६ ऑक्टोबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ६ ऑक्टोंबर २०१४

६ ऑक्टोबर

सच्चिदानंद परमात्म्याला सगुणाच्या आधारानेच पाहता येईल. 

 



परमात्मा सच्चिदानंदस्वरूप आहे हे जरी खरे, तरी ते स्वरूप सगुणाच्या आधाराशिवाय आपल्याला पाहता येणार नाही. आपण भगवंताला सगुणात पाहावे तेव्हाच त्याच्या विभूतीचे आपल्याला आकलन होईल. म्हणूनच समर्थांनी 'निर्गुण ओळखून सगुणात रहावे' असे म्हटले आहे. सत्य हे शांत आणि आनंदमय असले पाहिजे; हेच भगवंताचे मूळ स्वरूप आहे. ही सर्व सृष्टी भगवंतानेच उत्पन्न केली असून, तिच्यामध्ये तो व्यापून राहिला आहे. अर्थात्, सर्व सृष्टी आनंदमय असूनही ती तशी दिसत नाही; हा भ्रम आहे. डोळ्याच्या आतमध्ये पाहण्याची शक्ति नसेल तर बाह्य डोळा असूनही दिसत नाही; परंतु आंतमध्ये शक्ति असली, तरी ती आहे असे बाह्य डोळ्यांशिवाय कळत नाही. त्याचप्रमाणे, सगुण आणि निर्गुण यांचा संबंध आहे. सत्य हे अखंड टिकणारे आहे म्हणून ते शांत आहे; म्हणून सनातन आहे. ते शांत आणि सनातन आहे म्हणून त्याच्याच ठिकाणी समाधान आहे; कारण अशांतामध्ये आनंद असणे शक्य नाही. म्हणून सत्य हे परमात्मस्वरूप होय. परमात्मस्वरूपी सत्य हे व्यावहारिक भाषेत सांगितले पाहिजे. पण व्यावहारिक सत्य मात्र निराळे असते. ही सृष्टी भगवंताने निर्माण केली आहे, म्हणून तिच्यामध्ये सर्व ठिकाणी भगवंताचे अस्तित्व असले पाहिजे. याचा अर्थ असा की, प्रत्येकामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा असा एक गुण आहे. हा गुण म्हणजे जगण्याची हौस होय. सर्वांना शांति मिळावी हाच भगवंताचा हेतू आहे. ही शांति परिस्थितीवर अवलंबून नाही. शांति एकपणात आहे, द्वैतात नाही. एकामध्ये ज्याचे मन गुंतले, ज्याने आपले मन भगवंताकडे ठेवले, त्यालाच शांतीचा लाभ होतो; मग त्याची इतर परिस्थिती कशीही असो. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे खास, आणि त्याकरिता त्याच्या नामाचे अनुसंधान हे एकच साधन आहे.
भगवंताला पहायचे असेल तर आपल्यालाही तसे व्हावे लागते. सत्त्वगुणात भगवंत असतो; तेव्हा आपण त्या मार्गाने जावे. आजारी माणसाला तीन गोष्टी कराव्या लागतात. कुपथ्य टाळणे, पथ्य सांभाळणे, आणि औषध घेणे. त्याचप्रमाणे भवरोग्यालाही तीन गोष्टी कराव्या लागतात. मुख्य ध्येय परमात्पप्राप्ती. त्याच्या आड जे येईल ते कुपथ्य - दुःसंगती, अनाचार, अधर्माचरण, मिथ्या भाषण, द्वेष, मत्सर वगैरे - त्याचा त्याग करावा; परमात्मप्राप्तीला जे सहायक, पोषक सत्संगती, सद्‌विचार, सद्‌ग्रंथवाचन, आणि सदाचार - ते पथ्य; ते सांभाळावे, आणि अखंड नामस्मरण करणे हे औषधसेवन होय.



२८०. आनंदरूप परमात्मा मिळविण्यासाठी सगुणोपासना पाहिजे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

५ ऑक्टोबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ५ ऑक्टोंबर २०१४

५ ऑक्टोबर

अभिमानाची पूर्णाहुती हाच खरा यज्ञ 

 



पाण्याचा रंग कोणता म्हणून विचारले तर काय सांगता येईल ? त्याचप्रमाणे भगवंत आहे. ज्याप्रमाणे पाहाल त्याप्रमाणे तो आपल्याला दिसेल. आपल्यामधल्या विकारांमुळे तो आपल्याला निराळा दिसू लागतो. खरोखर, भगवंताचे खरे स्वरूप जाणणारे विरळाच. ज्याचे विकार कमी, त्याला भगवंताची प्रचीती जास्त. एकच राम चोहोकडे कसा असेल, हे म्हणणे भ्रमाचे आहे. सर्व अवतार एक भगवंताचेच आहेत. नारायण हा लहानपणचा अवतार आहे, कारण तो सर्वांचा आदि आहे. राम हा तरुणपणचा अवतार आणि कृष्ण हा म्हातारपणचा अवतार समजावा. भगवंताला जन्ममरण नाही. तो तर सच्चिदानंद आहे; मग त्याचा जन्म कशाला करायचा असे काही जण विचारतात. एका घरामध्ये बाहेरच्या खोलीत पोरे दंगामस्ती आणि आरडाओरडा करीत होती. आजोबा घरात आहेत हे त्यांना माहीत नव्हते. आपण घरामध्ये आहोत ही जाणीव त्या पोरांना देण्यासाठी, खाकरा आला नसतानादेखील, आजोबा नुसते खाकरले. ते ऐकल्याबरोबर पोरे लगेच गप्प बसली. त्याचप्रमाणे भगवंताला जन्म नसूनसुद्धा 'तो आहे' ही जाणीव होण्यासाठी त्याचा जन्म करायचा असतो. भगवंत आहे ही जाणीव झाल्यानंतर, आपण विषयामध्ये दंगामस्ती करणार नाही आणि तो बेताने भोगू.
मी जोवर साकारावर प्रेम करतो, तोवर भगवंतालाही आकार घेणे प्राप्त आहे. जे वेदांना शक्य झाले नाही, जिथे वेदांनी 'नेति नेति' केले, ते परमात्मस्वरूप संतांनी जाणले; म्हणून भगवंताला सगुणात आणले. हा आनंदस्वरूप परमात्मा मिळविण्यासाठी आज आपल्याला सगुणोपासनेची अत्यंत जरूरी आहे. माणसाला जे अत्यंत हितकारक असते, ते शांत आणि आनंदस्वरूप असले पाहिजे. सत्यस्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय ते मिळत नाही; म्हणून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. विद्वत्ता अभिमान उत्पन्न करते; म्हणून विद्वत्ता आणि भगवंताची निष्ठा एके ठिकाणी सापडणे कठीण आहे. मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ होय. निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्त्विकता उत्पन्न होईल, आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल. अशा प्रकारे 'सर्वस्व' अर्पण करणे, हेच यज्ञाचे खरे सार होय.ज्याने स्वतःला ओळखले, त्याने भगवंताला ओळखले. विकारांच्या अधीन न होण्यामध्ये मनुष्याचे खरे मनुष्यपण आहे. भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय नुसती नीति ही पोरकी असते. ज्यात परमात्म्याचा विसर पडत नाही ती खरी चांगली बुद्धी आणि तो खरा सद्‌व्यवसाय. देवाचे नाम घ्यावे, नीतिधर्माचे आचरण करावे, प्रेमाने वागावे, आणि लोकांना मदत करावी, यालाच परमार्थ म्हणतात; आणि तो प्रत्येकाने मनापासून करावा.


२७९. प्रपंचात जशी आसक्ति असते, तशीच रामचरणी ठेवणे, हीच रामभक्ति होय.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

४ ऑक्टोबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ४ ऑक्टोंबर २०१४

४ ऑक्टोबर

भगवंताच्या संयोग-वियोगातच खरे सुख दुःख आहे. 

 



हल्ली लोकांचे हित करण्यासाठी जो तो झटत असतो, पण आपले स्वतःचे हित साधल्याशिवाय् दुसऱ्याचे हित आपण काय साधणार ? ज्याला स्वतःला सुधारता येत नाही, तो दुसऱ्याला काय सुधारणार ? त्यालासुद्धा अभिमानच आड येतो, कारण त्याला वाटते, 'आपण दुसऱ्याचे हित करून देऊ.' या अभिमानाने तो फुगलेला असतो. अहंकार जाण्यासाठी साधनच करावे लागते, आणि ते साधन गुरू सांगत असतात. म्हणून, त्याच्या आज्ञेप्रमाणे वागले म्हणजे आपले हित होते. ब्रह्म हे काही कुठे शोधायला जावे लागत नाही. ते आपल्या जवळच असते; पण ते दुसऱ्याने आपल्याला दाखवावे लागते. हेच काम सद्‌गुरू करीत असतात. श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म, अवतार घेऊन वसुदेवाच्या पोटी आले. परंतु, वसुदेव त्यांना आपला मुलगाच समजत होते तोपर्यंत, प्रत्यक्ष परमात्मा घरी असूनही ओळख पटली नाही. तेच, नारदांनी जेव्हा सांगितले की, 'श्रीकृष्णाला आपला मुलगा न समजता तो परब्रह्म आहे असे समजा म्हणजे तुमचे हित होईल, ' तेव्हा खरी ओळख पटली. तसेच, राम अवतारी असूनही, वसिष्ठांनी जेव्हा सांगितले की, 'तूच प्रत्यक्ष परब्रह्म आहेस, ' तेव्हाच त्याला ते ज्ञान झाले. आता हे जरी केवळ आपल्याला दाखविण्याकरिता असले, तरी त्याचा अर्थ हा की, गुरूने दाखविल्याशिवाय तो परमात्मा भेटत नाही. गुरू तरी काय सांगतात ? नामस्मरण हेच साधन म्हणून् ते सांगतात. ते दिसायला जितके सोपे तितकेच करायला कठीण असते; ते कठीण आहे म्हणून सोडून देऊ नये. आपण देवाला शरण जाऊन साधन करायला लागावे, म्हणजे ते करायला तो परमात्मा शक्ती देतो.
जगात खरे सुख नाही आणि दुःखही नाही. जगात सुखदुःख आहे असे जे आपल्याला वाटते ते अपुरे आहे; ते तात्पुरते आहे. खरे सुखदुःख भगवंताच्या संयोग-वियोगामध्येच आहे. खरे पाहता आपली बुद्धी लवचिक आहे; आपल्या वृत्तीवर कशाचाही परिणाम होतो. म्हणून आपल्या मागे भगवंताचा आधार हवा. आपण त्याचे आहोत, आणि जे जे होते ते त्याच्या इच्छेने होते, असे समजून वागावे. भूक लागली तर आईजवळ खायला मागावे, पण चोरी करू नये; तसे पोटापुरते भगवंताजवळ मागावे, पण जास्त मागू नये. भगवंत अत्यंत जवळ आहे आणि अत्यंत दूरही आहे. तसाच तो सर्वव्यापी आहे. म्हणून तो आपल्याला दिसत नाही. आपण दरवर्षी भगवंताचा जन्म करतो; याचा अर्थ असा की, मागच्या वर्षी आपण जन्म केला हे विसरलो, म्हणून या वर्षी पुनः त्याचा जन्म करावा लागला ! खरे म्हणजे भगवंताचा वाढदिवस करायला पाहिजे. भगवंत काल होते, आज आहे, आणि उद्या राहणारच; म्हणून त्याचा खरा वाढदिवस होऊ शकतो. भगवंताचे अस्तित्व आपण जागृत ठेवले, तर दरवर्षी जास्त उत्साह वाढेल आणि आनंदाचा वाढदिवस होईल.


२७८. रामनाम जाणा अक्षरे दोन । गुरूमुखे करावी ओळखण ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

३ ऑक्टोबर, २०१४

विजया दशमीच्या शुभेच्छा


श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३ ऑक्टोंबर २०१४

३ ऑक्टोबर

मीपणा ठेवून देवाकडे पाहणार्‍यास त्याची प्राप्ती होत नाही. 

 



देवाला आपण जाणू म्हणून तो जाणला जाईल का? मला ब्रह्म कळले म्हणून शब्दाने सांगितले तर ब्रह्म कळले असे होत नाही. जो ब्रह्म कळले असे म्हणतो, त्याला खरे म्हणजे काहीच कळले नाही असे होते. ते कळून घेऊ म्हणून कळत नाही; ते न कळतच कळते, आणि मग 'मला कळले' ही भावनाच तिथे राहात नाही. मी ब्रह्माला ओळखीन असे म्हणून जो देवाजवळ गेला, त्याला काहीच प्राप्ती होणार नाही. मीपणाने जो देवाला पाहू जातो, त्याला देवाची प्राप्ती होणार नाही. आपला अहंकारच देवाच्या प्राप्तीच्या आड येतो; आणि तो बरोबर घेऊनच जर आपण देवाला शोधू लागलो तर तो कसा सापडेल ? आपल्या आणि देवाच्यामध्ये आपल्या अहंकाराचा पातळ पडदा असतो, आणि तो असल्यामुळे आपल्याला देव दिसत नाही. तो दूर करा म्हणजे देव दिसू लागेल.
व्यापार चांगला चालला नाही म्हणजे मग विचारायला येता की, तुम्ही व्यापार करायला सांगितला पण चांगला चालत नाही! नामस्मरण केल्याने व्यापारात बिघाड येईल का ? तुम्ही म्हणाल की, आमच्या संसारात तुम्ही बिघाड करायला सांगता; परंतु मी बिघाड करायला सांगत नसून, माझ्या सांगण्यावरून तुम्ही नामस्मरण केले तर उलट तो चांगलाच होईल. काळजी न करता संसार करा, रामाला जे करायचे, ते तुम्ही काही केले तरी करायला तो चुकत नाही. मग काळजी करून तरी काय होणार आहे ? जे भोगायचे ते कष्टाने भोगण्यापेक्षा आनंदाने भोगलेले काय वाईट ! जे जे आघात होतील ते त्याचे म्हणून त्याच्याकडे पाठवावेत. आपल्याला त्यांच्याशी कर्तव्य नाही असे समजत जावे. आपल्याला नवस करायचा असेल तर असा करावा की, "मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद दे, म्हणजे मला समाधान राहील. दुसरे काही मागण्याची इच्छाच होऊ देऊ नको." असे मागावे, म्हणजे आपल्याला त्याचे होऊन राहता येईल. मनुष्याची शांती बिघडायला जगामध्ये दोनच कारणे आहेत. एक म्हणजे आपल्याला हवे ते न येणे, आणि दुसरे म्हणजे आपल्याला नको ते येणे. या दोन्हीपैकी आपल्या हातामध्ये एकही नाही; मग आपण दुःख का करावे ? भगवंताच्या नामाची एकदा गोडी लागली ना, की सर्व काही साधते. नाम अभिमानाचा नाश करते. नामाने हवे-नको-पणाची बुद्धी होत नाही, साधुसंतांनी आवर्जून सांगितलेले हेच नाम तुम्ही सतत घेऊन समाधानाचा शाश्वत ठेवा मिळवा.


२७७. भगवंताजवळ असे काही मागा, की पुन्हा दुसरे काही हवेसेच वाटणार नाही.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२ ऑक्टोबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २ ऑक्टोंबर २०१४

२ ऑक्टोबर

सगुणभक्ति 



 



सर्वांभूती भगवंत आहे याची खात्री पटायच्या आधी, तो माझ्यात आहे हे पटले पाहिजे. सोन्याचा दागिना 'मला सोने भेटवा' असे म्हणत नाही; त्याचप्रमाणे, मला भगवंत बाहेरून कुठून भेटायचा आहे असे नाही समजू. तो आपल्याजवळच आहे. मनुष्य बोलतो तसा जर वागला तर त्याला त्याची प्रचीती आल्याशिवाय राहणार नाही. मी 'कुणाचा' आहे हे जसे जाणले तर मी 'कोण' हे कळायला वेळ लागायला नको. सत्समागम केला म्हणजे मी कोण आहे हे कळते. साक्षीरूपाने नटलेला जो 'मी' त्याला पाहायला जंगलात जायला नको. 'माझेपण' सोडावे म्हणजे 'मी' चा बोध होतो. भगवंत चोहोकडे भरलेला आहे असे आपण नुसते तोंडाने म्हणतो, पण त्याप्रमाणे वागत नाही हे आपले मूळ चुकते. भगवंत माझ्यात आहे तसाच तो दुसर्‍यातही आहे, हे आपण सोयीस्करपणे विसरून जातो. जसा खोलीतला दिवा प्रकाशाने सर्व खोली व्यापून टाकतो, तसे हे सर्व जग भगवंताने व्यापून टाकले आहे. मी कर्ता नसून राम कर्ता आहे हे म्हटले म्हणजे त्यात सर्व आले. पोशाख निरनिराळे केले तरी मनुष्य हा एकच असतो. संन्यास हा मनाचा असतो, पोशाखाचा नसतो. मनावर कशाचाच परिणाम होऊ न देणे हाच संन्यास.
सगुणभक्ती करावी, भक्तीने नाम घ्यावे, नामात भगवंत आहे असे जाणावे, आणि भगवंताचे होऊन राहावे, हाच परमार्थाचा सुलभ मार्ग आहे. साधुसंतांनी अतिशय परिश्रम घेऊन आणि स्वतः अनुभव घेऊन हा मार्ग आपल्याला दाखवून दिला आहे. आपले ज्याच्याशी साम्य आहे त्याच्याशी आपली मैत्री जमते. आपण देही असल्यामुळे आज आपला देवही आपल्यासारखाच, पण त्याच्याही पलीकडे असणारा असा पाहिजे. अशा प्रकारचा देव म्हणजे सगुण मूर्ती होय. लहान मुलगा एखाद्या वस्तूसाठी हट्ट करू लागला की, आपण त्याच्यापुढे त्या वस्तूसारख्या इतर, पण बाधक नसणार्‍या वस्तू टाकतो. त्याचप्रमाणे, सगुणपासनेचा परिणाम होतो. दृश्य वस्तूंवर आपले प्रेम आहे; जे दिसते तेच सुखाचे आहे असे आपल्याला आज वाटते; म्हणून आपणच आपल्या कल्पनेने भगवंताला सगुण बनविला आणि त्याची उपासना केली. आपली बुद्धी निश्चयात्मक होण्यात या उपासनेचा शेवट होईल. आग्रह आणि प्रेम फक्त एका भगवंताच्या ध्येयाबद्दल असावे. इतर ध्येये असावीत, पण त्यांचा आग्रह नसावा. प्रपंचामध्ये व्यवहार होत असताना भगवंतापासून जेव्हा वृत्ती हलत नाही, तेव्हा तिला 'सहजसमाधी' असे म्हणतात. सहजपणाने जगणे, म्हणजे सहजपणातून वेगळे न राहणे, हीच सहजसमाधी होय. 'राम सर्व करतो' आणि 'राम माझा दाता आहे' ही भावना ज्याची स्थिर झाली, त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असे समजावे. त्याच्या जन्माचे सार्थक झाले हे सांगणे नकोच.


२७६. नाम घेताना स्वतःचा विसर पडणे ही सर्वोत्कृष्ट समाधी होय. नामात स्वतःला विसरण्यास शिकावे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

१ ऑक्टोबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १ ऑक्टोंबर २०१४

१ ऑक्टोबर

उत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हाच मुख्य भाग आहे. 




उत्सवासाठी तुम्हा सर्वांना बरेच कष्ट् झाले. लग्नामध्ये खऱ्या विवाहविधीला, म्हणजे अंतरपाट धरून सप्तपदी होईपर्यंत, थोडाच वेळ लागतो; पण या संस्काराचे महत्व आणि गांभीर्य मनावर ठसावे म्हणून चार दिवस एवढे सोहळे करतात. त्याचप्रमाणे, उत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हे मुख्य आहे बाकी आनंद आणि उत्साह हे त्याला पोषक म्हणून असावेत. आपला प्रत्येक सण आपल्याला भगवंताची आठवण करून देण्यासाठी आहे. देवदेवतांच्या उत्सवाचा हेतूही भगवंताचे प्रेम वाढीला लागावे हाच आहे. दिवाळीमध्ये फटाके उडवणे, गोड खाणे, फराळ करणे, या सर्व गोष्टी मागचे दुःख विसरण्यासाठी म्हणून आहेत. उत्सव काय, सण काय, धार्मिक कृत्ये काय, तीर्थक्षेत्रे, पूजापठण, इत्यादि सर्वांचे कार्य भगवंताचे प्रेम मिळवणे हेच मुख्यतः आहे. आपल्या हातून घडणारे प्रत्येक कर्म भगवंताच्या कृपेने होते आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे, म्हणजे हवे नकोपण नाहीसे होऊन, त्याच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होईल. देवाचे प्रेम यायला त्याची भीती गेली पाहिजे. आपण भुताखेतांवर आपला विश्वास नाही असे म्हणतो; पण करणी केलेला कुणी माणूस भेटला असताना किंवा पछाडलेला माणूस बघितल्यावर, आपल्याला त्याची भीती उत्पन्न होते. जी भीती आपल्याला भुताखेतांची वाटते तीच देवाबद्दल वाटली तर आपल्याला प्रेम कसे उत्पन्न होणार ? तेव्हा देवाबद्दलची भीती मनातून कढून टाका. देव कधीही कोणाचे वाईट करणार नाही याची खात्री बाळगा. परमेश्वर दयेचा सागर आहे. आपल्या बाळाला दुःख व्हावे असे माउलीला कधी वाटेल का ? आपण तिला मनापासून हाकच मारीत नाही. भगवंताचे नाम मनापासून घेतच नाही; इथेच आपले सर्व चुकते. तेव्हा, गोंदवल्यास आल्यासारखे, रामाजवळ जाऊन आता तुम्ही एकच मागा, 'रामा, तुझे प्रेम आम्हाला दे.' तुम्ही मागाल ते तो तुम्हाला खात्रीने देईल ह्यावर विश्वास ठेवा. तो त्याच्यासाठीच इथे उभा आहे. रामाची भक्ती करण्याने, आपला संसार आपली कल्पनाही होणार नाही इतका सुखाचा होईल. कोणत्याही परिस्थितीत नामाला सोडू नका. भगवंताच्या नामानेच त्याचा सहवास घडेल आणि त्याचे प्रेम उत्पन्न होईल. नाम हे भगवंताला अत्यंत जवळचे आहे. या नामाची तुम्ही संगत धरा, त्याचा सतत सहवास ठेवा, त्याला प्राणापलीकडे जपा; मग हेच नाम तुम्हाला थेट भगवंतापर्यंत पोहोचविल्याशिवाय राहणार नाही. जिथे राम तिथे नाम, आणि नाम तिथे राम. खरोखर तुम्ही नामात दंग होऊन स्वतःला विसरा, मग राम तुमच्यापुढेच उभा आहे.



२७५. दृश्यामध्ये असणारी भगवंताची खूण म्हणजे नाम होय.
नामावर विश्वास बसणे महाभाग्याचे लक्षण आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

३० सप्टेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३० सप्टेंबर २०१४

३० सप्टेंबर

प्रपंचात असावी खबरदारी । मन लावावे रामावरी ॥

 

    

सर्वांचे राखावे समाधान । पण रामाकडे लावावे मन ॥
रामाला स्मरून वागावे जगात आपण । तेथे पश्चातापाला नाही कारण ॥
म्हणून कृतीस असावा साक्षी भगवंत । हा जाणावा खरा परमार्थ ॥
व्यवहार करावा व्यवहारज्ञानाने । परमार्थ करावा गुरूआज्ञेने ॥
कलि अत्यंत माजला । गलबला चोहोकडून झाला ।
चित्त ठेवावे रामावर स्थिर । कार्य घडते बरोबर ॥
स्वस्थ बसावे एके ठिकाणी । राम आणत जावा मनी ॥
प्रयत्‍नांती परमात्मा । ही खूण घालावी चित्ता । व्यवहारी ठेवावी दक्षता ॥
मागील झाले होऊन गेले । पुढील होणार ते होऊ द्यावे भले ।
त्याचा न करावा विचार । आज चित्ती स्मरावा रघुवीर ॥
आंतबट्ट्याचा नाही व्यापार । ज्याने घरी आणला रघुवीर ॥
नुसत्या प्रयत्‍नाने जग सुखी होते । तर दुःखाचे वारे न भरते ॥
म्हणून परमात्मा आणि प्रयत्‍न । यांची घालावी सांगड । म्हणजे मनी न वाटे अवघड ॥
जेथे वाटते हित । तेथे गुंतत असते चित्त ।
चित्त गुंतवावे भगवंतापाशी । देह ठेवावा व्यवहाराशी ॥
चित्ती ठेवावी एक मात । कधी न सुटावा भगवंत ॥
राम माझा धनी । तोच माझा रक्षिता जनी ।
हे आणून चित्ती । विषयाची योग्यतेने करावी संगति ॥

देह करावा रामार्पण । मुखी घ्यावे नामस्मरण ॥
संतांची संगति । रामावर प्रीति । तोच होईल धन्य जगती ॥
व्यवहार सांभाळून । करावा परमार्थ जतन ॥
राम ठेवावा हृदयात । जपून असावे व्यवहारात ॥
रामाचे चिंतन, नामाचे अनुसंधान । वृत्ति भगवत्परायण, साधुसंतास मान ।
आल्या अतिथा अन्नदान, । भगवंताला भिऊन वागणे जाण, ।
याविण परमार्थ नाही जाण ॥ प्रपंचात असावी खबरदारी । मन लावावे रामावरी ।
त्याचा राम होईल दाता । न करावी कशाचीहि चिंता ॥
करवंटीचे कारण । खोबरे राहावे सुखरूप जाण ।
तैसे आपले देहाचे संबंध ठेवून । चित्ती असावा रघुनंदन ॥
परमार्थ करावा जतन । मन करून रामाला अर्पण ॥
प्रपंची असावे सावध । कर्तव्यी असावे दक्ष । तरी न सोडावा रामाचा पक्ष ॥
प्रयत्‍नांती परमेश्वर हे सज्जनांचे बोल । मनी ठसवावे खोल ॥
पण आरंभी स्मरला राम । त्यालाच प्रयत्‍नांती राम ।
हा ठेवावा विश्वास । सुखे साधावे संसारास ॥
कर्तव्यात भगवंताचे स्मरण । हेच समाधान मिळवण्याचे साधन ॥
प्रयत्‍न करावा मनापासून । फळाची अपेक्षा न ठेवून ॥
कर्तव्यात असावे तत्पर । निःस्वार्थबुद्धि त्याचे बरोबर ॥
जोवर देहाची आठवण । तोवर व्यवहार करणे जतन ।
म्हणून प्रयत्‍न करावा कर्तव्य जाणून । यश देणे न देणे भगवंताचे अधीन ॥


२७४. दाता राम हे आणून चित्ती । आपण वर्तावे जगती ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२९ सप्टेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २९ सप्टेंबर २०१४

२९ सप्टेंबर

प्रपंच हे साधन, परमार्थ हे साध्य. 

 



मी प्रपंचासाठी नसून रामाकरता आहे, ही दृढ भावना ठेवावी. 'मी माझ्याकरता जगतो' असे न म्हणता 'रामाकरता जगतो' असे म्हणू या, मग रामाचेच गुण अंगी येतील. आपण प्रपंचाकरता जगतो, म्हणून प्रपंचाचे गुण अंगी येतात. म्हणून भगवंताकरता जगावे. प्रपंच हे साधन आहे, परमार्थ हे साध्य आहे. प्रपंच कुणाला सुटला आहे ? पण साधू त्याचा सदुपयोग करतात; आम्ही तसा करीत नाही, म्हणून परमार्थ साधत नाही. जगात तीन गोष्टी दुर्मिळ आहेत: मनुष्यजन्म, संतसमागम, आणि मुमुक्षत्व. मनुष्यजन्म हा परमार्थाकरताच आहे, विषयभोगासाठी नव्हे. परमार्थाची तळमळ लागली पाहीजे. तळमळ उत्पन्न झाल्यावर, मन शुद्ध झाल्यावर, राम भेटेलच. समई लावली पण तेल बरोबर् न घातले तर ती विझेल. स्मरणरूपी तेल वारंवार घालावे, मग परमार्थ-दिवा कायम राहील. परमार्थ हा मुख्यतः अनुभवाचा आहे. पंढरपूरला जायचे असेल तर वाट चालू लागले पाहिजे. मग वाटेत कुणीतरी वाट दाखवणारा भेटतोच; निदान पाट्या तरी आढळतात. आम्ही परमार्थमार्गावर प्रत्यक्ष चालूच लागत नाही, मग वाटाड्या कसा भेटणार् ? परमार्थमार्गावर गुरू खास भेटेलच. म्हणूनच रामाचे अखंड स्मरण ठेवून परमार्थाला लागू या.
आचार आणि विचार यांची सांगड असावी. पोथीत जे ऐकतो ते थोडेतरी कृतीत येणे जरूर आहे. पोथी वाचल्यानंतर, जेवढे कळले तेवढे तरी आचरणात आणायला काय हरकत आहे ? जे कळणार नाही तेही पुढे हळूहळू कळेल. घरातून बाहेर पडल्यावर एकदम मुक्कामाचे ठिकाण दिसत नाही. प्रथम एक रस्ता, मग दुसरा, मग तिसरा, असे करता करता आपण मुक्कामाला पोहोचतो. त्याप्रमाणे, पोथीतले सगळे कळले नाही, तरी जे कळले तेवढे तरी कृतीत आणू या. दृढ निश्चयाने एकएक मार्ग आक्रमीत गेलो तर मुक्कामाला खास पोहोचू. म्हणुन भगवत्स्मरणाला जपले पाहिजे. त्याला प्राणापेक्षाही जास्त समजून सांभाळावे. संत, सद्‍गुरू आणि शास्त्र यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवावा. तेथे बुद्धिभेद होऊ देऊ नये. याप्रमाणे वागले तर प्रपंच परमार्थरूपच होईल. मी रामाचा म्हणणे हाच परमार्थ, अहंबुद्धी ठेवणे हा प्रपंच. परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला; उलट्, प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच. संसाररूपी वृक्षाला अभिमानाचे पाणी आम्ही वारंवार घालतो म्हणून तो इतका फोफावला. हा मूळ अभिमानच नष्ट केला पाहिजे. खरा कर्ता ईश्वर असताना, जीव विनाकारणच 'मी कर्ता' असे मानतो. झाडाचे पान रामावाचून हलत नाही. देहाचा योगक्षेम तोच चालवितो. मी कर्ता नसून राम कर्ता ही भावना वाढविणे हीच खरी उपासना.


२७३. कर्तृत्व न घेईल तर जीव सुखदुःख भोगणार नाही.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२८ सप्टेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २८ सप्टेंबर २०१४

२८ सप्टेंबर

अनुसंधानात राहिल्यावर अभिमान गळून जातो. 

 



अभिमान सोडून जो गृहस्थाश्रम पाळील तोच खरा परमार्थी. अभिमान सोडल्याने गृहस्थाश्रम चांगला होतो. 'मी म्हणेन तसे होईल,' असे कधीही म्हणू नये. अभिमानाच्या पायावर उभारलेली इमारत डळमळीत होणारच. अभिमान हा देहाचा आणि तत्संबंधी विषयांचा असतो. अभिमानाचे मूळच काढून टाकावे; म्हणजे, मी देहाचा आहे म्हणतो, हेच काढून टाकावे. हा देह माझा नाही हे आपल्याला पटते, पण अखंड सहवासाने आपले त्यावर प्रेम जडते. एकदा देहावर प्रेम जडले मग अभिमान आला. त्याच्या पाठोपाठ लोभ, क्रोध येणारच. अभिमान म्हणजे 'मी कर्ता' ही भावना असणे. ही भावना टाकून काम केले, तर् व्यवहारात कुठे नडते ? आपल्या देहाचा आणि मनाचा फार निकटचा संबंध आहे. पण देह केव्हातरी जाणार असल्याने त्याला इतके महत्व नाही. नुसता जाडजुड देह कामाचा नाही. आपले मन तयार झाले पाहिजे. 'मी भगवंताचा आहे' हे एकदा मनाने जाणून घेतले, म्हणजे मग अभिमानरहित होता येते. नेहमी भगवद्‌भजनात राहण्याचा प्रयत्‍न करा, म्हणजे अभिमान शिवणार नाही. डोळ्यात पाणी आणून भगवंताला आळवावे, त्याला शरण जावे; भगवंत कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आपण आपल्या मर्यादा ओळखून वागावे. अमुक एक गोष्ट अमक्या तर्‍हेने घडावी असे जोपर्यंत आपल्याला वाटते आहे, तोपर्यंत व्यवहाराच्या मार्गाने जो योग्य प्रयत्‍न आहे तो आपण केला पाहिजे. पण प्रयत्‍न केल्यावर मात्र त्याचे फळ भगवंतावर सोपवावे, आणि जे काही घडेल त्यामध्ये समाधान मानावे.
आपले अंतःकरण नेहमी शुद्ध ठेवावे. रात्री निजण्यासाठी अंथरूणावर पडले असताना आपले अंतरंग शोधून पाहावे की, 'मी कुणाचा द्वेष-मत्सर करतो का ?' तसे असेल, तर ते मनातून जबरीने काढून टाकावे; ते थोडे जरी शिल्लक राहिले, तरी आपल्या परमार्थाच्या आड येणार आहे; आपल्या मनाने आपल्याला निश्च्ययाने असे सांगितले पाहिजे की, 'मी कुणाचाही द्वेष करीत नाही.' आपले अंतःकरण इतके शुद्ध आणि सरळ असावे की, आपण तर कुणाचा द्वेष-मत्सर करू नयेच नये, परंतु दुसरा कुणी आपला द्वेष करीत असेल ही कल्पनासुद्धा आपल्याला येता कामा नये. 'मी भगवंताचा आहे, या देहाचा नाही,' असे अखंड अनुसंधान् ठेवून, आपल्याला भगवत्स्वरूप का होता येणार नाही ? जो आतबाहेर भगवंताने भरून राहील किंवा त्या ज्ञानाने भरून राहील तोच खरा ज्ञानी होय' आणि जाणीव ज्याप्रमाणे देहाला व्यापून असते, त्याप्रमाणे भगवंताचे स्मरण ज्याचे मन व्यापून टाकील तोच खरा साधक, तोच खरा अनुसंधानी, आणि तोच खरा मुक्त समजावा.


२७२. विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२७ सप्टेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २७ सप्टेंबर २०१४

२७ सप्टेंबर

स्मरण ही कृती आहे. 

 



गुरूने सर्व करावे ही गोष्ट सत्य आहे, आणि तो करतो ही ही गोष्ट तितकीच सत्य आहे. पण आपण खरोखर सच्छिष्य आहोत की नाही हे पाहावे. देहातीत व्हायला, गुरूआज्ञेप्रमाणे वागणे यापरते दुसरे काय आहे ? 'मी देही नाही' असे म्हणत राहिलो तर केव्हातरी देहातीत होईन. दुसरा मार्ग म्हणजे 'भगवंत माझा' म्हणावे, म्हणजे देहाचा विसर पडतो. समर्थांचे नाव घेऊन सांगतो की आपला नीतिधर्म सांभाळा, आणि कोणताही प्रसंग आला तरी नामाला विसरू नका. 'मी जे जे करतो ते ते भगवंताकरिता करतो' असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय. कर्तेपण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते. भक्ताचे लक्षण म्हणजे भगवंतप्राप्तीशिवाय दुसरे काही नको असे वाटणे. भगवंतापासून आपल्याला जे दूर सारते ते खरे संकट होय. तोच काळ सुखात जातो की जो भगवत्स्मरणात जातो. खरोखर, स्मरण ही कृती आहे आणि विस्मरण ही वृत्ती आहे. भगवंताचे स्मरण करणे म्हणजे हवन करणे होय, आणि अभिमान नष्ट करणे म्हणजे पूर्णाहुती देणेच होय्. वृत्ती भगवंताकार झाली पाहिजे. आपल्याला ज्याची आवड असते त्याचे स्मरण आपोआप राहते. विषय अंगभूत झाले असल्याने त्यांचे स्मरण सहज राहते; पण भगवंताचे स्मरण आपण मुद्दाम करायला पाहिजे. हे करणे अगदीच सोपे नाही; परंतु ते फार कठीण देखील नाही. ते मनुष्याला करता येण्यासारखे आहे.
भगवंताची भक्ती ही सहजसाध्य आहे. ती अनुसंधानाने साध्य होते. अनुसंधान समजून केले पाहिजे; तिथे अनुभव लवकर येईल. पहार्‍यावर शिपाई जसा जागृत राहतो, त्याप्रमाणे अनुसंधान जागृत् ठेवले तर विषयांच्या संकल्पाचे पाय मोडतील. चोर चोरी करायला केव्हा येईल हे ओळखून, अनुसंधान चुकू देऊ नये. ताप आला की तोंड कडू होते, मग जिभेवर साखर जरी चोळली तरी तोंड गोड होत नाही. त्यासाठी अंगातला ताप गेला पाहिजे. त्याप्रमाणे, वरवर क्रिया करून दुःख नाहीसे होणार नाही. त्यासाठी अनुसंधानच पाहिजे. एक मुलगा परीक्षेसाठी मुंबईला आला. परीक्षा होईपर्यंत तो अडकून होता. परीक्षा संपली तेव्हा तो म्हणाला, 'आता मी मोकळा झालो बाबा !' नंतर चार दिवस तो मजेत मुंबईत हिंडला. त्याप्रमाणे, आपण अनुसंधान ठेवून प्रपंचाच्या आसक्तीतून मोकळे व्हावे, आणि मग मजेने संसार करावा; आपल्याला अगदी आनंदच मिळेल. उंबरठ्यावर दिवा ठेवला असताना ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला उजेड पडतो, त्याप्रमाणे भगवंताचे अनुसंधान हा उंबरठ्यावरचा दिवा आहे; त्याने परमार्थ आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल. प्रपंचामध्ये वागताना मनाने थोडे लक्ष द्यावे लागते, याला भगवंताचे अधिष्ठान असणे म्हणजेच अनुसंधान ठेवणे म्हणतात.


२७१. भगवंताच्या इच्छेने अकर्तेपणाने कर्म करणे, हेच अनुसंधान ठेवणे किंवा भक्ती करणे होय.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२६ सप्टेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २६ सप्टेंबर २०१४

२६ सप्टेंबर

भगवंताला विसरणे ही आत्महत्याच. 

 



एकदा एका माणसाने पक्वान्ने कशी तयार करावी हे शिकविण्याची शाळा काढली. त्या शाळेमध्ये तो मनुष्य शब्दांच्या साहाय्याने, निरनिराळी पक्वान्ने कशी तयार करायची, हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगे. पण त्या विद्यार्थ्यांना घरी भाकरी करून खाण्यापुरते पीठ देखील मिळत नसे; त्यांना त्या पक्वान्नांच्या ज्ञानाचा काय उपयोग होईल बरे ? त्याचप्रमाणे वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वान्नांच्या ज्ञानासारखे आहे. जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो, त्याला त्यापासून तसा काही फायदा होत नाही. जे ज्ञान व्यवहाराला लागू पडत नाही, ते ज्ञान खरे असले तरी आपल्याला उपयोगाचे नाही.
आपल्यात आणि संतांमध्ये फरक हाच की, आपण जगतासाठी देव मानतो, तर् संत देवासाठी जगत मानतात. खरे म्हणजे, जी गोष्ट आचरायला अतिसुलभ असते, ती समजावून सांगायला फार कठीण असते; ती खरी अनुभवानेच जाणायची असते. ज्याचा अनुभव दुसर्‍यावर अवलंबून आहे तो अपूर्ण समजावा; म्हणजेच, जेव्हा मिश्रणाने पदार्थाला चव येते तेव्हा ते दोन्ही पदार्थ अपूर्णच समजावेत. या जगात सर्व दॄष्टीने पूर्ण असा एक भगवंतच आहे; त्याला विसरणे ही आत्महत्याच आहे. तेव्हा नेहमी त्याच्या सान्निध्यात, म्हणजेच त्याच्या नामात, राहाण्याचा प्रयत्न करावा. सर्व कीर्तनांचे सार हेच असते. फक्त मांडणी निराळी.
रामरायांनी सर्व वानरांना सीतामाईचा शोध करायला सांगितले. जो तो 'हूं, हूं' करून शोधासाठी निघून गेला. परंतु मारूती अती बुद्धीमान्; त्याने 'सीतेला कसे ओळखायचे' म्हणून विचारले. त्यावर श्रीरामांनी तिचे पुष्कळ वर्णन केले. ती सुंदर आहे म्हणून सांगितले. परंतु स्त्री कशी दिसते हेच त्याला माहिती नाही ! तेव्हा श्रीरामप्रभू त्याला म्हणाले, "तुला मी काय सांगतो हे कळलेले दिसत नाही; तू आता एकच गोष्ट लक्षात ठेव, जिथे तुला रामनामाचा सारखा ध्वनी ऐकू येईल तिथे ती आहे म्हणून समज." तेव्हा ती खूण मारुतिरायाला पटली. ज्याला भगवंताच्या नामाची खूण मनापासून समजली त्याच्या जन्माचे सार्थक झाले, त्याचा परमार्थ सफल झाला, आणि त्याला जगात मिळवायचे बाकी असे काही राहिलेच नाही. मारुतिरायाची भक्ती फार मोठी. श्रीरामाला वाटले, याला आता काहीतरी 'चिरंजीव' असे दिल्याशिवाय याचे समाधान होणार नाही; म्हणून चिरंजीव असे हे आपले नाम त्याला त्याने दिले. त्यामुळे त्या नामाबरोबर मारुतीही चिरंजीव झाला.

२७०. सर्व संतांचे सांगणे आहे की, मनापासून भगवंताचे नाम घ्या आणि आपले कर्तव्यकर्म करा.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२५ सप्टेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २५ सप्टेंबर २०१४

२५ सप्टेंबर

अखंड अनुसंधान ठेवण्याकरिता काय करावे ? 

 



भगवंताने आपल्याला बुद्धी दिली आणि ती चालवून आपण काम करतो, म्हणजे भगवंतच आपल्याकडून सर्व कर्मे घडवीत असतो. त्याच्या प्रेरणेनेच सर्व घडते आहे, अशी भावना प्रत्येक कर्मात ठेवली, म्हणजे भगवंतावर प्रेम जडते. जे जे काही करायचे ते भगवंताकरिता करावे; म्हणजे पापपुण्याची बाधा आपल्याला होणार नाही. एकदा कबीराच्या घरी पाहुणे आले. घरात तर त्यांना जेवू घालायला काही नव्हते. आणि अतिथीला भगवत्स्वरूप पाहावे असे शास्त्र आहे, तेव्हा कबीराने त्यांना पुरेल इतक्याच धान्याची चोरी केली. चोरी करणे हे वाईट असले, तरी ती भगवंताकरिता केल्यामुळे तिचे पाप त्याला नाही लागले. निदान, कर्म झाल्यावर तरी भगवंताचे स्मरण करून ते त्याला अर्पण करावे, म्हणजे हळूहळू अभिमान कमी होऊन भगवंतावर प्रेम जडेल.
आपण भगवंताचे आहोत, जगाचे नाही, असा एकदा दृढ निश्चय करावा. आपण मनुष्य आहोत याची जाणीव जितकी दृढ असते तितका हा निश्चय दृढ असावा. तथापि हे साधणे कठीण आहे. त्याच्या खालोखालचा उपाय म्हणजे, जे काही घडते आहे ते भगवत्प्रेरणेने, त्याच्या सत्तेने आणि इच्छेने घडते आहे, अशी अंतःकरणपूर्वक भावना ठेवावी. आणि हेही साधत नसेल, तर वैखरीने अखंड नामस्मरण करावे. या अनुसंधानाच्या प्रक्रियेत मन भगवंताच्या ठिकाणी चिकटून असते. सध्या आपले उलट चालले आहे; आपण देहाने पूजा करतो, यात्राबित्रा करतो, पण मन मात्र प्रपंचाकडे ठेवतो. सासरी असलेली सून कुटुंबातल्या सर्वांकरिता कष्ट करते; नवर्‍याचे कदाचित् ती फारसे करीतही नसेल, पण अंतःकरणात मात्र ती फक्त त्याच्यासाठीच असते. तसे, प्रपंचात सर्वांकरिता सर्व करावे, पण मनात मात्र 'मी रामाचा आहे' ही अखंड आठवण ठेवावी. आपले स्टेशन ठरून आपण गाडीत बसल्यावर मध्ये अनेक गोष्टी घडतील; उभे राहावे लागेल, निरनिराळ्या तर्‍हेचे लोक भेटतील. पण स्टेशनावर उतरल्यानंतर त्या आनंदामध्ये मागचे सगळे आपण विसरून जातो. तसे भगवंताचे ध्येय निश्चित करावे. भगवन्नाम हे भगवत्कृपेसाठी घ्यावे, कामनापूर्तीसाठी नसावे; नामच ध्येय गाठून देईल. भगवंताप्रमाणे आपणदेखील, प्रपंचात असून बाहेर राहावे; आपल्या देहाकडे साक्षित्वाने पाहायला शिकावे. पण ते साधत नसेल, तर व्यापात राहून अनुसंधानात असावे. वाचलेले विसरेल, पाहिलेले विसरेल, कृती केलेली विसरेल, पण् अंतःकरणात घट्ट धरलेले भगवंताचे अनुसंधान कधी विसरायचे नाही.


२६९. कलियुगात अवतार नसला तरी 'नामावतार' आहे, आणि तोच खरा तारक आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२४ सप्टेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २४ सप्टेंबर २०१४

२४ सप्टेंबर

कुटुंबात कसे वागावे ? 

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन

 



देहात आल्यावर, आपले ज्याच्याशी जे कर्तव्य आहे ते बरोबर करावे. घरात अत्यंत समाधान असावे. मुलांनी वडील माणसांचे दोष पाहू नयेत. बाप जसा सच्छील आहे तसे मुलांनी व्हावे., म्हणजे कुळाची कीर्ति वाढते. मोठ्या माणसाने, पेन्शन घेतल्यावर मनाने भगवंताचे नोकर होऊन राहावे. बाईनेही पतीपरते दैवत न मानावे. सर्वांनी भगवंताच्या नामात राहावे. जो मनुष्य तरूणपणी स्वाभाविक रीतीने वागेल त्याला म्हातारपणीही स्वाभाविक रीतीने वागता येईल; म्हणजेच म्हातारपण त्याला मुळीच दुःखदायक होणार नाही. आपण अस्वाभाविक रीतीने, म्हणजेच आसक्तीने वागत असल्यामुळे, म्हातारपणी कर्तेपण कमी होते आणि आसक्ती मात्र टिकते; आणि ती तापदायक बनते. ज्या माणसाची आसक्ती किंवा आग्रह म्हातारपणी सुटलेला असतो, त्याचा देह जरी अशक्त झाला तरी तो सर्वांना हवासा वाटेल. अशक्तपणामुळे त्याला ऐकायला कमी येईल, त्याला दिसायला कमी लागेल, त्याला मागच्या गोष्टींची आठवण राहणार नाही, त्याची झोप कमी होईल; पण हे सर्व होऊनही त्याचा कोणी कंटाळा करणार नाही, आणि त्याला स्वतःलाही जीवनाचा कंटाळा येणार नाही. म्हातारपणी आपण कसे मीपणाने वितळून जावे ! पण मी सांगतो ना !, ही कर्तेपणाची वृत्ती नाहीशी करावी, म्हणजे मग दुःख नाहीच नाही.
प्रपंचात वागत असता प्रत्येकाने अंतर्मुख होऊन, आपले दोष काय आहेत ते हुडकून काढावेत आणि ते घालविण्याचा प्रयत्‍न करावा. वयाची सोळा ते पंचवीस वर्षे हा काल असा असतो की मनुष्याची बुद्धी वाढीला लागलेली असते. ती वाढ योग्य मार्गाने व्हायला बंधनाची अत्यंत आवश्यकता असते. बंधनात उत्तम बंधन म्हणजे आईबाप सांगतील त्याप्रमाणे वागणे हे होय; कारण आपले हित व्हावे यापलीकडे त्यांचा दुसरा हेतू नसतो. जगामध्ये प्रत्येक गोष्ट आपण स्वतःच्या अनुभवाने शिकणे कसे शक्य आहे ? म्हणून आईबापांच्या अनुभवाचा फायदा आपण करून घ्यावा. आपले आईबाप एखादे वेळी चुकणार नाहीत असे नाही, कारण चुकणे हा मनुष्याचा धर्मच आहे; परंतु आपल्याविषयी त्यांची जी हितबुद्धी असते, तिच्यामुळे त्यांची चूक आपले कायमचे नुकसान करणार नाही. कोणता काल कुणाच्या भाग्याने येतो हे सांगता येत नाही. म्हणून आपण कधी कष्टी होऊ नये. सत्कर्म जेवढे मोठे तेवढी विघ्ने अधिक; भगवंताचे अनुसंधान हे सर्वात मोठे सत्कर्म आहे. आपण निश्चयाने आणि निःशंकपणे त्याचे नाव घेऊ या आणि आनंदात राहू या.


२६८. आपले अवगुण शोधावेत व त्यांचा त्याग करून गुण घ्यावेत.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२३ सप्टेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २३ सप्टेंबर २०१४

२३ सप्टेंबर

शास्त्रवचन, थोरवचन आणि आत्मसंशोधन. 

 



एकदा उद्धवाने श्रीकृष्णाला विचारले की, "तू आपल्या मुखानेच सांग की आम्हाला तुझी प्राप्ती कशी होईल." तेव्हा परमात्मा म्हणाला, "भक्ती केल्यानेच माझी प्राप्ती होऊ शकते." भक्तीची तीन साधने आहेत - शास्त्रवचन, थोरवचन आणि आत्मसंशोधन. आपले सध्या सगळे विपरीत झाले आहे. शास्त्रवचन म्हणावे, तर आपण आता इतके सुधारक झालो आहोत की, हल्लीच्या ज्ञानाने आपल्याला पुराणावर विश्वास ठेवण्याची लाज वाटते, 'मी या गावंढळ बापाचे कसे ऐकू ? यापासून माझा काय फायदा होणार?' तसेच आत्मसंशोधनाचे. आपण शोधन करतो ते कसले, तर पांडव कुठे राहात होते ? रामाचा जन्म कोणत्या गावी झाला ? कौरव-पांडवांचे युद्ध कोणत्या ठिकाणी झाले ? मला सांगा, अशा संशोधनापासून आपला कसा फायदा होणार ? एक प्राध्यापक मला म्हणाले, "मी कृष्णाबद्दलचे पुष्कळ संशोधन केले आहे आणि कृष्णाचे जन्मस्थळ कोणते, निर्याणस्थळ कोणते, याची आता खात्री झाली." मी म्हणतो की, ते करतात ते ठिक आहे. पण संतांना कृष्णप्राप्तीसाठी, कृष्णजन्म कुठे झाला या प्रश्नाच्या खात्रीची जरूरी वाटली नाही; त्यांनी दृढ उपासना करून कृष्णाला आपलेसे केले. खरे म्हणाल तर कृष्णाचा जन्म उपासनेने हृदयातच झाला पाहिजे आणि तेच खरे जन्मस्थान आहे.
आपण जर आपले वर्तन पाहिले, मनातले विचार बघितले, तर आपल्याला असे आढळून येईल की, लोकांना जर ते कळले तर लोक आपल्याकडे ढुंकूनही पाहणार नाहीत; आणि असे असूनही आपण आपल्या संशोधनाचा आणि विचारांचा अभिमान बाळगतो, याला काय म्हणावे ? अशाने का आपल्याला भगवंताचे प्रेम लाभणार ? आपला परमार्थ कसा चालला आहे हे दुसर्‍या कुणी सांगण्याची गरजच नाही. आपल्याला तो पुरता ठाऊक असतो. अभिमान खोल गेलेला, विचारांवर ताबा नाही, साधनात आळशीपणा; मग अशा परिस्थितीत आपल्याला परमात्म्याचे प्रेम कसे लाभणार ? साधुसंतांनी यावर एकच उपाय सांगितला आहे, आणि तो म्हणजे पूर्ण शरणागती. रामाला अगदी विनवणी करून सांगा की, 'रामा, आता मी तुझा झालो; ह्यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन, आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्‍न करीन; तू मला आपला म्हण.' देव खरोखरच किती दयाळू आहे ! लोकांचे शेकडो अपराध पोटात घालूनही, शरण आलेल्याला मदत करायला तो सदैव सिद्धच असतो.


२६७. नाम घेण्यात एकतानता करावी आणि स्वतःला पूर्ण विसरून जावे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या