२३ जानेवारी, २०२४

प्राण प्रतिष्ठापना आणि सिझेरियन

प्राण प्रतिष्ठापना आणी सिझेरियन काल २२ जानेवारीला प्रभू श्रीरामचंद्रांची अयोध्येत नवीन मंदिरात प्राण- प्रतिष्ठापना झाली. संपूर्ण भारतखंडात दिपावली साजरी झाली. या नेत्रदीपक सोहळ्याच्या निमित्याने देशातील काना-कोपर्यात साजरा झालेल्या उत्सवाच्या बातम्या बघताना एका बातमीने लक्ष वेधले आणि हसू आवरले नाही. ज्या स्त्रियांची डिलेव्हरी जवळ आली होती अशा अनेकांनी ( जोडप्यांनी) २२ तारखेला सिझेरियन करून बाळाला जन्म द्यायची इच्छा व्यक्त केली होती.
हे एकून काहीशी अशी प्रतिक्रिया आपसूक आली. 🤦🏻‍♂️ २२ जानेवारीचा काढिव मुहूर्त हा प्रभू श्रीरामांच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा होता. आपल्या पोटी श्रीरामा सारखे बाळ जन्माला यावे ही इच्छा होणे साहजिक आहे. पण नियतिची ही काही योजना असते. त्यात ढवळाढवळ करणे योग्य नाही. नैसर्गिक प्रसूती किंवा डाँक्टरांनी २२ तारखेला सिझरींग करु असे सांगितले असेल ( ही पण नियतीचीच योजना) तर गोष्ट वेगळी. पण तसे काही नसताना भावनेपोटी सिझेरियन करायचा निर्णय घेतलेल्या जोडप्यांना शुभेच्छा आणि सर्व नवजात बालकांना प्रेमळ आशीर्वाद 💐 ज्योतिष अभ्यासकांसाठी:- २२ जाने २०२४ ,दुपारी १२:३२ ची मेष लग्नाची पत्रिका. राशीस्वामी शुक्र जो द्वितीयेश आणि सप्तमेश ( मारकेश) आहे तो धनू ( शत्रू राशीत) मुळ नक्षत्रात आहे. चंद्रापासून आठवा आहे. आज पासून २५ -३० वर्षांनी या बालकांच्या विवाहासंबंधीचे प्रश्ण येणार आहेत. तुमच्याकडे ही अशी एखादी पत्रिका येईलच. त्यावेळी या ग्रहस्थितीचा सप्तम स्थानाच्या दृष्टीने अवश्य विचार करावा षष्ठेश - अष्टमेश युतीत भाग्य स्थानी इतर ग्रहयोग चंद्र-शुक्र प्रतियोग, चंद्र - नेपच्यून केंद्र योग अर्थात लग्न बदलले, भाव बदलले की परिणाम बदलतील. काही चांगले योग पत्रिकेत, नवमांश कुंडलीत आहेत. आपणासही काही विशेष योग आढळल्यास अवश्य सांगा श्रीराम 🙏 ( ज्योतिष अभ्यासक) अमोल केळकर 📝 पौष. शु. त्रयोदशी २३/०१/२०२४

७ जानेवारी, २०२४

पंचक

पंचक निमित्याने :- 🖐🏼

ज्योतिष शास्त्रातील एक  संकल्पना ( प्रचलित नियम)  घेऊन  विनोदी ढंगाने मराठी सिनेमाची निर्मिती केलीत याबद्दल सर्वप्रथम श्री व सौ माधुरी  नेने  यांचे अभिनंदन 💐💐
 
पंचकात विशाखा नक्षत्र नसते  पण काल  रात्री आम्हाला विशाखा या त्रिपाद नक्षत्रावरच पंचक लागले.
पंचक लागले खरे पण  "पंचक भावले" असे मात्र म्हणणार नाही


कोकणातील एका गावात खोतांच्या एकत्र कुटुंबात घडलेली गोष्ट. 
कोकणातील  डुक्करला मांजर आडवे गेल्यानंतर ही डुक्कर ( आपल्या भाषेत टमटम)  मागे घेऊ न देता पुढे दमटवणा-या  नायकाच्या वडीलांचे तो घरी पोहोचण्या आधी निधन झालेले असते. नायक आणि त्याचे वडील नास्तिक. सहा महिन्यापूर्वीच वडिलांनी ' देहदानाचा ' संकल्प केलेला आहे . त्यात  जोशी बुवा येऊन 'पंचक ' लागले आहे असे डिक्लेअर करतात आणि खोत कुटुंब दुहेरी संकटात सापडते.

तेथून पुढे श्रध्दा/ अंधश्रध्दा , आस्तिक /नास्तिक याचा झालेला गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. पण तो गुंता व्यवस्थित सुटला असे वाटत नाही.  शेवटपर्यंत विषय तसाच अधांतरीच राहिला आहे असे वाटत राहिले

कलाकारांमधे विद्याधर जोशींनी साकारलेले गुरुजींचे पात्र जाम आवडले. 
पंचक शांती वेळचे त्यांच्यावर चित्रीत झालेले इंग्रजी गाण्यावरचे विडंबन तर अफलातून क्रिएटिविटी. 
प्रासंगिक विनोद,  इतर कलाकारांच्या भूमिका ठिकठाक.  

'माधुरी दिक्षीतचा एक ही सिनेमा आम्ही सोडलेला नाही!'  हे ती नायिका असताना ठिक होते,  इथे ती ( माधुरी नेने ) फक्त निर्माती आहे 😬 
 तेंव्हा दोन तास खर्च करुन थेटरात जाऊन सिनेमा पहावा एवढा काही खास नाही , टीव्हीवर लागेलच. 
 ( त्यापेक्षा २ तास वेळ काढून उत्तम ज्योतिषाने कडे जाऊन आपली पत्रिका काढा किंवा काढलेली दाखवा 😷) 

 या शास्त्रातील  अभ्यासकांकडून, या विषयाची आवड असणा-यांकडून किंवा या विषयी जुजबी / ऐकीव माहिती असल्याने घरातील कुणी गेल्यानंतर तातडीने 'पंचक' लागलंय का? अशी विचारणा करणा-यांकडून भावना दुखावली जाणे, निषेध वगैरेंची शक्यता असताना  कुठेही शास्त्राची खिल्ली उडवली जाणार नाही याची मात्र काळजी घेतली आहे
संवेदनशील विषयात आजकाल कधी, केंव्हा ,कशा, कुणाच्या भावना दुखावल्या जातील याचा नेम राहिलेला नाही.  

नेंने दांपत्यांच्या निर्मीतीच्या या पहिल्याच प्रयत्नाला कितपत यश येईल हे सांगणे अवघड आहे. ही सुरवात आहे, पुढे एखादा आणखी  उत्तम मुहूर्त पाहून नवीन निर्मितीसाठी सुरुवात करा हे त्यांना सांगणे.  काय सांगा मराठी/ हिंदी सिनेमा निर्मितीचे 'पंचक' तुमच्या नशिबात लिहिलेले असेल.
त्यासाठी शुभेच्छा 💐💐 

पुढील काही निर्मितीसाठी  काही उपयुक्त विषय / नाव सुचवून ठेवतो.

१) ' बेटा मंगळवाला'
२) '  तेजाब भरी पनौती '
३) '  साजन एक प्रीती षडाष्टक '
४) ' दशा' तो 'पागल' है
५)  'कर्क तेरा गुरु दिवाना'
६)  'राहू खरा-नायक'

( ज्योतिष अभ्यासक)  अमोल 

#पंचक
#माझी_टवाळखोरी 📝
मार्गशीर्ष कृ एकादशी 
०७/०१/२०२४
-------------------------------------------
इतरांसाठी  महत्चाची गोष्ट : धनिष्ठा नक्षत्र चरण ३ व ४, शततारका,पू. भाद्रपदा ,उ.भाद्रपदा आणि रेवती या नक्षत्रावर कुणी गेले तर पंचक लागते आणि याची शांती वगैरे जी शास्त्रात सांगितली आहे ती करणे आवश्यकच असे एक अभ्यासक म्हणून आवर्जून नमूद करु इच्छितो. 

३० डिसेंबर, २०२३

अयोध्या मनुनिर्मित नगरी 📝





प्रभू श्रीरामाचे मंदिर आणि मूर्ती प्रतिष्ठापना  यासाठी अजून  काही दिवस लागणार असले त  सध्या  सर्वत्र वातावरण  ' श्रीराम' मय  झाले आहे. अशा वेळी किमान समस्त  मराठीजनांनी गदिमा आणि बाबूजी याचे स्मरण न करणे हे कृतघ्न पणाचे ठरेल.
आज जी अयोध्या नागरी सजलेली आहे / सजणार आहे , तो  भव्यदिव्य सोहळा आपण  पाहणार आहोतच .  पण  यापूर्वीच  या  दोघांनी शब्द आणि  संगीत या माध्यमातून  काही  वर्षांपूर्वीच  अयोध्येचे वर्णन  करून ठेवलंय. आजची सत्यातली अयोध्या आपण अनेक वेळा गीतरामायणातून अनुभवली आहे.


त्या नगरीच्या विशालतेवर 
उभ्या राहिल्या वास्तू सुंदर 
मधुन वाहती मार्ग समांतर 
रथ ,वाजी ,गज पथिक चालती, नटुनी त्यांच्यावरी
अयोध्या  मनुनिर्मित नगरी 

घराघरावर रत्नतोरणे
अवतीभवती रम्य उपवनें
त्यात रंगती नृत्य गायनें
मृदुंग वीणा नित्य नादती, अलका नगरीपरी
'अयोध्या मनुनिर्मित नगरी '

राजसौख्य ते सौख्य जनांचे
एकच चिंतन लक्ष मनांचे

अगदी हेच !  सध्या करोडो जनांच्या मनात फक्त एकच चिंतन - मनन सुरु आहे ते म्हणजे
" त्रिवार जयजयकार रामा,त्रिवार जयजयकार"
प्रजाजनीं जे रचिलें स्वप्नी
मूर्त दिसे ते स्वप्न लोचनीं
राजा राघव, सीता राज्ञी
चतुर्वेदसे लोक पूजिती रघुकुलदिपक चार
त्रिवार जयजयकार!

समयिं वर्षतिल मेघ धरेंवर
सत्यशालिनी धरा निरंतर
सेवारत जन,स्वधर्मतत्पर
" शांति: शांति:" मुनी वांच्छिती, ती घेवो अवतार 
त्रिवार जयजयकार! 

आता प्रतीक्षा  पौष शुक्ल द्वादशी,  चंद्र मृग नक्षत्री आपल्या उच्च राशीत येण्याची. तोपर्यंत:-

नगरिं लाभता लोकमान्यता
जाईल वार्ता श्रीरघुनाथा
उत्सुक होऊन श्रवणाकरिता
करवितील ते तुम्हा निमंत्रण 
रघुराजाच्या नगरीं जाऊन,गा बाळांनो श्रीरामायण !
🙏🙏🙏

देवा तुझ्या द्वारी आलो 📝
www.kelkaramol.blogspot.com 

२७ नोव्हेंबर, २०२३

कळस दर्शन

.

लोकीं तरी आथी ऐसें । जे दुरूनि कळसु दिसे ।
आणी भेटीचि हातवसे । देवतेची तिये ॥

ज्ञानेश्वरीतील १८ व्या अध्यायातील ही एक ओवी देवळाच्या कळसाचे महत्व सांगण्यासाठी पुरेशी आहे

 काही कारणाने जर गाभा-यातील देवतेचे दर्शन होऊ शकले नाही तर किमान कळसाचे दर्शन तरी घ्यावे असे अनेक जण मानतात. याचे प्रत्यंतर आपणास पंढरपूर यात्रेत येते. ज्यांना पांडुरंगाचे दर्शन होत नाही ते कळसाचे दर्शन घेऊन समाधान मानतात. 

हे आठवायला आज एक कारण घडले. नेरूळच्या कार्तिकस्वामी मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. मुळ मूर्ती आणि गाभारा दुस-या मजल्यावर आहे. दर्शन घेत असताना सहज वर लक्ष गेले आणि हे दिसले.

गाभाऱ्याच्या वरती एक काचेची चौकट लावली आहे. समोर कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले की लगेच मान वरुन कळस बघायचा, दर्शन घ्यायचे.
तिथे ही एक आरसा लावून कळसाचा 'टाॅप व्ह्यू ' दाखवलाय

सर्वच दक्षिणात्य मंदिरात हे पहायला मिळते की नाही माहित नाही पण या मंदिरात ज्यानी हे क्रिएटिव्ह डिझाईन केले आहे त्या इंजिनियरला सलाम.

#देवा_तुझ्या_द्वारी_आलो 💐

कार्तीक पोर्णीमा
२७/११/२३ 

२३ नोव्हेंबर, २०२३

पनौती

.पनौती

ज्योतिष शास्त्रात शनी महाराजांच्या गोचर भ्रमणानुसार ( शनीचे एका राशीतून दुस-या राशीत जाणे)  काही राशींना 'पनौती' येते.

पनौतीचे दोन प्रकार आहेत. एक छोटी पनौती दुसरी मोठी पनौती

मोठी पनौती म्हणजेच साडेसाती. याबद्दल माहिती बहुतेक सगळ्यांना आहे.
छोटी पनौती- याला आपण 'अडीचकी' असेही म्हणतो.
ही केंव्हा येते?


तर शनी महाराज जेंव्हा चंद्रापासून चवथ्या आणि आठव्या  राशीत येतो तेंव्हा 'छोटी पनौती ' चालू  झाली असे म्हणतात. 

पनौती येणे म्हणजे अडचणींचा सामना करावा लागणे

शनी महाराज जेंव्हा चंद्रा पासून चवथ्या स्थानी येतो तेंव्हा चंद्र- शनी केंद्र योग होतो जो वाईट असतो.

शनिची ३ री दृष्टी राशी कुंडलीतील ६ व्या ( आरोग्य), ७ वी दृष्टी दशम ( कर्म स्थान) आणि १० वी दृष्टी राशी कुंडलीच्या प्रथम स्थानावर ( आणि अर्थात तेथील चंद्रावर येते. ही तिन्ही स्थाने शनी महाराजांच्या दृष्टीने बिघडतात आणी त्या स्थानाकडे दर्शवलेल्या गोष्टींचा त्रास जसे अनारोग्य/ नोकरी, व्यवसायात अडचणी इ
शनी एका राशीत साधारण अडीच वर्षे असल्याने याला 'अडीचकी' म्हणतात

चंद्रा पासून आठव्या स्थानी गोचरीने आलेल्या शनीचा चंद्राशी षडाष्टक हा अशुभ योग होतो. आठव्या स्थानी असणाऱ्या शनीची ३ री,७ वी, १० वी दृष्टी अनुक्रमे राशी कुंडलीच्या दशम,  द्वितीय ( धन), पंचम ( संतती) स्थानावर येते तेंव्हा त्या स्थानानी दर्शवलेल्या गोष्टींचा त्रास होतो.

राशी कुंडली प्रमाणेच लग्न कुंडली कडून गोचर दृष्टी पहाणे आवश्यक आहे. 

२० नोव्हेंबर, २०२३

ज्योतिष अभ्यासकांसाठी

प्रिय ज्योतिष अभ्यासकांनो, 

भारतातील असंख्य ज्योतिषी ज्यांनी भारत जिंकेल असं म्हणले ते चुकले

आम्ही पण काय कमी नाही 

आम्ही तर 'दक्षिण आफ्रिका ' जिंकेल असं भकीत केले  होते.
( याचा अर्थ  भारत जिंकणार नाही हे आम्ही अधीच बोललो होतो.☺️
 त्यातल्या त्यात समाधानाची बाब ही की चुकणा-या *प्रसिध्द ज्योतिषीं* मधे आम्ही अजूनही ब-याच खालच्या पातळीवर आहोत 😊  ) 

भविष्य चुकले हे मान्य करायला काहीच हरकत नाही.

नियतीच्या सर्व योजना समजतीलच असे नाही , नियती पुढे कुणीच श्रेष्ठ नाही.

 हे ज्योतिषांसह सगळ्यांनी लवकर समजून घेणे आवश्यक.

ज्योतिषी चुकू शकतो ( कितीही मोठा ज्योतिषी असला तरी)  ,  आणि यात वावगे काहीच नाही.

काल किंवा त्या आधी ज्यांनी कांगारु जिंकतील असे भकित केले होते ( दिसलं तर नाही कुठे. श्री प्रसाद कुलकर्णी पंढरपूर यांचा अपवाद वगळता)  त्यांचे अभिनंदन पण यापूर्वी त्यांची भकिते चुकली नाहीत किंवा पुढे चुकणार नाहीत असेही नाही.

On serious note:

शास्त्राचा वापर नक्की कुठल्या गोष्टींसाठी करावा, किती करावा, कुणासाठी करावा, कसा करावा, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे किती प्रसिद्धी द्यावी  याबाबत तमाम अभ्यासकांनी विचार करायची वेळ आली आहे.

*हे एक असे क्षेत्र आहे की इथे यश आणि प्रसिद्धी हातात हात घालून रहाणे जरा अवघडंच*. 
(कुणी आपल्या पेक्षा वरचढं होतंय असं वाटलं की नियती बरोबर कामाला लागते)
या गोष्टींचा विचार तमाम शास्त्र पंडितांनी / अभ्यासकांनी अवश्य करावा.

पुढील अचूक प्रेडिक्शन्स साठी सर्वांना शुभेच्छा 🙏💐

अमोल केळकर 📝 

२३ सप्टेंबर, २०२३

दर्शनमात्रे नाम ...



प्रचंड संख्येने येणारे भक्त, अरुंद गल्ली, थोडीशी गडबड होणारच की.
नवरात्रीत अंबाबाईच्या देवळात, दत्तजयंतीला नरसोबाची वाडी ला ही गर्दी होते.  होणारी गर्दी हा मुळात विषयच नाही तर गर्दीचे व्यवस्थापन. त्यात मधे मधे कडमडणारे सेलिब्रेटी  हे सगळं मॅनेज करणं हे महत्वाचं आहे

ढकलाढकली, कार्यकर्त्यांची अरेरावी, मारहाण हे दरवर्षी चे प्रकार होत असल्याने अनेकांनी सोशल मिडियावर यावर परखड मत व्यक्त केले आहे. ते बरोबर ही आहे 

(असे जेंव्हा प्रकार घडतात तेंव्हा मला गजानन विजय पोथीतील काही अध्याय आठवतात. गजानन महाराजांनी ही आपल्या काही भक्तांना मुद्दाम असे प्रसाद देऊन त्यांच्याबाबत काही चमत्कार केले आहेत. अर्थात इथे पोलिस / कार्यकर्ते  देतात हा भाग वेगळा. पण असा प्रसाद मिळणाऱ्यांच्या बाबतीत काही विशेष घडत असणार हे आपलं आमचं वय्यक्तिक  मत )


हे सगळं 'कळत' असून ही, आज ही आमच्यासारख्या लाखो भक्तांची पावले  मुख- दर्शनासाठी 'वळतात'.
रांगेत लागणारा दोन एक तासाचा कालावधी 'राजाचा विजय असो' या घोषणेत कसा निघून जातो ते कळतच नाही.
 मोठ्या मैदानातील रांगेतून जेंव्हा लहानशा गल्लीत रांग येते  . प्रचंड गर्दीतून पुढे पुढे जात असताना सभोवतालचे लाईटींग, डेकोरेशन बघत बघत जाताना एका क्षणी वळणावर दरबार दिसू लागतो
राजाचा डावा हाताचे प्रथम दर्शन मग डावीकडे वळणा-या गल्लीतून जसे जसे पुढे जाऊ तसं तसं राजाचे दर्शन व्हायला सुरुवात होते.
 गेली अनेकवर्ष हेच दृश्य अनुभवले आहे. 
तिथून पुढचा प्रवास काही मिनिटाचा.  

पण त्या शाही दरबारातील राजाचे तेज अनुभवणे ही एक वेगळीच अनुभूती. अर्थात आधी लिहिल्याप्रमाणे हे तेज तुम्हाला जास्त अनुभवता येणार नाही किंवा त्याचा त्रास तुम्हाला जास्त होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मंडळाचे सदस्य, पोलिस तत्पर असतात. पुढील काही मिनिटात तुम्ही बाहेर कसे आलात हे तुम्हाला ही कळत नाही.

लालबागचा दरबार
भव्य दिव्य मुर्ती
दर्शनमात्रे मान
कामनापुर्ती...

ही शान कुणाची, लालबागच्या राजाची 🙏🌺

देवा तुझ्या द्वारी आलो 📝
poetrymazi.blogspot.com
२३/०९/२३ 

१० सप्टेंबर, २०२३

गरुडाला गुळाची चव काय

.छोट्या छोट्या गोष्टीत शास्त्राची प्रचीती येते.

२ तारखेला बुधाच्या रेवती नक्षत्रावर
भारत x पाकिस्तान सामना सुरु झाला

त्यादिवशी पावसाने सामना वाया गेला.

बुध  रिपिटेशनचा कारक आहे . बुधाच्या नक्षत्रावर एखादी घटना घडली/ केली की पुनरावृत्ती होते

हेच आज परत भारत - पाकिस्तान सामन्यात दिसले. आजही पाऊस आला.

ज्यांच्याकडून आम्ही हे शास्त्र शिकलो ते गुरुजी म्हणायचे, एखादी आवडणारी गोष्ट बुधाच्या नक्षत्रावर सुरु करा
 उदा. मैत्रिणीला भेटणे, डेटिंग करणे वगैरे म्हणजे पुनरावृत्ती होईल 😌

टॅरोट कार्ड बद्दल ही असे छान अनुभव आहेत ते परत कधीतरी

आमच्या एका ज्ञानी मित्राने  या प्रकाराला ' तुझे तरोट का फिरोट भाकड पत्ते ' असं नाव दिले आहे. अर्थात तो ज्ञानी आणि आमच्यासाठी गुरूवर्य असल्याने एक म्हण त्याच्यासाठी बदलून 

#गरुडाला_गुळाची_चव_काय

देवा तुझ्या द्वारी आलो
kelkaramol.blogspot.com 

१३ ऑगस्ट, २०२३

आचार्य अत्रे

.कुंडलीत मंगळ - बुध योग असता मग तो केंद्रयोग असो,प्रतियोग असो, युतीयोग असो
टीकात्मक स्वभाव, दुस-याचे मर्म बाहेर काढणे, विनोद करणे, चेष्टा करणे, टर उडविणे हे स्वाभाविक गुणधर्म पहावयास मिळतात

कै. आचार्य अत्रांच्या कुंडलीत लग्नातील बुध दशमातील मंगळाच्या अंशात्मक केंद्रयोगात आहे

(माहिती साभार : महाराष्ट्राचा कुंडली संग्रह )

आज १३ आँगस्ट २०२३, आचार्य अत्रे यांना "शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती निमित्य"
विनम्र  अभिवादन



 

३१ मे, २०२३

वस्त्र- संहिता

वस्त्र - संहिता 📝

 यापुढे नवस करायचे/ फेडण्याचे उपाय सांगताना पंडीत/ ज्योतिषांनी विशेष ध्यान दिले पाहिजे. ' नवरा_माझा_नवसाचा ' मधील उपाय हा इतिहासजमा होणार आहे. मेष राशीत ,अश्विनी या केतूच्या नक्षत्रातील 'गुरु' ने वस्त्र-संहितेचे नियम बनविण्यासाठी चालना दिली आहे हे नक्की मोठमोठी देवस्थाने, मोठमोठे नियम लावून अंमलबजावणी करतीलच, प्रश्ण आहे तो तुलनेने लहान, छोट्या गावातील मंदिरांचा. महत्वाच्या कामाला निघताना किंवा गुरुवार,शनिवार,सोम-मंगळवारी, किंवा विशिष्ठ दिवशी आँफीसला जायच्या आधी देवळात जाताना वेळ वाचावा म्हणून केवळ शूज काढून 'मोजे' न काढताच आपण अनेकजण देवळात जातोय. हे ही थांबवले पाहिजे. ठाण्याला स्टेशनजवळ असणाऱ्या ' स्वामी समर्थांच्या मठात ' मोजे न घालून येण्याबाबत उल्लेख आहे. असा उल्लेख इतर ही काही ठिकाणी आढळला थोडक्यात "मौज आणि मोजे " बाहेर ठेऊनच मंदिरात यावे असा एखादा फलक/ नियम सर्व मंदिरात लावायला हरकत नाही.

  देवाचिया द्वारी
 पूर्ण वस्त्रधारी
 तेणे दर्शन भारी
 साधकाला !!

 गोविंदाय नमो नम :🙏🙏🌷

 #देवा_तुझ्या_द्वारी_आलो
जेष्ठ शु. एकादशी ३१/५/२३

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या