१८ डिसेंबर, २०२२

ब्रह्मचैतन्य_गोंदवलेकर_महाराज_पुण्यतिथी

जिथे एकच 'रंग'
नामाचा... 🌺
जिथे एकच ध्यास
'रामाचा'....🌹

तिथे आशिर्वाद 
"ब्रह्मचैतन्याचा"..।🌸

#ब्रह्मचैतन्य_गोंदवलेकर_महाराज_पुण्यतिथी
#मार्गशीर्ष_कृ_दशमी
#देवा_तुझ्या_द्वारी_आलो 
१८/१२/२२ 📝 

९ डिसेंबर, २०२२

एकच ग्रह, एकच स्थान वेगळ्या राशी

.काल एकाने विचारलं, एकच ग्रह पत्रिकेत एकाच स्थानात पण वेगळ्या राशीत असेल तर वेगळी फळं का देतो?
म्हणलं अहो, तो ज्या राशीत आहे त्याचं कारकत्व, राशी स्वामीचे कारकत्व, त्याची पत्रिकेतील जागा, त्या ग्रहाचे राशी स्वामीशी नाते ( मित्र/ शत्रू )तो कुठल्या नक्षत्रात आहे, तत्व, ग्रहांची अवस्था वगैरे अनेक गोष्टी असतात. कळलं?
म्हणावा तसा प्रतिसाद समोरून न आल्याने त्यांना म्हणले,एक उदाहरण सांगतो.
तुम्ही लेखन करता, सोशल मिडीयावर पोस्ट करता
लेख एकच
पण 'अनुदिनीत / ब्लाॅगवर'  वाचले जाईल याची तुम्हालाही शाश्वती नाही
'व्हाटसप' वर सगळे वाचतील पण एकही लाईक मिळणार नाही

पण हेच ब्लाॅगवाले/ व्हाटसपवाले, 
' फेसबुकवर' मात्र तुम्हाला लाईक आणि प्रतिक्रिया भरभरुन देतील 

हे मात्र त्याला पटलं 😁

( प्रॅक्टिकल)  अमोल
०९/१२/२२ 📝 

२७ नोव्हेंबर, २०२२

दृष्यम की अदृष्यम

दृष्यम ( की अदृष्यम) 

एखादा सिनेमा, त्यातील एखादी पंच लाईन डोक्यात अशी फिट्ट बसते की बस रे बस! 
 नुकत्याच आलेल्या सिनेमातील  एक वाक्य जाम फिट बसलय. 👇🏻

"सवाल ये नही की, आपकी आँखो के सामने क्या है, सवाल ये है की
आप देख क्या रहो हो" 🧐

सिनेमाची सुरवात एका स्वगताने  होते त्यातील मला भावलेल्या या दोन ओळी.

अनेक मोटिव्हेशनल सेमिनार, व्यक्तीमत्व विकास शिबीरं, OBT टेक्नॉलॉजी वगैरे शिकताना अगदी कुठेही हे लागू पडेल. 

ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर हे वाक्य म्हणजे
 'ज्योतिष शास्त्राची गुरूकिल्ली ' असं म्हणले तर चुकीचे ठरू नये.

गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून ज्योतिषाचा अभ्यास करत असताना, वेगवेगळ्या पुस्तकात दिलेली माहिती वाचताना, यू-ट्यूबवरचे विविध विषयांवरचे व्हिडिओ पाहताना अनेक मान्यवर अभ्यासक, शिक्षक, लेखकांनी हे ब-याचदा या आधीच सांगितले आहे. ज्योतिषाला पत्रिका पाहताना एक खास दृष्टी पाहिजे. नामवंत ज्योतिषी व.दा भट यांनी तर त्यांच्या अनेक पुस्तकात वेळोवेळी एक उल्लेख केलाय तो म्हणजे ज्योतिषांना 'पत्रिकेतील निर्णायक घटक' ओळखता आला पाहिजे. 

समोर असणाऱ्या चौकोनाच्या १२ भागात, १२ राशी आणि त्यात वेगवेळ्या ठिकाणी किंवा काही वेळा काहीजण मिळून एकत्रीत येणारे असे एकंदर १२ ग्रह हे पत्रिकेचे दिसणारे "दृष्यम " स्वरूप.

हे सगळं तुमच्या समोर आहे पण इथे अनेक 'अदृष्यम गोष्टी ' ज्या पत्रिकेचा निर्णायक घटक ठरू शकतात त्या शोधण्यासाठी योग्य दृष्टी आणि तेवढा अभ्यास असणे आवश्यक.

 समुद्रातल्या लाटांशी आपला संबंध आपण जेवढा वेळ समुद्रात असतो तेवढाच असतो. एकदा तेथून बाहेर आलो की आपला लाटांशी संबंध संपला. पण म्हणून लाटा थांबत नाहीत. तसंच प्रत्येक क्षणी नवीन पत्रिका तयार होत असते त्या प्रत्येक क्षणाच्या पत्रिकेचा अभ्यास करणे निव्वळ अशक्य. समुद्रांच्या लाटांप्रमाणे निर्माण झालेल्या पत्रिकेतून आपल्या कडे मार्गदर्शनासाठी  पत्रिका येणे यामागे  अर्थातच नियतीचीच योजना असणार
अशा आलेल्या जातकांना मात्र योग्य न्याय देणे हे जमलं पाहिजे
यासाठी परत परत आपली तयारी वाढवायची आणि पत्रिकेच्या अदृष्यम गोष्टी, निर्णायक घटक शोधण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी वरची पंच लाईन कायम लक्षात ठेवायची 

( अभ्यासू) अमोल केळकर
विनायक चतुर्थी ( मार्गशीर्ष)
२७/११/२२ 📝 

१२ नोव्हेंबर, २०२२

टी २० चषक इंग्लंड जिंकेल का पाकिस्तान

.रुलिंग प्लॅनेटचा अभ्यास म्हणून परत एकदा

टी २० चषक इंग्लंड जिंकेल का पाकिस्तान ? 🏏
प्रश्ण दिनांक १२/११/२२
वेळ : ११ वा २० मिनिटे
मी ठेवलेला क्रम
१) पाकिस्तान २) इंग्लंड

यावेळचे रुलिंग प्लॅनेट
L - धनू - गुरु - ३
S - आद्रा - राहू  मेष राशीत ( मंगळ) -९
R - मिथुन - बुध - ९
D - शनिवार - शनी - ३

बेरीज = ३+९+९+३= २४
बुध एकदा रुलिंग मधे ३ वजा करू
२४-३ = २१
आलेल्या संख्येस असलेल्या ( २) पर्यायाने भागू
२१/२ = बाकी १

पर्याय १ वरचा संघ विजयी ठरेल

( अभ्यासू)  अमोल 🏏
१२/११/२२ 

१८ ऑगस्ट, २०२२

गोकुळाष्टमी

 भगवंताच्या चरणस्पर्शास
यमुना झाली व्याकुळ..
देवकीनंदनाच्या आगमनाने
अवघे आनंदले गोकुळ


लहानपणापासून श्रीहरींच्या अनेक लीला आणि समृध्द गोकुळाची अनेक वर्णने आपण वाचली आहेत. याचा थोडा  तरी अनुभव घ्यायचा असल्यास गोंदवले इथे  काकड आरतीला उपस्थित रहायचे. 

नित्य आरतीत म्हणले जाणारे हे पद गायचे 👇🏻 अन लोण्याच्या गोळ्याचा प्रसाद तळहातावर घेऊन इथल्या 'गोकुळी' रंगून जायचे 

तू खाय बा साखर लोणी !
माझिया बाळा! तू खाय बा साखर लोणी !

नव लक्ष गोपाळ गडी! वाट पाहती यमुनास्थळी !
मिळूनी मेळा!  तू खाय बा साखर लोणी !

बाळ मुकुंद खातो लोणी! कौतुक पाहे नंदराणी!
भरुनी डोळा! तू खाय बा साखर लोणी !

भानुदास विनंती करी! प्रसाद द्यावा मज श्रीहरी!
त्रिभुवनपाळा !  तू खाय बा साखर लोणी !

" गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा " 🙏🪷

देवा तुझ्या द्वारी आलो
श्रीकृष्ण जन्माष्टमी
१८/०८/२२ 📝

३१ जुलै, २०२२

आठवणीतील सांगली

आठवणीतील सांगली

श्रावणी सोमवार म्हणलं की सांगलीकरांची 
'पाऊले चालती हरीपूरची वाट' हे ठरलेलं. 
त्यातही पहिले दर्शन बागेतल्या गणपतीचे.
देव गणेश / देव शंकर यांच्या दर्शनाचा हा अनोखा भक्तीसंगम, कृष्णा-वारणा या पवित्र नद्यांच्या साक्षीने

१आँगस्ट २२- पहिला श्रावणी सोमवार आणि 'विनायक चतुर्थी'. यानिमित्याने ही 'आठवणीतील सांगली'

सांगलीकरांची ही भक्ती अशीच कायम राहो हे संगमेश्वरापाशी मागणे
 🙏🌸🌼
#पहिला_श्रावणी_सोमवार
#विनायकी_चतुर्थी
#हरीपूर
#बागेतला_गणपती


१९ मे, २०२२

संकष्टी चतुर्थी

.श्री गणेशगुरु दत्तात्रया नम :🙏




संकष्टी चतुर्थी, गुरुवार
१९/०५/२२ 

१ मे, २०२२

दोन कल्याणकारी मारुती स्तोत्रे

."मंत्र, स्तोत्रे आणि चमत्कार"

वि. के फडके  यांच्या पुस्तकातील
*दोन कल्याणकारी मारुतीस्तोत्रे* या लेखाचे क्रमश: वाचन 
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

भाग - १ 📝



महाराष्ट्राचे महान संत समर्थ श्रीरामदास स्वामी यांनी रचिलेले 'भीमरूपी स्तोत्र' महाराष्ट्रात जितके लोकप्रिय आहे तितकीच लोकप्रियता गोस्वामी तुलसीदासाच्या 'हनुमान चालीसा' ने उत्तर भारतात संपादन केली आहे. ही दोन्ही स्तोत्रे विलक्षण प्रभावी असून त्यांच्या नित्य पठणाने अनेक व्याधी व संकटांचा नाश होतो असा त्यांचा लौकिक आहे.
      समर्थ रामदास आणि गोस्वामी तुलसीदास हे दोघेही परम रामभक्त होते; परंतु परकीयांच्या दबावामुळे सत्व विसरलेल्या समाजात नवचैतन्य निर्माण करुन त्या समाजाला बलशाली व तेजस्वी बनविण्यासाठी दोघांनीही महारुद्र हनुमंताचा आदर्श सर्वसामान्यांपुढे ठेवला आहे. श्री समर्थांनी जशी अकरा हनुमंतांची स्थापना केली तशीच गोस्वामी तुलसीदासांनी काशी क्षेत्रात बारा हनुमंतांची स्थापना केलेली आहे!
 
      या दोघा महान संत कवींनी रचलेली, 'भीमरुपी स्तोत्र' व 'हनुमान चालिसा स्तोत्र '  ही दोन स्तोत्रे हा देखील हनुमान उपासनेच्या प्रचाराचाच एक भाग होता !

क्रमश:🚩
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
देवा तुझ्या द्वारी आलो 

२८ एप्रिल, २०२२

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी

.'मी तुझ्या पाठीशी'
'भिऊ नकोस ' अजिबात
याच शाश्वत विश्वासाने
दिवसाची होते सुरुवात 

चैत्र वद्य त्रयोदशी 
गुरुवार २८/४/२२
स्वामी समर्थ पुण्यतिथी 🙏🚩

"देवा तुझ्या द्वारी आलो " 📝
www.kelkaramol.blogspot.com

१९ एप्रिल, २०२२

श्री गणेश चालीसा


..श्री गणेश चालीसा

अंगारकी चतुर्थी
१९/०४/२२

"देवा तुझ्या द्वारी आलो" 
www.kelkaramol.blogspot.com 

१० एप्रिल, २०२२

श्रीराम नवमी

.२७ नक्षत्रात 'पुष्य' नक्षत्र सर्वोत्तम मानतात. चैत्र शु.नवमीला जन्म असणा-या प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म पुष्य नक्षत्रावर


आज चैत्र शु नवमी ( १० एप्रिल २०२२)  आणि आज सूर्योदयापासून संपूर्ण दिवस 'पुष्य' नक्षत्रच आहे.



 हा एक आजच्या घडून आलेला छान योगायोग

'श्रीराम नवमीच्या' सर्वांना शुभेच्छा आणि सर्वांप्रती शुभचिंतन 💐🙏

"देवा तुझ्या द्वारी आलो

२३ मार्च, २०२२

अशी ही थट्टा

अशी ही थट्टा 

आज एकनाथ षष्ठी  ( फाल्गुन कृ षष्ठी) . आजच्या तिथीला संत एकनाथ महाराजांनी  देह ठेवला. आजच्या दिवसाच्या निमित्याने त्यांची एक मला आवडलेली विशेष रचना  "अशी ही थट्टा" इथे देत आहे


यातील मेसेज ज्याने त्याने आपल्या पद्धतीने घ्यावा. समजायला तशी सोपीच आहे.

बरी नव्हे थट्टा, बरी नव्हे थट्टा, बरी नव्हे थट्टा
भलभल्यास लाविला बट्टा, अशी ही थट्टा

ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधी
थट्टेने हरवली बुद्धी
केली नारदाची नारदी
अशी ही थट्टा

थट्टा दुर्योधनानं हो केली
पांचाळी सभेत गांजिली
गदाघावे मांडी फोडिली
अशी ही थट्टा

थट्टेने दुर्योधन मेला
भस्मासुर भस्म की हो झाला
वालीही मुकला प्राणाला
अशी ही थट्टा

थट्टा रावणाने त्या केली
सोन्याची लंका बुडविली
थट्टा ज्याची त्यास भोवली
बरी नव्हे थट्टा

थट्टेतून सुटले चौघेजण
शुक, भीष्म आणि हनुमान
चौथा कार्तिकस्वामी जाण
त्याला नाही बट्टा

एका जनार्दन सर्वांला
थट्टेला भिऊन तुम्ही चाला
नाहीं तर नरककुंडाला
अशी ही थट्टा
//
थोडं अवांतर: संत एकनाथ महाराजांनी ज्या अनेक रचना केल्यात त्या प्रत्येक रचनेत शेवटच्या कडव्यात ते स्वतःसाठी 'एका जनार्दनी' असा उल्लेख करतात. वरच्या रचनेतही तसा उल्लेख आहे. आणखी काही
उदाहरणे-

माझ्या मना 
लागो छंद, गोविंद नित्य गोविंद!
यात शेवटी ते म्हणतात
गोविंद हा जनीं-वनीं
म्हणे एका जनार्दनीं !
//
काया ही पंढरी ,आत्मा हा विठ्ठल
नांदतो केवळ पांडुरंग!
देखिली पंढरी देही-जनी-वनीं
एका जनार्दनी वारी करी!!
//
संत एकनाथ महाराजांना विनम्र 🙏🌸

फाल्गुन कृ षष्ठी
(नाथषष्ठी)
२३/३/२२
Kelkaramol.blogspot.com 📝
देवा तुझ्या द्वारी आलो 🙏🌸 

२२ मार्च, २०२२

तारीख का तिथी

तारीख का तिथी?

हिंदू आहात ना?  मग लाज का वाटते तिथीने उत्सव साजरे करायची?


शिवजयंती  खरं म्हणजे ३६५ दिवस साजरी व्हायला पाहिजे हे टिपिकल राजकीय भाष्य कृपया नको. आम्ही ३६५ दिवस देवघरातील गणपतीचे पूजन करतो, १२ संकष्ट्या तेवढ्याच विनायकी ही करतो. पण भाद्रपद शु.चतुर्थीचा गणेशोत्सव किंवा माघ शु चतुर्थीची गणेश जयंती अत्यंत उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरी करतो. त्यामुळे ३६५ दिवस महाराजांना स्मरून शिवजयंती तिथीने साजरी करायला का कमीपणा वाटतोय?

 तारखेने १९ फेब्रुवारीलाच गोंदवलेकर महाराजांचा जन्मदिवस पण आपण जन्मोत्सव तिथीने करतो ना?

काल शिवजयंतीला दोन राजकीय नेते तारीख -तिथीवरुन भांडत होते. एकानं मुद्दा उपस्थित केला की तुम्ही तुमचे वाढदिवस तिथीने करता का?

मी म्हणतो असा विचार करायला काय हरकत आहे? अहो तुम्ही मेल्यावर तुमची मुले तुमचे श्राध्द तिथीने करतात मग वाढदिवस ही तिथीने करायला काय हरकत आहे?

आजकाल तुम्हाला एवढ्या सोई-सुविधा आहेत ( गुगल/ अँप वगैरे)  की समजा एखाद्याला आपली तिथी माहित नसेल तर शोधायला फारसे कष्ट ही पडत नाहीत.

आमचे नवीन वर्ष गुढी-पाडव्यालाच हा विचार जर दिवसेंदिवस रूजू शकतो तर आमचे उत्सव/ वाढदिवस पण तिथीनेच करणार हा नव-विचार रूजवायला काय हरकत आहे?

हिंदू आहात ना?🚩

( विचार पटले असल्यास ५ जणांना सांगायला हरकत नाही) 

अमोल 📝
#रंगपंचमी_🌈 

५ मार्च, २०२२

मकरेत शनी- मंगळ

.मकरेत स्वत:च्या राशीतच शनी असताना आता मंगळ ही नुकताच मकरेत आलाय

२ मार्च, २०२२

फुलपूडा

फुलपूडा ☘️🌿🌸🌺🌼🍃

आमच्याकडे रोज फुलपूडा येतो. म्हणजे आम्ही आमच्या फुलवाल्याला सांगितलंय रोज ५ रु चा फुलपूडा टाकत जा. जास्त फुले नसतात पण देवघरातील प्रत्येक देवाला एक फूल ,  विष्णूला तुळस, शंकराला बेल इतपत असतं आणि काम होऊन जातं.  गवाकडे पहाटे लवकर उठून, फिरून येताना बागेतील विविध ताजी फुले पूजेत मिळण्याचे आमच्या देवघरातील देवांच्या तरी नशिबात नाही.



तर आमच्याकडे फुलपुड्याचे एक वैशिष्ट्ये सांगतो. जेंव्हा एखादा महत्वाचा दिवस असतो त्याच्या आदल्यादिवशी हा फुलपूडा रजा घेतो.  फुलवाल्याला इतक्यांदा बजावून सांगितलयं की धार्मिक सणाच्या दिवशी तरी व्यवस्थित  फुले मिळावीत म्हणून आम्ही तुझ्याकडून महिनाभर फुले घेतो. पण जेंव्हा पाहिजेत तेंव्हा मिळाली नाही तर काय उपयोग? 
पण नाही. 
 
आता बहुतेक आमच्या देवांनाही सवय झालीयं. कालचंच उदाहरण. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी बरोबर फुलपूड्याची रजा. कापसाचे वस्त्र , आणि अक्षता महादेवांवर वाहून आम्ही समाधान करुन घेतले. 
पण आजच्या फूलपुड्यात संपूर्ण देव्हारा भरेल एवढा बेल. कालची उणीव भरून निघाली. 

 त्या त्या दिवसाचे महत्व वगैरे असते हे सगळं मान्य. पण आजही शंकराला बेल वाहताना तेवढाच आनंद वाटला जेवढा काल झाला असता. 

आता आमचं  ठरलय!  वेगळंच करायचं. उदा. मंदिरात देव दर्शनाला जाताना ही देव जरा निंवात असेल तेंव्हाच जायचे. म्हणजे गुरूवारी दत्त महाराजांना अजिबात भरायचे नाही, शनिवारी मारूती राया नकोत, मंगळवारी गणपती बाप्पा नकोत 
जरा दिवस बदलून गेलो तर मंदिरात निवांतपणे बसून  गप्पा तरी होतील छान.
आज बुधवार आज परत विश्वेश्वराच्याच मंदिरात जाऊन आज निवांत असणाऱ्या महादेवांना भेटून येतो.

मोगरा फुलला.. मोगरा फुलला

अमोल 📝
माघी. अमावस्या
२/३/२२ 

२३ फेब्रुवारी, २०२२

प्रकटदिन - ग्रहस्थिती

.आज माघ वद्य सप्तमी ( २३/०२/२०२२) गजानन महाराज १४४ व्या प्रकट दिनी सकाळी ९ वाजता जुळून आलेली ग्रहस्थित

मीन लग्न - 'गुरु' लग्नस्वामी

नवमांश लग्न - धनूचे - गुरु लग्नस्वामी

रवी - रवी ग्रह सध्या  गुरु ग्रहाबरोबर  कुंभेत आहे ( याचाच अर्थ शास्त्रानुसार गुरु  अस्त आहे )

चंद्र- विशाखा या गुरुच्या नक्षत्रात ( नवमांश कुंडलीत गुरुच्या पाचव्या दृष्टीत)

मंगळ, शुक्र - धनु राशीत - गुरुची रास

गुरु - मीन या स्वतःच्याच नवमांशी

केतू - विशाखा या गुरुच्या नक्षत्रात ( नवमांश कुंडलीत गुरुच्या दृष्टीत)

राहू, बुध - यांचा सध्या उप. न.स्वामी गुरु

हर्षल - नवमांश कुंडलीत गुरुच्या ७ व्या दृष्टीत

नेपच्यून - पू. भाद्रपदा या गुरुच्या नक्षत्रात

तर शनी आणि प्लुटो हे ग्रह सोडून आज सर्व ग्रह गुरूशी संबंधित 

( अभ्यासू)  अमोल 📝  

प्रकट दिन- गजानन महाराज

.योगीराज, ब्रम्हांडनायक
प्रभू तू शेगावीचा  
प्रकट दिनी नमुनी तुज
मार्ग आचरु साधनेचा
🙏🌸

* माघ वद्य सप्तमी/२३ फेब्रु 📝
देवा तुझ्या द्वारी आलो



१७ फेब्रुवारी, २०२२

गुरु प्रतिपदा

.प्रासंगिक * 📝




सप्त नदी काठी 
नृसिंह वाडी स्थान
"मनोहर पादुका " पाहून
हरपले भक्तांचे भान

#गुरु_प्रतिपदा
१७/०२/२२

देवा तुझ्या द्वारी आलो
kelkaramol.blogspot.com 

८ फेब्रुवारी, २०२२

नमस्कार

.नमस्कार 🙏

एखाद्या देवळात गेल्यावर देवाला भाविकांकडून केल्या जाणा-या नमस्कारात सुध्दा किती विविधता असते ना? 

मंदिरातील पायरी चढण्याआधी  उजव्या हाताने पायरीला हात लावून ( स्पर्श करुन) मग तो हात स्वतःच्या हृदयाला लावणे, मग मंदिरातील घंटानाद करुन नमस्कार, देवतेच्या स्वरूपा नुसार समोरील कासव, नंदी, उंदीर यांना नमस्कार,  मग मुख्य देवतेचे दर्शन घेताना नमस्काराचे विविध प्रकार, कधी हृदया जवळ दोन्ही हात धरून तर कघी तेच दोन्ही हात कपाळावर धरून, डोळे मिटून, डोळे उघडे ठेऊन, प्रदक्षिणा झाल्यावर साष्टांग नमस्कार करतानाही विविध प्रकार.

एखाद्या मंदिरात गेल्यावर भाविकांकडून विविध प्रकारे केली जाणारी ही भक्ती बघायला खूप छान वाटते. 

कामाच्या गडबडीत मंदिरात जाऊ न शकणारा पण मंदिराच्या समोरून पायी,दोन चाकी, चारचाकी, बस, रेल्वेतून जाताना क्षणभर मंदिराकडे बघून जमेल तसे दर्शन घेणारा, नमस्कार करणारा तर ' परम भक्तच' नाही का?

 प्रकार अनेक पण मुळ उद्देश एकच 'नतमस्तक' होणे. या भक्तीला एका चाकोरीत ठेवणे शक्त नाही.

 #व्यक्ती तितक्या प्रकृती चे उदाहरण एखाद्या मंदिरात ही छान बघायला मिळते.

( नतमस्तक)  अमोल 🙏
पौष.शु अष्टमी
०८/०२/२२

देवा तुझ्या द्वारी आलो
kelkaramol.blogspot.com 

३ फेब्रुवारी, २०२२

गणपती मंदिर विश्रामबाग

.सांगली नगरी आणि गणपती यांचे नाते अतुट आहे. पटवर्धन संस्थांचे गणेश मंदिर आणि हरिपूर रोड वरील बागेतला गणपती ही सांगलीतील प्रसिद्ध गणपती मंदिरे. एका गावात दोन प्रसिद्ध गणपती मंदिरे असण्याचा मान सांगली प्रमाणे पुणे नगरीला आहे कारण इकडे ही दगडुशेठ गणपती आणि सारसबाग किंवा तळ्यातला गणपती अशी दोन प्रसिद्ध गणपती देवस्थानं आहेत. 

इतर ठिकाणी मात्र एकाच शहरात   दोन प्रसिध्द गणपती मंदिरं कमीच.



सांगलीच्या उपनगरातील आणखी एका गणपती बाप्पांचे हे चित्र आहे  साधरणपणे १९९५ नंतर अचानक प्रसिद्ध पावलेले हे  गणेश मंदिरातील बाप्पा. शंभर फुटी रोडला विश्रामबाग या सांगलीतील उपनगरात  असलेले हे मंदिर.

अजुबाजूच्या परिसात असणा-या काॅलेजमधील  कुमार/ कुमारिकांचे हे अल्पावधीत  आवडते स्थान झाले आणि सांगलीला ३ रे प्रसिध्द  गणेश मंदिर मिळाले.

आमची विश्रामबागची रम्य सफर  सुरु व्हायची ती या मंदिरातून आणि सांगता व्हायची ती  पै प्रकाश किंवा सरोवरची ची भेळ खाऊन . हीच एकेकाळी आमच्यासाठी ऐश होती दर रविवारची 

विश्रामबागच्या या गजाननाची कृपा तुम्हा सर्वांवर राहो हीच गणेश जयंती निमित्य प्रार्थना 🙏🌺


देवा तुझ्या द्वारी आलो.
माघ. शु.चतुर्थी
४/२/२२
www.kelkaramol.blogspot.com 

८ जानेवारी, २०२२

शनि महात्म्य

.
आज उत्तरभाद्रपदा हे शनि महाराजांचे नक्षत्र , शनिवार आणि सुरु असलेली साडेसाती या योगावर 'शनी महात्म्य' वाचले. दरवेळेला जेंव्हा हे शनि महात्म्य वाचतो तेंव्हा एक वेगळा विचार शनि महाराज देतात. तसा आजही एक वेगळा विचार सुचला


 साडेसातीचे अडीच अडीच वर्षाचे तिन टप्पे असतात हे आपणास माहितच आहे. प्रत्येक राशीला हे तिन टप्पे कसे जातात हे ही अनेक पुस्तकात दिलेले आहे. साडेसातीत केल्या जाणा-या उपायांचा मधे 'शनि महात्म्य'  वाचन हे ही सांगितले आहेच.  आज हे वाचन केल्यानंतर मनात विचार आला की ज्या राजा विक्रमादित्याची कथा यात सांगितली आहे ती संपूर्ण कथा तीन टप्प्यात विभागली तर साधारण प्रत्येकाला तसा अनुभव साडेसातीच्या तीन टप्प्यात येतो.

शनि महाराजांची साडे असतो साक्षात प्रभुरामचंद्र, श्रीकृष्ण, कैलासपती महादेव, साक्षात गुरु यांनाही चुकलेली नाही ( फक्त काहींनी याचा कालावधी कमी करुन घेतला, असा उल्लेख शनि  महात्म्यात आहे) . आपल्या कर्माचा झालेला गर्व कमी होणे हे साडेसातीचे प्रयोजन.

तर कथेचा पहिला टप्पा

सभेत नवग्रहात श्रेष्ठ कोण यावर चर्चा सुरु असताना नकळत राजाकडून शनि महाराजांची टिंगल होते, नंतर राजाला आपली चूक समजते पण ग्रह दशेप्रमाणे आता जे होईल त्याला सामोरे जायचे अशी मनाची तयारी होते. घोडे विकणारा व्यापारी  बनून शनि महाराज येतात,  एक छान घोडा राजाला दाखवतात, तो उधळतो आणि राजाला खूप लांब अरण्यात सोडतो
( अचानक वेगळ्या परिस्थितीला सामोरे जाणे, काय घडतय हे न कळणे)

दुसरा टप्पा :-
 एका गावात आसरा मिळालेल्या राजावर चोरीचा आळ येणे, तिथल्या राजाने त्याला हात- पाय तोडून टाकण्याची शिक्षा देणे
( हा टप्पा जेंव्हा गोचरीचा शनी तुमच्या राशीतून/ जन्मस्थ चंद्रावरुन भ्रमण करतो,  अनेक अडचणी येणे,  काय करावे हे न सुचणे, झालेल्या चुकांची जाणिव होणे इ इ )

टप्पा ३ रा

हात-पाय तोडलेल्या विक्रमादित्य  जाला त्याच्या राज्यातील माहेरवाशीण ओळखते, सेवा करायची परवानगी इथल्या राजाला मागते,  अन्न-पाणी निवारा देते आणि एक दिवस शनि महाराजांच्या कृपेने परत सगळे व्यवस्थित होते
( परिस्थितीनुसार करावे लागलेले बदल, नवीन गोष्टीत किंवा जुन्याच गोष्टी परत नवीन प्रकारे हळूहळू अंगीकारणे आणि परत पूर्ववत आशादायक जीवनाचा लाभ होणे)

तर साडेसातीत आपले अगदी विक्रमादित्या एवढे हाल होत नाहीत पण साधारण त्या चक्रातून शनि महाराज आपल्याला नेऊन आणतात

असे हे शनि महात्म्य,  ज्यांनी अजून वाचले नसेल त्यांनी अवश्य वाचा,  योग्य तो बोध घ्या आणि महाराजांच्या कृपेने वाटचाल करीत रहा ते

इदं न मम ! ही भावना ठेऊन

( शनी भक्त) 📝
पौष शु. षष्ठी
८/१/२०२२

www.kelkaramol.blogspot.com
टिप: 
आता २९ एप्रिल ला शनी कुंभेत गेल्यावर 'धनु ' वाल्यांची साडेसाती संपून 'मीन ' राशीला साडेसाती सुरु होईल. पण जुलै महिन्यात शनि महाराज वक्री होऊन परत मकरेत येतील तेंव्हा परत धनु साठी साडेसाती असेल ती जाने २०२३ पर्यत आणी मग मीन राशीला परत सुरु होईल

साडसाती २०२२
 २९ एप्रिल २०२२ पर्यत
धनु, मकर, कुंभ

२९ एप्रिल ते १२ जुलै
मकर, कुंभ, मीन

१३ जुलै ते १७ जानेवारी २०२३
धनु, मकर, कुंभ
 

३ जानेवारी, २०२२

तुजवीण शंभो मज कोण तारी

.

🌹☘️🍂🌸💙
वैराग्य योगी शिव शूलपाणी ।
सदा समाधी निजबोधवाणी । उमानिवासा त्रिपुरान्तकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥
💙🌸🍂☘️🌹