October 31, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३१ ऑक्टोंबर २०१४

३१ ऑक्टोबर

मनुष्यमात्र भगवंताच्या प्राप्तीसाठीच जन्माला आला आहे. 

 



भगवंत एकच ओळखतो : जो त्याची भक्ति करतो, तो त्याला आवडतो. तिथे जातीचे, वर्णाचे, बंधन नाही. आपण भाग्यवान कुणाला म्हणतो ? ज्याच्याजवळ पैसा अधिक असतो त्याला; पण तो काही खरा भाग्यवान नव्हे. ज्याला भगवंत भेटला तो खरा भाग्यवान. भगवंत आपल्याला भेटणे हे प्रत्येकाने जीवनातले मुख्य कार्य समजावे. पैसा भगवंताच्या आड येत नसतो; आपला अहंकार, मीपणा, हाच मुख्यतः भगवंताच्या आड येतो. 'मी सेवा करतो' असे जो म्हणतो त्याची खरी सेवाच होत नाही. कर्तेपणा आपल्याकडे घेतो तोपर्यंत सेवा नाही घडली. भगवंताची आठवण ठेवून जे जे कर्म आपण करतो ते ते पुण्यकर्म होते. भगवंत माझ्याजवळ आहे अशी श्रद्धा ठेवून वागा. श्रद्धेने जो करील त्याला फळ येईल खास. पण म्हणून श्रद्धेवांचून केलेले भजनपूजन वाया जाते असे नाही समजू. भगवंताची भक्ति उत्पन्न व्हावी म्हणूनच भजनपूजन करावे, मनाचे रंजन म्हणून करू नये. सत्कर्म करणारे पुष्कळ असतात, पण पुष्कळ वेळा त्यात स्वार्थबुद्धी असते. फळाची आशा न ठेवता सत्कर्म करणे हीच खरी भक्ति.
सर्वांभूती भगवद्‌भाव ठेवावा हेच परमार्थाचे खरे सार आहे. माझ्यामध्ये भगवंत आहे हे मी ओळखले म्हणजे इतरांच्या ठिकाणी त्याला पाहता येईल. 'मी कोण' हे न ओळखल्यामुळेच आपले सर्व चुकते आहे. माझ्यात भगवंत आहे हे दोन प्रकारे पाहता येते. सर्व चेतना त्याकडून मिळते हे एक. दुसरे म्हणजे, 'देह ठेवला' असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा ठेवणारा कोणी दुसरा असला पाहिजे; म्हणजे देह हा 'मी' नव्हे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, यांचा सा़क्षी कुणीतरी आहे हे खास. 'मी कोण' हे जाणायला सा़क्षीरूपाने वागावे. सर्व जगाला मी माझे म्हणतो, पण जो खरा माझा त्याला तसे म्हणत नाही. भगवंत माझ्यात आहे ही जाणीव उत्पन्न करून घ्यावी. अनुमानाने आणि अनुभवाने पाहिले तर भगवंत माझ्यात आहे हे खात्रीने पटेल. वर्षाचा आनंद पाडव्यापासून, आयुष्याचा आनंद वाढदिवसापासून, आणि दिवसाचा आनंद सकाळपासून सुरू होतो, म्हणून भगवंताच्या भक्तीला आपण त्याच्या नामाने सुरुवात करावी; म्हणजे त्यामुळे होणारा आनंद लगेच आपल्याला मिळेल; सुरुवात गोड आणि शेवटही गोडच होईल. आकाश हे जसे सर्वांना सारखे आहे, त्याचप्रमाणे मानवजन्माचे ध्येय हे सर्वांना सारखेच आणि एकच आहे. कोणत्याही जातीतला, धर्मातला किंवा देशातला मनुष्य असो, तो भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणजे परमार्थासाठीच जन्माला आला आहे.


३०५. आपण भगवंताला शरण गेलो, तर तो आपल्याला हातचा कधी सोडणार नाही.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३० ऑक्टोंबर २०१४

३० ऑक्टोबर

ठेवतां रामावर एक विश्वास ।
त्यालाच समाधान हमखास ॥





रामाचा हात माझ्यामागे हें ठेवावें मनांत । व्यवहार सांभाळून वागावे जगांत ॥
दुष्ट मतीची उत्पत्ति । ही दुर्जनाची संगति ॥
भावे धरितां रघुपति । सर्व संकटे दूर जाती ॥
भोगांत नामाचे न व्हावे विस्मरण । याकरितां राखावें समाधान ॥
देहाचे भोग देहाचे माथी । त्याची न मानावी खंती ॥
विश्वास ठेवावा रामापायीं । सर्व कांही चांगले होऊन जाई ॥
आपला भार घेतला रामानें । विश्वासाने सत्य मानणें खरे ॥
सद्‌गुरुआज्ञा प्रमाण । हेंच साधनांतील साधन जाण ॥
जो जो प्रसंग येईल जैसा । तो तो सान्निध्य जाणावे रघुपतीचा ॥
शरीर आहे दों दिवसांचे । वायां न जाऊं द्यावें साचे ॥
रामकृपा त्याजसी होई । ज्यानें नांव ठेवले हृदयी ॥
मुखीं नाम, हृदयीं राम, । त्याने जोडला आत्माराम ॥
गुरुचरणी ठेवावा विश्वास । निर्भयता त्यानें येते खास ॥
जें जें होणार ते होतच जाते । विनाकारण मन कष्टी होते ॥
माझे प्रपंची नाहीं सुखदुःख । असे ज्याने जाणले चित्तीं । त्याचा संसार झाला सुखाचा निश्चितीं ॥
ज्याने दिली रामाची संगति । त्याचा विषाद न मानावा चितीं ॥
उद्विग्नतेचें कारण । साधनाचे विस्मरण ॥
मुख्य करितां रामाची भक्ति । आपोआप गळते विषयाची आसक्ति ॥

भगवंतावर ठेवावा पूर्ण विश्वास । तो करतो हेंच हिताचे मानावें खास ॥
अंतकाळी भगवंताचे नाम । त्याला करीन माझेसमान ।
हें भगवंताचे वचन जाण । त्याच्यावर ठेवावा विश्वास ॥
म्हणून रामावांचून जगती । आतां माझा असें न म्हणावें चित्तीं ॥
दुःख जाण्यास उपाय सांगती साधुजन । आसक्तीत न गुंतावें आपण ॥
म्हणून, सर्व कांही करावे । पण मीपणाने कोठें न राहावे ॥
याला उपाय एकच जाण । सदा राखावे रामाचे अनुसंधान ॥
याहून दुजें नाही साधन । हे मानावे प्रमाण ॥
ठेवतां रामावर एक विश्वास । त्यालाच समाधान हमखास ॥
म्हणून रामाचा चित्तीं ठेवावा विश्वास । वळण द्यावें व्यवहारास ॥
साधन असें काही असावे । ज्याने साध्याला सहज पोहोचावे ॥
राम म्हणावा आपला । साधनांतील साधनाचा लाभ झाला ॥
शुद्ध असावे आचरण । पवित्र करावें मन ॥
नामस्मरण ज्याच्या मुखीं । रामकृपें तोच एक सुखी ॥
एकच देव, एकच गुरु, एकच साधन ।
यांवर ठेवतां विश्वास । कृपा करील ईश्वर खास ॥

३०४ जेव्हां मनासकट देह केला अर्पण ।
मग मरणाच्या भयाचे काय कारण ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

October 29, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २९ ऑक्टोंबर २०१४

२९ ऑक्टोबर

भगवंताचे होण्यास आपण निर्दोष असणे जरूर आहे.

   


भगवंताचे समाधान आपण्यास न मिळण्याचे कारण, आम्ही ज्याचे आहोत असे वाटते ते आम्हाला सोडता येत नाही; प्रपंच आम्हाला हवासा वाटतो. जगाच्या तोंडाकडे पाहून समाधान मिळेल असे आपल्याला वाटते. ही प्रपंचाची आणि जगाची आस सोडून भगवंताचे दास झाल्याशिवाय आम्हाला समाधान मिळणे कठीण आहे. हे दास्यत्व येण्यासाठी भगवंताच्या प्राप्तीची उत्कंठा आम्हाला लागणे जरूर आहे. ही उत्कंठा यावी तरी कशी ? भगवंताचे होण्यासाठी, आम्ही अगदी निर्दोष असणे अवश्य आहे. हे निर्दोषपण येण्यासाठी, आपण खरोखरच जसे नाही तसे जगाला दिसू नये. मनाने नेहमी शुद्ध असावे. आपण खरोखर चांगले नाही असे आपल्याला कळत असतानासुद्धा लोक आपल्याला चांगले म्हणतात, याची आम्हाला खंत वाटणे जरूर आहे. जगात आपले वागणे असे असावे की, आपल्याविषयी दुसर्‍या कुणाला शंकाही येता कामा नये. ढोंग मुळीच करू नका. आचारविचाराने इतके पवित्र झाल्यानंतर मग आम्हाला भगवंताचे का बरे होता येणार नाही ?
भगवंताचे झाल्यावर आम्हाला काळजीचे काही कारण आहे का ? आपण सर्वजण 'आम्ही भगवंताचे आहोत' असे म्हणतो आणि काळजी करतो, हे किती विपरीत आहे ! ही प्रपंचाची काळजी नाहीशी होण्यासाठी, प्रपंचातले सर्व वैभव, धनदौलत ही आपली कर्तबगारी नसून, ती रामाच्या इच्छेने आली आहे असे आम्ही म्हटले पाहिजे. 'माझा प्रपंच तुझ्या इच्छेने चालला आहे, तू ठेवशील त्यात मी समाधानात राहीन,' अशी आमची वृत्ती बनायला पाहिजे. यासाठी मोठे वैराग्य पाहिजे असे नाही. खरोखर, वैराग्य, त्याग वगैरेंच्या भानगडीत पडू नका. भगवंत ठेवील त्या परिस्थितीमध्ये समाधानात राहणे यासारखे दुसरे वैराग्य कोणतेही नाही. ज्याच्यामधे भगवंताचा विसर पडेल, त्याच्यावर वैराग्य करा. ज्याच्यामध्ये भगवंताची आठवण राहील, तो विवेक समजून आचरणात आणा. प्रपंच उत्तम करा, पण त्याच्या आधीन होऊ नका. आधीन होणे हे पाप आहे, प्रपंच करणे हे पाप नाही. शक्य तितके धर्माचे पालन करा; नीति प्राणाबरोबर सांभाळा. गोंदवल्याला तुम्ही इतकी मंडळी येता, मला संकोच असा वाटतो की, इतका पैसा खर्च करून, इतक्या अडचणी सोसून, इतके कष्ट करून तुम्ही येता, तर बरोबर काय घेऊन जाता ? काहीतरी बरोबर घेऊन जाऊन आचरणात आणा. नामस्मरणात तुम्ही सगळ्यांनी राहा. नामाकरिता नाम घ्या. नाम घेऊन काही मागू नका, राम कल्याण केल्याखेरीज राहणार नाही.



३०३. आपल्याला कोणी चांगले म्हटले तर आपल्या जीवाला धक्का बसून लगेच नामाची आठवण व्हावी.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

October 28, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २८ ऑक्टोंबर २०१४

२८ ऑक्टोबर

परमेश्वर आपल्या हृदयात आहे. 

 



सरकारी नोकर वरिष्ठाच्या हुकुमाप्रमाणे चालत असल्यामुळे त्याच्यावर वैयक्तिक जबाबदारी कसलीही येत नाही आणि कर्तेपणाही त्याला शिवत नाही; त्याप्रमाणे गुरूवर श्रद्धा ठेवून त्याच्या आज्ञेत राहावे. लाभ-हानी देव जाणे, जबाबदारी गुरूवर; आणि तोच हे साधन करवीत असल्याने कर्तेपणही त्याच्यावरच असणार. त्याच्याही पुढे म्हणजे, जे जे काही घडते ते ते सर्व त्याच्याच इच्छेने आणि सत्तेने घडते, अशी दृढ भावना असली, म्हणजे कर्तेपण सोडून अजिबात मोकळे होता येते. असे झाले म्हणजे जे जे आपल्या हातून घडते, ती त्याचीच सेवा होते. मुख्य गोष्ट ही की, परमात्मा आपल्या हृदयात आहे, आपण त्याच्यात आहोत, आपण तोच आहो, अशी दृढ भावना पाहिजे. याच्या मधली पायरी म्हणजे परमात्म्याच्या नजरेखाली, तो पाहात असताना, आपण सर्व कर्मे करीत आहोत अशी जाणीव असणे आवश्यक आहे. यामुळे अभिमान सर्वस्वी जरी न गळला, तरी आपल्या हातून वाईट कृत्ये तरी घडायची नाहीत.
क्षेत्राला क्षेत्रत्व आपण आपल्या भावनेने जर दिले नाही तर तिथे पाणी आणि दगडच आहेत ! 'काशी', 'गंगा', असे म्हटले म्हणजे पवित्रतेचे संस्कार मनात उभे राहतात, पण तिथल्या राहणार्‍या पुष्कळ लोकांचा तसा भाव नसल्यामुळे ते वर्षावर्षात स्नानासही जात नाहीत. यावरून, त्यांना ते क्षेत्र असे वाटतच नाही असे दिसते. क्षेत्र हे आपल्या भावनेनेच नाही का निर्माण होत ? मग ते घरच्या घरीच नाही का निर्माण करता येणार ? याला अर्थातच दृढभाव असायला पाहिजे. तितका तो दृढ होत नसेल, तर क्षेत्रात जावे; आणि आर्थिकदृष्ट्या तेही शक्य नसेल, तर 'काशीस जावे नित्य वदावे;' म्हणजे काशीचे स्मरण तरी करावे, म्हणजे त्याने पवित्रतेचे संस्कार उद्‌भूत होऊन मन पवित्र होईल. देव सर्वत्र भरलेला आहे, पण तो भावाने प्रकट केला पाहिजे. प्रह्लाद, द्रौपदी यांना अगदी खात्री होती की देव आपला साह्यकारी आहे, तेव्हा देवाला प्रकट होणेच भाग पडले. सद्‌गुरू मला साहाय्य करतील अशी तुमची खात्री पाहिजे, म्हणजे त्यांना साहाय्य करावेच लागते. याचा अनुभव घेणे हे तुमच्याच हाती नाही का ?
स्वार्थाने कर्मे करणे याचे नाव प्रपंच, आणि निःस्वार्थपणाने करणे याचे नाव परमार्थ. जो आसक्तिमध्ये नाही तो निःस्वार्थी समजावा. आसक्ति निघण्याची पहिली पायरी असेल तर ती उदासीनता होय. देव आहे असे निःशंकपणे वाटणे हे ज्ञान होय. हे ज्ञान भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने सहज प्राप्त होते.

३०२. उपासनेचा हेतू असेल तर तो राम आपल्या पाठीमागे उभा आहे ही भावना उत्पन्न करणे हा होय.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

October 27, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २७ ऑक्टोंबर २०१४

२७ ऑक्टोबर

परमेश्वराकडे कर्तेपण देऊन काळजी सोडून द्यावी. 

 



सर्व कर्तेपण परमात्म्याला देऊन, आपण काळजी करण्याचे अगदी सोडून द्यावे, आणि सदैव समाधानात आणि आनंदात राहावे. जे जे काही घडते आहे ते ते परमात्माच आपल्या हिताकरिता करतो आहे, आणि आपल्याकडून ज्या क्रिया होतात त्या आपण करीत नसून परमात्माच करीत आहे, अशी प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येक क्रियेमध्ये जाणीव आणि भावना ठेवावी. अशी भावना ठेवायला कुठे बिघडते ? त्यात अवघड ते काय आहे ? प्रयत्‍न अवश्य करावा आणि तो कसून करावा ; पण तो परमात्माच सर्व करीत असून, त्यात येणारे यश अगर अपयश हे सर्व आपल्या हितासाठीच आहे, अशी ठाम भावना ठेवली पाहिजे. अशी ठाम भावना ठेवल्यावर काळजीला जागाच कुठे राहिली ? आणि एकदा काळजी गेली म्हणजे आपला आनंद हा स्वयंसिद्ध आहेच आहे ! तो काही दुसर्‍या कुठून मिळवायचा नाही. आनंदाला ही काळजी झाकाळून टाकते. थोडक्यात म्हणायचे झाले तर असे सांगता येईल की, मीपण, म्हणजेच कर्तेपण परमात्म्याला द्यावे, म्हणजे काळजी नाहीशी होते आणि निर्मळ आनंद उरतो, आणि अशा स्थितीत नामस्मरण चालावे. हेच 'स्वानंदात स्मरण' होय.
आपले कर्तेपण अपुरे आहे. ते आपल्या स्वाधीन नसून परमात्म्याच्या स्वाधीन आहे. म्हणून सुखदुःखाची बाधा आपल्याला न होता, ती परमात्म्याला झाली पाहिजे ! आपल्या सुखदुःखाचा नाश म्हणजेच आपल्या कर्तेपणाचा नाश; आणि आपल्या कर्तेपणाचा नाश म्हणजेच 'भगवंत करतो' ही भावना होय. आपले होते कसे ते पाहा; कर्माच्या सुरुवातीला काळजी लागते; कर्म झाल्यावर शेवटी, 'अरे, हेच का फळ मिळाले ?' म्हणून काळजी लागते; याप्रमाणे, काळजी करणार्‍या मनुष्याला सुख-समाधान केव्हाच मिळत नाही. काळजी ही वाळवीसारखी आहे; काही खात असताना तर ती दिसत नाही, पण कपडा किंवा पुस्तक खाल्ल्यावर मात्र ती दिसते. त्याचप्रमाणे, काळजी आपली निष्ठा कमी करीत असते; त्या अवस्थेत ती दिसत नाही, परंतु नंतर मात्र ती दिसते. काळजी सोडायची म्हटली तर आजच सुटेल, नाहीतर ती केव्हाच सुटणार नाही. भारतीय युद्धात, भगवंताने जिथे रथ नेऊन उभा करावा तिथे अर्जुनाने बाण मारावे ! अर्जुनाने आपल्या रथाच्या दोर्‍या भगवंताच्या हाती दिल्या, त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनाच्या दोर्‍या भगवंताच्या हाती देऊ या. अर्जुनाच्या जागी एखादे बाण मारणारे यंत्र जरी असते तरी काम तेच झाले असते. तसे आपण भगवंताचे यंत्र बनू या. यंत्राला चालविणारी शक्ति आणि यंत्राकडून काम करवून घेणारी शक्ति म्हणजे भगवंत आहे. आपण आपल्या मालकावर पूर्ण विश्वास टाकून त्याच्या नामात राहू या.


३०१. आपला देह प्रारब्धावर टाकून, साधकाने मजेत त्याच्या सुखदुःखाकडे पाहावे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

October 26, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २६ ऑक्टोंबर २०१४

२६ ऑक्टोबर


भगवत्कृपेचा लोंढा म्हणजे काय ? 

 



कोणतेही बी पेरताना ते अत्यंत शुद्ध असावे; म्हणजे किडलेले किंवा सडलेले नसावे. भगवंताशिवाय दुसर्‍या कोणत्याही फळाच्या हेतूने केलेली भक्ति ही सडलेल्या बीजासारखी आहे. आता, सुरुवातीलाच उत्तम बी पैदा होईल असे नाही, परंतु प्रयत्‍नाने ते साधता येते. पुष्कळ वेळा काही तरी ऐहिक सुखाच्या इच्छेने मनुष्य भक्ति करायला लागतो; म्हणजे त्यावेळी तो सडके बीज पेरीत असतो. प्रारंभी अशा तर्‍हेचे काही तरी निमित्त होतच असते, परंतु थोड्याशा विचाराने, शुद्ध बीजाची पेरणी होणे जरूर आहे असे चित्ताला पटते. भगवंताची तशी अनन्य भावाने प्रार्थना करावी. पाऊस पडणे वा न पडणे ही गोष्ट सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन आहे, आणि तो यथाकाळ पडतोही. असे पाहा की, एखादे शेत खोलात असले की त्यात पाणी इतके साचते की, ते जर बाहेर काढून लावले नाही तर सबंध पीक कुजून जाते. त्याच अर्थाने भगवंताच्या कृपेचा लोंढा जर जोराचा असला तर बंधारा फोडून तो बाहेर सोडणेच जरूर असते. असे करण्यात दोन्हींकडून फायदा असतो. एक म्हणजे शेतात जास्त झालेले पाणी बाहेर काढून लावल्याने शेतातले पीक न कुजता उत्तम वाढते; आणि दुसरे म्हणजे, हे बाहेर घालविलेले पाणी आजूबाजूच्या शेतात पसरून तिथलेही पीक वाढवायला मदत होते. बंधारा फोडून पाणी बाहेर लावणे याचेच नाव परोपकार. साधकाची जशी प्रगती होत जाईल त्याप्रमाणे मध्यंतरी सिद्धी प्राप्त होऊन, बोललेले खरे होणे, दुसर्‍याच्या मनातले समजणे, एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी अदृश्य गतीने जाणे, इत्यादि प्रकार घडू लागतात. अशा वेळी मोहाला बळी न पडता, त्यांचा उपयोग स्वार्थाकडे न होईल अशी खबरदारी घेणे जरूर असते. उपयोग करायचाच झाला तर दुसर्‍याचे काम करण्यात, परोपकारांत व्हावा; यालाच बंध फोडून पाणी बाहेर लावणे असे म्हणता येईल.
शहाण्या माणसाने आपले सुख बाहेरच्या वस्तूवर अवलंबून न ठेवण्याचा अभ्यास करावा. बाहेरची वस्तू सुटली तरी मनाला दुसरी वस्तू देणे अवश्य असते. अशी वस्तू म्हणजे भगवंत होय. भगवंत हा नेहमी राहणारा, स्वयंपूर्ण, आणि आनंदमय असल्यामुळे त्याचे चिंतन करता करता मनामध्ये ते गुण उतरतात. अर्थात् मन भगवंताच्या चिंतनाने आनंदमय बनल्यावर त्या माणसाला जीवन किती रसमय होत असेल याची कल्पना करावी. मी त्याचा आहे आणि हे सर्व त्याचे आहे अशी सारखी जाणीव पाहिजे. किती आनंद आहे त्यात !


३००. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

October 25, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २५ ऑक्टोंबर २०१४

२५ ऑक्टोबर

ईश्वरप्राप्तीचा मार्ग - खरी तळमळ आणि संपूर्ण शरणागती 

 



नुसता विषयाचा त्याग केल्याने ईश्वराची प्राप्ती होत नाही; बायकोचा त्याग करून होत नाही; जनात राहून होत नाही तसेच वनात राहिल्यानेही होत नाही. खरे म्हटले म्हणजे अमुक असे काही नाही, की जे केल्याने त्याची प्राप्ती होईल. तसे असते तर साधू ओळखायला काहीच वेळ लागला नसता. संत हे यांपैकी काय करीत नाहीत ? काही प्रपंच करतात तर काही वनात राहतात. म्हणून काय, की अमुकच केले म्हणजे ईश्वराची प्राप्ती होते असे नाही. मग असे काय आहे की जे केल्याने त्याची प्राप्ती होते ? तर त्यासाठी एकच लागते, ते म्हणजे, ईश्वराची प्राप्ती व्हावी ही मनापासून तळमळ लागली पाहिजे. ज्याला अशी तळमळ लागली त्याचे निम्मे काम झाले. ज्याप्रमाणे मोठी इमारत बांधण्यासाठी तिचा पाया अगोदर बळकट असावा लागतो, त्याप्रमाणे खरी तळमळ लागली म्हणजे पुढले कार्य व्हायला फार अडचण पडत नाही; आणि हे व्हायला भाग्य लागते. तळमळ लागल्यावर सर्व भोगांचा त्याग करावाच लागतो असे नाही. आपण रामाचे आहोत असे आपल्याला मनापासून वाटले पाहिजे; आणि त्याला शरण जाऊन आपण त्याचे आहोत असे वागले पाहिजे; म्हणजे त्याचे झाले पाहिजे. असे करण्याने आपला प्रपंच बिघडेल असे वाटते का ? आपण नोकरी करतो त्यावेळेस अंमलदाराबद्दल आपले चांगले मत असते का ? तो आपल्याला मनाने आवडत नसूनही आपण देहाने त्याचे काम करतोच की नाही ? तसे, आपण मनाने रामाचे आहोत असे ठरवून देहाने प्रपंच करावा, म्हणजे प्रपंच न बिघडता उलट चांगला होतो; कारण आपण ज्याला शरण गेलो त्याला त्याची लाज असते. बिभीषण रामाला शरण आला, तेव्हा त्याला मारून टाकावा असेच बाकीच्यांनी सांगितले. तरी पण रामाने सांगितले की, "जो मला शरण आला त्याचे रक्षण करणे माझे काम आहे." शरणागताला नुसते जीवदान देऊन तो राहिला नाही, तर त्याला लंकेचे राज्य दिले. म्हणून सांगतो की, जो त्याचा होऊन राहतो, त्याची लाज रामाला असते.
माझ्याकडे इतके जण येतात, पण एकाने तरी 'रामाची प्राप्ती करून द्या' म्हणून विचारले का ? मी आलो आहे तो काय तुमचे विषय पुरविण्यासाठी ? समजा, एकजण चोरी करायला निघाला आणि वाटेत त्याला मारुतीचे देऊळ लागले. तिथे जाऊन मारुतीला नवस केला की, "मला जर आज चोरीत यश आले तर मी तुझ्या देवळावर सोन्याचा कळस चढवीन'" तर आता सांगा, त्याला मारुतीने काय द्यावे ? त्याने त्याच्या नवसाला पावावे असे तुम्हाला वाटते का ? जर नाही, तर तुम्ही विषय मागितले आणि मी दिले नाहीत तर मला दोष का देता ? आपल्याला नवस करायचा असेल तर असा करावा की, "मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद म्हणजे समाधान रहावे, आणि दुसरे काही मागण्याची इच्छाच होऊ नये."



२९९. साधकाने शक्य तितके कर्तव्य करावे, आणि मग
'भगवंत किंवा गुरू पाहून घेतील' असे म्हणून आनंदात राहावे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

October 24, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २४ ऑक्टोंबर २०१४

२४ ऑक्टोबर

परमेश्वराची खरी पूजा. 

 



देहाभिमान नाहीसा झाला म्हणजे काळजीचे कारण उरत नाही. 'मी साधन करतो' असा अभिमान देहाभिमानामुळे उत्पन्न होतो. हा साधनाभिमानही घातुक असतो. तेव्हा, जे काही होते ते परमेश्वराच्या सत्तेने होते असे मानीत जावे. आपले हित कशात असते ते त्यालाच उत्तम कळते, आणि तो सर्व तुमच्या बर्‍याकरिताच करीत असतो. तेव्हा कसलीही काळजी करू नये. त्याच्यावर विश्वास टाकून आनंदात असावे, चित्तवृत्ती परमेश्वराकडे लावावी. तेथून ती विषयाकडे जाऊ लागली म्हणजे संधी साधावी; म्हणजे त्यावर लक्ष असावे. मन विषयाकार होऊ लागले म्हणजे माझे स्मरण करावे. बर्‍याच वेळाने आठवण झाली तरी माझे स्मरण करावे, म्हणजे पुढे पुढे लवकर आठवण होऊ लागेल. ज्याचे मन पूजेत असते त्याची खरी पूजा होते. सर्वांभूती भगवद्‌भाव, आणि कोणाचे मन न दुखविणे, ही पूजा खरी होय. पूजेला बाह्योपचाराची गरज नसते. मन मात्र अर्पण होणे जरूर आहे. पूजेत भाव असणे जरूर आहे.
भक्ति आणि वैराग्य यांच्यामध्ये तसा फरक नाही. परमेश्वराची आवड म्हणजे भक्ति, आणि विषयाची अनासक्ति म्हणजे वैराग्य. रामराय वनवासात जायला निघाले तेव्हा त्यांनी सीतामाईला बरोबर न येण्याविषयी सांगितले. त्या वेळी तिने उत्तर दिले की, 'रामा ! तुझ्याबरोबर असेन तर मला सर्व कष्ट सुखमय आहेत; आणि तुझ्याशिवाय असेन तर सर्व सुखोपभोग हे मला कष्टमय आहेत.' सीता ही रामाची मोठी भक्त होती, आणि म्हणून तिची अशी अवस्था होती. तिला परिस्थितीची जाणीव नव्हती. पण आपली गोष्ट अशी नाही. आपण एकीकडे परिस्थितीवर अवलंबून आहोत आणि दुसरीकडे आपल्याला भगवंत पाहिजे, म्हणून आपण मध्यम मार्ग धरावा; तो हा की, आपण म्हणावे, 'रामा, माझी परिस्थिती तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे.' असे आपण मनःपूर्वक म्हटले की परिस्थिती बदलली तरी आपला आनंद टिकेल.
'माझ्या देवाला हे आवडेल का ?' अशा भावनेने जगात वागणे हाच सगुणोपासनेचा हेतू आहे. जसजशी आपण सगुणाची उपाधी वाढवतो तसतशी आपली इतर उपाधी कमी कमी होत जाते. सगुणाच्या उपासनेला आज आपण कल्पनेने प्रारंभ करू, मागून निश्चयात्मकता आपोआप येईल. चैतन्य सर्व ठिकाणी भरलेले आहे; ते कुठेही प्रकट होऊ शकेल. त्याला प्रकट करणे हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे. ज्याची भावना खरी शुद्ध, म्हणजे निःसंशय असते, त्याला दगडाची मूर्तीदेखील देव बनते. भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे; त्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही.

२९८. उपाधी वासना नाहीशा करण्यासाठीच नाम घ्यायचे असते.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

October 23, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २३ ऑक्टोंबर २०१४

२३ ऑक्टोबर

तुम्ही नाम घ्यायला लागा, भगवंताचे प्रेम येईलच. 

 



ज्या माणसाला आपला स्वार्थ साधायचा नाही, त्याला कमी पडणे शक्यच नाही. जिथे निःस्वार्थीपणा आहे तिथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे. आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही. जो भगवंताच्या प्रेमात तल्लीन झाला, त्याला बाकीच्या गोष्टींची आठवण राहात नाही. ज्याप्रमाणे मालक घरात आला की चोर पळालाच म्हणून समजा, त्याचप्रमाणे जो भगवंताच्या प्रेमात रमला, तो खात्रीने सुखी बनला; कारण त्याची देहबुद्धी पळून जाते. म्हणून भगवंताला अशा प्रेमाने आळवावे, की त्याच्या डोळ्यांत पाणी यावे. आळवताना आपल्या डोळ्यात पाणी आले की भगवंताच्या डोळ्यांत पाणी येते.
भगवंताचे प्रेम लागायला सत्संगतीचा मार्ग अतिशय उत्तम आहे यात शंकाच नाही. परंतु सत्संगती सर्वांनाच मिळेल असे काही निश्चयाने सांगता येणार नाही. दुसरा मार्ग विचाराचा आहे. नेहमी चांगले आणि पवित्र विचार मनात बाळगावेत. भगवंताने सर्वांवर कृपा करावी, त्याने सर्वांचे कल्याण करावे, त्याचे प्रेम सर्वांना यावे, असे विचार नेहमी मनात ठेवून संतांच्या विचारांचे मनन करावे. सर्वांचे कल्याण चिंतण्यात स्वतःचे कल्याण अनायासे होत असते. पण आपण असे पाहतो की आपले विचारसुद्धा नेहमी स्थिर राहात नाहीत. नामस्मरणाला बसल्यानंतर किती अपवित्र विचार आपल्या मनात येत असतात याचा सर्वांना अनुभव आहे ना ? तेव्हा चांगले विचार मनात बाळगणे हेही आपल्या हातात नाही. आता तिसरा मार्ग म्हणजे नाम. नाम हे एकच साधन असे आहे की आपल्याला ते प्रयत्‍नाने घेता येईल. ते नाम तुम्ही सर्वांनी निःशंकपणे घ्या. त्या नामाच्या विरुद्ध तुम्हाला कुणीही सांगितले तरी त्याचे ऐकू नका. ते नाम कसे घ्यावे वगैरे चिकित्सेत तुम्ही पडू नका. तुम्ही नाम घ्यायला लागा, भगवंताचे प्रेम तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. अगदी सतत निश्चयाने नाम घ्या. जिथे नाम तिथे माझा राम आहे, हा माझा विश्वास तुम्ही बाळगा. दुसरे काही एक न करता सतत निश्चयाने नामात राहणार्‍या माणसाला संतांची भेट होऊन ते त्याचे कल्याण करतील. भगवंताचे नाम ही ठिणगी आहे. ती फुलवली तर सबंध जग भरून जाईल एवढी मोठी होऊ शकते. ही नामाची ठिणगी आपण सतत जागृत ठेवू या. जो नामात राहिला त्याचा वासनाक्षय झाला आणि दैन्यपणा संपला. ते नाम सर्वांनी मनापासून घ्या, आणि सर्वांनी अगदी आनंदात राहून सुखाने संसार करा.



२९७. विचार आणि नाम यांनी वासनेला खात्रीने जिंकता येईल.
मग आपले कर्तेपण आपोआप मरून जाईल.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

October 22, 2014

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

' देवा तुझ्या द्वारी आलो '  या ब्लॉगच्या  सर्व वाचकांना त्यांच्या कुटुंबियांना  दीपावलीच्या  हार्दिक शुभेच्छा 



अमोल केळकर 

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २२ ऑक्टोंबर २०१४

२२ ऑक्टोबर

मुखी नाम, नीतिचे आचरण, हृदयी भगवंताचे प्रेम. 

 



ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्या हृदयात राम आहे खास. ज्याच्या हृदयात राम आहे, तो राम म्हणूनच मी पाहतो. प्रपंचामध्ये जोपर्यंत आपण भगवंत आणला नाही, तोपर्यंत प्रपंचाला पूर्तता नाही आली. प्रपंचाचे आपण मालक बनू या; प्रपंचाचे गुलाम नाही आपण बनू. जो प्रपंचाचा गुलाम बनेल त्याला समाधान कसे मिळेल ? सुख हे लोकांकडून मिळते. समाधान हे अंतर्यामातून मिळते. लोकांकडून येते ते सुख, आतून येते ते समाधान. समाधान दुसर्‍यावर अवलंबून नसते. ते माझे मला मिळविता आले पाहिजे. समाधान हे देण्यासारखे नाही, आणि घेण्यासारखे नाही. माझी वासना माझ्या ताब्यात असली पाहिजे, ज्याने परमात्म्याला आपला म्हटला, त्याची वासना नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही.
प्रपंच टाका असे मी कधीच सांगत नाही. प्रपंच टाकून परमार्थ मिळत नाही अशी माझी खात्री आहे. प्रपंच असला पाहिजे असेही नाही. प्रपंच नसला तरी चालेल, आणि असला तरी बिघडत नाही. प्रपंच करा, पण समाधान ठेवा. मुखाने भगवंताचे नाम, नीतिचे आचरण, आणि हृदयात भगवंताचे प्रेम ठेवा. इतर कशाने साधता येणार नाही ते प्रेमाने साधेल. आपण जसे आपल्या आई-बापांवर, मुलाबाळांवर, प्रेम करतो तसे भगवंतावर प्रेम करावे. ज्ञानेश्वरांचे जाऊ द्या, ते विद्येचे सागर होते, परमात्मस्वरूप होते; पण तुकारामांजवळ काय होते ? तुकारामांजवळ अशी काय विद्या होती ? पण त्यांनी देवावर किती प्रेम केले ! आज लाखो लोक पंढरीला जातात, ही त्याची साक्ष आहे. तसे प्रेम करायला तुम्हा शिका. घरात असे वळण ठेवा की सर्वांचे भगवंताकडे लक्ष लागेल. भाषा गोड असावी, कधी कडू नसावी; लोण्यासारखी असावी. शिव्या दिल्या तरी त्या भाषेमध्ये गोडी आहे असे वाटावे; रागावला तरी त्यात गोडी आहे असे वाटावे. भाषा गोड व्हायला आपण निःस्वार्थी बनल्याशिवाय नाही येणार. गोकुळासारखे घर असले तर असू द्या, पण गोकुळाला शोभा आणणारा परमात्मा त्यात पाहिजे. गरिबी कितीही असली तरी ते घर सुखरूप दिसेल खास. आम्हाला भगवंताचे खरे प्रेम असेल, तर आम्ही त्याच्याकडून प्रपंचातली काही अपेक्षा करणार नाही. चोराने चोरीचा नवस केला, आणि प्रापंचिकाने प्रापंचिक गोष्टीकरिता नवस केला, काय फरक आहे ? दोघांनाही भगवंत नको आहे ! भगवंताचा विसर यासारखे पाप नाही, भगवंताचे स्मरण यासारखे पुण्य नाही. ते स्मरण आपण अखंड राखण्याचा प्रयत्‍न करू या. नामात राहू या, म्हणजे आपल्या कर्तव्याची जाणीव आपल्याला बरोबर होईल.


२९६. दुसर्‍यापासून सुख मिळविण्याचा प्रयत्‍न करणारा मनुष्य प्रपंची होय.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

October 21, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २१ ऑक्टोंबर २०१४

२१ ऑक्टोबर


प्रारब्ध म्हणजे न समजणार्‍या गोष्टींचे कारण. 

 



आपले ध्येय काय असावे हे ठरविण्याची बुद्धी माणसाला आहे, ती खालच्या प्राण्यांना नाही. हाच माणसांत आणि त्या प्राण्यांत फरक आहे. प्राण्यांना प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात, त्याचप्रमाणे माणसालादेखील आलेले भोग भोगावे लागतात. पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागेपुढे सोयीने भोग भोगू शकतो. जगातल्या घडामोडी जशा चालतात, तशाच आपल्याही सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात. आपण जे मिळविले आहे ते स्वतःच्या प्रयत्‍नाने मिळाले, ही कल्पना गेल्याशिवाय देह प्रारब्धावर टाकता येणार नाही. 'माझे सर्व हे त्याच्या कृतीचे फळ आहे,' असे म्हटले तर क्रिया तर चालते, पण कर्तेपण राहात नाही. पुष्कळ गोष्टी अशा आहेत की, त्यांच्याकडे बोट दाखवून त्यांचे कारण अमुक असे आपण सांगू शकतो. पण काही गोष्टी अशा आहेत की, त्यांचे कारण आपल्याला दाखविता येत नाही. अशा वेळी, त्या प्रारब्धाने घडल्या असे आपण म्हणतो. प्रारब्ध म्हणजे न समजणार्‍या गोष्टींचे कारण होय, असे म्हणायला हरकत नाही. संतांनादेखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते, पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुखदुःख त्यांना नाही. व्यवहारदृष्ट्या औषध घेऊन मग भोग भोगणे हाच मार्ग खरा आहे. बुवाने आपल्या सिद्धीने रोग बरा करणे किंवा टाळणे हे बरे नाही. त्यामध्ये बुवाची प्रसिद्धी होईल खरी, पण त्यात त्याचे स्वतःचे कल्याण नाही, तसेच लोकांचेही पण हित नाही. समजा, एक मनुष्य रस्त्याने चालला असताना वाटेत एक दहा रुपयांची नोट पडलेली आढळली. पूर्वसंस्काराप्रमाणे ती उचलून घेण्याची वासना त्याला होईल, पण ती प्रत्यक्ष उचलून घ्यावी किंवा न घ्यावी हे ठरविण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे. म्हणून प्रारब्धाने देहभोग आला असता त्यामध्ये मनाची वृत्ती कशी ठेवावी हे स्वातंत्र्य त्याला आहे. म्हणून प्रारब्धाने देहभोग आला असता त्यामध्ये मनाची वृत्ती कशी ठेवावी हे स्वातंत्र्य आपल्याला आहे. ते प्रारब्धावर अवलंबून नाही. भगवंत सगुणात आला की त्यालादेखील प्रारब्धाचा नियम लागू झाला.
आपला जन्मजात स्वभाव जरी वाईट असला तरे अभ्यासाने तो खात्रीने सुधारता येईल. जोपर्यंत आपल्या अंतःकरणात अवगुण आहेत तोपर्यंत आपली प्रगती होणे कठीण आहे. शेत पेरण्याकरिता ज्याप्रमाणे जमिनीची मशागत करायला पाहिजे, त्याप्रमाणे भगवंताचे प्रेम येण्यासाठी आपले अंतःकरण दुर्गुणांपासून स्वच्छ केले पाहिजे. एकदा असे अंतःकरण शुद्ध झाले म्हणजे भगवंतावाचून दुसरा कोणी नाही ही भावना टिकविणे, म्हणजेच अनुसंधान ठेवणे, फारसे जड नाही. अनुसंधान हे आपले ध्येय ठरवून, त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी कराव्या. त्याकरिता सर्वांनी मनापासून नाम घ्यावे, आणि आनंदात राहावे.


२९५. मिळणे आणि जाणे दोन्ही प्रारब्धाधीनच आहे. मग हर्ष, शोक वृथा का करावा ?


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

October 20, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २० ऑक्टोंबर २०१४

२० ऑक्टोबर

भगवंताला होता अर्पण । तेथें सुख दुःखाचे नाही कारण ॥ 

 



सर्वस्वी व्हावें रामास अर्पण । हाच उपाय सांगती साधुजन ॥
रामास अर्पण व्हावें कोण्या रीती । त्याचा मार्ग सज्जन सांगती ॥
प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान । तेथें प्रयत्‍नांचा उगम ॥
अखंड राखावे अनुसंधान । येणें कर्म होईल सहज समर्पण ॥
उपास्यदेवतेची करावी आठवण । मनानें जावे त्यास शरण ॥
सद्‌गुरूसी झाला जो अनन्य । त्यास दुजें करणे नाही अन्य ॥
सद्‌वृत्ति, सद्‌गुण, दुर्गुणादि विकार । हें सर्व करावें रामार्पण ।
त्यानेंच रामाचे होऊन राहणे जाण ॥
राजापोटीं पुत्र जन्मा आला । राजपद हातीं चालत आले त्याला ।
तैसे आपण व्हावें रामार्पण । विषयाचा न लागे तेथे लाग जाण ॥
मनानें भगवंतास जावे शरण । व्यवहारांत दक्षता ठेवावी आपण ॥
अनन्य व्हावें रामास शरण । तुझेविण नाहीं मानणें कांही अन्य ॥
ठेवावा सदा मनीं ध्यास । दया येईल रामरायास ॥
जेव्हां मनासकट देह केला अर्पण । मग मरणाच्या भयाचें काय कारण ? ॥

परमार्थाचे मुख्य साधन । शक्यतो न चुकूं द्यावे अनुसंधान ॥
हृदयी भगवंताचे ध्यान । याविण नाहीं दुजा उपाय जाण ॥
सर्व कांही करीत जावे । परि व्यवहारी न गुंतावे ॥
ऐसें राहावे प्रपंचांत । जसा पाहुणा वागे जगांत ॥
बाह्य सृष्टी विषयाकार । तेथें मन न गुंतूं द्यावे जाण ॥
देह लावावा प्रपंची । मन लावावे रामचरणी ॥
लोभ्याचे चित्त पैशावरी । परि व्यवहार जैसा करी ।
तैसें मन ठेवावे रामावरी । प्रपंचांत असावी हुशारी ॥
चित्त एकाग्र न व्हावया कारण । विषय मानला आपला जाण ॥
घार फिरते आकाशांत । तैसें चित्त राहतें विषयांत ॥
म्हणून दृष्टी ठेवावी त्याचेवर । जे स्वाभाविक आहे स्थिर ॥
एकाग्रतेस करणें साधन । त्याला करणें जरूर नामस्मरण ॥
एकाग्रतेस उपाय एकच खरा । नामीं प्रेमा ठेवा पुरा ॥
निश्चितपणा राखावा । साधनांत जोर आणावा ॥
विषयापासून निवृत्ति । जडावी नामाची प्रीति । त्याला दूर नाही रघुपति ॥
व्यवहारांत असावी दक्षता । परि राम चिंतीत जावा सदा ॥
प्रपंचांत असावे लक्ष । तरी त्याचा चित्तीं घेऊं नये पक्ष ॥
परमात्म्याने जें जें दिले । तें तें त्याचें म्हणून सांभाळावे भले ।
मुला-बाळांचे करावें जतन । रामाने दिलेलें हें जाणून ।
त्यांच्या लोभांत न गुंतवावें चित्त । हाच परमार्थ सत्य ॥
सर्व कांही करावे । मीपणाने न राहावे ॥
रामसेवा रामासाठी । न जाणावी विषयासाठी ॥
प्रपंच न मानावा सुखाचा । तो असावा कर्तव्याचा ॥
सदा राहावें सावधचित्त । मनानें भजावा भगवंत ॥

२९४. जें जें कांही माझे । तें तें जाणावें रामाचें ।
राम त्यास सांभाळिता । काळजीस कारण उरले नाही आतां ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

October 19, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १९ ऑक्टोंबर २०१४

१९ ऑक्टोबर

संस्कारकर्मांचा मूळ हेतू. 

 



धार्मिक संस्कार फार चांगले असतात, कारण त्यांनी आपल्या मनाला वळण लागते. प्रत्येक धर्मामध्ये संस्कार असतातच. ज्या मनुष्याला संस्कार नाही तो कोणत्याच धर्माचा नाही; मग तो आस्तिक असो वा नास्तिक असो. खरे म्हणजे कोणतेच कर्म यथासांग घडत नसते; पण त्यातल्या त्यात, संस्कारकर्म मनुष्याने शास्त्राप्रमाणे करावे. त्यामध्ये जिथे कमी पडेल तिथे भगवंताचे स्मरण करावे, कारण भगवंताची श्रद्धा वाढावी हाच संस्काराचा मूल हेतू आहे. संस्कार करीत असताना जरूर असलेला धार्मिक विधी तर करावाच, पण ज्यांना आपल्याविषयी प्रेम आहे असे, आणि आपल्याला ज्यांच्याविषयी प्रेम आहे असे जे लोक आहेत, त्यांना जेवायला बोलवावे. लौकिक मात्र वाढवू नये. वाईट ते सोडणे आणि चांगले ते धरणे हाच संस्काराचा मुख्य हेतू. संस्कार हे भगवंताचे स्मरण करून देतात. समाज हा बंधनाशिवाय राहूच शकत नाही. 'आम्हाला बंधने नकोत' असे म्हणणारे लोक वेडे आहेत. बंधनामुळेच आपल्या धर्माला सनातनत्व आले आहे. म्हणून बंधनांना अतिशय महत्त्व आहे. धर्म हा कधीच बुडत नसून बंधने बुडत जातात. सध्या बंधने बुडत चालली आहेत. पूर्वी धर्मावर श्रद्धा होती, म्हणून इतक्या सुधारणा नसूनसुद्धा स्वास्थ्य होते. पण आज बाहेरच्या जगात पुष्कळ सुधारणा झाल्या तरी त्या सुधारणांना धर्माचा पाया नसल्यामुळे मानवाला स्वास्थ्य नाही. अलीकडे काही लोक असे म्हणतात की, समाज जसा बदलेल तसे नीतीचे नियम बदलायला पाहिजेत. पण अध्यात्मविद्या असे सांगते की, नीतिचे नियम कायमच आहेत. ते न बदलता माणसाने स्वतःलाच बदलले पाहिजे. एखाद्या समाजाचा पाया बौद्धिक असू शकेल किंवा पैसा असेल, पण ज्या समाजाचा पाया धर्म आहे त्या समाजालाच खरे समाधान लाभेल. धर्म म्हणजे एका अर्थाने व्यवस्थितपणाच होय. धर्म समाजाला संस्काराच्या रूपाने धरून ठेवतो.
व्यवहारामध्ये ज्याचा उपयोग करता येतो तोच खरा वेदांत होय; आणि जो परमार्थाला उपयोगी तोच खरा आणि योग्य व्यवहार होय. भगवंत आम्हाला हवा आहे असे म्हटले, तरी जग आमच्या आड येत आहे असे आम्हाला वाटते. जग आडवे का येते, तर जगाशी आमचे स्वार्थाचे संबंध आहेत म्हणून, जगाशी वागताना आम्हाला निःस्वार्थीपणाने व्यवहार करण्याची सवय नसल्याने जगाचा मोह आम्हाला सुटत नाही. हे सर्व नाहीसे होण्यासाठी आम्ही निःस्वार्थी बनणे खरोखर आवश्यक आहे. त्यासाठी आम्हाला आमचे मन ताब्यात ठेवता आले पाहिजे, आणि त्याकरिता नाम हेच साधन आहे. जन्माला येऊन काही करणे असेल तर भगवंताला न विसरता कर्मे करावी, म्हणजे झाले.


२९३. नामात जो प्रपंच करील त्याचाच प्रपंच पूर्णत्वाला जातो.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

October 18, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १८ ऑक्टोंबर २०१४

१८ ऑक्टोबर

भगवंताच्या प्राप्तीची साधने. 

 



भगवंत आणि आपण ह्यांच्यामध्ये अभिमानाचा पडदा आहे; हा दूर झाला म्हणजे आपल्याला भगवत्प्राप्ती झाली. हा दूर व्हायला अनेक मार्ग आहेत. कर्ममार्ग, हठयोग,राजयोग, वगैरे मार्गांनी हा तितका लवकर दूर होत नाही; उलट क्वचित् प्रसंगी वाढतोही. भक्तिमार्ग सोपा आहे. भक्ति म्हणजे भगवंताला अभिमानरहित अनन्य शरण जाणे, भगवंताचे होऊन राहणे, भगवंताशिवाय दुसरे काहीच न दिसणे, सर्वत्र भगवत् प्रचीती येणे. अशी भक्ति प्राप्त होण्याचा मार्ग म्हटला म्हणजे सर्व कर्तृत्व भगवंताकडे देणे, सर्व त्याच्या इच्छेने चालले आहे असे मानणे, आणि आपली प्रत्येक क्रिया त्याला समर्पण करणे. असे केल्याने आपला अभिमान लवकर नाहीसा होतो. हे साधत नसेल तर गुरु आज्ञेत राहणे, म्हणजेच आपला मान अभिमान, शहाणपण, हे सर्व गुंडाळून ठेवून, गुरु सांगतील तसे, सबब न सांगता वागणे. हेही साधत नसेल तर संतांजवळ नुसते पडून राहणे. त्यांच्या सांगण्याने, सहवासाने, अभिमान हळूहळू कमी होतो.
भक्ति दोन प्रकारांनी उत्पन्न करता येते. पहिला प्रकार म्हणजे सर्व सोडून, लंगोटी लावून, 'भगवंता, तू मला भेटशील तेव्हाच मी उठेन,' अशा निग्रहाने बसणे. हा मार्ग कठीण आहे. प्रापंचिकाला हा साधणार नाही. दुसरा प्रकार म्हणजे सहवासाने भक्ति उत्पन्न करणे. भगवंताचे गुणवर्णन वाचणे, त्याचेच गुण श्रवण करणे, त्याच्या दर्शनास जाणे, प्रत्येक कृत्य भगवंताकरिता करणे, प्रत्येक कृत्यात त्याचे स्मरण ठेवणे; असा त्याचा अखंड सहवास ठेवावा, म्हणजे भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होते. विषयाकरिता केलेली भगवद्‌भक्ति ही खरी भक्ति होऊ शकत नाही. भगवत्‌सेवा निष्काम पाहिजे; कारण भक्ति म्हणजे संलग्न होणे. मी विषयाशी संलग्न असतो तेव्हा ती विषयाची भक्ति होते, भगवंताची नाही. तेव्हा, आपण करतो ही भगवंताची सेवा नसून विषयाची सेवा होते हे ठरल्यासारखे झाले; म्हणजे मी विषयाचाच गुलाम झालो. विषयांचा गुलाम होऊन मी विषय कसचे भोगणार ? मालक होऊन विषय भोगावेत. संत, भगवंत, हे निरतिशय सुख देणारे आहेत. त्यांच्याजवळ विषय मागणे म्हणजे रामाजवळ भिक्षेचे फडके मागण्याइतकेच वेडेपणाचे नव्हे का ? आपण सेवेचे फळ मागून भगवंताला मात्र दूर करतो. भगवंताची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्याभोवती फिरत असावे. भगवंतामध्ये जे मिसळतात ते परत येत नाहीत, हे लक्षात ठेवावे.


२९२. भगवंताच्या प्राप्तीच्या आड येणारे नाहीसे व्हावे म्हणून
तळमळणारा जो असतो, त्याचे साधन बरोबर चाललेले असते.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

October 17, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १७ ऑक्टोंबर २०१४

१७ ऑक्टोबर

अनन्यतेतच भक्ति जन्म पावते. 

 



भगवंतावाचून भक्ति होत नाही. ज्याप्रमाणे सौभाग्यवती म्हटली की तिला नवरा असायचाच, त्याप्रमाणे भक्ति म्हटली की तिथे भगवंत असलाच पाहिजे. भगवंत हा भक्तीचा प्राण आहे. भक्ति आणि माया दोघी भगवंताच्याच स्त्रिया आहेत. पण, म्हणून त्या सवती आहेत. दोन सवती एके ठिकाणी सुखाने नांदत नाहीत हा जगाचा अनुभव आहे. मायेला बाजूला करायची झाल्यास आपण भक्तीची कास धरावी. म्हणजे ती मायेस आपोआप हुसकावून लावते. मायेचे वर्चस्व नाहीसे झाले की आपले काम होऊन जाते.
तालमीत जाणारा आणि तालमीत न जाणारा यांच्यामध्ये थोडातरी फरक दिसायला पाहिजे; तालमीत जाणार्‍याच्या शरीरावर थोडातरी पीळ दिसायला हवा ना ! तसेच, जो भक्ति करतो त्याच्या वृत्तीमध्ये थोडा तरी फरक पडला पाहिजे. आपल्याला जर विद्या पाहिजे असेल तर आपण विद्वानांची संगत धरली पाहिजे, त्याचप्रमाणे आपल्याला भक्ति आणि आनंद पाहिजे असेल तर भगवंताची संगत धरली पाहिजे, सर्व सृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे. याकरिता अनन्यतेची अत्यंत जरूरी आहे. अनन्यतेतच भक्ति जन्म पावते. द्रौपदीची अनन्यता खरी. भगवंताशिवाय मला दुसरा कोणताच आधार नाही याची खात्री पटणे, हेच अनन्यतेचे स्वरूप. माझी प्राप्ती करून घ्यायची असेल तर भक्ति हेच साधन आहे असे स्वतः परमात्म्यानेच सांगितले आहे. जसे नामस्मरण विस्मरणाने करता येत नाही, त्याचप्रमाणे भक्ति अभिमानाने करता येत नाही.
समजा, एखाद्या माणसाचे लग्न झाले. तो काल ब्रह्मचारी होता आणि आज गृहस्थाश्रमी झाला; तरी त्याच्या जीवनांतले इतर व्यवसाय चालूच राहतात. त्याचप्रमाणे, आपण भगवंताचे झालो तरी आपले प्रपंचाचे सर्व व्यवहार पूर्ववत् सुरळीत चालतात. जी जी गोष्ट घडेल ती ती आपण भगवंताला सांगावी. भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ठेवण्यासाठी, भगवंताला सांगून प्रत्येक काम करावे. भक्तीने भगवंत साधतो आणि फलाशा आपोआप कमी होतात. म्हणून आपण उपासना किंवा भक्ति वाढवावी. 'मी देही आहे,' असे म्हणता म्हणता आपण या देहाचे झालो; तसेच मी देवाचा आहे असे म्हणत गेल्याने आपण देवरूप होऊन जाऊ. पण हे होण्यासाठी सगुणोपासनेची जरूरी आहे. रस्ता चालून गेल्याशिवाय जसे आपले घर गाठता येत नाही, त्याप्रमाणे सगुणोपासनेशिवाय आपल्याला उपाधिरहित होता येत नाही. राम कर्ता आहे ही भावना म्हणजेच सगुणोपासना, आणि हेच खर्‍या भक्तीचे स्वरूप आहे. 'तू जे देशील ते मला आवडेल' असे आपण भगवंताला सांगावे, आणि 'माझ्या देवाला हे आवडेल का ?' अशा भावनेने जगात वागावे.

२९१. घडणारी प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने घडते अशी भावना कायम ठेवणे म्हणजेच भक्ति करणे होय.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

October 16, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १६ ऑक्टोंबर २०१४

१६ ऑक्टोबर

परनिंदा व विद्येचा अभिमान माणसाला भगवंतापासून दूर नेतात. 

 



परनिंदा करण्यासारखे पाप नाही. निंदेची सवय फार वाईट असते; तिच्यामुळे आपले स्वतःचेच नुकसान होते. दुसर्‍याला दुःख व्हावे म्हणून माणूस परनिंदा करतो, पण ती ऐकायला तो हजरच कुठे असतो ? म्हणजे मग आपण यात काय साधले ? निंदेमुळे आपलेच मन दूषित होते. दूषित मन किंवा दुष्कर्म हे माणसाला परनिंदेला प्रवृत्त करते. ज्याला परनिंदा गोड वाटते, त्याने समजावे की आपल्याला भगवंत अजून फार दूर राहिला आहे. तिखट तिखटाप्रमाणे लागू लागणे ही जशी सापाचे विष उतरल्याची खूण आहे, त्याचप्रमाणे परनिंदा गोड वाटेनाशी झाली की देव जवळ येत चालला असे समजावे. म्हणून, ज्याला स्वतःचे हित करून घ्यायचे असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि जिव्हा नामाला वाहावी. भगवंताच्या मार्गाने जाणार्‍याने, दुसर्‍याच्या ठिकाणी दिसणार्‍या दोषांचे बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे, आणि अवगुणाचे तण आपल्या अंतःकरणातून काढून टाकून तिथे भगवंताच्या नामाचे बीज पेरावे.
पुष्कळ वेळा आपले दोष आपल्याला कळतात, ते भगवंताचा आड येतात हे देखील कळते, पण त्याला आपला इलाज नसतो. उदाहरणार्थ, काही लोकांची दृष्टी फारच बाधक असते. एखादी चांगली वस्तू किंवा गोष्ट त्यांनी बघितली की ती बिघडते. असे दोष पुष्कळ वेळा ज्याचे त्याला सुधारता येत नाहीत. पण सत्संगती जर लाभली तर मात्र असले दोषदेखील सुधारतात. हाच संतांच्या संगतीचा महिमा आहे. मनुष्य स्वभावतः आपले दोष वाढविण्याचा प्रयत्‍न करीत असल्यामुळे त्याचे जीवन सुखमय होत नाही. तो दुसर्‍याला त्याचा दोष दाखवून देईल, पण त्याला स्वतःला आपला दोष कळणार नाही.
विद्या ही बरेच वेळा मनुष्याला भगवंतापासून दूर नेते. वारकरी पंथातले अडाणी लोक 'विठ्ठल विठ्ठल' म्हणता म्हणता भगवंताला ओळखतात, पण शहाणे लोक परमार्थाची पुस्तके वाचूनही त्याला ओळखीत नाहीत. घरात बदाम आणि खारका यांची पोती भरून ठेवली, तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडामांसात जाऊन रक्तांत मिसळत नाहीत तोपर्यंत त्यांचा उपयोग नाही. त्याचप्रमाणे, पुस्तकी ज्ञानाचे पर्यवसान आचरणात झाले नाही तर ते व्यर्थ जाते. भगवंताकरिता कुणीही कष्ट करून नका; कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे. ती वस्तू सात्त्विक प्रेमाने साध्य होणारी आहे; आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो. तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा, आपापसांत प्रेम वाढवा, म्हणजे मग सर्व जग आनंदमय, प्रेममय दिसू लागेल, आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर पडेल.

२९०. निंदा ही आपल्या साधनाची होळी करते.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

October 15, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १५ ऑक्टोंबर २०१४

१५ ऑक्टोबर

लीन माणसाला भगवंत लवकर साधेल. 

 



नामस्मरण करायचे ते अभिमान टाकून करीत जावे. परमेश्वराला अनन्यशरण जाऊनच त्याचे नाम घेत जावे. पुष्कळ वेळा, आपण साधन करू लागलो म्हणजे आपल्याला अभिमान चढू लागतो, आणि त्यामुळे साधन व्यर्थ होते. संताकडे जाताना आपण मनामध्ये काही एक बरोबर घेऊन जाऊ नये; किंवा काही नेलेच तर भगवंताचे प्रेम न्यावे. आपण प्रपंचाचे प्रेम आणि अभिमान बरोबर घेऊन जातो आणि मग, एकावर एक लिहिलेले जसे वाचता येत नाही तशी अवस्था होते. एखादी वस्तू आपल्याला हवी असे वाटल्यावर आपण तिच्या प्राप्तीविषयी विचार करू लागतो. म्हणूनच पहिल्याने, भगवंत हवा असे आपल्याला वाटले पाहिजे. त्यानंतर त्याच्या प्राप्तीच्या साधनांचा अभ्यास करायला पाहिजे. हा अभ्यास मनाच्या कष्टाचा आहे. क्रोधाला बाहेर येऊ देण्यापेक्षा, क्रोध गिळणे यात जास्त श्रम आहेत. असे करण्यामध्ये आज कष्ट आहेत हे खरे, पण पुढे मात्र सुख आहे हे निश्चित. वागण्यात आणि चालण्यात आपण सावधगिरी बाळगावी; नको ते टाळावे.
अनन्यतेला पैसा लागत नाही, विद्या लागत नाही; त्याला फक्त आपली अभिमानवृत्ती बाजूला ठेवावी लागते. भगवंताचे होण्यासाठी अंगी लीनता आलीच पाहिजे. लीन माणसाला भगवंत लवकर साधेल. लीनतेमध्ये बाकीचा विसर पडून भगवंत तेवढा शिल्लक राहतो. जो वृत्तीने लहान आहे त्याला भगवंत लवकर वश होतो. मनुष्य मोठा असून लहानासारखा वागला तर ते फार चांगले असते. मनाने मात्र आपण बळकट बनले पाहिजे. आपण स्वतःशी चोवीस तास उघडा व्यवहार करावा. भगवंताने आपल्याला केव्हाही जरी पाहिले तरी आपल्याला लाज वाटता कामा नये. आपले वागणे असे असावे की भगवंताची आस मनामध्ये वाढत जाऊन, तिचे पर्यवसान ध्यासामध्ये व्हावे. रात्री जे स्वप्न पडावेसे वाटते ते दिवसभर करावे. यासाठी आपली वृत्ती नामामध्ये गुंतवून ठेवावी. 'असावे सर्वांत पण नसावे कोणाचे' अशा वृत्तीने जो राहील त्याला लवकर परमार्थ साधेल.
देहाच्या उपचारांना जो भुलतो तो भगवंताला अगदी विसरलेला असतो. पण ज्याचे अनुसंधान मजबून असते त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते. पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात. त्यांच्या तावडीत सापडता कामा नये. लोकेषणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच. तो टाळता येणे कठीण आहे. पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे आहे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत.

२८९. अभिमानरहित जावे रामाला शरण । त्यानेच राम आपला होईल जाण ॥

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

October 14, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १४ ऑक्टोंबर २०१४

१४ ऑक्टोबर

परमात्म्याचे प्रियत्व आले की जनप्रियत्व येते. 

 



परमात्म्याने आपल्याला लोककल्याणार्थ सर्व काही शक्ति द्याव्यात, असे काही माणसांना वाटते, पण अमुक एका देहामार्फत लोककल्याण व्हावे अशी इच्छा का असावी ? देहबुद्धी सुटली नाही असाच याचा अर्थ नव्हे का ? शक्ति वापरण्याचे सामर्थ्य आपल्याला आले तर परमात्मा कदाचित् ती देईलही. लहानाच्या हातात तरवार देऊन काय उपयोग ? लोकांनी आपले ऐकावे असे तुम्हाला वाटते; पण अजून क्रोध अनावर आहे, मन ताब्यात नाही, असेही म्हणता ! तर आधी आपल्या विकारांवर, मनावर छाप बसवा आणि मग लोकांबद्दल विचार करा ! तुम्हाला जनप्रियत्व पाहिजे ना ? मग जनांचा राजा परमात्मा, त्याचे प्रियत्व संपादन करा, म्हणजे जनप्रियत्व आपोआपच येईल. तुम्हाला लोक वाईट दिसतात, पण त्यांना सुधारायला जाऊ नका. तुमच्याच मनात वाईट आहे म्हणून लोक तुम्हाला तसे दिसतात. स्वतःला आधी सुधारा म्हणजे कुणीही वाईट दिसणार नाही.
लहान मुली बाहुलीबरोबर खेळतात, तिला जेवू घालतात, निजवतात. त्यांना ठाऊक असते की ही निर्जीव आहे, पण भावनेने तिला सजीव कल्पून तिच्याशी त्या खेळतात. तुम्हीही अशी भावना का करीत नाही की, परमात्मा आपल्याशी बोलतो आणि आपणही त्याच्याशी बोलतो ? ही भावना जो जो जास्त दृढ होईल, तो तो खरोखर तो तुमच्याशी बोलू लागेल. मनातून आपले नाते भगवंताशी ठेवावे. आपले सगळे जीवन जर भगवंताच्या हाती आहे, तर जीवनातल्या सर्व घडामोडी त्याच्याच हातात असणार.
आपण सात्त्विक कृत्ये करतो, पण त्यांचा अभिमान बाळगतो. सात्त्विक कृत्ये चांगली खरी, पण त्यात अभिमान ठेवला तर फार वाईट. एक वेळ वाईट कृत्ये परवडली; केव्हा तरी त्यांचा पश्चात्ताप होऊन मुक्तता तरी होईल. पण सात्त्विक कृत्यातला अभिमान कसा निघणार ? मी आप्त‍इष्टांना मदत केली, आणि आप्त‍इष्ट म्हणू लागले, 'यात याने काय केले ? परमात्म्याने त्याला दिले म्हणून त्याने मदत केली !' हे ऐकून मला वाईट वाटते ! इथे वास्तविक पाहता परमात्मा त्यांना आठवला, आणि मी मात्र 'मी दिले' असा अभिमान धरून वाईट वाटून घेतो ! परमात्म्याने त्यांना माझ्या हाताने दिले, हीच सत्य स्थिती असताना मला वाईट वाटण्याचे काय कारण ? म्हणून, परमात्म्याच्या इच्छेने सर्व काही घडते आहे ही भावना ठेवावी. आपण परमात्म्याजवळ मागावे की, "तू वाटेल त्या स्थितींत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस, माझा मीपणा काढून टाक. तुझा विसर पडू देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे."

२८८. आपले जीवन देवाच्या हाती आहे, आणि देव नामाच्या स्वाधीन आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

October 13, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १३ ऑक्टोंबर २०१४

३ ऑक्टोबर

निष्ठा बलवत्तर असावी. 

 



पोथीची समाप्ती झाली, म्हणजे ऐकण्याचे संपून कृतीत उतरण्याची वेळ आली असे समजावे. पोथी ऐकण्याचा मोबदला पुराणिकाला पैका दिल्याने मिळत नाही; तो असा असावा की दोघांचेही कल्याण होईल. भगवद्‌भक्ति करणे हा खरा मोबदला आहे.
जगात अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्यांचे ज्ञान आपल्याला होत नाही; पण म्हणून काही आपण त्या खोट्या नाही मानीत. आपण आपल्या तुटपुंज्या ज्ञानाचाही अभिमान धरतो हे चुकते आपले. भगवंताने ज्ञान दिले, आणि आम्ही त्याचा अभिमान धरू लागलो, तर हातात तरवार दिल्यावर शत्रूचे शिर कापण्याऐवजी आपलीच मान तोडल्यासारखे झाले ! ज्या विद्येने स्वतःचे हित कळत नाही, ती विद्या नसून अविद्याच होय. जे खरे नाही ते खरे आहे असे वाटणे, हे अज्ञान होय. अविद्या आणि अज्ञान दोन्ही सारखेच. परमात्म्याच्या स्वरूपाविषयी आपण संशय घेतो हे आपले अज्ञानच होय. देव आपल्याला आणि आपल्या कृतीला पाहतो ही जाणीव असणे, म्हणजे ज्ञान होय.
प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढे भगवंत देतच असतो. म्हणून आहे त्यात समाधान ठेवावे. ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीत टिकेल. आपली निष्ठा अशी बलवत्तर असावी की तिच्यामुळे आपले समाधान राहील. हरिश्चंद्र, प्रह्लाद, वगैरे मोठ मोठ्यांचा किती छळ झाला ! पण त्यांची निष्ठा अती बलवत्तर असल्याने ते त्या छळातून सुखरूप पार पडले. परिस्थिती सारखी बदलत असते; म्हणून जे फळ आपण आज मागतो ते बदललेल्या परिस्थितीत सुखाचे होईलच याची खात्री नाही. म्हणून जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे. गीतेत असे सांगितले आहे की, सर्व धर्म सोडावेत पण भगवंताला शरण जावे; पण ते न करता आपण विषयालाच शरण जातो, त्याला काय करावे ? अर्जुनाने भगवंताला आपल्या बाजूला घेतले, आणि त्यामुळे पांडवांचे जे समाधान टिकले, ते काही कौरवांचे टिकले नाही. पांडवांनी देहाने वनवास सोसला; पण मनाने त्यांनी भगवंताला भजल्यामुळे वनवासातही ते समाधानात राहिले. भगवंताच्या इच्छेने सर्व होते आणि सर्व तोच करतो, अशी भावना ठेवणे यासारखे समाधान नाही. आनंद कृतीत आहे, फळाच्या आशेत नाही. नामस्मरण ही कृती केली तर शाश्वत आनंद आणि समाधान आपल्याला मिळाल्यावाचून राहणार नाही. जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते अशा खर्‍या भावनेने एक वर्षभर जो राहील, त्याला समाधान हे काय आहे हे खात्रीने कळेल.

२८७. नाम घेताना देवाला सांगावे, " प्रपंचातले काही मला देऊ नकोस, मला तुझे प्रेम दे."


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

October 12, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १२ ऑक्टोंबर २०१४

१२ ऑक्टोबर

वृत्ति भगवंतमय होणे याचेच नाव भक्ति. 

 



भगवंतापासून पंचमहाभूते निर्माण झाली; आणि तसे बघितले तर सर्व चमत्कार भगवंताच्या सामर्थ्याने पंचमहाभूतांचेच असतात. भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते ते सर्व आपल्या ठिकाणी आहे. भगवंत हा जगाचा मालक आहे. त्याच्या सत्तेने सर्व व्यवहार घडतात. आपण जीव त्याचा अंश आहोत. म्हणून आपण कर्तव्य करावे, आणि फळ भगवंताच्या इच्छेवर सोपवावे. आता प्रश्न असा आहे की, सर्व गोष्टी जर भगवंताच्या इच्छेने घडतात, तर माझी इच्छाही भगवंत उत्पन्न करतो; आणि असे आहे तर मी माझी इच्छा का मारावी ? अगदी बरोबर आहे. रात्री अंधार पडतो त्याला कारण कोण ? त्याला कारण सूर्य ! कारण सूर्य मावळला की अंधार पडतो. याचा अर्थ असा की, ज्याप्रमाणे प्रकाशाचे कारण सूर्य आहे त्याचप्रमाणे अंधाराचे कारण पण सूर्यच आहे; फरक इतकाच की, प्रकाशाचे कारण तो असणेपणाने आहे, आणि अंधाराचे कारण तो नसणेपणाने आहे. हे जसे खरे, तसे माझ्या इच्छेचे कारणसुद्धा भगवंतच आहे, पण नसणेपणाने कारण आहे इतकेच. सारांश, भगवंताचा विसर पडला की माझी इच्छा जन्म पावते. म्हणून, ज्याला भगवंत हवा असेल त्याने त्याचे स्मरण करावे आणि आपली इच्छा त्याला अर्पण करावी.
आपली देहबुद्धी नष्ट झाली की भगवंत ओळखता येतो. ज्याप्रमाणे इमारतीचा नकाशा कागदावर असतो, त्याचप्रमाणे सगुणमूर्ती हेच आपले परब्रह्म. एकदा नकाशा पक्का झाल्यावर मग इमारत बांधणे जड जात नाही. सगुणमूर्तीचे ध्यान करावे. 'ब्रह्म निराकार आहे, त्याला आकारात आणणे ही चूक आहे,' असे कुणी कुणी म्हणतात, पण मी स्वतः जोपर्यंत आकारात आहे तोपर्यंत सगुणमूर्तीचे पूजन आवश्यकच आहे. 'मी रामाचा आहे' असे म्हणणे म्हणजे 'मी ब्रह्म आहे' असे म्हणणे होय. तदाकार वृत्ती होणे याचे नाव अनुसंधान; आणि अनुसंधानाने वृत्ती भगवंतमय होणे याचे नाव भक्ति. 'ब्रह्म सत्य जग मिथ्या' याचा थोडक्यात अर्थ म्हणजे; 'जग जसे आहे असे आपण समजतो तसे ते नाही.' अंतर्बाह्य परमात्मा दिसू लागणे हेच भक्तीचे लक्षण आहे. याकरिता, आपल्या कृतीकडे भगवंत पाहतो ही जाणीव नेहमी कायम ठेवावी. भगवंतापासून मी दूर आहे ही भावनाच मनात आणू नये. भगवंताच्या प्राप्तीकरता देहाचा सांभाळ करावा. मन रामाकडे गुंतलेले असले म्हणजे देहाचा विसर पडतो. म्हणून नामस्मरणाच्या योगाने मन भगवंताच्या ठिकाणी विलीन करावे. हेच परमार्थाचे सर्व सार आहे.


२८६. वेदांती ज्याला 'ब्रह्म' असे म्हणतात, त्यालाच भक्त 'नाम' असे म्हणतात.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

October 11, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ११ ऑक्टोंबर २०१४


११ ऑक्टोबर

भगवंताजवळ 'वास' ठेवल्यावर वासना राहातच नाही. 

 



एखादा मनुष्य दुष्ट निघाला, तर 'मागच्या जन्मी तो कसाब असेल' असे आपण म्हणतो, पण हे बरोबर नाही. मनुष्याला वासनेनेच जन्म येतो, कर्माने नाही. म्हणूनच कर्म टाळायचे नसते, त्याच्यामागची वासना टाळावी लागते. कर्म हे केव्हाही बाधक ठरत नाही, तर कर्माचा हेतू बाधक ठरतो. अधिकार्‍यापुढे शिपाई चालतो आणि कैद्याच्या पुढेही चालतो. परंतु यामध्ये जो फरक आहे, तोच संताच्या आणि आमच्या वासनेत आहे. आम्ही वासनेचे खत विषयाला घालतो आणि विषयांतच गुंतून राहतो. वासनेचा क्षय सत्संगाशिवाय नाही होणार. संगतीने मनावर परिणाम घडतो. वासना ही दुसर्‍या कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून, आपण भगवंताजवळ 'वास' ठेवला तरच ती नष्ट होते. 'वासना' म्हणजे 'विषयाजवळचा वास ना - म्हणजे नको.' सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत वासनेमुळे सर्व कर्म एकमेकांत गुंतून गेले आहेत. म्हातारे आणि तरुण या सर्वांना वासना सारखीच आहे. 'मी आता कंटाळलो' असे म्हटले, तरी वासना आपल्याला सोडीत नाही, आणि देह ठेवतानाही आपली वासना आपल्याबरोबर येते. परमात्मा जसा चिरंजीव आहे, तशी वासना पण चिरंजीव आहे.
वासनेच्या म्हणजे हवेपणाच्या तीन अवस्था आहेत, एक आस, दुसरी हव्यास, आणि तिसरी ध्यास. आस म्हणजे वस्तू नुसती हवीशी वाटणे; हव्यास मध्ये वस्तू नेहमीच आपल्या जवळ असावीशी वाटते आणि ध्यासामध्ये त्या वस्तूशिवाय इतर काहीच सुचत नाही. मोठे झाड तोडायचे असेल तर आपण त्याच्या वरच्या फांद्या आधी तोडतो, नंतर बुंधा तोडतो, त्याचप्रमाणे वासनेचे झाड तोडण्यासाठी त्याच्या फांद्या, म्हणजेच आपले हवे-नको पण, आधी तोडाव्या, आणि शेवटी वासना मारावी. आपल्याला जे मागायचे आहे ते भगवंताजवळच मागावे. त्याने ते नाही दिले, तर ते न देणेच आपल्या हिताचे आहे अशी बुद्धी उत्पन्न होईल. त्यानेच वासना मरेल; आणि वासना नष्ट झाल्यावर बुद्धी भगवद्‌स्वरूप होईल. काहीही न करता मिळावा इतका का परमार्थ सोपा आहे ? त्याच्यासाठी निदान वाईट वासना तरी मारायला नको का ? आणि चांगल्या वासनासुद्धा नीति आणि धर्माला धरून असतील तेवढ्याच भोगाव्या. श्रीमंतांच्या गरजा मरेपर्यंत भागत नाहीत, कारण त्यांना वासना जास्त असते. काळ हा आपल्याला आशेत गुंतवून ठेवतो, आणि शेवटपर्यंत सुख न देता आपले आयुष्य संपवितो. जो जिवंतपणी वासनारहित राहिला त्याला सुखदुःख नाही. आपण आपल्याच घरामध्ये पाहुण्यासारखे वागावे. असे राहण्याने वासना क्षीण होईल.


२८५. 'राम कर्ता' ही भावना ठेवून नामात राहण्याचा प्रयत्‍न करा,
म्हणजे वासनेची नांगी मोडलीच म्हणून समजा.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

October 10, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १० ऑक्टोंबर २०१४

१० ऑक्टोबर

राम ठेवील त्यात समाधान ।
हे खर्‍या भक्ताचे लक्षण जाण ॥ 

 



    

नसावे कशाचे ज्ञान । वाटावे सदा घ्यावे रामनाम ।
प्रपंची राखावे समाधान । हेंच भक्ताचे मुख्य लक्षण जाण ॥
डोळे व कान ह्यांनी होते बाह्य जगाचें ज्ञान । त्यांना लावावे नामाचे अनुसंधान ।।
राम आणावा चित्तीं । 'त्याचा प्रपंच करतो' ही राखावी स्मृति ।।
स्वार्थहीन व्हावे आपण । तें होईल करतां परमात्मस्मरण ।।
संधि साधून जो राहिला । तोच जगीं धन्य झाला ।।
नाटकांत नट काम करी जैसें । आपण वर्तत जावें तैसें ।।
राजा रंक होई जरी । तरी मी कोण हें जाणून राहे अंतरीं ।।
जग सज्जन-दुर्जन मिश्रित । त्यांतून शोधून काढावा अवचित ।।
जो लाभेल संगतीला । रामाचें प्रेम दुणावेल त्याला ।।
द्वेष, मत्सर, अहंकारवृत्ति, । यांची न धरावी संगति ।।
मानापमान करावे सहन । साक्ष ठेवून रामचरण ।।
सर्व कांही करावें । पण खरें प्रेम साधनावर असावें ।।
अभिमानरहित राहावें । हेंच शिष्याचे लक्षण जाणावें ।।
राम व्हावा माझा । रात्रंदिवस काळजी ठेवीत जा ।।
लक्ष ठेवावें संताकडे । देह लावावा प्रपंचाकडे ।।

गुणांत उत्तम गुण । आपले कळावे अवगुण ।
अवगुण कळले ज्याला । तो सुधारण्याच्या मार्गाला लागला ।।
प्रथम स्वाधीन करीं आपले मना । सोडावा अहंभाव, विषयवासना । काही पाहिजे हें न वाटावे मना ।।
व्यवहारांत असावे दक्ष । कधीं न घ्यावा विषयी लोकांचा पक्ष ।।
दुर्जनाची संगति । तीच रामाला दूर करिती ।।
म्हणून मनासी धरावा सत्संग । रामाविण दुजा नसावा रंग ।
उदास व्हावें एकाच वेळीं । केव्हा भेटेल वनमाळी ।।
तळमळीचे मुख्य लक्षण । दुसरे विषयाची न व्हावी आठवण ।।
पतिव्रतेला पति जाण । तैसें साधकाला साधन जाण ।।
मोहाला बळीं पडणें । याहून नाहीं दुजें लाजिरवाणें ।।
विघ्न रामसेवेंत भारी । तरी आपण सांभाळावें हातीं घेऊन शिरीं ।।
रामाची सेवा हा जाणावा संसार । मग सुखाने करावा व्यवहार ।।
देवास करावा नैवेद्य अर्पण । प्रसाद घ्यावा त्याचा आपण ।।
चित्त ठेवावें रामापाशीं । ध्यास असावा त्याचा अहर्निशीं ।।
गुरूकडून घेतलेले नाम पावन करील जगास । हा ठेवावा विश्वास । राम कृपा करील खास ।।
देहानें नाहीं करता आले । मन रामापायीं गुंतवले । रामानें त्याचें कल्याण केलें ।।
राम ठेवील त्यांत समाधान । हेंच खरे भक्ताचें लक्षण जाण ।।
भगवंतावांचून मनीं न येऊ द्यावें काही । भगवत्स्वरूप तो सर्व ठिकाणीं पाहीं ।।
आपण व्हावें रामाचें । उदाहरण घालून द्यावें साचें ।।

२८४. नामाहून दुजे काही । सत्य त्रिवाचा नाही ॥
निर्हेतुक घ्यावे नाम । जेणे जोडेल आत्माराम ॥

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

October 9, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ९ ऑक्टोंबर २०१४

९ ऑक्टोबर

भगवंताचे स्मरण हेच भक्तीचे रहस्य ! 

 



'मी नाही, तू आहेस' हे जाणणे हीच खरी भक्ति होय. भक्तीचा विषय एक भगवंत ठेवला, की बाकी सर्वांचा विसर पडतो. भक्ति केली की चित्त निर्विषय होते, हे सांगावेच लागत नाही. स्वतःचे विस्मरण आणि भगवंताचे स्मरण हेच भक्तीचे रहस्य. भगवंताची प्राप्ती पाहिजे असेल तर भक्ती करावी. भगवंताच्या चरित्रात भक्तांच्या सर्व तर्‍हा आहेत. त्यामध्ये आपण कुठेतरी खासच बसू ! भगवंताने त्या सर्वांना समाधान दिले, मग ते आपल्याला का मिळणार नाही ? जग प्रगतीपर आहे हे खरे; पण पैसा, मुले, मान्यता, वगैरे ऐहिक सुखांची वाढ होणे यालाच आपण प्रगती समजतो. भगवंताची भक्ति ही खरी प्रगती होय. ही प्रगती बाहेर दिसण्यासारखी नाही. भगवंतावाचून यश हे अपयशच समजावे. कित्येक वेळा अपयश हेच यश बनते; म्हणून अपयश आले तरी, ते भगवंताच्या इच्छेने आले असे समजून शांत रहावे. 'भगवंत आहे' असे म्हणणे किंवा मानणे याचा अर्थ असा की, ही सर्व सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे. त्या सृष्टीचे तो रक्षण आणि पालन करतो. सृष्टीमध्ये अनेक समूह आहेत, त्यांचेसुद्धा रक्षण आणि पालन तोच करतो. त्या समूहांपैकी आपण एक जीव आहोत, आणि आपलेही रक्षण आणि पालन तो सदा करीत आहे.
खरे पाहिले असता प्रत्येक मनुष्य अद्वैताचाच अभ्यास करीत असतो. अद्वैतामध्ये नेणारे द्वैत आपल्याला पाहिजे आहे. भगवंत, म्हणजे सगुण परमात्मा, असा आहे की वेगळा दिसतो खरा, परंतु भक्ताला तो आपल्यासारखा करून घेतो. आई आणि मुलगा यांच्यामध्ये साम्य असते. मुलाचा आवाज आईला नेहमी गोडच लागतो, त्याप्रमाणे भक्ताचा आवाज भगवंताला गोड लागतो. शेताची राखण करण्याकरिता जसे काठीवर कांबळे घालून त्याचे सोंग करतात, तसेच सगुण उपासनेचे आहे. राखणदार हजर नसताना ते सोंग ज्याप्रमाणे शेताचे रक्षण करायला उपयोगी पडते, त्याचप्रमाणे निर्गुणाच्या अभावी परमात्म्याची आठवण करून देण्यासाठी सगुण हे उपयोगी पडते. डोंगराच्या माथ्यावर चढल्याशिवाय आपले पलीकडे असलेले गाव जसे आपल्याला दिसत नाही, तसे सगुणरूपमय झाल्याशिवाय निर्गुण होता येत नाही.
जो भगवंतावर अवलंबून आहे तोच खरा स्वतंत्र होय. भगवंताचा ध्यास लागणे म्हणजे तद्‌रूपच होणे होय. भगवंताची प्रीति याचेच नाव भक्ति. 'माझा त्राता, माझी काळजी घेणारा, माझे रक्षण करणारा आणि पालन करणारा तो भगवंत आहे' असे मानणे आणि तसे वागणे हीच भगवंताबद्दलची खरी अस्तित्वबुद्धी होय. आपले स्वतःवर जितके प्रेम आहे, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करणे हीच खरी उपासना, आणि हेच जीवनाचे सर्वस्व होय.

२८३. संकटांचे डोंगर अंगावर पडले तरी ज्याची वृत्ती
भगवंतापासून वळत नाही, तोच खरा भगवंताचा झाला.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

October 8, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ८ ऑक्टोंबर २०१४

८ ऑक्टोबर

प्रयत्‍न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी. 

 



जगात कुणीही सुखी नाही असे समर्थ सांगतात. पण एखादा राजाच्या पोटी जन्माला आला म्हणून सुखी झाला, असे आपण मानतो ! खाण्यापिण्याची अडचण नसली म्हणजे त्याला इतर काही काळज्याच नाहीत असे म्हणून कसे चालेल ? ' मागच्या जन्मी मी कुणाचा तरी घात केला म्हणून आज हे दुःख वाट्याला आले आहे, ' असे आपण म्हणतो, आणि त्याबरोबरच फलाशेने कर्म करून पुढील जन्माची तयारी आजच करू लागतो. पण त्यातून सुटण्याचा काही मार्ग दिसत नाही. कर्मामध्ये आजवर मोठेमोठे लोक गुंतून राहिले आहेत. जन्माला आलो तो जन्माचे सार्थक करून घेण्याकरिता; पण या फेर्‍यातच आपण अडकून पडलो तर काय उपयोग ? आपण एखाद्या कापडाच्या गिरणीत गेलो तर म्हणतो, 'काय धोटे फिरतात !' परंतु फिरवणारा तर दुसरीकडेच असतो, त्याप्रमाणे, देहाचे देहपण जीव असेल तोपर्यंत; त्यामधून तो जीवात्मा नाहीसा झाला की, देहाचे देहपणही नाहीसे होते. आत्म्याच्या संयोगाने सर्व काही चालते.
एका गृहस्थाला फार काम असे, जेवायलाही फुरसत मिळत नसे. त्याच्या आईने त्याच्या खिशात बदाम, खडीसाखर, वड्या अशा जिनसा टाकल्या आणि सांगितले की, "येताजाता, काम करता करता, एक एक तोंडात टाकीत जा." त्याप्रमाणे, संतांनी आम्हाला नामरूपी खाऊ दिला आणि सांगितले की, "येताजाता, काम करता करता, हा तोंडात टाकीत जा, म्हणजे लोभाची भूक लागणारच नाही, फार सुख होईल."
एका गृहस्थाचे त्याच्या भावाशी भांडण होते. त्याने जेव्हा आपले मृत्युपत्र केले तेव्हा त्यामध्ये लिहिले की, "माझ्या शवाला माझ्या भावाचा हात लागू नये." काय ही देहबुद्धीची पराकाष्ठा ! आज आपल्याला जे करणे योग्य आहे ते करायचे सोडून, मनुष्य कालचे आणि उद्याचे पाहात बसतो. पुष्कळ लोकांना 'उद्या काय होणार ' हे कळायला पाहिजे असते. पण आपला पुढचा काळ चांगला यावा म्हणून आपण आज चांगले वागणे जरूर आहे; तसे न करता मागच्याचा किंवा पुढच्याचा विचार करीत बसणे म्हणजे जे करू नये ते करणे, हे मायेचे लक्षण होय. मायेच्या तावडीत जे सापडलेले आहेत ते लोक करू नये ते करतील, आणि उद्याची काळजी करतील. मनुष्याची एक स्थिती कधीच कायम राहात नाही. आजची वाईट स्थिती जाऊन चांगली स्थिती उद्या ना परवा येणारच असते. पण आपला प्रयत्‍न आपण कधी सोडू नये. व्यवहारात नेहमी प्रयत्‍न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी. कर्माचा हेतू जाळून टाकावा ही पुढची पायरी. रामाच्या इच्छेने सर्व काही होते ही दृढ भावना ठेवून, मरणाची भिती बाळगू नये आणि जाण्याची काळजी करू नये. नेहमी नामस्मरणात राहण्याचा प्रयत्‍न करावा.

२८२. कर्तव्यी असावे तत्पर । मुखी नाम निरंतर ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

October 7, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ७ ऑक्टोंबर २०१४

७ ऑक्टोबर

त्याग हे यज्ञाचे खरे मर्म आहे. 

 



सदाचरणाने राहणार्‍या माणसाला खर्च कमी लागतो, कारण खर्‍या समाधानाने पोट भरले की अन्नही कमी लागते. मी हे वारंवार सांगतो, कारण सदाचरणाचे, नीतिधर्माचे आचरण, हा परमार्थाच्या इमारतीचा पाया आहे. पाया भक्कम नसेल तर त्यावरची इमारत जास्त दिवस टिकू शकणार नाही. त्याप्रमाणे नीति जर सांभाळली नाही, तर पुढच्या कर्माचा फारसा उपयोग होत नाही. परस्त्री मातेसमान माना, परद्रव्याची अभिलाषा बाळगू नका आणि परनिंदेला विष्ठा समजून त्याग करा. या तीन गोष्टींना फार सांभाळा. परमार्थाची इमारत या तीन गोष्टींवर उभी करायची आहे. नुसता पाया बांधून ज्याप्रमाणे घरात राहता येत नाही, त्याप्रमाणे पायाशिवाय इमारतही उभी करता येत नाही. 'राम कर्ता' ही भावना ठेवून नामात राहणे, म्हणजे परमार्थरूपी इमारतीत आनंदात राहणेच होय. व्यावहारिक मोठेपणा बाजूला ठेवा आणि देवाला अनन्यभावाने शरण जा. देवाला शरण जाताना सर्व विसरून जा. समजा एखादा माणूस नाटकात राजाचे काम करीत असला आणि नाटक संपल्यावरही तो घरी येऊन जर राजासारखे वागू लागला, तर त्याचा व्यवहार बिघडून जाईल; त्याचप्रमाणे, देवाला शरण जाताना, मी मोठा भक्त, विद्वान, पैसावाला, ही सर्व नाती विसरून गेले पाहिजे.
कर्माचे फळ आपल्या हातचे नाही म्हणून त्याची काळजी करू नये, हे समजले तरी, काळजी न करणे हे देखील आपल्या हातचे नाही म्हणून आपण काळजी करतोच ! यासाठीच भगवंताच्या नामात राहण्याची सवय करा. कर्म करणे यात विशेष नाही. आपल्याला कर्म केल्याशिवाय चैनच पडत नाही. 'कर्म करा' असे गीतेतही सांगितले आहेच. परंतु कर्म केल्याने पाहिजे ते फळ आपल्याला मिळतेच असे नाही. म्हणून भगवंताला स्मरून कर्म करा, आणि मग काय काय होते ते पहा. हेच निष्काम कर्म. भगवंताच्या इच्छेने सर्व घडते आहे ही भावना ठेवून आपले कर्तव्य करणे, हे सर्व गीतेचे सार आहे.
जो समजून त्याग करील त्याला फायदा होईल. नाहीतरी, संन्यास आणि त्याग दोन्ही आपल्याजवळ सुद्धा आहेत. भगवंताच्या बाबतीत आपण संन्यासी वृत्ति धारण करतो आणि आपण आपल्या आईबापाला सोडतो असा त्याग करतो ! हे काय कामाचे ? त्याग हे यज्ञाचे खरे मर्म आहे. भगवंताच्या प्राप्तीच्या आड जे जे येते ते ते टाकणे, म्हणजे यज्ञ करणे होय. या यज्ञामध्ये वासनांची आहुति द्यावी. कोणत्याच गोष्टीबद्दल हवे अगर नको असे न वाटणे, हेच वासनांची आहुती दिल्याचे लक्षण आहे.

२८१. जेथे वासना संपली तेथेच भगवंताची कृपा झाली.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )