December 7, 2019

भूपाळी

.*दश  दिशा " भूपाळी " म्हणती* . . . . .

वरची ओळ वाचलेल्यांच्या मनात पहिले वाक्य ही नकळत पणे आले असणार ते म्हणजे
 ' *प्रभाती  सूर नभी रंगती* ' 🎼

काय जादू  होती ना या पहाटेचा  गाण्यांमध्ये , अगदी तोंडपाठ असायची ही गाणी .

*भूपाळी*  - रात्री शेजारती झाल्यावर मंदिराचा गाभारा बंद करून आपण जस झोपी जातो तसे साक्षात देवही झोपी जातात आणि मग पहाटे  पूजा-अर्चा, काकड आरती करण्याआधी  गाणे म्हणून  म्हणजेच भूपाळी ने  त्यांना जागे करण्याची  ही प्रथा .

फारच कल्पक. पहाट वेळच्या निसर्गाचे, पक्षी,प्राणी, सृष्टी यांचे हुबेहूब वर्णन या भक्ती गीतांतून/ भूपाळीतून बघायला मिळते. ही बरीचशी गाणी ' भूप ' रागात आढळतात.

काही गाण्यातून स्वत: ला आठवण करून देणे , की बाबा आजची पहाट तू पहात आहेस त्या  विध्यात्याचे आभार मान.  कुठल्याही गोष्टीची सुरवात  गणपतीला स्मरुन करावी

*उठा उठा हो सकळिक वाचे स्मरावा गजमुख*
रिध्दीसिद्धी चा नायक  सुखदायक भक्तांसी

तुझ्या कांतीसम रक्तपताका
पूर्वदिशा उजळती
अरुण उगवला, पहाट झाली
*उठ महा-गणपती*🙏🏻🌺

सृष्टीचा पालनकर्ता  जागा झालाय , केवढा आनंद , तो इतरांनाही कळावा म्हणून इतरांनाही जागे करायचे

*उठा सकलजन उठिले नारायण*
आनंदले मुनिजन तिन्ही लोक

पण काही भूपाळ्या ह्या  मानवी अवतारात असताना 'देव लहान होते'  त्यावेळी त्यांना जागे करण्यासाठीच्या असाव्यात असा माझा अंदाज

रात्री कौसल्या माता छोट्या रामाला  गोष्ट सांगत असताना  तो आकाशातला चंद्र हातात पाहिजे म्हणून हट्ट करतो. मग सुमंत एक आरसा रामाच्या हातात ठेऊन त्याचे प्रतिबिंब आरशात पाडून बाळ श्रीरामाचे  समाधान करतात. श्रीराम झोपी जातात.  त्यांना जाग करण्यासाठी म्हणल्या गेलेल्या भूपाळीत त्याचे वर्णनं किती छान केलय बघा :-

*काल  दर्पणी चंद्र दावुनी सुमंत गेले गृहा*
*त्याच दर्पणी आज राघवा सूर्योदय पहा*
*वसिष्ठ मुनिवर घेऊन गेले* *पूजापात्र राउळी*
*उभी घेउनी कलश दुधाचा* *कौसल्या माऊली*

*उठी श्री रामा* . . . . .
सुरेख वर्णन  ना  ?

असेच वर्णन ' श्रीकृष्णासाठी पण बरं का ? आजही आपण आपल्या मुलांना उठवताना म्हणतोच की उठ हा लवकर , आवर , शाळेचे वाहन येईल किंवा रविवारी अरे तो तुझा मित्र  आला बघ आवरुन,  उठ, आवर इ इ ,

*घनश्याम  सुदंरा श्रीधरा अरुणोदय झाला*
*उठी लवकरी वनमाळी उदयाचळी मित्र आला* .

इथे मित्र म्हणजे साक्षात  रवी / सूर्य असला तरी  मला इथे कुठेतरी  गोविंदाचा लाडका सुदामा ही असू शकेल असे कायम  वाटत राहिले आहे

 भूपाळी  ज्याच्यात  त्या त्या देवतांची स्तुती केली आहे , त्यांच्या चांगल्या गुणाचे वर्णन केले आहे .  हे प्रत्यक्षात त्यांचासाठी आहे आणि शिवाय  आपल्यातील त्याचा अंशाला  ' देवत्वाला ' / आत्म्याला  केलेली ही आळवणी  असावी असे माझे ठाम मत

उठी उठी सद्गुरू माय, अरुणोदय झाला  - गोंदवलेकर महाराज
उठा उठा श्री  साईनाथ गुरु,  - साईबाबा
उठ पंढरीच्या राजा  - विठ्ठल
उठी गोविंदा, उठी गोपाला
चल उठ रे मुकुंदा
उठ जगत माऊली
उठा उठा श्री गजानना

अशा अनेक भूपाळ्या अनेकांना पाठ असतील , रोज ते म्हणत ही असतील

आमच्या इथे शांतिनिकेत वसतिगृहात पहाटे  ५ वाचता  भूपाळी , भक्ती गीते लागायची आणि  पहाटेचा जो " *उष:काल झाला* .. "  त्याचे चैतन्य जाणवू लागायचे .  मला तर खात्री आहे त्या वसतिगृहातील  मुले / मुली    कँटीनमधल्या कौसल्या माई कलश चहाचा  घेऊन यायचा आधीच त्यांचे " *उठी लवकरी* '  होत असणार


*उठा उठा सकाळ झाली , अमुक साबणाने  अभ्यंगस्नान करायची वेळ झाली*  ही जहिरात  पाठ असणा-या नव्या पिढीला  या वरच्या  भूपाळी / अभंग  माहीत असतील  ही अाशा.
मात्र ज्यांना या भूपाळीचा वगैरे अजिबात गंध नाही  त्याचासाठी  या खास चार ओळींनी लेखनाचा शेवट

नित्य रोज सकाळी
ऐकावी भूपाळी
प्रारब्द्ध नसता कपाळी
तो अभागी  एक

📝७/१२/१९
देवा तुझ्या द्वारी आलो

kelkaramol.blogspot.in

September 12, 2019

पुढल्या वर्षी लवकर या

.
*या रे या सारे या,गजाननाला आळवूया*
🙏🏻🌺

बाप्पा, उद्या तू  परत आपल्या घरी चाललास. दु:ख तर होतच आहे पण *आपलं ठरलयं* 👍🏻

संकल्प आहेच, संपर्कही राहीलच

सकाळी आपल्याच श्वासाची जाणीव होऊन जेंव्हा जाग येईल तेंव्हा 'आधी वंदू तुज मोरया' मगच कराग्रे वसते लक्ष्मी . मुलांना 'वक्रतुंड' म्हणा रे असं सांगताना नकळत आपल्याकडून ही होणारी प्रार्थना,  पुजेच्या वेळी 'प्रणम्य शिरसा देवं' आणि ' अथर्वशिर्षाचे एक आवर्तन' हा नित्य दिनक्रम,  अचानक दृष्टीस पडणारे लाल जास्वंदीचे फूल, तळमजल्यामुळे अगदी बिंधास्त इकडे तिकडे फिरणारे मुषक, वर्षातील ५२ मंगळवार, १२ संकष्ट्या, तेवढ्याच विनायकी,  माघी जयंती , सत्यनारायण- दसरा-लक्ष्मी पूजन आणि इतर कुठल्याही धार्मिक कार्यात/ उत्सवात होणारे तुझे 'सुपारी' रुपी पूजन, सांस्कृतिक कार्यक्रमात होणारी पहिली 'गणेश वंदना', गणेश पुराण पारायणे , अगदी गाडी चालवताना समोरच विराजमान असलेला तू, अष्टविनायक -सिध्दिविनायक- दशभूजा इ. प्रकारात वर्षातून वेळोवेळी भेटणारा तू, अचानक काही 'विघ्न' आली तरी 'सूख' वार्ता ही घेऊन येणारा तूच. आजूबाजूच्या प्रणव, प्रथमेश, मंदार, ओंकार, विनायक, वरद,अथर्व यांच्यातून आठवणीत येणारा तूच आणि कागदावर उमटणाऱ्या *अक्षरा... अक्षरातून*.... *शब्दा*... *शब्दातून* प्रकटणारा *बुद्धीची देवता* म्हणजे *साक्षात तूच* 📝

'भक्ती' मार्गाच्या या संकल्पात, वरील विविध प्रकारे 'संपर्क' ही राहणारच हे नक्की ✔

हे 'अनाथांच्या नाथा '
पुढल्या वर्षी तुम्ही येणार आहात २२ आॅगस्टला
ही तारिख लवकर येऊ दे 🙏🏻

तरीपण ' हेची दान देगा देवा तुझा विसरन व्हावा, विसरन व्हावा तूझा विसरन व्हावा '

"तूज नमो"  🙏🏻🌺

या रे या सारे या
गजाननाला आळवूया
नाम प्रभूचे गाऊया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया

गुणगान तुझे ओठांवर राहू दे
चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे
नाथांचा नाथ तू, मायेची हाक तू
भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया

उपकार तुझे सुखदायक सुखकर्ता
आधार तुझा तू तारण करता
तू माता, तूच पिता
तू बंधू, तूच सखा
आम्हावरी राहू दे माऊली तुझी दया

📝 देवा तुझ्या द्वारी आलो
kelkaramol.blogspot.in

#देवाक काळजी

August 28, 2019

गणपती प्राण प्रतिष्ठापना पूजा विधीची ध्वनीफीत

दरवर्षी प्रमाणे - गणपती प्राण प्रतिष्ठापना  पूजा विधीची ध्वनीफीत इथे उपलब्ध आहे 

https://od.lk/d/MV8xNTczNDI5NzRf/Ganpati%20Pran%20Pratishtha%20Maha%20Pooja.mp3

ही ध्वनीफीत जुनी असल्याने पूजा करताना खालील बदल लक्षात ठेवावा 

"विकारीनाम संवत्सर 
सोमवासरे 

#ज्ञानप्रबोधिनी 
#झी २४ तास 

मंगलमूर्ती मोरया 

August 5, 2019

धन्य धन्य हो

धन्य धन्य हो ...🙏🏻🌺

खुप दिवस झाले मंडळी कुलदेवतेला गेलो नाही. एकदा त्र्यंबकेश्वरला जाऊन यायचंय तसंच शिर्डी ही करता येईल ना?   ते अंबेजोगाईला जायचे राहूनच जातय बघा. अशा प्रकारचे अनेक संवाद आपण वेळोवेळी ऐकत असतो. घरातील मंगल कार्य असेल, परंपरा असतील, किंवा श्रध्दा-भक्ती म्हणून असेल, प्रकट दिन-समाधी किंवा काही विशेष जत्रा, उत्सवाच्या निमित्याने वेळोवेळी आपण एखाद्या धार्मिक ठिकाणाला भेट देत असतो.

तिथे एकदा गेलो की अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. स्थानमहात्म्या प्रमाणे रांगेत लागणारा वेळ गृहीत धरून भक्त जेंव्हा आपल्या देव/देवतांचे मुख दर्शन घेतो तेंव्हा त्याला तिथे येण्याचे सार्थक झाल्याचे समाधान मिळते.

मंडळी, दर्शन घेतले,तीर्थ- प्रसाद घेतला, अंगारा लावला, इतरांसाठी पुडीत बांधून घेतला तरी एक गोष्ट केल्याशिवाय या सोहळ्याची ख-या अर्थाने सांगता झाली असे म्हणता येणार नाही ,जोपर्यत तिथे आपण त्या चैतन्यरुपी वास्तूस *प्रदक्षिणा* मारत नाही.

*धन्य धन्य हो  प्रदक्षिणा सद्गुरु रायाची*...

मंडळी, आज याच विषयावर मंथन. दर्शन झाले की आपण अगदी सहज प्रदक्षिणा मारतो. पण किती मोठं अध्यात्म यात दडलंय ना? 
आठवतीय स्पर्धा  बाल गणेश आणि कार्तिकी मधील? पृथ्वीला सगळ्यात पहिला प्रदक्षिणा कोण मारतो ही स्पर्धा आणि बाल गणेशाने शंकर-पार्वती अर्थात आई- बाबांना प्रदक्षिणा मारुन पृथ्वीप्रदक्षिणेचे पुण्य तात्काळ प्राप्त केले. कुठल्याही देवळात आपण त्या देवतेला माऊली/ पालनकर्ता या नात्याने बघतो. तेंव्हा दर्शन झाल्यावर जेंव्हा आता प्रदक्षिणा माराल तेंव्हा ही फार मोठी कृती तुमच्याकडून होत आहे हे लक्षात असू दे. आता प्रदक्षिणा १,३,५,७,११,२१ किती मारायच्या हा ज्याचा त्याचा श्रध्देचा प्रश्ण. ( ज्यांना ' प्रश्न ' असे लिहावेसे वाटते त्यांनी असे लिहावे हरकत नाही)

प्रत्येक देवस्थानातील/ देवळातील प्रदक्षिणा  मार्ग हा विशेष असतो.
साक्षात डोंगररुपात स्थित गणपतीला प्रदक्षिणा घालण्याचा नैसर्गिक अनुभव ब-याच जणांनी गणपतीपुळेला घेतला असेलच.

सांगलीच्या गणपती मंदीरात प्रदक्षिणा मारताना, तिथे दगडात असणाऱ्या कड्या वाजवून दर्शन घेण्याची प्रथा अनेक सांगलीकरांना परिचयाची असेल.

कोल्हापूरला अंबाबाईच्या देवळातील प्रदक्षिणा मार्ग म्हणजे भूयारातून जातोय का काय असे वाटायचे लहानपणी. थोडासा नागमोडी वळणदार मार्गावरुन जाताना केंव्हा बाहेर पडायचो ते कळायचेच नाही.
 नरसोबावाडीला छतावर अनेक धार्मिक चित्रे / कथा कोरलेल्या होत्या. लहानपणी वाडीला गेल्यावर काका-काकू कडून या गोष्टी सांगण्यात आल्या ज्या कायम मनात कोरल्या गेल्या.

मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरातील प्रदक्षिणा मार्ग समुद्र बघायला मिळायचा म्हणून आवडायचा.

ही काही आठवलेली उदाहरणे. तुमची ही अशी खास उदाहरणे असू शकतात.

प्रदक्षिणा आपण स्वत: वय्यक्तिक घातलेली एका देवळाच्या गाभाऱ्यापुरती असो, त्या देवाच्या पालखीची नगर प्रदक्षिणा असो किंवा नर्मदा परिक्रमा( प्रदक्षिणा ) सारखी व्यापक असो. याचे मोल पृथ्वी प्रदक्षिणे सारखेच.

मेष ते मिन राशीतून मार्गक्रम करुन निरंतर प्रदक्षिणेच्या चक्रात अडकलेले चंद्र, रवि आणि इतर ग्रह हे ही कालचक्राच्या वाटेवरचे भक्तच.

लेख संपवता संपवता , काही ठिकाणी प्रदक्षिणा संपल्यावर एक वेगळी वाट जी तुम्हाला देवस्थानाच्या छतावर घेऊन जाते जिथून तुम्हाला सरळ
गाभा-यातील मुर्तीचे दर्शन होते.
नक्की मंदीर आठवत नाही पण बहुतेक चिंचवडचे गणपती मंदीर आणि हो हे मात्र नक्की आठवतयं हरिपूरचे संगमेश्वराचे मंदीर.
चला जायचं संगमेश्वराला 'भक्ती संगमावर?

अनायसे आज पहिला श्रावणी सोमवार पण आहे. ☺

प्रदक्षिणा करुनी देह, भावे वाहिला
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे, उभा राहिला

📝५/८/१९
kelkaramol.blogspot.in

July 29, 2019

भक्ती संगम


" *भक्ती  संगम* "

मंडळी नमस्कार 🙏🏻

आषाढ महिना संपत आला की  धरण क्षेत्रातील पावसाने  वाढलेल्या पाण्याच्या बातम्या लक्ष वेधून घेतात . अमुक पूल पाण्याखाली गेला, अमुक धरणं  क्षमतेच्या इतकी भरली , तमुक गावाचा संपर्क तुटला , या धरणातून अमुक तमुक क्षमतेचा विसर्ग चालू , हा बंधारा भरून वाहू लागला  इ इ . 

अशावेळी  अनेक ठिकाणी  एक अपूर्व  दृश्य पहावयास मिळते .  यात प्रामुख्याने उल्लेख करता येईल तो म्हणजे *नरसोबावाडीच्या  (जिल्हा. कोल्हापूर ) " दक्षिणद्वार " सोहळ्याचा*

कृष्णा आणि पंचगंगा  यांच्या संगमावर असलेले नरसोबावाडी हे एक पवित्र धार्मिक तीर्थक्षेत्र. कोल्हापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसाने पंचगंगा ( जणू  पाच भगिनी) दुथडी भरून वाहू लागते. त्याचवेळी सातारा, सांगली  जिल्ह्यातील पावसाने  महाबळेश्वर , कोयना पाणलोट क्षेत्र  , कोयना धरणातील पाण्याचा उत्सर्ग, चांदोली धरणातील उत्सर्ग  यामुळे  कृष्णा , कोयना , वारणा या नद्या  आनंदाने फुलून जाऊन पात्राच्या बाहेर पडून दक्षिण दिशेकडून नरसोबावाडीला  येतात आणि एका अनोख्या भेटीसाठी  'सप्त कन्या' आणि त्यांची 'कृष्णा माई' सज्ज होतात.

या मिळून सा-याजणींची  " परब्रह्म भेटीलागी "  अशी अवस्था होऊन जाते आणि मग या सगळ्याजणी  सरळ पोचतात ते  *श्री नरसिह सरस्वती यांच्या ' मनोहर पादुकांवर ' जलाभिषेक करण्यासाठी*

" शक्ती आणि भक्ती  यांचा हा  अनोखा संगम. *अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त* चा जयघोष करत मग इतर भाविक  या भक्ती संगमाचा
 " याची देही " अनुभव घेऊन भक्तीरसात चिंब होऊन जातात. असा हा विलक्षण  दक्षिणद्वार सोहळा, दरवर्षी पावसाळ्यात दोन - तीन वेळा तरी अनुभवास येतो.

नरसोबावाडीस पोहोचण्यापुर्वी  या सगळ्या नद्या वाटेत अनेक ठिकाणी   अनेक गावातील  घाटांवरच्या देवळातील ' चैतन्याला '  स्पर्श करून आलेल्या असतात. काही उदाहरणे द्यायची झाल्यास कृष्णेने  वाईच्या ढोल्या  गणपतीच्या गाभा-यात जाऊन घेतलेले दर्शन किंवा कृष्णेचेच  औदूंबरला दत्त गुरु चरणी घातलेले लोटांगण सांगता येतील.

 अगदी असंच त्र्यंबकेश्वरहून उगम पावणारी
 ' गोदा ' त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन  नाशिकला  ' प्रभू श्री रामचंद्रा ' चरणी लीन  झालेली पहावयास मिळते.  माऊलीच्या भेटीसाठी आसुसलेली 'इंद्रायणी' हे आणखी एक उदाहरण. अशी अनेक उदाहरणे आपणसा  इतरत्रही पहावयास मिळतात.

नद्यांना या " परब्रह्म भेटीच्या ओढीचे"  मूळ  माझ्यामते  फार पूर्वी पासून आहे. जेंव्हा श्रावण कृष्ण अष्टमीला  छोट्या गोविंदाला घेऊन ' कंसा ' पासून सुरक्षीत स्थळी  नेण्यासाठी जेंव्हा वासुदेव निघाले होते. 'यमुनेला' ही वाटलंच की  या देवकी पुत्राच्या छोट्या पावलांना स्पर्श करावा असं.  सोमवती अमावस्येला  ओंकारेश्वराच्या दर्शनाहून परत बोटीतून येताना
' श्री गजानन महाराजांच्या ' बोटीला खालच्या बाजूने छिद्र पडले . नावेत पाणी  जाऊ लागले. इतर भक्त मंडळी घाबरली पण इथे ही 'नर्मदा' "राजाधीराज योगीराज परब्रह्म गजानन महाराजांचे " चरण स्पर्श करण्यासाठी आली होती.

आषाढ महिन्यात पांडूरंगाच्या भेटीसाठी तहान भूक विसरून निघालेले वारकरी  आणि याच आषाढ - श्रावणात परब्रह्ममाच्या भेटी साठी निघालेल्या या नद्या  यात मला तरी काही फरक वाटत नाही .  हे कालचक्र, जीवन असेच प्रवाहित राहील जोपर्यत
 ' भेटीची ही आस ' निरंतर राहील

आणि  एकदा का ही भेट झाली की मग फक्त जाणवेल.

तुझा श्वास माझा ध्यास नुरे दुजे काही
तुझी भक्ती माझी मुक्ती भरे दिशा दाही
विश्व् आत्मरुपी  अवघे एकरूप झाले

*परब्रह्म भेटी लागी धरेवरी आले*
*सूर सूर चैत्यनाचा रोमरोम झाले*

🙏🏻🌺
२९/०७/१९
📝 *देवा तुझ्या द्वारी आलो*
kelkaramol.blogspot.in


July 1, 2019

वारीतील - सेल्फीत्सोव

*सेल्फीशी होऊ दंग. . .    सेल्फीत्सोव*

( सेल्फीची गोडी, करी जास वेडी, तोचि पुण्य जोडी पंढरीचे )

देहू आळंदी हून पंढरपूरकडे  पालख्या निघाल्या की  याच सुमारास  पुण्य नगरीत  एक अनोखा  उत्सव भरताना दिसतो.  अर्थात पुणेकर हे मुळातच उत्सव प्रिय . सवाई महोत्सव असू दे ,   गणेशोत्सव असू दे  , दिवाळी पहाट किंवा अगदी कार्तिक पोर्णीमा  असू दे या सगळ्यात पुणेकरांचा उत्साह अगदी  ओसंडून वहात असतो.

 देहू ,आळंदीहून पुणे मार्गे पंढरपूरला जाणा-या पालख्या हा ही पुणेकरांसाठी असाच  कौतुकाचा विषय.  पाऊस, हेल्मेट सक्ती, रस्त्यांची कामे , मेट्रोची कामे  आणि त्यात वारीमुळे होणारी वाहतूक कोंडी  याची चिंता न करता अस्सल पुणेकर या पालख्या  "एन्जॉय"  करतो. इथे अस्सल पुणेकर हा शब्द  अशासाठी वापरलाय की  या सगळ्यामुळे त्रास होतो असे मानणारा वर्ग ही पुण्यात आहे पण तो मुळचा पुणेकर नसून बाहेरून पुण्यात स्थायिक झालेला पुणेकर आहे.

या पालख्या जर पुणे मुक्कामी विकेंड ला येत असतील तर या उत्साहाला अधिक उधाण येते.  आपापला व्याप सांभाळून पुणेकर वारीचा आनंद लुटतात , वारी बरोबर एक दिवस चालत जातात , ताल मृदूंग , अभंग , जयघोष , पताका , तुळशी- वृंदावन , कपाळावर गंध, पालखी  सोबत जाणे  इ अनेक प्रकार करुन आपला सहभाग नोंदवतात.

साधारण उत्सव असो , यात्रा/ जत्रा असो साधारण आपण तीन प्रकारची जनता यात सामील होते असे म्हणतो  हौसे, गवसे, नौसे .
सोशल मीडियाचा,  सेल्फी या प्रकारचा उदय झाल्यानंतर आजकाल  ' हौसे, गवसे, नौसे बरोबरच आता "सेल्फे"  ही नवी जमात बघता बघता फोपावली आहे असा आमचा अभ्यास सांगतो.  प्रोफेशनल कॅमेरामन , चित्रकार , आर्टिस्ट यांच एक ठीक असतं. पूर्वीपासून ही लोकही वारीचे चित्रीकरण,काही खास फोटो  काढण्यात मग्न असतात . मात्र यांचा त्रास फारसा कुणाला होत नाही. एकतर हे लांब कुठं तरी  बसून  आपले काम करत असतात . ना ते कुणाच्या अध्यात ना मध्यात .  हरिनामाचा जयघोष करत चाललेल्या  या माऊलीच्या भक्तांच्या तर हे गावीही नसते  की दूर  कुठूनतरी  कुणीतरी आपली छबी , आपले भाव (  आजच्या शब्दात  नॅचरल एक्सप्रेशन्स )  टिपत आहेत.  यात कुठेही देखावा नसतो , कृत्रिमता नसते  त्यामुळे ते चित्र ही अगदी सहज जमून जाते.

आता या वारीतल्या सेल्फी टेक्नॉलॉजीचा ( इथे पारंपारिक तंत्रज्ञानाचा विचार आहे , यातही आता अनेक आधुनिक तंत्रज्ञान आले आहे )  विचार करू.
एकंदर यांचे वर्णन अभंगातून व्यक्त करायचे झाल्यास असे 👇🏻 करता येईल.

*पुण्यनगरी गाऊ आम्ही  पुण्यनगरी नाचू*
*मोबाईलच्या कँमेराने  सेल्फी फोटो काढू*
*विठ्ठलचे नाम घेऊ  लावूनी ' टायमर '*

 तर  या  लोकांना आपण वारीत जाऊन आलो ( फोटो काढण्यापुरते का होईना )  हे अख्या जगाला ( ठणकावून) सांगायचे असते. हेच प्रयोजन ठेऊन ते घरातून निघतात . यात काही जण स्वतःच्या कुटूंबासह (  हे कमीच ) , ऑफीस ग्रुप,  सोसायटी ग्रुप  किंवा शाळा - कॉलेजच्या मित्र - मैत्रिणींचा ग्रुप ( हे जास्त )निघतात. थोडक्यात घोळक्याने जातात .  यात एखाद्या शहाण्याला यापूर्वीच्या
' *सेल्फी-वारीचा* ' अनुभव असतो. पालखीचा मुक्काम  कुठे आहे , मार्ग काय आहे  याची माहिती ही करून घेतलेली असते. मग ठरलेल्या ठिकाणी मंडळी पोचतात. मग कुणा माऊलीच्या डोक्यावरचे तुळशी वृंदावन स्वतःच्या डोक्यावर घेऊन  फोटो काढायला लावणे ( इथे बहुतेक सेल्फी घेता येणे शक्य नसते ) , उगाच ताल , मृदूंग अडकवून

*निघालो घेऊन कॅमेरा हा हाती , आम्ही भाग्यवान* 

अशा अॅटीट्युड ( ऐटीत - IT मधील असेही म्हणा हवंतर ) मधे हे सेल्फीकरी विठ्ठलाला लावतात तसा गंध कपाळावर ' गुगल ' तानाचा फोटो /  घोडे , पालखी  बरोबरचा सेल्फी  आणि पुढे काय काय प्रकारे सेल्फी निघू शकतात इतपत कल्पना करण्यात तुम्ही समर्थ आहात . आजकाल ते
'फेसबुक  लाईव्ह ' प्रकार पण दाखवायचे असते.

यानं  काय होत की एकंदर या वारीचा वेग पुण्याच्या आजूबाजूला कमी होतो. जो तो  सेल्फी ( स्व चित्र) घेण्यासाठी इतरांना थांबवतो. ते वारकरीही मग थांबतात  , त्यांचा नामात व्यत्यय येतो.
या सर्व प्रकाराने  आपण भक्तीचे अनोखे प्रदर्शन नुसते करत आहोत  असे काही वेळा वाटते.

अर्थात याला अपवाद आहेत हे नक्कीच . काही खरोखरच सेवाभावाने कुठलीही अपेक्षा  न करता मदत करतात, अन्नदानाचे आयोजन होते , कचरा व्यवस्थापनाचे , सांडपाणी व्यवस्थापनाचे नव नवीन आदर्श  पुढे येतात.अशा काही समाधानाच्या गोष्टीही दिसून येतात

*पंढरपूरची वारी  ही  ख-या अर्थाने  महाराष्ट्राचा सांस्कृतिक / वैचारिक  आणि / भक्तीमय  ठेवा  आहे. त्या सोहळ्याला आपण सगळे मिळून असेच ठेवू या* 🚩🚩

दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला
घुमे गजर हरिनामाचा भक्त  *फोटोत  रंगला* ,

असं  फक्त व्हायला नको हीच पांडूरंगा चरणी  प्रार्थना 🙏🏻🌺

देवा तुझ्या द्वारी आलो
www.kelkaramol.blogspot.in

May 15, 2019

हस्त नक्षत्र चरण ४: श्लोक


हस्त नक्षत्रात चरण ३: श्लोक


हस्त नक्षत्र चरण २: श्लोक


हस्त नक्षत्र चरण १: श्लोक

.
उत्तरा फाल्गुनी चरण ४: श्लोक


May 12, 2019

माघ नक्षत्र चरण३: श्लोक

.माघ नक्षत्र चरण २: श्लोक

.माघ नक्षत्र चरण १: श्लोक

.सूर्यस्तुती

.आज रविवारच्या सुमुहूर्तावर ही सूर्यस्तुती  माऊली कृपेने 🙏🏻

🌞 श्री सूर्यस्तुति 🌞

जयाच्या रथा एकची चक्र पाहीं
नसे भूमि आकाश आधार कांहीं
असे सारथी पांगुळा ज्या रथासी
नमस्कार त्या सूर्यनारायणासी!

करी पद्म माथां किरिटी झळाळी
प्रभा कुंडलांची शरीरा निराळी
पहा रश्मि ज्याची त्रिलोकासि कैसी
नमस्कार त्या सूर्यनारायणासी!

सहस्त्रद्वयें दोनशें आणि दोन
क्रमी योजने जो निमिषार्धतेन
मना कल्पवेना जयाच्या त्वरेसी
नमस्कार त्या सूर्यनारायणासी!

विधीवेदकर्मासि आधारकर्ता
स्वधाकार स्वाहादि सर्वत्र भोक्ता
असे अन्नदाता समस्तां जनांसी
नमस्कार त्या सूर्यनारायणासी!

युगे मंत्रकल्पांत ज्याचेनि होती
हरिब्रह्मरुद्रादि ज्या बोलिजेती
क्षयांती महाकाळरुप प्रकाशी
नमस्कार त्या सूर्यनारायणासी!

शशी तारका गोवुनी जो ग्रहातें
त्वरें मेरु वेष्टोनियां पूर्वपंथें
भ्रमे जो सदा लोक रक्षावयासी
नमस्कार त्या सूर्यनारायणासी!

समस्या सुरांमाजि तूं जाण चर्या
म्हणोनीच तूं श्रेष्ठ त्या नाम सूर्या
दुजा देव तो दाखवी स्वप्रकाशी
नमस्कार त्या सूर्यनारायणासी!

महामोह तो अंधकारासि नाशी
प्रभा शुध्द सत्वाचि अज्ञान नाशी
अनाथां कृपा जो करी नित्य ऐशी
नमस्कार त्या सूर्यनारायणासी!

कृपा ज्यावरी होय त्या भास्कराची
न पाहून शके शत्रु त्याला विरिची
उभ्या राहती सिद्धी होऊनी दासी
नमस्कार त्या सूर्यनारायणासी!

फळे चंदनें आणि पुष्पेंकरोनी
पुजावें बरें एकनिष्ठा धरोनि
मनीं इच्छिंले पाविजे त्या सुखासी
नमस्कार त्या सूर्यनारायणासी!

नमस्कार साष्टांग बापा स्वभावें
करोनि तया भास्करालागिं घ्यावे
दरिद्रें सहस्त्रादि जो क्लेश नाशी
नमस्कार त्या सूर्यनारायणासी!

वरी सूर्य आदित्य मित्रादी भानू
विवस्वान इत्यादिही पादरेणू
सदा वांच्छिती पूज्य ते शंकरासी
नमस्कार त्या सूर्यनारायणासी!

🌺

kelkaramol.blogspot.in

आश्लेषा नक्षत्र चरण ४: श्लोक

.
आश्लेषा नक्षत्र चरण ३: श्लोक

.
गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या