December 12, 2020

देवा तुझ्या द्वारी आलो

( १२ डिसेंबर २०२० , प्रभादेवी सिध्दिविनायक मंदिर ) 

दर्शनाचा हवा असलेला ७ ते ८ हा स्लॉट न मिळता ८ ते ९ हा स्लॉट मिळत होता. काय करायचे ? ८ ते ९ मध्ये किती वेळ लागेल ? ९ पर्यत ऑफीसला पोहोचता येईल का असा विचारविनिमय आमच्या नेहमीच्या ऑफीस मेम्बर्सचा चालू होता. शेवटी तब्बल१० महिन्यांनी मिळालेली संधी न सोडता ८ ते ९ तर ८ ते ९ आधी बुकींग करू म्हणून प्रत्येकाने आपल्या मोबाबाईलवर बुकींगची पुष्टी केली आणि निर्धास्त झालो. 

तस पहायला गेल तर गेली अनेक वर्ष महिन्यातील एका शनिवारी सकाळी लवकर निघून मुंबईत धार्मिक स्थळांना भेट हा आमचा नियमित कार्यक्रम असायचा जो अर्थातच गेले १० महिने खंडीत झालेला. सगळ्यात पाॅप्युलर किंवा जास्ती जास्त आम्ही जायचो तो दर्शन मार्ग म्हणजे  प्रभादेवीचा सिध्दिविनायक  - महालक्ष्मी  मंदिरातील ७ ची आरती आणि ऑफीसला ९ ला परत . त्याखालोखाल  प्रभादेवी सिद्धिविनायक - सेना भवन जवळील स्वामी समर्थ मठ - वडाळा राम मंदिर, विठ्ठल मंदिर  आणि परत हा एक पर्यायी मार्ग . किंवा वर्षातून एकदा बाबुलनाथ, मुंबादेवी किंवा गिरगावचे फडके मंदीर. गेले अनेक वर्ष सुरु असलेली पण मध्यतंरी कोविड संकटाने बंद झालेली आमची धार्मिक वारी  आज विशाखा नक्षत्रावर   " पुनःश्च हरी ॐ " म्हणून सुरु झाली.

 नियोजित वेळेच्या पाऊण तास आधी पोहोचलो. वेळेआधी आत सोडायला सुरक्षारक्षकाने नकार दिला कारण QR कोड प्रणालीने वेळेआधी दरवाजा उघडला जाणार नव्हता. आणखी थोडा वेळ प्रतीक्षा करणे क्रमप्राप्त होते. दरम्यान ७ ते ८ दर्शन वेळेतला मुंबईकर भाविक अगदी ७.५५ वाजता ही आलेले पाहून त्यांच्या टाइम मॅनेजमेंटचे कौतुक वाटले 

शेवटी  ती घटिका आली. ' भेटी लागे जीवा लागलीसी आस '  आठ वाजता मोबाईल स्कॅन होऊन  आम्ही ' देवाच्या द्वारी   आलो .  दर्शन मार्गात  बदल केला होता. मारुती मंदिराच्या बाजूने रांग नेली होती . अंतरा  अंतरावर उभे रहायचे स्टिकर होते पण गर्दी नसल्याने  थांबाव लागत नव्हतं.  नेहमी जसे सरळ  गाभा-यात प्रवेशतो ते मात्र बंद केलेले. प्रमुख दरवाजा समोर उभे राहून दर्शन घेऊन परत बाहेर पडायचे अशी सोय केली होती.
३ ते ४ मिनिट लागली फक्त. प्रदक्षिणा  नाही, तिथे बसून गणपती अथर्वशीर्ष नाही , आणि लाडक्या उंदीर मामाच्या कानात  केलेली हितगुजही नाही. फक्त क्षणभर त्या  सिध्दिविनायका समोर नतमस्तक होता आले. आलेल्या परिस्थितीत निभावून नेण्याचे बळ दिल्याबद्दल त्याचे आभार मानले आणि आज भले ३ मिनिट आलो असेन उद्या किमान ३० मिनिटासाठी  "मी  परत येईन " हा आशावाद ही व्यक्त केला . बाकी त्यालाच काळजी. 

" पुनश्च हरी ॐ"   होण्यासाठी एवढं  ही पुरेस आहे. यानिमित्याने  नवी मुंबईहून - मुंबईला १० महिन्यानंतर आलो. आपली लाडकी मैत्रीण खूप दिवसांनी भेटणार म्हणल्यावर जी उत्सुकता असते अगदी तशीच उत्सुकता मुंबईला जाणार म्हणल्यावर होती. अनेक  गोष्टी बदलल्या होत्या. सुरवात अगदी वाशी टोल नाक्यापासूनच झाली. 'फास्ट टॅग' प्रणाली मुंबई टोल नाक्यावरही सुरु झाल्याने कस झुपुक करुन गेलो. वाशी खाडीपूल जरा अंधारातच पास झाला पण हा मुंबई, नवी मुंबई जोडणारा सामायिक दुवा नेहमीच विलोभनीय वाटतो. मुंबई मेट्रोची कामे अगदी मानखुर्द/ BARC  पर्यत आली होती. चेंबूरच्या शिवाजी महाराज प्रवेशद्वारापाशी महाराजांना मुजरा करून डाव्या बाजूला 'आर् के स्टुडिओ' च्या काही खुणा दिसतात का हे  बघून सरळ  मैत्री पार्कला 
 ' अशोका ट्रँव्हल्सच्या '  मागे गाडी थांबवली.  गाडी नं MH ०९ असल्याने  ही गाडी सांगली/कोल्हापूरची असणार हे लक्षात आले. साखर झोपेतील प्रवासी आरामात उतरत होते त्यामुळे  वेळही जात होता. पण आपल्यांसाठी हे सहन करावेसे वाटले. (MH १२ ची गाडी पुढे असती तर काय केले असते हे आत्ता सांगू शकत नाही. कदाचित हाॅर्न वाजून धिंगाणा घातला असता).पुढे प्रियदर्शिनीला  ठाण्याहून येणारा रस्ता मिळतो. कंपनीच्या सिध्दिविनायक पदयात्रेसाठी याच रोडवरून आपण रात्री १ च्या सुमारास इथे पोहोचायचो हे आठवले. चुनाभट्टी आल्यावर अरे हा तर कलानगर, बिकेसीला जाणारा नवीन  उडडाणपूल! आपलं अजून जायचं राहिला आहे याची जाणीव झाली. दादरच्या टिळक पुलावर पोहोचल्यावर सकाळच्या बाजाराने झालेले ट्रॅफिक जाम , कबुतरखान्याच्याआधी लागलेल्या देवळाला अर्धी प्रदक्षिणा मारून पोर्तुगीज चर्च दिशेने मार्गक्रमण, शेवटी मंदिराच्या थोडं आधी सुरक्षित मिळालेलं पार्किग, दर्शन झाल्यावर परतीच्या प्रवासात ऐरोलीला  'कृष्णा भोग' येथे घेतलेला नेवैद्य/पोटपूजा आणि अगदी ९ नाही पण थोडं पुढे कामाच्या ठिकाणी पोहोचणे 

म्हणलं तर फक्त  ३ मिनिटाचे दर्शन झाले म्हणलं तर ३ तास. विचार आपला आपला 
शेवटी भाव तसा देव कारण

ॐकाराचं रुप तुझं चराचरामंदी
झाड-वेली- पानासंग फुल तू सुगंधी
भगताचा पाठीराखा, गरीबाचा वाली
माझी भक्ती तुझी शक्ती एकरूप झाली
देवा दिली हाक उध्दार कराया
आभाळाची छाया तुझी, समिंदराची  माया , 
मोरया. मोरया .मोरया . मोरया 

🙏🌺
( भक्त ) अमोल 
१२/१२/२०२०
#देवा तुझ्या द्वारी आलो 
www.kelkaramol.blogspot.com 

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या