१५ जून, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १५ जून २०१४



१५ जून

'मी फक्त एका नामातच आहे.' 

 



मनुष्य कितीही मोठा असला, उत्तम पुराण आणि प्रवचन सांगणारा जरी असला, तरी तो जर नामात रहात नसेल, किंवा त्याच्या संगतीत परमेश्वराचे प्रेम लागत नसेल, तर तो कदापीही संत म्हणून समजला जाणार नाही. संतांचे नातेवाईक संत असतातच असे नव्हे. आपण नोकरी केली तर आपला मुलगा नोकरी करीलच असे काही नाही; तसेच जो भगवंताचा आहे त्याचा मुलगा भगवंताचा असेलच असे नाही. संत जरी झाला तरी त्याने चार माणसांसारखेच वागावे. काहीतरी वागणे हे संतांचे वागणे नव्हे. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण होय; कारण 'सर्व ठिकाणी मी आहे' ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही. साधूच्या अंतःकरणामध्ये भयाचा संकल्प नसल्यामुळे वाघ, सिंह, साप त्याला त्रास देत नाहीत. अगदे जंगली वाघाकडे देखील निर्भयतेने नजरानजर केली तर तो अंगावर येत नाही; शिवाय, साधूंच्या शुद्ध अंतःकरणाचाही त्याच्यावर परिणाम होतो. अशा रीतीने, संतांच्या अंतःकरणाची प्राणिमात्रांनासुद्धा जाणीव असते. अशा संतांचा सहवास मिळणे ही फार भाग्याची गोष्ट आहे. परमेश्वराचे प्रेम लागणे किंवा सतत मुखात नाम येणे, हेच संतांच्या संगतीत राहून साधायचे असते. संतांची अखंड संगत नामानेच ठेवता येईल. जिथे नाम आहे तिथे संतांचा सहवास आहे. तुकाराम महाराजांसारखे संतसुद्धा देवापाशी मागताना 'तुझा विसर न पडावा' हेच मागतात. तसेच रामदासस्वामी देवाला म्हणतात, 'तुझा योग, म्हणजे सहवास, मला नित्य घडू दे.' 'योग असणे' म्हणजे दुसरे काही नसून, मन जेव्हा अनुसंधानापासून अलिप्त होऊन इतर विचारांत भरकटते, तेव्हा त्याला आवरून परत अनुसंधानात लावणे, हीच योगशक्ति.
हुकूम कितीही कडक असेना का, परंतु त्याच्याखाली जर सही नसेल तर त्या हुकुमाला महत्त्व नाही. साहेबाच्या सहीच्या कागदाला महत्त्व आहे. नाम हे सर्व साधनांत सहीसारखे आहे. एका मुलाला अत्यंत राग येत असे. रागाच्या भरात तो आपले डोके आपटून घेई. त्याला मी सांगितले, 'रोज स्नान झाल्यावर आपल्या पोटावर गंधाने रामनाम लिहून ठेव, आणि ज्या ज्या वेळी राग येईल त्या त्या वेळी त्या नामाकडे पहा !' आणि त्या प्रयोगाने त्या मुलाचा राग आपोआप शांत झाला. खरोखर, नामात किती प्रचंड शक्ति आहे ! अनुभव घेऊनच पहा. मी आजपर्यंत सर्वांना नामच सांगत आलो आहे. मी इथे नाही, मी तिथे नाही, मी गेलो नाही, मी जात नाही; मी फक्त एका नामातच आहे. ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे, त्याच्या मागे-पुढे मी आहेच.


१६७. तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे ह्यापलीकडे, सत्य सांगतो, मला कसलीही अपेक्षा नाही.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

१४ जून, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १४ जून २०१४



 १४ जून
 भगवंत जोडणे हाच एक धर्म. 


भगवंत जोडत असेल तर अधर्मही करावा; भगवंत जोडणे हाच एक धर्म. अभिमानाने कोणतेही कृत्य केले तर ते नाही भगवंताला पोहोचत. दानधर्म केला, धर्मशाळा बांधल्या, हे सर्व नाव होण्याकरिता जर केले, तर त्याचा तुमच्या कल्याणाला काय उपयोग झाला ? भगवंत जवळ न येता त्यामुळे अभिमान मात्र वाढतो. बाभळीची झाडे लावली तर त्यांनी आंबे कसे येतील ? मीपणाने केलेले काम नाही उपयोगी पडत. शरणबुद्धीने केलेले काम हाच खरा धर्म. मी भगवंताच्या हातचे बाहुले आहे असे समजावे. 'राम कर्ता' असे म्हणावे. म्हणजे, देवाजवळ शरणबुद्धी धरावी. भगवंताची निष्ठा कोणत्याही वयात आणि कोणत्याही अवस्थेत वाढवता येते. ही निष्ठा कधी कुणाला हार जाणार नाही, किंवा कधी कुणापुढे मान लवविणार नाही. एकदा भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवल्यावर मग काळजीचे कारणच काय ? काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो. भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रयत्‍न करावा, आणि जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे. व्यवहारात सौख्य कर्तव्याने मिळते, तसे परमार्थात सौख्य निष्टेने मिळते. परमार्थ करणार्‍या माणसाने कोणाचेही अंतःकरण दुखवू नये. परमार्थ हा लबाड आणि भोंदू माणसाचा नाही, तसा तो बावळ्या माणसाचाही नाही. व्यवहारात कुणाला फसवू नये, आणि कशाला भुलू नये. आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसविण्यासाठी नसावी. लोकांकडून न फसण्या‍इतकेच आपण व्यवहारी असावे. आपल्या हातामध्ये जितका पैसा असेल, त्या मानानेच देवघेव करावी. व्यवहाराच्या दृष्टीने देणे न राहील असे वागावे. 'कोणत्याही परिस्थितीत मी राहीन' असे जो म्हणेल त्याला कधीच अडचण पडत नाही. आपण श्रीमंतांचा द्वेष करू नये आणि गरीबांना कमी लेखू नये. अशी वृत्ती बनायला भगवंताची निष्ठा पाहिजे. प्रत्येकाला खायला प्यायला भरपूर मिळाले पाहिजे ही संपत्तीची समान वाटणी होय. मोबदला न देता आपण पैसा घेतला, तर, तो ज्याचा घेतला त्याची वासना त्याला चिकटून बरोबर येते. काय गंमत आहे बघा, इतर बाबतीत मनुष्य वचन पाळण्याची पराकाष्ठा करतो, पण तो पैशाचे वचन देतो ते सहज, आणि ते मोडतोही सहज. तेवढेच वचन पाळण्यात तो कुचराई करतो. पैसा नसून अडते आणि तो असून नडते, अशी आपली परिस्थिती आहे. संन्याशाने एक दिवसाचा संग्रह करावा, गृहस्थाने तीन दिवसांचा संग्रह करावा. आपल्याजवळ तीन दिवस खायला आहे असे पाहिल्यावर आपण मुळीच काळजी करू नये.


१६६. 'मी कर्ता आहे' ही प्रपंचातली पहिली पायरी, तर 'राम कर्ता आहे' ही परमार्थातली पहिली पायरी.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

१३ जून, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १३ जून २०१४

१३ जून

प्रपंच हे परमार्थाचे साधन. 

 



फार दिवस नोकरी केली की माणसाच्या मनाला गुलामगिरीची सवय लागते; हे चांगले नाही. काही दिवस तरी माणसाने मालकीहक्काने राहायला शिकले पाहिजे. नोकरी करीत असतानाच अनुसंधानाचा अभ्यास करावा, म्हणजे पुढे नोकरी सुटल्यावर, जितका वेळ मिळेल तितका अनुसंधानात जाईल. प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यापासून परमार्थाचा अभ्यास करतो आहे. प्रत्येक मनुष्याला आनंद किंवा समाधान हवे आहे, आणि त्यासाठी त्याची खटपट चालू असते. खरोखर, परमार्थाला दुसर्‍याची गरजच नाही; मग दुसरा कुणी आपला परमार्थ बिघडवील कसा ? जगात जे आहे ते सर्व चांगले आहे, आपणच तेवढे बरे नाही. दरवाजे, खिडक्या, हे जसे घराचे साधन आहे, किंवा आपल्या गावी जाण्यासाठी आगगाडी हे जसे साधन आहे, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी, किंवा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रपंच हे साधन आहे. नाहीतर नुसत्या प्रपंचामध्ये सुख नाही. प्रपंच हा इथून तिथून सगळा सारखाच. गरीबाचा असो की अडाण्याचा असो, अधिकार्‍याचा असो की कारकुनाचा असो, या देशातला असो की त्या देशातला असो, प्रपंचाचा धर्म जो उणेपणा, अपुरेपणा किंवा तात्पुरतेपणा, तो कधीही कुठेही बदलत नाही. म्हणून जे आपल्यापाशी नाही ते ज्याच्यापाशी आहे त्याच्या प्रपंचाला पाहून आपण भुलून जाऊ नये. आहे त्यात समाधान ठेवावे. परमार्थात अधिकार कुणी कुणाला देऊन येत नसतो; आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो. परमार्थाची जाणीव जेवढी दुःखात होते, तेवढी सुखात असताना होत नाही. ते सुख शेवटी दुःखांतच लोटते. ज्या जाणीवेने आपण सर्व ज्ञान मिळवितो, ती काय आहे हे जाणण्याचा कुणी प्रयत्‍न करीत नाही. वैषयिक बुद्धी विकारांना सामील झाली म्हणजे ते प्रबळ होऊन घातक ठरतात. अशा वेळी, मनात येईल तसे वागण्याचे टाळले तर विकार दुबळे होतात. मी विकारवश होत असेन, तर अखंड प्रेमयुक्त नामस्मरण करणे जरूर आहे. विकारांना वश न होता, प्रारब्धाने आलेले विषय भोगावे म्हणजे त्यांचे काही चालणार नाही.
थर्मामीटर ताप दाखवितो, घालवीत नाही. तद्वत शास्त्रे आपले कुठे चुकते ते दाखवितात, काय करावे ते दाखवितात, पण करणे आपल्याकडेच आहे. समर्थांना राम दिसला, आम्हांला का दिसू नये ? तर आम्ही समर्थांप्रमाणे श्रद्धा ठेवून उपासना सतत आणि आदराने करीत नाही म्हणून. कसेही करा, पण मी रामाचा आहे ही भावना जागृत ठेवा. नाम जाणून, अजाणून, श्रद्धेने, अश्रद्धेने, कसेही घ्या, राम तुम्हाला अन्नवस्त्राला कमी करणार नाही हे खास ! नाम श्रद्धेने घेतले तर विशेषच फळ. म्हणून अखंड नामात रंगून आनंदात राहू या.



१६५. सुखाने प्रपंच करा पण त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा. हेच माझे तुम्हाला सांगणे आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

१२ जून, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १२ जून २०१४



१२ जून
परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू. 



द्वैतामध्ये दुःख आहे, तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे. आपण एकामध्ये राहिलो तर आनंद मिळेल. हे जगत् पुष्कळ भासले तरी ते एकच आहे. प्रपंचाच्या दहा दिशा आहेत, पण परमार्थाची मात्र एकच दिशा आहे; तिच्याकडे आपण लक्ष लावावे. काही न करणे, अर्थात् मनाने, हा खरा परमार्थ होय. परमार्थामध्ये उपाधी मुळीच नाही; नाही म्हणजे किती नाही, तर 'मी' सुद्धा तिथे नाही. प्रपंच हा द्वैत आहे, त्याचे अवडंबर मोठे असणारच. आपल्याला आपल्या जगण्याचा अंतिम हेतू जोपर्यंत कळला नाही, तोपर्यंत प्रपंच करणे हेच ध्येय आपण समजतो. वास्तविक, मनुष्यप्राणी हा देह आणि मन दोन्ही मिळून आहे, म्हणून त्याने ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजेत. परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे. व्यवहारात द्वैताशिवाय आनंद नाही. म्हणून परमार्थात, मानसपूजेत, पहिल्याने 'मी' आणि 'परमात्मा' अशा द्वैताने सुरुवात करावी लागते.
जोपर्यंत परमार्थ आपल्या हाडीमासी खिळला नाही, तोपर्यंत आपल्याला वाचनाची गरज आहे. त्यापासून साधनाला जोर येतो. मन भगवंताकडे गुंतविण्यासाठी काय करावे हे पाहावे. एक बाप आपल्या मुलाला पोहायला शिकवीत होता. बापाने मुलाला पहिल्याप्रथम घोट्या‍इतक्या पाण्यात आणले, नंतर ढोपराइतक्या पाण्यात आणले, नंतर आणखी पुढे आणले; आणि एक दिवस त्याने मुलाला पाण्यात खेचून घेतले. त्याप्रमाणे आपले गुरू आपल्याला परमार्थ शिकवीत असतात. आपण पाण्यात उतरले मात्र पाहिजे. देहाने प्रपंच केला पण तो फळाला येत नाही, म्हणून संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला. पण आमचे शहाणपण, आमचा अभिमान, नाम घेण्याच्या आड येतो त्याला काय करावे ? हा अभिमान दुसरा कुणी उत्पन्न करतो असे थोडेच आहे ? आपल्या ध्यानातही येत नाही. इतके सूक्ष्म असे वासनेचे बीज आपल्यात कुठे तरी दडलेले असते. त्यामुळे लौकिकाची अभिलाषा सुटत नाही. याकरिता संतांनी एक मार्ग सुचविला आहे आणि तो म्हणजे नामस्मरणात राहून विषयाची ऊर्मी उठू न देणे, प्रपंचातली विघ्ने ही सूचनावजा असतात; ती आपल्याला जागे करतात. जन्माला आलो तो भगवंताला ओळखण्याकरिता, हे विसरू नये म्हणून विघ्नांची योजना असते. विघ्ने ही आपण भगवंताच्या जवळ जाण्याकरिताच येत असतात. तेव्हा त्यांना न घाबरता, भगवंताच्या नामांतच स्वतःला विसरून जावे, हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे.



१६४. जेथे आळस माजला, तेथे परमार्थ बुडाला.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

११ जून, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ११ जून २०१४

११ जून

सुखदुःख मनावर अवलंबून आहे. 

 



जिथे रोग असेल तिथेच औषध लावले तर उपयोग होईल. दुःखाचे मूळ कुठे आहे हे प्रथम पाहावे. प्रपंचात काही न्यूनता पडली की दुःख होते. श्रीमंताच्या किंवा गरीबाच्या सुखदुःखात तसा फरक तो कोणता ? एखाद्याजवळ पैसा पुष्कळ आहे, परंतु मूलबाळ नाही, म्हणून तो दुःखी असतो, तर दुसर्‍याला संतती आहे पण पैसा नाही, म्हणून तो कष्टी होतो. तिसर्‍याला संतती, संपत्ति वगैरे सर्व आहे, परंतु पोटदुखीच्या विकाराने तो बेजार आहे. एकंदरीत, सुखदुःखे कोणाला सुटत नाहीत. जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासाने सुद्धा आणल्या, तरी पण न्यूनता काही सरत नाही. दुःखावर आपण वरवर उपाय करतो, परंतु आपल्या दुःखाच्या मुळाशी आपले मनच आहे हे नाही आपल्या ध्यानात येत. खरोखर, सुखदुःख हे वस्तूत नसून आपल्या मनःस्थितीवरच अवलंबून आहे. वस्तू चोरीला गेली त्या वेळी झोपेत, आनंदात होता, पण जागे झाल्यावर, वस्तू गेल्याचे समजल्यावर दुःखी झाला. म्हणजे दुःखी होते ते मन. तेव्हा, औषध द्यायचे ते मनाला द्या. संतांनी मनाला शिकवण दिली. आजवर आम्ही विषयसुख सख्ख्या मुलाप्रमाणे भोगले, आणि परमार्थ सावत्र मुलासारखा केला. सावत्र आईप्रमाणे आम्ही मनाला शिकविले.
ज्याचा सहवास झाला, त्याप्रमाणे मनावर परिणाम होऊ लगले. विषयाचा सहवास गर्भापासून आपण ठेवतो, म्हणून विषयापासून मिळणारा आनंद खरा मानू लागलो. ज्याचे बीज लावावे त्याची फळे खावी. आपण विषयाचे बी पेरतो, आणि विषयाची फळे दुःखदायक आहेत म्हणून मग शोक करतो, याला काय करावे ? व्यापारी दरवर्षी आढावा घेतात त्याप्रमाणे, माझे विषय किती कमी झाले हे आपण पाहावे. जितकी प्रपंचाकरिता तळमळ करतो, तितकी भगवंताकरता करावी. प्रपंचातल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक आहे. परमार्थ हा परिस्थितीवर, श्रीमंती-गरीबीवर, रोगी-निरोगीपणावर वगैरे कशावरही अवलंबून नाही. मनाची स्वस्थता, अंतःशुद्धता, आचरणाची पवित्रता, यांवर अवलंबून आहे. प्रपंचातल्या सोयी आणि गैरसोयी या दोन्ही परमार्थाच्या आड येतात. आपण रस्त्यातून चाललो असताना, एखादे अत्तराचे दुकान पाहून थांबलो काय किंवा मिरच्यांचे दुकान पाहून थांबलो काय, रस्ता चालण्याच्या दृष्टीने दोन्ही घातकच ठरतात. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही, आपण आपली आसक्ति त्यात कालवतो म्हणून आपल्याला तो सुखदुःख देतो, ही आसक्ति काढणे, याचेच नाव परमार्थ होय.



१६३. त्याच गोष्टी 'आसक्ति' सोडून करणे याचे नाव परमार्थ.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

१० जून, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १० जून २०१४

१० जून

आपला व्यवहार, परमार्थ, घडतो ।
तो सर्व त्याचे इच्छेने चालतो ॥ 

 





'असे झाले असते तर बरे झाले असते' । हे म्हणणे नाही खरे ॥
जे होणे योग्य ते घडले । व ते राम‍इच्छेनेच घडले ॥
परमात्म्यानेच जी इच्छा केली । त्याचे आड नाही कोणी आले ।
हा ठेविता विश्वास । मनाला धीर वाटेल खास ॥
माझे सर्व कर्माचा गुरूच सूत्रधार । सर्व सत्ता गुरूचे हाती । तेथे न चाले कोणाची गति ॥
आपले जगणे जेथे भगवंताच्या हाती । तेथे बाकीच्या गोष्टींची काय मिति ? ॥
परिस्थिति कोणाचीही । कितीही असली भली किंवा बुरी । तरी परमात्म्याचेच हाती त्याची दोरी ॥
न पडावे अभिमानाला बळी । राम‍इच्छा जाणावी सगळी ॥
हा जरी असेल सिद्धांत । तरी जपून वागावे व्यवहारात ॥
आपला व्यवहार, परमार्थ, घडतो । तो सर्व त्याचे इच्छेने चालतो ॥
म्हणून, होणे जाणे भगवंताच्या हाती । आपण त्याला जावे शरणागति ॥
चित्तांत ज्याच्या राहिले समाधान । तोच भगवंताचा आवडता जाण ॥
ज्याचा विश्वास रामावरी । त्याला समाधान स्वीकारी ॥
माझे हित रामाचे हाती । हा धरिता विश्वास । समाधान मिळत असे जीवास ॥
आपण होऊन रामाचे जाण । सदा राखावे समाधान ॥
मी-माझे करावे रामार्पण । तेथे समाधानाचा अनुभव पूर्ण ॥
आस ठेवावी रामापायी । आनंदी समाधानी राही ॥
अंतरी समाधान । हेच आपले साधन जाण ॥
संसारात न पाहावे उणे पुरे । ठेवावे त्यात समाधान खरे ॥
जशी जशी ज्या वेळी परिस्थिति । तशी तशी असावी समाधान वृत्ति ॥
ज्या स्थितीत ठेवील राम । त्यात राखावे समाधान ॥
चिंता, अहंता, ममता, कोणी कारणावांचून । केले छळ, कपट अपमान ।
अथवा बोलिले शब्दबाण । त्यात राखावे समाधान ॥
समाधान देणे नाही दुसर्‍याचे हाती । ईश्वरकृपेनेच त्याची प्राप्ति ॥
जोवर संशयी झाले मन । तोवर न होई समाधान ॥
विषयास घातले खत जाण । तरी कसे पावावे समाधान ? ॥
जोवर दृश्याचे भान । तोवरी मनी न राहे समाधान ॥
समाधानाची स्थिति । उपाधीरहित असावी वृत्ति ॥
कोठे ठेवावे मन । जेणे मिळेल समाधान ? ॥
समाधान नव्हे देहाचा गुण । मनाने व्हावे भगवंताचे आपण ॥
पांडव झाले वनवासी । पण अखंड राहिले भगवंतापाशी ॥
पांडव भगवंताचे भक्त झाले । वनवास नाही चुकविता आले ।
त्यांनी केले भगवंताचे स्मरण । जेणे राखिले समाधान ॥
'आता झालो मी रामाचा' । हा विचार ठेवावा साचा ॥
ऐसे होऊन राही । समाधान तेथेच पाही ॥



१६२. सर्व कर्ता राम । हे ठेविता चित्ती । समाधान येते त्यापरती ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

९ जून, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ९ जून २०१४

९ जून

वासनानाश हाच मोक्ष. 

 

 

पुष्कळदा भक्ति म्हणजे काय, किंवा परमार्थ कशाला म्हणतात, हेच आपल्याला कळत नाही. ज्याला प्रपंच नीट करता येत नाही, त्याला नाही परमार्थ करता येणार. प्रपंचाला कंटाळून भक्ति नाही येणार. कंटाळा प्रपंचाचा येण्यापेक्षा, विषयांचा आला पाहिजे. मला सुख हवे हा प्रत्येक जीवाचा मुख्य हेतू असतो. मोक्ष म्हणजे निरतिशय सुखाचा अनुभव होय. 'जिवंतपणी मिळालेली आत्यंतिक सुखाची स्थिति' अशी मोक्षाची व्याख्या करता येईल.
खरोखर, भगवंताजवळ काय कमी आहे ? एक आपले मन त्याला द्यावे आणि त्याची श्रद्धायुक्त भक्ती करावी. काळजी करणे म्हणजे भगवंतावर भरवसा नसणे होय. प्रारब्धावर देह टाकणे ही खरी संन्यासवृत्ती होय. वासना न ठेवता आपल्या हातून कर्मच होत नाही, त्याला काय करावे ? माझे समाधान माझ्याजवळ असताना, दुसरीकडे ते मिळेल असे आपल्याला वाटते, हेच आपले चुकते. हवेपण संपले नाही तोपर्यंत समाधान नाही. हव्यास मरेपर्यंत सुटतच नाही; हे सर्व रोगांचे मूळ आहे. आणि म्हणूनच; ज्याची वासना नाहीशी झाली तो मोक्षत्वाला गेला खरा. आशेची निराशा झाली नाही तोपर्यंत भगवंताचा दास नाही होता येणार. आशा जेव्हा मनात उठेल तेव्हा ती भगवंताला अर्पण करावी. प्रत्येकाला वाटते, मी श्रीमंत व्हावे, पण कितीजण तसे होतात ? म्हणजे ती निराशाच नाही का ? प्रपंच खरोखरीच नाटकासारखा आहे. नाटकामध्ये एखादा मनुष्य राजा झाला काय किंवा भिकारी झाला काय, प्रत्यक्ष जगामध्ये त्याला किंमत नाही. उलट, भिकार्‍याचे काम करणार्‍याने जर ते उत्तम केले, तर लोक त्याचे कौतुक करतात. तसे, प्रपंचामध्ये कुणी श्रीमंत असला काय आणि गरीब असला काय, याला महत्त्व नसून, त्याने भगवंताचे अनुसंधान किती ठेवले याला खरे महत्त्व आहे. आपण पैसा साठविला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा. अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये. विषयावर जोपर्यंत तुमचे सुख अवलंबून आहे, तोपर्यंत भक्तीचे खरे सुख मिळत नाही. एक भगवंतच मनापासून हवा असे वाटले, म्हणजे तो प्राप्त होतो. 'मी करतो' असे कधीच म्हणू नये. मी आपल्या तपश्चर्येने भगवंताला पाहीन असे जो म्हणतो, त्याला भगवंताचे दर्शन होणे कठीण असते. विषय मिळाला नाही म्हणजे तळमळ लागते, त्याप्रमाणे भगवंत भेटला नाही तर तळमळ लागावी. आजच्या आपल्या स्थितीत आपल्याला काय करता येणे शक्य आहे, हे प्रथम पाहावे. परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील, त्याला तो लवकर साधेल. त्त्या माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे कारण उरणार नाही.



१६१. हवे व नको याचा आग्रह नसावा. यातच वासनेचे मरण आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

८ जून, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ८ जून २०१४

८ जून

विषयाकडचा ओढा भगवंताकडे लावावा. 

 



प्रपंचात ज्याला विश्वास म्हणतात, त्यालाच परमार्थात श्रद्धा म्हणतात. उणीव हेच प्रपंचाचे रूप असल्यामुळे तो पूर्ण झाला असे कधीच होणार नाही. समाधान हा मात्र पूर्णत्वाचा स्वभाव आहे. निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल. आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल. अशा प्रकारे 'सर्वस्व' अर्पण करणे, याचेच नाव यज्ञ होय. त्याग आणि भगवंताचे स्मरण, हा यज्ञाचा खरा अर्थ होय. परमार्थ साधला की बुवाचा देह पुष्ट होतो. तो काय दुधाचा रतीब लावतो ? छेः; भगवंताच्या आनंदाने त्याचा देह भरलेला असतो; परंतु साधकावस्थेमध्ये त्याचा देह कष्टामध्येच ठेवलेला असतो. खरे म्हणजे, परमार्थी माणसाने दैन्यवाणे राहायचे कारणच नाही. पैसा असेल तर त्याने रोज श्रीखंडपुरी खावी; पण उद्या जर उपास पडला, तर मात्र आजच्या पक्वान्नाची आठवण होता कामा नये.
सर्वांत गृहस्थाश्रम श्रेष्ठ सांगितला आहे. ज्याला हित करून घ्यायचे आहे, त्याला गृहस्थाश्रमासारखा आश्रम नाही. पण लग्न करून सर्व काळ विषयांत घालवू लागलो, आणि प्रपंचाची कर्तव्ये करायची राहिली, तर मग लग्न करून काय साधले ? उद्योग करून पोट भरायचे हे खरे, पण नोकरी करून मालकाला सर्वस्व मानू लागलो आणि देवाला विसरलो, तर नाही उपयोग. देवाला स्मरून नोकरी करावी. गृहस्थाश्रमात देव भेटणार नाही असे म्हणेल, त्याचे खरे मानू नये. देव भेटेल याची खात्री बाळगावी. आपला भार सर्वस्वी भगवंतावर टाकावा. संकट, आनंद, दोन्ही भगवंताला सांगावीत. ज्या स्थितीत भगवंताने ठेवले आहे त्या स्थितीत समाधान मानावे. अर्पणबुद्धीने सर्व कर्मे करावीत. ज्यात माझे मन मला खात नाही, ते काम चांगले असे समजावे. कोणत्याही मनुष्याला जोपर्यंत या प्रपंचामध्येच सर्व काही आहे असे वाटत असते, तोपर्यंत तो परमार्थापासून दूर असतो. वाईट लोक समाधानात दिसतात, पण खरे ते तसे नसतात. वाईट कृत्ये करणाराला कधी ना कधी तरी पश्चात्ताप झाल्यावाचून राहात नाही. एखादी बाई आपल्या सावत्र मुलाला ज्याप्रमाणे खायला प्यायला घालते, पण आतून तिचे त्याच्यावर प्रेम नसते, त्याप्रमाणे आपण परमार्थाला वागवतो. खरे म्हणजे आपले इथेच चुकते. आपला ओढा जो विषयाकडे आहे, तो भगवंताकडे लावला की परमार्थ साधला. ज्याने विषयातले सुख भगवंताकडे लावले, म्हणजे भगवंताच्या स्मरणात ज्याला सुखा-समाधानाचा लाभ झाला, त्याचे जन्माला येऊन खरे कल्याण झाले.



१६०. प्रपंचात जी आपली चिकाटी आहे. तिच्या एकचतुर्थांश
चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली, तरी आपले काम भागेल.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

७ जून, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ७ जून २०१४

७ जून

नित्यनेम म्हणजे काय ? 

 



नित्यनेम म्हणजे काय ? नित्याचा जो नेम तो खरा नित्यनेम होय. नित्य कोण ? जो कधीही बदलत नाही तो. याचा अर्थ, जो पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य होय. म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा. त्याचा नियम करायचा म्हणजे काय करायचे ? नियम करणे याचा अर्थ नियमन करणे, निग्रह करणे, वश करून घेणे, स्वाधीन ठेवणे, हा होय. आपले मन भगवंताच्या स्वाधीन करणे, त्याच्या ठिकाणी ते नेहमी ठेवणे, याचे नाव नित्यनियम होय. आजच्या आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन करता येत नाही; आणि देह हा जड, अशाश्वत असल्यामुळे देहाने, नित्य आणि शाश्वत अशा भगवंताचा नियम घडणे शक्य नाही. म्हणून, देहाने घेता येत असून देहाच्या पलीकडे असणारे, आणि सूक्ष्म असल्यामुळे भगवंताशी शाश्वत संबंध असणारे, असे भगवंताचे नाम अखंड घेणे हा आपला खरा नित्यनियम आहे. इतर सर्व गोष्टी, शास्त्राची बंधने, पोथी वगैरे वाचणे, स्नानसंध्यादि नित्यकर्मे, वगैरे पाळावी, पण त्याचा हट्ट वा आग्रह असू नये. कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे नाम मात्र सोडू नये. एवढाच हट्ट क्षम्य आहे.
शुद्ध भावनेने नाम घेतले की भगवंत दर्शन देतो. शुद्ध भावनेचे फळ फार मोठे आहे. पुष्कळ वेळा गरीब आणि अशिक्षित लोकच या बाबतीत श्रेष्ठ असतात. आपण नाम घेत जावे, नामाने भावना शुद्ध होत जाते. खरे म्हणजे, मनुष्याला जिवंत राहण्यासाठी हवेची जितकी जरूरी आहे तितकीच, किंबहुना त्याहूनही जास्त जरूरी, परमार्थामध्ये भगवंताच्या नामाची आहे. भगवंताच्या नामाशिवाय न राहण्याचा संकल्प प्रत्येक माणसाने केला पाहिजे. भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही. तो एका प्रेमाने वश होतो. प्रेमामध्ये हट्ट आणि कष्ट झाले तर शोभतात, आणि हिताचे होतात. आपण भक्तांचे प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढे बघतो. जो मनुष्य साडेतीन कोटी रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्यावाचून राहणार नाही. शंका या फार चिवट असतात, त्या मरता मरत नाहीत. शिवाय, काही शंका आचरणाने आणि अनुभवानेच नाहीशा होतात. म्हणून, मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये. सतत नाम घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते, आणि सर्व शंका आपोआप विरून जातात. लंकेमध्ये रावणाच्या बंदिवासात अशोकवनात सीता असताना, तिच्या सान्निध्याच्या प्रभावामुळे तिथली झाडे, पक्षी, दगड या सर्वांना रामनामाचे प्रेम लागले होते, असे वर्णन आहे. रामनामाचे प्रेम आणि भगवंताचे प्रेम ही दोन्ही एकच आहेत. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे ह्यातच जीवनाचे सर्वस्व आहे.


१५९. ध्रुवासारखी नामावर निष्ठा पाहिजे. प्रत्यक्ष भगवंत समोर आले, तरी त्याने नाम सोडले नाही.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

६ जून, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ६ जून २०१४

६ जून

भगवंत आणि मी वेगळे नाहीत. 

 



समुद्राचा फेस खरा आहे असे वाटले, तरी त्याच्याखाली पाणीच असते. असत्य हे नेहमी सत्याला धरूनच राहते. जे नाही ते तोंडाने सांगणे ही माया. तिला आपण खरे मानतो. मायेला असत्य मानले की ब्रह्माला सत्यत्व येते. आपण मायेच्या पाठीमागे जातो, पण माया ही मृगजळाप्रमाणे आहे असे समजते तेव्हा आपण स्वस्थ होतो. जन्माच्या वेळेस 'सोऽहं' म्हणत होता, नंतर 'कोऽहं' म्हणू लागला आणि शेवटी 'देहच मी' म्हणू लागला ! वास्तविक, सूर्य आणि त्याचे किरण हे जसे वेगळे नाहीत, त्याप्रमाणे 'भगवंत' आणि 'मी' वेगळे नाहीत.
सत्य म्हणजे अखंड टिकणारे ते, म्हणजे परमात्मस्वरूप होय. सच्चिदानंदस्वरूपाच्या ठिकाणी मन चिकटून राहणे यालाच अनुसंधान म्हणतात. भगवंतावाचून इतर सर्व म्हणजेच उपाधी होय. 'मला कळत नाही' असे वाटणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे; आणि मी आणि भगवंत वेगळे नाहीत असे अंगी मुरणे ही शेवटची पायरी होय. 'जे जे घडते त्याचा कर्ता परमात्मा आहे, मी फक्त कर्तव्यापुरता आहे' असे वाटणे, यालाच निष्काम कर्म म्हणतात; आणि 'आले तर भोगले, गेले तर सोडले', हे सहजकर्म होय. दोष बाधू नयेत अशा रीतीने केलेले कर्म ते ज्ञानयुक्त कर्म होय; आणि ईश्वराच्या स्मरणात केलेले कर्म त्याला निरासक्त कर्म असे म्हणतात. 'अमुकच फळ मला मिळावे' ही वृत्ती सोडणे, याचे नाव निरासक्ति होय. विषयांची विरक्ति झाली की त्याला ज्ञान झाले असे म्हणतात. थोडक्यात म्हणजे, जे कर्म बंधनाला कारण होते ते अज्ञान, आणि जे मोक्षाला कारण होते ते ज्ञान समजावे. कर्ममार्ग, उपासनामार्ग, नवविधाभक्ति, इत्यादि सर्वांनी गाठण्याचे ध्येय एकच असते. लग्नात ज्याप्रमाणे अमुक एक खर्च मी जास्त करीन, दुसरा कमी करीन, असे माणूस म्हणतो, पण मुख्य कार्य हे मुलीला नवरा गाठून देणे, त्याप्रमाणे भगवंताची भेट होणे हे मुख्य होय. आपली देहबुद्धी संतांच्या संगतीच्या आड येऊ देऊ नये. भगवंताच्या, स्वरूपदर्शनाच्या आड माझ्या देहबुद्धीचा पर्वत येतो. सर्व साधनांचा उपभोग अभिमान नाहीसा करण्यासाठी असतो. नामस्मरणाने हे काम लवकर होते, आणि म्हणूनच सर्व साधनांचे सार भगवंताचे नाम हेच आहे. ते आपण श्रद्धापूर्वक घ्यावे आणि भगवंताशी एकरूप व्हावे. आपण प्रयत्‍न करीत असताना, भगवंत माझ्या पाठीशी आहे ही भावनाच आपल्याला उद्धरून नेईल याची खात्री बाळगा, आणि भगवंताच्या नामात आनंदाने कालक्रमणा करा.



१५८. आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो, तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्‍न करा.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

५ जून, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ५ जून २०१४

५ जून

वैराग्यावाचून सारा परमार्थ लटका आहे. 

 

   

पक्ष्यांची पिले त्यांच्या पंखाखाली वाढतात, त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे. आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल, त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत. आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही. रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते; कारण शक्ति येणे हे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे, अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो. परमार्थात मनाचे कष्ट आहेत. कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे; आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्‍न करील, त्याला परमार्थाचा अनुभव लवकर येईल. आपण आपले मन भगवंताच्या अनुसंधानात मोठ्या काळजीपूर्वक ठेवले असताना त्याच्यावर आघात करायला विषय अगदी टपलेला असतो. मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की पुरे, विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावे. साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जपले पाहिजे. म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय.
प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासक्तिने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ. परमार्थाच्या आड काय येते ? धन, सुत, दारा, वगैरे आड येत नाहीत, तर त्यांच्यावरचे जे ममत्व ते आड येते. वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे; ती वस्तू नसणे हे वैराग्य नव्हे. एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त, असे म्हणता येणार नाही. बायको असून लंपट नसेल तो विरक्त. आहे ते परमात्म्यानेच दिले आहे आणि ते त्याचे आहे, असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय. या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही, तो वैरागी. वैराग्यावाचून सारा परमार्थ लटका आहे. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते. आज खरी भक्ति नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही, आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ति येत नाही. शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता, भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा. ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कुणी नाही, आपले आप्त कुणी नाहीत, जिथे आपल्याला कुणी मान देत नाही, अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा. जिथे कुणी आपल्याला ओळखीचे नाही असे स्थान आपल्या अभ्यासाला चांगले असते.


१५७. बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगति । चित्ति असावा एक रघुपति ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

४ जून, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ४ जून २०१४

४ जून

परमार्थात अभिमान आड येतो. 

 



शास्त्रात दोन गोष्टी सांगितल्या आहेत; इहलोक आणि परलोक कसे साधावेत हे दोन्ही स्पष्ट केले आहे. परंतु आपण प्रपंच तडीचा आणि परमार्थ सवडीचा मानतो. या दोन्ही गोष्टींत जाणत्याची संगत लागते. परलोक साधून देणार्‍याला सद्‍गुरु म्हणतात. जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो, त्यालाच सद्‍गुरुकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो. आपण भगवंताला शरण जात नाही, कारण आपला अभिमान या शरण जाण्याच्या आड येतो. गंमत अशी की, व्यवहारात सुद्धा आम्ही अभिमान सोडून, ज्याला जे समजते त्याच्याकडे जातो. इहलोक अनुभवाचा आणि परलोक अनुमानाचा, अशी आपली कल्पना असते. पण इहलोकाचा अनुभव दुःखाचा येतो तरी तो आम्ही सोडत नाही, मग 'परमार्थाचा अनुभव नाही म्हणून मी तो करीत नाही' हे म्हणणे लबाडीचे आहे. 'प्रपंचात आम्ही काही पाप करीत नाही, मग परमार्थ तरी दुसरा कोणता राहिला ?' असे काहीजण विचारतात. प्रपंच सचोटीचा असला, तरी त्यात अभिमान असेल तर तो परमार्थ होणार नाही. 'राम कर्ता' म्हटल्याशिवाय, म्हणजेच अभिमान सोडल्याशिवाय, परमार्थ नाही साधणार. 'मी देही' म्हणू लागलो यात अभिमान आला. देहबुद्धीला कारण म्हणजे वासना. वासना हे सर्वांचे मूळ आहे. 'माझा जन्मच जर वासनेत आहे तर ती बाजूला काढल्यावर आम्ही जिवंत कसे राहू ?' असे वाटते. जो या वासनेचा खून करतो, तोच परमार्थाला लायक होतो. अंती जी मती, ती जन्माला कारण होते. हे सगळे ज्ञानाचे बोलणे झाले, पण प्रचीतीने हे सर्व जाणावे.
बायकोपोरांचा त्रास होतो, मन एकाग्र होत नाही, म्हणून बुवा झाला; मठ केला. लोक येऊ लागले, त्यांना जेवायला घालण्याकरिता भिक्षा आणू लागला. पण भगवंत सर्वांना खायला घालतो हे विसरला ! छप्पर गळू लागले ते नीट करण्याची काळजी करू लागला. मग घरादारांनी काय केले ? असा बुवा होण्यापेक्षा प्रपंचात राहिलेले काय वाईट ! थोडक्यात म्हणजे, परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील, त्याला तो लवकर साधेल. त्या माणसाला प्रपंच सोडून जायचे कारणच उरणार नाही. जगातले आपले समाधान अगर असमाधान, ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून आहे. परमार्थात महत्त्व, बाहेरचे ऐश्वर्य किती आहे याला नसून, वृत्ती स्थिर होण्याला आहे, आणि भगवंताचे सतत अनुसंधान हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे.


१५६. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते. आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

३ जून, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३ जून २०१४

३ जून
परमार्थ कसा साधेल ? 




ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली, त्याला शरण जावे. त्याला शरण जाण्याच्या आड काय येते ते पाहावे. कर्तेपण टाका म्हणजे शरण जाता येते. माझेपणाने मिरविता आणि अभिमान कायम ठेवता, मग भगवंताला शरण कसे जाता येईल ? आपण संतांच्या दर्शनाला जातो, आणि बायकोचे दुखणे बरे व्हावे असे म्हणतो; मग ते दर्शन खरे झाले म्हणायचे का ? पोराबाळांकरता, बायकोकरता, संतांकडे नाही जाऊ. संतांनी नामस्मरण करायला सांगितले, परंतु मुलगा वाचत नाही असे पाहिले की आपली रामावरची, नामस्मरणावरची, श्रद्धा उडते. म्हणजे मी विषयाकरता नाम घेतो असेच झाले ! विषय सुटावेत असे वाटते, पण ते सुटतच नाहीत. याचे कारण आमची अशी बलवत्तर इच्छाच नसते. संन्यास घ्यायला निघाला तर बायको पोर घेऊन आडवी येते; तिला दूर सारून निघाला, पण पुढे मोहात पडून परस्त्री करण्याची वेळ येते ! माणूस व्यसनाकरतां हे सर्व करतो, परंतु परमार्थाकरिता विषय आणि मोह दूर करून साधन कर म्हटले, तर निरनिराळ्या सबबी आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. चोवीस वर्षे अभ्यास केला तरी पोटभर खायला मिळत नाही, मग परमार्थ मात्र दोन वर्षात साध्य व्हावा असे कसे म्हणावे ?
शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे. परमार्थ हा समजुतीचा आहे, उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही. बद्रीनारायणाची यात्रा करूनही तो साधणार नाही. त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिल्यानेच जास्त फायदा होईल. काही खेळ जसे एकट्यानेच खेळायचे असतात, तसा परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे. तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे. खेळात काही बाह्य साधन तरी लागते, पण या अभ्यासात त्याचीही जरूरी नसते. परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल, तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थक नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे, हा तर मोठा घात आहे. सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्‍न करणे, याचेच नाव परमार्थ. 'जग काय म्हणेल' म्हणून वागणे याचे नाव व्यवहार, आणि 'भगवंत काय म्हणेल' म्हणून वागणे हाच परमार्थ.


१५५. कर्तव्यात भगवंताचे स्मरण हेच परमार्थाचे सार.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२ जून, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २ जून २०१४

२ जून
भगवंतावर अकारण प्रेम करावे. 



खरोखर, जगात आणि लौकिकांत आपण अडाणी राहिलो तर काही वाईट नाही. भगवंताच्या मार्गामध्ये त्याचा फायदाच होईल. आपण अडाणी झाल्याशिवाय, म्हणजे आपली विद्या आणि मोठेपण विसरल्याशिवाय, परमार्थ साधत नाही. मुलगा गावाला जाताना ज्याप्रमाणे आई त्याला फराळाचे देते, त्याप्रमाणे परमात्मा आपल्याला ज्या परिस्थितीत जन्माला घालतो त्या परिस्थितीत राहण्यासाठी लागणारे समाधानही तो आपल्याला देत असतो. ते घ्यायची आपली लायकी मात्र पाहिजे. जिथे असमाधान फार, तिथे दुष्ट शक्तींना काम करायला वाव मिळतो. याच्या उलट, जिथे खरे समाधान आहे, तिथे चांगल्या शक्ति मदत करतात. आपण नामाला चिकटून राहिलो तर बाहेरची वाईट परिस्थिती बाधणार नाही. देहाचा मनाशी संबंध आहे, आणि मनाचा हृदयाशी संबंध आहे; म्हणून मन नेहमी अगदी समाधानात ठेवावे, म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्य वाढेल.
स्वार्थ सुटताना पहिल्या पहिल्याने मनुष्य व्यवहाराच्या चौकटीत बसणार नाही. जो येईल त्याला तो आपलाच म्हणेल. पण परमार्थ मुरला की तो व्यवहार बरोबर करून शिवाय निःस्वार्थी राहील. खरोखर, परमार्थ हे एक शस्त्र आहे; त्यामध्ये सुसूत्रपणा आहे. व्यवहार न सोडावा; पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते, म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावे. भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे. भगवंतावर अकारण प्रेम करणे याचे नाव परमार्थ. परमार्थाला डोके शांत पाहिजे. एका गृहस्थाला सगळीकडे रामाची मूर्ति दिसू लागली. झाले ! त्याला वाटले की देव आपल्याला भेटला. पण हे काही खरे भगवंताचे दर्शन नव्हे. तो सर्व ठिकाणी आहे अशी भावना झाली पाहिजे. परमार्थाची काळजी करू नये; ती काळजीच प्रगतीच्या आड येते. वय वाढू लागले की आपले सर्व अवयव जसे प्रमाणात आपोआप वाढतात, तसेच परमार्थाला लागणार्‍या गुणांचे आहे. आपण साधन करीत असताना, आपली प्रगती किती झाली हे सारखे पाहू नये. समजा, आपण आपल्या परसात एक झाड लावले, आणि ते किती वाढले हे पाहण्यासाठी रोज त्याच्या मुळ्या उपटून आपण जर पाहू लागलो, तर ते झाड वाढेल का ? अगदी तसेच परमार्थाच्या प्रगतीचे आहे. मनुष्याला परमार्थ किती साधला हे त्याच्या बोलण्यावरून आणि दृष्टीवरून ओळखता येते.


१५४. परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही. तो निव्वळ स्वतःकरिता आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

१ जून, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १ जून २०१४

१ जून

कर्तेपणा टाकणे हाच परमार्थ ! 

 



दोरीला जो साप म्हणून समजला तो बद्ध; पण दोरीला दोरी म्हणून ज्याने ओळखले, तो मुक्त समजावा. 'देही मी नव्हे' हे ज्याला समजले तो मुक्तच. सत्यज्ञान करून घेणे म्हणजेच मुक्तावस्था आहे. बद्धदशा आमची आम्ही निर्माण केली. काळजी, तळमळ आणि दुःख ही बद्धपणाची लक्षणे होत, तर कोणत्याही परिस्थितीत आनंदाने राहणे हे मुक्तपणाचे लक्षण आहे. जागे होणे म्हणजे मुक्तदशेला येणे आहे. माझे माझ्याजवळच आहे, पण ठाऊक नाहीसे झाले आहे. भगवंताला विसरल्याने 'मी देही' असे म्हणू लागलो आहे. देह तर माझ्या ताब्यात नाही, तेव्हा मी देही नाही हे सिद्ध झाले. आपण कर्तेपण आपल्याकडे घेतो, आणि त्याबरोबर सुखदुःखही आपल्याकडे घेतो. मला सुख नाही आणि दुःखही नाही असे ज्याला वाटेल, तो मुक्त समजावा.
कर्तेपण घातुक असते. मी एवढा मोठा वाडा बांधला, प्रपंच चांगला केला, असा प्रापंचिकाला अभिमान वाटतो, तर संन्यासी मठाचाच अभिमान धरून बसतो ! म्हणजे कर्तेपणाच्या बाधेतून दोघांचीही सहजी सुटका होत नाही. हे कर्तेपण सोडावेसे वाटले तरी ते आपल्याला सुटत नाही, याचा आपल्याला नेहमी अनुभव येतो. भगवंताचे अस्तित्व पटल्यानेच कर्तेपणा कमी होतो. म्हणून, भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे, आणि भगवंत ठेवील त्यात समाधान मानावे. भगवंताच्या स्मरणाशिवाय जिथे आपल्याला सुख होते, तो विषय समजावा. विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळे असणे याचे नाव प्रपंच, आणि परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणे याचेच नाव परमार्थ.
फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो ते कर्म होय; पण फळाची काहीही अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो ते कर्तव्य ठरते. आणि असे कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करीत राहणे हाच परमार्थ. हे करीत असताना भगवंताला दृष्टीआड न होऊ देणे, याचेच नाव अनुसंधान होय. समजा, आपण एखादे चांगले पुस्तक वाचीत बसलो आहोत, इतक्यात आपल्या पायाला एक मुंगी चावली; त्याची जाणीव आपल्याला कशी चटकन होते ! ती जाणीव सर्व शरीरभर व्यापून असते, त्याचप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानाने प्रपंचाला व्यापून ठेवले पाहिजे. प्रपंचातला कोणताही उद्योग करताना अनुसंधान टिकवावे. अनुसंधानाचा अभ्यास करावा. भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते. मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा.

१५३. आपले कर्तव्याला न विसरावे । भगवंताचे अनुसंधान राखावे ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या