१८ डिसेंबर, २०१३

श्री स्वामी चरित्र सारामृत-अध्याय 16




श्री गणेशाय नमः ॥ भक्तजन तारणार्थ । यतिरुपे श्रीदत्त । भूवरी प्रगट होत । अक्कलकोटी वास केला ॥१॥
जे जे झाले त्यांचे भक्त । त्यात श्रेष्ठ स्वामीसुत । ऐकता त्यांचे चरित्र । महादोष जातील ॥२॥
प्रसिद्ध मुंबई शहरात । हरीभाऊ नामे विख्यात । आनंदे होते नांदत । निर्वाह करीत नौकरीने ॥३॥
कोकणप्रांती राजापूर । तालुक्यात इटिया गाव सुंदर । हरीभाऊ तेथील राहणार । जात मराठे तयांची ॥४॥
ते खोत त्या गावचे । होते संपन्न पूर्वीचे । त्याच गावी तयांचे । माता - बंधू राहती ॥५॥
मुंबईत तयांचे मित्र । ब्राह्मण उपनाव पंडित । ते करिता व्यापार त्यात । तोटा आला तयांसी ॥६॥
एके समयी पंडितांनी । स्वामीकीर्ति ऐकिली कानी । तेव्हा भाव धरोनी मनी । नवस केला स्वामीते ॥७॥
जरी आठ दिवसात । मी होईन कर्जमुक्त । तरी दर्शना त्वरित । अक्कलकोटी येईन ॥८॥
यासी सात दिवस झाले । काही  अनुभव न आले । तो नवल एक वर्तले । ऐका चित्त देउनि ॥९॥
हरीभाऊ आणि त्यांचे मित्र । अफूचा व्यापार करिता त्यात । आपणा नुकसान सत्य । येईल ऐसे वाटले ॥१०॥
त्यांनी काढिली एक युक्ती । बोलावुनी पंडिताप्रती । सर्व वर्तमान त्या सांगती । म्हणती काय करावे ॥११॥
हे नुकसान भरावयासी । द्रव्य नाही आम्हांपाशी । फिर्याद होता अब्रुसी । बट्टा लागेल आमुच्या ॥१२॥
तेव्हा पंडित बोलले । मलाही कर्ज काही झाले । निघाले माझे दिवाळे । यात संशय असेना ॥१३॥
तुम्ही व्हावया कर्जमुक्त । यासी करावी युक्ती एक । तुमचा होउनी मी मालक । लिहून देतो पेढीवर ॥१४॥
उभयतांसी ते मानले । तत्काळ तयांपरी केले । तो नवल एक वर्तले । ऐका सादर होवोनी ॥१५॥
अफूचा भाव वाढला । व्यापारात नफा जाहला । हे सांगावया पंडिताला । मारवाडी आला आनंदे ॥१६॥
पंडित ऐकोन वर्तमान । आनंद झाला त्यालागोन । हरीभाऊते भेटोन । वृत्त निवेदन केले ॥१७॥
अक्कलकोटी स्वामी समर्थ । सांप्रतकाळी वास करीत । त्यांचीच कृपा ही सत्य । कर्जमुक्त झालो आम्ही ॥१८॥
नवस केला तयांसी । जाऊ आता दर्शनासी । वार्ता ऐकूनी उभयतांसी । चमत्कार वाटला ॥१९॥
ज्यांनी आपुले मनोरथ । पूर्ण केले असती सत्य । ऐसे जे का समर्थ । अक्कलकोटी नांदती ॥२०॥
तरी अक्कलकोटाप्रती । येतो तुमच्या सांगाती । आम्ही पाहुनिया स्वामीमूर्ती । जन्म सार्थक करु की ॥२१॥
गजानन हरिभाऊ पंडित । त्रिवर्ग अक्कलकोटी जात । समर्थांचे दर्शन घेत । पूजन करीत भक्तीने ॥२२॥
पाहूनी समर्थांची मूर्ती । तल्लीन हरीभाऊंची वृत्ती । मुख पाहता नयनपाती । न लवती तयांची ॥२३॥
तेव्हा समर्थे तयांसी । शिव, राम, मारुती ऐसी । नामे दिधली त्रिवर्गासी । आणिक मंत्र दिधले ॥२४॥
पंडिता राम म्हटले । गजानना शिवनाम दिधले । मारुती हरीभाऊस म्हटले । तिघे केले एकरुप ॥२५॥
मग समर्थे त्या वेळे । त्रिवर्गा जवळ बोलाविले । तिघांशी तीन श्लोक दिधले । मंत्र म्हणोनी ते ऐका ॥२६॥
॥ श्लोक ॥ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णूः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुर्देवपरब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥१॥
ऐसा मंत्र हरीभाऊते । दिधला असे समर्थे । तेव्हा तयाच्या आनंदाते । पारावार नसेची ॥२७॥
दुसरा मंत्र गजाननाला । तया वेळी श्रींनी दिधला । तेव्हा तयांच्या मनाला । आनंद झाला बहुसाळ ॥२८॥
॥ श्लोक ॥ आकाशात् पतित तोय यथा गच्छति सागरम् ॥ सर्व - देव - नमस्कारः केशव प्रति गच्छति ॥२॥
संतोषले त्याचे मन । मग पंडिता जवळ घेवोन । एक मंत्र उपदेशोन । केले पावन तयाते ॥२९॥
॥ श्लोक ॥ इदमेव शिवम् इदमेव शिवम् । इदमेव शिवम् इदमेव शिवः ॥३॥
तीनशे रुपये तयांनी । आणिले होते मुंबईहूनी । त्यांचे काय करावे म्हणोनी । विचारिले समर्थांते ॥३०॥
ऐसा प्रश्न ऐकोनी । समर्थ बोलले त्या लागोनी । त्यांच्या पादुका बनवोनी । येथे आणाव्या सत्वर ॥३१॥
स्वामीसन्निध काही दिन । त्रिवर्ग राहिले आनंदाने । हरिभाऊंचे तनमन । स्वामींचरणी दृढ जडले ॥३२॥
काही दिवस गेल्यावरी । त्रिवर्ग एके अवसरी । उभे राहूनी जोडल्या करी । आज्ञा मागती जावया ॥३३॥
आज्ञा मिळता तयांसी । आनंदे आले मुंबईसी । हरीभाऊंच्या मानसी । ध्यास लागला स्वामींचा ॥३४॥
व्यवहारी वर्तता । स्वस्थता नसेची चित्ता । गोड न लागती संसारवार्ता । चैन नसे क्षणभरी ॥३५॥
असो पुढे त्रिवर्गानी । चांदीच्या पादुका करवोनी । अर्पावया स्वामींचरणी । आले अक्कलकोटाते ॥३६॥
भक्तजनांचा कैवारी । पाहोनिया डोळेभरी । माथा ठेविला चरणांवरी । बहुत अंतरी सुखावले ॥३७॥
चांदीच्या पादुका आणिल्या । त्या श्री चरणीं अर्पण केल्या । समर्थे आदरे घेतल्या । पायी घातल्या त्याच वेळी ॥३८॥
त्या आत्मलिंग पादुका । चौदा दिवसांपर्यंत देखा । पायी वागवी भक्तसखा । दिधल्या नाही कोणाते ॥३९॥
हरीभाऊ एके दिनी । समर्थांसन्निध येवोनी । दर्शन घेवोन श्रीचरणी । मस्तक त्यांनी ठेविले ॥४०॥
तो समर्थे त्याप्रती । घेवोनिया मांडीवरती । वरदहस्त सत्वरगती । मस्तकी त्यांचे ठेविला ॥४१॥
म्हणती तू माझा सूत । झालासी आता निश्चित । परिधान करी भगवे वस्त्र । संसार देई सोडोनी ॥४२॥
मग छाटी कफनी झोळी । समर्थे तयांसी दिधली । ती घेवोनी तया वेळी । परिधान केली सत्वर ॥४३॥
आत्मलिंग पादुका सत्वरी । देती हरीभाऊंचे करी । म्हणती जाऊनी सागरतीरी । किल्ला बांधोनी राहावे ॥४४॥
धरु नको आता लाज । उभार माझा यशध्वज । नको करु अन्य काज । जन भजना लावावे ॥४५॥
जाऊनी आता सत्वर । लुटवी आपुला संसार । लोभ मोह अणुमात्र । चित्ती तुवा न धरावा ॥४६॥
आज्ञा ऐकोनिया ऐसी । आनंद झाला मानसी । सत्वर आले मुंबईसी । साधूवेष घेवोनी ॥४७॥
सदगुरुने मस्तकी हस्त । ठेविता झाले ज्ञानवंत । धन्य धन्य ते स्वामीसुत । धन्य स्वामी दयाळ ॥४८॥
सदगुरुचा उपदेश होता । तात्काळ गेली भवव्यथा । उपरती झाली चित्ता । षडविकार निमाले ॥४९॥
बहुत गुरु जगी असती । नाना मंत्र उपदेशिती । द्रव्यप्राप्तीस्तव निश्चिती । ढोंग माजविती बहुत ॥५०॥
तयांचा उपदेश न फळे । आत्मरुपी मन न वळे । सत्यज्ञान काही न कळे । मन न चळे प्रपंची ॥५१॥
तयांसी न म्हणावे गुरु । ते केवळ पोटभरु । भवसागर पैलतीरु । उतरतील ते कैसे ॥५२॥
तैसे नव्हेची समर्थ । जे परमेश्वर साक्षात । मस्तकी ठेविता वरदहस्त । दिव्यज्ञान शिष्यांते ॥५३॥
असो हरीभाऊंनी काय केले । ब्राह्मणांसी बोलाविले । संकल्प करोनी ठेविले । तुळसीपत्र घरावरी ॥५४॥
हरीभाऊ घर लुटविता । तारा नामे त्यांची कांता । ती करी बहुत आकांता । घेत ऊर बडवोनी ॥५५॥
म्हणे जोडोनिया कर । लुटविता तुम्ही संसार । हा नव्हे विचार । दुःख लागेल भोगावे ॥५६॥
आजवर अब्रूने । दिवस काढिले आपण । परी आता अवलक्षण । आपणा काय आठवले ॥५७॥
हांसतील सकल जन । धिक्कारतील पिशून । उपास पडता कोण । खावयाते घालील ॥५८॥
अल्पवयी आपणासी । बुद्धी सुचली ही कैसी । त्यागोनिया संसारसुखासी । दुःखडोही का पडता ॥५९॥
संसारसुख भोगोन । पुढे येता वृद्धपण । मग करावे मोक्षसाधन । सेवावे वन तपार्थ ॥६०॥
आपल्या वडिलांची थोरवी । मनामाजी आणावी । त्यांची कीर्ति मळवावी । उचित नसे आपणा ॥६१॥
तुम्ही संसार सोडोनी । जाऊनी बसाल जरी वनी । तरी मग सांगा कोणी । मजलागी पोसावे ॥६२॥
माझे करिता पाणिग्रहण । अग्नि ब्राह्मण साक्ष ठेवोन । आपण वाहिली असे आण । स्मरण करावे मानसी ॥६३॥
तुम्ही म्हणाल मजसवे । तूहि घरदार सोडावे । मजसमागमे फिरावे । भिक्षा मागत घरोघरी ॥६४॥
तरी संसारसुखासक्त । मी असे जी सत्य सत्य । संसारी मन विरक्त । माझे न होय कदाही ॥६५॥
आता जरी आपण । संसार टाकिला लुटोन । हे केले महत्पुण्य । ऐसे कोण म्हणेल ॥६६॥
कुटुंबा उपवासी मारावे । सर्वस्व धर्म करावे । यासी काय पुण्य कार्य म्हणावे । पाप उलटे होतसे ॥६७॥
विनविते जोडोनी कर । अद्यापि स्वस्थ करा अंतर । आपला हा विचार । सोडोनी द्यावा प्राणप्रिया ॥६८॥
ऐशी तियेची उत्तरे । ऐकोनिया स्वामीकुमरे । समाधान बहुत प्रकारे । करीतसे तियेचे ॥६९॥
परी तारेच्या चित्तात । षडरिपु होते जागत । संसाराचे मिथ्यत्त्व । तियेलागी कळेना ॥७०॥
आशा, मनीषा, भ्रांती आणि । कल्पना वासना या डाकिणी । त्यांनी तिजला झडपोनी । आपणाधीन केलेसे ॥७१॥
त्यायोगे सद्विचार । तियेसी न सुचे अणुमात्र । धरोनिया दुराग्रह । स्वामीसुता बोधीतसे ॥७२॥
षडविकार त्यागोनी । रतला जो स्वामीचरणी । दृढ निश्चय केला मनी । संसार त्याग करावा ॥७३॥
स्त्रियेच्या अंगावरी अलंकार । तेहि लुटविले समग्र । तिये दिधले शुभ्र वस्त्र । परिधान करावया ॥७४॥
आत्मलिंग समर्थे । स्वामीसुताते दिधले होते । त्या पादुका स्वहस्ते । मठामाजी स्थापिल्या ॥७५॥
कामाठीपुर्‍यात त्या समयी । मठ स्थापिला असे पाही । हरीभाऊ होऊनी गोसावी । मठामाजी राहिले ॥७६॥
धन्य धन्य ते स्वामीसुत । गुर्वाज्ञेने झाले विरक्त । परी जन त्याते निंदित । नाना दोष देवोनी ॥७७॥
पूर्वजन्मी तप केले । त्याचे फळ प्राप्त झाले । सदगुरुचरणी विनटले । सर्व फिटले भवदुःख ॥७८॥
इति श्री स्वामीचरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा भाविक भक्त परिसोत । षोडशोऽध्याय गोड हा ॥८०॥
श्रीरस्तु । शुभं भवतु ॥ 

१७ डिसेंबर, २०१३

श्री स्वामी चरित्र सारामृत-अध्याय 15



स्वामी समर्थ , श्री स्वामी समर्थ, ब्रह्मांडनायक








श्री गणेशाय नमः ॥ नलगे करणे तीर्थाटन । हठयोगादिक साधन । वेदाभ्यास शास्त्रज्ञान । मोक्षसाधनकारणे ॥१॥
अंतरी स्वामीभक्ती जडता । चारी पुरुषार्थ येती हाता । पाप ताप दैन्य वार्ता । तेथे काही नुरेची ॥२॥
वर्तत असता संसारी । स्वामीपद आठवी अंतरी । तयाते या भवसागरी । निश्चये तारिती समर्थ ॥३॥
सर्व कामना पुरवोन । अंती दाविती सुरभुवन । जे नर करिती नामस्मरण । ते मुक्त याच देही ॥४॥
मंगळवेढे ग्रामात । राहत असता श्रीसमर्थ । ग्रामवासी जन समस्त । वेडा म्हणती तयांसी ॥५॥
आपुली व्हावी प्रख्याती । हे नसेचि जयाच्या चित्ती । स्वेच्छे वर्तन करिती । काही न जाणती जनवार्ता ॥६॥
कोणासी भाषण न करिती । कवणाचे गृहा न जाती । दुष्टोत्तरे जन ताडिती । तरी क्रोध नयेची ॥७॥
शीतोष्णाची भीती । नसेची ज्यांचिया चित्ती । सदा अरण्यात वसती । एकान्तस्थळी समर्थ ॥८॥
सुखदुःख समान । सदा तृप्त असे मन । लोकवस्ती आणि व्रन । दोन्ही जया सारखी ॥९॥

परमेश्वरस्वरुप यती । ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती । ते करिता स्वामीभक्ती । जन हासती तयाते ॥१०॥
या वेळी मंगळवेढ्यात । बसाप्पा तेली राहात । दारिद्र्ये पीडिला बहुत । दीन स्थिती तयाची ॥११॥
बसाप्पा व्यवसाय करी । पुरे न पडे त्यामाझारी । अठराविश्वे दारिद्र्य घरी । पोटा भाकरी मिळेना ॥१२॥
तो एके दिनी फिरत फिरत । सहज वनामाजी जात । तो देखिले श्रीसमर्थ । दिगंबर यतिराज ॥१३॥
कंटकशय्या करोन । तियेवरी केले शयन । ऐसे नवल देखोन । लोटांगण घालितसे ॥१४॥

अंतरी पटली खूण । यति ईश्वरांश पूर्ण । म्हणूनी सुखे शयन । कंटकशय्येवरी केले ॥१५॥

अष्टभावे दाटोनी । माथा ठेवी श्रीचरणी । म्हणे कृपाकटाक्षे करोनी । दासाकडे पहावे ॥१६॥

स्वामीचरणांचा स्पर्श होता । ज्ञानी झाला तो तत्त्वता । कर जोडोनिया स्तविता । झाला बहुत प्रकारे ॥१७॥
सकल ब्रह्मांडनायका । कृपाधना भक्तपालका । पाप, ताप आणि दैन्य हारका । विश्वपते जगदगुरु ॥१८॥
पाहुनिया प्रेमळ भक्ती । अंतरी संतोषले यति । वरदहस्त ठेविती । तत्काळ मस्तकी तयाचे ॥१९॥
बसाप्पाचे श्रीचरणी । मन जडले तैपासोनी । राहू लागला निशिदिनी । स्वामीसन्निध आनंदे ॥२०॥
जिकडे जातील समर्थ । तिकडे आपणही जात । ऐसे पाहुनी हासत । कुटिल जन तयाते ॥२१॥

वेड्याच्या नादी लागला । संसार याने सोडिला । घरदार विसरला । वेडा झाला निश्चये ॥२२॥

मग बसाप्पाची कांता । ऐकूनिया ऐशी वार्ता । करीतसे आकांता । म्हणे घर बुडाले ॥२३॥

आधीच आम्ही निर्धन । परी मोलमजुरी करोन । करीत होतो उपजीवन । आता काय करावे ॥२४॥
बसाप्पा येता गृहासी । दुष्टोत्तरे बोले त्यासी । म्हणे सोडिले संसारासी । वेड काय लागले ॥२५॥

परी बसाप्पाचे चित्त । स्वामींचरणी आसक्त । जनापवादा न भीत । नसे चाड कोणाची ॥२६॥

ऐसे लोटले काही दिन । काय झाले वर्तमान । ते होवोनी सावधान । चित्त देउनी ऐकावे ॥२७॥

एके दिवशी अरण्यात । बसाप्पा स्वामीसेवा करीत । तव झाली असे रात । घोर तम दाटले ॥२८॥
चित्त जडले श्रीचरणी । भीती नसे काही मनी । दोन प्रहर होता रजनी । समर्थ उठोनी चालले ॥२९॥
पुढे जाता समर्थ । बसाप्पा मागे चालत । प्रवेशले घोर अरण्यात । क्रूर श्वापदे ओरडती ॥३०॥

आधीच रात्र अंधारी । वृक्ष दाटले नाना परी । मार्ग न दिसे त्या माझारी । चरणी रुतती कंटक ॥३१॥
परी बसाप्पाचे चित्ती । न वाटे काही भीती । स्वामीचरणी जडली वृत्ती । देहभान नसेची ॥३२॥

तो समर्थ केले नवल । प्रगट झाले असंख्य व्याल । भूभाग व्यापिला सकळ । तेजे अग्नीसमान ॥३३॥
पादस्पर्श सर्पा झाला । बसाप्पा भानावरी आला । अपरिमित देखिला । सर्पसमूह चोहीकडे ॥३४॥
वृक्षशाखा अवलोकित । तो सर्पमय दिसत । मागे पुढे पहात । तो दिसत सर्पमय ॥३५॥

वाहोनिया ऐशी परी । भयभीत झाला अंतरी । तो तयासी मधुरोत्तरी । समर्थ काय बोलले ॥३६॥

भिऊ नको या समयी । जितुके पाहिजे तितुके घेई । न करी अनुमान काही । दैव तुझे उदेले ॥३७॥
ऐसे बोलता समर्थ । बसाप्पा भय सोडूनी त्वरित । करी घेवोनि अंगवस्त्र । टाकीत एका सर्पावरी ॥३८॥
गुंडाळोनी सर्पा त्वरित । सत्वर उचलोनी घेत । तव सर्प झाले गुप्त । तेजही नष्ट जाहले ॥३९॥

तेथोनिया परतले । सत्वर ग्रामामाजी आले । बसाप्पासहित बैसले । समर्थ एका देऊळी ॥४०॥
तेथे आपुले अंगवस्त्र । बसाप्पा सोडोनी पहात । तव त्यात सुवर्ण दिसत । सर्प गुप्त झाला ॥४१॥

ऐसे नवल देखोनी । चकित झाला अंतःकरणी । माथा ठेवी स्वामींचरणी । प्रेमाश्रू नयनी वहाती ॥४२॥
त्यासी बोलती यतीश्वर । घरी जावे त्वा सत्वर । सुखे करावा संसार । दारा पुत्रा पोशिजे ॥४३॥

आनंदोनी मानसी । बसाप्पा गेला गृहासी । वर्तमान सांगता कांतेसी । तेहि अंतरी सुखावे ॥४४॥
कृपा होता समर्थांची । वार्ता नुरेची दैन्याची । याविषयी ही बसाप्पाची । गोष्ट साक्ष देतसे ॥४५॥
असो तो बसाप्पा भक्त । संसारसुख उपभोगीत । रात्रदिन '' श्री स्वामी समर्थ '' । मंत्र जपे  त्यादरे ॥४६॥
पाप, ताप आणि दैन्य । ज्यांचे दर्शने निरसोन । जाय ते पद रात्रंदिन । प्रेमे विष्णू शंकर ध्याती ॥४७॥
पुढे कथा सुंदर । स्वामीसुताचे चरित्र । मन करोनिया स्थिर । सादर होउनी ऐकावे ॥४८॥

इति श्री स्वामीचरित्रामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा भाविक परिसोत । पंचदशोऽध्याय गोड हा ॥४९॥
श्री स्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीरस्तु ॥ शुभं भवतु ॥ 




१६ डिसेंबर, २०१३

श्री स्वामी चरित्र सारामृत-अध्याय 14



स्वामी समर्थ , श्री स्वामी समर्थ, ब्रह्मांडनायक







श्री गणेशाय नमः । जयजयाजी करुणाघना । जयजयाजी अघशमना । जयजयाजी परमपावना । दीनबंधो जगदगुरु ॥१॥
आपुल्या कृपे निश्चित । त्रयोदश अध्यायापर्यंत । वर्णिले स्वामी चरित्रामृत । आता पुढे वदवावे ॥२॥

आपुल्या कथा वदावया । बुद्धी देई स्वामीराया । चरित्र ऐकोनी श्रोतया । संतोष होवो बहुसाळ ॥३॥

कैसी करावी आपुली भक्ती । हे नेणे मी मंदमती । परी प्रश्न करिता श्रोती । अल्पमती सांगतसे ॥४॥

प्रातः काळी उठोन । आधी करावे नामस्मरण । अंतरी घ्यावे स्वामीचरण । शुद्ध मन करोनी ॥५॥

प्रातः कर्मे आटपोनी । मग बैसावे आसनी । भक्ती धरोनी स्वामीचरणी । पूजन करावे विधियुक्त ॥६॥

एकाग्र करोनी मन । घालावे शुद्धोदक स्नान । सुगंध चंदन लावोन । सुवासिक कुसूमे अर्पावी ॥७॥

धूप - दीप - नैवेद्य । फल तांबूल दक्षिणा शुद्ध । अर्पावे नाना खाद्य । नैवेद्याकारणे स्वामींच्या ॥८॥

षोडशोपचारे पूजन । करावे सदभावे करुन । धूप - दीपार्ती अर्पून । नमस्कार करावा ॥९॥


जोडोनिया दोन्ही कर । उभे रहावे समोर । मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र । नाममंत्र श्रेष्ठ पै ॥१०॥

,  
आजानुबाहू सुहास्यवदन । काषायवस्त्र परिधान । भव्य आणि मनोरम । मूर्ती दिसे साजिरी ॥११॥

मग करावी प्रार्थना । जयजयाजी अघहरणा । परात्परा कैवल्यसदना । ब्रह्मानंदा यतिवर्या ॥१२॥

जयजयाजी पुराणपुरुषा । लोकपाला सर्वेशा । अनंत ब्रह्मांडाधीशा । वेदवंद्या जगदगुरु ॥१३॥


सुखधामनिवासिया । सर्वसाक्षी करुणालया । भक्तजन ताराया । अनंतरुपे नटलासी ॥१४॥


तू अग्नि तू पवन । तू आकाश तू जीवन । तूची वसुंधरा पूर्ण । चंद्र सूर्य तूच पै ॥१५॥


तू विष्णू आणि शंकर । तू विधाता तू इंद्र । अष्टदिकपालादि समग्र । तूच रुपे नटलासी ॥१६॥


कर्ता आणि करविता । तूच हवी आणि होता । दाता आणि देवविता । तूच समर्था निश्चये ॥१७॥

जंगम आणि स्थिर । तूच व्यापिले समग्र । तुजलागी आदिमध्याग्र । कोठे नसे पाहता ॥१८॥


असोनिया निर्गुण । रुपे नटलासी सगुण । ज्ञाता आणि ज्ञान । तूच एक विश्वेशा ॥१९॥


वेदांचाही तर्क चाचरे । शास्त्रांतेहि नावरे । विष्णू शंकर एकसरे । कुंठित झाले सर्वहि ॥२०॥


मी केवळ अल्पमती । करु केवी आपुली स्तुती । सहस्त्रमुखही निश्चिती । शिणला ख्याती वर्णिता ॥२१॥

दृढ ठेविला चरणी माथा । रक्षावे मजसी समर्था । कृपाकटाक्षे दीनानाथा । दासाकडे पहावे ॥२२॥

आता इतुकी प्रार्थना । आणावी जी आपुल्या मना । कृपासमुद्री या मीना । आश्रय देईजे सदैव ॥२३॥

पाप ताप आणि दैन्य । सर्व जावो निरसोन । इहलोकी सौख्य देवोन । परलोकसाधन करवावे ॥२४॥

दुस्तर हा भवसागर । याचे पावावया पैलतीर । त्वन्नाम तरणी साचार । प्राप्त होवो मजला ते ॥२५॥

आशा मनीषा तृष्णा । कल्पना आणि वासना । भ्रांती भुली नाना । न बाधोत तुझ्या कृपे ॥२६॥


किती वर्णू आपुले गुण । द्यावे मज सुख साधन । अज्ञान तिमिर निरसोन । ज्ञानार्क हदयी प्रगटो पै ॥२७॥

शांती मनी सदा वसो । वृथाभिमान नसो । सदा समाधान वसो । तुझ्या कृपेने अंतरी ॥२८॥


भवदुःखे हे निरसो । तुझ्या भजनी चित्त वसो । वृथा विषयांची नसो । वासना या मनाते ॥२९॥


सदा साधु - समागम । तुझे भजन उत्तम । तेणे होवो हा सुगम । दुर्गम जो भवपंथ ॥३०॥


व्यवहारी वर्तता । न पडो भ्रांती चित्ता । अंगी न यावी असत्यता । सत्य विजयी सर्वदा ॥३१॥


आप्तवर्गाचे पोषण । न्याय मार्गावलंबन । इतुके द्यावे वरदान  । कृपा करुनी समर्था ॥३२॥


असोनिया संसारात । प्राशीन व नामामृत । प्रपंच आणि परमार्थ । तेणे सुगम मजलागी ॥३३॥


ऐशी प्रार्थना करिता । आनंद होय समर्था । संतोषोनि तत्त्वता । वरप्रसाद देतील ॥३४॥


गुरुवारी उपोषण । विधियुक्त करावे स्वामीपूजन । प्रदोषसमय होता जाण । उपोषणे सोडावे ॥३५॥

तेणे वाढेल बुद्धी । सत्यसत्य हे त्रिशुद्धी । अनुभवाची प्रसिद्धि । करिताती स्वामीभक्त ॥३६॥


श्री स्वामी समर्थ । ऐसा षडाक्षरी मंत्र । प्रीतीने जपावा अहोरात्र । तेणे सर्वार्थ पाविजे ॥३७॥


ब्राह्मणा क्षत्रियांदिका लागोनी । मुख्य जप हा चहूवर्णी । स्त्रियांनीही निशिदिनी । जप याचा करावा ॥३८॥

प्रसंगी मानसपूजा करिता । तेहि प्रिय होय समर्था । स्वामीचरित्र वाचिता ऐकता । सकल दोष जातील ॥३९॥
कैसी करावी स्वामी भक्ती । हे नेणे मी मंदमती । परी असता शुद्धचित्ती । तेची भक्ती श्रेष्ठ पै ॥४०॥

आम्ही आहो स्वामी भक्त । मिरवू नये लोकात । जयासी भक्तीचा दभ व्यर्थ । निष्फळ भक्ती तयाची ॥४१॥

दंभ षोडशोपचारे पूजिता । परी प्रिय नव्हेचि समर्था । भावे पत्र - पुष्प अर्पिता । समाधान स्वामीते ॥४२॥

जयाजयाजी आनंदकंदा । जयाजयाजी करुणासमुद्रा । विष्णू शंकराचिया छंदा । कृपा करोनी पुरवावे ॥४३॥
श्री स्वामीचरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा ऐकोत भाविक भक्त । चतुर्दशोऽध्याय गोड हा ॥४४॥
श्रीरस्तु । शुभं भवतु ॥