July 2, 2021

शुभ्र बुधवार व्रत

."शुभ्र बुधवार व्रत"

आपल्याकडे काही प्रापंचिक  हेतू पूर्ण करण्यासाठी काही अनुभवसिद्ध  उपाय / व्रत सांगितले आहेत. ब-याचदा ते सोपे वाटतात पण करायला गेलं की कळतं सोपे नाहीत. उदा. अमावस्येनंतर येणा-या द्वितीयेला ' चंद्र दर्शन ' हा धनप्राप्तीचा एक प्रकार सांगितला आहे. ' अरे यात काय फार मोठं आहे, घेऊ दर्शन ' असं ठरवून ही शु. द्वितीयेच्या चंद्राचे दर्शनही सोxपी गोष्ट नाही हे अनेकांनी अनुभवलं असेलच. 
धनप्राप्तीसाठीचा आणखी एक उपाय सविस्तर इथे देत आहे. इच्छूकांनी अवश्य करावा. 



हा उपाय मुद्दाम आज शुक्रवारी देत आहे. याची दोन कारणे आहेत. सगळ्यात महत्वाचे आणि मुख्य कारण म्हणजे आज बुधाचे 'रेवती' नक्षत्र आहे.
 दुसरे आज देण्यास कारण की हे वाचून ज्यांना 'शुभ्र बुधवार व्रत ' करायचे आहे त्यांना तयारी साठी ( मनाच्या ) थोडा वेळ मिळेल

व्रतविधी:-
११ पांढरे बुधवार करणे हा बुध उपासनेचा महत्वाचा भाग आहे.या दिवशी उपवास ठेवावा व उपवासाचे फक्त पांढरेच पदार्थ खावेत. तसेच हे पदार्थ पूर्णपणे अळणी करावेत म्हणजे त्यात तिखट- मीठ अजिबात घालू नयेत. पहिल्या बुधवारी जो पदार्थ खाल तोच पदार्थ पूर्ण अकरा बुधवारी खावा.

या व्रतात पांढऱ्या रंगाचे महत्व फार आहे. महत्वाची गोष्ट अशी की बुधवार हा महालक्ष्मीचा खास वार आहे. महालक्ष्मीची पूजा ही बुधाची पूजा म्हणून करावयाची असते.

बुधवारी प्रात: काळी उठून नित्यकर्मे उरकावीत. नंतर जमीन सारवून अथवा फरशी असल्यास स्वच्छ पुसून त्यावर पाट मांडावा. पाटावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवावा तसेच पाटाभोवती रांगोळी काढावी.कलशावर श्रीलक्ष्मीची मुर्ती/ तसबीर ठेवावी व शेजारी बुधाची मूर्ती अथवा चित्र ठेवावे.

" श्री लक्ष्मी देव्यै नम: " या मंत्राने श्री लक्ष्मीची पांढरी फुले वाहून पूजा करावी.देवीला दूध - साखर या पांढऱ्या वस्तूंचाच नैवेद्य दाखवावा.पूजा करताना मन एकाग्र व भक्तिपूर्ण ठेवावे.

बुध हा वाचेचा ग्रह असल्याने त्या दिवशी जरूरीपेक्षा जास्त बोलू नये. त्यादिवशी आचरण अत्यंत शुध्द ठेवावे. दिवसभर पांढरीच वस्त्रे नेसावीत. संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करुन उपवास सोडावा.उपवास सोडताना तिखट- मीठ न घातलेला दहीभात अथवा ताकभात खावा.
सकाळ संध्याकाळ देवीची पूजा झाल्यावर आरती म्हणून बुधाचा हा मंत्र म्हणून प्रार्थना करावी

बुधं त्वं बुद्धीजनको बोधद: सर्वदा तृणाम्!
तत्वावबोधं कुरुषे सोमपुत्र नमो नम:!
🙏🌼

उद्यापन: १२ व्या बुधवारी व्रताचे उद्यापन करावे. सुवासिनीला जेवावयास बोलवावे. जेवणात पक्वान्न म्हणून दुधातील गव्हल्यांची अथवा शेवयांची खीर करावी. स्वयंपाक आखणी न करता नेहमी सारखा करावा. सुवासिनीला पांढरे कापड, पांढ-या फुलांची वेणी, दक्षिणा द्यावी.
 हे व्रत करताना अनेक अडचणी येतात, मनस्ताप होतो, तरीही श्रद्धेने व निष्ठेने हे व्रत पूर्ण करावे. हे व्रत म्हणजे एक तपश्चर्याच असल्याने ती पूर्ण झाल्यावर तिचे इष्ट फळ मिळतेच.
व्रत करताना स्त्रियांना अडचण आल्यास तो बुधवार जमेस न धरता पुढचा धरावा.

विद्याप्राप्तीसाठीही श्री गणपतीचे ११ बुधवार करतात. या व्रताने श्रीगणपती बुधाच्या रुपात प्रसन्न होतात व विद्येतीस भरभराट होते.

माहिती: 'श्री शुभ्र बुधवार व्रतकथा' पोथीतून साभार 📝

२ जुलै २०२१
'रेवती' नक्षत्र   

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या