श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२४ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २४ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २४ नोव्हेंबर २०१४ 

उत्कट भावनेने भगवंताची उपासना करावी.

 


विस्तव माहीत नसला, तरी तो हाताला चुकूनही लागला तरी हात भाजतो; किंवा हा परीस आहे हे माहीत नसूनही, लोखंडाचा घण त्यावर मारला तरी त्याचे सोने व्हायचे रहात नाही. त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय नुसते भक्तीने जरी भगवंताकडे गेले तरी काम होते. परंतु दुसर्‍या विषयांची आसक्ति जोवर आपल्याला सुटत नाही, तोवर मनापासून भगवद्‌भक्ति होत नाही. जिथे उत्कट भावना आहे तिथे सगुण मूर्तीला मनुष्यधर्म प्राप्त होतील. उपासक देहाला विसरला की उपास्यमूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल. शिवाय, जे इतर लोक थोडे तन्मय झाले आहेत, त्यांनादेखील तो अनुभवाला येईल. परंतु उपासकाची किंवा भक्ताची भावना नेहमी उत्कट राहीलच असा नेम नाही. म्हणून अशा उपासकाला मूर्तीमधल्या चैतन्याचा अनुभव येऊन देखील पारमार्थिकदृष्ट्या फायदा होईलच असे निश्चित नाही.
एका मुलाने काही खोडी केली म्हणून शेजारच्या बाईने त्याला एक चापट मारली. त्याबरोबर त्या मुलाने मोठे भोकाड पसरले आणि त्या बाईला शिव्या देऊ लागला. ते ऐकून त्याची आई बाहेर आली आणि तिने त्याला चांगलाच झोडपला. परंतु आईच्या हातचा इतका मार खाऊनसुद्धा तो मुलगा फार ओरडला नाही, आणि त्याने आईला उलट शिव्यापण दिल्या नाहीत. हे जसे खरे, त्याप्रमाणे आपल्यावर येणारी संकटे ही भगवंताने आणली आहेत अशी निष्ठा असेल, तर आपल्याला त्यांचा त्रास होईल, पण त्यांनी आपली शांति बिघडणार नाही. भगवंताचा विसर आपल्याला पडला की आपली शांति बिघडते. ज्या दातांनी सिंह मोठाले प्राणी मारतो त्याच दातांनी तो आपल्या पिल्लांना इजा न करता उचलतो, हे लक्षात असू द्यावे. आपण निःपक्षपाती बुद्धीने विचार केला तर भगवंताचे सान्निध्य लाभले त्यालाच निर्भयता आणि निर्वासनता येईल. प्रत्येक माणसाला आधार लागतो. पण आपण अपूर्णाचा आधार धरल्यामुळे आपल्याला निर्भयता येत नाही; यासाठी भगवंताचा आधार धरावा. बुद्धीने निश्चय करावा आणि मन भगवंताकडे लावावे, की इंद्रिये तिकडे बळजबरीने जातीलच, राम उपाधिरहित आणि त्याचे नामही उपाधिरहित आहे. म्हणून, ज्याप्रमाणे खडक किंवा वाळू पाण्याशी मिसळत नाहीत, साखर किंवा मीठच विरघळते आणि समरस होते, तद्वत् रामाशी त्याचे नामच समरस होते.


३२९. सर्व सृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२३ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २३ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २३ नोव्हेंबर २०१४

भगवंत कल्पनेच्या पलीकडे आहे. 

 



मनुष्याचा स्वभावच असा असतो की, आपल्या कल्पनेत जेवढे येते तेवढेच आपण सत्य मानतो. पण आपली कल्पनाच किती संकुचित असते, याचा कोणी विचार करीत नाही. जो कल्पनेच्या पलीकडे आहे, जिथे कल्पना थांबते, ज्याला कल्पना बांधू शकत नाही, त्याला कल्पनेने कसे ओळखता येईल ? जो ज्ञानाच्या पलीकडे राहिला आहे त्याला माझ्या तोकड्या ज्ञानाने कसे आजमावता येणार ? माझ्या बुद्धीच्या पलीकडे तो आहे, तेव्हां त्याच्या इच्छेनेच त्याचे खरे ज्ञान होणार आहे. अविद्या ती हीच की आपल्या कल्पनेने होणारे ज्ञान हेच खरे मानणे. याकरिता श्रद्धा आणि कल्पना यांतला फरक ओळखावा. खरी श्रद्धा तीच की जी कल्पनेच्या पलीकडे राहते. प्रल्हादाइतके आपण नामाला सत्यत्व देत नाही. कल्पनेची मजल प्रल्हादाने नाही चालविली. कल्पनेच्याही पलीकडे राहिला असे मानायला काय हरकत आहे ?
सूर्यप्रकाश जसा सर्व ठिकाणी भरलेला असतो, त्याप्रमाणे देवळात, घरात, तीर्थक्षेत्रांत, सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे. परमात्मा फक्त विद्वानांचा किंवा श्रीमंतांचा नसून तो सर्वांचा आहे. भगवंत सर्वांचा आहे, म्हणूनच तो सर्वांना सुसाध्य असला पाहिजे. एखादा मोठा गणिती हिशेब लवकर करू शकतो; परंतु खेडेगावातले अडाणी लोक गणित न शिकताही हिशेब बरोबर करतात, आणि त्यांचा व्यवहार बरोबर चालतो. तसे विद्वानाला कदाचित् भगवंत लवकर प्राप्त होईल, पण अडाणी माणसालादेखील तो प्राप्त होऊ शकेलच. भगवंताची दृष्टीच अशी आहे की, त्याला आपले अंतःकरण स्पष्ट दिसते. ते जसे असेल त्याप्रमाणे भगवंत आपल्याला जवळ किंवा दूर करतो. मनुष्य जन्माला आला की सगळी नाती त्याला आपोआप येतात, त्याचप्रमाणे, परमात्मा आनंदरूप आहे असे म्हटले की बाकीचे सर्व गुण त्यामध्ये आले असे समजावे. जसा मारुतीमध्ये देवअंश होता तसाच तो आपल्यामध्येही आहे. त्याने तो फुलविला, पण आपण झाकून तो विझवून टाकला, याला काय करावे ? मामलेदाराला बरोबर असलेल्या शिपायाची भिती वाटत नाही, चोराला मात्र त्याच्याबरोबर असलेल्या शिपायाची भिती वाटते. त्याचप्रमाणे भगवंत आपल्या पाठीमागे आहे ही जाणीव ज्याला असते, त्याला उपाधीची भिती वाटत नाही; कारण ती त्याच्याच इच्छेने आली आहे अशी त्याची खात्री असते. आपण आपले मागले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते.



३२८. जे निश्चित नाही त्याचे नाव कल्पना होय. देव आहे असे निःशंकपणाने वाटणे, हे ज्ञान होय.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२२ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २२ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २२ नोव्हेंबर २०१४

देव अत्यंत दयाळू आहे. 

 



तुम्ही फार कष्ट करून इथे येता. किती दगदग, किती त्रास तुम्हाला सोसावा लागतो ! बरे, इथे आल्यावर हाल काय कमी होतात ? परंतु इथे कशासाठी आपण येतो, आपल्याला काय हवे आहे, हे आपल्याला कळते का ? आपल्याला देव खरोखर हवासा वाटतो आहे का ? याचा विचारच आपण फारसा करीत नाही. आपल्यावर काही संकट आले, किंबहुना आपले काही वाईट झाले, की आपण म्हणतो, देवाने असे कसे केले ? असे म्हणणे यासारखे दुसरे पाप नाही. देवावर विश्वास न ठेवणारा माणूस यापेक्षा एकवेळ परवडला, कारण तो ’ देवाने वाईट केले ’ असे तरी म्हणणार नाही. देव खरोखर अत्यंत मायाळू आहे, त्याला कुणाचेही दुःख सहन होत नाही. कोणत्या आईला आपल्या मुलाला दुःख, कष्ट झालेले आवडेल ? म्हणून, देवाने माझे वाईट केले ही खोटी समजूत प्रथम मनातून काढून टाका.
द्रौपदीला जेव्हा वस्त्रहरणासाठी दुःशासनाने भर सभेत खेचले, तेव्हा तिला वाटत होते की पांडवांना हे सहन होणार नाही, ते माझी विटंबना होऊ देणार नाहीत, ते दुःशासनाची खांडोळी करतील. तिला पांडवांबद्दल विश्वास वाटत होता. दुःशासनाने जेव्हा तिच्या पदराला हात घातला, तेव्हा तिने आशेने धर्माकडे पाहिले. धर्माला वाटले, आता विरोध केला तर आपले सत्याचे व्रत उघडे पडेल, म्हणून त्याने लाजेने मान खाली घातली. हे कसले अहंपणाने लडबडलेले सत्य ! तीच स्थिती इतर पांडवांची झाली. पुढे तिने भीष्माचार्यांकडे पाहिले, परंतु त्यांनीही मान खाली घातली. तेव्हा मात्र तिने जगाची आशा सोडली, आणि कळकळीने परमात्मा श्रीकृष्णाला हाक मारली; आणि त्याने अनेक वस्त्रे पुरवून तिची अब्रू रक्षण केली. पुढे तिला एकदा श्रीकृष्ण भेटला असताना तिने त्याला विचारले की, " आधीच तू माझ्या बचावासाठी का नाही धावलास ? तो दुष्ट, केस धरून मला खेचून नेत असतानाच का नाही धावलास ? " तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, " त्यात माझा काय दोष ? मी तुझ्या रक्षणासाठी आतुर होतो, परंतु तुला पांडवांची आणि इतरांची आशा होती, ते रक्षण करतील असे तुला वाटत होते. मला दरवाजा खुला नव्हता, मग मी कसा येऊ ? तू जगताची आशा सोडलीस आणि मला बोलावलेस, त्याबरोबर मी तुझ्या भेटीला धावलो. " जगाची आशा, आसक्ति सोडल्याशिवाय परमेश्वराला आपली हाक कशी पोहोचेल ? ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्याच गोष्टीची आपल्याला नड लागते. आपल्याला देवाची नड लागली आहे का ? देवाचे प्रेम लागायला त्याच्या अखंड सहवासात राहण्याची अत्यंत जरूरी आहे; आणि हा सहवास जर कशाने साधत असेल तर तो एक त्याचे नाम घेतल्यानेच साधेल. भगवंताचे नाम घेऊन त्याचे प्रेम मिळवा, हेच माझे सांगणे.


३२७. सर्व विसरून भगवंताला आळवले की तो कृपा करतो.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२१ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २१ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २१ नोव्हेंबर २०१४

भगवंताजवळ काय मागावे ? 

 



एखादा मनुष्य तालुक्याच्या ठिकाणी गेला, आणि त्याला 'तुम्ही कुठले' असे विचारले, तर तो आपल्या खेडेगावचे नाव सांगेल. जिल्ह्याच्या ठिकाणी गेला तर तालुक्याचे नाव सांगेल, इलाख्याच्या ठिकाणी गेला तर जिल्ह्याचे नाव सांगेल; तसेच दुसर्‍या प्रांतात गेला तर आपल्या इलाख्याचे नाव सांगेल, आणि परदेशात गेला तर आपल्या देशाचे नाव सांगेल. म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जेवढी विशालता येईल तेवढे भेदभाव कमी होतात. तसे, मनुष्य कोणत्याही धर्माचा असला तरी सर्व धर्मांचे मूळ एकच असल्यामुळे, त्या मुळाशी जो गेला त्याला सर्व धर्म सारखेच. पण एवढी विशाल दृष्टी येईपर्यंत, जो ज्या धर्मात जन्माला आला त्या धर्माचे आचरण करणे हेच हिताचे असते.
सुख मिळविण्याच्या आपल्या सर्व कल्पना आज खोट्या ठरल्या आहेत. आपण प्रथम अशी कल्पना केली की, श्रीमंतीमध्ये सुख आहे. त्याप्रमाणे रगड पैसा मिळविला तरी आपल्याला जर सुख मिळाले नाही, तर तर आपली कल्पना खोटी होती असे म्हणायला काय हरकत आहे ? एकच वस्तू एकाला सुखरूप तर दुसर्‍याला दुःखरूप वाटते; म्हणजे ती वस्तू मुळात दोन्ही नाही, सुखरूप नाही किंवा दुःखरूपही नाही. जी वस्तू आज आपल्याला सुखाची वाटते, ती उद्या तशी वाटेलच असे नाही. आपली बुद्धी स्थिर नसल्यामुळे आपली कल्पनाही स्थिर नाही. म्हणून त्याच वस्तूमध्ये सुख आहे ही कल्पनादेखील खोटीच असली पाहिजे; ती तेवढी खरी आहे असे आपण का म्हणावे ? जगातली आपली नाती आपण कल्पनेनेच लावतो. ती नाही म्हणायला किंवा विसरायला आपणच तयार होतो. आपल्यावर संकट आले की आपल्याला पूर्वीच्या गोष्टी, नाती, वगैरे गोड लागत नाहीत. त्यावेळी आपल्याला चैन पडत नाही. हा सर्व कल्पनेचाच खेळ आहे. एका काट्याने दुसरा काटा काढावा आणि नंतर दोन्ही टाकून द्यावेत; त्याप्रमाणे एका कल्पनेने दुसरी कल्पना मारावी आणि शेवटी दोन्ही कल्पना नाहीशा कराव्यात. कल्पना करायचीच तर ती भगवंताविषयी करू या. भगवंत हा दाता आहे, त्राता आहे, सुख देणारा आहे, अशी कल्पना आपण करू या. त्यात खरे हित आहे, आणि त्यानेच संसार खरा सुखाचा होईल. कल्पनेचे खरे-खोटेपण हे अनुभवाअंती कळते; म्हणून अनुभवानंतर कल्पना थांबली पाहिजे. अशी रीतीने कल्पना थांबल्यावर आणि वृत्ती स्थिर झाल्यावर तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवली पाहिजे. भगवंत ही अशी एकच स्थिर वस्तू आहे. " अमुक एक वस्तू मजपाशी आहे म्हणून मी सुखी आहे, " या वृत्तीमध्ये राम नसून , काही नसताना वृत्तीचे समाधान टिकले पाहिजे, आणि वृत्ती भगवंतापाशी स्थिर झाली पाहिजे. हेच परमार्थाचे खरे मर्म आहे.


३२६. कल्पना म्हणजे मायेचे हत्यार. कल्पनारहित थोडे नामदेखील फळ देईल.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२० नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २० नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २० नोव्हेंबर २०१४

रामापरतें सत्य नाही ॥

 





मी कोणाचा कोण ? । मी आलो कोणीकडून ? ।
तू आहेसी अजन्म आत्माचि निधान ।
आत्म्यासी नाही जन्ममरण । हे आहे सत्य जाण ॥
आत्म्यास नसे जन्ममरण । तरी तो देहांत आला कैसा कोण ? ॥
आत्मा निर्गुण निराकारी । त्यास नाही जन्ममृत्युची भरी । तो सत्तामात्र वसे शरीरी ॥
आत्मा नाही कर्ता हर्ता । तो कल्पनेच्या परता ॥
तूं आहेस आत्मा । सर्व व्यापूनी वेगळा तो परमात्मा ॥
सर्व पोथ्यांचे सार । सर्व साधू्-संतांचा विचार । परमात्मा एकच सत्य जाण ॥
रामापरते सत्य नाही ।श्रुतिस्मृति सांगतात हेचि पाही ॥
रामसत्तेविण न हाले पान । हे सर्व जाणती थोर लहान ॥
श्रीरामरूप ब्रह्मस्वरूप, निर्गुण सगुण, सुंदर । तयासी माझे अनंत नमस्कार ॥
रामाविणें सत्य काही । सत्य जाण दुजें नाही ॥
दुःखाचा हर्ता व सुखाचा कर्ता । परमात्म्यावाचून नाही कोणी परता ॥
रामापरते हित । सत्य सत्य नाहीं त्रिभुवनांत ॥
आजवर जें जें कांही केले । तें भगवच्चिंतनाने दूर झाले ॥
विषय मला मारी ठार । हा जेव्हां झाला निर्धार । तेव्हांच तो होईल दूर ॥

सर्व कांही पूर्ववत् चालावें । तरी पण मन रामाला लावावे ॥
वैभव, संपत्ति, मनास वाटेल तशी स्थिति, । ही भगवत्-कृपेची नाही गति ॥
न व्हावे कधी उदास । रामावर ठेवावा विश्वास ॥
स्वार्थरहित प्रेम । हीच परमात्म्याची खूण ॥
जसा सूर्याला अंधार नाही । तसें परमात्म्याशी असत्य, अन्याय, नाही ॥
परमात्मा न्यायरूप आहे । म्हणजे परमात्मा सत्य आहे ॥
रामाविण सत्य सत्य कांही । सत्यत्वाला उरले नाही ॥
आपले आधी आला । आपले संगत राहिला ।
आपले मागे उरला । त्याची संगत धरतो भला ॥
रामाचा आधार जन्माआधी आला । पण माझे-मीपणानें सोडून गेला ॥
सर्व स्थिति-लय-कर्ता । एकच प्रभु माझा राम त्राता ॥
राम सर्वव्यापी भरला । तो माझेपासून दूर नाही जाहला ॥
परमात्मा सर्व ठिकाणी भरला । त्याचेविण रिता ठाव नाही उरला ॥
सर्व जीव पराधीन । सर्व परमात्म्याचे अधीन ॥
म्हणून जें जें घडेल कांही । तें तें त्याचे सत्तेनेंच पाही ॥
चातुर्य, बुद्धी, देहभाव, वासना, कल्पना । ही मायाच अवघी जाणा ॥
माया बहुत जुनाट । तिनें बहुतास भोगविलें कष्ट ॥
मुख्य देहबुद्धी अविद्यात्मक । अविद्या पराक्रम साधी फार ।
तिची शक्ति फार मोठी । आत्मदर्शन न होऊं देई भेटीं ॥
म्हणून जें जें दिसतें तें तें नासते । हा बोध घेऊन चित्ति ।
सज्जन लोक जगीं वर्तती ॥

३२५. जगाची उत्पत्ति, स्थिति, लय । हे परमात्म्याचे हाती । मनी न वाटू द्यावी खंती ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

१९ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १९ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १९ नोव्हेंबर २०१४

भगवंताजवळ काय मागावे ? 

 



परमात्मा कसा असतो म्हणून विचारले तर काय सांगता येईल ? तो तर नाम, रूप आणि गुण यांच्या अतीत आहे; म्हणून, आपल्या भावनेने जसा पाहावा तसा तो आहे असे सांगता येईल. म्हणजेच, सर्व काही आपल्या भावनेवर आहे. आपण त्याच्याजवळ काहीही मागितले तरी तो द्यायला तयार असतो. आपण विषय मागितले तर तो देत नाही असे नाही, पण त्याबरोबरच त्याचे फळ म्हणून सुखदुःखेही आपल्याला भोगावी लागतात. म्हणून, काही मागायचे झाले तर ते विचार करून मागावे. एक गृहस्थ दमून एका झाडाखाली बसला. ते झाड कल्पवृक्षाचे होते. तो सहज म्हणाला, 'इथे आता मला पाणी मिळाले तर फार बरे होईल.' असे म्हणताच त्याला पाणी मिळाले. पुढे, 'आता काही खायला मिळाले तर बरे.' असे म्हणताच त्याला खायला मिळाले. त्यावर, त्याला विश्रांती घ्यावीशी वाटली, आणि तसे म्हणताच त्याची निजण्याची सोय झाली. पुढे त्याला वाटले की आता इतके सर्व मिळाले, तेव्हां इथे माझी बायकोमुले असती तर मजा आली असती; असे म्हणताच ती तिथे आली. एवढे झाल्यावर त्याला वाटले, ' आपण जी इच्छा केली ते सर्व मिळाले. तर आता इथे मरण आले तर--' असे म्हणताच तो मरण पावला ! म्हणून काय, की विषय मागत गेले तर त्यापासून विषयच वाढत जातात. तेव्हां, ज्यापासून आपले कल्याण होईल असे मागावे. एका भिकार्‍याला राजा म्हणाला की, 'तुला काय मागायचे असेल ते माग.' त्याने आपल्याला पांघरायला घोंगडी मागितली. मागितले असते तर अर्धे राज्यही द्यायला तो राजा तयार होता, त्याच्यापाशी त्याने यःकश्चित् घोंगडी मागितली. समर्थ द्यायला भेटल्यावर त्याच्याजवळ काय मागायचे हे नीट विचार करून मागावे. म्हणूनच, भगवंतापाशी त्याच्या भक्तिची याचना करावी; ही मागितल्याने आपल्याला समाधान मिळते, आणि दुसरे काही मागण्याची इच्छा होत नाही.
भगवंताचे अवतार कसे झाले आहेत ? तर भक्तांकरिताच देवाला अवतार घ्यावे लागले आहेत. अवतार घेतल्यावर नुसते भक्तांचेच काम होते असे नाही, तर त्यामुळे इतरांनाही 'देव आहे' ही भावना निर्माण होते. आपण त्याला शरण जाऊन त्याचे होऊन रहावे, म्हणजे आपल्याला मग इतर कोणत्याही बाबतीत काळजी करण्याचे कारण उरत नाही. भगवंत हा अत्यंत दयाळू आहे. लोखंडाने परिसाला मारले तरी त्याचे सोनेच बनते. त्याप्रमाणे, भगवंताने भरताला भाऊ म्हणून तारला, बिभीषण शरण आला म्हणून त्याला तारला, आणि रावणाला शत्रू म्हणूनही तारला; पण त्याने सोडले कुणालाच नाही. असा भगवंत जोडायला नामाशिवाय दुसरा कोणताच उपाय नाही.



३२४. भगवंताच्या नामाशिवाय मला काहीच कळत नाही, असे ज्याला कळले त्यालाच सर्व कळले.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

१८ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १८ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १८ नोव्हेंबर २०१४

श्रद्धा ही मोठी शक्ति आहे. 

 

    

फार चिकित्सा करीत बसणे हे मानवी देहबुद्धीचे लक्षण आहे. दुकानात गिर्‍हाईक आले आणि मालाची फार चिकित्सा करू लागले की, ' हे गिर्‍हाईक काही विकत घेणार नाही ' असे दुकानदार समजतो. परमार्थातही अती चिकित्सा करणार्‍या माणसाचे तसेच आहे. रणांगणावर गुरूंना कसे मारावे या चिकित्सेत अर्जुन पडला. भगवंतांनी अर्जुनाला आपले रूप दाखविले. त्यात पुढे होणार्‍या सर्व गोष्टी अर्जुनाला दिसू लागल्या. देहबुद्धीच्या, अभिमानाच्या आहारी जाऊन मायेत सापडल्यामुळे झालेला गोंधळ या विश्वरूपदर्शनामुळे नाहीसा झाला.
मायेचे मूळ लक्षण म्हणजे 'मी कर्ता आहे’ असे वाटणे. 'अभिमानाशिवाय कार्य तरी कसे होईल ?' असे आपण म्हणतो, आणि पापाचरण करायलाही मागे पुढे पाहात नाही. देहबुद्धीने केलेला धर्म उपयोगी पडत नाही. अभिमानाने पुण्यकर्मे जरी केली तरी तीही पुढल्या जन्माला कारण होतात. सर्व काही देवाला अर्पण केले, ही आपली आठवण काही जात नाही. दुःखात असताना, आपण आपले जीवन प्रारब्धाच्या, ग्रहांच्या, संचिताच्या किंवा भविष्याच्या हाती आहे असे म्हणतो. परंतु ते भगवंताच्या हाती आहे ही श्रद्धा उडून, आपण त्याला विसरतो. आपण आपल्या शंकेचे समाधान करू शकत नाही. त्यासाठी आपण कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे. आपण आजपर्यंत जगलो याला काय कारण सांगता येईल ? आपण मेलो नाही म्हणून जगलो इतकेच ! 'मी कसा जगलो' याचे कारण कुणालाही सांगता येणार नाही. म्हणून, राखणारा भगवंत आहे ही श्रद्धा असावी.
ही सृष्टी भगवंताने उत्पन्न केली. सृष्टीमध्ये भगवंत सर्व ठिकाणी भरलेला आहे. तो आनंदमय आहे, आपण त्याचे अंश आहोत, मग आपण दुःखी का ? याचे उत्तर असे की, 'देव आहे' असे खर्‍या अर्थाने आपण वागत नाही, जिथे भगवंत आहे तिथे आपण त्याला पाहात नाही, श्रद्धेने साधन करीत नाही. श्रद्धेशिवाय कधी कुणाला परमार्थ साधायचा नाही. श्रद्धा ही फार बळकट आणि मोठी शक्ति आहे. श्रद्धेने जे काम होईल ते कृतीने होणे कठीण जाते. विद्या, बुद्धी, कला, इत्यादि गोष्टी बिळासारख्या आहेत, त्यांच्यामधून श्रद्धा झिरपत जाते. विद्वानांची मते आपापसांत जमत नाहीत आणि त्यामुळे आपली श्रद्धा डळमळते, आणि मग आपल्याला आणखी वाचन केल्याशिवाय चैनच पडत नाही. आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा, म्हणजे धीर पाहिजे. आपण आपल्या स्वतःवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली, तरी आपले काम होईल. नामात भगवंत आहे ही श्रद्धा ठेवावी, आणि अखंड भगवंताच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा, हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे.

३२३. भगवंतावर निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा, भगवंत कष्टसाध्य नसून सहजसाध्य आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

१७ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १७ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १७ नोव्हेंबर २०१४

भगवंताला गरज फक्त आपल्या निष्ठेची. 

 



परमेश्वरापाशी काय मागावे ? तुम्ही त्रास करून घेऊन इतक्या लांब गोंदवल्याला जे आलात ते विषयच मागण्यासाठी आला आहात ना ? ते मागितलेत तर तो देणार नाही असे नाही. आपल्याप्रमाणे तो मर्यादित स्वरूपाचा दाता नाही. आपण दान केले तर तितके आपल्यापैकी कमी होते, पण त्याने कितीही दिले तरी ते कमी होणे शक्य नाही. पण विषय मागून मिळाले तरी आपले खरे कल्याण होईल का ? त्याने तुम्हाला खरे समाधान होईल का ? नाही. कारण देहभोग आज एक गेला तरी दुसरा पुनः येणारच. म्हणून देहभोग येतील ते येऊ देत. देवाच्या मनात ज्या स्थितीत ठेवायचे असेल त्या स्थितीत 'मला समाधान दे' हेच त्याच्यापाशी मागावे. त्याची करुणा भाकून, 'मला तू निर्विषय कर आणि काही मागावे अशी इच्छाच होऊ नये हेच देणे मला दे,' असे तुम्ही अनन्य शरण जाऊन मागावे. त्यातच तुमचे कल्याण आहे.
भगवंताला फक्त आपल्या निष्ठेची गरज आहे. अत्यंत आवडीच्या गोष्टीबद्दल जे प्रेम आपल्याला वाटते, तेच भगवंताबद्दल वाटावे. सात्त्विक गुणापलिकडे गेल्याशिवाय देवाची भेट होत नाही. म्हणून देवाला अनन्य शरण गेल्याशिवाय काही होत नाही. जोपर्यंत अभिमान आहे तोपर्यंत आपल्याला शरण जाता येणार नाही. म्हणून अभिमान सोडून त्याच्याजवळ करुणा भाका, म्हणजे तो दयाघन परमात्मा तुमच्यावर कृपा करायला वेळ लावणार नाही. जगात जे ज्याला आवडते तेच आपण केले तर त्याला ते गोड वाटते. भगवंताला प्रेमाशिवाय दुसर्‍या कशाचीही गरज नाही. निःस्वार्थ बुद्धीच्या प्रेमानेच भगवंताला बद्ध करता येते. प्रेमाने जग जिंकता येते. प्रेम ही भगवंताची वस्तू आहे. प्रेम करायला आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी. सर्वांशी अत्यंत प्रेमाने, निष्कपट प्रेमाने वागावे. आपले बोलणे अगदी गोड असावे. आपल्या बोलण्यामध्ये, नव्हे पाहण्यामध्येसुद्धा प्रेम असावे. प्रेम करायला गरीबी आड येत नाही, किंवा श्रीमंती असेल तर फार द्यावे लागत नाही. नाम हे प्रेमरूपच आहे, आणि खरा प्रेमाचा व्यवहार म्हणजे देणे-घेणे हा होय. म्हणून, आपण नाम घेतले की, भगवंताचे प्रेम येईलच. नामाचे प्रेम नामातूनच उत्पन्न होते. देवाला देता येईल असे एक नामच आहे, ते घेऊन आपल्याला तो समाधानात ठेवतो. अत्यंत गुह्यातले जे गुह्य आहे ते मी तुम्हाला सांगतो : नामाचे प्रेम हेच ते गुह्य होय. आपण भगवंताची प्रार्थना करून, नामाची चिकाटी सोडली नाही तर तो मदत करतो, आणि आपले मन आपोआप नामात रंगून जाऊ लागते.



३२२. भगवंताचे नाम हेच श्रेष्ठ आहे. त्या नामात जो रंगेल तोच खरा प्रेमी.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

१६ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १६ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १६ नोव्हेंबर २०१४

अभिमान जाणे ही देवाची कृपाच. 

 



आता उत्सव पुरा झाला; आता तुम्ही सर्वजण परत जाल, तर क्षेत्रात आल्याची काही खूण घेऊन जा. ती खूण म्हणजे काय ? क्षेत्राच्या ठिकाणी काहीतरी अवगुण सोडावा. आपल्याला जी काही प्रिय वस्तू असते ती सोडावी. तर इथे येऊन, विषयांपैकी एखादा विषय तरी तुम्ही सोडाल का ? इथे साक्षात् परमात्मा आले आहेत, त्यांचे तुम्हा सर्वांना दर्शन झाले आहे. तर मला वाटते याहून तुम्ही काही तरी जास्त करणे आवश्यक आहे. तर एक गोष्ट इथे द्यावी आणि एक गोष्ट इथून घेऊन जावी. अभिमान इथे सोडावा, आणि त्याच्या बदली देवाची कृपा घेऊन जावी. अभिमान तुम्हाला देता येईल का ? अभिमान ही उचलून देण्यासारखी वस्तू आहे का ? अभिमान जाणे म्हणजे देवाची कृपा होणे आहे. अभिमान सोडू म्हणून सुटत नाही. मागे एकदा असे झाले की, एकजण तीन वर्षेपर्यंत एके ठिकाणी बसून सारखे साधन करीत होता. मी एके ठिकाणी सारखे बसून साधन करतो आहे असे त्याला वाटत असे. एकदा त्याचे गुरू तिथून जात होते. त्याला साधनाचा अभिमान झाला आहे असे त्यांना ताबडतोब समजले. म्हणून ते त्याच्याजवळ जाऊन म्हणाले की, " तू इथे काय करतो आहेस ? " तर तो म्हणाला, " मी इथे एके ठिकाणी बसून तीन वर्षे साधन करतो आहे." ते म्हणाले, " वा ! वा ! फार चांगले ! तू आणखी तीन दिवस इथे सारखे बसून साधन कर, म्हणजे आतापर्यंत केलेल्याचे श्रेय मिळेल." तो तसे करू लागला. त्याला वाटले की, तीन वर्षे साधन केले, तर आता तीन दिवस करणे फारसे काय अवघड आहे, तर ते सहज करीन ! पण गंमत अशी की, त्याला गुरूने सांगितल्यावर तिथे पाच मिनिटेसुद्धा बसवले नाही. त्याला आतून कोणीतरी फेकून देते आहे असे वाटू लागले, खालून मुंग्या आल्याशा वाटू लागल्या, आणि आजूबाजूने सारखी भिती वाटू लागली. तेव्हा आपली चूक त्याच्या ध्यानात आली आणि तो गुरूला शरण गेला. तो म्हणाला, " मी आजपर्यंत अभिमानाने साधन केले, पण आपण करून घेतल्याशिवाय हे काही सुरळीत घडणे शक्य नव्हते. आपणच माझ्याकडून सर्व करून घेतले आणि आपण शक्ति दिली म्हणूनच माझ्याकडून हे साधन झाले, नाहीतर होणे शक्य नाही. तर मी आपल्याला शरण आलो आहे." याप्रमाणे शरण गेल्यावर त्याला गुरुकृपा झाली. म्हणून, सात्त्विक अभिमानही उपयोगी नाही. एकवेळ प्रपंचाचा अभिमान पत्करतो, कारण तो लवकर जाण्याचा संभव असतो; पण सात्त्विक अभिमान सुटायला फार वेळ लागतो.



३२१. परमार्थामध्ये मिळविण्यापेक्षा मिळविलेले टिकवणे हेच फार कठीण जाते.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

१५ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १५ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १५ नोव्हेंबर २०१४ 

काळजीचे मूळ कर्तेपणात आहे

 



आनंद पहायला आपल्याला दुसरे कुठे जावे लागते का ? नाही. जो स्वतःच आनंदरूप आहे त्याने आपण होऊन ' मी दुःखी आहे ' असे मानून घेतले आहे. एक जण आपले तोंड आरशात पहायला गेला, पण त्याला ते दिसले नाही. त्यावर दुसरा एकजण म्हणाला, ' मी दाखवितो.' असे म्हणून आरशावर मळ बसला होता तो पुसून, त्याने आत पहायला सांगितले, तेव्हां तोंड स्वच्छ दिसले. त्याचप्रमाणे साधू लोक करीत असतात. ते आपल्याला सांगत असतात की तूच ब्रह्मस्वरूप आहेस; म्हणजे तू स्वतःसिद्ध आणि आनंदरूप आहेस. परंतु आपण काय करतो की हा प्रपंच माझा आहे असे समजतो. आणि त्यामुळे त्यातले सर्व सुखदुःख आपण आपल्यावर लादून घेतो. ज्याने तो उत्पन्न केला त्याला तो रक्षण करण्याची शक्ति असते आणि तो ते आपल्या इच्छेप्रमाणे करीतही असतो; पण तिथे आपल्यावर कर्तेपणा ओढून घेऊन आपण सर्व काळजी करीत बसतो. वास्तविक आपल्या हाती काय आहे ? परमात्म्याला काय करायचे ते तो करीत असतो, आपण मात्र काळजी करून शीण करून घेत असतो. म्हणूनच काळजी सोडून देऊन आपण भगवंताला शरण होऊन राहावे. आपण त्याचे होऊन राहिले म्हणजे आपल्याला सुखदुःख होत नाही, आणि मग आपल्याला त्या आनंदाचा लाभ मिळतो.
काळजी ही मोठी विलक्षण असते. एका माणसाला आपल्या मुलाला चांगली नोकरी लागावी ही काळजी होती. पुढे त्याच्या मनाप्रमाणे नोकरी लागल्यावर, त्या मुलाच्या लग्नाची काळजी सुरू झाली. काही दिवसांनी लग्न झाले; मग पुढे सून चांगली वागत नाही म्हणून काळजी लागली. नंतर तिला मूल होईना म्हणून काळजी लागली. काही दिवसांनी तिला मूल झाले; त्या मुलाला फिट येऊ लागली म्हणून त्याला काळजी लागली. शेवटी आणखी काही दिवसांनी मुलाची फिट बरी झाली. पण त्या म्हातार्‍यालाच फिट्स येऊ लागल्या. आणि अखेर काळजी करीत करीतच तो मरून गेला. काळजी ही आपल्याला भगवंतापासून खरेच काळाच्या स्वाधीन करते. आपण काळाच्या स्वाधीन झालो की आपली बुद्धी भ्रष्ट होते. खरे म्हणजे काळजीचे मूळ माझेपणात आणि कर्तेपणात आहे, आणि खुद्द कर्तेपणाचे मूळ भगवंताच्या विस्मरणात आहे. व्यवहारी माणसे मोठी हुशार असतात; भगवंताला साक्षी ठेवून काळजी करतात ! हा तर त्याच्याहिपेक्षा मोठा गुन्हा आहे. 'काळजी लागणे स्वाभाविक आहे ही कल्पनाच आधी मनातून काढून टाकली पाहिजे. आपली काळजी का सुटत नाही ? या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे. काळजीने आपल्याला धरण्याऐवजी आपणच काळजीला घट्ट धरून ठेवतो, तर मग ती सुटणार कशी ? ज्याने भगवंत आपलासा करून घेतला त्याला काळजीचे कारण उरत नाही.



३२०. संकट आले तर काळजी करू नये. भगवंत करतो ते आपल्या हिताचे करतो ही दृष्टी ठेवावी.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

१४ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १४ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १४ नोव्हेंबर २०१४

प्रपंच भगवंताचा आहे असे जाणून करावा. 

 

    

हे जे सर्व जग दिसते, त्याला कुणी तरी नियंता आहे असे तुम्हाला वाटते का ? एखाद्या नास्तिकाला विचारले की 'हे जग कुणी निर्माण केले ? ' तर तो काय सांगेल, तर पांचभौतिक तत्त्वांपासूनच याची उत्पत्ती झाली आहे. पण ही तत्त्वे कुणी निर्माण केली ? त्यावर तो सांगेल, 'ते मात्र काही कळत नाही'. पण जे कळत नाही त्यालासुद्धा कुणीतरी असलाच पाहिजे. म्हणून, देव नाही हे कोणालाही म्हणता येणार नाही. जिथे सध्या वस्ती नाही तिथेही मंदिरे बांधलेली आपण पाहितो; आणि ती कुणी बांधली याचा तपास करू लागलो असताना बांधणारा कोण हे जरी समजले नाही तरी, ज्याअर्थी ती आहेत, त्या अर्थी त्यांना कुणीतरी बांधणारा आहेच. म्हणून काय की, जगाचा कुणी तरी कर्ता हा असलाच पाहिजे. तो कोण हे आपल्याला समजत नाही इतकेच.
आपण संसारात वागतो त्याप्रमाणे मुले खेळात खेळ थाटतात, खेळात लग्न लावतात, त्यांचा सर्व सोहळा करतात; बाहुलीचे सर्व संस्कार ती करतात. त्यांच्या खेळात बाळंतपण होते, मुले होतात, सर्व काही करतात; पण त्यांना कुणी घरात हाक मारली म्हणजे खेळ टाकून तशीच धावत जातात. त्या वेळेस मूल तिथे रडेल वगैरेची काळजी त्यांना राहात नाही. असेच आपण संसारात वागावे. जर सर्वच देवाने केले आहे तर त्याचे पालनही तोच करतो आणि संहारही करणारा तोच असतो; तर मग आपल्याला तरी त्याने दिलेल्या संसारात काही बरे-वाईट झाले म्हणून सुखदुःख मानण्याचा काय अधिकार आहे ? समजा, आपण एक घर भाड्याने घेतले आहे. त्याचे आपण बरीच वर्षे भाडे भरतो आहोत. पुढे जर आपण ते घर माझेच आहे असे म्हणू लागलो, तर तो मालक ऐकेल का ? तो काहीही उपायाने आपल्याला घरातून काढून लावील की नाही ? तसेच आपले प्रपंचात झाले आहे. जो प्रपंच आपल्याला त्याने भाड्याने दिला आहे, तो आपण आपलाच म्हणून धरून बसलो. परंतु त्याला वाटेल तेव्हा आपल्याला काढून लावता येणे शक्य असताना आपण तो आपला म्हणून कसे म्हणावे ? तर तो त्याचा आहे असे समजून वागावे आणि जेव्हा तो आपल्याला न्यायला येईल तेव्हा जाण्याची आपली तयारी ठेवावी, म्हणजे संसारात सुखदुःखे बाधत नाहीत.
आपण भजनाला लागलो तर प्रपंच कसा चालेल याची काळजी करू नये. भजनाला लागल्यावर तुकाराम महाराजांसारखे झालो तर वाईट काय ? बरे, तसे न झाले तर प्रपंच चालूच आहे ! प्रपंचात नुसते रडत बसण्यापेक्षा, आनंदाने रामनामात राहू या. सर्व हवाला रामावर ठेवून थोडे दिवस तरी राहून पहा, मन खास चिंतारहित होईल, पूर्ण निष्ठा उत्पन्न होईल.

३१९. हे सर्व विश्व व अखिल प्रपंच ईश्वराचा आहे. प्रपंच ज्याचा आहे त्यास तो देऊन टाकून आपण मोकळे व्हावे.अडखळण्याची भितीच नाही.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

१३ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १३ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १३ नोव्हेंबर २०१४

परमेश्वर जाणण्याचा मार्ग ! 

 

 


जो कोणी एखादे कृत्य करतो त्यात तो करणारा असतो; स्वतः निराळा राहूनही त्या कृत्यात तो अंशरूपाने असतो. न्यायाधीश निकाल देतो तेव्हा 'अमक्या न्यायाधिशाने निकाल दिला' असे म्हणतो. म्हणजेच काय की, तो न्यायाधीश जरी वेगळा असला तरी दिलेल्या निकालामध्ये तो असतोच. त्याचप्रमाणे परमात्म्याने हे जे सर्व जग उत्पन्न केले, त्या प्रत्येकात तो अंशरूपाने आहे. म्हणूनच, सर्व चराचरामध्ये ईश्वर पाहावा असे सांगतात त्याचेही कारण हेच आहे. या सर्व चराचर सृष्टीमध्ये ईश्वर पाहायला आपली तितकी प्रबळ इच्छा व्हावी लागते. देव आहे ही पुष्कळांची नुसती भावनाच असते, पण ती बरोबर जाणली जात नाही, आणि ती बरोबर जाणण्याची इच्छा होणे हेच खरे व्हायला पाहिजे असे असते, अशी ज्याला इच्छा झाली त्याचे अर्धे काम झाले असे म्हणावे. तशी इच्छा झाल्यावर, देव पाहण्यासाठी काय मार्ग आहेत हे तो पाहू लागतो. त्याला पुष्कळ निरनिराळे मार्ग सांगणारे भेटतील. कोणी सांगतील की संन्यास घेतला म्हणजे ताबडतोब ईश्वराची प्राप्ती होईल; कुणी सांगतील की ब्रह्मचारी राहिले म्हणजे देव भेटेल, कुणी सांगतील गृहस्थाश्रम वेदाने श्रेष्ठ सांगितला आहे. तसे वागले म्हणजे देव आपल्या घरी चालत येईल; कुणी याग, कुणी हठयोग, तर कुणी जपतपादि साधने सांगतील. अशा मतामतांच्या गोंधळात आपण काय करावे ? तर ज्यांनी तो मार्ग चोखाळला आहे, त्यांनी काय केले ते पाहावे. असा मार्ग कुणी चोखाळला ? तर जे संत लोक आजपर्यंत झाले त्यांनी. त्या सर्वांनी देवाची प्राप्ती करून घेतली आहे. म्हणून ते काय सांगतात ते पाहावे.
आपण घराच्या बाहेर जायला निघालो म्हणजे वाट चालू लागतो. जिथे चार वाटा फुटतात तिथे पाट्या लावलेल्या असतात, आणि जिकडे जायचे ते त्यावर लिहिलेले असते. समजा आपल्याला पंढरपूर जायचे आहे; आता केवळ एखादा रस्ता सावलीचा आहे म्हणून त्याच रस्त्याने जाऊ लागलो तर आपण पंढरपूरला पोहोचू का ? पंढरपूरचा मार्ग उन्हाचा म्हणून आपण तो सोडून देऊन सावलीच्या रस्त्याने जावे, तसेच आपले झाले आहे. आपण विषयात आनंद मानून त्यातच रंगून गेलो आहोत, आणि त्यामुळे देवाकडे जाणारा रस्ता चुकलो आहोत. म्हणूनच, संत सांगत असतात त्या वाटेनेच जाण्याचा निश्चय करावा, आणि तो मार्ग जरी कठीण वाटत असला, तरी तो देवाकडे जातो हे लक्षात ठेवावे.


३१८. संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावे; पडण्याची, अडखळण्याची भितीच नाही.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

१२ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १२ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १२ नोव्हेंबर २०१४

बद्ध आणि मुक्त यांतला फरक. 

 

  


बद्ध हे जगाचे असतात. मुक्त हे जगाचे नसून एका भगवंताचे असतात. संतांची चवकशी करताना, त्याची उपासना कोणती, गुरू कोण हे पाहतात. त्याच्या आईबापांची नाही चौकशी करीत. संतांना देहाची आठवण नसते. ते आपला देहाभिमान, मीपण, भगवंताला देतात. परमात्म्यापेक्षा विषयाची गोडी ज्याला जास्त तो बद्ध. विषयाचे प्रेम कमी होणे म्हणजे मुक्तदशेच्या मार्गाला लागणे, ' मी भगवंताचा ' म्हटले की तिथे बद्धपणा संपला. आपण बद्ध आहोत हे तरी आपणच बद्ध आहोत ही भावना करून घेतली म्हणून. आपण, मूळ तेच रूप स्वयंसिद्ध असताना, सर्व इंद्रिये मिळून होणारा देह मी आहे असे म्हणतो; आणि त्यामुळे देहाला जे सुखदुःख होते ते आपल्याला झाले असे म्हणतो. आत्मा स्वतः त्यापासून अलिप्त असतो. परंतु आत्मा आणि देह वेगळा नाही असे आपण म्हणत असतो; म्हणून मी तोच देह आणि हा देह तोच आत्मा, अशी आपली भावना दृढ झालेली असते. परंतु आपण बोलण्यात मात्र ' माझा ' हात दुखावला किंवा 'माझ्या ' पोटात दुखते, असे म्हणतोच की नाही ? म्हणजे, प्रत्येक अवयव 'माझा' म्हणणारा कुणीतरी वेगळा आहे हे खरे; आपल्याला ते बरोबर समजत नाही इतकेच. मीपणा हा आपल्यात इतका बाणलेला असतो.
आपले मन विषयाच्या आनंदात रंगले, म्हणून तिथे आपण आपलेपणाने वागतो. परंतु विषयच जिथे खोटे, तिथे मन रंगूनही, ते नाहीसे झाले म्हणजे आपल्याला दुःख हे होणारच. आपण दुसर्‍यावर अवलंबून राहिलो म्हणूनही सुखदुःख होते. म्हणून , आपण त्या सर्वांपासून निराळे आहोत असे समजून वागावे. हे होण्यासाठी परमेश्वराची भक्ति करायला पाहिजे. भक्तिला जर काही आड येत असेल तर आपली देहबुद्धीच होय; आणि ती गेल्याशिवाय खरी भक्ति होणारच नाही. तरी आपण परमेश्वराचे आहोत असे समजून वागावे. जे जे होईल ते ते त्याची इच्छा म्हणून झाले असे समजून वागू लागलो, म्हणजे आपली देहबुद्धी हळूहळू कमी होत जाईल. याकरिता काही तप, याग वगैरे करावे लागत नाही. संसार सोडून वनातही जावे लागत नाही आणि विशेष आटाआटीही करावी लागत नाही. जे घडते ते ' मी केले' हा मीपणा टाकून, ' मी देवाचा आहे ' असे म्हणून, आणि जे होईल त्यात आनंद मानून राहावे, म्हणजे मीपणा सुटत जाईल. हे ' मी ' केले नाही, परमात्म्याच्या इच्छेने झाले, असे मानले म्हणजे मीपणा राहिला कुठे ?


३१७. ज्याप्रमाणे, मनाने ' मी देहाचा आहे ' अशी समजून झालेल्याने आपण देहरूप बनलो,
त्याचप्रमाणे मनाने ' मी भगवंताचा आहे ' असे म्हणत गेल्याने आपण भगवद् रूप बनून जाऊ.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

११ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ११ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ११ नोव्हेंबर २०१४

परमेश्वराच्या भक्तीचा राजमार्ग. 

 

परमात्म्याची ज्याने ओळख होते ते ज्ञान. अन्य ज्ञान ते केवळ शब्दांचे अवडंबरच होय. परमात्मा नुसत्या ज्ञानाने ओळखता येणार नाही. भक्ति केल्यानेच तो ओळखता येईल. जसे गाय आली म्हणजे तिच्यामागोमाग वासरू येते, त्याला निराळे बोलवावे लागत नाही. त्याप्रमाणे, भक्ति केल्यावर ज्ञान आपोआपच मागे येते. आता भक्ति कशी करायची हे पाहिले पाहिजे. जो देवापासून विभक्त राहात नाही तो भक्त. नुसते देहाला कष्ट दिल्याने वैराग्य प्राप्त होत नाही, तर ज्या स्थितीत आपल्याला देव ठेवील त्या स्थितीतच आनंदाने राहणे म्हणजे वैरागी होणे. सुखात ठेवले तर आसक्तिशिवाय राहिले म्हणजे झाले. वैराग्य प्राप्त व्हायला प्रपंच सोडावा लागत नाही. साधुसंत प्रपंच सोडून राहात नाहीत. किंबहुना, ते आपल्यापेक्षांही प्रपंच उत्तम करतात; पण मनातून त्यांना त्यात आसक्ति नसते. मनाने आतून जो आसक्तिरहित झाला त्यालाच खरे वैराग्य आले असे होते. अंगाला राख फासून राहिले म्हणजे वैराग्य येत नाही; तर देह प्रारब्धावर, भगवंताच्या भरवंशावर टाकून राहणे हेच वैराग्य. कशाचीही हाव न धरता, जी स्थिती प्राप्त होईल तीतच आनंदाने राहणे म्हणजे परमेश्वराची इच्छा मानणे होय. आणि तसे राहिले म्हणजे आपोआपच भक्त होतो. तसे व्हायला राजमार्ग म्हणजे नामस्मरण करणे. नामस्मरणावर विश्वास ठेवावा आणि ते विश्वासाने घेत जावे.
गुरूने जे नामस्मरण करायला सांगितले असेल तेच करीत राहावे. आणि त्यातच त्याला पाहावे, म्हणजे दिसेल ते गुरुरूपच दिसू लागते. असे झाले म्हणजे सर्व ठिकाणी गुरू दिसू लागतो; चांगल्या दिवाणखान्यात असलो म्हणजे गुरू दिसतो आणि वाईट ठिकाणी असलो तर तो दिसत नाही असे नाही. सर्व ठिकाणी गुरुरूप दिसू लागल्यावर जगात वाईट असे काहीच राहात नाही, कारण मग वाईटाला जागाच राहात नाही. नामस्मरण हेच साधन आहे आणि साध्यही तेच आहे. दुसर्‍या कुणीही काहीही सांगितले तरी त्यावर विश्वास ठेवू नये. नामस्मरण हेच सत्य. त्यावर इतका विश्वास ठेवा, की त्याशिवाय जगात दुसरे काही नाही. एवढा विश्वास अंगी बाणल्यावर देव काही लांब नाही, तुमच्याजवळ आहे. प्रपंचावर जी आसक्ति करता ती तिथून काढून परमार्थावर ठेवा, म्हणजे परमार्थ कठीण नाही. गुरूला अनन्य शरण जाणे म्हणजेच आपला मीपणा नाहीसा करणे होय. मीपणा समूळ मेल्याशिवाय अनन्य शरण जाता येणार नाही. मीपणा हा गुरूने सांगितलेले नामस्मरण करीत राहिल्याने जातो. म्हणूनच सतत नामस्मरण करीत असावे.


३१६. वैराग्य हे वृत्तीत असते. भगवंताने जे दिले त्यात समाधान असून, इतर काही हवे असे न वाटणे, हे वैराग्य.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

१० नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १० नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- 

१० नोव्हेंबर २०१४

शेजार असतां रामाचा । दुःखाची, काळजीची, काय वार्ता ॥

  


ज्याला म्हणावे मी 'माझे' । त्यावर माझी सत्ता न गाजे ॥
स्वतःचा नाही भरंवसा हें अनुभवास येई । परि वियोगाचे दुःख अनिवार होई ॥
तुम्ही विचारी, सुज्ञ आहांत । थोडासा करावा विचार ॥
सर्व सत्ता रामरायाचे हाती । तेथे मानवाची काय गति ? ॥
विचाराने दुःख सारावें । सर्वांचे समाधान राखावें ॥
सर्व केले रामार्पण । हा नव्हे शब्दांचा खेळ जाण ॥
अर्पण केल्याची खूण । न लागावी काळजी तळमळ जाण ॥
परमात्म्याचे रक्षण, कोणतेही स्थळी, कोणतेही काळी, असते हा भरंवसा ।
याचा अनुभव प्रत्येकास आहे खासा ॥
ठेवा रामावर पूर्ण विश्वास । न करावे उपासतापास ॥
उपास हा शब्द अलिकडील जाण । त्याच्यापुढे एक पाऊल टाकून ।
उपासनेत राहावे आपण । तेथे आहे निर्धास्तपण ।
उपासनापुढील ठाण । उपासना मुख्य जाण ॥
उपासनेंत राहावे आपण । हेंच रामाचें सान्निध्य जाण ॥
शेजार असतां रामाचा । दुःखाची, काळजीची काय वार्ता ॥
जैसा सूर्य प्रकाशतां । काळोखाचा नाश होईल तत्त्वतां ॥
एवढें आता ऐकावे माझे । राम उतरील सर्व ओझें ॥
स्मरतां रामाला । तो देईल समाधानाला ॥
देवाकडे करावी विनंति । देहदुःख अति फार । होई रामाचा विसर ।
आता द्या नामाचे अखंड स्मरण । देवा, देह केला तुला अर्पण ॥
परमात्मा दयाळू फार । आपलें हित करील हा ठेवावा निर्धार ॥
मी आहे तुमच्यापाशी हा ठेवावा विश्वास । न सोडावा आता धीर ।
सदा घ्या भगवंताचे नाम । जेणें कृपा करील रघुनंदन ॥
राम कृपाळू दीनांचा नाथ । तो सर्व कांही पाहात ॥
आपले प्रारब्धाने आलेले कर्म । ते त्यास न विसरतां करावे अर्पण ।
सुखाने घ्या नामस्मरण । कृपा करील रघुनंदन ॥
हा करावा उपाय । तोच समाधानाला नेईल खास ॥

मागील गोष्टींची आठवण । पुढील गोष्टींचे चिंतन । हेंच दुःखाला खरे कारण ॥
स्वार्थ म्हणजेच आपलेपण । म्हणून माझा मीच दुःखाला कारण ॥
आपण आपलेपणानें वागत गेलें । सुख, दुःख, चिंता, शोक यांचे मालक व्हावे लागलें ॥
सुखदुःखांत चित्ताची न राहे स्थिरता । तीच त्याची खरी अवस्था ॥
सुखदुःख परिस्थितीवर नसते । आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते ॥
दुःखाचें मूळ कारण । जगत् सत्य मानलें आपण ॥



३१५. जोपर्यंत 'देही मी' ही भावना । तोपर्यंत दुःखाच्या यातना ॥
सारांश, देहातादात्मक । याचेंच नांव दुःख ॥




( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

९ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ९ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ९ नोव्हेंबर 
लोकांचे मन दुखविणे ही हिंसाच !


ही जी सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे तिची नक्कल म्हणजे चित्रकला होय. चित्रकाराने रंगविलेले चित्र खोटे असून जे खर्यासारखे भासते, त्याला उत्तम चित्र असे म्हणतात. भगवंताचे होऊन जी कला येईल ती खरी. भगवंताने आपल्याकडून जे करवून घेतले ती कला समजावी. जे कर्म भगवंताकडे न्यायला मदत करते ती कलाच होय. या कलेमध्ये मनाला गुंतविणे आणि उद्योगात राहणे ही भगवत्सेवाच आहे. मन म्हणजे कल्पनांचे मूर्त स्वरूप. मन चंचल आहे तोपर्यंत देहालासुद्धा स्वस्थता नाही. मनाची चलबिचल होते म्हणूनच अभ्यास करायला पाहिजे. मनाला शिक्षण देणे याचे नाव अभ्यास करणे. मनाची विश्रांती हीच खरी विश्रांती होय. सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी वैचित्र्य आढळते. प्राण्यांच्या कितीतरी जाती आहेत. माणसेसुद्धा एकासारखी एक कुठे असतात ? पण सर्वांमध्ये भगवंत मात्र सारखाच ओवलेला आहे. जगामध्ये प्राणी एकमेकाला मारक असूनदेखील कसे जगतात, हे पाहिले म्हणजे आश्चर्य वाटते. जगामध्ये माणूस आणि वाघ दोघेही राहतात. परंतु दोघांनाही एकमेकांची भिती असते, म्हणून एक दुसर्याला सहसा मारीत नाही. ज्याच्यामुळे दुसर्याच्या हिताचा घात होतो, अशी कृती करणे म्हणजे हिंसेचे लक्षण समजावे. भगवंताच्या आड येणार्‍या वस्तूंची हिंसा करणे ही अहिंसाच होय. पण आपल्या स्वार्थाकरिता आणि बडेजावाकरिता लोकांचे मन दुखविणे, ही हिंसाच समजावी. दुसर्याचे मन दुखविणे म्हणजे भगवंताचे मन दुखविणे होय. आपल्या मनात आलेली गोष्ट आपल्या हातूनसुद्धा होत नाही, तर मग इतरांनी आपल्या मनासारखे वागावे असे म्हणणे हे काही बरोबर नाही. आपल्याकडे बायका चातुर्मासामध्ये नियम करतात. उदाहरणार्थ, रोज एक वात लावायची, उजव्या हाताने पाणी प्यायचे, वगैरे. वास्तविक हे नियम कसले ! तुम्ही एक वात लावली काय आणि दोन वाती लावल्या काय, शेवटी दिवा लावावा लागतोच ! त्यापेक्षा, ' कुणाचे अंतःकरण दुखविणार नाही' असा नियम करावा. प्रथम चार महिने करावा आणि मग वर्षभर पाळावा आणि नंतर जन्मभर ठेवावा. काही बायका चातुर्मासात मीठ सोडतात. असे अळणी खाणारी बाई जेवायला बसली असताना मीठ वाढायला आलेल्या बाईला दुरूनच ' नको नको ' म्हणते; कारण न जाणो, चुकून मीठ किंवा मिठाचा पदार्थ पानात पडायचा ! हे जसे ती सांभाळते, त्याचप्रमाणे आपण कुणाचे अंतःकरण न दुखविण्याचा नियम केला की, आपण किती बेताने बोलू आणि कोणी आले तर आपण किती काळजीपूर्वक वागू ! भगवंत चोहोकडे आहे असे आपण म्हणतो, पण त्याप्रमाणे वागत नाही, याला काय करावे ? भगवंताचे होऊन त्याच्या नामात राहणे हाच एक उत्तम मार्ग आहे.

 ३१४. अंतःकरण न दुखवता बोलणे, हे वाचेचे तप आहे असे म्हणतात. 

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

८ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ८ नोव्हेंबर २०१४

८ नोव्हेंबर

कर्तव्य करावे, मग व्हायचे ते होऊ द्यावे. 

 



जगामध्ये आणि जीवनामध्ये दुःख आहे यात शंका नाही. पण त्यापैकी पंचवीस टक्के दुःखच बाहेरून येते. युद्ध, महागाई, दुष्काळ, चोर्‍यामार्‍या, दारिद्र्य इत्यादिंचे दुःख बाहेरून येते. पण पंचाहत्तर टक्के आपले दुःख आपल्यामधूनच निर्माण होत असते. आपले शरीर, मन आणि हृदयस्थ भगवंत मिळून आपण बनतो. भगवंत आनंदरूप असल्याने तो दुःख निर्माण करू शकणार नाही. देहाचा स्वभाव झिजणे, क्षीण होणे, असमर्थ होत जाणे, हा असल्याने तो आपल्या मार्गाने जात असतो. तो दुःख निर्माण करू शकत नाही. जे जडच आहे ते सुखही देऊ शकत नाही आणि दुःखही निर्माण करू शकत नाही. उरले आपले मन. कुठेतरी चिकटणे हा मनाचा स्वभावधर्म असल्याने ज्याला ते चिकटते त्याचे गुणधर्म अंगिकारते. भक्ताचे मन भगवंताला चिकटते म्हणून त्याच्या मनातून दुःख निर्माण होऊच शकत नाही. ज्याचे मन देहाला चिकटते, त्याचे मन दुःख निर्माण करीत असले पाहिजे. भगवंताहून वेगळेपण आणि देहाशी एकपण, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देह लहान आहे, आकुंचित आहे, तात्पुरता आहे, सान्त आहे, तोच मी आहे अशा घट्ट भावनेने जिकडेतिकडे दोनपण दिसू लागते आणि त्यातून भयरूपी समंध साकार होतो आणि तो जीवाला छळतो. भगवंताच्या स्मरणात आनंदाची मस्ती भोगायला जन्मलेला माणूस, भयापोटी चिंता आणि चिंतेपायी दुःख निर्माण करतो. भगवंताने आपल्या संकल्पाने जग निर्मिले. त्यात घडणार्‍या घटनांचा आराखडा त्या संकल्पात असतो. कालचक्र जसे फिरते तशा घटना आकार घेत जातात. त्यात भगवंताचा हात असतो. त्याचा विसर पडला की आपण गोंधळून जातो, आणि आपली कल्पना भय निर्माण करते. भगवंत मला सांभाळणारा आहे ही वस्तुस्थिती आहे, कारण भगवंताने स्वतःतूनच हे जग निर्माण केले. आपण अंतर्यामी त्याच्या नामात गुंतून राहिलो, तर त्याचे साहाय्य कसे मिळते याचा अनुभव आपोआप येईल. भगवंत नामस्वरूप आहे, म्हणून त्याच्या नामात राहाणार्‍याला देहाचे काय होईल याचे भय उरत नाही.
आपल्या प्रयत्‍नाने जेवढ्या गोष्टी करता येतील तेवढ्या करा. त्या होतच असतात, प्रयत्‍नाने फक्त आपला हात लागतो. आपल्या मनासारखे व्हावे असे म्हणणे म्हणजे ज्या होणार्‍या गोष्टी आहेत त्या मी बदलाव्या, असे म्हणण्यासारखे आहे. त्या कधी बदलल्या जात नाहीत, आणि आपल्याला आनंद कधी मिळत नाही. म्हणून म्हणतो, रामावर निष्ठा ठेवावी. माझे कर्तव्य मी केले आहे ना ? ते करीत असताना मी अनीति, अधर्माने वागलो नाही ना ? आता जे व्हायचे ते होऊ दे; कुठे काळजी करा ! ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल ना, तोच मनुष्य सुखी होईल.


३१३. देहाचा लगाम भगवंताच्या हातात द्यावा आणि नामस्मरणात मजेत दिवस घालवावे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

७ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ७ नोव्हेंबर २०१४


७ नोव्हेंबर

साधन निष्कामबुद्धीने आणि सावधानपणे करावे. 

 



भगवंतापासून जो निराळा राहात नाही तो मुक्तच. 'मी भगवंताचा' म्हटले की तिथे बद्धपणा संपला. 'मी' नसून 'तो' आहे हे जाणणे म्हणजे मुक्तता प्राप्त करून घेणे. देहात असून देहातीत राहतो तो मुक्त. 'राम कर्ता' हे जाणतो तो मुक्त. 'माझे माझे' म्हणून आपण बद्धावस्था लावून घेतो, बद्धाचे आवरण काढून टाकले की आपण मुक्तच आहोत. माझ्या मनावर कशाचाही परिणाम झाला नाही आणि समाधान कायम राहिले, की मुक्तावस्था. 'माझ्यासारखा पापी मीच' असे आपण मनानेच ठरवतो आणि दुःख करीत बसतो. मी एक भगवंताचा झालो, आता नाही कोणाचा, असे म्हणावे, आणि जगात नटासारखे वागावे. वास्तविक, आपण मायेकडून पछाडले गेलो आहोत. भगवंताजवळ माया ही छायेप्रमाणे आहे. आपण मायेचा नियंता जो भगवंत, त्याचे होऊन राहावे; मग माया खरी नाही हे समजते. मायेला ओळखणे म्हणजे विवेक, आणि भगवंत ठेवील त्यात समाधान मानणे, हे वैराग्य.
पापपुण्य हे मनाचे धर्म आहेत, मी आता नाम घेतो, माझी सर्व पापे त्यामुळे नाहीशी झाली आहेत अशी दृढ भावना झाली की तो निष्पाप झाला हे समजावे. चारचौघे करतात म्हणून साधन करून नाही चालणार. साधनात दृढ भाव पाहिजे. साधन करायचे ते योग्य मार्गाने झाले पाहिजे. ते अगदी निष्काम असावे. बुद्धिभेद करणारे लोक जगात नेहमी असणारच; पण साधकाने आपला बुद्धिभेद होत नाही इकडे जागृत असावे. काही पुरुष किंवा स्त्रिया यांना आपला स्वतःचा असा काही प्रपंच राहिलेला नसतो, तरीही हे लोक उगीचच जगाचे दोष काढीत बसतात; दुसर्‍यांच्या घरी जाऊन उठाठेव करतात; हे फार मोठे पाप आहे. साधकाने ते कटाक्षाने टाळावे. ज्या लोकांना आपल्यामध्ये दोष आहेत हे कळतच नाही, ते लोक अगदी खालचे समजावेत; ज्यांना आपला दोष कळतो ते दुसर्‍या प्रतीचे समजावेत; आपण प्रय‍त्न करूनसुद्धा भगवंताच्या आड येणारा दोष जात नाही म्हणून तळमळ असणारे लोक हे सर्वांत चांगले; साधकाने तसे बनले पाहिजे. परमार्थमार्गामध्ये अर्ध्यापर्यंत गेल्यावर, मग पुढे जाणारे साधक फार थोडे असतात. खरे म्हटले म्हणजे साधन आणि वाचन असले की साधक कधी मागे पडायचा नाही. ब्रह्मचारी साधकाने प्रपंचातल्या उठाठेवी करू नयेत, कारण तशाने प्रपंचाचे प्रेम त्याला लागेल. त्याने प्रपंचापासून चार पावले दूर रहावे, नाही तर तोच हवा असे वाटू लागते. जगात किती पोथ्या आणि किती मते आहेत ! एवढे पाहायला वेळ कुठे आहे ? म्हणून साधकाने गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, किंवा दासबोध, असा एक ग्रंथ प्रमाण मानून त्याप्रमाणे साधन करावे.


३१२. मुंगी डोंगरावर चढण्याचा प्रयत्‍न करते आणि कालांतराने का होईना पण
वर पोहोचल्याशिवाय राहात नाही, हे ध्यानात घेऊन आपण प्रयत्‍नाला लागू या.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

६ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ६ नोव्हेंबर २०१४

६ नोव्हेंबर

भगवंताची कृपा. 

 



खरोखर, भगवंताच्या कृपेशिवाय बाकी गोष्टी असून वा नसून सारख्याच आहेत. एखादी मुलगी लग्न होऊन सासरी गेली; तिथे सासू, सासरा, दीर नणंद, जावा वगैरे सर्व लोकांशी तिचे चांगले आहे पण नवर्याशी मात्र पटत नाही, तर तिला खरे सुख समाधान मिळणार नाही. परंतु, समजा, नवर्याशी चांगले आहे पण इतरांशी तितकेसे ठीक नाही, तर तिचे अडणार नाही. तसेच एकाद्याच्या आजारात पैसा, डॉक्टर, औषधे, माणसांची मदत वगैरे सर्व गोष्टी अनुकूल आहेत, पण त्यात भगवंताच्या कृपेचा हात नसेल तर सर्व व्यर्थ आहे. याच्या उलट, भगवंताची कृपा आहे, पण इतर गोष्टींचा अभाव आहे, तरी काम भागते. म्हणून सर्व बाबतीत भगवंताच्या कृपेची गरज आहे; आणि ती मिळविण्याकरिता, त्याचे स्मरण हाच एक मार्ग आहे. समजा, एखादी कुरूप मुलगी आहे. पुष्कळ ठिकाणी तिला दाखविली पण ती नापसंत झाली; नंतर एकाने तिला पाहिली आणि एकदम पसंत आहे म्हणून सांगितले. ती पसंत झाली की सौभाग्याचे सर्व गुण जसे तिच्यामध्ये येतात, त्याप्रमाणे ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली त्याचे काम पूर्ण झाले; मग त्याने किती पाप आणि पुण्य केले आहे हे कोण पाहतो !
भगवंताची कृपा सर्वांवर, अर्थात् आपल्यावरही आहेच. आपल्यावर कृपा आहे अशी आपली खात्री झाली की ती प्रकट होते. कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपताच. ' मी पिईन तर आईचेच दूध पिईन ' असे म्हणून वासरू गाईला ढुसण्या मारते आणि गाय त्याला पाजते; त्याप्रमाणे आपण भगवंताशी अनन्यतेने वागले आणि त्याचे नामच मागितले तर तो कृपा करतोच करतो. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून, असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय. 'भगवंता ! तू माझ्यावर कृपा कर,' असे सांगणे म्हणजे 'मी कृपेला लायक नाही त्या माझ्यावर तू कृपा कर' असे म्हणण्यासारखेच आहे. जो लायक नाही त्याच्यावर कृपा कशी होईल ? ज्याप्रमाणे डोंगरावर आपण शब्द काढला तर त्याला उत्तर म्हणून आपलाच शब्द प्रतिध्वनिरूपाने येतो, त्याप्रमाणे भगवंताच्या प्रार्थनेचा प्रतिध्वनी त्याच्या कृपारूपाने येतो. भगवंताच्या कृपेनेच त्याचे नाम आपल्या मुखात येते. भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असे म्हणावे. ती काम करीत असतेच, आपणच आपल्या शंकेने ती झाकून टाकू नये. पुष्कळ केलेले देखील शंकेने व्यर्थ जाते. आपण नाम सोडणार नाही हे नक्की ठरले की आपली वृत्ती निःशंक होते. जे भगवंताचे आहेत ते अहेतुक नाम घेतात.


३११. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही काळात आणि वाटेल
त्या अवस्थेत घेण्यासारखे एक भगवंताचे नामच तेवढे आहे.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

५ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ५ नोव्हेंबर २०१४

५ नोव्हेंबर

भगवंत हाच एकमेव आधार वाटला पाहिजे.




एक भगवंत सत्य आहे. आपले कुठे चुकत असेल तर ते हेच की, आम्ही प्रपंच सत्य मानतो. फणस कापायला ज्याप्रमाणे हाताला तेल लावावे लागते त्याप्रमाणे, राजकारण घ्या, किंवा प्रपंच घ्या, हरिप्रेमाचे तेल आधी हाताला लावावे. समर्थांनी 'मुख्य हरिकथानिरूपण' असे सांगितले; म्हणजे बाकीच्या गोष्टी आपोआप मागे येतील. आम्ही कर्तेपण मिरवू पाहतो इथेच सर्व बिघडते. हरीचे अधिष्ठान ठेवण्याआधी आम्ही कर्तेपणाचेच अधिष्ठान ठेवतो. लग्नाच्या आधी देवाला नमस्कार करतो, पण पुढे प्रपंचात देवाला विसरतो, हे चुकते. नुसते विषय घातक नाहीत; त्यांच्यात आम्ही आपल्या आवडीने जीव घालतो हे घातक आहे, विषयाच्या ताब्यात जाणे हे घातुक आहे. पण पायाच जर चांगला नाही घातला तर देऊळ कसे टिकावे ?
अमुक एका कार्याला कुणाची मदत नको म्हटले, तर आपण जे म्हणू ते व्हायला पाहिजे. ते होत नाही. तेव्हा मदत कोणाची तरी घ्यायचीच, तर मग आपल्यासारख्या बुडत्याचीच घेऊन काय उपयोग ? भगवंताचीच घेतली पाहिजे. आम्ही जर भगवंताजवळ विषय मागितले तर त्याचे फळही घ्यावे लागेल. दुर्योधन आणि अर्जुन भगवंताची मदत मागायला आले. एवढे सैन्य सोडले आणि अर्जुनाने भगवंताला मागितले. दुर्योधनाने जे मागितले तेच नाही का आम्ही आज प्रपंचात मागत ? आमचे कार्याकडे लक्षच नसते, सर्व लौकिकाकडेच असते. 'मी दुसर्‍या कशाचाही नाही' असे म्हटले म्हणजे भगवंताला अनन्य शरण होता येते. 'परमात्मा हवा' ही नाही आम्ही जाणीव करून घेत, 'जग हवे' असे म्हणतो; आणि तिकडे, सर्व जग मला नावे ठेवते असेही म्हणतो ! मी म्हणतो, जगाला नावे ठेवू द्या, पण राम काय म्हणतो इकडे पाहणे जरूर आहे. आपण परमेश्वराचे परमेश्वरालाच दिले तर कुठे बिघडले ? जो दिसत नाही, भासत नाही, त्याचे हे सर्व आहे असे म्हणण्यात कुठे बिघडते ? ते म्हणण्यात जे समाधान मिळते ते नाही आम्हाला समजत. खरोखर परमात्मा साक्षात कल्पवृक्ष आहे. आपण नेहमी चिंता वाहतो, म्हणून तो आपल्याला चिंताच देतो. आपण जर त्याच्याकडे आनंद मागितला तर तो आपल्याला आनंदच देईल. भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे. तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभहानीचे महत्त्व नाही.
राम हा त्रैलोक्याचा स्वामी आहे, आपण त्याचे सेवक आहोत. पण आम्ही नोकरी दुसर्‍याची करतो आणि पगार मात्र रामाजवळ मागतो ! तसे करू नये. खरे-खुरेच रामाचे दास व्हावे. ज्ञान, योग, प्राणायाम वगैरे भगवंतावाचून येऊ शकेल, पण भक्ति मात्र भगवंतावाचून येणार नाही. भक्ति ही भगवंताची देणगी आहे.

३१०. प्रपंच करणे हा आपण स्वार्थ म्हणतो. पण तो खरा स्वार्थ नाही;
खरा स्वार्थ भगवंताचे होण्यात आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या