June 30, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३० जून २०१४

३० जून

ऐसा करावा काही नेम ।
जेणे जोडेल आत्माराम ॥ 

 

ऐसा करावा काही नेम । जेणे जोडेल आत्माराम ॥
नेम असावा शाश्वताचा । जेणे राम कृपा करील साचा ॥
नेम असावा वाचा मन । जेणे संतुष्ट होईल रघुनंदन ॥
कर्तव्यात गुंतवावे शरीर । जेणे संतोषे रघुवीर ॥
सतीला नसे दुजे दैवत जाण । तिला पति एकच प्रमाण ॥
न पाहावे त्याचे दोष गुण । आपले कर्तव्य करावे जतन ॥
पतिव्रताधर्म श्रेष्ठ भारी । वंदिताती संत महामुनि ॥
पति‍आज्ञा प्रमाण । हेच मुख्य साध्वीचे लक्षण जाण ॥
न बोलावे उणेपुरे । जे परमात्म्यास न आवडेल खरे ॥
संतति वा संपत्ति । भगवत्कृपेने ज्याची प्राप्ति ॥
त्याचे करावे रक्षण । पण न गुंतू द्यावे मन ॥
जे आवडेल पतीला पाही । तो तो आपला धर्मच राही ॥
मनाने करावे भगवंत स्मरण । जेणे चुकेल जन्ममरण ॥
अखंड राखावे समाधान । चुको न द्यावे अनुसंधान ॥
काया गुंतवावी प्रपंचात । मन असावे रघुनाथात ॥
प्रपंचात राखावी खबरदारी । मन लावावे रामावरी ।
त्याचा राम होईल दाता । न करावी कशाची चिंता ॥
मुखी असावे नामस्मरण । हृदयात भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ।
शुद्ध राखावे आचरण । पवित्रतम अंतःकरण ।
मुखाने भगवंताचे स्मरण । त्यावर कृपा करील रघुनंदन ।
हा ठेवावा विश्वास । अनुभव येईल नक्की खास ॥
पतीस करावे एकदा तरी नमन । रामरूप जाणून ।
त्याचे जाणावे मनोगत । तैसे वर्तणे हे आपले हित ॥
ऐसा नेम ज्याचे घरी । राम उभा त्याचे दारी ॥
आल्या अतिथा अन्न द्यावे । कोणास विन्मुख न पाठवावे ॥
राम कर्ता हा ठेवा भाव । कमीपणाला नाही ठाव ॥
सर्वांचे उगमस्थान एक । हे धरावे चित्ती । त्याला नाही कशाची भीति ॥
रामाविण न पाहावे जग । समाधानाची खूण हीच सत्य ॥
जे जे काही यावे । ते ते रामापासून आले । हा ठेवावा भाव ॥
साक्षित्वाने देहाचा प्रपंच पाहावा । अंतरी रघुनाथ भजावा ॥
देहाची गति प्रारब्धाचे हाती । ऐसे शास्त्रे सांगती ।
परि न येई हे चित्तीं । एकच जगती माझा रघुपति ॥
मुखाने घ्यावे रामनाम । हृदयी परमात्म्याचे प्रेम ।
याहून दुजा न करावा विचार । हा ठेवावा निर्धार ॥
चातुर्मासांत करावी सुरुवात । अखंड चालवावा हा हेत ॥
थोडा नेम सांगतो कांही । तो करूनिया पाही ॥
घ्यावें भगवंताचें नाम । खात पीत, करीत असता काम ।
होईल तेवढे करावे जतन । परमात्मा पुरे करील हे जाणावे ॥
सर्वांस सांगावे आशीर्वाद । सर्वांनी जोडावा भगवंत ॥


१८२. मागणे तुम्हा एकच पाही । नामावाचून दूर कधी न राही ॥


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

June 29, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २९ जून २०१४

२९ जून

पुण्यतिथी कशी साजरी करावी ? 

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन

 

 

सत्पुरुषाची पुण्यतिथी कशी साजरी कराल ? या दिवशी जो नेम कराल तो सतत टिकण्यासारखा असतो. म्हणून आजपासून नामाशिवाय बोलायचे नाही असे आधीच ठरवा. नामांत राहण्याचा प्रयत्‍न करा, म्हणजे इथे आल्यासारखे काही केल्याचे श्रेय तरी मिळेल. इथे जो जो म्हणून आला त्याच्याजवळ आपण राहावे असे मला वाटते, पण तुम्हीच दार लावून ठेवले तर मी काय करणार ? पाहुणा घरी आला आणि त्याला दार उघडलेच नाही, तर तो काय करणार ? तसे विषयात राहून दारे बंद करून ठेवू नका. नामाचा उच्चार कंठी ठेवा, म्हणजे विषयाचा घाला होणार नाही. आता कली मातत चालला आहे; त्याचा घाला चुकवायचा असेल तर नामावर विश्वास ठेवा. कोणीही काहीही सांगितले तरी नाम सोडू नका. जसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसे तुम्ही नामाची कास घट्ट धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही.
समर्थांनी नामाच्या समासात सांगितले आहे तसे, नाम हेच रूप असे समजून घेत चला, म्हणजे रूप दिसेल. भगवंत हा आपल्या आतमध्ये प्रकट व्हायचा असल्यामुळे, नामस्मरणाच्या योगाने तो हळूहळू प्रकट होत जाणे हेच खरे हिताचे आणि कायमचे असते. डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणे, काहीतरी तेज दिसणे, दृष्टांत होणे, इत्यादि गोष्टी तात्पुरत्या असतात. एखादा अशक्त, हाडकुळा मनुष्य लठ्ठ होण्यासाठी 'अंगाला सूज येऊ दे' असे म्हणाला तर ते वेड्यासारखे होईल; याच्या उलट, त्याने नीट औषध घेतले तर तो कदाचित लठ्ठ होणार नाही, पण त्याचे शरीर मात्र घट्ट होईल. तसेच परमार्थाच्या अनुभवाचे आहे; आणि हा अनुभव वाढीला लागावा याकरिताच पुण्यतिथी साजरी करावी. नामस्मरण सतत केल्याने आज ना उद्या भगवंताचे प्रेम येईलच येईल. प्रपंचाच्या गर्दीमध्ये भगवंताचे स्मरण ठेवण्यासाठी उत्सव, सण, पुण्यतिथ्या, वगैरे असतात. खरोखर, प्रापंचिकाला कितीतरी पाश आहेत ! पैसा, लौकिक, मुले, मित्र, आप्त, वगैरे सर्व पाशच आहेत. अशा अनेक पाशांमध्येही नाम आवडीने घेणे किती कठीण आहे ! त्यामध्ये टिकणारा मनुष्य चांगला भक्कम असला पाहिजे. नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे. म्हणून नामात सत्संगतीही आहे. मोबदल्याची अपेक्षा न करता मनापासून नाम घ्यायचे आजच्या दिवसापासून ठरवा.


१८१. संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

June 28, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २८ जून २०१४

२८ जून

परमार्थ हे कृतीचे शास्त्र आहे. 

Add caption

 एकदा जनक राजाच्या घरी एक विद्वान आला, आणि आपण आल्याची वर्दी त्याने राजाला पाठविली. 'आता राजा आपली पूजा करील' असे त्याच्या मनात आले. हा त्याचा भाव समजून जनक राजाने निरोप पाठविला की, 'आपण एकटेच यावे.' त्याप्रमाणे, आपण अभिमानाचे गाठोडे बाहेर ठेवून मगच रामाकडे जावे; तसेच सद्‍गुरूच्या घरीही आपले भांडवल बाजूला ठेवूनच जावे. 'मी कोण' याची जाणीव जोपर्यंत राहते तोपर्यंत दुजेपण आलेच. अभिमान वाढविण्याकरिता देवाकडे नाही जाऊ. दुसर्‍याचे वाईट व्हावे असे आपल्याला वाटले की आपला अभिमान वाढीला लागला आहे असे जाणावे. पोराबाळांवर जितके प्रेम करता तितके प्रेम भगवंतावर करावे. आपली आणि भगवंताची इच्छा एकच होणे, हे परमार्थाचे सूत्र आहे. भगवंताची जी इच्छा तीच आपली करावी, आणि आनंदात राहावे. अगदी निःस्वार्थबुद्धीने केलेले कर्तव्य कधी वाया जात नाही. एखाद्या सावकाराकडे कोणाचे दागिने गहाण असले, तर त्याने आपल्या घरच्या लग्नामध्ये ते वापरणे हा अन्याय आहे. त्याचप्रमाणे, आपली मुलेबाळे ही देवाने आपल्याजवळ दिली आहेत, त्यांचे रक्षण करावे; ते कर्तव्य होईल. पण त्यांच्या ठिकाणी आपलेपणा ठेवून सुखदुःख भोगणे हे मात्र पाप आहे.
संन्याशाने भगवे वस्त्र धारण केल्यावर त्याचा थोडा तरी परिणाम बुद्धीवर होतोच. त्याचप्रमाणे आपण भजनपूजन करू लागल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर दिसला पाहिजे. जो शहाणा असेल त्याने समजून आणि जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने, बंधने पाळावीत. स्वतःच्या मताबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असावी, त्यात घोटाळा असू नये. मनाने आपण खंबीर झाले पाहिजे. ज्याप्रमाणे पांढरा कपडा मळण्याचा जास्त संभव असतो, त्याप्रमाणे सत्कर्माला विघ्ने फार येतात; त्यांना न जुमानता आपण सत्कर्म करावे. आचार आणि विचार ही दोन्ही जुळली म्हणजे उच्चारही तसाच येतो.
नारळात पाणी जितके गोड तेवढी खोबर्‍याला चव कमी; तसे, जेवढी विद्वत्ता जास्त तेवढी निष्ठा कमी. फार वाचू नका; जे काही थोडे वाचाल त्याचे मनन करा; आणि ते कृतीत आणा. जसे वडिलांचे पत्र वाचल्यावर आपण त्यातल्या मजकुराप्रमाणे कृती करतो, तशी ग्रंथ वाचनाच्या समाप्तीनंतर कृतीला सुरुवात करावी. परमार्थ हे सर्वस्वी कृतीचेच शास्त्र आहे. समाधान आणि आनंद हे त्या शास्त्राचे साध्य आहे. भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होतो.

१८०. सर्व काही करावे । पण खरे प्रेम साधनावर असावे ॥

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

June 27, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २७ जून २०१४


२७ जून

शाश्वतचे सुख कसे लाभेल ? 

 असे पाहा, एखादा प्रवचन करणारा घ्या; किंवा मोठा वैदिक कर्मे करणारा घ्या; त्याला त्यापासून समाधान मिळते असे नाही, तो असमाधानातच असतो. कळू लागल्यापासून आपण सदाचाराने वागत असून आणि देवधर्म करीत असूनही आपल्याला समाधान लाभत नाही, याचे कारण काय ? तर आपले ध्येय निश्चित झालेले नसते. आपण नीतिने वागतो ते लोकांच्या भितीने; कारण आपण वाईट वागलो तर लोक आपल्याला नावे ठेवतील. लौकिकासाठी केलेले कर्म कधीही समाधान देऊ शकत नाही. पापकर्म करणार्‍यालाही समाधान लाभत नाही, कारण त्यालासुद्धा आपण करतो हे वाईट आहे असे वाटतच असते. एकदा एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला, "देवापाशी काही न्याय नाही; तो अगदी अन्यायी आहे." मी त्याला विचारले, "असे झाले तरी काय ?" त्यावर तो म्हणाला, "मी कधी कोणाचा पैसा खाल्ला नाही, सदाचरणाने वागलो; पण मी फक्त एकमजली घर बांधू शकलो, आणि माझ्या हाताखाली काम करणार्‍या एका भिकारड्या कारकुनाने पैसा खाऊन माझ्या घरासमोर दुमजली घर बांधले !" मी त्याला विचारले, "मग तुम्ही का नाही पैसा खाल्ला ?" त्यावर तो म्हणाला, "मला तसे आवडत नाही; लोक नावे ठेवतील." तेव्हा, जे कर्म लौकिकासाठी केले त्याने कधीही समाधान मिळू शकणार नाही. प्रपंचात सुख लाभावे म्हणून आपण देवाचे करतो, आणि लौकिकासाठी नीतिधर्माने वागतो; मग त्यातून शाश्वतचे सुख कसे लाभेल ? अंगावर चांगले दागिने घातले, उत्तम लुगडे नेसले, परंतु कुंकू जर कपाळाला नसेल तर या सर्वांची काय किंमत ? तसेच, जर देवाचे प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपयोग होणार नाही. या‍उलट देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असूनसुद्धा जर नीतिधर्माचे आचरण नसेल, तर ती परमार्थाची इमारत टिकू शकणार नाही.
खरोखर परमार्थ अत्यंत सोपा आहे, विद्वान लोक तो उगीचच अवघड करून सांगतात. चांगले काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल. परमार्थ तीनपैकी कोणत्याही एका गोष्टीने साधू शकेल : एक, देहाने साधूची संगत; दुसरी, संतांच्या वाङ्‍मयाची संगत आणि त्याचप्रमाणे पुढे आचरण; आणि तिसरी, भगवंताचे नामस्मरण. नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल. संतांनी सांगितले ते संशय न घेता विश्वासाने करणे ही पहिली पायरी, आणि ते पुढे निश्चयाने, श्रद्धेने, आणि प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी. हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे.


१७९. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार;
भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव परमार्थ.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

June 26, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २६ जून २०१४

२६ जून

नियम थोडा करावा, पण तो शाश्वताचा असावा. 

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन

 ज्या झाडाची वाढ व्हावी असे आपल्याला वाटते, त्या झाडाला आपण पाणी घालतो, त्याची मशागत करतो, त्या झाडाकडे लक्ष पुरवितो. परंतु जे झाड वाढू नये असे वाटते, किंवा ज्या झाडाचे विशेष महत्त्व आपल्याला वाटत नाही, त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करतो. तसे, जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल, त्याची जोपासना करावी. देहाकडे, विचारांकडे, विषयांकडे दुर्लक्ष करावे, म्हणजे आपोआपच त्यांचा विसर पडेल. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची जोपासना करताना, त्याला गुराढोरांनी खाऊ नये म्हणून त्याच्याभोवती कुंपण घालावे लागते, त्याप्रमाणे परमार्थ हा खरा कुंपणातच ठेवावा; तो जितका गुप्त राहील तितका चांगला. त्याचे प्रदर्शन झाले तर त्याला दृष्ट लागते. म्हणून परमार्थ हा कोणाच्या न कळत, परंतु अत्यंत आवडीने करावा. झाड लावल्यावर ते किती वाढले आहे हे कुणी रोज उकरून पाहात नाही, त्याप्रमाणे अनुभवाच्या, प्रचीतीच्या मागे लागू नका; त्यामुळे प्रगती खुंटेल.
हट्टी आणि व्यसनी माणसे एका दृष्टीने मला आवडतात; कारण त्यांचा हट्ट भगवंताच्या मार्गाला लावला की झाले. परमार्थात नियम थोडाच करावा, पण तो शाश्वताचा असावा; म्हणजे, जेणेकरून भगवंताचे प्रेम लागेल याबद्दलचा असावा, आणि तो प्राणाबरोबर सांभाळावा. जे अत्यंत थोर भाग्याचे असतात त्यांनाच ध्यानमार्ग साधतो. हा मार्ग फार थोरांचा आहे. ध्यानामध्ये जगाचाच विसर पडतो; त्या अवस्थेमध्ये दिवस काय पण वर्षेसुद्धा जातील, पण त्याच्या देहाला काही होणार नाही. आपल्यासारख्याला साधनांत साधन म्हणजे भगवंताचे नाम; दानांत दान म्हणजे अन्नदान; आणि उपासनांत उपासना म्हणजे सगुणाची उपासना होय; या तिन्हींमुळे देहाचा विसर पडतो. म्हणून शक्य तो या तीन गोष्टींची कास धरा. मनुष्याची साहजिक प्रवृत्ती व्याप वाढविण्याकडे असते. द्वैत वाढवून त्यात अद्वैत पाहण्यात आनंद असतो हेही खरे. साधे मधमाश्यांचे उदाहरण घ्या. त्या अनेक झाडांवरून मध गोळा करतात आणि नंतर पोवळ्यात एकत्र करतात. असा एकत्र केलेल्या मधाचा केवढा गोड साठा होऊ शकतो बरे ! अशा रीतीने सर्व द्वैतामध्ये एक अद्वैत, म्हणजे एक राम, पहायला शिकावे; आणि ज्याला सर्वत्र राम पाहणे असेल त्याने स्वतःमध्येच राम पाहून, प्रत्येक कृती ही रामाची समजावी. स्वतःमध्ये राम पाहिल्याशिवाय तो सर्वत्र पाहता येणार नाही. तेव्हा स्वतःचा म्हणजेच देहाचा विसर पडल्याशिवाय सुख लाभणार नाही, आणि हा देहाचा विसर राममय झाल्यानेच होईल. म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहा.


१७८. परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते.


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

June 25, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २५ जून २०१४

२५ जून

सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. 

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन

 राम सहज हाती लागेल म्हणून जी काही साधने समर्थांनी सांगितली आहेत, त्यामध्ये चांगल्या ग्रंथांचे वाचन हेही एक आहे. परंतु कोणत्याही ग्रंथाचे अगर पोथीचे वाचन करताना, केवळ काहीतरी वाचायचे म्हणून वाचन करू नये. अर्थ कळल्याशिवाय पोथी खरी वाचल्यासारखे नाही होणार; तसेच जितका त्याचा अर्थ कळला तितके तरी कृतीत आणण्याचा प्रयत्‍न करावा. आपण जे करीत नाही ते प्रथम करायला सुरुवात करावी. भाराभर वाचले आणि कृती केली नाही, तर काय उपयोग ? चार मैलांचा रस्ता असला तर सबंध रस्ता एकदम दिसावा असे म्हटल्याने कसे होईल ? एक मैल रस्ता चालावा, म्हणजे पुढचे दिसेल. जसजशी मजल मारावी तसतसे पुढचे दिसू लागेल. परमार्थाचेही असेच आहे. बापासारख्या मिशा मला याव्या म्हणून लहान मुलाने हट्ट धरला तर कसे होईल ? त्याचप्रमाणे, आजच मला देवदर्शन व्हावे म्हटले तर कसे होईल ? सद्‍गुरूची आज्ञा पाळावी, साधन करू लागावे, म्हणजे सर्व काही होते. जेवायला बसले म्हणजे पोट भरायचे राहते का ?
खरोखर परमार्थाची वाट अगदी सरळ आहे; प्रपंचाचा रस्ता मात्र डोंगराळ असून काटेकुटे यांनी भरलेला आहे. आपला प्रपंच हा परमार्थाच्या सोयीसाठी असायला पाहिजे. पण याच्या उलट, आपला परमार्थच मुळी आपल्या प्रपंचाच्या सोयीसाठी आपण केला आहे. कुंपणाने शेत खावे तसे आपले झाले आहे. शेताला कुंपणाची जरूरी आहे; नाहीतर ढोरे आत येऊन शेत फस्त करतील. पण कुंपणच जर बेसुमार वाढले, तर त्यामुळे शेताचे नुकसान होते हे जाणले पाहिजे.
ज्याने व्यवहार तपासून केला, त्याला परमार्थ साधलाच. परमार्थ हा साखरेसारखा आहे. आपण साखरेचे कारले जरी केले तरी ते खायला गोड लागते, तसे प्रपंचातसुद्धा परमार्थ केला तरीही तो गोडच असतो. परमार्थ हा आपल्यासाठीच असल्याने तो आपल्याला शक्य आहे किंवा नाही हे विचार करून पाहावे; आणि तो आपल्याला शक्य आहे असे जर पटले, तर मात्र केल्याशिवाय राहू नये.
पोटात अन्न घालण्यासाठी जसे तोंड, त्याचप्रमाणे परमार्थाला सदाचरण आवश्यक आहे. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. पाया म्हणजे काही घर नव्हे; परंतु पायाशिवाय मात्र घर नव्हे, हे देखील तितकेच खरे. आपण स्वतःच्या मुलाला जसे प्रेमाने घेतो तसा परमार्थ करावा; आणि दुसर्‍याच्या मुलाला जसे घेतो तसा प्रपंच करावा. भगवंताच्या स्मरणात प्रपंच सुखाचा करणे हाच खरा परमार्थ, आणि ज्याची वृत्ती सुधारून भगवंताकडे लागली त्यालाच खरा परमार्थ कळला.

१७७. भगवंतावर अकारण प्रेम करणे याचे नाव परमार्थ.


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

June 24, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २४ जून २०१४

२४ जून

ज्ञान हे दुहेरी शस्त्र आहे. 

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

 लोककल्याणाच्या तळमळीने जो ग्रंथ लिहितो तो खरा ग्रंथकार होय; वाचनात आलेले आचरणात आणून जो लोकांना सांगतो तो खरा वक्ता होय; आणि सांगितलेले आचरणात आणतो तोच खरा श्रोता आणि साधक होय. अलीकडे ज्ञानप्रसाराची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत.त्यामुळे नको त्या ज्ञानाचाही विस्तार झपाट्याने होतो आहे. ज्ञान हे एक प्रकारचे दुहेरी शस्त्र आहे. कोणत्याही ज्ञानाचा बरावाईट उपयोग, तो करणार्‍यावर अवलंबून असतो. ज्ञान हे मुळात पवित्र आहे. जे ज्ञान नीति आणि धर्म यांच्या पायावर उभे असते ते जास्त प्रभावी ठरते. सर्वांचे एकमेकांवर प्रेम वाढेल आणि सर्वजण एकत्र येतील असे ज्ञान असावे. श्रीमंत-गरीब, विद्वान-अशिक्षित, लहान-थोर, स्त्री-पुरुष या सर्वांना एकमेकांबद्दल प्रेम, आदर आणि आपुलकी वाढेल, असे ज्ञान व्यक्त झाले पाहिजे. द्वेष-मत्सर वाढवील, नीतिधर्माला फाटा देईल, असे ज्ञान पुस्तकात नसावे. विद्वान शास्त्रज्ञ नवीन शोध लावून जगाला स्वार्थी आणि लोभी बनवितात, आणि त्यामुळे सर्वनाश होतो. जे ज्ञान समाधान देत नाही ते खरे ज्ञान नव्हे. जगाचे खरे स्वरूप ज्याने कळते ते खरे ज्ञान होय.
देहासंबंधी जे ज्ञान ते व्यावहारिक ज्ञान जे असे आहे तसे ओळखणे हे तत्त्वज्ञान. मी देहाला 'माझा' म्हणतो, अर्थात मी देह नव्हे. 'माझे घर' म्हणणारा 'मी', घराहून वेगळा ठरलो ! जडत्व म्हणजे काय ? देहाच्या ठिकाणी ममत्व हे जडत्व. पदार्थाचे यथार्थ ज्ञान ज्याला आहे तो शहाणा. व्यवहाराचे गूढ ज्याला कळते तो प्रपंची; जगाचे गूढ ज्याला कळते तो तत्त्वज्ञानी. सूक्ष्माचे ज्ञान होणे यात सुख आहे. आत्मा हा समुद्र आहे, तर जीव हा त्याचा अगदी लहान थेंब आहे. त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे हेच खरे तत्त्वज्ञान आहे. 'ब्रह्म सत्यं, जगन्मिथ्या' अशा ज्ञानाच्या गोष्टी कळायला कठीण असल्या, तरी अभ्यासाने दीर्घ काळानंतर कळतील; पण नामाचे महत्त्व कळणार नाही; ते एक संतकृपेनेच कळते. नामावर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावे; त्यानेच समाधान लाभेल.
ज्या ग्रंथाच्या श्रवणाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होते; ज्याच्या योगाने विरक्ति उत्पन्न होते, अनीतिचे वर्तन टाकून नीतिमार्ग, धर्ममार्ग याचा अवलंब करावासा वाटतो, तो सद्‍ग्रंथ; उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथभागवत, हे ग्रंथ वाचून सदोदित त्यांचे मनन करणे, हेच फार जरूरीचे आहे. त्याने ईश्वरप्रेम उत्पन्न होते.

१७६. अत्यंत कठीण प्रमेये असलेले जगातले ग्रंथ वाचावेत,
पण शेवटी अत्यंत सोप्यातले सोपे असे नामच घ्यावे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

June 23, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २३ जून २०१४

२३ जून

हेतू शुद्ध ठेवावा. 

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन

 मनुष्याने शुद्ध हेतू ठेवण्याचा प्रयत्‍न करावा. हेतू शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरुप होऊ लागते आणि प्रगतीला मदत होते. हेतू हा विहिरीत असणार्‍या झर्‍याप्रमाणे आहे. झरा गोड पाण्याचा असला म्हणजे विहिरीचे पाणी स्वाभाविकच गोड असते. म्हणून हेतू शुद्ध ठेवण्याची दक्षता घ्यावी, आणि त्याकरिता रामाची प्रार्थना करावी. माणसाला देहरक्षणापुरते अन्न, वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा नाही. 'नको दैन्यवाणे जिणे भक्ति उणे' हेच रामराया जवळ मागावे. पर्वकाळात भगवंत कामधेनूचा अवतार घेतो; जे ज्याला पाहिजे ते त्याला देतो. पर्वकाळात सज्जन तसेच दुर्जनही आपली कामे करून घेतात. जारण-मारण ही देखील पर्वकाळांतच शीघ्र साध्य होतात. आपण मात्र भगवंताचे कसे व्हावे हे पहावे. शुभेच्छा धरावी, भावना जागृत करावी. 'काहीही कर, पण भगवंता तुझा विसर पडू देऊ नकोस.' असे भगवंताजवळ मागावे. 'आजवर कळत नकळत जे पाप झाले असेल ते नाहीसे कर. पुढे पुनः नाही करणार,' असे म्हणावे, म्हणजे मागली पापे नष्ट होतात. ज्याला विषयाची गोडी असते त्याला नाही परमार्थाची गोडी लागत. त्यांना 'मीच काय तो शहाणा, मोठा' असा अभिमान असतो. पण त्यांच्यापेक्षा लक्षावधी शहाणे आणि श्रीमंत जगात आहेत हे ते जाणत नाहीत. ते खालच्या लोकांकडे पाहतात आणि त्यांच्याहून मी श्रेष्ठ आहे असे म्हणतात. माझे चुकते आहे एवढे कळले तरी चालेल. विषयी लोकांना 'मला कुठे दुःख आहे' असे वाटते. पण दारूप्रमाणे विषयाची धुंदी उतरली म्हणजे पश्चात्ताप होतो.
'देव आहे' असे खर्‍या अर्थाने वाटणारे जगामध्ये थोडेच असतात. सद्‌विचार, सच्छास्त्र आणि सद्‍बुद्धि हे प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडे नेण्यासाठी आहेत. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते. पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही, त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते. तसे, ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते, त्याने नाम घेणे हेच एक औषध घ्यावे. भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काही येत नाही.
खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते, तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातली माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते, त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो. आपण 'मी' पणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो.

१७५. शुद्ध असावे आचरण । तसेच असावे अंतःकरण ।
त्यात भगवंताचे स्मरण । हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन ॥

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

June 22, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २२ जून २०१४

 २२ जून

सुख त्यागात आहे, भोगात नाही. 

 अमुक हवे असे वाटले आणि ते मिळाले नाही, म्हणजे दुःख होते. अमुक हवे असे वाटूच देऊ नये. परमात्मा ठेवील त्यात समाधान मानावे. याचेच नाव वैराग्य. आपण विषयांत बुडतो आहोत, आणि पुनः विषयाचीच कास धरली तर आपण अधिकाधिक नाही का बुडणार ? विषयाची आस धरणे म्हणजे त्याचे दास होण्यासारखे आहे. मनुष्य सुखाकरता धडपड करतो, आणि अंती दुःखमय अशा विषयाची आशा करतो. सुख त्यागात आहे, भोगात नाही, हे पुष्कळांना पटत नाही.
परिसाला लोखंड लागले म्हणजे त्याचे सोने होते, पण रुप्याचे काही सोने होत नाही. तसे आपण दीनाहून दीन म्हणजे अभिमानरहित झाले पाहिजे. आणि असे झाले म्हणजेच परमात्म्याला अनन्य शरण जाता येईल. हे व्हायला त्याची कृपाच पाहिजे, आणि ती नित्य भाकावी. एखाद्या गोष्टीने आपले मन अस्वस्थ होते ते का बरे ? त्या गोष्टीला आपण सत्यत्व देतो म्हणून. हा सर्व खेळ आहे, हे मिथ्या आहे, असे जाणून, ज्याप्रमाणे नट नाटकातली आपली भूमिका अगदी खर्‍यासारखी करतो, त्याप्रमाणे व्यवहार करावा. सुख, समाधान, सत्यात असते, मिथ्यात नसते. आजपर्यंत आपण विषय उपभोगले पण त्यात आपल्याला सुख झाले नाही; मग विषय मिथ्या आहेत याची भगवंताने तुम्हाला प्रचीती नाही का दिली ? तरीसुद्धा तुम्ही या विषयांतच प्रपंच कसा सुधारेल असे मला विचारता, याला काय म्हणावे ? जे दुःखमयच आहे त्यात सुख कुठून मिळणार ? दोन लहान मुली भातुकली खेळल्या; जी मुलगी गरीब होती तिने पोळ्या आणि गुळांबा केला, पण जी श्रीमंत होती तिने मात्र श्रीखंड आणि बासुंदी केली. पहिलीचा गुळांबा जितका पोट भरण्याला उपयोगी नाही, तितकेच दुसरीचे श्रीखंडही उपयोगी नाही. तसे प्रपंचाचे खरेपण आहे. प्रपंच असण्यासाठी बायको आणि मुले यांची गरज आहेच असे नाही; जो दुसर्‍यावर अवलंबून असतो तो प्रपंचीच असतो. म्हणून एकटा असला तरी प्रपंचीच असतो. दुसर्‍यापासून सुख मिळविण्याचा प्रयत्‍न करणारा मनुष्य हा प्रपंची होय. पाचजण मिळून प्रपंच बनतो. त्यामध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो. मग सर्व सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे ?
प्रपंचामध्ये अनेक वस्तू आहेत, पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे. प्रपंचामध्ये कितीही वस्तू आणल्या तरी पुर्‍या पडत नाहीत, कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसर्‍या वस्तूच्या आणण्याचे बीज आहे. पण भगवंताचे तसे नाही. भगवंताची वस्तू एकदा आणली की पुनः ती आणायला नको.

१७४. 'अमुक एक वस्तू आहे म्हणून मी सुखी आहे'
या वृत्तीत राम नसून, काही नसताना वृत्तीचे समाधान टिकले पाहिजे.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

June 21, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २१ जून २०१४

२१ जून

भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही. 

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन

 प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही. परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही. जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. प्रह्लादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली, तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातले. तुम्हा सर्वांना गोपीची गोष्ट माहीत असेलच. त्या गोपीला श्रीकृष्णाला जेवण घालायचे होते, पण तिचा नवरा तिला जाऊ देईना. त्यावर तिने सांगितले की, हा देह तुझा आहे, परंतु मनावर तुझा ताबा नाही. असे म्हणून ती त्याच्या देहाजवळ देह ठेवून श्रीकृष्णाकडे गेलीच की नाही ? त्याप्रमाणे आपण परमार्थात भाव ठेवणे जरूर आहे. पण असे आपण नुसते म्हणून काय उपयोग ? तो सर्वव्यापी आहे, सर्वसाक्षी आहे, असे आपण म्हणतो, पण आपण पापाचरण करायला भितो का ? तो आपल्याला पाहतो आहे असे पक्के वाटले तर आपल्याकडून कधीतरी पाप होईल का ? पण आपल्याला तसे वाटतच नाही. आपल्यासारख्या आस्तिकाला देव 'हवा' असे वाटते खरे, पण 'हवाच' असे वाटत नाही. आपल्या प्रपंचाच्या मदतीसाठी देव हवा असे वाटते. प्रपंच 'असावाच' असे आपल्याला वाटते. आणि भगवंत मात्र 'असला तर बर' असे वाटते. याच्या उलट 'भगवंत असावाच' आणि 'प्रपंच असला तर बरा' असे वाटायला पाहिजे. प्रपंचाची आवड असू नये, पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी. देहाने ते कर्तव्य करावे, आणि मनाने मात्र अनुसंधान ठेवावे. ज्या गोष्टी आपल्या मनाला खातात त्या न केल्या की आपला आपल्या विकारांवर ताबा येईल. भगवंताच्या देखत आपल्याला करायला लाज वाटणार नाही, अशीच कृती आपण करावी.
ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात, आणि ज्यांना व्याप नाही तेही लोक रडतात; मग सुख कशात आहे ? पैसा सुख देतो का ? पैसा मिळविणे कठीण, मिळाला तर तो कायम राहील का त्याची शाश्वती नाही. पैशाप्रमाणेच इतर सर्व वस्तूंची गोष्ट आहे. सर्वसुखी असा प्रपंचात कोण ? प्रत्येकाचे काही ना काही तरी गार्‍हाणे आहेच. प्रत्येकाला आशा वाटते की मी उद्या आजच्यापेक्षा सुखी होईन. तो कधी पूर्ण सुखी होत नाही, त्याचे गार्‍हाणे संपत नाही ! प्रपंचातल्या सर्व वस्तू नाशवंत आणि दुःखरूप अशा आहेत. म्हणूनच प्रपंच असत्य आहे, हा अनुभव प्रपंच देतो. त्या अनुभवाने प्रपंचात जो आसक्त होत नाही तो सुखी; अनुभव विसरून जो आसक्त होतो तो दुःखी. सुख हे समजुतीमध्ये आहे, आणि भगवंताचे होणे हीच समजूत तेवढी खरी आहे.


१७३. प्रपंच अनासक्तिने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

June 20, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २० जून २०१४

२० जून

ज्याला प्रपंच नाही करता आला ।
त्याचा परमार्थ ढिला पडला ॥ 

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

   

मातापिता यांचे न पाहावे दोष । हे सर्व सत्पुत्राचे लक्षण सत्य ॥
माता-पितरांचे समाधान । हेच सुपुत्राचे खरे लक्षण ॥
आईचे अंतःकरण अत्यंत कोवळे असते । आपले दुःखीपणाने ते दुःखी होते ।
आपली आनंदी वृत्ति आईला आनंदी बनविते ।
म्हणून मुलांनी असावे नेहमी आनंदात । काहूर न माजू द्यावे चित्तात ॥
शब्दाने करावे त्यांचे समाधान । उत्तरी अपशब्दाचे न मानावे दुःख जाण ॥
नोकरी चाकरी उद्योग धंदा । पोटाकरिता करणे आहे सदा ॥
आपण पैका मिळवावा पुष्कळ । पण ते सुखाचे साधन न मानावे सकळ ॥
प्रपंचात नुकसान होईल असे काम करू नये । तसे शब्द बोलू नये ॥
आल्या अतिथा अन्न द्यावे । कोणास विन्मुख न पाठवावे ॥
निरुत्साही बनू नये । निराश वाटू देऊ नये ॥
अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे । त्यात रामाचे अधिष्ठान राखावे ॥
ज्याला प्रपंच नाही करता आला । त्याचा परमार्थ ढिला पडला ॥

प्रपंचाची काळजी । हीच परमार्थाला वाळवी ॥
परमात्म्याचा आधार ज्याला । ठाव नसे काळजीला ॥
शेजार असता रामाचा । दुःखाची, काळजीची, काय वार्ता ? ॥
मी कोण हे जाणले ज्याने चित्ती । त्याला काळजी न राहे अशी होईल वृत्ति ॥
राम त्राता हा भाव ठेवावा चित्ति । निर्भयता होईल याच रीती ॥
ज्याने देह केला रामाला अर्पण । त्याला नाही काळजीचे कारण ॥
कर्ता राम हे आणता चित्ति । पापपुण्याची नाही त्याला भीति ॥
ज्याचा परमात्मा झाला सखा । त्याला नाही कोठे धोका ॥
'कर्ता मी' म्हणे आपण । हे सर्व दुःख काळजीचे कारण ॥
झाले ते होऊन गेले । होणार ते चुकेना कोणाला भले ॥
म्हणून नाही करू काळजीला । राम साक्षी आहे त्याला ॥
जे जे काही माझे । ते ते जाणावे रामाचे ॥
राम त्यास सांभाळता । काळजीस कारण न उरले आता ॥
मुलाबाळांची न करावी काळजी । रामराय करावा राजी ॥
आपला प्रपंच हा रामाचा जाणून चित्ती । काळजी चिंता करणे ही योग्य नाही रीति ॥
शक्यतो करावे नामस्मरण । आपली काळजी न करावी आपण ॥
रामाचा म्हणून प्रपंच केला । काळजीचे कारण उरत नाही आपल्याला ॥
भगवंत असता पाठीराखा । काळजीची काय कथा ? ॥
म्हणून, मुखाने नाम, चित्तांत राम । त्याचे मनाला होईल आराम ॥
सतत ठेवावे एक चित्तीं । । न सोडावा रघुपति ॥
सर्व सारांचे सार । एक भजावा रघुवीर ॥
नेमात नेम उत्तम जाण । रामावाचून न राहावे आपण ॥१७२. सर्व कर्ता राम । हा भरवसा ठेवावा ठाम । मग काळजीचे उरले नाही काम ॥

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

June 19, 2014

गुरु

कृष्णमूर्ती पध्दतीत रुलींग प्लॅनेट  म्हणून एक संकल्पना आहे. त्यानुसार कुठल्याही एका विशिष्ठ वेळेला  काही ठराविक ग्रहांचाच अंमल असतो.  ते ग्रह म्हणजे
त्यावेळच्या उदीत लग्नाचा स्वामी , त्यावेळचा नक्षत्र स्वामी , त्यावेळी असलेल्या राशीचा स्वामी आणि त्या दिवसाचा स्वामी

यालाच   LSRD  असे म्हणतात

दिनांक १९ ' ०६/२०१४ ला  संध्याकाळी ७ ते ९ या कालावधीतील रुलिंग प्लॅनेट मधे फक्त ' गुरु ' ग्रह आला आहे

लग्न - धनू - स्वामी - गुरु ( L)
नक्षत्र  - पुर्वा भाद्रपदा - स्वामी - गुरु (S)
रास - मीन - स्वामी - गुरु ( R)
दिवस गुरुवार - स्वामी - गुरु ( D)

विशेष म्हणजे गुरु , पुनर्वसू या आपल्याच नक्षत्रात  आहे.

देवानांच ऋषीणांच गुरु कांचनसन्निभम् !
बुध्दिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम् !!(अर्थात एकच ग्रह जेंव्हा रुलिंग मधे येतो तेंव्हा इतर आणखी  कुठले ग्रह रुलिंग मधे घ्यावेत हे गुरुवर्य कृष्णमुर्ती यांनी काही नियम दिले आहेत , ते परत कधी तरी )

( अभ्यासक ) अमोल 


श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १९ जून २०१४

१९ जून

'मी कोणीतरी आहे' ही वृत्ती घातक. 

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन

 पुष्कळ लोकांच्या अडचणी ऐकून असा विचार मनात आला, की जगातल्या सर्व दुःखांचे मूळ, देहदुःख आणि पैशाची टंचाई ह्यांत मुख्यतः साठविलेले आहे. या दोन गोष्टींत जर मदत करता आली तर पुष्कळ लोकांना सुखी करता येईल असे वाटू लागले, आणि त्या दृष्टीने विचार सुरू झाला. पैशाचा विचार करता असे दिसले की, आपण लंगोटी घातलेली, जवळ पैसा नाही, आणि त्याचा लोभही नाही. आता दुसर्‍याला पैसा द्यायचे म्हटले, म्हणजे त्याचा प्रथम आपल्या ठिकाणी लोभ उत्पन्न केलाच पाहिजे, तरच तो मिळवावा अशी बुद्धी होईल; नंतर पैसे मिळविणे, आणि त्याच्यानंतर तो गरजवंताला देणे. पण हे करणे वाटते तितके सोपे नाही. कारण दुसर्‍याला देण्याकरिता पैसा मिळवावा म्हणून जो लोभ प्रथम आपल्या ठिकाणी उत्पन्न केला, तोच पैसा सोडताना आपल्या आड येईल, आणि दुसर्‍याला पैसा देण्याची बुद्धी मारील. म्हणजे परिणाम असा होणार की, दुसर्‍याला पैसा तर देता आला नाहीच, पण आपल्या ठिकाणा मात्र आधी नसलेल्या पैशाचा लोभ उत्पन्न झाला. ह्यात दुसर्‍याचे काम तर नाहीच, आणि स्वतःचे मात्र नुकसान झाले. दुसरी बाब देहदुःखाची. ज्याची देहबुद्धी मेलेली आहे, त्याला दुसर्‍याच्या देहदुःखाची जाणीवच होऊ शकत नाही. म्हणजे दुसर्‍याचे देहदुःख नाहीसे करावे अशी बुद्धी होण्याकरिता स्वतःचे ठिकाणी देहबुद्धी जागृत करावी लागेल. समजा इतके केले, आणि दुसर्‍याचे देहदुःख निवारले, तरी त्याला पुनः देहदुःख भोगावे लागणारच नाही असे कसे होईल ? आज झालेली पोटदुखी बंद केली तरी कालांतराने त्याला ताप किंवा इतर आजार येणारच नाही असे कसे होऊ शकेल ? म्हणजे देहदुःख कायमचे टाळता येणार नाही, आणि पैसाही देता येत नाही. अशाने जगाला सुखी तर करता येणार नाहीच, पण आपल्या स्वतःच्या ठिकाणी मात्र नसते दोष उत्पन्न केल्यामुळे स्वतःची अवनती केल्यासारखे होऊन, नुकसान मात्र पदरात पडते. म्हणून रामाची प्रार्थना केली की, असल्या गोष्टी करण्याची शक्ति आणि बुद्धी मला देऊ नकोस.
बालपणाची सरल वृत्ती नाहीशी व्हायला दोन मोठी कारणे आहेत. एक पैसा, आणि दुसरे विद्या. दोन्हींपासून 'मी कुणीतरी श्रेष्ठ आहे' ही वृत्ती उत्पन्न होते, आणि ती घातक असते. 'मी कुणीतरी आहे' असे वाटण्यापेक्षा 'मी कुणाचा तरी आहे' असे वाटणे हिताचे आहे. जगातले अत्याचार, अनीति, अधर्म, असमाधान, या सर्वांचे कारण हेच की, मनुष्य जास्त लोभी झाला आहे. देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो, पण ज्याची परीक्षा पाहायची त्याला भगवंत जास्त पैसा देतो.


१७१. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून,
असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

June 18, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १८ जून २०१४


१८ जून

परमार्थात गुप्ततेची जरूरी असते. 

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन

   वासनेच्या तावडीतून सुटणे फार कठीण आहे. कारण वासनेच्या पोटीच प्राणी जन्माला येत असतो. त्या वासनेला जिंकणे, म्हणजे आपण मरून जाण्या‍इतके कठीण आहे. वासनेच्या पोटी जन्म, आणि जन्मानंतर अहंकार, ह्या जोडप्यापोटी कामक्रोधादि विकार जन्माला येतात. या जोडप्याचे वैशिष्ट्य असे की, त्यामध्ये बायको नवर्‍यापेक्षा वडील असते; कारण आधी वासना, आणि त्यातून पुढे अहंकार. भगवंताजवळ 'वास' ठेवला तरच वासना नष्ट होते. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही. प्रपंचातली वासना बाहेर काढणे, याचेच नाव परमार्थ. प्रपंचात प्रसिद्धीची जरूरी वाटते. त्याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरूरी लागते. समजा, एखाद्या बाईने दागिने हवेत म्हणून नवर्‍याजवळ हट्ट धरला, आणि नवर्‍याने तिला हवे असलेले सर्व दागिने देण्याचे कबूल केले; पण अट अशी घातली की, जेव्हा दागिने अंगावर घालायचे असतील त्या वेळी ते घालून खोलीची दार-खिडक्या बंद करून आत बसले पाहिजे. अशी अट पाळून कोणती बाई दागिने घालायला कबूल होईल ? कारण दागिने लोकांनी पाहण्यातच तिला समाधान आहे. ही झाली प्रपंचातली रीत. परमार्थात याच्या उलट गुप्ततेची गरज आहे. आपली साधना कोणाच्याही नजरेत न येईल अशी खबरदारी घ्यावी; कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते. ती केवळ इतर लोकांचीच लागते असे नसून, आपली स्वतःचीसुद्धा लागण्याचा फार संभव असतो. म्हणून परमार्थात गुप्तता असावी; आणि आपल्या हातून जे साधन होते आहे, ते सद्‍गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेनेच माझ्याकडून करवून घेतले जात आहे, ही जाणीव ठेवावी.
आजारी माणसाने नुसते पडून राहावे, पण औषध मात्र नियमाने घ्यावे. बाकीच्या गोष्टी इतर लोक करतात; औषध मात्र आपण स्वतःच घेतले पाहिजे. एखादा मोठा राजा जरी झाला तरी कडू औषध दासीला देऊन काही त्याचा रोग बरा होत नाही. त्याचप्रमाणे, परमार्थात भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्या स्वतःलाच करायला पाहिजे. उगीच कुणाच्या नादी लागू नये. परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे नीट समजावून घ्या आणि मग त्या मार्गाने जा. कोणाला फसू नका, कारण स्वतः फसणे हे जगाला फसविण्या‍इतकेच पाप आहे. ज्याच्या प्रपंचात पाठीराखा परमात्मा आहे, त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो. उलट ज्याचा पाठिराखा अभिमान आहे, त्याचा परमार्थदेखील प्रपंचच म्हटला पाहिजे.


१७०. बाहेरून प्रपंची दिसावे पण आत मात्र परमार्थी असावे. ही खरी कला होय.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

June 17, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १७ जून २०१४

१७ जून

प्रपंचाच्या गडबडीतच परमार्थ साधावा.

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजकोर्टातली शपथ ज्याप्रमाणे लोक खरी मानीत नाहीत, त्याप्रमाणे प्रपंचात काही लोक लबाडीने वागतात. आणि त्याला 'हा व्यवहार आहे' असे म्हणतात; हा काही नेटका प्रपंच नव्हे. प्रपंचात जर समाधान झाले नाही, तर तो नेटका नाही झाला. प्रपंचाची दिशा ज्याची चुकली, त्याने नाही परमार्थ साधला. ज्याला प्रपंच करता येत नाही, त्याला बुवापणाही नाही करता येणार ! कर्ज फार झाले म्हणून प्रपंच मोडला, यात कोणता स्वार्थत्याग आहे ? प्रपंचाचा त्याग केला म्हणजे काय केले, तर जंगलात जाऊन बसला. थंडी वाजू लागली तेव्हा काटक्या गोळा करून शेकोटी केली. जागा साफ केली, तुळशी लावल्या, झोपडी बांधली. पण भिक्षेला जाताना झोपडीची काळजी केली, तर मग घरदारानेच काय केले होते ? प्रपंचाचे बंधन सुटावे लागते, जबरदस्तीने सोडून कुठे सोडता येते ? हा प्रपंच, हा संसार, जर भगवंतानेच उत्पन्न केला आहे, तर तो कोणाला तरी सुटेल काय ? जो आसक्तिच्या आश्रयाखाली राहतो त्याला संसार आहे असे समजावे. तुकोबांना आणि ज्ञानेश्वरमहाराजांनासुद्धा संसार, प्रपंच होता; पण त्यामध्ये त्यांची आसक्ति नव्हती, म्हणून त्यांना तो बाधला नाही.
पेन्शन घेतल्यावर परमार्थ करू, हे म्हणणे बरोबर नाही. या गडबडीतच, प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ साधावा. सावधानता कशाची ठेवायची ? तर मी जन्माला आलो तेव्हा जे कबूल केले, ते करण्याची सावधगिरी ठेवायची. प्रपंच करताना लक्ष भगवंताकडे ठेवा. विषयात गुंग झालो, भगवंताचा विसर पडू लागला, ही संधी साधावी आणि त्या वेळी भगवंताचे स्मरण ठेवावे. आपण विषयाला जसे शरण गेलो तसे भगवंताला शरण जावे. चित्त शुद्ध करून विचार करावा, आणि मी विषयाला किती शरण गेलो हे पाहावे. विषयापासून वेगळे व्हावे, म्हणजे हे पाहता येते. व्यसनी माणसाने, व्यसनापूर्वी मी कसा वागत होतो याचा विचार करावा. मारुतिरायाच्या दर्शनाला मी पूर्वी जात होतो, आता विषयात त्याची आठवणही होत नाही, याला काय करावे ? नोकरीत नाही का तुम्ही वरिष्ठाला शरण जात ? मग जे पोटाकरता करता ते भगवंताकरता का नाही करीत ? भगवंताला शरण जाणे सर्वांत सोपे आहे; त्याला निराळ्या कोणत्याही वस्तूची जरूरी नाही लागत. माझ्या मनांत येईल तेव्हा भगवंताला शरण जाता येईल. भगवंताला शरण जाणे म्हणजे 'मी त्याचा झालो' असे म्हणणेच होय. 'मी रामाचा झालो, जे जे होते ते राम‍इच्छेने होते' असे जो म्हणतो त्याला निराळी सावधगिरी ठेवावी लागत नाही.


१६९. प्रपंचाला 'माझी' गरज आहे, आणि 'मला' भगवंताची गरज आहे.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

June 16, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १६ जून २०१४


१६ जून

परमार्थ श्रद्धेने करावा. 

     


आपण मनुष्यजन्माला आलो, ते भगवत्प्राप्तीकरिताच आलो. आतापर्यंत मी पुष्कळ योनी हिंडलो, भगवंताने आता मला मनुष्य योनीत आणले. 'भगवंता, आता नाही तुला विसरणार' असे कबूल करूनही, आपण जन्माला आलो नाही तर लगेच 'तू कोण ?' असे म्हणू लागलो ! संत आपल्याला 'तोच मी' असे भगवंताजवळ कबूल करून आल्याची आठवण करून देतात. पण संतांनी जागे केले तरी आम्ही मात्र पुनः तोंडावरून पांघरूण ओढून घेतो, याला काय करावे ? झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करणे कठीणच जाते. पुष्कळ तीर्थयात्रा केल्या पण होतो तसाच राहिलो; यात दोष गंगेचा का माझा ? 'गंगेच्या काठी कितीतरी लोक येतात, स्नान करातात, पूजाअर्चा करतात, मग हे कलियुग आहे असे कसे म्हणावे ?' असे एकाने म्हटले. त्यावर दुसरा म्हणला, 'याचे प्रत्यंतर समोरच दाखवितो. समोर एक रक्तपिती माणूस बसला आहे. त्याला जो पापी नसेल त्याने कवटाळावे म्हणजे त्याची रक्तपिती जाईल. पण एवढे होईल की जर कवटाळणारा माणूस पापी असेल तर त्याला त्या माणसाची रक्तपिती होईल.' असे समजल्यावर जो तो हळूहळू तिथून पसार होऊ लागला ! म्हणजे एवढे नेमनिष्ठ, विद्वान, गंगामाईचे रोज स्नान करणारे, तरी आपले अंतःकरण शुद्ध झाले आहे असे त्या कुणालाच वाटले नाही ! तेवढ्यात वर्‍हाडकडला एक गरीब शेतकरी घोंगडी पांघरून हातातली काठी टेकीत टेकीत येत होता. त्याची निष्ठाच अशी की गंगेत स्नान केले की सर्व पापे नष्ट होतात. त्याने गंगेत बुडी मारली आणि वर येऊन त्या रोग्याला कडकडून भेटला; आणि आश्चर्य म्हणजे त्या रोग्याचा रोग बरा झाला ! असे हे जे गोरगरीब, भोळेभाळे लोक, त्यांच्याजवळ अंधश्रद्धेने जे येते, ते मोठ्या विद्वानांनाही साधत नाही. आपण व्यवहारात पुष्कळ ठिकाणी अंधश्रद्धा ठेवतो. घरुन कचेरीला निघताना वेळेवर आपण पोहोचू अशी अंधश्रद्धा आपली असतेच. कधी कधी आकस्मिक कारणाने आपण कचेरीला पोहोचू शकत नाही, तरीपण आपण भरवसा ठेवतोच ! व्यवहारात आपण एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवतो, तेवढी जरी भगवंतावर ठेवली, तरी भगवंत आपल्याला समाधान देईल. परमार्थ पूर्ण समजून तरी करावा, किंवा अडाण्यासारखा श्रद्धेने करावा. पण आपण आहोत अर्धवट; म्हणजे, पूर्ण कळलेले नसून आपल्याला ते कळले आहे असे वाटते. अशा माणसाला शंका फार, आणि त्याचे समाधान करणेही फार कठीण जाते. अमुक एक खरे आहे असे कळूनसुद्धा ज्याला आचरणात आणता येत नाही, तो मनुष्य खरा अज्ञानी. जे अनुभवाने सुधारले तेच शहाणे भले !
१६८. परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही. पण तेथे श्रद्धेशिवाय मुळीच चालायचे नाही.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

June 15, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १५ जून २०१४१५ जून

'मी फक्त एका नामातच आहे.' 

 मनुष्य कितीही मोठा असला, उत्तम पुराण आणि प्रवचन सांगणारा जरी असला, तरी तो जर नामात रहात नसेल, किंवा त्याच्या संगतीत परमेश्वराचे प्रेम लागत नसेल, तर तो कदापीही संत म्हणून समजला जाणार नाही. संतांचे नातेवाईक संत असतातच असे नव्हे. आपण नोकरी केली तर आपला मुलगा नोकरी करीलच असे काही नाही; तसेच जो भगवंताचा आहे त्याचा मुलगा भगवंताचा असेलच असे नाही. संत जरी झाला तरी त्याने चार माणसांसारखेच वागावे. काहीतरी वागणे हे संतांचे वागणे नव्हे. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण होय; कारण 'सर्व ठिकाणी मी आहे' ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही. साधूच्या अंतःकरणामध्ये भयाचा संकल्प नसल्यामुळे वाघ, सिंह, साप त्याला त्रास देत नाहीत. अगदे जंगली वाघाकडे देखील निर्भयतेने नजरानजर केली तर तो अंगावर येत नाही; शिवाय, साधूंच्या शुद्ध अंतःकरणाचाही त्याच्यावर परिणाम होतो. अशा रीतीने, संतांच्या अंतःकरणाची प्राणिमात्रांनासुद्धा जाणीव असते. अशा संतांचा सहवास मिळणे ही फार भाग्याची गोष्ट आहे. परमेश्वराचे प्रेम लागणे किंवा सतत मुखात नाम येणे, हेच संतांच्या संगतीत राहून साधायचे असते. संतांची अखंड संगत नामानेच ठेवता येईल. जिथे नाम आहे तिथे संतांचा सहवास आहे. तुकाराम महाराजांसारखे संतसुद्धा देवापाशी मागताना 'तुझा विसर न पडावा' हेच मागतात. तसेच रामदासस्वामी देवाला म्हणतात, 'तुझा योग, म्हणजे सहवास, मला नित्य घडू दे.' 'योग असणे' म्हणजे दुसरे काही नसून, मन जेव्हा अनुसंधानापासून अलिप्त होऊन इतर विचारांत भरकटते, तेव्हा त्याला आवरून परत अनुसंधानात लावणे, हीच योगशक्ति.
हुकूम कितीही कडक असेना का, परंतु त्याच्याखाली जर सही नसेल तर त्या हुकुमाला महत्त्व नाही. साहेबाच्या सहीच्या कागदाला महत्त्व आहे. नाम हे सर्व साधनांत सहीसारखे आहे. एका मुलाला अत्यंत राग येत असे. रागाच्या भरात तो आपले डोके आपटून घेई. त्याला मी सांगितले, 'रोज स्नान झाल्यावर आपल्या पोटावर गंधाने रामनाम लिहून ठेव, आणि ज्या ज्या वेळी राग येईल त्या त्या वेळी त्या नामाकडे पहा !' आणि त्या प्रयोगाने त्या मुलाचा राग आपोआप शांत झाला. खरोखर, नामात किती प्रचंड शक्ति आहे ! अनुभव घेऊनच पहा. मी आजपर्यंत सर्वांना नामच सांगत आलो आहे. मी इथे नाही, मी तिथे नाही, मी गेलो नाही, मी जात नाही; मी फक्त एका नामातच आहे. ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे, त्याच्या मागे-पुढे मी आहेच.


१६७. तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे ह्यापलीकडे, सत्य सांगतो, मला कसलीही अपेक्षा नाही.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

June 14, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १४ जून २०१४ १४ जून
 भगवंत जोडणे हाच एक धर्म. 


भगवंत जोडत असेल तर अधर्मही करावा; भगवंत जोडणे हाच एक धर्म. अभिमानाने कोणतेही कृत्य केले तर ते नाही भगवंताला पोहोचत. दानधर्म केला, धर्मशाळा बांधल्या, हे सर्व नाव होण्याकरिता जर केले, तर त्याचा तुमच्या कल्याणाला काय उपयोग झाला ? भगवंत जवळ न येता त्यामुळे अभिमान मात्र वाढतो. बाभळीची झाडे लावली तर त्यांनी आंबे कसे येतील ? मीपणाने केलेले काम नाही उपयोगी पडत. शरणबुद्धीने केलेले काम हाच खरा धर्म. मी भगवंताच्या हातचे बाहुले आहे असे समजावे. 'राम कर्ता' असे म्हणावे. म्हणजे, देवाजवळ शरणबुद्धी धरावी. भगवंताची निष्ठा कोणत्याही वयात आणि कोणत्याही अवस्थेत वाढवता येते. ही निष्ठा कधी कुणाला हार जाणार नाही, किंवा कधी कुणापुढे मान लवविणार नाही. एकदा भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवल्यावर मग काळजीचे कारणच काय ? काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो. भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रयत्‍न करावा, आणि जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे. व्यवहारात सौख्य कर्तव्याने मिळते, तसे परमार्थात सौख्य निष्टेने मिळते. परमार्थ करणार्‍या माणसाने कोणाचेही अंतःकरण दुखवू नये. परमार्थ हा लबाड आणि भोंदू माणसाचा नाही, तसा तो बावळ्या माणसाचाही नाही. व्यवहारात कुणाला फसवू नये, आणि कशाला भुलू नये. आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसविण्यासाठी नसावी. लोकांकडून न फसण्या‍इतकेच आपण व्यवहारी असावे. आपल्या हातामध्ये जितका पैसा असेल, त्या मानानेच देवघेव करावी. व्यवहाराच्या दृष्टीने देणे न राहील असे वागावे. 'कोणत्याही परिस्थितीत मी राहीन' असे जो म्हणेल त्याला कधीच अडचण पडत नाही. आपण श्रीमंतांचा द्वेष करू नये आणि गरीबांना कमी लेखू नये. अशी वृत्ती बनायला भगवंताची निष्ठा पाहिजे. प्रत्येकाला खायला प्यायला भरपूर मिळाले पाहिजे ही संपत्तीची समान वाटणी होय. मोबदला न देता आपण पैसा घेतला, तर, तो ज्याचा घेतला त्याची वासना त्याला चिकटून बरोबर येते. काय गंमत आहे बघा, इतर बाबतीत मनुष्य वचन पाळण्याची पराकाष्ठा करतो, पण तो पैशाचे वचन देतो ते सहज, आणि ते मोडतोही सहज. तेवढेच वचन पाळण्यात तो कुचराई करतो. पैसा नसून अडते आणि तो असून नडते, अशी आपली परिस्थिती आहे. संन्याशाने एक दिवसाचा संग्रह करावा, गृहस्थाने तीन दिवसांचा संग्रह करावा. आपल्याजवळ तीन दिवस खायला आहे असे पाहिल्यावर आपण मुळीच काळजी करू नये.


१६६. 'मी कर्ता आहे' ही प्रपंचातली पहिली पायरी, तर 'राम कर्ता आहे' ही परमार्थातली पहिली पायरी.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

June 13, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १३ जून २०१४

१३ जून

प्रपंच हे परमार्थाचे साधन. 

 फार दिवस नोकरी केली की माणसाच्या मनाला गुलामगिरीची सवय लागते; हे चांगले नाही. काही दिवस तरी माणसाने मालकीहक्काने राहायला शिकले पाहिजे. नोकरी करीत असतानाच अनुसंधानाचा अभ्यास करावा, म्हणजे पुढे नोकरी सुटल्यावर, जितका वेळ मिळेल तितका अनुसंधानात जाईल. प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यापासून परमार्थाचा अभ्यास करतो आहे. प्रत्येक मनुष्याला आनंद किंवा समाधान हवे आहे, आणि त्यासाठी त्याची खटपट चालू असते. खरोखर, परमार्थाला दुसर्‍याची गरजच नाही; मग दुसरा कुणी आपला परमार्थ बिघडवील कसा ? जगात जे आहे ते सर्व चांगले आहे, आपणच तेवढे बरे नाही. दरवाजे, खिडक्या, हे जसे घराचे साधन आहे, किंवा आपल्या गावी जाण्यासाठी आगगाडी हे जसे साधन आहे, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी, किंवा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रपंच हे साधन आहे. नाहीतर नुसत्या प्रपंचामध्ये सुख नाही. प्रपंच हा इथून तिथून सगळा सारखाच. गरीबाचा असो की अडाण्याचा असो, अधिकार्‍याचा असो की कारकुनाचा असो, या देशातला असो की त्या देशातला असो, प्रपंचाचा धर्म जो उणेपणा, अपुरेपणा किंवा तात्पुरतेपणा, तो कधीही कुठेही बदलत नाही. म्हणून जे आपल्यापाशी नाही ते ज्याच्यापाशी आहे त्याच्या प्रपंचाला पाहून आपण भुलून जाऊ नये. आहे त्यात समाधान ठेवावे. परमार्थात अधिकार कुणी कुणाला देऊन येत नसतो; आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो. परमार्थाची जाणीव जेवढी दुःखात होते, तेवढी सुखात असताना होत नाही. ते सुख शेवटी दुःखांतच लोटते. ज्या जाणीवेने आपण सर्व ज्ञान मिळवितो, ती काय आहे हे जाणण्याचा कुणी प्रयत्‍न करीत नाही. वैषयिक बुद्धी विकारांना सामील झाली म्हणजे ते प्रबळ होऊन घातक ठरतात. अशा वेळी, मनात येईल तसे वागण्याचे टाळले तर विकार दुबळे होतात. मी विकारवश होत असेन, तर अखंड प्रेमयुक्त नामस्मरण करणे जरूर आहे. विकारांना वश न होता, प्रारब्धाने आलेले विषय भोगावे म्हणजे त्यांचे काही चालणार नाही.
थर्मामीटर ताप दाखवितो, घालवीत नाही. तद्वत शास्त्रे आपले कुठे चुकते ते दाखवितात, काय करावे ते दाखवितात, पण करणे आपल्याकडेच आहे. समर्थांना राम दिसला, आम्हांला का दिसू नये ? तर आम्ही समर्थांप्रमाणे श्रद्धा ठेवून उपासना सतत आणि आदराने करीत नाही म्हणून. कसेही करा, पण मी रामाचा आहे ही भावना जागृत ठेवा. नाम जाणून, अजाणून, श्रद्धेने, अश्रद्धेने, कसेही घ्या, राम तुम्हाला अन्नवस्त्राला कमी करणार नाही हे खास ! नाम श्रद्धेने घेतले तर विशेषच फळ. म्हणून अखंड नामात रंगून आनंदात राहू या.१६५. सुखाने प्रपंच करा पण त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा. हेच माझे तुम्हाला सांगणे आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

June 12, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १२ जून २०१४१२ जून
परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू. द्वैतामध्ये दुःख आहे, तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे. आपण एकामध्ये राहिलो तर आनंद मिळेल. हे जगत् पुष्कळ भासले तरी ते एकच आहे. प्रपंचाच्या दहा दिशा आहेत, पण परमार्थाची मात्र एकच दिशा आहे; तिच्याकडे आपण लक्ष लावावे. काही न करणे, अर्थात् मनाने, हा खरा परमार्थ होय. परमार्थामध्ये उपाधी मुळीच नाही; नाही म्हणजे किती नाही, तर 'मी' सुद्धा तिथे नाही. प्रपंच हा द्वैत आहे, त्याचे अवडंबर मोठे असणारच. आपल्याला आपल्या जगण्याचा अंतिम हेतू जोपर्यंत कळला नाही, तोपर्यंत प्रपंच करणे हेच ध्येय आपण समजतो. वास्तविक, मनुष्यप्राणी हा देह आणि मन दोन्ही मिळून आहे, म्हणून त्याने ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजेत. परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे. व्यवहारात द्वैताशिवाय आनंद नाही. म्हणून परमार्थात, मानसपूजेत, पहिल्याने 'मी' आणि 'परमात्मा' अशा द्वैताने सुरुवात करावी लागते.
जोपर्यंत परमार्थ आपल्या हाडीमासी खिळला नाही, तोपर्यंत आपल्याला वाचनाची गरज आहे. त्यापासून साधनाला जोर येतो. मन भगवंताकडे गुंतविण्यासाठी काय करावे हे पाहावे. एक बाप आपल्या मुलाला पोहायला शिकवीत होता. बापाने मुलाला पहिल्याप्रथम घोट्या‍इतक्या पाण्यात आणले, नंतर ढोपराइतक्या पाण्यात आणले, नंतर आणखी पुढे आणले; आणि एक दिवस त्याने मुलाला पाण्यात खेचून घेतले. त्याप्रमाणे आपले गुरू आपल्याला परमार्थ शिकवीत असतात. आपण पाण्यात उतरले मात्र पाहिजे. देहाने प्रपंच केला पण तो फळाला येत नाही, म्हणून संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला. पण आमचे शहाणपण, आमचा अभिमान, नाम घेण्याच्या आड येतो त्याला काय करावे ? हा अभिमान दुसरा कुणी उत्पन्न करतो असे थोडेच आहे ? आपल्या ध्यानातही येत नाही. इतके सूक्ष्म असे वासनेचे बीज आपल्यात कुठे तरी दडलेले असते. त्यामुळे लौकिकाची अभिलाषा सुटत नाही. याकरिता संतांनी एक मार्ग सुचविला आहे आणि तो म्हणजे नामस्मरणात राहून विषयाची ऊर्मी उठू न देणे, प्रपंचातली विघ्ने ही सूचनावजा असतात; ती आपल्याला जागे करतात. जन्माला आलो तो भगवंताला ओळखण्याकरिता, हे विसरू नये म्हणून विघ्नांची योजना असते. विघ्ने ही आपण भगवंताच्या जवळ जाण्याकरिताच येत असतात. तेव्हा त्यांना न घाबरता, भगवंताच्या नामांतच स्वतःला विसरून जावे, हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे.१६४. जेथे आळस माजला, तेथे परमार्थ बुडाला.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

June 11, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ११ जून २०१४

११ जून

सुखदुःख मनावर अवलंबून आहे. 

 जिथे रोग असेल तिथेच औषध लावले तर उपयोग होईल. दुःखाचे मूळ कुठे आहे हे प्रथम पाहावे. प्रपंचात काही न्यूनता पडली की दुःख होते. श्रीमंताच्या किंवा गरीबाच्या सुखदुःखात तसा फरक तो कोणता ? एखाद्याजवळ पैसा पुष्कळ आहे, परंतु मूलबाळ नाही, म्हणून तो दुःखी असतो, तर दुसर्‍याला संतती आहे पण पैसा नाही, म्हणून तो कष्टी होतो. तिसर्‍याला संतती, संपत्ति वगैरे सर्व आहे, परंतु पोटदुखीच्या विकाराने तो बेजार आहे. एकंदरीत, सुखदुःखे कोणाला सुटत नाहीत. जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासाने सुद्धा आणल्या, तरी पण न्यूनता काही सरत नाही. दुःखावर आपण वरवर उपाय करतो, परंतु आपल्या दुःखाच्या मुळाशी आपले मनच आहे हे नाही आपल्या ध्यानात येत. खरोखर, सुखदुःख हे वस्तूत नसून आपल्या मनःस्थितीवरच अवलंबून आहे. वस्तू चोरीला गेली त्या वेळी झोपेत, आनंदात होता, पण जागे झाल्यावर, वस्तू गेल्याचे समजल्यावर दुःखी झाला. म्हणजे दुःखी होते ते मन. तेव्हा, औषध द्यायचे ते मनाला द्या. संतांनी मनाला शिकवण दिली. आजवर आम्ही विषयसुख सख्ख्या मुलाप्रमाणे भोगले, आणि परमार्थ सावत्र मुलासारखा केला. सावत्र आईप्रमाणे आम्ही मनाला शिकविले.
ज्याचा सहवास झाला, त्याप्रमाणे मनावर परिणाम होऊ लगले. विषयाचा सहवास गर्भापासून आपण ठेवतो, म्हणून विषयापासून मिळणारा आनंद खरा मानू लागलो. ज्याचे बीज लावावे त्याची फळे खावी. आपण विषयाचे बी पेरतो, आणि विषयाची फळे दुःखदायक आहेत म्हणून मग शोक करतो, याला काय करावे ? व्यापारी दरवर्षी आढावा घेतात त्याप्रमाणे, माझे विषय किती कमी झाले हे आपण पाहावे. जितकी प्रपंचाकरिता तळमळ करतो, तितकी भगवंताकरता करावी. प्रपंचातल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक आहे. परमार्थ हा परिस्थितीवर, श्रीमंती-गरीबीवर, रोगी-निरोगीपणावर वगैरे कशावरही अवलंबून नाही. मनाची स्वस्थता, अंतःशुद्धता, आचरणाची पवित्रता, यांवर अवलंबून आहे. प्रपंचातल्या सोयी आणि गैरसोयी या दोन्ही परमार्थाच्या आड येतात. आपण रस्त्यातून चाललो असताना, एखादे अत्तराचे दुकान पाहून थांबलो काय किंवा मिरच्यांचे दुकान पाहून थांबलो काय, रस्ता चालण्याच्या दृष्टीने दोन्ही घातकच ठरतात. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही, आपण आपली आसक्ति त्यात कालवतो म्हणून आपल्याला तो सुखदुःख देतो, ही आसक्ति काढणे, याचेच नाव परमार्थ होय.१६३. त्याच गोष्टी 'आसक्ति' सोडून करणे याचे नाव परमार्थ.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

June 10, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १० जून २०१४

१० जून

आपला व्यवहार, परमार्थ, घडतो ।
तो सर्व त्याचे इच्छेने चालतो ॥ 

 

'असे झाले असते तर बरे झाले असते' । हे म्हणणे नाही खरे ॥
जे होणे योग्य ते घडले । व ते राम‍इच्छेनेच घडले ॥
परमात्म्यानेच जी इच्छा केली । त्याचे आड नाही कोणी आले ।
हा ठेविता विश्वास । मनाला धीर वाटेल खास ॥
माझे सर्व कर्माचा गुरूच सूत्रधार । सर्व सत्ता गुरूचे हाती । तेथे न चाले कोणाची गति ॥
आपले जगणे जेथे भगवंताच्या हाती । तेथे बाकीच्या गोष्टींची काय मिति ? ॥
परिस्थिति कोणाचीही । कितीही असली भली किंवा बुरी । तरी परमात्म्याचेच हाती त्याची दोरी ॥
न पडावे अभिमानाला बळी । राम‍इच्छा जाणावी सगळी ॥
हा जरी असेल सिद्धांत । तरी जपून वागावे व्यवहारात ॥
आपला व्यवहार, परमार्थ, घडतो । तो सर्व त्याचे इच्छेने चालतो ॥
म्हणून, होणे जाणे भगवंताच्या हाती । आपण त्याला जावे शरणागति ॥
चित्तांत ज्याच्या राहिले समाधान । तोच भगवंताचा आवडता जाण ॥
ज्याचा विश्वास रामावरी । त्याला समाधान स्वीकारी ॥
माझे हित रामाचे हाती । हा धरिता विश्वास । समाधान मिळत असे जीवास ॥
आपण होऊन रामाचे जाण । सदा राखावे समाधान ॥
मी-माझे करावे रामार्पण । तेथे समाधानाचा अनुभव पूर्ण ॥
आस ठेवावी रामापायी । आनंदी समाधानी राही ॥
अंतरी समाधान । हेच आपले साधन जाण ॥
संसारात न पाहावे उणे पुरे । ठेवावे त्यात समाधान खरे ॥
जशी जशी ज्या वेळी परिस्थिति । तशी तशी असावी समाधान वृत्ति ॥
ज्या स्थितीत ठेवील राम । त्यात राखावे समाधान ॥
चिंता, अहंता, ममता, कोणी कारणावांचून । केले छळ, कपट अपमान ।
अथवा बोलिले शब्दबाण । त्यात राखावे समाधान ॥
समाधान देणे नाही दुसर्‍याचे हाती । ईश्वरकृपेनेच त्याची प्राप्ति ॥
जोवर संशयी झाले मन । तोवर न होई समाधान ॥
विषयास घातले खत जाण । तरी कसे पावावे समाधान ? ॥
जोवर दृश्याचे भान । तोवरी मनी न राहे समाधान ॥
समाधानाची स्थिति । उपाधीरहित असावी वृत्ति ॥
कोठे ठेवावे मन । जेणे मिळेल समाधान ? ॥
समाधान नव्हे देहाचा गुण । मनाने व्हावे भगवंताचे आपण ॥
पांडव झाले वनवासी । पण अखंड राहिले भगवंतापाशी ॥
पांडव भगवंताचे भक्त झाले । वनवास नाही चुकविता आले ।
त्यांनी केले भगवंताचे स्मरण । जेणे राखिले समाधान ॥
'आता झालो मी रामाचा' । हा विचार ठेवावा साचा ॥
ऐसे होऊन राही । समाधान तेथेच पाही ॥१६२. सर्व कर्ता राम । हे ठेविता चित्ती । समाधान येते त्यापरती ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

June 9, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ९ जून २०१४

९ जून

वासनानाश हाच मोक्ष. 

 

 

पुष्कळदा भक्ति म्हणजे काय, किंवा परमार्थ कशाला म्हणतात, हेच आपल्याला कळत नाही. ज्याला प्रपंच नीट करता येत नाही, त्याला नाही परमार्थ करता येणार. प्रपंचाला कंटाळून भक्ति नाही येणार. कंटाळा प्रपंचाचा येण्यापेक्षा, विषयांचा आला पाहिजे. मला सुख हवे हा प्रत्येक जीवाचा मुख्य हेतू असतो. मोक्ष म्हणजे निरतिशय सुखाचा अनुभव होय. 'जिवंतपणी मिळालेली आत्यंतिक सुखाची स्थिति' अशी मोक्षाची व्याख्या करता येईल.
खरोखर, भगवंताजवळ काय कमी आहे ? एक आपले मन त्याला द्यावे आणि त्याची श्रद्धायुक्त भक्ती करावी. काळजी करणे म्हणजे भगवंतावर भरवसा नसणे होय. प्रारब्धावर देह टाकणे ही खरी संन्यासवृत्ती होय. वासना न ठेवता आपल्या हातून कर्मच होत नाही, त्याला काय करावे ? माझे समाधान माझ्याजवळ असताना, दुसरीकडे ते मिळेल असे आपल्याला वाटते, हेच आपले चुकते. हवेपण संपले नाही तोपर्यंत समाधान नाही. हव्यास मरेपर्यंत सुटतच नाही; हे सर्व रोगांचे मूळ आहे. आणि म्हणूनच; ज्याची वासना नाहीशी झाली तो मोक्षत्वाला गेला खरा. आशेची निराशा झाली नाही तोपर्यंत भगवंताचा दास नाही होता येणार. आशा जेव्हा मनात उठेल तेव्हा ती भगवंताला अर्पण करावी. प्रत्येकाला वाटते, मी श्रीमंत व्हावे, पण कितीजण तसे होतात ? म्हणजे ती निराशाच नाही का ? प्रपंच खरोखरीच नाटकासारखा आहे. नाटकामध्ये एखादा मनुष्य राजा झाला काय किंवा भिकारी झाला काय, प्रत्यक्ष जगामध्ये त्याला किंमत नाही. उलट, भिकार्‍याचे काम करणार्‍याने जर ते उत्तम केले, तर लोक त्याचे कौतुक करतात. तसे, प्रपंचामध्ये कुणी श्रीमंत असला काय आणि गरीब असला काय, याला महत्त्व नसून, त्याने भगवंताचे अनुसंधान किती ठेवले याला खरे महत्त्व आहे. आपण पैसा साठविला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा. अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये. विषयावर जोपर्यंत तुमचे सुख अवलंबून आहे, तोपर्यंत भक्तीचे खरे सुख मिळत नाही. एक भगवंतच मनापासून हवा असे वाटले, म्हणजे तो प्राप्त होतो. 'मी करतो' असे कधीच म्हणू नये. मी आपल्या तपश्चर्येने भगवंताला पाहीन असे जो म्हणतो, त्याला भगवंताचे दर्शन होणे कठीण असते. विषय मिळाला नाही म्हणजे तळमळ लागते, त्याप्रमाणे भगवंत भेटला नाही तर तळमळ लागावी. आजच्या आपल्या स्थितीत आपल्याला काय करता येणे शक्य आहे, हे प्रथम पाहावे. परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील, त्याला तो लवकर साधेल. त्त्या माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे कारण उरणार नाही.१६१. हवे व नको याचा आग्रह नसावा. यातच वासनेचे मरण आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

June 8, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ८ जून २०१४

८ जून

विषयाकडचा ओढा भगवंताकडे लावावा. 

 प्रपंचात ज्याला विश्वास म्हणतात, त्यालाच परमार्थात श्रद्धा म्हणतात. उणीव हेच प्रपंचाचे रूप असल्यामुळे तो पूर्ण झाला असे कधीच होणार नाही. समाधान हा मात्र पूर्णत्वाचा स्वभाव आहे. निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल. आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल. अशा प्रकारे 'सर्वस्व' अर्पण करणे, याचेच नाव यज्ञ होय. त्याग आणि भगवंताचे स्मरण, हा यज्ञाचा खरा अर्थ होय. परमार्थ साधला की बुवाचा देह पुष्ट होतो. तो काय दुधाचा रतीब लावतो ? छेः; भगवंताच्या आनंदाने त्याचा देह भरलेला असतो; परंतु साधकावस्थेमध्ये त्याचा देह कष्टामध्येच ठेवलेला असतो. खरे म्हणजे, परमार्थी माणसाने दैन्यवाणे राहायचे कारणच नाही. पैसा असेल तर त्याने रोज श्रीखंडपुरी खावी; पण उद्या जर उपास पडला, तर मात्र आजच्या पक्वान्नाची आठवण होता कामा नये.
सर्वांत गृहस्थाश्रम श्रेष्ठ सांगितला आहे. ज्याला हित करून घ्यायचे आहे, त्याला गृहस्थाश्रमासारखा आश्रम नाही. पण लग्न करून सर्व काळ विषयांत घालवू लागलो, आणि प्रपंचाची कर्तव्ये करायची राहिली, तर मग लग्न करून काय साधले ? उद्योग करून पोट भरायचे हे खरे, पण नोकरी करून मालकाला सर्वस्व मानू लागलो आणि देवाला विसरलो, तर नाही उपयोग. देवाला स्मरून नोकरी करावी. गृहस्थाश्रमात देव भेटणार नाही असे म्हणेल, त्याचे खरे मानू नये. देव भेटेल याची खात्री बाळगावी. आपला भार सर्वस्वी भगवंतावर टाकावा. संकट, आनंद, दोन्ही भगवंताला सांगावीत. ज्या स्थितीत भगवंताने ठेवले आहे त्या स्थितीत समाधान मानावे. अर्पणबुद्धीने सर्व कर्मे करावीत. ज्यात माझे मन मला खात नाही, ते काम चांगले असे समजावे. कोणत्याही मनुष्याला जोपर्यंत या प्रपंचामध्येच सर्व काही आहे असे वाटत असते, तोपर्यंत तो परमार्थापासून दूर असतो. वाईट लोक समाधानात दिसतात, पण खरे ते तसे नसतात. वाईट कृत्ये करणाराला कधी ना कधी तरी पश्चात्ताप झाल्यावाचून राहात नाही. एखादी बाई आपल्या सावत्र मुलाला ज्याप्रमाणे खायला प्यायला घालते, पण आतून तिचे त्याच्यावर प्रेम नसते, त्याप्रमाणे आपण परमार्थाला वागवतो. खरे म्हणजे आपले इथेच चुकते. आपला ओढा जो विषयाकडे आहे, तो भगवंताकडे लावला की परमार्थ साधला. ज्याने विषयातले सुख भगवंताकडे लावले, म्हणजे भगवंताच्या स्मरणात ज्याला सुखा-समाधानाचा लाभ झाला, त्याचे जन्माला येऊन खरे कल्याण झाले.१६०. प्रपंचात जी आपली चिकाटी आहे. तिच्या एकचतुर्थांश
चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली, तरी आपले काम भागेल.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

June 7, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ७ जून २०१४

७ जून

नित्यनेम म्हणजे काय ? 

 नित्यनेम म्हणजे काय ? नित्याचा जो नेम तो खरा नित्यनेम होय. नित्य कोण ? जो कधीही बदलत नाही तो. याचा अर्थ, जो पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य होय. म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा. त्याचा नियम करायचा म्हणजे काय करायचे ? नियम करणे याचा अर्थ नियमन करणे, निग्रह करणे, वश करून घेणे, स्वाधीन ठेवणे, हा होय. आपले मन भगवंताच्या स्वाधीन करणे, त्याच्या ठिकाणी ते नेहमी ठेवणे, याचे नाव नित्यनियम होय. आजच्या आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन करता येत नाही; आणि देह हा जड, अशाश्वत असल्यामुळे देहाने, नित्य आणि शाश्वत अशा भगवंताचा नियम घडणे शक्य नाही. म्हणून, देहाने घेता येत असून देहाच्या पलीकडे असणारे, आणि सूक्ष्म असल्यामुळे भगवंताशी शाश्वत संबंध असणारे, असे भगवंताचे नाम अखंड घेणे हा आपला खरा नित्यनियम आहे. इतर सर्व गोष्टी, शास्त्राची बंधने, पोथी वगैरे वाचणे, स्नानसंध्यादि नित्यकर्मे, वगैरे पाळावी, पण त्याचा हट्ट वा आग्रह असू नये. कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे नाम मात्र सोडू नये. एवढाच हट्ट क्षम्य आहे.
शुद्ध भावनेने नाम घेतले की भगवंत दर्शन देतो. शुद्ध भावनेचे फळ फार मोठे आहे. पुष्कळ वेळा गरीब आणि अशिक्षित लोकच या बाबतीत श्रेष्ठ असतात. आपण नाम घेत जावे, नामाने भावना शुद्ध होत जाते. खरे म्हणजे, मनुष्याला जिवंत राहण्यासाठी हवेची जितकी जरूरी आहे तितकीच, किंबहुना त्याहूनही जास्त जरूरी, परमार्थामध्ये भगवंताच्या नामाची आहे. भगवंताच्या नामाशिवाय न राहण्याचा संकल्प प्रत्येक माणसाने केला पाहिजे. भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही. तो एका प्रेमाने वश होतो. प्रेमामध्ये हट्ट आणि कष्ट झाले तर शोभतात, आणि हिताचे होतात. आपण भक्तांचे प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढे बघतो. जो मनुष्य साडेतीन कोटी रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्यावाचून राहणार नाही. शंका या फार चिवट असतात, त्या मरता मरत नाहीत. शिवाय, काही शंका आचरणाने आणि अनुभवानेच नाहीशा होतात. म्हणून, मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये. सतत नाम घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते, आणि सर्व शंका आपोआप विरून जातात. लंकेमध्ये रावणाच्या बंदिवासात अशोकवनात सीता असताना, तिच्या सान्निध्याच्या प्रभावामुळे तिथली झाडे, पक्षी, दगड या सर्वांना रामनामाचे प्रेम लागले होते, असे वर्णन आहे. रामनामाचे प्रेम आणि भगवंताचे प्रेम ही दोन्ही एकच आहेत. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे ह्यातच जीवनाचे सर्वस्व आहे.


१५९. ध्रुवासारखी नामावर निष्ठा पाहिजे. प्रत्यक्ष भगवंत समोर आले, तरी त्याने नाम सोडले नाही.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

June 6, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ६ जून २०१४

६ जून

भगवंत आणि मी वेगळे नाहीत. 

 समुद्राचा फेस खरा आहे असे वाटले, तरी त्याच्याखाली पाणीच असते. असत्य हे नेहमी सत्याला धरूनच राहते. जे नाही ते तोंडाने सांगणे ही माया. तिला आपण खरे मानतो. मायेला असत्य मानले की ब्रह्माला सत्यत्व येते. आपण मायेच्या पाठीमागे जातो, पण माया ही मृगजळाप्रमाणे आहे असे समजते तेव्हा आपण स्वस्थ होतो. जन्माच्या वेळेस 'सोऽहं' म्हणत होता, नंतर 'कोऽहं' म्हणू लागला आणि शेवटी 'देहच मी' म्हणू लागला ! वास्तविक, सूर्य आणि त्याचे किरण हे जसे वेगळे नाहीत, त्याप्रमाणे 'भगवंत' आणि 'मी' वेगळे नाहीत.
सत्य म्हणजे अखंड टिकणारे ते, म्हणजे परमात्मस्वरूप होय. सच्चिदानंदस्वरूपाच्या ठिकाणी मन चिकटून राहणे यालाच अनुसंधान म्हणतात. भगवंतावाचून इतर सर्व म्हणजेच उपाधी होय. 'मला कळत नाही' असे वाटणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे; आणि मी आणि भगवंत वेगळे नाहीत असे अंगी मुरणे ही शेवटची पायरी होय. 'जे जे घडते त्याचा कर्ता परमात्मा आहे, मी फक्त कर्तव्यापुरता आहे' असे वाटणे, यालाच निष्काम कर्म म्हणतात; आणि 'आले तर भोगले, गेले तर सोडले', हे सहजकर्म होय. दोष बाधू नयेत अशा रीतीने केलेले कर्म ते ज्ञानयुक्त कर्म होय; आणि ईश्वराच्या स्मरणात केलेले कर्म त्याला निरासक्त कर्म असे म्हणतात. 'अमुकच फळ मला मिळावे' ही वृत्ती सोडणे, याचे नाव निरासक्ति होय. विषयांची विरक्ति झाली की त्याला ज्ञान झाले असे म्हणतात. थोडक्यात म्हणजे, जे कर्म बंधनाला कारण होते ते अज्ञान, आणि जे मोक्षाला कारण होते ते ज्ञान समजावे. कर्ममार्ग, उपासनामार्ग, नवविधाभक्ति, इत्यादि सर्वांनी गाठण्याचे ध्येय एकच असते. लग्नात ज्याप्रमाणे अमुक एक खर्च मी जास्त करीन, दुसरा कमी करीन, असे माणूस म्हणतो, पण मुख्य कार्य हे मुलीला नवरा गाठून देणे, त्याप्रमाणे भगवंताची भेट होणे हे मुख्य होय. आपली देहबुद्धी संतांच्या संगतीच्या आड येऊ देऊ नये. भगवंताच्या, स्वरूपदर्शनाच्या आड माझ्या देहबुद्धीचा पर्वत येतो. सर्व साधनांचा उपभोग अभिमान नाहीसा करण्यासाठी असतो. नामस्मरणाने हे काम लवकर होते, आणि म्हणूनच सर्व साधनांचे सार भगवंताचे नाम हेच आहे. ते आपण श्रद्धापूर्वक घ्यावे आणि भगवंताशी एकरूप व्हावे. आपण प्रयत्‍न करीत असताना, भगवंत माझ्या पाठीशी आहे ही भावनाच आपल्याला उद्धरून नेईल याची खात्री बाळगा, आणि भगवंताच्या नामात आनंदाने कालक्रमणा करा.१५८. आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो, तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्‍न करा.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

June 5, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ५ जून २०१४

५ जून

वैराग्यावाचून सारा परमार्थ लटका आहे. 

 

   

पक्ष्यांची पिले त्यांच्या पंखाखाली वाढतात, त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे. आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल, त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत. आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही. रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते; कारण शक्ति येणे हे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे, अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो. परमार्थात मनाचे कष्ट आहेत. कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे; आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्‍न करील, त्याला परमार्थाचा अनुभव लवकर येईल. आपण आपले मन भगवंताच्या अनुसंधानात मोठ्या काळजीपूर्वक ठेवले असताना त्याच्यावर आघात करायला विषय अगदी टपलेला असतो. मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की पुरे, विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावे. साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जपले पाहिजे. म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय.
प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासक्तिने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ. परमार्थाच्या आड काय येते ? धन, सुत, दारा, वगैरे आड येत नाहीत, तर त्यांच्यावरचे जे ममत्व ते आड येते. वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे; ती वस्तू नसणे हे वैराग्य नव्हे. एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त, असे म्हणता येणार नाही. बायको असून लंपट नसेल तो विरक्त. आहे ते परमात्म्यानेच दिले आहे आणि ते त्याचे आहे, असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय. या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही, तो वैरागी. वैराग्यावाचून सारा परमार्थ लटका आहे. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते. आज खरी भक्ति नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही, आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ति येत नाही. शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता, भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा. ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कुणी नाही, आपले आप्त कुणी नाहीत, जिथे आपल्याला कुणी मान देत नाही, अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा. जिथे कुणी आपल्याला ओळखीचे नाही असे स्थान आपल्या अभ्यासाला चांगले असते.


१५७. बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगति । चित्ति असावा एक रघुपति ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या