July 1, 2019

वारीतील - सेल्फीत्सोव

*सेल्फीशी होऊ दंग. . .    सेल्फीत्सोव*

( सेल्फीची गोडी, करी जास वेडी, तोचि पुण्य जोडी पंढरीचे )

देहू आळंदी हून पंढरपूरकडे  पालख्या निघाल्या की  याच सुमारास  पुण्य नगरीत  एक अनोखा  उत्सव भरताना दिसतो.  अर्थात पुणेकर हे मुळातच उत्सव प्रिय . सवाई महोत्सव असू दे ,   गणेशोत्सव असू दे  , दिवाळी पहाट किंवा अगदी कार्तिक पोर्णीमा  असू दे या सगळ्यात पुणेकरांचा उत्साह अगदी  ओसंडून वहात असतो.

 देहू ,आळंदीहून पुणे मार्गे पंढरपूरला जाणा-या पालख्या हा ही पुणेकरांसाठी असाच  कौतुकाचा विषय.  पाऊस, हेल्मेट सक्ती, रस्त्यांची कामे , मेट्रोची कामे  आणि त्यात वारीमुळे होणारी वाहतूक कोंडी  याची चिंता न करता अस्सल पुणेकर या पालख्या  "एन्जॉय"  करतो. इथे अस्सल पुणेकर हा शब्द  अशासाठी वापरलाय की  या सगळ्यामुळे त्रास होतो असे मानणारा वर्ग ही पुण्यात आहे पण तो मुळचा पुणेकर नसून बाहेरून पुण्यात स्थायिक झालेला पुणेकर आहे.

या पालख्या जर पुणे मुक्कामी विकेंड ला येत असतील तर या उत्साहाला अधिक उधाण येते.  आपापला व्याप सांभाळून पुणेकर वारीचा आनंद लुटतात , वारी बरोबर एक दिवस चालत जातात , ताल मृदूंग , अभंग , जयघोष , पताका , तुळशी- वृंदावन , कपाळावर गंध, पालखी  सोबत जाणे  इ अनेक प्रकार करुन आपला सहभाग नोंदवतात.

साधारण उत्सव असो , यात्रा/ जत्रा असो साधारण आपण तीन प्रकारची जनता यात सामील होते असे म्हणतो  हौसे, गवसे, नौसे .
सोशल मीडियाचा,  सेल्फी या प्रकारचा उदय झाल्यानंतर आजकाल  ' हौसे, गवसे, नौसे बरोबरच आता "सेल्फे"  ही नवी जमात बघता बघता फोपावली आहे असा आमचा अभ्यास सांगतो.  प्रोफेशनल कॅमेरामन , चित्रकार , आर्टिस्ट यांच एक ठीक असतं. पूर्वीपासून ही लोकही वारीचे चित्रीकरण,काही खास फोटो  काढण्यात मग्न असतात . मात्र यांचा त्रास फारसा कुणाला होत नाही. एकतर हे लांब कुठं तरी  बसून  आपले काम करत असतात . ना ते कुणाच्या अध्यात ना मध्यात .  हरिनामाचा जयघोष करत चाललेल्या  या माऊलीच्या भक्तांच्या तर हे गावीही नसते  की दूर  कुठूनतरी  कुणीतरी आपली छबी , आपले भाव (  आजच्या शब्दात  नॅचरल एक्सप्रेशन्स )  टिपत आहेत.  यात कुठेही देखावा नसतो , कृत्रिमता नसते  त्यामुळे ते चित्र ही अगदी सहज जमून जाते.

आता या वारीतल्या सेल्फी टेक्नॉलॉजीचा ( इथे पारंपारिक तंत्रज्ञानाचा विचार आहे , यातही आता अनेक आधुनिक तंत्रज्ञान आले आहे )  विचार करू.
एकंदर यांचे वर्णन अभंगातून व्यक्त करायचे झाल्यास असे 👇🏻 करता येईल.

*पुण्यनगरी गाऊ आम्ही  पुण्यनगरी नाचू*
*मोबाईलच्या कँमेराने  सेल्फी फोटो काढू*
*विठ्ठलचे नाम घेऊ  लावूनी ' टायमर '*

 तर  या  लोकांना आपण वारीत जाऊन आलो ( फोटो काढण्यापुरते का होईना )  हे अख्या जगाला ( ठणकावून) सांगायचे असते. हेच प्रयोजन ठेऊन ते घरातून निघतात . यात काही जण स्वतःच्या कुटूंबासह (  हे कमीच ) , ऑफीस ग्रुप,  सोसायटी ग्रुप  किंवा शाळा - कॉलेजच्या मित्र - मैत्रिणींचा ग्रुप ( हे जास्त )निघतात. थोडक्यात घोळक्याने जातात .  यात एखाद्या शहाण्याला यापूर्वीच्या
' *सेल्फी-वारीचा* ' अनुभव असतो. पालखीचा मुक्काम  कुठे आहे , मार्ग काय आहे  याची माहिती ही करून घेतलेली असते. मग ठरलेल्या ठिकाणी मंडळी पोचतात. मग कुणा माऊलीच्या डोक्यावरचे तुळशी वृंदावन स्वतःच्या डोक्यावर घेऊन  फोटो काढायला लावणे ( इथे बहुतेक सेल्फी घेता येणे शक्य नसते ) , उगाच ताल , मृदूंग अडकवून

*निघालो घेऊन कॅमेरा हा हाती , आम्ही भाग्यवान* 

अशा अॅटीट्युड ( ऐटीत - IT मधील असेही म्हणा हवंतर ) मधे हे सेल्फीकरी विठ्ठलाला लावतात तसा गंध कपाळावर ' गुगल ' तानाचा फोटो /  घोडे , पालखी  बरोबरचा सेल्फी  आणि पुढे काय काय प्रकारे सेल्फी निघू शकतात इतपत कल्पना करण्यात तुम्ही समर्थ आहात . आजकाल ते
'फेसबुक  लाईव्ह ' प्रकार पण दाखवायचे असते.

यानं  काय होत की एकंदर या वारीचा वेग पुण्याच्या आजूबाजूला कमी होतो. जो तो  सेल्फी ( स्व चित्र) घेण्यासाठी इतरांना थांबवतो. ते वारकरीही मग थांबतात  , त्यांचा नामात व्यत्यय येतो.
या सर्व प्रकाराने  आपण भक्तीचे अनोखे प्रदर्शन नुसते करत आहोत  असे काही वेळा वाटते.

अर्थात याला अपवाद आहेत हे नक्कीच . काही खरोखरच सेवाभावाने कुठलीही अपेक्षा  न करता मदत करतात, अन्नदानाचे आयोजन होते , कचरा व्यवस्थापनाचे , सांडपाणी व्यवस्थापनाचे नव नवीन आदर्श  पुढे येतात.अशा काही समाधानाच्या गोष्टीही दिसून येतात

*पंढरपूरची वारी  ही  ख-या अर्थाने  महाराष्ट्राचा सांस्कृतिक / वैचारिक  आणि / भक्तीमय  ठेवा  आहे. त्या सोहळ्याला आपण सगळे मिळून असेच ठेवू या* 🚩🚩

दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला
घुमे गजर हरिनामाचा भक्त  *फोटोत  रंगला* ,

असं  फक्त व्हायला नको हीच पांडूरंगा चरणी  प्रार्थना 🙏🏻🌺

देवा तुझ्या द्वारी आलो
www.kelkaramol.blogspot.in

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या