिजे; या प्रपंचावरचे प्रेम न सोडता आम्हाला भगवंताचे समाधान लाभावे अशी आमची इच्छा आहे. खरोखर, प्रपंचातले आमचे हे प्रेम व्यभिचारी आहे. प्रेम ही वस्तू अशी आहे, की ती एकाच ठिकाणी ठेवता येईल. एका म्यानात ज्याप्रमाणे दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे आमचे प्रेम आम्हाला दोन ठिकाणी ठेवता येणार नाही. आमचे खरे सुख एका भगवंताजवळच आहे; आणि ते मिळविण्यासाठी आम्ही प्रपंच सोडायलाच पाहिजे असे नाही. प्रपंचात आम्हाला वाटणारी आसक्ती ही मुख्यतः नाहीशी झाली पाहिजे. शास्त्रातसुद्धा हेच सांगितले आहे. शास्त्र हे अनुभवाचे बनले आहे. आमचा अनुभव आम्ही शास्त्राबरोबर पडताळून पाहात नाही. प्रपंचाची खरी किंमत आम्हाला कळल्याशिवाय त्याच्याबद्दल वाटणारी आमची आसक्ती कमी होणार नाही. आज प्रपंचात सुख नाही हे अनुभवाला येऊनही त्याची आसक्ती आम्हाला सुटत नाही. ती आसक्ती सुटायला काय मार्ग आहे तो आम्ही पाहणे अगदी जरूर आहे. प्रपंचाची आम्हाला गरज किती आहे? एखादा मनुष्य फिरायला जाताना हातात काठी घेतो. त्याला हातात काठी घेणे हे भूषण आहे असे कोणी म्हणत नाही. त्याप्रमाणे भगवंताकडे जायला प्रपंचाची आम्हाला आधारापुरतीच गरज आहे. हा प्रपंच करीत असताना त्याची आसक्ती कमी होऊन भगवंताचे प्रेम येण्यासाठी, शास्त्रांनी घालून दिलेली बंधने आम्ही पाळली पाहिजेत, आणि त्यासाठी आपले आचारविचार आणि उच्चार आम्ही सांभाळणे जरूर आहे. आपण आपल्या संस्कारांप्रमाणे वागलो तर निवृत्तिमध्येच जाऊ; कारण आपली प्रवृत्ती ही सर्व निवृत्तिपरच आहे यात संशय नाही. आता यापुढे आपण रामाच्या नावाने प्रपंचाचा धंदा करू या, म्हणजे नफातोटा त्याचाच होईल.
प्रपंचात सदाचाराने वागावे. सदाचार हा मूळ पाया आहे. नीतिधर्माचे आचरण असावे. नीतिधर्माची बंधने ही आमचे विकार आवरण्यासाठीच आहेत. विचाराने अत्यंत पवित्र असावे. कोणाचा द्वेष, मत्सर करू नये, आणि दुसऱ्याचे अहित चिंतू नये. उच्चार तर फार सांभाळले पाहिजेत. नेहमी सर्वांशी गोड बोलावे. ज्या जिभेने आपण भगवंताचे नाम घेतो, त्या जिभेने दुसऱ्याचे अंतःकरण कधीही न दुखावेल याची खबरदारी घ्या. अंतःकरण दुखवीत असताना त्याच्या ठिकाणी वास करीत असलेल्या भगवंतालाच आपण दुखवीत असतो हे ध्यानात धरा.

७६. प्रपंचातले आपले मन आपण काढून भगवंताकडे लावावे. तसे करण्यात समाधान आहे.


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

March 15, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १५ मार्च २०१४

 

१५ मार्च

उपाधीरहित 'मी' म्हणजेच भगवंत.



ब्रह्माचे निरूपण सांगता येण्यासारखे नसते. साखर खाल्ल्याशिवाय तिची गोडी कळत नाही, काही मर्यादेपर्यंत शब्दांनी सांगता येते. खोटयावरून खऱ्याची परीक्षा करता येते, तसे माया ज्याला कळली त्याने ब्रह्म जाणले म्हणून समजावे. पण मी मायारूपच जर झालो तर ती कशी ओळखावी बरे? सत्यावर छाया पडली तीच माया झाली. वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया. तेव्हा मायेच्या तावडीत सापडल्यावर, सत्य आणि परमात्मस्वरूप असणारे ब्रह्म जाणणे कसे शक्य होणार ? जी जगतेमरते ती माया. म्हणजे माया ही नासणारी आहे, भंगणारी आहे. शाश्वत आनंदापासून जी मला दूर करते ती माया. म्हणूनच, ज्याने शाश्वत सुख मिळते, जे मायेच्या पकडीतून सुटण्याचा मार्ग दाखविते, तेच खरे तत्त्वज्ञान होय. एक भगवंत फक्त सत्यस्वरूप आहे; त्याच्यासाठी जे जे करणे ते सत्य होय. 'मी देवाचा आहे' हे कळणे याचे नाव आत्मनिवेदन होय. आत्मनिवेदन म्हणजे देवाला ओळखणेच होय; म्हणजेच मायेला दूर सारणे. वास्तविक, उपाधिरहित जो 'मी' तोच भगवंत आहे. उपाधिरहित राहणे म्हणजे भगवदरूप होणे. किनाऱ्यावरून पाण्याकडे जात असताना अशी एक जागा येते की, तिथे वाळू संपते आणि पाणी सुरू होते. म्हणजे त्या रेषेच्या अलीकडे वाळू आणि पलीकडे पाणी असते, ही मधली स्थिती म्हणजे तुर्यावस्था होय. इथे 'मी ब्रह्म आहे' अशी जाणीव राहते.
निर्गुण परमात्मा आणि ही सगळी सृष्टी यांना जोडणारी सांखळी असेल तर तो ॐकार होय. म्हणून, परमार्थामध्ये कोणत्याही साधनाने जडाचा निरास करता करता शेवटी ॐकारापर्यंत येऊन थांबावे लागेल; म्हणजे प्रत्येकाला नामाशीच यावे लागेल. दहा माणसे उभी केली, त्यांतली नऊ 'ही नव्हेत' म्हणून बाजूला सारली, दहावा राहिला तोच खरा. त्याप्रमाणे 'हे नाही, ते नाही' झाल्यावर जे शेवटी उरले ते ब्रह्मच होय. भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात, "तू ज्ञानी असशील तर समाधानात राहा, पण तू तसा नसशील तर मग उगीच ज्ञानाच्या गोष्टी सांगू नकोस; आणि कोणाचे तरी, म्हणजे अर्थात्‌ ज्ञानी माणसाचे, ऐक आणि त्याप्रमाणे वाग." याचा साधा अर्थ असा की, आपण संतांना शरण गेले पाहिजे. सर्व सृष्टीच्या दृष्टीने आपण आणि आपला प्रयत्‍न कःपदार्थ आहे; म्हणजे खऱ्या अर्थाने आपण निमित्तमात्र आहोत. म्हणून आपल्या वाट्याला येणारी चांगली अगर वाईट कर्मे ही ईश्वराचे मनोगत आहे असे समजावे.

७५. वेदांत हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

March 14, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १४ मार्च २०१४

 १४ मार्च

प्रपंचातले आपलेपण भगवंताकडे वळवा.



प्रेम हे सर्वांना उपजतच येत असते. हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, यांच्यावर प्रेम कसे करावे हे कुणी शिकवावे लागत नाही. एकदा आपले मानले की प्रेम आपोआप निर्माण होते. पण हे प्रेमसुद्धा खरे बघितले तर स्वार्थी आहे. मुलगा ऐकत नाही, तो वाटेल तसे वागतो, अशी आपण तक्रार करतो. त्याच्यावर जर आपले खरे प्रेम असेल तर आपण तशी तक्रार करणार नाही, परंतु त्याच्यामागे 'हा माझे ऐकत नाही' हा अहंकार, स्वार्थ आहे. एक गृहस्थ मला भेटले , त्यांना मी विचारले, "झाले का मुलाचे लग्न?" ते म्हणाले, "नाही, उद्या आहे." "मुलगा चांगला वागतो का ?" असे मी विचारल्यावर ते म्हणाले , "आत्ताच नाही सांगत, सहा महिन्यांनी सांगेन." स्वार्थाचे प्रेम इतके अशाश्वत आहे. मला सांगा, अशा स्वार्थाच्या प्रेमापासून सुख कसे लाभेल ? प्रपंचात आपण केवळ कर्तव्यबुद्धीने वागावे; मग "मुलगा माझे ऐकत नाही" हा प्रश्नच उदभवणार नाही.
खरोखर, प्रपंच हा एखाद्या प्रयोगशाळेसारखा आहे. कॉलेजचे शिक्षण पुरे करण्यासाठी काही महिने तिथे शिकावे लागते असे म्हणतात. त्या प्रयोगशाळेतून काही उत्पादन काढण्याचा उद्देश नसतो, फक्त मुलांना शिकविण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तिथे सर्व काही शिकून घ्यायचे असते; ते किती उपयोगी पडेल, त्यापासून किती फायदा होईल, याची अपेक्षा ठेवायची नसते. त्याप्रमाणे, प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा समजावी.
आजपर्यंतचा आपला अनुभव पाहिला तर आपण 'केले' असे थोडेच असते. म्हणून, परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपण आपले कर्तव्य तेवढे योग्य रीतीने करावे, आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नये. प्रत्येक गोष्ट घडायला योग्य वेळकाळ यायला लागतो. तेव्हा कर्तव्यबुद्धीने वागून काय ते करा, आणि 'भगवंता, हा प्रपंच तुझ्या इच्छेने चालला आहे' असे म्हणा, म्हणजे आपोआप भगवंताचे प्रेम लागेल. प्रपंचातले जे आपलेपण आहे ते भगवंताकडे वळवा. घरातल्या मंडळींवर निःस्वार्थबुद्धीने प्रेम करायला शिका, म्हणजे परमार्थ आपोआप साधेल, आणि आपलेपणा भगवंताकडे वळविल्यामुळे भगवंतावर प्रेम जडेल; याकरिता काही वेगळे करणे नको. हा आपलेपणा निर्माण होण्यासाठी, भगवंतावाचून आपले नडते ही भावना झाली पाहिजे. याकरिता आपण त्याच्या अखंड सहवासात राहण्याचा प्रयत्‍न केला पाहिजे. त्याच्या नामस्मरणानेच ही गोष्ट सहज शक्य आहे.

७४. वाचलेले विसरेल, पाहिलेले विसरेल, कृती केलेली विसरेल,
पण अंतःकरणात घट्ट धरलेले नाम कधी विसरायचे नाही.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

March 13, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १३ मार्च २०१४

 

१३ मार्च

परमात्म्यावर पूर्ण निष्ठा पाहिजे.



आईकरिता रडत असलेले मूल आई भेटल्याशिवाय रडणे थांबवत नाही, त्याप्रमाणे, समाधानाकरिता, आनंदाकरिता, धडपडणारा आपला जीव, परमेश्वर प्राप्त झाल्याशिवाय शांत राहू शकत नाही. म्हणून प्रपंचाची काळजी न करता, परमेश्वराची प्राप्ती कशी होईल याची काळजी करा. भगवंतावर संपूर्णपणे निष्ठा ठेवल्याशिवाय आपली प्रपंचाची काळजी दूर होणार नाही. सर्व जगताचा जो पालनकर्ता, तो आपले पालन नाही का करणार ? प्रत्येक गोष्ट त्याच्याच सत्तेने होते हे लक्षात ठेवा, मग प्रपंच कधीही बाधक होणार नाही. एक भगवंतावरची निष्ठा मात्र शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळा. आपण पुराणात वाचलेच आहे की, भीष्माने पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा केली. भीष्मप्रतिज्ञाच ती, मग ती खोटी कशी होऊ शकेल ? सर्व पांडव चिंताग्रस्त झाले, पण द्रौपदीची निष्ठा मात्र जबरदस्त होती. ती म्हणाली, "आपण श्रीकृष्णाला विचारू." तिने सर्व वृत्तांत त्याला कथन केला. श्रीकृष्ण म्हणाला, "द्रौपदी, तू आता असे कर, रात्री भीष्माचार्यांच्या आश्रमात जा. तिथे फक्त संन्याशांना आणि स्त्रियांना मुभा आहे. मी तुझ्याबरोबर आश्रमापर्यंत येतो." त्यानंतर श्रीकृष्ण द्रौपदीला घेऊन भीष्माचार्यांच्या आश्रमापर्यंत गेले आणि बाहेरच तिचे अलंकार आणि इतर वस्तू सांभाळत बसले. श्रीकृष्णांनी तिला आत जाताना सांगितले की, "भीष्माचार्य आता झोपत आहेत अशा वेळी तू आत जा आणि बांगडया वाजवून नमस्कार कर." त्याप्रमाणे द्रौपदी आत गेली, आणि बांगडया वाजवून नमस्कार केला." त्यांनी लगेच तिला "अखंड सौभाग्यवती भव" म्हणून आशीर्वाद दिला. मग त्यांनी पाहिले तो द्रौपदी. तेव्हा ते म्हणाले, "द्रौपदी, ही अक्कल तुझी खचित नव्हे; तुझ्याबरोबर कोण आहे ते सांग." ती म्हणाली, "माझ्याबरोबर गडी आणला आहे; तो बाहेर उभा आहे." भीष्माचार्यांनी बाहेर येऊन पाहिले. त्यांनी श्रीकृष्णाला ओळखले, परंतु आता सर्व काम होऊन चुकले होते. म्हणून म्हणतो, परमात्म्यावर पूर्ण निष्ठा पाहिजे. या निष्ठेच्या आड जर काही येत असेल तर तो म्हणजे आपला अभिमान. हा अभिमान सर्वांना घातक आहे. तो घालवण्यासाठीच परमात्म्याला वारंवार अवतार घेणे भाग पडले. ही अभिमानाची हरळी नाहीशी व्हायला भगवंताच्या नामासारखा दुसरा उपाय नाही. नामावर प्रल्हादाने जशी निष्ठा ठेवली तशी ठेवावी. त्याने नाम श्रद्धेने घेतले आणि निर्विषय होण्याकरिता घेतले, आपण ते विषयासाठी घेऊ नये. नामापरते दुसरे सत्य नाही हे समजावे. याच जन्मात हे नाम शांतीचा आणि समाधानाचा ठेवा मिळवून देईल.

७३. नामस्मरणात स्त्रीपुरूष, श्रीमंतगरीब, हे भेद नाहीत. फक्त ते श्रद्धेने घेणे जरूर आहे.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

March 12, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १२ मार्च २०१४


 १२ मार्च

प्रपंचात 'राम कर्ता' ही भावना ठेवावी.



परमात्मा आनंदरूप आहे. भगवंताचा आनंद हा उपाधिरहित आहे. भगवंताच्या हास्यमुखाचे ध्यान करावे. प्रत्येक गोष्टीत मनुष्य आनंद पाहात असतो. उकाड्यात वारा आला, त्याला वाटते बरे झाले; पाऊस आला की त्याला वाटते, आता गारवा येईल. कोणत्याही तऱ्हेने काय, मनुष्य आनंद साठवू पाहात असतो. मनुष्याला भूक लागेल तेव्हा जर अन्न खाईल तर त्याचे पोट भरेल आणि त्यापासून त्याला आनंद होईल; परंतु त्याने विष खाल्ले तर त्याने आनंद न होता मरण मात्र येईल. तसे आपले होते. आपण विषयातून आनंद घेऊ पाहतो, आणि तो बाधक होतो. एखाद्या रोग्याला जर जंत झाले आणि त्याला जर खूप खायला घातले, तर ते शरीराला पोषक न होता, जंतच वाढतात; त्याचप्रमाणे आपण सत्कर्मे करताना पोटात विषयांचे प्रेम ठेवून ती केली, तर त्यामुळे विषयच पोसले जाऊन, त्यांपासून समाधान लाभू शकत नाही. याकरिता कर्तव्यबुद्धीने कर्म करावे, म्हणजे ते बाधक ठरत नाही.
मनुष्य जन्मभर जो धंदा करतो त्याच्याशीच तो तद्रूप होऊन जातो. एखादा वकील घ्या, तो त्याच्या धंद्याशी इतका तद्रूप होतो की मरतेवेळीसुद्धा तो वादच करीत जाईल. नोकरी करणारा नोकरीशी इतका तद्रूप होतो की, स्वप्नात देखील तो स्वतःला नोकर समजूनच राहतो. कर्म कसे करावे, तर त्याच्यातून वेगळे राहून. लग्नाचा सोहळा भोगावा, लाडू खावेत, परंतु ते दुसऱ्याचे आहेत असे समजून. आपल्या मुलीचे किंवा मुलाचे नाहीत असे मानून; नाही तर व्याह्यांची काळजी लागायची, किंवा हुंडा मिळतो की नाही इकडे लक्ष लागायचे. त्यामुळे तापच निर्माण होईल. कर्माशिवाय कोणालाच राहता येत नाही. एखाद्याला शिक्षा द्यायची म्हणून, 'अगदी हलायचे नाही, पापणी, हात, पाय, काहीही हलवता कामा नये,' असे सांगितले तर ते जसे त्याला शक्य होणार नाही, तसे काही ना काही तरी कर्म हे होणारच. भगवंतांनी अशी काही सांगड घालून दिली आहे की कर्म केल्याशिवाय गत्यंतरच नाही. परंतु ती कर्मे ' राम कर्ता ' ही भावना विसरून केली तर बाधक होतात, आणि मरणापर्यंत माणूस पुढल्या जन्माची तयारी करीत राहतो; तेव्हा, देहाने कर्म करतानाही ' कर्ता मी नव्हे ' हे जाणून कर्म करावे. आपल्याला कर्म केल्याशिवाय करमत नाही. पण आपण फळाची आशा उगीचच करीत असतो. आपण फळाची आशा सोडून कर्म करू लागलो, की ते कर्म करीत असतानाच समाधान प्राप्त होते.

७२. प्रपंचात सर्वांकरिता सर्व करावे , पण मनात मात्र 'मी रामाचा आहे'
ही अखंड आठवण ठेवावी, म्हणजेच त्याच्या नामात राहावे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

March 11, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ११ मार्च २०१४

 ११ मार्च

अहंपणा टाकल्यास प्रपंचातील लाभहानी झेलता येईल.



प्रपंच हा परमेश्वरप्राप्तीच्या आड कधीही येऊ शकत नाही. आपण पाहतोच की प्रपंचात आपला कितीतरी लोकांशी निरनिराळया स्वरूपांत संबंध येतो. आईवडील, बायकोमुले, बहीणभाऊ, इतर सगेसोयरे, मित्र आणि इतर जन, या सर्वांचा उत्तम उपयोग करायचा असेल तर या सर्वांशी व्यवहार करताना आपण आपली सर्व कर्मे एका हरिस्मरणाच्या धाग्यात जोडून करावीत, म्हणजे सर्वांशी संबंध सलोख्याचे राहून प्रपंच फारच सुखकर होईल; निदान तो तापदायक तरी खचित होणार नाही. या सर्वांशी संबंध बिघडायला आपला अभिमान, अहंपणा, विशेषकरून कारणीभूत होत असतो. हा अभिमान श्रीमंतालाच असतो असे नव्हे तर गरिबालाही तो सोडत नाही. आपण पुराणात वाचले आहेच की, हिरण्यकश्यपूला जेव्हा भगवंतांनी मांडीवर घेऊन पोट फाडायला सुरूवात केली, तेव्हा त्याचा हात अभिमानाने तलवारीकडे गेला, प्रत्यक्ष भगवंत समोर असूनही त्याने काही हात जोडले नाहीत. केवढा हा अभिमानाचा जोर. गरीब लोकसुद्धा या अभिमानाच्या आहारी किती गेलेले असतात. एकदा एक भिकारी एकाच्या दाराशी येऊन भिक्षा मागू लागला, तेव्हा तो गृहस्थ त्या भिकाऱ्याला म्हणाला, 'अरे. तुला काही काळवेळ समजते की नाही ?' त्यावर तो भिकारी म्हणाला, 'जा जा. मला काही तुमचे एकटयाचेच घर नाही, गावात अशी शंभर घरे आहेत.' पाहा, अभिमानाचे तण किती खोल गेलेले असते. अभिमान हा शेतात उगवणाऱ्या हरळीसारखा आहे. ही हरळी समूळ नाहीशी केल्याशिवाय चांगले पीक हाती लागत नाही, त्याप्रमाणे, अभिमान संपूर्णपणे नाहीसा झाल्याशिवाय परमेश्वरी कृपेचे पीक येणे शक्य नाही. फणस चिरताना एक काळजी घ्यावी लागते; हाताला तेल लावून तो कापावा लागतो आणि त्यातले गरे काढावे लागतात, म्हणजे हाताला चिकाचा त्रास न होता गरे चटकन्‌ निघतात. त्याप्रमाणे, नाम घेऊन प्रपंचात व्यवहार केला, तर अभिमानाचा किंवा विषयवासनांचा चीक न लागता परमेश्वरी कृपेचे गरे हस्तगत करता येतात. हा अहंपणा, हा देहाभिमान टाकला तर प्रपंचातली लाभहानी हसतखेळत झेलता येईल. लहान मुले पावसाळयात कागदाच्या लहान लहान होडया करून पाण्यात सोडतात, त्यांतली होडी तरली तरी हसतात, बुडाली तरी हसतात; त्याप्रमाणे प्रपंचातली सुखदुःखे हसतखेळत झेलावीत; आणि हे एका नामानेच साधते.

७१. नामस्मरण म्हणजे 'तू आहेस, मी नाही' ही स्थिती होय.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

March 10, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १० मार्च २०१४

 

१० मार्च

प्रपंचात स्त्रीने कसे वागावे ?  


पतिसेवा हाच आपला धर्म । प्रपंचाचे कर्तव्य हेच आपले सत्कर्म ।
अंतरी समाधान हेच आपले साधन ॥
सर्वांनी राहावे सुखी । रामनाम नित्य घ्यावे मुखी ॥
सर्व सुखाचा लाभ । घरबसल्या मिळतो देव ॥
कर्तव्यी असावे तत्पर । मुखी नाम निरंतर ॥
देहाने करावी सेवा । याहून दुजा लाभाचा नाही ठेवा ॥
परमात्म्याने जे जे दिले । ते ते त्याचे म्हणून सांभाळणे भले ॥
त्या लोभात न गुंतवावे चित्त । हाच परमार्थ सत्य ॥
नसावे कशाचे ज्ञान । वाटावे सदा घ्यावे रामनाम ।
प्रपंची राहावे समाधान । हेच भक्ताचे मुख्य लक्षण जाण ॥
पतिव्रता साध्वी थोर थोर । त्यांचे करावे स्मरण । जे करील पुण्यवान ॥
न बोलावी पतीस दुरूत्तरे । समाधान राखोनि अंतरे । जे सज्जनांस आवडेल खरे ॥
पतीपरते न मानावे दुजे दैवत । घरात राखावे नेहमी समाधान ॥
तुमच्या पतिसारख्यांची संगति । हीच भाग्याची खरी प्राप्ति ॥
त्यांच्या आज्ञेने वागावे । त्यांच्या सुखात आपले सुख पाहावे ॥
राम धरिता चित्ती । प्रपंचाची काळजी त्याचे हाती ॥
प्रपंची असावे खबरदार । परी लोभात न गुंतावे अंतर ।
धन संग्रही राखावे । सर्वच खर्चुन न टाकावे ॥
ही प्रपंचाची रीत । सर्व जगात आहे चालत ॥
जगाची रीत लोभात असणे । हे मात्र आपणास न आवडावे ॥
देहाने करावी पतिसेवा । ध्यानी धरावा रामराया ।
त्याचा संसार उत्तम झाला । हाच आशीर्वाद माझा भला ॥
प्रपंचाची संगति । काळजीची उत्पत्ति ।
तेथे धरिता नामाची संगति । काळजीविरहित आनंद देई ॥
मुलीच्या लग्नाची काळजी करू नये । प्रयत्‍नाला सोडू नये ।
प्रयत्‍नाअंती परमेश्वर । हे सज्जनांचे बोल । मनी ठसवावे खोल ॥
आरंभी ज्याने स्मरला राम । त्यालाच प्रयत्‍नाअंती राम ।
हा ठेवावा विश्वास । सुखे साधावे संसारास ॥
मिष्ट भाषण वरिवरी । विष आहे अंतरी । असल्याची संगत नसावी बरी ॥
मी तुम्हास सांगतो हित । दृश्यात न ठेवावे चित्त ॥
राम सेवेकरता प्राण । म्हणून करणे आहे जतन ॥
मान अपमान जगतात । ते मूळ कारण झाले घातास ॥
कोणतेही काम करीत असता । राखावी मनाची शांतता ।
अगदी व्यवहारबुद्धीने कामे करावी सर्वथा ॥
आप्तैष्ट सखेसज्जन । यांचे राखावे समाधान । परी न व्हावे त्यांचे अधीन ॥
सर्वांशी राहावे प्रेमाने । चित्त दुश्चित न व्हावे कशाने ॥
आल्या अतिथा अन्न द्यावे । कोणास विन्मुख न पाठवावे ॥
अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे । त्यात रामाचे अधिष्ठान राखावे ॥

७०. रामावर ठेवावा विश्वास । सुखाने करावा संसार ॥

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

March 9, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ९ मार्च २०१४


९ मार्च

मध्यम स्थितीतली माणसे संगतीला चांगली.



एका गावात चोरांची एक सभा भरली. तीत काही चोर म्हणाले की, लूट करायची ती हानी करून करावी; तर काहींचे असे म्हणणे पडले की, कुणाला उगीच मारायला नको, नुसतीच लूट करावी; पण लूट करावी असे सर्वांचेच ध्येय होते ! तसे आपले होते. एक म्हणतो, व्यवहारदृष्टया प्रपंच करावा; दुसरा म्हणतो, तसे नव्हे, योग्यअयोग्य पाहून प्रपंच करावा; तर तिसरा म्हणतो, स्वतःचा स्वार्थ साधून प्रपंच करावा; परंतु देवाचे अधिष्ठान ठेवून प्रपंच करावा असे कुणीच म्हणत नाही ! सगळयांना प्रपंच 'हवा' आणि 'देव असला तरी चालेल.' म्हणजे प्रपंच तेवढा खरा, असे ते मानून चालतात, देवाविषयी मात्र त्यांच्या मनात संशय असतो. वृत्ती कितीही अस्थिर असलेली त्यांना चालते. दारू पिऊन बेहोश झालेला माणूस मनाला येईल ते गाणे गातो. असा एक दारूडा गाणे गात असताना दुसरा दारूडा त्याला म्हणू लागला की, 'अरे, हे असले गाणे काय म्हणतोस ? तुला काही कळत नाही.' नंतर काही वेळाने तोच प्रश्न पहिल्या दारूड्याने दुसऱ्या दारूड्याला विचारला ! त्याप्रमाणे, प्रपंचामध्ये ज्यांची वृत्ती स्थिर नाही अशा लोकांनी वाटेल ती मते प्रतिपादन करावी असे घडते, आणि मग ते एकमेकांना नावे ठेवतात. आपला प्रपंचातला व्यवहार असा असतो.
'आम्हांला बंधने नकोत' असे म्हणणारे लोक वेडेच समजले पाहिजेत. समाज हा बंधनाशिवाय राहूच शकत नाही. खरोखर, नोकरीमध्ये फार त्रास नसेल तर ती मालकाइतकीच सुखाची असते; उलट कित्येक वेळा मालकीमध्येच फार त्रास असतो. व्यवहारामध्ये आपण दुसऱ्याची लबाडी ओळखून वागावे एवढीच लबाडी आपल्यामध्ये असावी. पण स्वतः लबाडी करू नये; म्हणजेच, आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसविण्यासाठी नसावी. लोकांकडून न फसण्याइतकेच आपण व्यवहारी असावे.
व्यवहाराच्या दृष्टीने बघितले तर मला मध्यम स्थितीतली माणसेच जास्त भेटली. ती व्यवहाराला आणि संगतीला फार चांगली असतात, कारण ती सर्व बाजूंनी मध्यम असतात; त्यांचे पाप मध्यम, पुण्य मध्यम, आणि परमार्थदेखील मध्यमच असतो. असा मनुष्य वेळप्रसंगी कर्जबाजारी झाला तरी चालतो, पण कर्ज किती असावे, तर या महिन्यात देऊन टाकता येईल इतकेच.

६९. नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे,
अब्रुने जगता यावे, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. 

 

 

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

March 8, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ८ मार्च २०१४

 ८ मार्च

प्रपंचाच्या अपूर्ण गोष्टींत केव्हांही समाधान मिळणार नाही.



सर्व अनुभवांत आत्मप्रचीती ही खरी. दुसऱ्याने पुष्कळ अनुभव सांगितले, परंतु स्वतःला येईल तो अनुभव हाच खरा महत्वाचा. आत्मप्रचीतीने जागरूकता येईल, भाव वाढेल, साधनाला जोर येईल, आणि भगवत्प्राप्ती लवकर होईल. संतांनी पुष्कळ गोष्टी आजवर आपल्याला सांगितल्या, परंतु त्यांना देव जसा हवासा वाटला तसा आपल्याला वाटतो का ? प्रपंच करीत असताना भगवंताची आपल्याला आवश्यकता वाटते का ? आपण असा विचार करावा की, आपण लहानाचे मोठे झालो, विद्या संपादन केली, नोकरी मिळाली, लग्न झाले, मुलेबाळे झाली, घरदार केले, परंतु आपल्याला अजून काहीतरी हवेसे वाटतेच आहे ! हे आपले 'हवेपण' केव्हा संपणार ?
आपण नोकरी करतो, कोणी वकिली, कोणी डॉक्टरकी; नोकरी करणारा, मालकाला आपल्याशिवाय दुसरा कोणी नोकर मिळणार नाही म्हणून काही नोकरी करीत नाही, किंवा अशीलाला कोणी दुसरा वकील मिळणार नाही म्हणून वकील वकिली करीत नाही. म्हणजेच नोकरीवाला काय, डॉक्टर काय, वकील काय, कोणीही आपापले कर्म केवळ त्या कर्मासाठीच करीत नाही, तर त्यातून आपल्याला सुख मिळेल ह्या ईर्ष्येने तो ते करीत असतो. परंतु आपण पाहतोच की सर्व काही केले, आयुष्यही संपले, तरी काहीतरी करण्याचे राहूनच जाते; त्याला पूर्णता येत नाही. एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की, आता ह्यापुढे काही करायचे उरले नाही, असे काही वाटत नाही. आता काहीएक नको आहे, जेवढे आहे त्यात समाधान आहे, असे कधी वाटते का? पुढे कसे होईल, हे सर्व टिकेल का, ह्यात आणखी भर कशी पडेल, याची विवंचना कायमच ! एखाद्याचे लग्न ठरले, ते झाले की आता प्रपंचाची काळजी मिटली असे वाटते का ? लग्न झाल्यावर, समजा पाच वर्षे मूल झाले नाही, तरी हा काळजी करतोच; आणि समजा, मुलेच मुले झाली तरीही याची काळजी आहेच ! तेव्हा या प्रपंचाच्या गोष्टी अपूर्ण आहेत. त्यांतून समाधान लाभेल हे कसे शक्य आहे ? ह्या गोष्टी एकांतून एक निर्माण होणाऱ्या आहेत. ज्या ज्या म्हणून सुखाच्या गोष्टी मानल्या, त्या सर्व जरी एकत्र केल्या तरी त्यांतून समाधान निर्माण होणार नाही. ज्या गोष्टी अपूर्णच आहेत, त्यातून पूर्णस्वरूप असलेले समाधान कसे लाभेल ? समजा, एका वेड्याच्या इस्पितळात दोनशे वेडे आहेत; जर कुणी म्हणाले की आता आणखी शंभर वेडे आले की एक शहाणा त्यांतून निर्माण होईल, तर हे कधी शक्य आहे का ?

६८. मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

March 7, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ७ मार्च २०१४


७ मार्च

प्रपंचातील थोडीतरी चिकाटी भगवंतासाठी धरावी.

  

लग्न करणे याला आपण सामान्यतः प्रपंच समजतो. लग्न ही फार पवित्र संस्था आहे. तिच्यामध्ये दोन जीवांचा उद्धार आहे. ज्याप्रमाणे गुरू आणि शिष्य यांचा संबंध असतो, म्हणजे दोघांचे मत एकच असते, त्याप्रमाणे पती आणि पत्‍नी यांचा संबंध असावा. पत्‍नी आपले सर्वस्व पतीला देते, यामध्ये खरे पवित्रपण आहे. लग्नाचा पवित्रपणा ज्या वेळी नाहीसा होईल, त्या वेळी आपल्या धर्माचा पायाच उखडला असे समजावे. आपली अशी समजूत असते की, लग्न केले तेव्हा सुख हे लागणारच. जे जे परमेश्वराने निर्माण केले ते माझ्या सुखासाठीच केले असे आपण म्हणतो. वास्तविक, एकच वस्तू ठेवली आणि ती सर्वांनी घ्यावी म्हटले, तर सर्वच एकट्याच्या हाती कशी येईल ? बायको म्हणते, मी माहेरी सोळा वर्षे तपश्चर्या केली आणि आता यांच्या पदरात पडले, तेव्हा यांनी नाही का आमचे लाड पुरवू? खरोखर, सुखाकरिताच प्रत्येकाची धडपड चाललेली असते; परंतु खरे सुख कशात आहे हे कळूनसुद्धा, आपण डोळयांवर कातडे ओढून घ्यावे, त्याप्रमाणे तिकडे दुर्लक्ष करीत असतो. प्रपंचात सुख मिळावे म्हणून आपण जी चिकाटी धरतो, तिच्या एकचतुर्थांश चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली तरी आपले काम भागेल. आनंदाच्या प्राप्तीसाठी आपण जे साधन आज करतो आहोत ते चुकीचे आहे. तात्पुरत्या सुखासाठी आपण आज धडपडत आहोत, त्यापासून दुःखच पदरात पडते. म्हणून तसे न करता, चिरकाल टिकणाऱ्या सुखासाठी आपण काही तरी साधन करावे.
जगामध्ये प्रत्येक गोष्टीला बंधन आहे. प्रत्येकाचे नियम ठरलेले आहेत. त्या नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे अनवस्था आणणे होय. त्याप्रमाणे कुटुंबामध्ये प्रत्येक माणसाचे कर्तव्य ठरलेले आहे. असे कर्तव्याचे वळण जिथे असते त्या घराला 'वळण आहे' असे म्हणतात. ज्या घरामध्ये वळण असते ते घर सुखी होईल. समजा, आपण एक घर बांधले, त्यामध्ये दरवाजे केले, भिंतीला केल्या, वर आढ्याला झरोके केले. आता त्यांपैकी झरोक्यांनी विचार केला की, 'आम्ही का म्हणून लहान असावे ? आम्ही दरवाज्यांइतकेच मोठे होणार!' असे म्हणून ते दरवाज्यांइतके मोठे झाले; खिडक्यांनीही तोच विचार केला, आणि त्या सगळया दरवाज्यांइतक्या मोठया बनल्या; असे झाल्यावर त्या घराचे काय होईल? हे जसे योग्य नव्हे, तसे, ज्या घरामध्ये प्रत्येकजण आपलेच मत खरे म्हणतो, आणि जेथे वडील माणसांविषयी आदर नसतो, त्या घराचा विचका व्हायला वेळ लागत नाही.

६७. आपल्या घरातील वातावरण शुद्ध, शांत आणि पवित्र असावे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

March 6, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ६ मार्च २०१४

 

६ मार्च

वासनेचे प्राबल्य.



माझ्या निरूपणाचा तुम्हांस विसर पडतो म्हणूनच बरें आहे. एखादी गोष्ट चांगली आहे आणि ती मिळाली तर सुखप्रद होईल, ह्या गोष्टीची आठवण असूनही आपण ती मिळविण्यासाठी प्रयत्‍न करीत नाही, हे अगदी अयोग्य आहे. हे पापच आहे. जर आपल्याला समजलेच नाही तर ते न करण्यात पाप नाही, परंतु समजूनही न करण्यात अत्यंत पाप आहे. खरे म्हणजे, प्रयत्‍न करणे हे आपल्या हातात आहे. आपण ऐकतो की, अंतकाळी जी मती तीच गती. मृत्यूसमयी जशी वासना धरावी त्याप्रमाणे आपल्याला पुनर्जन्म प्राप्त होतो; तेव्हा वासनेतच आपला जन्म आणि वासनेतच आपला अंत, असे असताना तिला दूर कशी करता येईल ? एखादा मनुष्य काळा असेल तर त्याला आपले काळेपण काही घालवता येत नाही; त्याप्रमाणे, वासना असणे हा मनुष्याचा एक सहजगुण आहे, तो त्याला पालटता येत नाही. तर मग आम्हाला वासनेतून कधीच मुक्त होता येणार नाही का? मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राणिमात्रापेक्षा जर काही वेगळे असेल तर चांगले काय आणि वाईट काय हे कळण्याची बुद्धी. आपण कळूनसवरूनही वासनेला, अहंपणाला आधार देतो, इथेच आपले चुकते. आपला अहंपणा इतका खोल गेलेला आहे की, आपल्याला हे सर्व माझेच वाटते: माझी बायको, माझी मुले, माझे माझे म्हणून किती सांगावे ! त्या माझेपणामुळेच अहंभाव वाढीला लागून, सर्व काही आपल्या मनाजोगते, आपल्याला सुख देणारे, हवेसे वाटू लागते, आणि दुःख अगदी नकोसे वाटते. अर्थात्‌ जगात कोणालाच नुसते सुख मिळत नाही. असे असूनही अहंपणाला बळी पडून सुखाच्या लालचीने मनुष्य मरेपर्यंत बरीवाईट कृत्ये करीत असतो, आणि त्याप्रमाणे त्याची वासना बनत जाते. वासना म्हणजे अभिमान, म्हणजेच मीपणा. अशा रीतीने अहंपणाच जर वासनेचे मूळ अधिष्ठान आहे, तर तो नको का घालवायला ? खरोखरच, मनुष्याचा अहंपणा इतका खोल मुरलेला आहे की, त्याचे निर्मुलन करायला तसेच सूक्ष्म अस्त्र पाहिजे. नामाइतके प्रभावी आणि सूक्ष्म अस्त्र दुसरे कोणतेच नाही. ते परमेश्वराच्या अगदी जवळचे आहे. परंतु एवढे असूनही आपण ते आवडीने, निष्ठेने घेत नाही. आम्हांला सर्व काही समजते, परंतु नामस्मरण करण्याचा आळस आपल्यात भरलेला आहे; भगवंत कर्ता आहे असे अनुसंधान जो रात्रंदिवस ठेवील त्याचाच अहंकार जाईल हे ध्यानात ठेवून आपण भगवंताचे नाम घ्यावे.
मनाने भगवंताचे होणे हे भक्तीचे मर्म आहे. आपल्याला जे पाहिजे ते त्याच्याजवळ मागावे. मागितलेली वस्तू भगवंत देईल किंवा न देईल. वस्तू दिली तर बरेच झाले, पण आपण मागितलेली वस्तू भगवंताने दिली नाही तर ती देणे आपल्या हिताचे नव्हते असे खरे मनापासून वाटावे. ही भावना वाढण्यासाठी, भगवंत दाता आहे असे लक्षात ठेवून शक्य तितके त्याचे नामस्मरण करावे.

६६. जो नामात राहिला त्याचा वासनाक्षय झाला

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

March 5, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन-५ मार्च २०१४

 ५ मार्च

भगवंताचे नाम कधी सोडू नये.



जगामध्ये सर्वस्वी खरे असे अस्तित्व एकच असले पाहिजे; त्यालाच आपण 'भगवंत' असे म्हणतो. भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामूळे मनुष्याचा विचार त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मानवी विचार हा शब्दमय आहे; म्हणून विचाराच्या भूमिकेवर उभे राहून भगवंताची कल्पना करायला शब्द हेच साधन आहे. याला 'नाम' असे संत म्हणतात. ज्या अंतःकरणात नाम आहे, म्हणजे ज्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल प्रेम, आस्तिक्यबुद्धी, भाव, श्रद्धा आहे, तिथे भगवंत विशेष प्रकट झालेला दिसून येतो. भगवंताबद्दल आस्तिक्यबुद्धी असणे, म्हणजे स्वतःबद्दल नास्तिकबुद्धी असणे होय. एका म्यानात ज्याप्रमाणे दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे भगवंत आणि अहंपणा एका अंतःकरणात राहू शकत नाहीत. संत हे भगवंताशी एकरूपच झालेले असतात. भगवंताचे नाम घेणे म्हणजे आपल्या कर्तेपणाचा अभिमान कमी करणे होय. नामाचे प्रेम लागले म्हणजे कर्तेपणाचा अभिमान कमी होतो. कर्तेपणा भगवंताकडे सोपविल्यावर आपली स्वतःची इच्छा राहातच नाही. जिथे इच्छा नाही तिथे यशापयशाचे महत्व उरत नाही. कधी सुख तर कधी दुःख, कधी यश तर कधी अपयश, हा प्रपंचाचा धर्मच आहे हे ओळखून, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटना 'त्याच्या' इच्छेने आणि सत्तेने घडून येतात अशी जाणीव ज्याच्या अंतःकरणात उमटली त्याला भगवंताचे अस्तित्व खरे समजले. 'मी खरा नसून तोच खरा आहे' हे सांगण्यासाठी जिथे 'मी' च उरत नाही, ती खरी पूर्णावस्था होय. तिथे 'मी त्याला जाणतो' हे देखील संभवत नाही.
संत ओळखू यायला आणि त्याची भेट घडायला, भगवंताचे नामच घेत राहणे आवश्यक आहे. नाम घेत असताना, सदाचरण कधी सोडू नये, नीतीच्या मर्यादा कधी ओलांडू नयेत, निराश कधी बनू नये, देहाला उगीच कष्टवू नये; पण काही झाले तरी भगवंताचे नाम कधी सोडू नये. कर्तव्याचे फळ प्रारब्धाधीन असल्याने, जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे; किंबहुना, भगवंताच्या सत्तेने सर्व सूत्रे हलतात, म्हणून प्रारब्धदेखील त्याच्या नजरेखाली काम करते.
नाम घेणे म्हणजे सर्वस्व देणेच होय. मोठा अधिकारी आपल्या सहीचा शिक्का करतो; तो ज्याच्या हातामध्ये असतो तो मनुष्य त्या शिक्क्याने साहेबाइतकेच काम करवून घेऊ शकतो. हे जसे व्यवहारामध्ये आहे, अगदी तसेच भगवंताच्या बाबतीतही आहे. जे काम प्रत्यक्ष भगवंत करतो तेच काम त्याचे नाम करीत असते.

६५. भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की, त्याच्या आड दुसरे काही येत नाही.


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )