December 7, 2019

भूपाळी

.*दश  दिशा " भूपाळी " म्हणती* . . . . .

वरची ओळ वाचलेल्यांच्या मनात पहिले वाक्य ही नकळत पणे आले असणार ते म्हणजे
 ' *प्रभाती  सूर नभी रंगती* ' 🎼

काय जादू  होती ना या पहाटेचा  गाण्यांमध्ये , अगदी तोंडपाठ असायची ही गाणी .

*भूपाळी*  - रात्री शेजारती झाल्यावर मंदिराचा गाभारा बंद करून आपण जस झोपी जातो तसे साक्षात देवही झोपी जातात आणि मग पहाटे  पूजा-अर्चा, काकड आरती करण्याआधी  गाणे म्हणून  म्हणजेच भूपाळी ने  त्यांना जागे करण्याची  ही प्रथा .

फारच कल्पक. पहाट वेळच्या निसर्गाचे, पक्षी,प्राणी, सृष्टी यांचे हुबेहूब वर्णन या भक्ती गीतांतून/ भूपाळीतून बघायला मिळते. ही बरीचशी गाणी ' भूप ' रागात आढळतात.

काही गाण्यातून स्वत: ला आठवण करून देणे , की बाबा आजची पहाट तू पहात आहेस त्या  विध्यात्याचे आभार मान.  कुठल्याही गोष्टीची सुरवात  गणपतीला स्मरुन करावी

*उठा उठा हो सकळिक वाचे स्मरावा गजमुख*
रिध्दीसिद्धी चा नायक  सुखदायक भक्तांसी

तुझ्या कांतीसम रक्तपताका
पूर्वदिशा उजळती
अरुण उगवला, पहाट झाली
*उठ महा-गणपती*🙏🏻🌺

सृष्टीचा पालनकर्ता  जागा झालाय , केवढा आनंद , तो इतरांनाही कळावा म्हणून इतरांनाही जागे करायचे

*उठा सकलजन उठिले नारायण*
आनंदले मुनिजन तिन्ही लोक

पण काही भूपाळ्या ह्या  मानवी अवतारात असताना 'देव लहान होते'  त्यावेळी त्यांना जागे करण्यासाठीच्या असाव्यात असा माझा अंदाज

रात्री कौसल्या माता छोट्या रामाला  गोष्ट सांगत असताना  तो आकाशातला चंद्र हातात पाहिजे म्हणून हट्ट करतो. मग सुमंत एक आरसा रामाच्या हातात ठेऊन त्याचे प्रतिबिंब आरशात पाडून बाळ श्रीरामाचे  समाधान करतात. श्रीराम झोपी जातात.  त्यांना जाग करण्यासाठी म्हणल्या गेलेल्या भूपाळीत त्याचे वर्णनं किती छान केलय बघा :-

*काल  दर्पणी चंद्र दावुनी सुमंत गेले गृहा*
*त्याच दर्पणी आज राघवा सूर्योदय पहा*
*वसिष्ठ मुनिवर घेऊन गेले* *पूजापात्र राउळी*
*उभी घेउनी कलश दुधाचा* *कौसल्या माऊली*

*उठी श्री रामा* . . . . .
सुरेख वर्णन  ना  ?

असेच वर्णन ' श्रीकृष्णासाठी पण बरं का ? आजही आपण आपल्या मुलांना उठवताना म्हणतोच की उठ हा लवकर , आवर , शाळेचे वाहन येईल किंवा रविवारी अरे तो तुझा मित्र  आला बघ आवरुन,  उठ, आवर इ इ ,

*घनश्याम  सुदंरा श्रीधरा अरुणोदय झाला*
*उठी लवकरी वनमाळी उदयाचळी मित्र आला* .

इथे मित्र म्हणजे साक्षात  रवी / सूर्य असला तरी  मला इथे कुठेतरी  गोविंदाचा लाडका सुदामा ही असू शकेल असे कायम  वाटत राहिले आहे

 भूपाळी  ज्याच्यात  त्या त्या देवतांची स्तुती केली आहे , त्यांच्या चांगल्या गुणाचे वर्णन केले आहे .  हे प्रत्यक्षात त्यांचासाठी आहे आणि शिवाय  आपल्यातील त्याचा अंशाला  ' देवत्वाला ' / आत्म्याला  केलेली ही आळवणी  असावी असे माझे ठाम मत

उठी उठी सद्गुरू माय, अरुणोदय झाला  - गोंदवलेकर महाराज
उठा उठा श्री  साईनाथ गुरु,  - साईबाबा
उठ पंढरीच्या राजा  - विठ्ठल
उठी गोविंदा, उठी गोपाला
चल उठ रे मुकुंदा
उठ जगत माऊली
उठा उठा श्री गजानना

अशा अनेक भूपाळ्या अनेकांना पाठ असतील , रोज ते म्हणत ही असतील

आमच्या इथे शांतिनिकेत वसतिगृहात पहाटे  ५ वाचता  भूपाळी , भक्ती गीते लागायची आणि  पहाटेचा जो " *उष:काल झाला* .. "  त्याचे चैतन्य जाणवू लागायचे .  मला तर खात्री आहे त्या वसतिगृहातील  मुले / मुली    कँटीनमधल्या कौसल्या माई कलश चहाचा  घेऊन यायचा आधीच त्यांचे " *उठी लवकरी* '  होत असणार


*उठा उठा सकाळ झाली , अमुक साबणाने  अभ्यंगस्नान करायची वेळ झाली*  ही जहिरात  पाठ असणा-या नव्या पिढीला  या वरच्या  भूपाळी / अभंग  माहीत असतील  ही अाशा.
मात्र ज्यांना या भूपाळीचा वगैरे अजिबात गंध नाही  त्याचासाठी  या खास चार ओळींनी लेखनाचा शेवट

नित्य रोज सकाळी
ऐकावी भूपाळी
प्रारब्द्ध नसता कपाळी
तो अभागी  एक

📝७/१२/१९
देवा तुझ्या द्वारी आलो

kelkaramol.blogspot.in

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या