१३ मार्च, २०२०

हर्षल

प्रिय हर्षल,

सर्वप्रथम तूला वाढदिवसाच्या शुभेच्छा 📝

खरं म्हणजे कालच १२ मार्चला 'आजचे दिनविशेष ' या रेडिओ वरच्या कार्यक्रमात तूझा वाढदिवस ( तेही १९७२ वगैरे साल) म्हणून सांगितले गेले. पण तूझा वाढदिवस आजच. १३ मार्च १७८१ ला "विल्यम हर्षल" ने तूला शोधले. 'बुध' ग्रहाची विस्तारित आवृत्ती म्हणजे तू. म्हणूनच वाढदिवसाच्या तारखेत ही 'संभ्रमावस्था' ही खरंच तूलाच शोभून दिसली. असो.

पाश्चिमात्य खगोलशास्त्रज्ञाने तूला शोधून त्याचेच नाव तूला दिले गेले. 'यूरेनस' असेही तुझे इंग्रजी नाव आहे. पण इकडच्यांनी पण तूला खास नावं दिली आहेत

प्रजापती- कै. जनार्दन मोडक यांनी केलेले नामकरण

अरुण -कै. व्यंकटेश केतकर यांनी दिलेले नाव

खरं म्हणजे ९ ग्रहांच्या कारकत्वा पलीकडे पहायची अजूनही
ब-याच जणांना सवय नाही म्हणूनच की काय तू, वरुण ( नेपच्यून)  आणि यम ( प्लूटो)  या ग्रहांचा जातकाच्या एकंदर  जीवनात होणा-या घडामोडींबद्दल फारसे लिहिलेले नाही ( काही अपवाद वगळता) . मुख्य म्हणजे महा-दशेत ही तुम्हाला स्थान नाही. पण जीवनातील अनेक महत्वाच्या मुख्यत: विचित्र घडामोडीं घडण्यात तुमचा वाटा आहे.

पत्रिकेतील १२ राशीत/ १२ स्थानातून  नक्की कुठे, कसा , कुणाबरोबर तू  उपस्थित असता जातकाला 'हर्ष ' होईल हे कळणे थोडे अवघडच. कारण मुळातच तुझी गणना पापग्रहात झाली आहे . तरीही एका राशीत ७ वर्षे काढणारा तू, विविध ग्रहांशी योगात काय विविध चमत्कार करतोस हे अभ्यासणे ही एक मोठी गोष्ट वाटते.

काही उदाहरणे

अल्बर्ट आईनस्टाईनच्या कुंडलीतील बुध ग्रहाच्या त्रिकोणयोगातील 'हर्षल ' सापेक्ष सिध्दांत मांडतो.

न्यूटनच्या कुंडलीतील गुरुच्या त्रिकोण योगातील हर्षल ' गुरूत्वाकर्षणाचा ' शोध लावतो

तर एडीसनच्या कुंडलीत गुरुच्या लाभयोगातील हर्षल जगाला तारायंत्राच्या विश्वात नेऊन सोडतो.

महर्षी धोंडो केशव कर्वे - शनी सारखा परंपरा सांभाळणारा पुराणमतवादी ग्रह हर्षल बरोबर लाभयोगात. त्याकाळात जुन्या परंपरांचे आव्हान स्विकारुन विधवा- विवाह केला

पंडीता रमाबाई - शनी हर्षल लाभयोग. बिपिन मेधावी यांच्याशी रजिस्टर पद्धतीने विवाह, नंतर विलायतेत मुलीसह ख्रिस्ती धर्माची शिक्षा

गो.ग.आगरकर - रवि हर्षल लाभयोग. सर्व अंधश्रध्दा, ओंगळ रुढि व अविवेकी परंपरा यावर सुधारक पत्रातून टिका

थोडक्यात श्राध्द व श्रावणी न करणारे, देव न मानणारे, सोयर सुतक न पाळणारे, आंतरजातीय विवाह करणारे छोटे मोठे सुधारक तूझ्या अंमलाखाली येतात.

म.दा भट यांनी तुझ्याबद्दल एका पुस्तकात लिहिले आहे.
हा हर्षल मोठा स्फोटक ग्रह आहे. हायड्रोजन सारख्या स्फोटक वायूची हर्षल देवता आहे. मोठा चौकस व बुध्दिमान ग्रह आहे.
ब-याच वेळा हा चौकसपणा विघ्नसंतोषी असतो. काही तरी विचित्र करावयाचे, उडी  मारायची, नाश झाला तरी चालेल, आगे कूच करावयाची.

सर्व नवीन संहारक अस्त्रे तूझ्याच अंमलाखाली येतात. याचा उपयोग शेवटी जगाच्या कल्याणासाठी करायचा की संहारासाठी हे सर्व तुझ्या लहरीपणावर अवलंबून.

अतिरेकी स्वार्थामुळे, अविवेकामुळे वा सत्तास्पर्धेमुळे हा हर्षल रुद्र रुप धारण करुन भविष्यकाळात कोणा राष्ट्रप्रमुखाच्या शरिरात प्रवेश करता झालाच तर पुराणामध्ये वर्णिलेला प्रलय वा विश्वलय अशक्य नाही अशी निश्चिती शास्त्रीय प्रगतीमुळे येत आहे.

 तेंव्हा थोडंस ' *डरो ना*  असे यानिमित्ताने तमाम सृष्टीतील अविवेकी जनतेस सांगावेसे वाटते.

इतर ग्रहांप्रमाणेच तुमचे ही  सध्याचे  मेष राशीतील भ्रमण बारा राशीच्या लोकांना *आरोग्यदायी जावो* या तुमच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 🙏🏻💐

वायो विजांचे तडाखे !
तेणे पृथ्वी अवघी तरखे!
कठिणत्व अवघेंचि फांके!
चहूंकडे !!

तेथें मेरुची कोण गणना!
कोण सांभाळिल कोणा!
चंद्र सूर्य तारंगणा!
मूस झाली !!

पृथ्वीने विरी सांडिली!  अवघी धगधगायमान जाली!
ब्रम्हांडभटी जळोन गेली!  येकसरां!!

📝 ( ग्रहांचा मित्र)  अमोल
१३/०३/२०२०

*
( ग्रह योग संदर्भ : म.दा. भट यांचे पुस्तक)

४ मार्च, २०२०

प्लूटो - ग्रह बदल

*प्लूटो* ग्रह - राशी बदल

१९३० साली शोध लागलेला हा ग्रह. आज ४ मार्चला धनू राशीतून मकर राशीत आला आहे.

एका राशीत तब्बल २४ वर्ष मुक्काम करणारा हा ग्रह. म्हणजे बघा आपला ७४/ ७५/७६/७७ जन्म आहे  त्यांच्या सगळ्यांच्या पत्रिकेत प्लुटो ग्रह 'कन्या' राशीतच असेल.

शोध लागल्यापासून अजून या ग्रहाची संपूर्ण राशीचक्रातून फेरीही झालेली नाही.

या ग्रहाचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो याचा संपूर्ण अभ्यास व्हायचाय. त्यामुळेच की काय पत्रिकेत या ग्रहाबद्दल फारसा विचार केला गेलेला दिसत नाही

एकटा जोतिषी या ग्रहाच्या संपूर्ण राशीचक्रातील भ्रमणाचा अभ्यास करणे ही शक्य नाही. आज वयाने ४० वर्षाचे जे जोतिषी आहेत ते फारफार तर अजून 'मकर',  कुंभ' राशीतील प्लुटोचा अभ्यास करु शकतील. मात्र हे ज्ञान पुढच्या पिढीला म्हणजे अजून ५० वर्षानंतर जे जोतिषी असतील त्यांच्यापर्यत पोहोचले पाहिजे. त्यासाठी मकरेतील प्लूटो किंवा कुंभेतील प्लूटो असे लिखाण कायमस्वरूपी पुस्तक रुपात राहणे आवश्यक आहे.

प्लूटोचे व्यक्तीपेक्षा राष्ट्राच्या व सामूहिक जीवनाच्या दृष्टीने जास्त महत्व आहे. सामाजिक क्रांती,  लढाया, संक्रमणे, राजकीय उलाढाली वगैरे गोष्टी प्लूटोच्या कारकत्वाखाली येतात. या ग्रहाबाबत अद्याप बरेच संशोधन होणे बाकी आहे.

आपल्या भारत देशाची रास 'मकर' मानली जाते. आज प्लूटो 'मकर' राशीत आलाय आणि त्याचा मुक्काम साधाएण २४ वर्षे इथे असेल.
भारतासाठी आणि प्लूटो अभ्यासकांसाठी त्याचे मकर राशीतून भ्रमण सुखावह जावो या शुभेच्छा 💐

📝( ग्रहांकीत) अमोल

१५ फेब्रुवारी, २०२०

६ फेब्रुवारी, २०२०

नक्षत्र दैनंदिनी



श्रीराम 🙏🏻🌺

नवीन वर्ष सुरु झाले की आपण बरेच जण डायरी / रोजनिशी लिहितो. जानेवारी २०२० पासून ही  अनेक जण प्रत्येक दिवशी रोजनिशी लिहीतच असतील

ही संकल्पना घेऊन ज्योतिष अभ्यासक  किंवा साधारण या विषयाची माहिती असणा-यांसाठी एक नवीन गोष्ट सुचवतोय . आवडली तर अमलात आणा नाही आवडली तर सोडून द्या.

 यासाठी तुम्हाला  ३६५ पाने नसली तरी चालतील २७ पाने पुरतील.

प्रत्येक पानावर एका नक्षत्राचे नाव लिहा  ( अश्विनी ते रेवती )

आता जेव्हा आयुष्यात एखादी महत्वाची घटना सुरु कराल, किंवा घडली असेल  मग ती व्यावसायिक असू दे कौटूंबिक असू दे किंवा वय्यक्तिक यश अपयश  काही ही असू दे . ज्या गोष्टीची विशेष नोंद ठेवावी असं वाटेल अशी घटना   मग भले अगदी एकादा देवदर्शनाचा योग आला असू दे , परदेशात जायचा योग आला असू दे. , तुम्हाला जे महत्वाचे वाटते ते सर्व

तर अशी कुठलीही घटना घडली की ती कुठल्या नक्षत्रावर घडली आहे  त्या नक्षत्राच्या पानावर ते लिहून ठेवायचे. (काही अडचणी आल्या असतील तर त्या लिहायच्या )

आता ते नक्षत्र ( रास ) तुमच्या स्वतः: च्या पत्रिकेत कुठल्या भागात आहे  हे तुम्हाला माहीत असतेच .  यावरून तुमचा तुम्हालाच काही अभ्यास करता येईल

उदा. उद्या  पुनर्वसू नक्षत्रावर ( पुनर्वसू नक्षत्रावर  - त्यातही मिथुन रास आणि कर्क रास  वर घटनांची वेगळी नोंद करून ठेवलेली असावी ) अमुक वाजे पर्यंत मिथुन रास आहे आणि काही महत्वाची मिटींग आहे तर , पुनर्वसू नक्षत्राचे आपण लिहिलेले पान  काढायचे.  त्या नक्षत्रावर आत्तापर्यत काय काय काम झाली आहेत / काय काय घटना घडल्या आहेत यावरून साधारण अंदाज घ्यायचा  ( कर्क / मिथुन रास तुमच्या पत्रिकेत  कुठल्या स्थानात आहे यावरूनही काही गोष्टी समजू शकतील )

अर्थात एक विचार मांडलाय.
मी अशी सुरवात केली आहे.

 अगदी फार छोट्या  गोष्टी लिहायची आवश्यकता नाही पण  महत्वाच्या गोष्टींची तरी नोंद ठेऊन बघायला काय जातंय ?

मला वाटतंय पूर्वजांनी नक्षत्राबद्दल संपत, विपत, क्षेम,  प्रत्यर , साध्य , मैत्र हे जे लिहून ठेवली त्याचा अभ्यास या ' नक्षत्र दैनंदिनी ' मधून मिळू शकतो .

शुभेच्छा

अमोल केळकर
a.kelkar9@gmail.com

२४ जानेवारी, २०२०

साडेसाती आणि महादशा

दर अडीच वर्षानी शनी चा ग्रह बदल झाला की साडेसाती वर वारेमाप चर्चा होते.

साडेसाती सुरु म्हणजे त्रास सुरु होणार / संपली म्हणजे आनंदी आनंद असं काहीच नसतं

ज्या राशीचा साडेसाती शी दुरान्वये संबंध नसतो अशा राशींच्या व्यक्ती ही जिवनात तितक्याच  त्रस्त असतात. काही जण म्हणतात आमची साडेसाती संपली तरी अजून त्रास आहे,  असे का?

तर मंडळी माझ्यामते आपल्या जिवनात साडेसाती पेक्षा ही सगळ्यात निर्णायक घटक ठरतो तो म्हणजे तुम्हाला कुठल्या ग्रहाची महादशा आहे ते.

गुरु ( १६ वर्षे) , शनि ( १९ वर्षे) , बुध ( १७ वर्षे) , शुक्र ( २० वर्षे)   यांच्या दशांचा कालावधी हा साडेसाती पेक्षाही खूप मोठा असतो. आणि हे ग्रह ( आणि त्यांचे नक्षत्र स्वामी) पत्रिकेतील ६,८,१२ चे कार्येश असतील तर भले साडेसाती नसली तरी आयुष्यात अनेक संकटे उभी राहू शकतात. साडेसाती ही एकत्र असेल तर दुष्काळात तेरावा.
साडेसाती संपली तरी परिस्थितीत फरक पडत नाही

चांगल्या ग्रहाची दशा ( पत्रिकेत चांगले स्थान देणा-या) आणि साडेसाती  माझ्यामते बॅलेन्स लाईफ देतात

 शिक्षणाच्या काळात आलेल्या राहू सारख्या ग्रहाची दशा शिक्षणाची वाट लावतातच. अशीच दशा विवाहाच्या काळात आंतरजातीय विवाह घडवून आणू शकते ( इतर ग्रह योग ही विचारात घ्यावे लागतात )

त्यामुळे आयुष्याच्या घडणा-या अनेक ब-या वाईट गोष्टीत साडेसाती बरोबरच महादशा/ अंतर्दशा यांचाही विचार होणे आवश्यक

📝 अभ्यासक

७ डिसेंबर, २०१९

भूपाळी

.*दश  दिशा " भूपाळी " म्हणती* . . . . .

वरची ओळ वाचलेल्यांच्या मनात पहिले वाक्य ही नकळत पणे आले असणार ते म्हणजे
 ' *प्रभाती  सूर नभी रंगती* ' 🎼

काय जादू  होती ना या पहाटेचा  गाण्यांमध्ये , अगदी तोंडपाठ असायची ही गाणी .

*भूपाळी*  - रात्री शेजारती झाल्यावर मंदिराचा गाभारा बंद करून आपण जस झोपी जातो तसे साक्षात देवही झोपी जातात आणि मग पहाटे  पूजा-अर्चा, काकड आरती करण्याआधी  गाणे म्हणून  म्हणजेच भूपाळी ने  त्यांना जागे करण्याची  ही प्रथा .

फारच कल्पक. पहाट वेळच्या निसर्गाचे, पक्षी,प्राणी, सृष्टी यांचे हुबेहूब वर्णन या भक्ती गीतांतून/ भूपाळीतून बघायला मिळते. ही बरीचशी गाणी ' भूप ' रागात आढळतात.

काही गाण्यातून स्वत: ला आठवण करून देणे , की बाबा आजची पहाट तू पहात आहेस त्या  विध्यात्याचे आभार मान.  कुठल्याही गोष्टीची सुरवात  गणपतीला स्मरुन करावी

*उठा उठा हो सकळिक वाचे स्मरावा गजमुख*
रिध्दीसिद्धी चा नायक  सुखदायक भक्तांसी

तुझ्या कांतीसम रक्तपताका
पूर्वदिशा उजळती
अरुण उगवला, पहाट झाली
*उठ महा-गणपती*🙏🏻🌺

सृष्टीचा पालनकर्ता  जागा झालाय , केवढा आनंद , तो इतरांनाही कळावा म्हणून इतरांनाही जागे करायचे

*उठा सकलजन उठिले नारायण*
आनंदले मुनिजन तिन्ही लोक

पण काही भूपाळ्या ह्या  मानवी अवतारात असताना 'देव लहान होते'  त्यावेळी त्यांना जागे करण्यासाठीच्या असाव्यात असा माझा अंदाज

रात्री कौसल्या माता छोट्या रामाला  गोष्ट सांगत असताना  तो आकाशातला चंद्र हातात पाहिजे म्हणून हट्ट करतो. मग सुमंत एक आरसा रामाच्या हातात ठेऊन त्याचे प्रतिबिंब आरशात पाडून बाळ श्रीरामाचे  समाधान करतात. श्रीराम झोपी जातात.  त्यांना जाग करण्यासाठी म्हणल्या गेलेल्या भूपाळीत त्याचे वर्णनं किती छान केलय बघा :-

*काल  दर्पणी चंद्र दावुनी सुमंत गेले गृहा*
*त्याच दर्पणी आज राघवा सूर्योदय पहा*
*वसिष्ठ मुनिवर घेऊन गेले* *पूजापात्र राउळी*
*उभी घेउनी कलश दुधाचा* *कौसल्या माऊली*

*उठी श्री रामा* . . . . .
सुरेख वर्णन  ना  ?

असेच वर्णन ' श्रीकृष्णासाठी पण बरं का ? आजही आपण आपल्या मुलांना उठवताना म्हणतोच की उठ हा लवकर , आवर , शाळेचे वाहन येईल किंवा रविवारी अरे तो तुझा मित्र  आला बघ आवरुन,  उठ, आवर इ इ ,

*घनश्याम  सुदंरा श्रीधरा अरुणोदय झाला*
*उठी लवकरी वनमाळी उदयाचळी मित्र आला* .

इथे मित्र म्हणजे साक्षात  रवी / सूर्य असला तरी  मला इथे कुठेतरी  गोविंदाचा लाडका सुदामा ही असू शकेल असे कायम  वाटत राहिले आहे

 भूपाळी  ज्याच्यात  त्या त्या देवतांची स्तुती केली आहे , त्यांच्या चांगल्या गुणाचे वर्णन केले आहे .  हे प्रत्यक्षात त्यांचासाठी आहे आणि शिवाय  आपल्यातील त्याचा अंशाला  ' देवत्वाला ' / आत्म्याला  केलेली ही आळवणी  असावी असे माझे ठाम मत

उठी उठी सद्गुरू माय, अरुणोदय झाला  - गोंदवलेकर महाराज
उठा उठा श्री  साईनाथ गुरु,  - साईबाबा
उठ पंढरीच्या राजा  - विठ्ठल
उठी गोविंदा, उठी गोपाला
चल उठ रे मुकुंदा
उठ जगत माऊली
उठा उठा श्री गजानना

अशा अनेक भूपाळ्या अनेकांना पाठ असतील , रोज ते म्हणत ही असतील

आमच्या इथे शांतिनिकेत वसतिगृहात पहाटे  ५ वाचता  भूपाळी , भक्ती गीते लागायची आणि  पहाटेचा जो " *उष:काल झाला* .. "  त्याचे चैतन्य जाणवू लागायचे .  मला तर खात्री आहे त्या वसतिगृहातील  मुले / मुली    कँटीनमधल्या कौसल्या माई कलश चहाचा  घेऊन यायचा आधीच त्यांचे " *उठी लवकरी* '  होत असणार


*उठा उठा सकाळ झाली , अमुक साबणाने  अभ्यंगस्नान करायची वेळ झाली*  ही जहिरात  पाठ असणा-या नव्या पिढीला  या वरच्या  भूपाळी / अभंग  माहीत असतील  ही अाशा.
मात्र ज्यांना या भूपाळीचा वगैरे अजिबात गंध नाही  त्याचासाठी  या खास चार ओळींनी लेखनाचा शेवट

नित्य रोज सकाळी
ऐकावी भूपाळी
प्रारब्द्ध नसता कपाळी
तो अभागी  एक

📝७/१२/१९
देवा तुझ्या द्वारी आलो

kelkaramol.blogspot.in

१२ सप्टेंबर, २०१९

पुढल्या वर्षी लवकर या

.
*या रे या सारे या,गजाननाला आळवूया*
🙏🏻🌺

बाप्पा, उद्या तू  परत आपल्या घरी चाललास. दु:ख तर होतच आहे पण *आपलं ठरलयं* 👍🏻

संकल्प आहेच, संपर्कही राहीलच

सकाळी आपल्याच श्वासाची जाणीव होऊन जेंव्हा जाग येईल तेंव्हा 'आधी वंदू तुज मोरया' मगच कराग्रे वसते लक्ष्मी . मुलांना 'वक्रतुंड' म्हणा रे असं सांगताना नकळत आपल्याकडून ही होणारी प्रार्थना,  पुजेच्या वेळी 'प्रणम्य शिरसा देवं' आणि ' अथर्वशिर्षाचे एक आवर्तन' हा नित्य दिनक्रम,  अचानक दृष्टीस पडणारे लाल जास्वंदीचे फूल, तळमजल्यामुळे अगदी बिंधास्त इकडे तिकडे फिरणारे मुषक, वर्षातील ५२ मंगळवार, १२ संकष्ट्या, तेवढ्याच विनायकी,  माघी जयंती , सत्यनारायण- दसरा-लक्ष्मी पूजन आणि इतर कुठल्याही धार्मिक कार्यात/ उत्सवात होणारे तुझे 'सुपारी' रुपी पूजन, सांस्कृतिक कार्यक्रमात होणारी पहिली 'गणेश वंदना', गणेश पुराण पारायणे , अगदी गाडी चालवताना समोरच विराजमान असलेला तू, अष्टविनायक -सिध्दिविनायक- दशभूजा इ. प्रकारात वर्षातून वेळोवेळी भेटणारा तू, अचानक काही 'विघ्न' आली तरी 'सूख' वार्ता ही घेऊन येणारा तूच. आजूबाजूच्या प्रणव, प्रथमेश, मंदार, ओंकार, विनायक, वरद,अथर्व यांच्यातून आठवणीत येणारा तूच आणि कागदावर उमटणाऱ्या *अक्षरा... अक्षरातून*.... *शब्दा*... *शब्दातून* प्रकटणारा *बुद्धीची देवता* म्हणजे *साक्षात तूच* 📝

'भक्ती' मार्गाच्या या संकल्पात, वरील विविध प्रकारे 'संपर्क' ही राहणारच हे नक्की ✔

हे 'अनाथांच्या नाथा '
पुढल्या वर्षी तुम्ही येणार आहात २२ आॅगस्टला
ही तारिख लवकर येऊ दे 🙏🏻

तरीपण ' हेची दान देगा देवा तुझा विसरन व्हावा, विसरन व्हावा तूझा विसरन व्हावा '

"तूज नमो"  🙏🏻🌺

या रे या सारे या
गजाननाला आळवूया
नाम प्रभूचे गाऊया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया

गुणगान तुझे ओठांवर राहू दे
चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे
नाथांचा नाथ तू, मायेची हाक तू
भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया

उपकार तुझे सुखदायक सुखकर्ता
आधार तुझा तू तारण करता
तू माता, तूच पिता
तू बंधू, तूच सखा
आम्हावरी राहू दे माऊली तुझी दया

📝 देवा तुझ्या द्वारी आलो
kelkaramol.blogspot.in

#देवाक काळजी

२८ ऑगस्ट, २०१९

गणपती प्राण प्रतिष्ठापना पूजा विधीची ध्वनीफीत

दरवर्षी प्रमाणे - गणपती प्राण प्रतिष्ठापना  पूजा विधीची ध्वनीफीत 



इथे उपलब्ध आहे 

https://od.lk/d/MV8xNTczNDI5NzRf/Ganpati%20Pran%20Pratishtha%20Maha%20Pooja.mp3

ही ध्वनीफीत जुनी असल्याने पूजा करताना खालील बदल लक्षात ठेवावा 

"विकारीनाम संवत्सर 
सोमवासरे 

#ज्ञानप्रबोधिनी 
#झी २४ तास 

मंगलमूर्ती मोरया 

५ ऑगस्ट, २०१९

धन्य धन्य हो

धन्य धन्य हो ...🙏🏻🌺

खुप दिवस झाले मंडळी कुलदेवतेला गेलो नाही. एकदा त्र्यंबकेश्वरला जाऊन यायचंय तसंच शिर्डी ही करता येईल ना?   ते अंबेजोगाईला जायचे राहूनच जातय बघा. अशा प्रकारचे अनेक संवाद आपण वेळोवेळी ऐकत असतो. घरातील मंगल कार्य असेल, परंपरा असतील, किंवा श्रध्दा-भक्ती म्हणून असेल, प्रकट दिन-समाधी किंवा काही विशेष जत्रा, उत्सवाच्या निमित्याने वेळोवेळी आपण एखाद्या धार्मिक ठिकाणाला भेट देत असतो.

तिथे एकदा गेलो की अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. स्थानमहात्म्या प्रमाणे रांगेत लागणारा वेळ गृहीत धरून भक्त जेंव्हा आपल्या देव/देवतांचे मुख दर्शन घेतो तेंव्हा त्याला तिथे येण्याचे सार्थक झाल्याचे समाधान मिळते.

मंडळी, दर्शन घेतले,तीर्थ- प्रसाद घेतला, अंगारा लावला, इतरांसाठी पुडीत बांधून घेतला तरी एक गोष्ट केल्याशिवाय या सोहळ्याची ख-या अर्थाने सांगता झाली असे म्हणता येणार नाही ,जोपर्यत तिथे आपण त्या चैतन्यरुपी वास्तूस *प्रदक्षिणा* मारत नाही.

*धन्य धन्य हो  प्रदक्षिणा सद्गुरु रायाची*...

मंडळी, आज याच विषयावर मंथन. दर्शन झाले की आपण अगदी सहज प्रदक्षिणा मारतो. पण किती मोठं अध्यात्म यात दडलंय ना? 
आठवतीय स्पर्धा  बाल गणेश आणि कार्तिकी मधील? पृथ्वीला सगळ्यात पहिला प्रदक्षिणा कोण मारतो ही स्पर्धा आणि बाल गणेशाने शंकर-पार्वती अर्थात आई- बाबांना प्रदक्षिणा मारुन पृथ्वीप्रदक्षिणेचे पुण्य तात्काळ प्राप्त केले. कुठल्याही देवळात आपण त्या देवतेला माऊली/ पालनकर्ता या नात्याने बघतो. तेंव्हा दर्शन झाल्यावर जेंव्हा आता प्रदक्षिणा माराल तेंव्हा ही फार मोठी कृती तुमच्याकडून होत आहे हे लक्षात असू दे. आता प्रदक्षिणा १,३,५,७,११,२१ किती मारायच्या हा ज्याचा त्याचा श्रध्देचा प्रश्ण. ( ज्यांना ' प्रश्न ' असे लिहावेसे वाटते त्यांनी असे लिहावे हरकत नाही)

प्रत्येक देवस्थानातील/ देवळातील प्रदक्षिणा  मार्ग हा विशेष असतो.
साक्षात डोंगररुपात स्थित गणपतीला प्रदक्षिणा घालण्याचा नैसर्गिक अनुभव ब-याच जणांनी गणपतीपुळेला घेतला असेलच.

सांगलीच्या गणपती मंदीरात प्रदक्षिणा मारताना, तिथे दगडात असणाऱ्या कड्या वाजवून दर्शन घेण्याची प्रथा अनेक सांगलीकरांना परिचयाची असेल.

कोल्हापूरला अंबाबाईच्या देवळातील प्रदक्षिणा मार्ग म्हणजे भूयारातून जातोय का काय असे वाटायचे लहानपणी. थोडासा नागमोडी वळणदार मार्गावरुन जाताना केंव्हा बाहेर पडायचो ते कळायचेच नाही.
 नरसोबावाडीला छतावर अनेक धार्मिक चित्रे / कथा कोरलेल्या होत्या. लहानपणी वाडीला गेल्यावर काका-काकू कडून या गोष्टी सांगण्यात आल्या ज्या कायम मनात कोरल्या गेल्या.

मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरातील प्रदक्षिणा मार्ग समुद्र बघायला मिळायचा म्हणून आवडायचा.

ही काही आठवलेली उदाहरणे. तुमची ही अशी खास उदाहरणे असू शकतात.

प्रदक्षिणा आपण स्वत: वय्यक्तिक घातलेली एका देवळाच्या गाभाऱ्यापुरती असो, त्या देवाच्या पालखीची नगर प्रदक्षिणा असो किंवा नर्मदा परिक्रमा( प्रदक्षिणा ) सारखी व्यापक असो. याचे मोल पृथ्वी प्रदक्षिणे सारखेच.

मेष ते मिन राशीतून मार्गक्रम करुन निरंतर प्रदक्षिणेच्या चक्रात अडकलेले चंद्र, रवि आणि इतर ग्रह हे ही कालचक्राच्या वाटेवरचे भक्तच.

लेख संपवता संपवता , काही ठिकाणी प्रदक्षिणा संपल्यावर एक वेगळी वाट जी तुम्हाला देवस्थानाच्या छतावर घेऊन जाते जिथून तुम्हाला सरळ
गाभा-यातील मुर्तीचे दर्शन होते.
नक्की मंदीर आठवत नाही पण बहुतेक चिंचवडचे गणपती मंदीर आणि हो हे मात्र नक्की आठवतयं हरिपूरचे संगमेश्वराचे मंदीर.
चला जायचं संगमेश्वराला 'भक्ती संगमावर?

अनायसे आज पहिला श्रावणी सोमवार पण आहे. ☺

प्रदक्षिणा करुनी देह, भावे वाहिला
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे, उभा राहिला

📝५/८/१९
kelkaramol.blogspot.in

२९ जुलै, २०१९

भक्ती संगम


" *भक्ती  संगम* "

मंडळी नमस्कार 🙏🏻

आषाढ महिना संपत आला की  धरण क्षेत्रातील पावसाने  वाढलेल्या पाण्याच्या बातम्या लक्ष वेधून घेतात . अमुक पूल पाण्याखाली गेला, अमुक धरणं  क्षमतेच्या इतकी भरली , तमुक गावाचा संपर्क तुटला , या धरणातून अमुक तमुक क्षमतेचा विसर्ग चालू , हा बंधारा भरून वाहू लागला  इ इ . 

अशावेळी  अनेक ठिकाणी  एक अपूर्व  दृश्य पहावयास मिळते .  यात प्रामुख्याने उल्लेख करता येईल तो म्हणजे *नरसोबावाडीच्या  (जिल्हा. कोल्हापूर ) " दक्षिणद्वार " सोहळ्याचा*

कृष्णा आणि पंचगंगा  यांच्या संगमावर असलेले नरसोबावाडी हे एक पवित्र धार्मिक तीर्थक्षेत्र. कोल्हापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसाने पंचगंगा ( जणू  पाच भगिनी) दुथडी भरून वाहू लागते. त्याचवेळी सातारा, सांगली  जिल्ह्यातील पावसाने  महाबळेश्वर , कोयना पाणलोट क्षेत्र  , कोयना धरणातील पाण्याचा उत्सर्ग, चांदोली धरणातील उत्सर्ग  यामुळे  कृष्णा , कोयना , वारणा या नद्या  आनंदाने फुलून जाऊन पात्राच्या बाहेर पडून दक्षिण दिशेकडून नरसोबावाडीला  येतात आणि एका अनोख्या भेटीसाठी  'सप्त कन्या' आणि त्यांची 'कृष्णा माई' सज्ज होतात.

या मिळून सा-याजणींची  " परब्रह्म भेटीलागी "  अशी अवस्था होऊन जाते आणि मग या सगळ्याजणी  सरळ पोचतात ते  *श्री नरसिह सरस्वती यांच्या ' मनोहर पादुकांवर ' जलाभिषेक करण्यासाठी*

" शक्ती आणि भक्ती  यांचा हा  अनोखा संगम. *अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त* चा जयघोष करत मग इतर भाविक  या भक्ती संगमाचा
 " याची देही " अनुभव घेऊन भक्तीरसात चिंब होऊन जातात.



 असा हा विलक्षण  दक्षिणद्वार सोहळा, दरवर्षी पावसाळ्यात दोन - तीन वेळा तरी अनुभवास येतो.

नरसोबावाडीस पोहोचण्यापुर्वी  या सगळ्या नद्या वाटेत अनेक ठिकाणी   अनेक गावातील  घाटांवरच्या देवळातील ' चैतन्याला '  स्पर्श करून आलेल्या असतात. काही उदाहरणे द्यायची झाल्यास कृष्णेने  वाईच्या ढोल्या  गणपतीच्या गाभा-यात जाऊन घेतलेले दर्शन किंवा कृष्णेचेच  औदूंबरला दत्त गुरु चरणी घातलेले लोटांगण सांगता येतील.

 अगदी असंच त्र्यंबकेश्वरहून उगम पावणारी
 ' गोदा ' त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन  नाशिकला  ' प्रभू श्री रामचंद्रा ' चरणी लीन  झालेली पहावयास मिळते.  माऊलीच्या भेटीसाठी आसुसलेली 'इंद्रायणी' हे आणखी एक उदाहरण. अशी अनेक उदाहरणे आपणसा  इतरत्रही पहावयास मिळतात.

नद्यांना या " परब्रह्म भेटीच्या ओढीचे"  मूळ  माझ्यामते  फार पूर्वी पासून आहे. जेंव्हा श्रावण कृष्ण अष्टमीला  छोट्या गोविंदाला घेऊन ' कंसा ' पासून सुरक्षीत स्थळी  नेण्यासाठी जेंव्हा वासुदेव निघाले होते. 'यमुनेला' ही वाटलंच की  या देवकी पुत्राच्या छोट्या पावलांना स्पर्श करावा असं.  सोमवती अमावस्येला  ओंकारेश्वराच्या दर्शनाहून परत बोटीतून येताना
' श्री गजानन महाराजांच्या ' बोटीला खालच्या बाजूने छिद्र पडले . नावेत पाणी  जाऊ लागले. इतर भक्त मंडळी घाबरली पण इथे ही 'नर्मदा' "राजाधीराज योगीराज परब्रह्म गजानन महाराजांचे " चरण स्पर्श करण्यासाठी आली होती.

आषाढ महिन्यात पांडूरंगाच्या भेटीसाठी तहान भूक विसरून निघालेले वारकरी  आणि याच आषाढ - श्रावणात परब्रह्ममाच्या भेटी साठी निघालेल्या या नद्या  यात मला तरी काही फरक वाटत नाही .  हे कालचक्र, जीवन असेच प्रवाहित राहील जोपर्यत
 ' भेटीची ही आस ' निरंतर राहील

आणि  एकदा का ही भेट झाली की मग फक्त जाणवेल.

तुझा श्वास माझा ध्यास नुरे दुजे काही
तुझी भक्ती माझी मुक्ती भरे दिशा दाही
विश्व् आत्मरुपी  अवघे एकरूप झाले

*परब्रह्म भेटी लागी धरेवरी आले*
*सूर सूर चैत्यनाचा रोमरोम झाले*

🙏🏻🌺
२९/०७/१९
📝 *देवा तुझ्या द्वारी आलो*
kelkaramol.blogspot.in


१ जुलै, २०१९

वारीतील - सेल्फीत्सोव

*सेल्फीशी होऊ दंग. . .    सेल्फीत्सोव*

( सेल्फीची गोडी, करी जास वेडी, तोचि पुण्य जोडी पंढरीचे )

देहू आळंदी हून पंढरपूरकडे  पालख्या निघाल्या की  याच सुमारास  पुण्य नगरीत  एक अनोखा  उत्सव भरताना दिसतो.  अर्थात पुणेकर हे मुळातच उत्सव प्रिय . सवाई महोत्सव असू दे ,   गणेशोत्सव असू दे  , दिवाळी पहाट किंवा अगदी कार्तिक पोर्णीमा  असू दे या सगळ्यात पुणेकरांचा उत्साह अगदी  ओसंडून वहात असतो.

 देहू ,आळंदीहून पुणे मार्गे पंढरपूरला जाणा-या पालख्या हा ही पुणेकरांसाठी असाच  कौतुकाचा विषय.  पाऊस, हेल्मेट सक्ती, रस्त्यांची कामे , मेट्रोची कामे  आणि त्यात वारीमुळे होणारी वाहतूक कोंडी  याची चिंता न करता अस्सल पुणेकर या पालख्या  "एन्जॉय"  करतो. इथे अस्सल पुणेकर हा शब्द  अशासाठी वापरलाय की  या सगळ्यामुळे त्रास होतो असे मानणारा वर्ग ही पुण्यात आहे पण तो मुळचा पुणेकर नसून बाहेरून पुण्यात स्थायिक झालेला पुणेकर आहे.

या पालख्या जर पुणे मुक्कामी विकेंड ला येत असतील तर या उत्साहाला अधिक उधाण येते.  आपापला व्याप सांभाळून पुणेकर वारीचा आनंद लुटतात , वारी बरोबर एक दिवस चालत जातात , ताल मृदूंग , अभंग , जयघोष , पताका , तुळशी- वृंदावन , कपाळावर गंध, पालखी  सोबत जाणे  इ अनेक प्रकार करुन आपला सहभाग नोंदवतात.

साधारण उत्सव असो , यात्रा/ जत्रा असो साधारण आपण तीन प्रकारची जनता यात सामील होते असे म्हणतो  हौसे, गवसे, नौसे .
सोशल मीडियाचा,  सेल्फी या प्रकारचा उदय झाल्यानंतर आजकाल  ' हौसे, गवसे, नौसे बरोबरच आता "सेल्फे"  ही नवी जमात बघता बघता फोपावली आहे असा आमचा अभ्यास सांगतो.  प्रोफेशनल कॅमेरामन , चित्रकार , आर्टिस्ट यांच एक ठीक असतं. पूर्वीपासून ही लोकही वारीचे चित्रीकरण,काही खास फोटो  काढण्यात मग्न असतात . मात्र यांचा त्रास फारसा कुणाला होत नाही. एकतर हे लांब कुठं तरी  बसून  आपले काम करत असतात . ना ते कुणाच्या अध्यात ना मध्यात .  हरिनामाचा जयघोष करत चाललेल्या  या माऊलीच्या भक्तांच्या तर हे गावीही नसते  की दूर  कुठूनतरी  कुणीतरी आपली छबी , आपले भाव (  आजच्या शब्दात  नॅचरल एक्सप्रेशन्स )  टिपत आहेत.  यात कुठेही देखावा नसतो , कृत्रिमता नसते  त्यामुळे ते चित्र ही अगदी सहज जमून जाते.

आता या वारीतल्या सेल्फी टेक्नॉलॉजीचा ( इथे पारंपारिक तंत्रज्ञानाचा विचार आहे , यातही आता अनेक आधुनिक तंत्रज्ञान आले आहे )  विचार करू.
एकंदर यांचे वर्णन अभंगातून व्यक्त करायचे झाल्यास असे 👇🏻 करता येईल.

*पुण्यनगरी गाऊ आम्ही  पुण्यनगरी नाचू*
*मोबाईलच्या कँमेराने  सेल्फी फोटो काढू*
*विठ्ठलचे नाम घेऊ  लावूनी ' टायमर '*

 तर  या  लोकांना आपण वारीत जाऊन आलो ( फोटो काढण्यापुरते का होईना )  हे अख्या जगाला ( ठणकावून) सांगायचे असते. हेच प्रयोजन ठेऊन ते घरातून निघतात . यात काही जण स्वतःच्या कुटूंबासह (  हे कमीच ) , ऑफीस ग्रुप,  सोसायटी ग्रुप  किंवा शाळा - कॉलेजच्या मित्र - मैत्रिणींचा ग्रुप ( हे जास्त )निघतात. थोडक्यात घोळक्याने जातात .  यात एखाद्या शहाण्याला यापूर्वीच्या
' *सेल्फी-वारीचा* ' अनुभव असतो. पालखीचा मुक्काम  कुठे आहे , मार्ग काय आहे  याची माहिती ही करून घेतलेली असते. मग ठरलेल्या ठिकाणी मंडळी पोचतात. मग कुणा माऊलीच्या डोक्यावरचे तुळशी वृंदावन स्वतःच्या डोक्यावर घेऊन  फोटो काढायला लावणे ( इथे बहुतेक सेल्फी घेता येणे शक्य नसते ) , उगाच ताल , मृदूंग अडकवून

*निघालो घेऊन कॅमेरा हा हाती , आम्ही भाग्यवान* 

अशा अॅटीट्युड ( ऐटीत - IT मधील असेही म्हणा हवंतर ) मधे हे सेल्फीकरी विठ्ठलाला लावतात तसा गंध कपाळावर ' गुगल ' तानाचा फोटो /  घोडे , पालखी  बरोबरचा सेल्फी  आणि पुढे काय काय प्रकारे सेल्फी निघू शकतात इतपत कल्पना करण्यात तुम्ही समर्थ आहात . आजकाल ते
'फेसबुक  लाईव्ह ' प्रकार पण दाखवायचे असते.

यानं  काय होत की एकंदर या वारीचा वेग पुण्याच्या आजूबाजूला कमी होतो. जो तो  सेल्फी ( स्व चित्र) घेण्यासाठी इतरांना थांबवतो. ते वारकरीही मग थांबतात  , त्यांचा नामात व्यत्यय येतो.
या सर्व प्रकाराने  आपण भक्तीचे अनोखे प्रदर्शन नुसते करत आहोत  असे काही वेळा वाटते.

अर्थात याला अपवाद आहेत हे नक्कीच . काही खरोखरच सेवाभावाने कुठलीही अपेक्षा  न करता मदत करतात, अन्नदानाचे आयोजन होते , कचरा व्यवस्थापनाचे , सांडपाणी व्यवस्थापनाचे नव नवीन आदर्श  पुढे येतात.अशा काही समाधानाच्या गोष्टीही दिसून येतात

*पंढरपूरची वारी  ही  ख-या अर्थाने  महाराष्ट्राचा सांस्कृतिक / वैचारिक  आणि / भक्तीमय  ठेवा  आहे. त्या सोहळ्याला आपण सगळे मिळून असेच ठेवू या* 🚩🚩

दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला
घुमे गजर हरिनामाचा भक्त  *फोटोत  रंगला* ,

असं  फक्त व्हायला नको हीच पांडूरंगा चरणी  प्रार्थना 🙏🏻🌺

देवा तुझ्या द्वारी आलो
www.kelkaramol.blogspot.in

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या