July 31, 2015

गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा  - सादर  वंदन 




स्वामी मठ हेची 
स्थान सुख शांती 
वैकुंठ धाम 
स्वामी चरणी 

जय जय गुरुदेव दत्त 
श्री स्वामी समर्थ 

July 25, 2015

जातां पंढरीस सुख वाटे जीवा


जातां पंढरीस सुख वाटे जीवा ।
आनंदे केशवा भेटतांचि ॥१॥

या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं ।
पाहिली शोधोनी अवघी तीर्थे ॥२॥

ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार ।
ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठें ॥३॥

ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक ।
ऐसा वेणुनादीं कान्हा दावा ॥४॥

ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ।
ऐसें पाहतां निर्धार नाही कोठें ॥५॥

सेना म्हणे खूण सांगितली संती ।
या परती विश्रांती न मिळे जीवा ॥६॥

July 24, 2015

नित्य वाचे प्रभूनाम गाऊ


नित्य वाचे प्रभूनाम गाऊ
पांडुरंगी सदा लीन राहू

हा फेर जनन मरणाचा
चुकविताही ना चुकण्याचा
सुखेदु:खे समानच साहू

कोणी ब्राह्मण कोणी महार
करू नका असा अविचार
एकमेकां म्हणू भाऊ-भाऊ

सुख दारा घर सन्मान
नको वृथाच हा अभिमान
प्रभू पायी तनू-ध्यान वाहू

July 21, 2015

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई ।


खेळ मांडीयेला वाळवंटी घाई ।
नाचती वैष्णव भाईं रे ।
क्रोध अभिमान गेला पावटणी ।
एक एका लागतील पायीं रे ॥१॥

गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा
हार मिरविती गळां ।
टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव ।
अनुपम्य सुखसोंहळा रे ॥२॥

वर्णअभिमान विसरली याती
एकएकां लोटांगणीं जाती ।
निर्मळ चित्तें जालीं नवनीतें ।
पाषाणा पाझर सुटती रे ॥३॥

होतो जयजयकार गर्जत अंबर
मातले हे वैष्णव वीर रे ।
तुका ह्मणे सोपी केली पायवाट ।
उतरावया भवसागर रे ॥४॥

July 20, 2015

आनंदाचे डोही आनंदतरंग


आनंदाचे डोही आनंदतरंग ।
आनंद चि अंग आनंदाचे ॥१॥

काय सांगो जालें कांहीचियाबाही ।
पुढें चाली नाहीं आवडीनें ॥२॥

गर्भाचे आवडी मातेचा डोहळा ।
तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥३॥

तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा ।
अनुभव सरिसा मुखा आला ॥४॥

July 18, 2015

चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी



चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी
दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी

जगी प्रगटला तो जगजेठी, आला पुंडलिकाच्या भेटी
पाहुन सेवा खरी, थांबला हरि, तो पहा विटेवरी

नामदेव नामात रंगला, संत तुका किर्तनी दंगला
टाळ घेऊन करी, चला वारकरी, तो पहा विटेवरी

संत जनाई ओवी गाई, तशी सखू अन्‌ बहिणाबाई
रखुमाई मंदिरी, एकली परि, तो पहा विटेवरी॥

गीत-दत्ता पाटील
संगीत-मधुकर पाठक
स्वर-प्रल्हाद शिंदे

July 17, 2015

विठ्ठल आवडी प्रेमभावो



विठ्ठल आवडी प्रेमभावो ।
विठ्ठल नामाचा रे टाहो ॥१॥

तुटला हा संदेहो ।
भवमूळ व्याधीचा ॥२॥

म्हणा नरहरी उच्‍चार ।
कृष्ण हरी श्रीधर ।
हेची नाम आम्हां सार ।
संसार करावया प्रेमभावो ॥३॥

नेणो नामाविण काही ।
विठ्ठल कृष्ण लवलाही ।
नामा म्हणे तरलो पाही ।
विठ्ठल विठ्ठल म्हणताची ॥४॥

July 16, 2015

अभंगवाणी - पावलो पंढरी



पावलों पंढरी वैकुंठभुवन ।
धन्य अजि दिन सोनियाचा ॥१॥

पावलों पंढरी आनंदगजरें ।
वाजतील तुरें शंख भेरी ॥२॥

पावलों पंढरी क्षेमआलिंगनीं ।
संत या सज्जनीं निवविलों ॥३॥

पावलों पंढरी पार नाहीं सुखा ।
भेटला हा सखा मायबाप ॥४॥

पावलों पंढरी येरझार खुंटली ।
माउली वोळली प्रेमपान्हा ॥५॥

पावलों पंढरी आपुले माहेर ।
नाहीं संवसार तुका म्हणे ॥६॥

July 15, 2015

अभंगवाणी - चला पंढरीसी जाऊं



चला पंढरीसी जाऊं ।
रखमादेवीवरा पाहूं ॥१॥

डोळे निवतील कान ।
मना तेथें समाधान ॥२॥

संता महंता होतील भेटी ।
आनंदे नाचों वाळवंटी ॥३॥

तें तीर्थांचे माहेर ।
सर्व सुखाचें भांडार ॥४॥

जन्म नाही रे आणीक ।
तुका म्हणे माझी भाक ॥५॥

July 14, 2015

देऊळ बंद

देऊळ बंद हा सिनेमा आता प्रदर्शित होईल या सिनेमाचा विषय काय आहे हे आत्ता सांगता येत नसले तरी यातील काही सुंदर गाणी डाउनलोड साठी ठेवण्यात आली आहेत येथून डाऊनलोड करू शकाल



एक मात्र नक्की आमचे हे देऊळ मात्र कायम चालू असेल - २४ X ७

अभंगवाणी - पंढरी निवासा



पंढरी निवासा सख्या पांडुरंगा ।
करी अंग संगा, भक्‍ताचिया ॥१॥

भक्‍त कैवारीया होसी नारायणा ।
बोलता वचन काय लाज ॥२॥

मागे बहुतांचे फेडियले ऋण ।
आम्हांसाठी कोण आली धाड ॥३॥

वारंवार तुज लाज नाही देवा ।
बोल रे केशवा म्हणे नामा ॥४॥

रचना-संत नामदेव
संगीत-राम फाटक
स्वर-पं. भीमसेन जोशी

July 13, 2015

अभंगवाणी - माझे माहेर पंढरी



माझे माहेर पंढरी ।
आहे भीवरेच्या तीरी ॥१॥

बाप आणि आई ।
माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥

पुंडलीक राहे बंधू ।
त्याची ख्याती काय सांगू ॥३॥

माझी बहीण चंद्रभागा ।
करितसे पाप भंगा ॥४॥

एका जनार्दनी शरण ।
करी माहेरची आठवण ॥५॥

July 12, 2015

अभंगवाणी- विठुमाऊली तू माऊली जगाची


विठुमाऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा

काय तुझी माया सांगु शिरीरंगा
संसाराचि पंढरी तू केली पांडुरंगा
डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा
विठ्ठला पांडुरंगा
अभंगाला जोड टाळचिपळ्यांची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा

लेकरांची सेवा केलीस तू आई
कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठला मायबापा
जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा

July 11, 2015

अभंगवाणी- अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू ।


अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू ।
मी म्हणु गोपाळू, आला गे माये ॥१॥

चांचरती चांचरती बाहेरी निघाले ।
ठकचि मी ठेलें काय करू ॥२॥

तो सावळा सुंदरू कांसे पीतांबरू ।
लावण्य मनोहरू देखियेला ॥३॥

बोधुनी ठेलें मन तव जालें आन ।
सोकोनी घेतले प्राण माझे गे माये ॥४॥

बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा ।
तेणें काया मने वाचा वेधियेलें ॥५/

रचना-संत ज्ञानेश्वर
संगीत-पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर-लता मंगेशकर
  ( स्वराविष्कार- किशोरी आमोणकर )

July 10, 2015

अभंगवाणी -विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले


विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले ।
अवघे चि जालें देह ब्रह्म ॥१॥

आवडीचें वालभ माझेनि कोंदाटलें ।
नवल देखिलें नभाकार गे माये ॥२॥

बाप रखुमादेवीवरू सहज नीटु जाला ।
हृदयीं नटावला ब्रह्माकारें ॥३॥

रचना-संत ज्ञानेश्वर
संगीत-पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर-लता मंगेशकर

July 9, 2015

अभंग- भेटीलागीं जीवा लागलीसे आस


भेटीलागीं जीवा लागलीसे आस ।
पाहे रात्रीं दिवस वाट तुझी ॥१॥

पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन ।
तैसें माझें मन वाट पाहें ॥२॥

दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली ।
पाहतसे वाटुली पंढरीची ॥३॥

भुकेलिया बाळ अति शोक करी ।
वाट पाहे परि माउलीची ॥४॥

तुका म्हणे मज लागलीसे भूक ।
धांवूनि श्रीमुख दावीं देवा ॥५॥

रचना-संत तुकाराम
संगीत-श्रीनिवास खळे
स्वर-लता मंगेशकर

July 8, 2015

अभंग - देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी


देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी ।
तेणें मुक्‍ति चारी साधियेल्या ॥१॥

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
पुण्याची गणना कोण करीं ॥२॥

असोनि संसारीं जिव्हे वेगु करीं ।
वेदशास्‍त्र उभारी बाह्या सदा ॥३॥

ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे ।
द्वारकेचे राणे पांडवांघरीं ॥४॥

July 7, 2015

अभंग - वृंदावनी वेणु


वृंदावनी वेणु कवणाचा माये वाजे ।
वेणुनादे गोवर्धनु गाजे ॥१॥

पुच्छ पसरूनी मयूर विराजे ।
मज पाहता भासती यादवराजे ॥२॥

तृणचारा चरू विसरली ।
गाईव्याघ्र एके ठायी झाली ।
पक्षीकुळे निवांत राहिली ।
वैरभाव समूळ विसरली ॥३॥

यमुनाजळ स्थिरस्थिर वाहे ।
रविमंडळ चालता स्तब्ध होय ।
शेष कूर्म वराह चकीत राहे ।
बाळा स्तन देऊ विसरली माय ॥४॥

ध्वनी मंजूळ मंजूळ उमटती ।
बाकी रुणझुण रुणझुण वाजती ।
देव विमानी बैसोनी स्तुति गाती ।
भानुदासा पावली प्रेम-भक्‍ति ॥५॥

रचना-संत भानुदास
संगीत-
स्वर-अजितकुमार कडकडे

July 6, 2015

अभंग - अवघे गर्जे पंढरपूर


अवघे गर्जे पंढरपूर
चालला नामाचा गजर

टाळघोष कानी येती
ध्यानी विठ्ठलाची मूर्ती
पांडुरंगी नाहले हो
चंद्रभागा नीर

इडापिडा टळुनि जाती
देहाला या लाभे मुक्‍ती
नामरंगी रंगले हो
संतांचे माहेर

देव दिसे ठाई ठाई
भक्‍त लीन भक्‍तापाई
सुखालागी आला या हो
आनंदाचा पूर

गीत-अशोकजी परांजपे
संगीत-पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर-प्रकाश घांग्रेकर
नाटक-गोरा कुंभार
राग-आसावरी ,  जौनपुरी

July 3, 2015

अभंग - अजि सोनियाचा दिनु ।


अजि सोनियाचा दिनु ।
वर्षे अमृताचा घनु ॥१॥

हरि पाहिला रे हरि पाहिला रे ।
सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥२॥

दृढ विटे मन मुळी ।
विराजित वनमाळी ॥३॥

बरवा संतसमागमु ।
प्रगटला आत्मारामु ॥४॥

कृपासिंधु करुणाकरू ।
बाप रखमादेविवरू ॥५॥

रचना-संत ज्ञानेश्वर
संगीत-पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर-लता मंगेशकर
राग-भैरवी

अभंग - रूपे सुंदर सावळा गे माये


रूपे सुंदर सावळा गे माये ।
वेणु वाजवी वृंदावना गोधने चारिताहे ॥१॥

रुणझुण वाजवी वेणु ।
वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये ॥२॥

गोधने चारी हती घेऊन काठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोधने चारीताहे ॥३॥

एका जनार्दनी भुलवी गौळणी ।
करीती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥

रचना-संत एकनाथ
संगीत-श्रीधर फडके
स्वर-सुरेश वाडकर

July 2, 2015

अभंगवाणी - आतां कोठें धांवे मन


आतां कोठें धांवे मन ।
तुझे चरण देखिलिया ॥१॥

भाग गेला सीण गेला ।
अवघा जाला आनंद ॥२॥

प्रेमरसें बैसली मिठी ।
आवडी लाठी मुखाशी ॥३॥

तुका म्हणे आम्हां जोगें ।
विठ्ठला घोगें खरें माप ॥४॥

July 1, 2015

अभंग - आनंदाचे डोही आनंदतरंग ।

अभंग -
आनंदाचे डोही आनंदतरंग ।
आनंद चि अंग आनंदाचे ॥१॥

काय सांगो जालें कांहीचियाबाही ।
पुढें चाली नाहीं आवडीनें ॥२॥

गर्भाचे आवडी मातेचा डोहळा ।
तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥३॥

तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा ।
अनुभव सरिसा मुखा आला ॥४॥

रचना-संत तुकाराम
संगीत-श्रीनिवास खळे
स्वर-लता मंगेशकर