आमचे स्नेही श्री श्रीकांत दामले साहेब यांनी त्यांच्या फेसबूक भिंतीवर ठेवलेला हा अध्याय त्यांच्या परवानगीने या ब्लॉगच्या वाचकांसाठी देत आहे
अध्याय अकरावा
श्रीगणेशाय नमः ॥
धन्य धन्य तेचि जन
॥ जे शिवभजनी परायण ॥ सदा शिवलीलामृत श्रवण ॥ अर्चन सदा शिवाचे ॥१॥
सूत
म्हणे शौनकादिकांप्रति ॥ जे रुद्राक्षधारण भस्म चर्चिती ॥ त्यांच्या पुण्यास नाही
मिती ॥ त्रिजगती तेचि धन्य ॥२॥
जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण ॥ त्यासी
वंदिती शक्रादि सुरगण ॥ तो शंकरचि त्याचे दर्शन ॥ घेता तरती जीव बहू
॥३॥
अथवा षोडश षोडश दंडी जाण ॥ बांधावे रुद्राक्ष सुलक्षण ॥ शिखेमाजी एक
बांधावा पूर्ण ॥ शिवस्वरूप म्हणवुनी ॥४॥
त्यावरोनि करिता स्नान ॥ तरी
त्रिवेणीस्नान केल्यासमान ॥ असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण ॥ रुद्राक्ष बांधिजे
आदरे ॥५॥
कंठी बांधावे बत्तीस ॥ मस्तकाभोवते चोवीस ॥ सहा सहा कर्णी पुण्य
विशेष ॥ बांधिता निर्दोष सर्वदा ॥६॥
अष्टोत्तरशत माळ ॥ सर्वदा असावी गळा ॥
एकमुखी रुद्राक्ष आगळा ॥ पूजिता भाग्य विशेष ॥७॥
पंचमुख षण्मुख अष्टमुख ॥
चतुर्दशमुख लक्ष्मीकारक ॥ सकळ मंत्र सुफळ देख ॥ रुद्राक्षजप नित्य करिता
॥८॥
नित्य रुद्राक्षपूजन ॥ तरी केले जाणिजे शिवार्चन ॥ रुद्राक्षमहिमा परम
पावन ॥ इतिहास ऐका येविषयी ॥९॥
काश्मीर देशींचा नृप पावन ॥ नामाभिधान
भद्रसेन ॥ विवेकसंपन्न प्रधान ॥ परम चतुर पंडित ॥१०॥
प्रजा दायाद भुसुर ॥
धन्य म्हणती तोचि राजेश्वर ॥ लाच न घे न्याय करी साचार ॥ अमात्य थोर तोचि पै
॥११॥
सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी ॥ पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी ॥ सुत सभाग
विद्वान गुणी ॥ विशेष सुकृते पाविजे ॥१२॥
गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर ॥ शिष्य
प्रज्ञावंत गुरुभक्त उदार ॥ वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार ॥ विशेष सुकृते
लाहिजे ॥१३॥
श्रोता सप्रेम चतुर सावधान ॥ यजमान साक्षेपी उदार पूर्ण ॥ काया
आरोग्य सुंदर कुलीन ॥ पूर्वसुकृते प्राप्त होय ॥१४॥
असो तो भद्रसेन आणि
प्रधान ॥ बहुत करिता अनुष्ठान ॥ दोघांसी झाले नंदन ॥ शिवभक्त उपजतांचि
॥१५॥
राजपुत्र नाम सुधर्म ॥ प्रधानात्मज तारक नाम ॥ दोघे शिवभक्त निःसीम ॥
सावधान शिवध्यानी ॥१६॥
बाळे होऊनि सदा प्रेमळ ॥ अनुराग चित्ती वैराग्यशीळ ॥
लौकिकसंगे ध्रुव अमंगळ ॥ त्यांची संगती नावडे त्या ॥१७॥
पंचवर्षी दोघे कुमर
॥ लेवविती वस्त्रे अलंकार ॥ गजमुक्तमाळा मनोहर ॥ नाना प्रकारे लेवविती
॥१८॥
तव ते बाळ दोघेजण ॥ सर्वालंकारउपाधी टाकून ॥ करिती रुद्राक्ष धारण ॥
भस्म चर्चिती सर्वांगी ॥१९॥
आवडे सर्वदा एकांत ॥ श्रवण करिती शिवलीलामृत ॥
बोलती शिवनामावळी सत्य ॥ पाहाणे शिवपूजा सर्वदा ॥२०॥
आश्चर्य करिती राव
प्रधान ॥ यासी का नावाडे वस्त्रभूषण ॥ करिती रुद्राक्षभस्मधारण ॥ सदा स्मरण शिवाचे
॥२१॥
विभूति पुसोनि रुद्राक्ष काढिती ॥ मागुती वस्त्रे भूषणे लेवविती ॥ ते
सवेचि ब्राह्मणांसी अर्पिती ॥ घेती मागुती शिवदीक्षा ॥२२॥
शिक्षा करिता बहुत
॥ परी ते न सांडिती आपुले व्रत ॥ राव प्रधान चिंताग्रस्त ॥ म्हणती करावे काय आता
॥२३॥
तो उगवला सुकृतमित्र ॥ घरासी आला पराशर ॥ सवे वेष्टित ऋषींचे भार ॥ अपर
सूर्य तेजस्वी ॥२४॥
जो कृष्णद्वैपायनाचा जनिता ॥ त्रिकाळज्ञानी
प्रतिसृष्टिकर्ता ॥ जो वसिष्ठाचा नातू तत्त्वता ॥ राक्षससत्र जेणे केले
॥२५॥
जेवी मनुष्ये वागती अपार ॥ तैसेचि पूर्वी होते रजनीचर ॥ ते पितृकैवारे
समग्र ॥ जाळिले सत्र करूनिया ॥२६॥
जनमेजये सर्पसत्र केले ॥ ते आस्तिके
मध्येचि राहविले ॥ पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले ॥ मग वाचले रावणादिक
॥२७॥
विरंचीस दटावूनि क्षणमात्रे ॥ प्रतिसृष्टि केली विश्वामित्रे ॥ तेवी
पितृकैवारे पराशरे ॥ वादी जर्जर पै केले ॥२८॥
ते सांगावी समूळ कथा ॥ तरी
विस्तार होईल ग्रंथा ॥ यालागी ध्वनितार्थ बोलिला आता ॥ कळले पाहिजे निर्धारे
॥२९॥
ऐसा महाराज पराशर ॥ ज्याचा नातू होय शुक योगींद्र ॥ तो भद्रसेनाचा
कुळगुरु निर्धार ॥ घरा आला जाणोनी ॥३०॥
राव प्रधान सामोरे धावती ॥ साष्टांग
नमूनि घरासी आणिती ॥ षोडशोपचारी पूजिती ॥ भाव चित्ती विशेष ॥३१॥
समस्ता
वस्त्रे भूषणे देऊन ॥ राव विनवी कर जोडून ॥ म्हणे दोघे कुमर रात्रंदिन ॥ ध्यान
करिती शिवाचे ॥३२॥
नावडती वस्त्रे अलंकार ॥ रुद्राक्षभस्मावरी सदा भर ॥
वैराग्यशील अणुमात्र ॥ भाषण न करिती कोणासी ॥३३॥
इंद्रियभोगावरी नाही भर ॥
नावडे राजविलास अणुमात्र ॥ गजवाजियानी समग्र ॥ आरूढावे आवडेना ॥३४॥
पुढे हे
कैसे राज्य करिती ॥ हे आम्हांसी गूढ पडले चित्ती ॥ मग ते दोघे कुमर आणोनि गुरूप्रती
॥ दाखविले भद्रसेने ॥३५॥
गुरूने पाहिले दृष्टीसी ॥ जैसे मित्र आणि शशी ॥
तैसे तेजस्वी उपमा तयांसी ॥ नाही कोठे शोधिता ॥३६॥
यावरी बोले शक्तिसुत ॥
म्हणे हे का झाले शिवभक्त ॥ यांची पूर्वकथा समस्त ॥ ऐक तुज सांगतो
॥३७॥
पूर्वी काश्मीर देशात उत्तम ॥ महापट्टण नंद्रिग्राम ॥ तेथील वारांगना
मनोरम ॥ महानंदा नाम तियेचे ॥३८॥
त्या ग्रामीचा तोचि भूप ॥ पृथ्वीमाजी
निःसीम स्वरूप ॥ ललिताकृति पाहोनि कंदर्प ॥ तन्मय होवोनि नृत्य करी
॥३९॥
जैसा उगवला पूर्णचंद्र ॥ तैसे तिजवरी विराजे छत्र ॥ रत्नखचित याने अपार
॥ भाग्या पार नाही तिच्या ॥४०॥
रत्नमय दंडयुक्त ॥ चामरे जीवरी सदा ढळत ॥
मणिमय पादुका रत्नखचित ॥ चरणी जिच्या सर्वदा ॥४१॥
विचित्र वसने दिव्य सुवास
॥ हिरण्मयरत्नपर्यंतक राजस ॥ चंद्ररश्मिसम प्रकाश ॥ शय्या जिची अभिनव
॥४२॥
दिव्याभरणी संयुक्त ॥ अंगी सुगंध विराजित ॥ गोमहिषीखिल्लारे बहुत ॥
वाजी गज घरी बहुवस ॥४३॥
दास दासी अपार ॥ घरी माता सभाग्य सहोदर ॥ जिचे गायन
ऐकता किन्नर ॥ तटस्थ होती कोकिळा ॥४४॥
जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन ॥ सकळ
नृप डोलविती मान ॥ तिचा भोगकाम इच्छून ॥ भूप सभाग्य येती घरा ॥४५॥
वेश्या
असोन पतिव्रता ॥ नेमिला जो पुरुष तत्त्वता ॥ त्याचा दिवस न सरता ॥ इंद्रासही वश्य
नव्हे ॥४६॥
परम शिवभक्त विख्यात ॥ दानशील उदार बहुत ॥ सोमवार प्रदोषव्रत ॥
शिवरात्र करी नेमेसी ॥४७॥
अन्नछत्र सदा चालवीत ॥ नित्य लक्षत्रिदळे शिव
पूजित ॥ ब्राह्मणहस्ते अद्भुत ॥ अभिषेक करवी शिवासी ॥४८॥
याचक मनी जे जे
इच्छीत ॥ ते ते महानंदा पुरवीत ॥ कोटि लिंगे करवीत ॥ श्रावणमासी अत्यादरे
॥४९॥
ऐक भद्रसेना सावधान ॥ कुक्कुट मर्कट पाळिले प्रीतीकरून ॥ त्यांच्या गळा
रुद्राक्ष बांधोन ॥ नाचू शिकविले कौतुके ॥५०॥
आपुले जे का नृत्यागार ॥ तेथे
शिवलिंग स्थापिले सुंदर ॥ कुक्कुट मर्कट त्यासमोर ॥ तेथेंचि बांधी प्रीतीने
॥५१॥
करी शिवलीलामृतपुराणश्रवण ॥ तेही ऐकती दोघेजण ॥ सवेंचि महानंदा करी
गायन ॥ नृत्य करी शिवापुढे ॥५२॥
महानंदा त्यांसी सोडून ॥ नृत्य करवी
कौतुकेकरून ॥ त्यांच्या गळा कपाळी जाण ॥ विभूति चर्ची स्वहस्ते ॥५३॥
एवं
तिच्या संगतीकरून ॥ त्यांसही घडतसे शिवभजन ॥ असो तिचे सत्त्व पाहावयालागोन ॥ सदाशिव
पातला ॥५४॥
सौदागराचा वेष धरिला ॥ महानंदेच्या सदना आला ॥ त्याचे स्वरूप
देखोनि ते अबला ॥ तन्मय झाली तेधवा ॥५५॥
पूजा करोनि स्वहस्तकी ॥ त्यासी
बैसविले रत्नमंचकी ॥ तो पृथ्वीमोलाचे हस्तकी ॥ कंकण त्याच्या देखिले
॥५६॥
देखता गेली तन्मय होऊन ॥ म्हणे स्वर्गीची वस्तु वाटे पूर्ण ॥
विश्वकर्म्याने निर्मिली जाण ॥ मानवी कर्तृत्व हे नव्हे ॥५७॥
सौदागरे ते
काढून ॥ तिच्या हस्तकी घातले कंकण ॥ येरी होवोनि आनंदघन ॥ नेम करी तयासी
॥५८॥
पृथ्वीचे मोल हे कंकण ॥ मीहि बत्तीस लक्षणी पद्मिण ॥ तीन दिवस संपूर्ण
॥ दासी तुमची झाले मी ॥५९॥
तयासी ते मानले ॥ सवेंचि त्याने दिव्यलिंग काढिले
॥ सूर्यप्रभेहूनि आगळे ॥ तेज वर्णिले नवजाय ॥६०॥
लिंग देखोनि ते वेळी ॥
महानंदा तन्मय झाली ॥ म्हणे जय जय चंद्रमौळी ॥ म्हणोनी वंदी लिंगाते
॥६१॥
म्हणे या लिंगाच्या प्रभेवरूनी ॥ कोटि कंकणे टाकावी ओवाळूनी ॥ सौदागर
म्हणे महानंदेलागूनी ॥ लिंग ठेवी जतन हे ॥६२॥
म्हणे या लिंगापाशी माझा प्राण
॥ भंगले की गेले दग्ध होऊन ॥ तरी मी अग्निप्रवेश करीन ॥ महाकठीण व्रत माझे
॥६३॥
येरीने अवश्य म्हणोन ॥ ठेविले नृत्यागारी नेऊन ॥ मग दोघे करिती शयन ॥
रत्नखचित मंचकी ॥६४॥
तिचे कैसे आहे सत्त्व ॥ धैर्य पाहे सदाशिव ॥ भक्त
तारावया अभिनव ॥ कौतुकचरित्र दाखवी ॥६५॥
त्याच्या आज्ञेकरून ॥ नृत्यशाळेस
लागला अग्न ॥ जन धावो लागले चहूकडोन ॥ एकचि हांक जाहली ॥६६॥
तीस सावध करी
मदनारी ॥ म्हणे अग्नि लागला ऊठ लवकरी ॥ येरी उठली घाबरी ॥ तव वातात्मज चेतला
॥६७॥
तैशामाजी उडी घालून ॥ कंठपाश त्यांचे काढून ॥ कुक्कुट मर्कट दिधले
सोडून ॥ गेले पळोन वनाप्रती ॥६८॥
नृत्यशाळा भस्म झाली समग्र ॥ मग शांत झाला
सप्तकर ॥ यावरी पुसे सौदागर ॥ महानंदेप्रति तेधवा ॥६९॥
माझे दिव्यलिंग आहे
की जतन ॥ महानंदा घाबरी ऐकोन ॥ वक्षःस्थळ घेत बडवून ॥ म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले
॥७०॥
सौदागर बोले वचन ॥ नेमाचा आजि दुसरा दिन ॥ मी आपुला देतो प्राण ॥
लिंगाकारणे तुजवरी ॥७१॥
मग त्रिचरण चेतविला ॥ आकाशपंथे जाती ज्वाळा ॥ सौदागर
सिद्ध झाला ॥ समीप आला कुंडाच्या ॥७२॥
अतिलाघवी उमारंग ॥ जो भक्तजनभवभंग ॥
उडी घातली सवेग ॥ ॐनमःशिवाय म्हणवुनी ॥७३॥
ऐसे देखता महानंदा ॥ बोलाविले
सर्व ब्रह्मवृंदा ॥ लुटविली सर्व संपदा ॥ कोशसमवेत सर्वही ॥७४॥
अश्वशाळा
गजशाळा संपूर्ण ॥ सर्व संपत्तिसहित करी गृहदान ॥ महानंदेने स्नान करून ॥ भस्म अंगी
चर्चिले ॥७५॥
रुद्राक्ष सर्वांगी लेऊन ॥ ह्रदयी चिंतिले शिवध्यान ॥ हर हर
शिव म्हणवून ॥ उडी निःशंक घातली ॥७६॥
सूर्यबिंब निघे उदयाचळी ॥ तैसा प्रगटला
कपाळमौळी ॥ दशभुज पंचवदन चंद्रमौळी ॥ संकटी पाळी भक्तांते ॥७७॥
माथा जटांचा
भार ॥ तृतीयनेत्री वैश्वानर ॥ शिरी झुळझुळ वाहे नीर ॥ भयंकर महाजोगी
॥७८॥
चंद्रकळा तयाचे शिरी ॥ नीळकंठ खट्वांगधारी ॥ भस्म चर्चिले शरीरी ॥
गजचर्म पांघुरला ॥७९॥
नेसलासे व्याघ्रांबर ॥ गळा मनुष्यमुंडाचे हार ॥
सर्वांग वेष्टित फणिवर ॥ दशभुजा मिरविती ॥८०॥
वरचेवरी कंदुक झेलीत ॥ तेवी
दहा भुजा पसरोनी अकस्मात ॥ महानंदेसी झेलूनि धरीत ॥ ह्रदयकमली परमात्मा
॥८१॥
म्हणे जाहलो मी सुप्रसन्न ॥ महानंदे माग वरदान ॥ ती म्हणे हे नगर
उद्धरून ॥ विमानी बैसवी दयाळा ॥८२॥
माताबंधूसमवेत ॥ महानंदा विमानी बैसत ॥
दिव्यरूप पावोनि त्वरित ॥ नगरासमवेत चालली ॥८३॥
पावली सकळ शिवपदी ॥ जेथे
नाही आधिव्याधी ॥ क्षुधातृषाविरहित त्रिशुद्धी ॥ भेदबुद्धि कैची तेथे
॥८४॥
नाही काम क्रोध द्वंद्व दुःख ॥ मद मत्सर नाही निःशंक ॥ जेथींचे गोड उदक
॥ अमृताहूनि कोटिगुणे ॥८५॥
जेथे सुरतरूंची वने अपारे ॥ सुरभींची बहुत
खिल्लारे ॥ चिंतामणींची धवलागारे ॥ भक्ताकारणे निर्मिली ॥८६॥
जेथे वोसणता
बोलती शिवदास ॥ ते ते प्राप्त होय तयास ॥ शिवपद सर्वदा अविनाश ॥ महानंदा तेथे पावली
॥८७॥
हे कथा परम सुरस ॥ पराशर सांगे भद्रसेनास ॥ म्हणे हे कुमर दोघे निःशेष
॥ कुक्कुट मर्कट पूर्वींचे ॥८८॥
कंठी रुद्राक्षधारण ॥ भाळी विभूति चर्चून ॥
त्याचि पूर्वपुण्येकरून ॥ सुधर्म तारक उपजले ॥८९॥
हे पुढे राज्य करतील
निर्दोष ॥ बत्तीस लक्षणी डोळस ॥ शिवभजनी लाविती बहुतांस ॥ उद्धरितील तुम्हांते
॥९०॥
अमात्यसहित भद्रसेन ॥ गुरूसी घाली लोटांगण ॥ म्हणे इतुकेन मी धन्य ॥
सुपुत्र उदरी जन्मले ॥९१॥
भद्रसेन बोलत पुढती ॥ हे राज्य किती वर्षै करिती ॥
आयुष्यप्रमाण किती ॥ सांगा यथार्थ गुरुवर्या ॥९२॥
बहुत करिता नवस ॥ एवढाचि
पुत्र आम्हांस ॥ परम प्रियकर राजस ॥ प्राणांहूनि आवडे बहु ॥९३॥
तुमच्या
आगमनेकरून ॥ स्वामी मज समाधान ॥ तरी या पुत्राचे आयुष्यप्रमाण ॥ सांगा स्वामी मज
तत्त्वता ॥९४॥
ऋषि म्हणे मी सत्य बोलेन देख ॥ परी तुम्हांसी ऐकता वाटेल दुःख
॥ हे सभा सकळिक ॥ दुःखार्णवी पडेल पै ॥९५॥
प्रत्ययसदृश बोलावे वचन ॥ ना तरी
आंगास येते मूर्खपण ॥ तुम्हा वाटेल विषाहून ॥ विशेष ऐसी ते गोष्टी
॥९६॥
भद्रसेन म्हणे सत्य वचन ॥ बोलावया न करावा अनमान ॥ तरी तुझ्या पुत्रासी
बारा वर्षे पूर्ण ॥ झाली असता जाणपा ॥९७॥
आजपासोनि सातवे दिवशी ॥ मृत्यु
पावेल या समयासी ॥ राव ऐकता धरणीसी ॥ मूर्च्छा येऊनि पडियेला
॥९८॥
अमात्यासहित त्या स्थानी ॥ दुःखाग्नीत गेले आहाळोनी ॥ अंतःपुरी सकळ
कामिनी ॥ आकांत करिती आक्रोशे ॥९९॥
करूनिया हाहाकार ॥ वक्षःस्थळ पिटी नृपवर
॥ मग रायासी पराशर ॥ सावध करोनि गोष्ट सांगे ॥१००॥
नृपश्रेष्ठा न सोडी धीर ॥
ऐक एक सांगतो विचार ॥ जै पंचभूते नव्हती समग्र ॥ शशिमित्र नव्हते तै
॥१॥
नव्हता मायामय विकार ॥ केवळ ब्रह्ममय साचार ॥ तेथे झाले स्फुरणजागर ॥
अहं ब्रह्म म्हणोनिया ॥२॥
ते ध्वनि माया सत्य ॥ तेथोनि जाहले महत्तत्त्व ॥
मग त्रिविध अहंकार होत ॥ शिवइच्छेकरूनिया ॥३॥
सत्त्वांशे निर्मिला पीतवसन ॥
रजांशे सृष्टिकर्ता द्रुहिण ॥ तमांशे रुद्र परिपूर्ण ॥ सर्गस्थित्यंत करविता
॥४॥
विधीसी म्हणे सृष्टि रची पूर्ण ॥ येरू म्हणे मज नाही ज्ञान ॥ मग शिवे
तयालागून ॥ चारी वेद उपदेशिले ॥५॥
चहू वेदांचे सार पूर्ण ॥ तो हा
रुद्राध्याय परम पावन ॥ त्याहूनि विशेष गुह्य ज्ञान ॥ भुवनत्रयी असेना
॥६॥
बहुत करी हा जतन ॥ त्याहूनि आणिक थोर नाही साधन ॥ हा रुद्राध्याय शिवरूप
म्हणून ॥ श्रीशंकर स्वये बोले ॥७॥
जे रुद्राध्याय ऐकती पढती ॥ त्यांच्या
दर्शने जीव उद्धरती ॥ मग कमलोद्भव एकांती ॥ सप्तपुत्रा सांगे रुद्र हा
॥८॥
मग सांप्रदाये ऋषीपासोन ॥ भूतली आला अध्याय जाण ॥ थोर जप तप ज्ञान ॥
त्याहूनि अन्य नसेचि ॥९॥
जो हा अध्याय जपे संपूर्ण ॥ त्याचेनि दर्शने तीर्थे
पावन ॥ स्वर्गीचे देव दर्शन ॥ त्याचे घेऊ इच्छिती ॥११०॥
जप तप शिवार्चन ॥
याहूनि थोर नाही जाण ॥ रुद्रमहिमा अगाध पूर्ण ॥ किती म्हणोनि वर्णावा
॥११॥
रुद्रमहिमा वाढला फार ॥ ओस पडिले भानुपुत्रनगर ॥ पाश सोडोनि यमकिंकर ॥
रिते हिंडो लागले ॥१२॥
मग यमे विधिलागी पुसोन ॥ अभक्तिकृत्या निर्मिली दारुण
॥ तिणे कुतर्कवादी भेदी लक्षून ॥ त्यांच्या ह्रदयी संचरली ॥१३॥
त्यांसी
मत्सर वाढविला विशेष ॥ वाटे करावा शिवद्वेष ॥ तेणे ते जावोनि यमपुरीस महानरकी पडले
सदा ॥१४॥
यम सांगे दुतांप्रती ॥ शिवद्वेषी जे पापमती ॥ ते अल्पायुषी होती ॥
नाना रीती जाचणी करा ॥१५॥
शिव थोर विष्णु लहान ॥ हरि विशेष हर गौण ॥ ऐसे
म्हणती जे त्यालागून ॥ आणोनि नरकी घालावे ॥१६॥
रुद्राध्याय नावडे ज्यासी ॥
कुंभीपाकी घालावे त्यासी ॥ रुद्रानुष्ठाने आयुष्यासी ॥ वृद्धि होय निर्धारे
॥१७॥
याकरिता भद्रसेन अवधारी ॥ अयुत रुद्रावर्तने करी ॥ शिवावरी अभिषेकधार
धरी ॥ मृत्यु दूरी होय साच ॥१८॥
अथवा शतघट स्थापून ॥ दिव्यवृक्षांचे पल्लव
आणून ॥ रुद्रे उदक अभिमंत्रून ॥ अभिषिंचन पुत्रा करी ॥१९॥
नित्य दहा सहस्त्र
आवर्तने पूर्ण ॥ क्षोणीपाळा करी सप्तदिन ॥ राये धरिले दृढ चरण ॥ सद्गद होवोनि बोलत
॥१२०॥
सकळऋषिरत्नमंडितपदक ॥ स्वामी तू त्यात मुख्य नायक ॥ काळ मृत्यु भय शोक
॥ गुरु रक्षी त्यांपासूनि ॥२१॥
तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण ॥ तुजसवे जे
आहेत ब्राह्मण ॥ आणीक सांगती ते बोलावून ॥ आताचि आणितो आरंभी ॥२२॥
मग
सहस्त्र विप्र बोलावून ॥ ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ति पूर्ण ॥ न्यासध्यानयुक्त
पढून ॥ गुरूपासून जे आले ॥२३॥
परदारा आणि परधन ॥ ज्यांची वमनाहूनि नीच पूर्ण
॥ विरक्त सुशील गेलिया प्राण ॥ दुष्ट प्रतिग्रह न घेती ॥२४॥
जे
शापानुग्रहसमर्थ ॥ सामर्थ्यो चालो न देती मित्ररथ ॥ किंवा साक्षात उमानाथ ॥ पुढे
आणोनि उभा करिती ॥२५॥
ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण ॥ बैसला व्यासपिता घेऊन ॥
सहस्त्र घट मांडून ॥ अभिमंत्रोनि स्थापिले ॥२६॥
स्वर्धुनीचे सलिल भरले पूर्ण
॥ त्यांत आम्रपल्लव घालून ॥ रुद्रघोषे गर्जिन्नले ब्राह्मण ॥ अनुष्ठान दिव्य
मांडिले ॥२७॥
शास्त्रसंख्या झाले दिवस ॥ सातवे दिवशी मध्याह्नी आला चंडांश ॥
मृत्युसमय येता धरणीस ॥ बाळ मूर्च्छित पडियेला ॥२८॥
एक मुहूर्त निचेष्टित ॥
चलनवलन राहिले समस्त ॥ परम घाबरला नृपनाथ ॥ गुरु देत नाभीकारा ॥२९॥
रुद्रोदक
शिंपून ॥ सावध केला राजनंदन ॥ त्यासी पुसती वर्तमान ॥ वर्तले तेचि सांगत
॥१३०॥
एक काळपुरुष भयानक थोर ॥ ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर ॥ विक्राळ दाढा
भयंकर ॥ नेत्र खादिरांगासारखे ॥३१॥
तो मज घेऊनि जात असता ॥ चौघे पुरुष
धावोनि आले तत्त्वता ॥ पंचवदन दशभुज त्यांची साम्यता ॥ कमळभवांडी दुजी नसे
॥३२॥
ते तेजे जैसे गभस्ती ॥ दिगंततम संहारिती ॥ भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती
॥ दश हस्ती आयुधे ॥३३॥
ते महाराज येऊन ॥ मज सोडविले तोडोनि बंधन ॥ त्या
काळपुरुषासी धरून ॥ करीत ताडण गेले ते ॥३४॥
ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर ॥
भद्रसेन करी जयजयकार ॥ ब्राह्मणांसी घाली नमस्कार ॥ आनंदाश्रु नेत्री आले
॥३५॥
अंगी रोमांच दाटले ॥ मग विप्रचरणी गडबडा लोळे ॥ शिवनाम गर्जत तये वेळे
॥ देव सुमने वर्षती ॥३६॥
अनेक वाद्यांचे गजर ॥ डंक गर्जे अवघ्यात थोर ॥
मुखद्वयांची महासुस्वर ॥ मृदंगवाद्ये गर्जती ॥३७॥
अनेक वाद्यांचे गजर ॥
शिवलीला गाती अपार ॥ श्रृंगेभृंगे काहाळ थोर ॥ सनया अपार वाजती
॥३८॥
चंद्रानना धडकती भेरी ॥ नाद न माये नभोदरी ॥ असो भद्रसेन यावरी
विधियुक्त होम करीतसे ॥३९॥
षड्रस अन्ने शोभिवंत ॥ अलंकार दिव्य वस्त्रे देत
॥ अमोलिक वस्तु अद्भुत ॥ आणोनि अर्पी ब्राह्मणांसी ॥१४०॥
दक्षिणेलागी
भांडारे ॥ मुक्त केली राजेंद्रे ॥ म्हणे आवडे तितुके भरा एकसरे ॥ मागे पुढे पाहू
नका ॥४१॥
सर्व याचक केले तृप्त ॥ पुरे पुरे हेचि ऐकिली मात ॥ धनभार झाला
बहुत ॥ म्हणोनि सांडिती ठायी ठायी ॥४२॥
ब्राह्मण देती मंत्राक्षता ॥ विजय
कल्याण हो तुझिया सुता ॥ ऐसा अति आनंद होत असता ॥ तो अद्भुत वर्तले
॥४३॥
वसंत येत सुगंधवनी ॥ की काशीक्षेत्रावरी स्वर्धुनी ॥ की श्वेतोत्पले
मृडानी ॥ रमण लिंग अर्जिचे ॥४४॥
की निर्दैवासी सापडे चिंतामणी ॥ की
क्षुधितापुढे क्षीराब्धि ये धावूनी ॥ तैसा कमलोद्भवनंदन ते क्षणी ॥ नारदमुनी पातला
॥४५॥
वाल्मीक सत्यवतीनंदन ॥ औत्तानपादीकयाधुह्रदयरत्न ॥ हे शिष्य ज्याचे
त्रिभुवनी जाण ॥ वंद्य जे का सर्वांते ॥४६॥
जो चतुःषष्टिकळाप्रवीण निर्मळ ॥
चतुर्दश विद्या करतळामळ ॥ ज्याचे स्वरूप पाहता केवळ ॥ नारायण दुसरा की
॥४७॥
हे कमळभवांड मोडोनी ॥ पुनःसृष्टि करणार मागुतेनी ॥ अन्याय विलोकिता
नयनी ॥ दंडे ताडील शक्रादिका ॥४८॥
तो नारद देखोनि तेचि क्षणी ॥ कुंडांतूनि
मूर्तिमंत निघे अग्नी ॥ दक्षिणग्नि गार्हपत्य आहवनी ॥ उभे ठाकले देखता
॥४९॥
पराशरादि सकळ ब्राह्मण ॥ प्रधानासहित भद्रसेन ॥ धावोनि धरिती चरण ॥
ब्रह्मानंदे उचंबळले ॥१५०॥
दिव्य गंध दिव्य सुमनी ॥ षोडशोपचारे पूजिला
नारदमुनी ॥ राव उभा ठाके कर जोडोनी ॥ म्हणे स्वामी अतींद्रियद्रष्टा तू
॥५१॥
त्रिभुवनी गमन सर्व तुझे ॥ काही देखिले सांग अपूर्व ॥ नारद म्हणे
मार्गी येता शिव ॥ दूत चौघे देखिले ॥५२॥
दशभुज पंचवदन ॥ तिही मृत्यु नेला
बांधोन ॥ तुझ्या पुत्राचे चुकविले मरण ॥ रुद्रानुष्ठाने धन्य केले ॥५३॥
तव
पुत्ररक्षणार्थ ते वेळा ॥ शिवे वीरभद्रमुख्य पाठविला ॥ मज देखता मृत्यूसी पुसू
लागला ॥ शिवसुत ऐका ते ॥५४॥
तू कोणाच्या आज्ञेवरून ॥ आणीत होतासी
भद्रसेननंदन ॥ त्यासी दहा सहस्त्र वर्षे पूर्ण ॥ आयुष्य असे निश्चये ॥५५॥
तो
सार्वभौम होईल तत्त्वता ॥ रुद्रमहिम तुज ठाऊक अस्ता ॥ शिवमर्यादा उल्लंघूनि
तत्त्वता ॥ कैसा आणीत होतासी ॥५६॥
मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन ॥ पत्रिका
पाहिली वाचून ॥ तव द्वादशवर्षी मृत्युचिन्ह ॥ गंडांतर थोर होते ॥५७॥
ते
महत्पुण्ये निरसूनि सहज ॥ दहा सहस्त्र वर्षे करावे राज्य ॥ मग तो सूर्यनंदन महाराज
॥ स्वापराधे कष्टी बहू ॥५८॥
मग उभा ठाकूनि कृतांत ॥ कर जोडोनि स्तवन करीत ॥
हे अपर्णाधव हिमनगजामात ॥ अपराध न कळत घडला हा ॥५९॥
ऐसे नारद सांगता ते
क्षणी ॥ राये पायावरी घातली लोळणी ॥ आणीक सहस्त्र रुद्र करूनी ॥ महोत्साह करीतसे
॥१६०॥
शतरुद्र करिता निःशेष ॥ शतायुषी होय तो पुरुष ॥ हा अध्याय पढता
निर्दोष ॥ तो शिवरूप याचि देही ॥६१॥
तो येथेचि झाला मुक्त ॥ त्याच्या तीर्थे
तरती बहुत ॥ असो यावरी ब्रह्मसुत ॥ अंतर्धान पावला ॥६२॥
आनंदमय शक्तिनंदन ॥
राये शतपद्म धन देऊन ॥ तोषविला गुरु संपूर्ण ॥ ऋषींसहित जाता झाला ॥६३॥
हे
भद्रसेन आख्यान जे पुढती ॥ त्यासी होय आयुष्य संतती ॥ त्यांसी काळ न बाधे अंती ॥
वंदोनि नेती शिवपदा ॥६४॥
दशशत कपिलादान ॥ ऐकता पढता घडे पुण्य ॥ केले असेल
अभक्ष्यभक्षण ॥ सुरापान ब्रह्महत्या ॥६५॥
एवं महापापपर्वत तत्त्वता ॥ भस्म
होती श्रवण करिता ॥ हा अध्याय त्रिकाळ वाचिता ॥ गंडांतरे दूर होती
॥६६॥
यावरी कलियुगी निःशेष ॥ शिवकीर्तनाचा महिमा विशेष ॥ आयुष्यहीन लोकांस ॥
अनुष्ठान हेचि निर्धारे ॥६७॥
मग तो राव भद्रसेन ॥ सुधर्म पुत्रासी राज्य
देऊन ॥ युवराज्य तारकालागून ॥ देता झाला ते काळी ॥६८॥
मग प्रधानासमवेग राव
जाणा ॥ जाता झाला तपोवना ॥ शिवअनुष्ठान रुद्राध्याना ॥ करिता महारुद्र तोषला
॥६९॥
विमानी बैसवूनि त्वरित ॥ राव प्रधान नेले मिरवित ॥ विधिलोकी वैकुंठी
वास बहुत ॥ स्वेच्छेकरूनि राहिले ॥१७०॥
शेवटी शिवपदासी पावून ॥ राहिले
शिवरूप होऊन ॥ हा अकरावा अध्याय जाण ॥ स्वरूप एकादश रुद्रांचे ॥७१॥
हा
अध्याय करिता श्रवण ॥ एकादश रुद्र समाधान ॥ की हा कल्पद्रुम संपूर्ण ॥ इच्छिले फळ
देणार ॥७२॥
मृत्युंजयजप रुद्रानुष्ठन ॥ त्यासी न बाधी ग्रहपीडा विघ्न ॥
पिशाचबाधा रोग दारुण ॥ न बाधीच सर्वथाही ॥७३॥
येथे जो मानील अविश्वास ॥ तो
होईल अल्पायुषी तामस ॥ हे निंदी तो चांडाळ निःशेष ॥ त्याचा विटाळ न व्हावा
॥७४॥
त्यासी प्रसवोनि वांझ झाली माता ॥ त्याची संगती न धरावी तत्त्वता ॥
त्यासी संभाषण करिता ॥ महापातक जाणिजे ॥७५॥
ते आपुल्या गृहासी न आणावे ॥ आपण
त्यांच्या सदनासी न जावे ॥ ते त्यजावे जीवेभावे ॥ जेवी सुशील हिंसकगृह
॥७६॥
जो प्रत्यक्ष भक्षितो विष ॥ जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस ॥ त्यांसी
मृत्यु आला या गोष्टीस ॥ संदेह काही असेना ॥७७॥
असो सर्वभावे निश्चित ॥ अखंड
पहावे शिवलीलामृत ॥ हे न घडे तरी त्वरित ॥ हा अध्याय तरी वाचावा ॥७८॥
या
अध्यायाचे करिता अनुष्ठान ॥ तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य ॥ त्याचे घरी अनुदिन
॥ ब्रह्मानंद प्रगटेल ॥७९॥
अपर्णाह्रदयाब्जमिलिंद ॥ श्रीधरस्वामी तो
ब्रह्मानंद ॥ जो जगदानंदमूळकंद ॥ अभंग न विटे कालत्रयी ॥१८०॥
शिवलीलामृत
ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ एकादशाध्याय गोड
हा ॥१८१॥
इति एकादशोऽध्यायः समाप्तः
॥११॥
॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु॥
No comments:
Post a Comment