January 23, 2024

प्राण प्रतिष्ठापना आणि सिझेरियन

प्राण प्रतिष्ठापना आणी सिझेरियन काल २२ जानेवारीला प्रभू श्रीरामचंद्रांची अयोध्येत नवीन मंदिरात प्राण- प्रतिष्ठापना झाली. संपूर्ण भारतखंडात दिपावली साजरी झाली. या नेत्रदीपक सोहळ्याच्या निमित्याने देशातील काना-कोपर्यात साजरा झालेल्या उत्सवाच्या बातम्या बघताना एका बातमीने लक्ष वेधले आणि हसू आवरले नाही. ज्या स्त्रियांची डिलेव्हरी जवळ आली होती अशा अनेकांनी ( जोडप्यांनी) २२ तारखेला सिझेरियन करून बाळाला जन्म द्यायची इच्छा व्यक्त केली होती.
हे एकून काहीशी अशी प्रतिक्रिया आपसूक आली. 🤦🏻‍♂️ २२ जानेवारीचा काढिव मुहूर्त हा प्रभू श्रीरामांच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा होता. आपल्या पोटी श्रीरामा सारखे बाळ जन्माला यावे ही इच्छा होणे साहजिक आहे. पण नियतिची ही काही योजना असते. त्यात ढवळाढवळ करणे योग्य नाही. नैसर्गिक प्रसूती किंवा डाँक्टरांनी २२ तारखेला सिझरींग करु असे सांगितले असेल ( ही पण नियतीचीच योजना) तर गोष्ट वेगळी. पण तसे काही नसताना भावनेपोटी सिझेरियन करायचा निर्णय घेतलेल्या जोडप्यांना शुभेच्छा आणि सर्व नवजात बालकांना प्रेमळ आशीर्वाद 💐 ज्योतिष अभ्यासकांसाठी:- २२ जाने २०२४ ,दुपारी १२:३२ ची मेष लग्नाची पत्रिका. राशीस्वामी शुक्र जो द्वितीयेश आणि सप्तमेश ( मारकेश) आहे तो धनू ( शत्रू राशीत) मुळ नक्षत्रात आहे. चंद्रापासून आठवा आहे. आज पासून २५ -३० वर्षांनी या बालकांच्या विवाहासंबंधीचे प्रश्ण येणार आहेत. तुमच्याकडे ही अशी एखादी पत्रिका येईलच. त्यावेळी या ग्रहस्थितीचा सप्तम स्थानाच्या दृष्टीने अवश्य विचार करावा षष्ठेश - अष्टमेश युतीत भाग्य स्थानी इतर ग्रहयोग चंद्र-शुक्र प्रतियोग, चंद्र - नेपच्यून केंद्र योग अर्थात लग्न बदलले, भाव बदलले की परिणाम बदलतील. काही चांगले योग पत्रिकेत, नवमांश कुंडलीत आहेत. आपणासही काही विशेष योग आढळल्यास अवश्य सांगा श्रीराम 🙏 ( ज्योतिष अभ्यासक) अमोल केळकर 📝 पौष. शु. त्रयोदशी २३/०१/२०२४

January 7, 2024

पंचक

पंचक निमित्याने :- 🖐🏼

ज्योतिष शास्त्रातील एक  संकल्पना ( प्रचलित नियम)  घेऊन  विनोदी ढंगाने मराठी सिनेमाची निर्मिती केलीत याबद्दल सर्वप्रथम श्री व सौ माधुरी  नेने  यांचे अभिनंदन 💐💐
 
पंचकात विशाखा नक्षत्र नसते  पण काल  रात्री आम्हाला विशाखा या त्रिपाद नक्षत्रावरच पंचक लागले.
पंचक लागले खरे पण  "पंचक भावले" असे मात्र म्हणणार नाही


कोकणातील एका गावात खोतांच्या एकत्र कुटुंबात घडलेली गोष्ट. 
कोकणातील  डुक्करला मांजर आडवे गेल्यानंतर ही डुक्कर ( आपल्या भाषेत टमटम)  मागे घेऊ न देता पुढे दमटवणा-या  नायकाच्या वडीलांचे तो घरी पोहोचण्या आधी निधन झालेले असते. नायक आणि त्याचे वडील नास्तिक. सहा महिन्यापूर्वीच वडिलांनी ' देहदानाचा ' संकल्प केलेला आहे . त्यात  जोशी बुवा येऊन 'पंचक ' लागले आहे असे डिक्लेअर करतात आणि खोत कुटुंब दुहेरी संकटात सापडते.

तेथून पुढे श्रध्दा/ अंधश्रध्दा , आस्तिक /नास्तिक याचा झालेला गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. पण तो गुंता व्यवस्थित सुटला असे वाटत नाही.  शेवटपर्यंत विषय तसाच अधांतरीच राहिला आहे असे वाटत राहिले

कलाकारांमधे विद्याधर जोशींनी साकारलेले गुरुजींचे पात्र जाम आवडले. 
पंचक शांती वेळचे त्यांच्यावर चित्रीत झालेले इंग्रजी गाण्यावरचे विडंबन तर अफलातून क्रिएटिविटी. 
प्रासंगिक विनोद,  इतर कलाकारांच्या भूमिका ठिकठाक.  

'माधुरी दिक्षीतचा एक ही सिनेमा आम्ही सोडलेला नाही!'  हे ती नायिका असताना ठिक होते,  इथे ती ( माधुरी नेने ) फक्त निर्माती आहे 😬 
 तेंव्हा दोन तास खर्च करुन थेटरात जाऊन सिनेमा पहावा एवढा काही खास नाही , टीव्हीवर लागेलच. 
 ( त्यापेक्षा २ तास वेळ काढून उत्तम ज्योतिषाने कडे जाऊन आपली पत्रिका काढा किंवा काढलेली दाखवा 😷) 

 या शास्त्रातील  अभ्यासकांकडून, या विषयाची आवड असणा-यांकडून किंवा या विषयी जुजबी / ऐकीव माहिती असल्याने घरातील कुणी गेल्यानंतर तातडीने 'पंचक' लागलंय का? अशी विचारणा करणा-यांकडून भावना दुखावली जाणे, निषेध वगैरेंची शक्यता असताना  कुठेही शास्त्राची खिल्ली उडवली जाणार नाही याची मात्र काळजी घेतली आहे
संवेदनशील विषयात आजकाल कधी, केंव्हा ,कशा, कुणाच्या भावना दुखावल्या जातील याचा नेम राहिलेला नाही.  

नेंने दांपत्यांच्या निर्मीतीच्या या पहिल्याच प्रयत्नाला कितपत यश येईल हे सांगणे अवघड आहे. ही सुरवात आहे, पुढे एखादा आणखी  उत्तम मुहूर्त पाहून नवीन निर्मितीसाठी सुरुवात करा हे त्यांना सांगणे.  काय सांगा मराठी/ हिंदी सिनेमा निर्मितीचे 'पंचक' तुमच्या नशिबात लिहिलेले असेल.
त्यासाठी शुभेच्छा 💐💐 

पुढील काही निर्मितीसाठी  काही उपयुक्त विषय / नाव सुचवून ठेवतो.

१) ' बेटा मंगळवाला'
२) '  तेजाब भरी पनौती '
३) '  साजन एक प्रीती षडाष्टक '
४) ' दशा' तो 'पागल' है
५)  'कर्क तेरा गुरु दिवाना'
६)  'राहू खरा-नायक'

( ज्योतिष अभ्यासक)  अमोल 

#पंचक
#माझी_टवाळखोरी 📝
मार्गशीर्ष कृ एकादशी 
०७/०१/२०२४
-------------------------------------------
इतरांसाठी  महत्चाची गोष्ट : धनिष्ठा नक्षत्र चरण ३ व ४, शततारका,पू. भाद्रपदा ,उ.भाद्रपदा आणि रेवती या नक्षत्रावर कुणी गेले तर पंचक लागते आणि याची शांती वगैरे जी शास्त्रात सांगितली आहे ती करणे आवश्यकच असे एक अभ्यासक म्हणून आवर्जून नमूद करु इच्छितो. 

December 30, 2023

अयोध्या मनुनिर्मित नगरी 📝

प्रभू श्रीरामाचे मंदिर आणि मूर्ती प्रतिष्ठापना  यासाठी अजून  काही दिवस लागणार असले त  सध्या  सर्वत्र वातावरण  ' श्रीराम' मय  झाले आहे. अशा वेळी किमान समस्त  मराठीजनांनी गदिमा आणि बाबूजी याचे स्मरण न करणे हे कृतघ्न पणाचे ठरेल.
आज जी अयोध्या नागरी सजलेली आहे / सजणार आहे , तो  भव्यदिव्य सोहळा आपण  पाहणार आहोतच .  पण  यापूर्वीच  या  दोघांनी शब्द आणि  संगीत या माध्यमातून  काही  वर्षांपूर्वीच  अयोध्येचे वर्णन  करून ठेवलंय. आजची सत्यातली अयोध्या आपण अनेक वेळा गीतरामायणातून अनुभवली आहे.


त्या नगरीच्या विशालतेवर 
उभ्या राहिल्या वास्तू सुंदर 
मधुन वाहती मार्ग समांतर 
रथ ,वाजी ,गज पथिक चालती, नटुनी त्यांच्यावरी
अयोध्या  मनुनिर्मित नगरी 

घराघरावर रत्नतोरणे
अवतीभवती रम्य उपवनें
त्यात रंगती नृत्य गायनें
मृदुंग वीणा नित्य नादती, अलका नगरीपरी
'अयोध्या मनुनिर्मित नगरी '

राजसौख्य ते सौख्य जनांचे
एकच चिंतन लक्ष मनांचे

अगदी हेच !  सध्या करोडो जनांच्या मनात फक्त एकच चिंतन - मनन सुरु आहे ते म्हणजे
" त्रिवार जयजयकार रामा,त्रिवार जयजयकार"
प्रजाजनीं जे रचिलें स्वप्नी
मूर्त दिसे ते स्वप्न लोचनीं
राजा राघव, सीता राज्ञी
चतुर्वेदसे लोक पूजिती रघुकुलदिपक चार
त्रिवार जयजयकार!

समयिं वर्षतिल मेघ धरेंवर
सत्यशालिनी धरा निरंतर
सेवारत जन,स्वधर्मतत्पर
" शांति: शांति:" मुनी वांच्छिती, ती घेवो अवतार 
त्रिवार जयजयकार! 

आता प्रतीक्षा  पौष शुक्ल द्वादशी,  चंद्र मृग नक्षत्री आपल्या उच्च राशीत येण्याची. तोपर्यंत:-

नगरिं लाभता लोकमान्यता
जाईल वार्ता श्रीरघुनाथा
उत्सुक होऊन श्रवणाकरिता
करवितील ते तुम्हा निमंत्रण 
रघुराजाच्या नगरीं जाऊन,गा बाळांनो श्रीरामायण !
🙏🙏🙏

देवा तुझ्या द्वारी आलो 📝
www.kelkaramol.blogspot.com 

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या