५ मे, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ५ मे २०१४

५ मे

अभिमान न धरता कर्तव्यकर्म करावे. 

 



'मला कळत नाही' असे वाटणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे. आपण अभिमानाने, 'मला सर्व समजते' असे मानून जगात वावरत असतो. खरोखर, अभिमानासारखा परमार्थाचा दुसरा मोठा शत्रू नाही. अभिमान हा हरळीसारखा नाश करणारा आहे असे म्हणणेसुद्धा थोडे अपुरेच पडेल; कारण हरळी वाढली तर ती दिसते, आणि म्हणून ती उपटून तरी टाकता ह्येते. तशी अभिमानाची गोष्ट नाही. तो दिसत नाही, आणि म्हणून तो केव्हा आणि कसा डोके वर काढील याचा पत्ताच लागणार नाही. चित्तशुद्धीच्या मार्गांत मोठी धोंड कोणती असेल तर ती अभिमानाची आहे; आणि स्वतःच्या कर्तबगारीने आपण त्याच्या तावडीतून सुटू असे म्हणणेही वेडेपणाचे होईल. त्याच्या कचाट्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे सद्‍गुरूला अनन्यभावाने शरण जाऊन, अभिमानाच्या तावडीतून सोडविण्याबद्दल त्याची सतत प्रार्थना करणे हाच होय.
चित्तशुद्धी झाली की शेताची मशागत पुरी झाली असे म्हणायला हरकत नाही. पुढे प्रश्न, बी उत्तम असणे जरूर आहे. उत्तम बी कोणते हे कदाचित्‌ आपल्याला समजणार नाही परंतु फळ चांगले कोणते हे सहज समजते. आता असे समजा, जी फळे गोड लागली त्यांचीच लागवड केली. तरीपण पुढे असे अनुभवाला येते की, काही काळ लोटल्यानंतर कालमर्यादेप्रमाणे ते झाड मरते आणि अर्थात्‌ फळे मिळायची बंद होतात, आणि त्यामुळे मन कष्टी होते. यावरून असे दिसते की, आता गोड लागलेली फळे ही कालांतराने दुःखालाच कारणीभूत होतात. तर मग बी निवडताना असे पाहणे जरूर आहे की, ज्याची झाडे कायम टिकणारी आहेत आणि फळे अक्षय सुखाचा लाभ करून देणारी आहेत. जगात उत्पन्न झालेली अशी कोणती वस्तू आहे की जी अक्षय टिकेल ? 'कोणतीही नाही' असेच उत्तर येईल. म्हणून विनाशी फळाच्या आशेने केलेले कोणतेही कार्य सुखाला नेत नाही, असे म्हणावे लागते. याकरिताच, भगवंताशिवाय दुसर्‍या कोणत्याही फळाची आशा न ठेवता कर्तव्यकर्म करीत राहणे, हाच सुखाचा मार्ग आहे, आणि हीच उत्तम बीजाची पेरणी आहे. भगवंताची मनोभावे प्रार्थना करावी की, 'हे देवा, तुझी भक्ति तुझ्याशिवाय इतर कोणत्याही फळाच्या आशेने न होईल अशी कृपा कर.' त्या दृष्टीने आपणही प्रयत्‍न करणे जरूर आहे. ज्याप्रमाणे किडके आणि चांगले एकत्र झालेले धान्य आपण सुपात घालून पाखडतो, आणि किडके धान्य बाहेर उडवून लावून मागे उत्तम धान्य शिल्लक ठेवतो, त्याप्रमाणे भगवंताची भक्ति करता करता, भगवत्प्राप्तीशिवाय इतर होणार्‍या इच्छा काढून टाकण्याचा क्रम ठेवावा म्हणजे कालांतराने भगवंताकरिताच भगवत्प्राप्ती अशी भावना दृढ होत जाईल.


१२६ खरे सुख हे कायम टिकणारे पाहिजे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

४ मे, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ४ मे २०१४

४ मे

सत्संगतीत राहावे. 

 



नेहमी संतांची संगत करावी. परमार्थाला संतांचे अधिष्ठान आवश्यक आहे. संत आपल्याजवळच असतात, त्यांना पाहायला कुठे जावे लागत नाही. चित्त शुद्ध नसेल तर संतांच्या जवळ जाऊन तरी काय उपयोग होणार ? त्यांना आपण देहात पाहू नये. संत हे काही देहात नसतात, ते जे काही सांगतात त्या साधनात ते असतात. आपली विषयलालसा सोडल्याशिवाय त्यांची भेट होणे शक्य नाही. संताकडे एखादा चोर गेला तर त्याला त्याची खरी भेट होईल का ? तो ज्या हेतूने जातो त्या हेतूने त्याला फार तर तिथे चोरी करता येईल, परंतु संतांपासून जे खरे मिळवायचे ते साधेल का ? आपण जर चित्त शुद्ध करून गेलो तर आपल्याला त्यांची भेट होते; आणि भेट झाल्यावर, जे त्रिभुवनातही मिळणार नाही ते ते देतात.
एकजण एका संताकडे नेहमी दर्शनाला येत असे. तिथे इतर मंडळीही पुष्कळ असत, पण तो कुणाशीही बोलत नसे, कुणी काही विचारले तर उत्तर देत नसे, सदा मुद्रा खिन्न असे. कुणालाही त्याच्याशी बोलावे असे वाटत नसे. असे काही दिवस गेले. पुढे एके दिवशी ते सद्‍गुरु म्हणाले, "माझा तो वेडा कुठे आहे ? तो आज का आला नाही ?" हे त्याने ऐकताच तो आनंदाने उड्या मारू लागला, आणि जो तिथून निघाला तो पुनः आलाच नाही ! तो कशाला येईल ? गुरूने एकदा आपल्याला 'आपले' म्हणावे हेच शिष्याला मिळवायचे असते. ते त्या गृहस्थाने ओळखले, आणि म्हणून त्याचे काम झाले. गुरू तुम्हाला 'तुम्ही माझे झाला' असे म्हणत असतानासुद्धा तुम्ही ते ओळखत नाही, कारण तुम्ही विषय बरोबर घेऊन आलेले असता, आणि विषयाची प्राप्ती व्हावी असा हेतू मनात असतो. या‍उलट, गुरू तुम्हाला निवृत्ती देतात. निवृत्ती दिल्यावर विषयाची प्राप्ती व्हावी ही आठवणच जाते. जसे तहान लागल्यावर पाणी हवेसे वाटते, पण तेच पाणी पोटभर प्यायल्यावर नकोसे वाटते, म्हणजे त्याची निवृत्ती होते. आपला यावर आज विश्वास बसायचा नाही; पण हा विश्वास बसायला भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. नामाने ते कार्य होते, म्हणून नामस्मरण करीत जावे. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते आणि मग तळमळही आपोआप जाते.
मन आपल्याला विषयाचा आहेर करीत असताना आपण त्याला नामाचा आहेर करावा. आपण आपल्या अंतःकरणाला नामाची धग लावावी; त्याने अंतःकरण उकळले की दोष वर येतील; ते काढून टाकले की अंतःकरण शुद्ध होईल. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले, तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. नामानेच मन अंतरात प्रवेश करून स्थिर बनते.

१२५. संत सांगतील तेच करणे हीच त्यांची खरी सेवा होते.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

३ मे, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३ मे २०१४

३ मे

निश्चयपूर्वक नामस्मरण आणि चित्तशुद्धी. 

 



मला अजून अमुक करायचे आहे ही कल्पना सोडून द्यावी. आता मी परमेश्वराचा झालो, आता मला काही करायचे राहिले नाही, अशी मनाची स्थिती झाली पाहिजे. 'हे परमेश्वरा, आता तुझ्याकरिताच मी जगेन, तुझ्या नामस्मरणाशिवाय मला काही कर्तव्य उरले नाही,' असा निश्चय केला तर मनाला समाधान झालेच पाहिजे. 'नामस्मरण होत नाही, कारण वयामुळे मन थकले,' हे म्हणणे बरोबर नाही. शरीर थकेल, कारण लहानपणी वाढणे आणि वृद्धपणी थकत जाणे हा शरीराचा निसर्गक्रमच आहे; परंतु मन थकले, हे मात्र सयुक्तिक नाही. मन हा परमेश्वराचा अंश आहे, असे आपल्या दिव्य विभूती सांगताना भगवंतांनी सांगितले आहे. मनाची अत्यंत क्षीणतेची अवस्था म्हणजे मृत्युसमयीची. परंतु त्या समयीही माझे स्मरण ठेवावे असे भगवंतांनी सांगितले असताना, त्यापूर्वी केव्हाही, मन थकले आणि स्मरण करू शकत नाही असे होणे शक्य नाही. पूर्वी सहा-सहा तास बसून जप केलेला असेल, तितका आता होत नसेल, तितके बसवणार नाही. मध्ये मध्ये झोप लागत असेल, हे मान्य आहे; पण स्मरण राहू शकत नाही असे नाही होणार. मन थकले ही खरी अडचण नसून मनाचा इतर व्याप फार आहे हे खरे कारण आहे. तेव्हा, सर्व व्यापांतून आणि काळजीतून लक्ष काढून ते भगवंताकडे लावणे जरूर आहे. पैसाअडका, प्रपंचातल्या गोष्टी, यांचा मनाने त्याग करावा. असा त्याग केला तर कार्यभाग निश्चित होतो हे मी खात्रीने सांगेन.
पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा, माणसाला भगवंतापासून दूर नेतात, त्यांच्या तावडीत सापडता कामा नये. लोकेषणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच. तो टाळता येणे कठीण आहे. पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे आहे, त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत.
धर्माचरण, भगवद्‌भक्ति, नामस्मरण, आणि सत्संग हे चित्तशुद्धीचे उपाय होत. किंवा एकाच शब्दात असे म्हणता येईल की सत्संग हाच याला तोडगा आहे. चित्तशुद्धीचे लक्षण हे की, आपल्यासारखेच सर्व जग सुखी असावे ही भावना होणे. ही भावना वाढण्यासाठी, 'सर्व जग सुखी असावे' अशी प्रार्थना करण्याचा परिपाठ ठेवावा, म्हणजे हळूहळू भगवत्‌कृपेने साधेल. अभिमान हा मात्र चित्तशुद्धीत बिघाड करणारा आहे, आणि तो केव्हा डोके वर काढील आणि घात करील याचा पत्ता लागणार नाही. पण भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचे मरण आहे. म्हणून आपण भगवंताचे स्मरण अखंड टिकवू या आणि आनंदाने राहू या.

१२४. नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशी दृढ भावना करावी.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२ मे, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २ मे २०१४

२ मे

साधनात अत्यंत सावधगिरी पाहिजे. 

 



शेताची मशागत झाली, बी उत्तम पेरले, पाऊस चांगला पडला, आणि रोपही जोराने वर आले, तरी काम झाले असे नाही. कारण जसजशी एकेक पायरी पुढे जाईल तसतशी काळजी घेण्याची गरज असते. शेत वाढले तरी त्याचा नाश दोन कारणांनी होऊ शकतो, एक म्हणजे गुरेढोरे शेतात घुसून नाश करतील, किंवा दुसरे म्हणजे कीड पडून किंवा टोळधाडीसारखा उपद्रव होऊन शेत साफ नाहीसे होईल. यांपैकी पहिले कारण थोडे स्थूल आहे, तर दुसरे थोडे सूक्ष्म अहे. शेतात गुरेढोरे शिरली तर वरवर दृष्टी टाकूनही सहज समजते, किंवा त्यांना हाकलताही येते. पण कीड पडली तर जवळ जाऊन बारकाईने पाहावे लागेल. शेताला कुंपण घालून ढोरे आत शिरणार नाहीत असा बंदोबस्त करता येतो, आणि राख, शेण, औषधे, वगैरे टाकून, कीड न लागेल अशी तजवीज करता येते. हे सर्व करताना शेतकर्‍याला सतत जागृत राहावे लागते. म्हणजेच, एकसारखे शेतावर लक्ष ठेवावे लागते. हाच नियम परमार्थातही लागू पडतो. साधकाने अत्यंत काळजीने वागणे जरूर आहे.
शेताचे रक्षण व्हावे म्हणून जसे कुंपण, तसा संसार हा परमार्थाला कुंपण म्हणून असावा. कुंपणालाच जर खतपाणी मिळाले तर कुंपणच शेत खाऊन टाकते. तसे न होईल इतक्या बेताने संसाराला खतपाणी घालावे. शेताला कीड लागली की काय हे जसे बारकाईने पाहावे लागते, त्याप्रमाणे आपली वृत्ती कुठे गुंतते की काय याकडे बारकाईने लक्ष असावे. अशा सावधगिरीने वागले तर पीक येईपर्यंतचे काम झाले. पण 'पीक हातात आले, आता काय काळजीचे कारण ?' असे म्हणून भागणार नाही. पीक हातात आले तरी त्याची झोडणी झाली पाहिजे. पुढे दाणा दास्तानांत जपून ठेवले पाहिजेत; नाहीतर उंदीर, घुशी धान्य फस्त करतील. नंतर पुढे, जरूर लागेल तेव्हा ते कांडले पाहिजे. कांडतांनासुद्धा, दाणा फुटणार नाही इतक्या बेताने कांडले पाहिजे. अशा तर्‍हेने, आरंभपासून शेवटपर्यंत अगदी जागरूकतेने वागले पाहिजे, तरच साधकाची शेवटपर्यंत तग लागेल. नाहीतर मध्येच निष्काळजीपणामुळे, आणि सर्व काही हाती आले अशा भ्रमाने वागले, तर प्रगती थांबेल. अशी उदाहरणे फार आढळतात. म्हणुन अतिशय सावधगिरीने वागावे. जो साधक प्रपंचामध्ये असेल त्याला प्रपंची लोकांच्या संगतीत राहावे लागणार; पण त्याने फार सांभाळून राहायला पाहिजे. आपली वृत्ती केव्हा बदलेल याचा नेम नसतो. खरोखर, परमार्थ ही कठीण शिकारच आहे. शिकार अशी मारली पाहिजे, की आपल्या मीपणाला मारून आपण जिवंत राहिले पाहिजे, आणि आपल्याला नको तेवढेच गळून पडले पाहिजे.


१२३. सावधानता ठेवून नाम घ्यावे.
नामाची सतत धार धरावी. म्हणजे ते वृत्तीपर्यंत पोहोचते.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

१ मे, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १ मे २०१४

१ मे

कोणत्याही कृतीत हेतु शुद्ध पाहिजे. 

 



तमोगुण हा तिन्ही गुणांत जास्त जड असल्याकारणाने त्याचा परिणाम या जगामध्ये लगेच दिसून येतो. दुष्ट बुद्धी हा तमोगुणाचा परिणाम आहे. परंतु भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय माणसाच्या ठिकाणी आहे. यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे, म्हणजे सत्त्वगुणाचा उदय होतो आणि बुद्धी शुद्ध बनते. देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो हे काही खरे नाही. तसे जर असते तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडण्यार्‍यांना भगवंत लवकर वश झाला असता ! भगवंताचे लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे असते. आपल्या मनामध्ये प्रापंचिक हेतू ठेवून भगवंताच्या नावाने उपवासासारखे कष्ट केले तरी, ते पाहून लोक फसतील, पण भगवंत फसणार नाही. आपण जसे बोलतो तसे वागण्याचा अभ्यास करावा. परमार्थामध्ये ढोंग फार बाधक असते. प्रापंचिक गोष्टीकरता उपवास करणे मला पसंत नाही. उपवास घडावा यात जी मौज आहे ती उपवास 'करावा' यामध्ये नाही. भगवंताच्या स्मरणामध्ये इतके तल्लीन व्हावे की आपण नेहमी त्याजवळ वास करतो आहोत असे मनाला वाटावे. मग देहाने अन्न खाल्ले म्हणून बिघडले कुठे ? या‍उलट, आपल्या चित्तांत भगवंताचे नाम नसतांना आपण देहाने पुष्कळ उपवास केले, तरी अशक्तपणा शिवाय दुसरे काही पदरात पडणार नाही. काही लोक वेडे असतात; त्यांना आपण उपासतापास कशासाठी करतो आहोत हेच समजत नाही. कोणत्याही कृतीला वास्तविक मोल तुमच्या हेतूवरून येते. हेतू शुद्ध असून एखादे वेळी कृती बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालते; पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंत त्यापासून दूरच राहतो. माणसाने केलेला उपवास निष्काम असून, तो केवळ भगवंताच्या स्मरणात राहावे म्हणून केलेला असला तर फारच उत्तम आहे. निष्काम कर्माचे फार फार महत्त्व आहे. 'भगवंतासाठी भगवंत हवा' अशी आपली वृत्ती असावी. किंबहुना, नाम घेत असताना, प्रत्यक्ष भगवंत समोर ठाकला, आणि 'तुला काय पाहिजे ?' असे त्याने विचारले, तर 'तुझे नामच मला दे' हे त्याच्याजवळ मागणे, याचे नाव निष्कामता होय. कारण, रूपाने व्यक्त झालेला भगवंत केव्हातरी नाहीसा होईल, पण त्याचे नाम मात्र अखंड टिकेल; आणि त्याचे नाम घेतले की त्याला आपल्याकडे येणे जरूर आहे. म्हणून, देहाला कष्ट देण्याच्या भानगडीत न पडता भगवंतासाठीच नाम घेत असावे. त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही.



१२२. जेथे नाम तेथे राम हा ठेवावा विश्वास । कृपा करील रघुनाथ खास ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

३० एप्रिल, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३० एप्रील २०१४

३० एप्रिल

जेथे भगवंताचें नामस्मरण । तेथे सर्व संतांचें ठाण ॥





जोंवर धरिली जगाची आस । तोंवर परमात्मा दूर खास ॥
परमात्म्याची प्राप्ति । न होई राखता विषयासक्ति ॥
जग विषयाकार राहिले । तेथे प्रेम केले ते घातासी आले ॥
विषयी एकजीव झालो जाण । सुटता न सुटे आपण जाण ॥
मान, अपमान, जगाचे सुख-दुःख । हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण ॥
अभिमानांत परमात्म्याचे विस्मरण । हें जीवपणाचें मुख्य लक्षण ॥
सुख-दुःख, विपत्ति-आपत्ति, । ही माया प्रपंचाची ओहोटी भरती ॥
आत्मनिश्चय बाणल्यावांचून माया न हटे न सुटे जाण ॥
आता करी शूर मन । मायेसी हटवावे आपण ॥
जैसें जैसें बाहेर दिसलें । त्याचें बीज आपणाशीच उरलें ॥
एकच वस्तूची ओळखण जाण । पूर्ण होते समाधान ॥
ज्याच्यांत मानावे मी सुख । त्याच्यातच उद्‌भवतें दुःख ॥
नराचा होय नारायण । जर न चुकला मार्ग जाण ॥
जेथे ठेवावी आस । त्याचे बनावें लागते दास ॥
देह तो पंचभूतांचा । त्याचा भरवसा न मानावा फारसा ॥
मी तुम्हांस सांगतो हित । दृश्यांत न ठेवावें चित्त ॥
दृश्य वस्तु नाशिवंत असते । भगवत्कृपेने समाधान येते ॥
परिस्थिति नसे बंधनास कारण । असे आपलेच मनाची ठेवण ॥
देवास पाहावें ज्या रीतीनें । तसाच तो आपणास दिसतो जाण ॥
विषयाचा नाही झाला जोंवर त्याग । तोंवर रामसेवा नाही घडत सांग ॥
आपलें प्रेमयुक्त चाले धणी । त्यासी म्हणती ब्रह्मज्ञानी ॥
द्रव्यदारावर्जित जाण । ही खरी संताची खूण ॥
सृष्टी पाहावी भगवदाकारी । प्रेम ठेवील त्याचेवरी । त्याला नाही दुसरी सरी ॥
आल्यागेल्यास द्यावे अन्नदान । मुखानें भगवंताचें नाम ॥
हृदयांत रामाची प्रीति । यासच थोर म्हणती जीवन्मुक्ति ॥
न धरावी जगाची आस । तोच होऊ पाहे रामदास ॥
नामांत संत । नामीं भगवंत ॥
वृत्ति राखावी अत्यंत शांत । हेंच संताचें मुख्य लक्षण जाण ॥
जेथे भगवंताचें नामस्मरण । तेथे सर्व संतांचें ठाण ॥
अगरबत्ती जळून गेली । परि सुवासाने राहिली ॥
तैसी रामचरणी झाले जे लीन । तेच खरे जिवंत जाण ॥
संतचरणीं झाला लीन । त्याला भाग्यास नाहीं दुजें उणें ॥
संताची संगति । भगवन्नामानें साधतें ॥


१२१. देहासकट माझा प्रपंच । रामा केला तुला अर्पण ॥
ऐसें वाटत जावें चित्तीं । कृपा करील रघुपति ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२९ एप्रिल, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २९ एप्रील २०१४

२९ एप्रिल

पैशाच्या आसक्तित राहू नये. 

 



कामवासना आणि पैसा ही दोन्ही परमार्थाला विघातक आहेत; पण मला जर कोणी विचारले की, 'त्यातल्या त्यात जास्त घातक कोणते ते सांगा ?' तर मी सांगेन की, 'पैसा हा त्यांतला त्यात परमार्थाला जास्त हानिकारक आहे. पैसा हा भगवंताची निष्ठा कमी करतो.' भगवंताने आपल्याला पैसा दिला आहे, तो आपण सत्पात्र आहोत म्हणून का दिला आहे ? यासाठी, भिकार्‍याला पैसा देताना उगीच वाद घालू नये. तसे करणे म्हणजे काही न करण्याची बुद्धी होय. एखादा त्यागी मनुष्य सर्व देईल पण 'स्व' देणार नाही. 'स्व' देऊन मग 'सर्व' ठेवले तरी चालेल, पण 'सर्व' देऊन 'स्व' ठेवला तर ते मात्र चालणार नाही; म्हणजेच, 'मी देतो' ही भावना राहिली तर सर्वच देणे वाया जाते. मुख्य म्हणजे त्यातली वासना गेली पाहिजे, तर खरे सुख लागते.
देह हा पाया धरून त्यावर इमारत बांधू लागलो तर इमारत पक्की कशी होणार ? मी 'माझा' देह म्हणतो, पण ताप येणे न येणे, इजा होणे न होणे, हे आपल्या हातात आहे का ? 'मी माझे रक्षण करीन ' असे म्हणतो, पण वाटेत ठेच लागून पडल्यावर लोकांनी मला घरी आणावे लागते; म्हणजे जीवित किती परस्वाधीन आहे ! देहाने कितीही कार्य केले तरी ते कळसाला नाही पोहोचणार. अभिमानाने केलेले कार्य कसे कळसाला पोहोचणार ? एक भगवदिच्छेने कार्य केले तरच ते शेवटाला जाते. समर्थांनी देहबुद्धी नष्ट करून, रामाचे अधिष्ठान ठेवून कार्य केले; म्हणून त्यांना एवढे कार्य करता आले. जो भगवंताचा झाला त्याचेच कार्य पूर्ण झाले, आणि त्यालाच खरे समाधान मिळाले.
राजाच्या पोटी आलेले देखील भिकारी होऊन जातात, मग मी संपत्तीचा कुठे गर्व करावा ? पैशाने प्रेमात बिघाड येतो आणि अगदी जवळचे नातेवाईकसुद्धा दूर होतात. मी खरे सांगतो, पैशाच्या आसक्तित तुम्ही राहू नका. ही आसक्ति नाहीशी करण्याचा सोपा उपाय म्हणजे संतसमागम हाच होय. आज खरे संतच कुठे आहेत असे आपण म्हणतो, पण आम्हाला संत भेटावा ही तळमळच खरी लागलेली नसते. संतात संतपणा दिसत नाही याचे कारण आमच्यात तळमळ नाही. सत्ययुगात जो राम होता तोच आजही आहे, पण माझा भावच कमी झाला त्याला काय करावे ! संतांना आपण खोटेपणा देतो. पण माझा भाव शुद्ध नाही हे नाही जाणत. विषयात सुख आपल्या इच्छेप्रमाणे मिळत नाही, म्हणून आपण संताकडे जातो. पण संताला अर्पण करून घेण्याकरिता कितीजण संताकडे जातात ? देवाकरिता देवाकडे जाणारे किती बरे निघतील ?


१२०. मनाने नेहमी 'मी रामाचा आहे' ही भावना ठेवावी.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२८ एप्रिल, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २८ एप्रील २०१४

२८ एप्रिल

खरी तळमळ लागली म्हणजे संत भेटतो. 

 



असंताची आवड नाहीशी होईल तेव्हाच संत हवासा वाटेल. विषय आपल्याला त्रास देतात, पण ते सोडावे कसे हे समजत नाही. जंगलात सापडलेल्या माणसाप्रमाणे आपले झाले आहे. आपली वाट चुकली आहे असे ज्याला वाटेल तोच जंगलातून बाहेर पडण्याची वाट विचारतो. 'आता वय फार झाले, काळाच्या स्वाधीन होण्याची वेळ आली, रामा तूच आता तार,' अशी तळमळ लागली, तरच संतसहवास लाभेल. सत्संगत हवी असे आपण नेहमी म्हणतो खरे, पण मागतो मात्र ' असत्‌ ' ; मग आपल्याला सत्संगत मिळेल कशी ? स्वतःला कसे विसरावे हे कळण्याकरताच संताला शरण जावे. आपले विस्मरण म्हणजे भगवंताचे स्मरण. वडील दूर आहेत, त्यांचे पत्र नाही, म्हणून काळजी करतो; पण जन्मापासून भगवंत दूर आहे, त्याची तळमळ का लागू नये ? आपण नामस्मरण करतो, पण ज्याचे नाम घेतो तो कोण, असा विचार करतो का ? विषय सोडल्याशिवाय राम कसा भेटणार ? रामही हवा आणि विषयही हवा, हे जुळणार कसे ?
मला जोपर्यंत चिमटा घेतलेला कळतो तोपर्यंत कर्म मार्गानेच जाणे जरूर आहे. कर्ममार्ग सांभाळताना, 'कर्ता मी नव्हे' ही भावना सांभाळणे जरूर आहे. जो खरा अनुभवी आहे तो बोलणारच नाही, आणि बोललाच तर तो अगदी थोडे बोलेल; तो उत्तम होय. अनुभवी खरा, पण नाइलाज म्हणून जो बोलतो तो त्याच्यापेक्षा थोडा कमी समजावा. कोणीतरी बोलल्याशिवाय लोकांना कळणार कसे, म्हणून हे लोक कमीपणा पत्करूनही पुष्कळ बोलतात. परंतु अनुभव नसताना उगीच शब्दपांडित्य करणारे हे अगदी खालच्या दर्जाचे होत. ज्याला अनुभव कमी त्याला शब्दपांडित्य फार असते. जो जगाला फसविणार नाही आणि स्वतःही फसणार नाही, असाच मनुष्य जगाला मार्गाला लावू शकेल.
कित्येक साधू दगड मारतात किंवा शिव्या देतात, तरी लोक त्यांच्या मागे लागतात, कारण त्यांच्या शिव्यादेखील आशीर्वादाप्रमाणे असतात. हे कित्येक लोकांच्या ध्यानी येत नाही. एखादा मुलगा बापाला म्हणू लागला की, 'मी इतका जवळचा, पण मला मिळतो मार; आणि तो लांबचा पोर, त्याचे मात्र लाड !' पण तो मारच आपल्या हितासाठी असतो, हे त्याला नाही समजत ! साधूच्या बोलण्यामध्ये किंवा मारण्यामध्येसुद्धा दुष्ट बुद्धी नसते. संत जे काही बोलतील ते जगाच्या कल्याणाकरताच असते. संत निःस्वार्थी असतात. ते तळमळीने सांगतात. त्यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. संताच्या सांगण्याचा खरा अर्थ आचरणानेच कळेल.


११८. परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला.
प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२७ एप्रिल, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २७ एप्रील २०१४

२७ एप्रिल

नामधारकाने टाळण्याच्या गोष्टी. 

 



आपले विचार स्वार्थाचे नसावेत. स्वार्थामध्ये अभिमान नेहमी जागृत असतो. स्वार्थी मनुष्याला जगात सुख मिळणे कधीही शक्य नाही. नीतिची बंधने पाळा. परस्त्री मातेसमान माना. प्रपंचात एकपत्‍नीव्रताने राहणारे गृहस्थ लोक ब्रह्मचारीच होत. परद्रव्याची अभिलाषा धरू नका. त्याला विष्ठेसमान माना. दुसर्‍याच्या पैक्याचा अभिलाष धरण्यात आपला किती घात आहे याची नुसती कल्पनाच केलेली बरी. परस्त्री, परद्रव्य यांच्याप्रमाणेच परनिंदा हीही अत्यंत त्याज्य गोष्ट आहे. परनिंदेने नकळत आपण आपलाच घात करीत असतो. परनिंदेमध्ये दुसर्‍यांच्या दोषांचे चिंतन होत असल्या कारणाने, ते दोष आपल्याकडे येत असतात. या सर्व गोष्टी सांभाळून तुम्ही नाम घ्या, नामाचे प्रेम तुम्हाला अगदी खात्रीने येईल. हे सर्व करीत असताना तुमचे आईवडील, बायकोमुले, यांच्या बाबतीत असलेले कर्तव्य करायला चुकू नका आणि त्या कर्तव्यात आसक्ति राहू देऊ नका. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म हे कर्तव्यच होय. ते कर्तव्य सांभाळून नीतिधर्माने वागून आपला प्रपंच करा, आणि भगवंताचे स्मरण ठेवा. मग तुमचा प्रपंचच परमार्थरूप बनून भगवंताचे प्रेम तुम्हाला मिळेल हा माझा भरवसा तुम्ही बाळगा.
प्रपंच हा मिठासारखा आहे. भाकरीत मीठ किती घालायचे असते ? तर अगदी थोडे - फक्त चवीपुरते ! परंतु आपण मिठाची भाकरी करतो आणि त्यात परमार्थाचे चिमूटभर पीठ टाकतो; मग ती भाकरी खाता येईल का ? खरे समाधान मिळाल्यावर मनुष्य खेळासारखा प्रपंच करतो. त्यामध्ये तो वर चढला किंवा खाली पडला तरी सारखाच राहील; दुसर्‍याने डाव टाकल्यावर तो आपणही डाव टाकील ! पण डाव हरला किंवा जिंकला तरी त्याची त्याला पर्वा राहणार नाही.
प्रपंचात अनेक वस्तू आहेत. पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे. प्रपंचात कितीही वस्तू आणल्या तरी त्या पुर्‍या पडत नाहीत, कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसर्‍या वस्तूच्या आणण्याचे बीज आहे. पण भगवंताचे तसे नाही; भगवंताची वस्तू एकदा आणली की पुन्हा ती आणायला नको. समजा, एका दुकानात पुष्कळ माल भरलेला आहे; पण आपल्याला पाहिजे ती वस्तू तिथे नाही, म्हणजे आपल्या दृष्टीने तिथे काहीच नाही ! त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या मानसिक शक्ति असून तिथे भगवंत नसेल, तर त्या असून नसून सारख्याच समजाव्यात. परमात्म्याला प्रपंचरूप बनविण्या‍ऐवजी आपण प्रपंचाला परमात्मरूप बनवावा. यातच जन्माचे सार्थक आहे.


११८. परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला.
प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२६ एप्रिल, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २६ एप्रील २०१४

२६ एप्रिल

संतांनीच भगवंताला सगुणात आणले. 

 



सर्वांत अर्पणभक्ति श्रेष्ठ आहे. पूजा करताना 'मी तुझा दास आहे' असे म्हणावे, म्हणजे प्रेम येते. यात लाज वाटायचे काहीच कारण नाही. आधी भगवंताचे दास व्हावे आणि मग पूजा करावी. आम्ही इतर कित्येकांचे दास होतो, आणि इतक्यांत उरेल तेव्हा भगवंताचे दास होणार; मग पूजेत अर्पणभक्ति कशी येणार ? आपल्याला जे जे आवडते ते ते मनाने भगवंताला अर्पण करावे. इथे सर्व काही मनानेच करायचे असते. नुसते शरीराने काबाडकष्ट केले म्हणजे प्रेम येतेच असे नाही. चित्त विषयाकडे ठेवून भगवंताची सेवा करणे म्हणजे अंगचोरपणा आला. असा अंगचोरपणा करू नये. भगवंताकडे मन लागायला सगुणोपासना उत्तम होय. सर्व लोक या ना त्या रूपाने सगुणाचीच उपासना करणारे असतात. ठरलेली वेळ आणि ठरलेले साधन असावे, म्हणजे त्यामध्ये प्रेम येते. आपण ज्याची उपासना करतो त्या मूर्तीमध्ये तेज वाढत असते. ज्या मूर्तीची उपासना एखाद्या साधूने केलेली असेल त्या मूर्तीमध्ये फार तेज असते, आणि ते पुष्कळ काळ टिकते. शिवाय ते इतरांनाही उपयोगी पडते. जगाचे खरे स्वरूप कळण्यासाठी सगुण उपासनाच कारणीभूत आहे. सर्व भोग भोगून काळजी नसणे हे उपासनेचे खरे मर्म आहे. उपासनेचे तेज कसे झळकले पाहिजे ? हे तेज फार विलक्षण असते. पैशाचे किंवा विद्वत्तेचे तेज तितके नसते. ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे तोच जगात खरे काम करतो.
एक बाई डोळे झाकून बसली म्हणजे तिला एक देवी दिसे. त्या बाईशी देवी बोलत असे, आणि प्रपंचातल्या वगैरे सर्व गोष्टी कशा कराव्यात हे सांगत असे. परंतु बाईने ध्यान करणे सोडून दिल्याने तिला देवी दिसणे बंद झाले. तसेच एक मुलगा डोळे झाकून बसला म्हणजे त्याला पांढरी दाढी असलेला एक साधू दिसे. कसे वागावे, काय करावे, वगैरे सर्व गोष्टी तो त्या मुलाला सांगत असे. परंतु मुलाने ध्यान करणे सोडून दिले, आणि तो दाढीवाला दिसेनासा झाला. या गोष्टींचा अर्थ असा की, आपल्याला सांभाळणार्‍या शक्ति आपल्या मागे असतात, त्यांची उपासना आपण सोडू नये. भगवंताला सगुणामध्ये आणला हा संतांचा आपल्यावर फार मोठा उपकार आहे. संतांनी आपल्याला सांगितले की, "ही दृश्य मूर्ति तुझी आहे, तुला हव्या असणार्‍या सर्व वस्तू देणारा भगवंत तोच आहे." ही जाणीव आणि कल्पना आपल्या ठिकाणी वाढत गेली तर त्यामुळे 'भगवंत दाता आहे' ही जाणीव उत्पन्न होईल. 'भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझ्या सुखाचा आधार आहे, तो माझे कल्याण करणारा आहे,' ही जाणीव झाली की, जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेनेच मिळाले ही भावना होऊन, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान टिकेल.


११७. आनंदरूप परमात्मा मिळविण्यासाठी सगुणोपासना पाहिजे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२५ एप्रिल, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २५ एप्रील २०१४

२५ एप्रिल

संत हे आपला संबंध भगवंताशी जोडतात. 

 



आपले हृदय विषयाने इतके भरले आहे की तिथे भगवंताच्या प्रेमाला जागाच राहिली नाही. बरे, भगवंताचे प्रेम मुद्दाम तिथे घातले, तर ते आत न राहता बाहेर पडते आणि वार्‍यावर उडून जाते. सामानाने गच्च भरलेली जशी एखादी खोली असते, तसे आपले हृदय आहे. या हृदयाचा संबंध भगवंताशी जोडण्यासाठी, आपल्या हृदयातले सामान, म्हणजे विषय, खाली करून त्याच्या जागी भगवंताचे प्रेम भरणे जरूर आहे. साधारणपणे आपला अनुभव असा आहे की, एखादी वस्तू आपल्याला पुष्कळ आणि पुन्हा पुन्हा मिळाली तरी तिचा वीट येतो; म्हणून जी वस्तू आपल्याला कितीही मिळाली तरी तिचा वीट येणार नाही अशी वस्तू आपण मिळवावी. अशी अवीट असणारी वस्तू एकच आहे; ती म्हणजे भगवंत होय.
राजाने आपल्या नावाचा शिक्का केला, आणि जो अती प्रामाणिक होता त्याच्या जवळ दिला; त्याप्रमाणे भगवंताने आपले नाम संतांना दिले. त्यामुळे, संत जे करतील त्याला मान्यता देणे भगवंताला जरूरच आहे. आपण आणि संत यांच्यामध्ये मनुष्य या दृष्टीने फरक नाही; पण फरक आहे तो हा की, संत हा जसे बोलतो तसे वागतो, तर आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र त्याच्या उलट. आपल्या स्वार्थाच्या आड कोणी आले की आपण वाईट बोलतो. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच वस्तूवर दुसर्‍याने प्रेम केले तर आपण त्याला नावे ठेवतो. आपण नुसती नीतीची तत्त्वे जेव्हा सांगतो तेव्हा अगदी चांगले बोलतो; पण वागताना मात्र उलट वागतो. यासाठी आपण अशी कृती करू या की आपल्याला नंतर तसे बोलता येईल.
गाडीत बसायला मिळावे म्हणून काही कोणी गाडीत बसत नाही, तर आपल्या स्टेशनाला जाण्यासाठीच मनुष्य गाडीचा आधार घेतो. तसा, मोठमोठ्या संतांनी प्रपंच केला खरा, परंतु तो सुखासाठी केला नाही. आपल्या वृत्तीपासून न ढळता इतरांना तारण्याचे काम संतांनी केले. बुडणार्‍या माणसाला जसा दोरीचा आधार द्यावा, त्याप्रमाणे संतांनी आपल्याला परमात्म्याचा आधार दिला. चंदनाच्या झाडाजवळच्या झाडांना जसा चंदनाचा वास लागतो, त्याप्रमाणे संताजवळ राहतो तोही संतच बनतो. काही कष्ट न करता परमार्थ साधणे हेच सत्संगतीचे महत्त्व आहे.

११६. आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाकच ऐकू येत नाही.
ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर असावे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२४ एप्रिल, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २४ एप्रील २०१४

२४ एप्रिल

संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणे. 

 



मी जिवंत राहावे हे जितके जरूर आहे, तितकेच परमात्म्याची ओळख करून घेणे जरूर आहे. जगात नावे ठेवीत नाहीत कोणाला ? परमार्थाला वाहून घेतले तर प्रपंच नीट करीत नाही म्हणून नावे ठेवतात; तिकडे लक्ष देऊ नये. मनाच्या विषादाला कारण एकच असावे की, मी अजून भगवंताचा झालो नाही. जो भगवंताच्या इच्छेने वागतो त्याचे चांगले होते. भगवंत ठेवील त्यात समाधान मानून राहावे. भगवंताचे रूप आनंदमय आहे, आणि सृष्टीचा क्रमच असा आहे की तो माणसाला आनंदाप्रत पोहोचवीत असतो. अत्यंत दारिद्र्यालासुद्धा आनंदाची जागा असतेच. आनंदाशिवाय मनुष्य जगणेसुद्धा शक्य नाही. मी मुळात आनंदरूप असताना मग दुःखाचे गाडे आले कुठून ? मला दुःख होते ते माझे कुठे तरी चुकते म्हणून ! मी चुकलो का बरोबर, ही शंकासुद्धा मुक्ताला येत नाही, कारण तो आणि देव एकच असतात. बद्धालाही शंका येत नाही. कारण तो देव जाणतच नाही; 'सर्व काही मी करतो, आणि देव नाहीच, ' म्हणून म्हणतो. मुमुक्षूला मात्र ही तळमळ लागते. जेव्हा ही तळमळ तीव्र असते तेव्हां संतांची भेट होते. काही पूर्वीचा ठेवा असल्याशिवाय अशी तळमळ लागणार नाही.
आपण संतांचे होऊन राहावे. त्यांचे झालो म्हणजे त्यांच्याशिवाय आपल्याला कुणी नाही असे वाटले पाहिजे. संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत वागणे. ते सांगतील तसे करावे, ते वागतील तसे नाही वागू. सत्याची संगत धरली म्हणजे सत्संगती मिळते. कशाचीही आसक्ति न धरता जगात वागणे हेच मुक्तांचे लक्षण. हवेपण नाहीसे झाले म्हणजे मग दुःखाचे कारणच राहात नाही.
जिथे तुम्ही राहता तिथे सद्‌गुरु आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते, हीच त्यांची खरी कृपा होय. श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्येने होत नाही. आपल्या गुरूंनी सांगितलेल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ समजा. गुरू म्हणजे साक्षात परमात्मा. त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या. याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे न वाटावे.
माझ्या मनाचे विकार जात नाहीत असे चांगल्या माणसांनासुद्धा वाटते. पण 'ते जात नाहीत, जात नाहीत' असे घोकून त्यांचा ध्यास घेतल्याने ते उलट वाढतील. तिकडे लक्ष देऊ नये. नाम घेणे हे आपले काम करीत राहावे, म्हणजे विकार आपोपापच कमी होत जातील. मात्र, मनाच्या मागे देहाला जाऊ न देणे, इतके जपले पाहिजे.

११५. संतांची आज्ञा प्रमाण मानणे हेच प्रचीती येण्याचे साधन आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२३ एप्रिल, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २३ एप्रील २०१४

२३ एप्रिल

संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्युपत्रासारखे आहेत. 

 

   

संतांना ग्रंथ लिहिण्याची मुळीच हौस नसते, नाइलाज म्हणून ते ग्रंथ लिहीत असतात. तुम्हाला असे वाटते का, की नाथांनी आणि समर्थांनी ज्ञानेश्वरीची पारायणे करून नंतर आपले ग्रंथ लिहिले ? त्यांचे ज्ञान स्वतंत्र असते, आणि ते साक्षात्‌ भगवंतापासून आलेले असते. त्यामध्ये अर्थात्‌ मागील ग्रंथकारांनी सांगितलेल्या काही गोष्टी येणारच. संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्युपत्रासारखे आहेत. आपले मुलगे चांगले वागतील अशी ज्या बापाला खात्री वाटते तो कशाला मृत्युपत्र लिहील ? तशी ज्याला खात्री नसते तो नाइलाजाने मृत्युपत्र लिहितो ! त्याचप्रमाणे, संतांनी हौसेने किंवा विद्वत्ता दाखविण्यासाठी ग्रंथ लिहिले नाहीत, तर आपल्यासारख्या जडजीवांचे कल्याण व्हावे ही तळमळ त्यांना होती म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले. पोथी, पुराणे, सत्पुरुषांचे ग्रंथ, यांचा आपल्या जीवनाशी निकट संबंध असतो. असल्या ग्रंथांमध्ये, ज्याचा व्यवहारामध्ये उपयोग करता येतो असा वेदान्त सांगितलेला असतो. आपल्याला सुचणार नाहीत इतक्या शंका समर्थांनी घेऊन त्यांची उत्तरे दासबोधात दिली आहेत. परमार्थ न ऐकणारा दोषी आहे, पण तो ऐकत नसताना त्याला सांगणारा त्याहूनही दोषी समजावा. हा दोष पत्करूनही संत जगाला परमार्थ सांगत असतात.
ग्रंथ वाचीत असताना, ध्येय जर परमार्थप्राप्ती हे असेल तर त्यासाठी त्या ग्रंथात साधन कोणते सांगितले असेल इकडे लक्ष असावे. साधनाची योग्य निवड झाली की साध्य साधेलच. ज्या विषयात पारंगत व्हायचे तीच पुस्तके वाचणे जरूर असते. आमचे उलट होते; गणित विषय घेतो आणि वाचतो कादंबर्‍या ! मग गणितात पास कसे होणार ? परमार्थ हेच जर ध्येय असेल तर संतांच्या ग्रंथांचाच अभ्यास करावा, त्यांचेच श्रवण-मनन करावे.
आपण आपले मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावे; आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा. कधी तो सुखात राहील, तर कधी तो दुःखात राहील, कधी तो बरेच दिवस सरळ जाईल, तर कधी तो मधेच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल; पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम टिकेल यात शंका नाही. आपल्या देहाकडे आपण वेगळेपणाने पहायला शिकले पाहिजे. मन द्यावे भगवंताला आणि देह द्यावा प्रारब्धाला, म्हणजे हे साधेल. देहाचे सुखदुःख वरवरचे असावे, ते आत शिरून मनावर परिणाम करता कामा नये. भगवंताच्या नामाने हे हमखास साधते. म्हणून अखेर नामाशिवाय गत्यंतर नाही.

११४. संतांच्या ग्रंथाचा खरा अर्थ कृतीनेच कळेल.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२२ एप्रिल, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २२ एप्रील २०१४

२२ एप्रिल

सत्समागम हा सर्व साधनांचा राजा ! 

 



मनुष्यजन्माला येणे, संतांची भेट होणे, आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास होणे, या तिन्ही गोष्टी फार दुर्घट आहेत. म्हणूनच संतसमागमासारखा लाभ नाही असे म्हणतात. सत्समागम म्हणजे सर्व साधनांचा राजा होय. काही मागण्याची इच्छाच संत नष्ट करतात, मग मिळवायचे कुठे राहते ? संत बनणे व्यावहारिक दृष्ट्या काही सुखाचे नसते. एखाद्या स्नानसंध्याशील आणि सदाचरणी माणसाच्या अंगावर तेज दिसते, कारण देहाला धरून झालेल्या कर्माचे ते तेज असते; पण एखाद्या सत्पुरुषाच्या देहावर बाहेर तसे तेज दिसणारही नाही. आत वावरणार्‍या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो. देहाच्या आधाराने भोगण्याची या जगामधली जी सुखे आहेत, त्यांचे मार्ग सत्पुरुषापेक्षा आपण प्रापंचिक लोक जास्त जाणतो, परंतु देहाच्या पलीकडे असणारे आणि कायमचे टिकणारे, आणि देहाला विसरून आणि देवाला स्मरून जे मिळवायचे, असे भगवंताचे सुख आहे. ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेले पाहिजे. विषय तृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे. हा संतसंगतीचा परिणाम. असा जो असेल तोच संत, नव्हे प्रत्यक्ष भगवंत होय. अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. संत आपल्याला सत्यस्वरूपाची ओळख करून देतात. सत्पुरुषाने आखून दिलेल्या मार्गाने कायावाचामनाने जे कर्म केले जाते ते पौरुषच होय.
आगगाडीत बसणारी सर्व माणसे, मग ती कोणत्याही क्लासमध्ये बसणारी असोत, इतकेच नव्हे तर बिनतिकिटाची माणसेदेखील, गाडीबरोबर सरळ म्हणजे शेवटच्या स्टेशनापर्यंत जाऊन पोहोचतात; त्याचप्रमाणे संतांची संगत करणारी सर्व माणसे भगवंतापर्यंत पोहोचतात. त्यांच्यामधली बिनतिकिटाची, म्हणजे दुष्ट, पापी, दुराचारी, त्याज्य, आणि अयोग्य, अशी माणसेसुद्धा तरून जातात; मात्र कोणीही गाडी तेवढी सोडता कामा नये. हाच सत्संगतीचा महिमा. परमार्थ साधण्यासाठी सत्संगती फार उपयोगी पडते. ही संगती तीन प्रकारची असते : एक, संताचा प्रत्यक्ष देहामध्ये सहवास; दोन, संताने सांगितलेल्या मंत्राचा सहवास; आणि तीन, संताच्या विचारांची संगत. संगतीचा परिणाम नकळत होतो, म्हणून सत्संगती धरावी. आपण ज्याकरिता जन्माला आलो ते कारण फक्त संतच उमगले; म्हणून त्यांना शरण जावे. संत स्वतः समाधान मिळवून ते दुसर्‍याला देतात, हे त्यांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत !

११३. संतांजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले, म्हणजे संताची प्रचीती आली असे समजावे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२१ एप्रिल, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २१ एप्रील २०१४

२१ एप्रिल

सत्समागम म्हणजे संत सांगतील त्याप्रमाणे वागणे. 

 



कोणत्याही मंगल कार्यात सर्वाआधी गणपतीचे आवाहन करतात, आणि सगळे कार्य संपले की सर्वांचे शेवटी त्याचे विसर्जन करतात. त्याचप्रमाणे अनुसंधानानेच पोथीला सुरुवात करावी आणि अनुसंधानानेच पोथीची समाप्ती करावी. लौकिक कार्यामध्ये गणपतीचे विसर्जन झाल्यावर आपण शिल्लक उरतो, पण अनुसंधानाचे विसर्जन करताना आपणही त्यात नाहीसे व्हावे. "जसे ठेवायचे असेल तसे ठेवा, पण आपला विसर पडू देऊ नका, एवढी भीक घालावी, " अशी गुरूच्या चरणी प्रार्थना करावी.
भगवंताला विसरून भजन करू नका. भगवंताची आठवण ठेवून भाजी जरी आणली तरी त्याचे श्रेय जास्त आहे. जगाच्या लाजेला भिऊन भगवंताला अंतर देऊ नये. 'मी कोण' याचा विचार करावा, आणि तो करण्यासाठी, 'मी नाही कोणाचा' हे बघावे. मी आप्तेष्टांचा, बायको-मुलांचा, आईबापांचा तर नाहीच, पण मी देहाचा आणि मनाचाही नाही; असे करता करता जो राहील तो मी. खरे समाधान एकपणात आहे, अद्वैतात आहे. म्हणून, द्वैताचा जनक जो अभिमान तो कमी कसा होईल ते बघावे. याकरिता, मी कर्ता नसून देव कर्ता आहे असे मानावे. सर्वांभूती भगवद्‌भाव पाहावा, सत्समागम करावा. सत्समागम म्हणजे सत्याचा समागम. सत्पुरुषाच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनविणे हा खरा सत्समागम आहे. संतांवर अनन्य श्रद्धा ठेवा. त्यांच्या चालीने चाला. त्यांच्या समागमात दैन्य मानू नका, जे तुमची एकसारखी विषयातली नडच भागवतील ते संत नव्हेत. खरे संत विषयाची आसक्ति कमी करतात; अशा संताला शरण जावे. निर्विषय चित्त संतांनाच करता येते. संत हे ईश्वरदर्शनाची तळमळ उत्पन्न करतात. तळमळ उत्पन्न करून देणे हीच संतांची कामगिरी. संतांची भाषा तळमळीची असते, म्हणून ती तळमळ उत्पन्न करते. संत सांगतील त्याप्रमाणे वागावे. जग संतांशिवाय असणेच शक्य नाही. जे देहात दिसले पण वस्तुतः देहातीत राहिले ते संतच होत. आम्हाला त्यांना ओळखता येत नाही याला काय करावे ? नामाच्या योगानेच संत ओळखता येतात आणि टिकवता येतात. जो भगवंताचे नाम घेईल त्याला संत भेटेल, आणि तो त्याला भगवंताची प्राप्ती करून देईल. त्याचे कुठे अडणार नाही. पण जो नुसत्या शब्दज्ञानाच्या मागे लागेल त्याला आसक्ति सुटणार नाही, आणि त्याचे जीवन सार्थकी लागणार नाही.



११२. संताच्या पदरात पडले की तो आपली लाज राखतो.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या