June 27, 2021

रविवारची संकष्टी भाग २

. .रविवारची संकष्टी - भाग २

गेल्या वर्षी १० मे ला रविवारी संकष्टी होती. तशी ती ३१ जानेवारी २१ ला आली ,त्यानंतर आता रविवारी २७ जून ला आहे आणि परत यावर्षी आँक्टोबर २४ ला येत आहेत


एकंदर निभावण्यास कठिण अशी रविवारची संकष्टी असते हे नक्की. या बाबतचे माझे मनोगत भाग-१ मधे लिहिले आहे. त्याची लिंक सोबत दिली आहे. इच्छूकांनी अवश्य वाचावे.

आज या रविवारच्या संकष्टी निमित्य थोडे वेगळे अनुभव. श्री गणेश हे संकष्टीचे ( कृ. चतुर्थी) उपास्य दैवत. मात्र रविवार आणि गणेश दर्शन हे समीकरण मात्र ब-याच वेळा, अनेकांनी  अनुभवलं असणार.
लहानपणी सांगलीत असताना रविवारी संकष्टी असली की बागेतला गणपती का संस्थानच्या गणपतीला ? असा प्रश्ण पडायचा आणि मग दोन्ही ठिकाणचे दर्शन घेणे हा मार्ग काढला जायचा. मात्र रविवारी संकष्टी नसली आणि जरी कारखान्याहून सांगलीत येणे झाले की दोन पैकी एका मंदिरात जायचेच हे हळूहळू इतके पक्के झाले की शिक्षण, नोकरी निमित्य सांगली सोडून गेल्यावर सुट्टीला कधी येणे झाले तर यापैकी एका बाप्पांचे दर्शन घेणे हे 'मस्टच' असा पक्का निर्धार झालेला आहे.

गाव सोडून नोकरीसाठी चिपळूणला गेल्यावर रविवारी कधी गणपतीपुळे तर कधी हेदवी च्या सिध्दीविनायकाचे दर्शन घ्यायचा योग आला. इंजिनिअरिंगचा एक मित्र वाईचा असल्याने ब-याचदा रविवारी त्याच्याकडे गेल्यावर ढोल्या गणपतीचे दर्शन झाले. पुणे हे अजोळ असल्याने लहानपणापासून तळ्यातला गणपती ( सारसबाग), पेशवे पार्क, पर्वती हा रविवारचा कार्यक्रम फिक्स्ड असायचा. आजकाल मात्र दशभूजा गणपती पर्यतच जाणे होते.

मुंबईत स्थाईक झाल्यावर अर्थातच रविवारी प्रभादेवीचा सिद्धीविनायक होतोच. आलेल्या पाहुण्यांना सिद्धीविनायक दर्शन घडवण्याचा योग रविवारीच ठरवला जायचा. दोन चार वेळेला कंपनी तर्फे आयोजित सिध्दीविनायक पदयात्रेत सामील होता आले जी शनिवारी रात्री कंपनीतून निघायची आणि रविवारी पहाटे काकड आरतीला मंदिरात पोहोचायची.

मुंबई परिसरात भ्रमंतीसाठी / नातेवाईक / मित्र परिवार यांच्याकडे जाण्यासाठी रविवार हा हक्काचा दिवस. याच रविवार मुळे टिटवाळा महागणपती, खोपोलीचा वरदविनायक, डोंबिवलीचा सिद्धीविनायक, चिरनारचा गणपती, पालीचा गणपती आणि 
माथेरानच्या कड्याच्या गणपतीचे अनेक वेळा दर्शन झाले. 

मंडळी,  आज रविवारच्या संकष्टी निमित्याने कसे वाटले हे गणेश दर्शन ?  हे वाचताना तुम्हालाही तुमचे रविवार- गणेश दर्शन नक्की आठवले असेल.

हे लिहून होईपर्यंत १० दिवसाच्या खंडानंतर परत मस्त पाऊस पडायला लागलाय. उपवासाची मिसळ असते,
 ' उपवासाची भजी ' कशी करतात कुणाला काही कल्पना?

असेल तर नक्की कळवा. परत भेटू रविवारची संकष्टी भाग- ३ मधे एक वेगळा विषय घेऊन २४ आँक्टोबरला

मोरया 🙏🌺

"देवा तुझ्या द्वारी आलो" 📝
संकष्टी चतुर्थी ( २७/०६/२१ )

पहिल्या भागाची लिंक👇🏻
https://poetrymazi.blogspot.com/2020/05/blog-post_10.html 

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या