April 30, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३० एप्रील २०१४

३० एप्रिल

जेथे भगवंताचें नामस्मरण । तेथे सर्व संतांचें ठाण ॥





जोंवर धरिली जगाची आस । तोंवर परमात्मा दूर खास ॥
परमात्म्याची प्राप्ति । न होई राखता विषयासक्ति ॥
जग विषयाकार राहिले । तेथे प्रेम केले ते घातासी आले ॥
विषयी एकजीव झालो जाण । सुटता न सुटे आपण जाण ॥
मान, अपमान, जगाचे सुख-दुःख । हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण ॥
अभिमानांत परमात्म्याचे विस्मरण । हें जीवपणाचें मुख्य लक्षण ॥
सुख-दुःख, विपत्ति-आपत्ति, । ही माया प्रपंचाची ओहोटी भरती ॥
आत्मनिश्चय बाणल्यावांचून माया न हटे न सुटे जाण ॥
आता करी शूर मन । मायेसी हटवावे आपण ॥
जैसें जैसें बाहेर दिसलें । त्याचें बीज आपणाशीच उरलें ॥
एकच वस्तूची ओळखण जाण । पूर्ण होते समाधान ॥
ज्याच्यांत मानावे मी सुख । त्याच्यातच उद्‌भवतें दुःख ॥
नराचा होय नारायण । जर न चुकला मार्ग जाण ॥
जेथे ठेवावी आस । त्याचे बनावें लागते दास ॥
देह तो पंचभूतांचा । त्याचा भरवसा न मानावा फारसा ॥
मी तुम्हांस सांगतो हित । दृश्यांत न ठेवावें चित्त ॥
दृश्य वस्तु नाशिवंत असते । भगवत्कृपेने समाधान येते ॥
परिस्थिति नसे बंधनास कारण । असे आपलेच मनाची ठेवण ॥
देवास पाहावें ज्या रीतीनें । तसाच तो आपणास दिसतो जाण ॥
विषयाचा नाही झाला जोंवर त्याग । तोंवर रामसेवा नाही घडत सांग ॥
आपलें प्रेमयुक्त चाले धणी । त्यासी म्हणती ब्रह्मज्ञानी ॥
द्रव्यदारावर्जित जाण । ही खरी संताची खूण ॥
सृष्टी पाहावी भगवदाकारी । प्रेम ठेवील त्याचेवरी । त्याला नाही दुसरी सरी ॥
आल्यागेल्यास द्यावे अन्नदान । मुखानें भगवंताचें नाम ॥
हृदयांत रामाची प्रीति । यासच थोर म्हणती जीवन्मुक्ति ॥
न धरावी जगाची आस । तोच होऊ पाहे रामदास ॥
नामांत संत । नामीं भगवंत ॥
वृत्ति राखावी अत्यंत शांत । हेंच संताचें मुख्य लक्षण जाण ॥
जेथे भगवंताचें नामस्मरण । तेथे सर्व संतांचें ठाण ॥
अगरबत्ती जळून गेली । परि सुवासाने राहिली ॥
तैसी रामचरणी झाले जे लीन । तेच खरे जिवंत जाण ॥
संतचरणीं झाला लीन । त्याला भाग्यास नाहीं दुजें उणें ॥
संताची संगति । भगवन्नामानें साधतें ॥


१२१. देहासकट माझा प्रपंच । रामा केला तुला अर्पण ॥
ऐसें वाटत जावें चित्तीं । कृपा करील रघुपति ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

April 29, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २९ एप्रील २०१४

२९ एप्रिल

पैशाच्या आसक्तित राहू नये. 

 



कामवासना आणि पैसा ही दोन्ही परमार्थाला विघातक आहेत; पण मला जर कोणी विचारले की, 'त्यातल्या त्यात जास्त घातक कोणते ते सांगा ?' तर मी सांगेन की, 'पैसा हा त्यांतला त्यात परमार्थाला जास्त हानिकारक आहे. पैसा हा भगवंताची निष्ठा कमी करतो.' भगवंताने आपल्याला पैसा दिला आहे, तो आपण सत्पात्र आहोत म्हणून का दिला आहे ? यासाठी, भिकार्‍याला पैसा देताना उगीच वाद घालू नये. तसे करणे म्हणजे काही न करण्याची बुद्धी होय. एखादा त्यागी मनुष्य सर्व देईल पण 'स्व' देणार नाही. 'स्व' देऊन मग 'सर्व' ठेवले तरी चालेल, पण 'सर्व' देऊन 'स्व' ठेवला तर ते मात्र चालणार नाही; म्हणजेच, 'मी देतो' ही भावना राहिली तर सर्वच देणे वाया जाते. मुख्य म्हणजे त्यातली वासना गेली पाहिजे, तर खरे सुख लागते.
देह हा पाया धरून त्यावर इमारत बांधू लागलो तर इमारत पक्की कशी होणार ? मी 'माझा' देह म्हणतो, पण ताप येणे न येणे, इजा होणे न होणे, हे आपल्या हातात आहे का ? 'मी माझे रक्षण करीन ' असे म्हणतो, पण वाटेत ठेच लागून पडल्यावर लोकांनी मला घरी आणावे लागते; म्हणजे जीवित किती परस्वाधीन आहे ! देहाने कितीही कार्य केले तरी ते कळसाला नाही पोहोचणार. अभिमानाने केलेले कार्य कसे कळसाला पोहोचणार ? एक भगवदिच्छेने कार्य केले तरच ते शेवटाला जाते. समर्थांनी देहबुद्धी नष्ट करून, रामाचे अधिष्ठान ठेवून कार्य केले; म्हणून त्यांना एवढे कार्य करता आले. जो भगवंताचा झाला त्याचेच कार्य पूर्ण झाले, आणि त्यालाच खरे समाधान मिळाले.
राजाच्या पोटी आलेले देखील भिकारी होऊन जातात, मग मी संपत्तीचा कुठे गर्व करावा ? पैशाने प्रेमात बिघाड येतो आणि अगदी जवळचे नातेवाईकसुद्धा दूर होतात. मी खरे सांगतो, पैशाच्या आसक्तित तुम्ही राहू नका. ही आसक्ति नाहीशी करण्याचा सोपा उपाय म्हणजे संतसमागम हाच होय. आज खरे संतच कुठे आहेत असे आपण म्हणतो, पण आम्हाला संत भेटावा ही तळमळच खरी लागलेली नसते. संतात संतपणा दिसत नाही याचे कारण आमच्यात तळमळ नाही. सत्ययुगात जो राम होता तोच आजही आहे, पण माझा भावच कमी झाला त्याला काय करावे ! संतांना आपण खोटेपणा देतो. पण माझा भाव शुद्ध नाही हे नाही जाणत. विषयात सुख आपल्या इच्छेप्रमाणे मिळत नाही, म्हणून आपण संताकडे जातो. पण संताला अर्पण करून घेण्याकरिता कितीजण संताकडे जातात ? देवाकरिता देवाकडे जाणारे किती बरे निघतील ?


१२०. मनाने नेहमी 'मी रामाचा आहे' ही भावना ठेवावी.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

April 28, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २८ एप्रील २०१४

२८ एप्रिल

खरी तळमळ लागली म्हणजे संत भेटतो. 

 



असंताची आवड नाहीशी होईल तेव्हाच संत हवासा वाटेल. विषय आपल्याला त्रास देतात, पण ते सोडावे कसे हे समजत नाही. जंगलात सापडलेल्या माणसाप्रमाणे आपले झाले आहे. आपली वाट चुकली आहे असे ज्याला वाटेल तोच जंगलातून बाहेर पडण्याची वाट विचारतो. 'आता वय फार झाले, काळाच्या स्वाधीन होण्याची वेळ आली, रामा तूच आता तार,' अशी तळमळ लागली, तरच संतसहवास लाभेल. सत्संगत हवी असे आपण नेहमी म्हणतो खरे, पण मागतो मात्र ' असत्‌ ' ; मग आपल्याला सत्संगत मिळेल कशी ? स्वतःला कसे विसरावे हे कळण्याकरताच संताला शरण जावे. आपले विस्मरण म्हणजे भगवंताचे स्मरण. वडील दूर आहेत, त्यांचे पत्र नाही, म्हणून काळजी करतो; पण जन्मापासून भगवंत दूर आहे, त्याची तळमळ का लागू नये ? आपण नामस्मरण करतो, पण ज्याचे नाम घेतो तो कोण, असा विचार करतो का ? विषय सोडल्याशिवाय राम कसा भेटणार ? रामही हवा आणि विषयही हवा, हे जुळणार कसे ?
मला जोपर्यंत चिमटा घेतलेला कळतो तोपर्यंत कर्म मार्गानेच जाणे जरूर आहे. कर्ममार्ग सांभाळताना, 'कर्ता मी नव्हे' ही भावना सांभाळणे जरूर आहे. जो खरा अनुभवी आहे तो बोलणारच नाही, आणि बोललाच तर तो अगदी थोडे बोलेल; तो उत्तम होय. अनुभवी खरा, पण नाइलाज म्हणून जो बोलतो तो त्याच्यापेक्षा थोडा कमी समजावा. कोणीतरी बोलल्याशिवाय लोकांना कळणार कसे, म्हणून हे लोक कमीपणा पत्करूनही पुष्कळ बोलतात. परंतु अनुभव नसताना उगीच शब्दपांडित्य करणारे हे अगदी खालच्या दर्जाचे होत. ज्याला अनुभव कमी त्याला शब्दपांडित्य फार असते. जो जगाला फसविणार नाही आणि स्वतःही फसणार नाही, असाच मनुष्य जगाला मार्गाला लावू शकेल.
कित्येक साधू दगड मारतात किंवा शिव्या देतात, तरी लोक त्यांच्या मागे लागतात, कारण त्यांच्या शिव्यादेखील आशीर्वादाप्रमाणे असतात. हे कित्येक लोकांच्या ध्यानी येत नाही. एखादा मुलगा बापाला म्हणू लागला की, 'मी इतका जवळचा, पण मला मिळतो मार; आणि तो लांबचा पोर, त्याचे मात्र लाड !' पण तो मारच आपल्या हितासाठी असतो, हे त्याला नाही समजत ! साधूच्या बोलण्यामध्ये किंवा मारण्यामध्येसुद्धा दुष्ट बुद्धी नसते. संत जे काही बोलतील ते जगाच्या कल्याणाकरताच असते. संत निःस्वार्थी असतात. ते तळमळीने सांगतात. त्यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. संताच्या सांगण्याचा खरा अर्थ आचरणानेच कळेल.


११८. परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला.
प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

April 27, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २७ एप्रील २०१४

२७ एप्रिल

नामधारकाने टाळण्याच्या गोष्टी. 

 



आपले विचार स्वार्थाचे नसावेत. स्वार्थामध्ये अभिमान नेहमी जागृत असतो. स्वार्थी मनुष्याला जगात सुख मिळणे कधीही शक्य नाही. नीतिची बंधने पाळा. परस्त्री मातेसमान माना. प्रपंचात एकपत्‍नीव्रताने राहणारे गृहस्थ लोक ब्रह्मचारीच होत. परद्रव्याची अभिलाषा धरू नका. त्याला विष्ठेसमान माना. दुसर्‍याच्या पैक्याचा अभिलाष धरण्यात आपला किती घात आहे याची नुसती कल्पनाच केलेली बरी. परस्त्री, परद्रव्य यांच्याप्रमाणेच परनिंदा हीही अत्यंत त्याज्य गोष्ट आहे. परनिंदेने नकळत आपण आपलाच घात करीत असतो. परनिंदेमध्ये दुसर्‍यांच्या दोषांचे चिंतन होत असल्या कारणाने, ते दोष आपल्याकडे येत असतात. या सर्व गोष्टी सांभाळून तुम्ही नाम घ्या, नामाचे प्रेम तुम्हाला अगदी खात्रीने येईल. हे सर्व करीत असताना तुमचे आईवडील, बायकोमुले, यांच्या बाबतीत असलेले कर्तव्य करायला चुकू नका आणि त्या कर्तव्यात आसक्ति राहू देऊ नका. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म हे कर्तव्यच होय. ते कर्तव्य सांभाळून नीतिधर्माने वागून आपला प्रपंच करा, आणि भगवंताचे स्मरण ठेवा. मग तुमचा प्रपंचच परमार्थरूप बनून भगवंताचे प्रेम तुम्हाला मिळेल हा माझा भरवसा तुम्ही बाळगा.
प्रपंच हा मिठासारखा आहे. भाकरीत मीठ किती घालायचे असते ? तर अगदी थोडे - फक्त चवीपुरते ! परंतु आपण मिठाची भाकरी करतो आणि त्यात परमार्थाचे चिमूटभर पीठ टाकतो; मग ती भाकरी खाता येईल का ? खरे समाधान मिळाल्यावर मनुष्य खेळासारखा प्रपंच करतो. त्यामध्ये तो वर चढला किंवा खाली पडला तरी सारखाच राहील; दुसर्‍याने डाव टाकल्यावर तो आपणही डाव टाकील ! पण डाव हरला किंवा जिंकला तरी त्याची त्याला पर्वा राहणार नाही.
प्रपंचात अनेक वस्तू आहेत. पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे. प्रपंचात कितीही वस्तू आणल्या तरी त्या पुर्‍या पडत नाहीत, कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसर्‍या वस्तूच्या आणण्याचे बीज आहे. पण भगवंताचे तसे नाही; भगवंताची वस्तू एकदा आणली की पुन्हा ती आणायला नको. समजा, एका दुकानात पुष्कळ माल भरलेला आहे; पण आपल्याला पाहिजे ती वस्तू तिथे नाही, म्हणजे आपल्या दृष्टीने तिथे काहीच नाही ! त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या मानसिक शक्ति असून तिथे भगवंत नसेल, तर त्या असून नसून सारख्याच समजाव्यात. परमात्म्याला प्रपंचरूप बनविण्या‍ऐवजी आपण प्रपंचाला परमात्मरूप बनवावा. यातच जन्माचे सार्थक आहे.


११८. परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला.
प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

April 26, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २६ एप्रील २०१४

२६ एप्रिल

संतांनीच भगवंताला सगुणात आणले. 

 



सर्वांत अर्पणभक्ति श्रेष्ठ आहे. पूजा करताना 'मी तुझा दास आहे' असे म्हणावे, म्हणजे प्रेम येते. यात लाज वाटायचे काहीच कारण नाही. आधी भगवंताचे दास व्हावे आणि मग पूजा करावी. आम्ही इतर कित्येकांचे दास होतो, आणि इतक्यांत उरेल तेव्हा भगवंताचे दास होणार; मग पूजेत अर्पणभक्ति कशी येणार ? आपल्याला जे जे आवडते ते ते मनाने भगवंताला अर्पण करावे. इथे सर्व काही मनानेच करायचे असते. नुसते शरीराने काबाडकष्ट केले म्हणजे प्रेम येतेच असे नाही. चित्त विषयाकडे ठेवून भगवंताची सेवा करणे म्हणजे अंगचोरपणा आला. असा अंगचोरपणा करू नये. भगवंताकडे मन लागायला सगुणोपासना उत्तम होय. सर्व लोक या ना त्या रूपाने सगुणाचीच उपासना करणारे असतात. ठरलेली वेळ आणि ठरलेले साधन असावे, म्हणजे त्यामध्ये प्रेम येते. आपण ज्याची उपासना करतो त्या मूर्तीमध्ये तेज वाढत असते. ज्या मूर्तीची उपासना एखाद्या साधूने केलेली असेल त्या मूर्तीमध्ये फार तेज असते, आणि ते पुष्कळ काळ टिकते. शिवाय ते इतरांनाही उपयोगी पडते. जगाचे खरे स्वरूप कळण्यासाठी सगुण उपासनाच कारणीभूत आहे. सर्व भोग भोगून काळजी नसणे हे उपासनेचे खरे मर्म आहे. उपासनेचे तेज कसे झळकले पाहिजे ? हे तेज फार विलक्षण असते. पैशाचे किंवा विद्वत्तेचे तेज तितके नसते. ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे तोच जगात खरे काम करतो.
एक बाई डोळे झाकून बसली म्हणजे तिला एक देवी दिसे. त्या बाईशी देवी बोलत असे, आणि प्रपंचातल्या वगैरे सर्व गोष्टी कशा कराव्यात हे सांगत असे. परंतु बाईने ध्यान करणे सोडून दिल्याने तिला देवी दिसणे बंद झाले. तसेच एक मुलगा डोळे झाकून बसला म्हणजे त्याला पांढरी दाढी असलेला एक साधू दिसे. कसे वागावे, काय करावे, वगैरे सर्व गोष्टी तो त्या मुलाला सांगत असे. परंतु मुलाने ध्यान करणे सोडून दिले, आणि तो दाढीवाला दिसेनासा झाला. या गोष्टींचा अर्थ असा की, आपल्याला सांभाळणार्‍या शक्ति आपल्या मागे असतात, त्यांची उपासना आपण सोडू नये. भगवंताला सगुणामध्ये आणला हा संतांचा आपल्यावर फार मोठा उपकार आहे. संतांनी आपल्याला सांगितले की, "ही दृश्य मूर्ति तुझी आहे, तुला हव्या असणार्‍या सर्व वस्तू देणारा भगवंत तोच आहे." ही जाणीव आणि कल्पना आपल्या ठिकाणी वाढत गेली तर त्यामुळे 'भगवंत दाता आहे' ही जाणीव उत्पन्न होईल. 'भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझ्या सुखाचा आधार आहे, तो माझे कल्याण करणारा आहे,' ही जाणीव झाली की, जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेनेच मिळाले ही भावना होऊन, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान टिकेल.


११७. आनंदरूप परमात्मा मिळविण्यासाठी सगुणोपासना पाहिजे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

April 25, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २५ एप्रील २०१४

२५ एप्रिल

संत हे आपला संबंध भगवंताशी जोडतात. 

 



आपले हृदय विषयाने इतके भरले आहे की तिथे भगवंताच्या प्रेमाला जागाच राहिली नाही. बरे, भगवंताचे प्रेम मुद्दाम तिथे घातले, तर ते आत न राहता बाहेर पडते आणि वार्‍यावर उडून जाते. सामानाने गच्च भरलेली जशी एखादी खोली असते, तसे आपले हृदय आहे. या हृदयाचा संबंध भगवंताशी जोडण्यासाठी, आपल्या हृदयातले सामान, म्हणजे विषय, खाली करून त्याच्या जागी भगवंताचे प्रेम भरणे जरूर आहे. साधारणपणे आपला अनुभव असा आहे की, एखादी वस्तू आपल्याला पुष्कळ आणि पुन्हा पुन्हा मिळाली तरी तिचा वीट येतो; म्हणून जी वस्तू आपल्याला कितीही मिळाली तरी तिचा वीट येणार नाही अशी वस्तू आपण मिळवावी. अशी अवीट असणारी वस्तू एकच आहे; ती म्हणजे भगवंत होय.
राजाने आपल्या नावाचा शिक्का केला, आणि जो अती प्रामाणिक होता त्याच्या जवळ दिला; त्याप्रमाणे भगवंताने आपले नाम संतांना दिले. त्यामुळे, संत जे करतील त्याला मान्यता देणे भगवंताला जरूरच आहे. आपण आणि संत यांच्यामध्ये मनुष्य या दृष्टीने फरक नाही; पण फरक आहे तो हा की, संत हा जसे बोलतो तसे वागतो, तर आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र त्याच्या उलट. आपल्या स्वार्थाच्या आड कोणी आले की आपण वाईट बोलतो. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच वस्तूवर दुसर्‍याने प्रेम केले तर आपण त्याला नावे ठेवतो. आपण नुसती नीतीची तत्त्वे जेव्हा सांगतो तेव्हा अगदी चांगले बोलतो; पण वागताना मात्र उलट वागतो. यासाठी आपण अशी कृती करू या की आपल्याला नंतर तसे बोलता येईल.
गाडीत बसायला मिळावे म्हणून काही कोणी गाडीत बसत नाही, तर आपल्या स्टेशनाला जाण्यासाठीच मनुष्य गाडीचा आधार घेतो. तसा, मोठमोठ्या संतांनी प्रपंच केला खरा, परंतु तो सुखासाठी केला नाही. आपल्या वृत्तीपासून न ढळता इतरांना तारण्याचे काम संतांनी केले. बुडणार्‍या माणसाला जसा दोरीचा आधार द्यावा, त्याप्रमाणे संतांनी आपल्याला परमात्म्याचा आधार दिला. चंदनाच्या झाडाजवळच्या झाडांना जसा चंदनाचा वास लागतो, त्याप्रमाणे संताजवळ राहतो तोही संतच बनतो. काही कष्ट न करता परमार्थ साधणे हेच सत्संगतीचे महत्त्व आहे.

११६. आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाकच ऐकू येत नाही.
ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर असावे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

April 24, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २४ एप्रील २०१४

२४ एप्रिल

संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणे. 

 



मी जिवंत राहावे हे जितके जरूर आहे, तितकेच परमात्म्याची ओळख करून घेणे जरूर आहे. जगात नावे ठेवीत नाहीत कोणाला ? परमार्थाला वाहून घेतले तर प्रपंच नीट करीत नाही म्हणून नावे ठेवतात; तिकडे लक्ष देऊ नये. मनाच्या विषादाला कारण एकच असावे की, मी अजून भगवंताचा झालो नाही. जो भगवंताच्या इच्छेने वागतो त्याचे चांगले होते. भगवंत ठेवील त्यात समाधान मानून राहावे. भगवंताचे रूप आनंदमय आहे, आणि सृष्टीचा क्रमच असा आहे की तो माणसाला आनंदाप्रत पोहोचवीत असतो. अत्यंत दारिद्र्यालासुद्धा आनंदाची जागा असतेच. आनंदाशिवाय मनुष्य जगणेसुद्धा शक्य नाही. मी मुळात आनंदरूप असताना मग दुःखाचे गाडे आले कुठून ? मला दुःख होते ते माझे कुठे तरी चुकते म्हणून ! मी चुकलो का बरोबर, ही शंकासुद्धा मुक्ताला येत नाही, कारण तो आणि देव एकच असतात. बद्धालाही शंका येत नाही. कारण तो देव जाणतच नाही; 'सर्व काही मी करतो, आणि देव नाहीच, ' म्हणून म्हणतो. मुमुक्षूला मात्र ही तळमळ लागते. जेव्हा ही तळमळ तीव्र असते तेव्हां संतांची भेट होते. काही पूर्वीचा ठेवा असल्याशिवाय अशी तळमळ लागणार नाही.
आपण संतांचे होऊन राहावे. त्यांचे झालो म्हणजे त्यांच्याशिवाय आपल्याला कुणी नाही असे वाटले पाहिजे. संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत वागणे. ते सांगतील तसे करावे, ते वागतील तसे नाही वागू. सत्याची संगत धरली म्हणजे सत्संगती मिळते. कशाचीही आसक्ति न धरता जगात वागणे हेच मुक्तांचे लक्षण. हवेपण नाहीसे झाले म्हणजे मग दुःखाचे कारणच राहात नाही.
जिथे तुम्ही राहता तिथे सद्‌गुरु आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते, हीच त्यांची खरी कृपा होय. श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्येने होत नाही. आपल्या गुरूंनी सांगितलेल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ समजा. गुरू म्हणजे साक्षात परमात्मा. त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या. याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे न वाटावे.
माझ्या मनाचे विकार जात नाहीत असे चांगल्या माणसांनासुद्धा वाटते. पण 'ते जात नाहीत, जात नाहीत' असे घोकून त्यांचा ध्यास घेतल्याने ते उलट वाढतील. तिकडे लक्ष देऊ नये. नाम घेणे हे आपले काम करीत राहावे, म्हणजे विकार आपोपापच कमी होत जातील. मात्र, मनाच्या मागे देहाला जाऊ न देणे, इतके जपले पाहिजे.

११५. संतांची आज्ञा प्रमाण मानणे हेच प्रचीती येण्याचे साधन आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

April 23, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २३ एप्रील २०१४

२३ एप्रिल

संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्युपत्रासारखे आहेत. 

 

   

संतांना ग्रंथ लिहिण्याची मुळीच हौस नसते, नाइलाज म्हणून ते ग्रंथ लिहीत असतात. तुम्हाला असे वाटते का, की नाथांनी आणि समर्थांनी ज्ञानेश्वरीची पारायणे करून नंतर आपले ग्रंथ लिहिले ? त्यांचे ज्ञान स्वतंत्र असते, आणि ते साक्षात्‌ भगवंतापासून आलेले असते. त्यामध्ये अर्थात्‌ मागील ग्रंथकारांनी सांगितलेल्या काही गोष्टी येणारच. संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्युपत्रासारखे आहेत. आपले मुलगे चांगले वागतील अशी ज्या बापाला खात्री वाटते तो कशाला मृत्युपत्र लिहील ? तशी ज्याला खात्री नसते तो नाइलाजाने मृत्युपत्र लिहितो ! त्याचप्रमाणे, संतांनी हौसेने किंवा विद्वत्ता दाखविण्यासाठी ग्रंथ लिहिले नाहीत, तर आपल्यासारख्या जडजीवांचे कल्याण व्हावे ही तळमळ त्यांना होती म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले. पोथी, पुराणे, सत्पुरुषांचे ग्रंथ, यांचा आपल्या जीवनाशी निकट संबंध असतो. असल्या ग्रंथांमध्ये, ज्याचा व्यवहारामध्ये उपयोग करता येतो असा वेदान्त सांगितलेला असतो. आपल्याला सुचणार नाहीत इतक्या शंका समर्थांनी घेऊन त्यांची उत्तरे दासबोधात दिली आहेत. परमार्थ न ऐकणारा दोषी आहे, पण तो ऐकत नसताना त्याला सांगणारा त्याहूनही दोषी समजावा. हा दोष पत्करूनही संत जगाला परमार्थ सांगत असतात.
ग्रंथ वाचीत असताना, ध्येय जर परमार्थप्राप्ती हे असेल तर त्यासाठी त्या ग्रंथात साधन कोणते सांगितले असेल इकडे लक्ष असावे. साधनाची योग्य निवड झाली की साध्य साधेलच. ज्या विषयात पारंगत व्हायचे तीच पुस्तके वाचणे जरूर असते. आमचे उलट होते; गणित विषय घेतो आणि वाचतो कादंबर्‍या ! मग गणितात पास कसे होणार ? परमार्थ हेच जर ध्येय असेल तर संतांच्या ग्रंथांचाच अभ्यास करावा, त्यांचेच श्रवण-मनन करावे.
आपण आपले मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावे; आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा. कधी तो सुखात राहील, तर कधी तो दुःखात राहील, कधी तो बरेच दिवस सरळ जाईल, तर कधी तो मधेच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल; पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम टिकेल यात शंका नाही. आपल्या देहाकडे आपण वेगळेपणाने पहायला शिकले पाहिजे. मन द्यावे भगवंताला आणि देह द्यावा प्रारब्धाला, म्हणजे हे साधेल. देहाचे सुखदुःख वरवरचे असावे, ते आत शिरून मनावर परिणाम करता कामा नये. भगवंताच्या नामाने हे हमखास साधते. म्हणून अखेर नामाशिवाय गत्यंतर नाही.

११४. संतांच्या ग्रंथाचा खरा अर्थ कृतीनेच कळेल.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

April 22, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २२ एप्रील २०१४

२२ एप्रिल

सत्समागम हा सर्व साधनांचा राजा ! 

 



मनुष्यजन्माला येणे, संतांची भेट होणे, आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास होणे, या तिन्ही गोष्टी फार दुर्घट आहेत. म्हणूनच संतसमागमासारखा लाभ नाही असे म्हणतात. सत्समागम म्हणजे सर्व साधनांचा राजा होय. काही मागण्याची इच्छाच संत नष्ट करतात, मग मिळवायचे कुठे राहते ? संत बनणे व्यावहारिक दृष्ट्या काही सुखाचे नसते. एखाद्या स्नानसंध्याशील आणि सदाचरणी माणसाच्या अंगावर तेज दिसते, कारण देहाला धरून झालेल्या कर्माचे ते तेज असते; पण एखाद्या सत्पुरुषाच्या देहावर बाहेर तसे तेज दिसणारही नाही. आत वावरणार्‍या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो. देहाच्या आधाराने भोगण्याची या जगामधली जी सुखे आहेत, त्यांचे मार्ग सत्पुरुषापेक्षा आपण प्रापंचिक लोक जास्त जाणतो, परंतु देहाच्या पलीकडे असणारे आणि कायमचे टिकणारे, आणि देहाला विसरून आणि देवाला स्मरून जे मिळवायचे, असे भगवंताचे सुख आहे. ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेले पाहिजे. विषय तृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे. हा संतसंगतीचा परिणाम. असा जो असेल तोच संत, नव्हे प्रत्यक्ष भगवंत होय. अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. संत आपल्याला सत्यस्वरूपाची ओळख करून देतात. सत्पुरुषाने आखून दिलेल्या मार्गाने कायावाचामनाने जे कर्म केले जाते ते पौरुषच होय.
आगगाडीत बसणारी सर्व माणसे, मग ती कोणत्याही क्लासमध्ये बसणारी असोत, इतकेच नव्हे तर बिनतिकिटाची माणसेदेखील, गाडीबरोबर सरळ म्हणजे शेवटच्या स्टेशनापर्यंत जाऊन पोहोचतात; त्याचप्रमाणे संतांची संगत करणारी सर्व माणसे भगवंतापर्यंत पोहोचतात. त्यांच्यामधली बिनतिकिटाची, म्हणजे दुष्ट, पापी, दुराचारी, त्याज्य, आणि अयोग्य, अशी माणसेसुद्धा तरून जातात; मात्र कोणीही गाडी तेवढी सोडता कामा नये. हाच सत्संगतीचा महिमा. परमार्थ साधण्यासाठी सत्संगती फार उपयोगी पडते. ही संगती तीन प्रकारची असते : एक, संताचा प्रत्यक्ष देहामध्ये सहवास; दोन, संताने सांगितलेल्या मंत्राचा सहवास; आणि तीन, संताच्या विचारांची संगत. संगतीचा परिणाम नकळत होतो, म्हणून सत्संगती धरावी. आपण ज्याकरिता जन्माला आलो ते कारण फक्त संतच उमगले; म्हणून त्यांना शरण जावे. संत स्वतः समाधान मिळवून ते दुसर्‍याला देतात, हे त्यांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत !

११३. संतांजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले, म्हणजे संताची प्रचीती आली असे समजावे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

April 21, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २१ एप्रील २०१४

२१ एप्रिल

सत्समागम म्हणजे संत सांगतील त्याप्रमाणे वागणे. 

 



कोणत्याही मंगल कार्यात सर्वाआधी गणपतीचे आवाहन करतात, आणि सगळे कार्य संपले की सर्वांचे शेवटी त्याचे विसर्जन करतात. त्याचप्रमाणे अनुसंधानानेच पोथीला सुरुवात करावी आणि अनुसंधानानेच पोथीची समाप्ती करावी. लौकिक कार्यामध्ये गणपतीचे विसर्जन झाल्यावर आपण शिल्लक उरतो, पण अनुसंधानाचे विसर्जन करताना आपणही त्यात नाहीसे व्हावे. "जसे ठेवायचे असेल तसे ठेवा, पण आपला विसर पडू देऊ नका, एवढी भीक घालावी, " अशी गुरूच्या चरणी प्रार्थना करावी.
भगवंताला विसरून भजन करू नका. भगवंताची आठवण ठेवून भाजी जरी आणली तरी त्याचे श्रेय जास्त आहे. जगाच्या लाजेला भिऊन भगवंताला अंतर देऊ नये. 'मी कोण' याचा विचार करावा, आणि तो करण्यासाठी, 'मी नाही कोणाचा' हे बघावे. मी आप्तेष्टांचा, बायको-मुलांचा, आईबापांचा तर नाहीच, पण मी देहाचा आणि मनाचाही नाही; असे करता करता जो राहील तो मी. खरे समाधान एकपणात आहे, अद्वैतात आहे. म्हणून, द्वैताचा जनक जो अभिमान तो कमी कसा होईल ते बघावे. याकरिता, मी कर्ता नसून देव कर्ता आहे असे मानावे. सर्वांभूती भगवद्‌भाव पाहावा, सत्समागम करावा. सत्समागम म्हणजे सत्याचा समागम. सत्पुरुषाच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनविणे हा खरा सत्समागम आहे. संतांवर अनन्य श्रद्धा ठेवा. त्यांच्या चालीने चाला. त्यांच्या समागमात दैन्य मानू नका, जे तुमची एकसारखी विषयातली नडच भागवतील ते संत नव्हेत. खरे संत विषयाची आसक्ति कमी करतात; अशा संताला शरण जावे. निर्विषय चित्त संतांनाच करता येते. संत हे ईश्वरदर्शनाची तळमळ उत्पन्न करतात. तळमळ उत्पन्न करून देणे हीच संतांची कामगिरी. संतांची भाषा तळमळीची असते, म्हणून ती तळमळ उत्पन्न करते. संत सांगतील त्याप्रमाणे वागावे. जग संतांशिवाय असणेच शक्य नाही. जे देहात दिसले पण वस्तुतः देहातीत राहिले ते संतच होत. आम्हाला त्यांना ओळखता येत नाही याला काय करावे ? नामाच्या योगानेच संत ओळखता येतात आणि टिकवता येतात. जो भगवंताचे नाम घेईल त्याला संत भेटेल, आणि तो त्याला भगवंताची प्राप्ती करून देईल. त्याचे कुठे अडणार नाही. पण जो नुसत्या शब्दज्ञानाच्या मागे लागेल त्याला आसक्ति सुटणार नाही, आणि त्याचे जीवन सार्थकी लागणार नाही.



११२. संताच्या पदरात पडले की तो आपली लाज राखतो.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

April 20, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २० एप्रील २०१४

२० एप्रिल

संतांचा सहवास । याहून भाग्य नाही दुसरे खास ॥ 

 



बाह्य प्रपंच प्रारब्ध उपाधि । त्यांसी त्रासू नये कधी । हीच जाणावी उघड समाधि ॥
सावली मातीत पडली । तिला धु‍ऊन नाही घेतली ।
तसेच खरे आहे देहाचे । पण ते संतांनाच साधे ॥
सर्व संकल्प वर्ज्य करून । अवस्था असावी बालकवृत्तिसमान ॥
सतत विवेक अखंड चित्ती । रामनामी मनोवृत्ति । हेचि तुम्हा परमप्राप्ति ॥
मारुनी खोटी कल्पनावृत्ति । रामनाम अखंड चित्ती । समाधान संतोष शांति ॥
देवासी सर्व करी अर्पण । करी स्वानंदयुक्त परमात्मचिंतन । हीच साधूची खूण ॥
वासना जाळून शुद्ध चित्त । अहंभाव सोडून होई निभ्रांत ।
आता मी रामाचा, राम माझा । हे जाणावे पूर्ण ॥
संतसहवास त्याला पाही । जो देहबुद्धि टाकून राही ॥
संतास न पाहावे देहात । आपण देहापरते होऊन पाहावे त्यास ॥
नामात ठेवा प्रेम । हीच संतांची खूण ॥
जे जे आपले संगती आले । संताने त्यांचे सार्थकच केले ॥
साधूने देह ठेवला । तरी सत्तेने जागृत राहिला ॥
त्याची ठेवावी आठवण । सेवा करावी रात्रंदिन ॥
संतांचा सहवास । याहून भाग्य नाही दुसरे खास ॥
संतचरणी विश्वास । त्याने भगवंत जोडला खास ॥
लक्ष ठेवावे संताकडे । देह लावावा प्रपंचाकडे ॥
नाम घ्यावे श्वासोच्छ्वास । संत संतुष्ट होईल खास ॥
सांगावे संतास नमस्कार । जो जगताचा आधार ॥
संताच्या देहाची प्रारब्धगति संपली । काया आज दिसेनाशी झाली । परि अजरामर राहिली ॥
राम कर्ता हे जाणून चित्तीं । जगांत संत ऐसे वर्तती । जेणे दुसर्‍यास मार्गदर्शक होती ॥
संतांचे करावे अनुकरण । घ्यावे त्यांचे दर्शन ।
सांगावे आलो आहे आपण । विचाराव्या कठिण वाटा । जेणे सुलभ होईल व्यवहारी चालता ॥
रामापरता नाही लाभ । हे धरले ज्याने चित्ती । त्यास लाभली खरी संतांची संगती ॥
त्यांचा आदर्श ठेवावा पुढे । कधी न होईल वाकडे ॥
स्वतःचे पावावे समाधान । त्याने लोकांस आणण्याचा प्रयत्‍न करावा जाण ॥
संताशी व्हावे अनन्य शरण । दुसरीकडे जाण्याचे नाही कारण ॥
भाग्याने संत घरी आला । अभागी न मानी त्याला ॥
सूर्याचा प्रकाश झाला । आंधळ्याला उपयोगी नाही आला ॥
तैसी विषयी झाली ज्याची वृत्ती । संताची संगत त्याला न लाभती ॥
रामनामावाचून ज्याचा वेळ जात नाही । तोच जीवन्मुक्त पाही ॥
देहाचे ठिकाणी विरक्त । विषयाचे ठिकाणी नसे अहंममत्व । त्यालाच म्हणतात मुक्त ॥



१११. रामापरते न मानावे हित । हे सर्व संतांचे मनोगत ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

April 19, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १९ एप्रील २०१४

१९ एप्रिल

भवरोगापासून मुक्ततेचा उपाय - सत्संगती व नामस्मरण. 

 



एका गावात एक वैद्य राहात होता. त्या वैद्याला कोणाला काय रोग झाला आहे हे तोंडावरून समजत असे. त्याने एक दिवस एका मनुष्याला आपल्या घरावरून जाताना पाहिले आणि त्याला आत बोलावले. वैद्याने त्या माणसाला सांगितले की, " तुला एक भारी रोग झाला आहे; पण मी सांगतो ते औषध घे आणि मी सांगेन तसे पथ्य पाळ म्हणजे तुझा रोग बरा होईल." वैद्याने सांगितलेले औषध आणि पथ्य त्या मनुष्याने पाळले नसते तर त्या वैद्याचे काही नुकसान होते का ? त्याप्रमाणेच संत लोक जे आपल्याला करायला सांगतात, त्यात त्यांना स्वतःला काही मिळवायचे असते का ? आपल्याला गुरु सांगत असतात, त्यांचे ऐकल्याने आपलाच फायदा होत असतो. ते आपल्याला भवरोग झाला आहे असे सांगतात आणि त्याकरिता संतसंग करा आणि नामात रहा म्हणून सांगत असतात. ते जे सांगतात ते स्वतः अनुभव घेऊनच सांगत असतात. औषध सोपे असले म्हणून त्यात गुण नाही असे म्हणून कसे चालेल ? तुकारामांनी आपल्या उपासनेची शपथ घेऊन सांगितले आहे की, नामस्मरणासारखे सोपे साधन नाही. तुमचा हल्लीच्या साधूंवर विश्वास नसला तरी समर्थ आणि तुकाराम यांनी सांगितले त्यावर तरी विश्वास ठेवायला काय हरकत आहे ? त्यांनी तुमच्या कल्याणाकरिताच ते साधन सांगितले आहे. ते तुम्ही न कराल तर त्यांचे काही नुकसान नाही, तुमचेच नुकसान आहे; तरी त्याचा विचार करा. आपल्याला रोग झाला आहे असे पक्के कळल्यावर आपण औषध घेण्याचे टाळणार नाही. संसारात सुख नाही असे आपल्याला दिसत असताना, ज्या योगाने सुख मिळेल त्याच्या खटपटीला लागले पाहिजे. त्याकरिता होईल तितके नामात राहण्याचा प्रयत्‍न करा, म्हणजे तुम्हाला खरे समाधान मिळेल.
एका मनुष्याने तीस वर्षे मनापासून नोकरी केली. तो म्हणाला, "भगवंताची पूजा आणि भक्ति कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो." त्याला विचारले, "ते कसे ?" तेव्हा त्याने उत्तर दिले, "नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते. तो जिथे बदली करील तिथे आपल्याला जावे लागते; मग घरात अडचण असली तरी तिथे आपले काही चालत नाही. म्हणजे आपलेपण बाजूला ठेवावे लागते. आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला. आता मी वरिष्ठाच्या ठिकाणी भगवंताला ठेवले आहे. भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे, कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही. तो अत्यंत निःस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडवून आणतो. म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे." याचप्रमाणे प्रत्येक माणसाने आपल्या प्रपंचापासून परमार्थ करायला शिकले पाहिजे. हेच आपल्या जीविताचे सार आहे.



११०. अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही; त्यातच भक्ति जन्म पावते.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

April 18, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १८ एप्रील २०१४


१८ एप्रिल

संत विषयात देव पाहतात, आपण देवात विषय पाहतो.

  


प्रत्येकजण भक्ति करीतच असतो, कारण व्यापक दृष्टीने पाहिले तर भक्ति म्हणजे आवड. परमार्थात भक्ति म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे. सर्वांना विषयाची आवड असते, तेव्हा सर्व लोक एकपरीने विषयाची भक्तिच करीत असतात. विषयाची आवड ही देहबुद्धीला धरून, देहबुद्धी वाढविणारी, आणि स्वार्थी असते. ही कमी झाल्याशिवाय परमात्म्याची आवड म्हणजे भक्ति उपजणे शक्य नाही. याकरिता भक्ति मार्गातली पहिली पायरी म्हटली म्हणजे मोबदल्यारहित, निष्काम, निःस्वार्थी परमात्मस्मरण करणे, आणि शेवटची पायरी म्हणजे आपण स्वतःला विसरणे, देहबुद्धि विगलित होणे, ही होय. देहरक्षण परमार्थप्राप्तीकरिता करावे. केवळ विषय सेवनाकरिताच जगणे असेल तर त्यापेक्षा मेलेले काय वाईट ?
जयंत्यादि उत्सव आपण करतो तो भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न व्हावे म्हणून. मुळात प्रेम नसेल तर, ज्याच्यावर प्रेम असते त्याला आपण जो उपचार करतो, तो उपचार करून प्रेम आणायचे असते. प्रेम आणि उपचार यांचा अन्योन्य संबंध असतो. या उपचाराने भगवंताशी संबंध वाढतो, आणि यामुळे भगवंतावरचे प्रेमही वाढते. आई आपल्या लहान मुलाला दागिने वगैरे घालते, त्याचे त्या लहान मुलाला काही सुख नसते, उलट थोडे दुःखच वाटते, पण त्यामुळे या आईला बरे वाटते म्हणून ती तसे करते. भगवंताला आपण दागिने वगैरे घातले तर ते स्वतःकरताच होय. वास्तविक भगवंताला काय कमी आहे ?
संत विषयात देव पाहतात, पण आम्ही मात्र देवात सुद्धा विषय पाहतो. रामाची मूर्ती काय उत्तम घडविली आहे, देऊळ किती सुंदर बांधले आहे, वगैरे आम्ही म्हणतो. आमची वृत्ती विषयाकार बनली, म्हणून आम्हाला जिकडे तिकडे विषयच दिसतो. संतांची वृत्ती राममयच असते, त्यांना सर्वत्र रामच दिसतो. तेरा कोटी जप केला म्हणजे रामदर्शन होते असे म्हणतात. त्याचा अर्थ, तेरा कोटी जप व्हायला रोज दहा-बारा तास या प्रमाणात जवळ जवळ दहा बारा वर्षे लागतात, इतका सतत ध्यास लागला म्हणजे ते रूपच तो होतो. नाम कधीच वाया जात नाही. केव्हा केव्हा एखाद्याला दर्शन होत नाही, तेव्हा त्याचे नाम दुसरीकडे खर्च झाले असे समजावे; मग ते विषयप्राप्तीकरिता असेल, किंवा त्याचे पूर्वपाप घटत असेल. विषयाकरिता नाम खर्च करू नये, नामाकरिता नाम घ्यावे.

१०९. नाम आपले सर्वस्व वाटले पाहिजे.



( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

April 17, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १७ एप्रील २०१४

१७ एप्रिल

संत 'तू भगवंताचा आहेस' ही जाणीव देतात. 

 

आपण कोणतेही कृत्य करीत असताना, ज्याकरिता ते कृत्य आरंभिले ते जसे आपल्या डोळ्यासमोर असते, त्याप्रमाणे नाम घेताना, आपण नाम कशाकरिता घेतले त्याची अखंड जाणीव असावी. ही जाणीव अखंड ठेवणे, मी भगवंताचा आहे हे जाणणे, याचे नाव अनुसंधान ठेवणे. वास्तविक आपण भगवंताचे आहोतच, पण मी विषयाचा आहे असे भ्रमाने वाटू लागले. संत 'तू विषयाचा नाहीस, भगवंताचा आहेस' असे सांगतात. हीच संतांची खरी कामगिरी, आणि याकरिता ते नाम घ्यायला सांगतात. नाम घेणे म्हणजे 'मी विषयाचा नाही, भगवंताचा आहे' असे मनाला सांगणे आणि मनात तशी जाणीव उत्पन्न करणे; आणि ही जाणीव टिकविण्याकरिता पुनः पुनः मनाला तेच सांगणे, म्हणजे तेच नाम सतत घेणे.
तुम्हाला रामदर्शन पाहिजे म्हणता, पण राम तुम्हाला ओळखता कसा येणार ? रामदर्शन व्हायला रामाचे अंतर काटता आले पाहिजे; रामाला पक्के ओळखता आले पाहिजे. याकरिता अंतःकरणाची पवित्रता पहिजे; शुद्ध भाव पाहिजे. सर्व काही साधने केली, पण भाव नसेल तर ती व्यर्थ होतात. कालांतराने त्यामुळे भाव उत्पन्न होईल हे खरे, पण भाव ठेवून साधने केली म्हणजे प्राप्ती लवकर होते. नवविधा भक्तीमध्ये सोपी आणि मुख्य भक्ती म्हणजे अर्पण करणे ही होय. आपण सर्वस्वी देवाचे होऊन राहावे म्हणजे आपण जे काही करतो ते सर्व अर्पणच होते.
ज्याने त्याने आपले हित ओळखून वागणे हे जरूर आहे. कल्याणाचा मार्ग कुणीही दाखवील, पण त्याप्रमाणे वागणे हे ज्याचे त्याच्याकडे आहे. बंधनाला खरे कारण परिस्थिती नसून आपल्याच मनाची ठेवण ही आहे. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही काळात आणि वाटेल त्या अवस्थेत घेण्यासारखे एक भगवंताचे नाम तेवढे आहे. आहे त्या परिस्थितीत पूर्ण समाधान राहणे ही देवाची पूर्ण कृपा होय.
अग्नीचा उपयोग तो करून घेणार्‍यावर आहे; तसा देवाचा उपयोग जसा करावा तसा होतो. परमेश्वराच्या ध्यानाने सिद्धी येतात आणि सिद्धी तर त्याज्य; मग परमेश्वराचे ध्यान करूच नये की काय ? तर ध्यान हे सिद्धी मिळविण्यासाठी करू नये. परमेश्वर-प्राप्तीकरिता निष्कामबुद्धीने ध्यान करावे, म्हणजे परमेश्वर सिद्धीचे अडथळे दूर करतो. साधू सिद्धींचा उपयोग कधीही करीत नाहीत; ते परमात्मस्वरूपात मिळून गेलेले असतात. सर्व गोष्टी ते परमात्म्यावर सोपवितात आणि त्याच्या इच्छेनेच केव्हा केव्हा चमत्कार झाल्याचे साधूंच्या चरित्रात दिसते.

१०८. साधूजवळ कधीही व्यावहारिक गोष्टी मागू नयेत, त्या प्रारब्धावर सोपवाव्यात.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

April 16, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १६ एप्रील २०१४

१६ एप्रिल

व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात 

 



नोकरी केली पाहिजे असेल तर ते देणारा जिथे असतो तिथे आपण जातो; त्याप्रमाणे भगवंताची भेट घ्यायची असेल तर संत जिथे राहतात तिथे आपण जावे. परमेश्वराचे स्वरूप ओळखण्यासाठी संतांकडे जाणेच जरूर आहे. संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे. संतांजवळ निर्विषय चित्त असते. रात्री सर्वजण झोपल्यावर शिपा‍ई जसे गस्त घालतात, तसे साधुसंत आमच्या गैरसावधतेत जागृत असतात. आपण झोपी गेलो असताना ते आपली वृत्ति तपासतात. एका बाईला मूल झाले. पण त्याला आकडी येऊ लागली. ते पाळण्यात उगीच निपचित पडून असायचे. ते मूल बरोबर वाढेना, चांगले हसेना, खेळेना. मुलाची ती अवस्था पाहून आईला बरे वाटत नसे. अगदी तसेच संतांना वाटते. शिष्य केला खरा, पण साधनांत जर त्याची प्रगती होत नसेल तर संताला वाईट वाटते. शिष्याची प्रगती होत असेल तर संत स्वतःच्या प्रेमापोटीच शिष्याला सजवील आणि त्याचे कौतुक करील. संतांना फारसे कधी कोणी चांगले म्हणत नाही. त्यांनी एकाचे कल्याण केले तर त्या माणसाचे दहा नातेवाईक त्यांना नावे ठेवतात. संतांना ओळखण्याकरिता जे गुण सांगितले आहेत ते त्यांची परिक्षा करण्याकरिता सांगितले नसून, त्यांचा त्या दृष्टीने उपयोगही होत नाही. त्या गुणांचे आपण आचरण करावे म्हणून ते सांगितलेले आहेत.
संतांजवळ राहणार्‍या लोकांना तीन तोटे आणि तीन फायदे असतात. त्यांपैकी तोटे असे की, एक, वेदान्त बोलायला तेवढा उत्तम येतो; दोन, संतांजवळ राहिल्याने उगीच मान मिळतो; आणि तीन, 'ते, म्हणजे संत, सर्व पाहून घेतील' या खोट्या भावनेने वाटेल हा तसे वागतो. आता फायदे पाहू. पहिला म्हणजे, तो जर खर्‍या भावनेने संतांजवळ राहील तर तेवढ्यानेच, काही साधन न करतासुद्धा, त्याचा परमार्थ साधेल; दुसरा, त्याला मान मिळेल, पण तो स्वतः मानाच्या अपेक्षेच्या पलीकडे राहील, आणि तिसरा, वेदान्त त्याला बोलायला नाही आला तरी त्याच्या आचरणात येईल. म्हणून संतांजवळ राहणार्‍याने ते सांगतील तसे वागावे, मानाची अपेक्षा करू नये आणि फारसा वेदान्त बोलू नये. तोंडापर्यंत आले तरी दाबून टाकावे. संतांची आज्ञा प्रमाण मानणे हे प्रचीती येण्याचे साधन आहे. व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात, हे ओळखून आपण त्यांची संगत करावी. तेल आणि वात असल्यावर दिवा लावायला जसा वेळ लागत नाही, त्याचप्रमाणे आपली भूमिका थोडी तयार असल्यावर सत्संगतीचा परिणाम व्हायला वेळ लागत नाही.

१०७. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

April 15, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १५ एप्रील २०१४

१५ एप्रिल

सत्संगतीच्या योगे मन पैक्यावर गुंतून राहात नाही. 

 



संतांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते; ते बोलतील ते खरे होते. वाचासिद्धी म्हणतात ती हीच. या सिद्धीचा उपयोग आपणसुद्धा करून घेऊ शकतो; परंतु भगवत्सेवा करावी आणि त्याबद्दल पगार घ्यावा, तसे हे होते. कामधेनूवर ओझे टाकावे हे बरे वाटेना म्हणून, वाटेने घोडा येत होता तो घेतला आणि कामधेनू देऊन टाकली, तशासारखे होते. जे सुख चिरकाल टिकणारे नाही ते घेऊन काय करायचे ? हाडांची काडे करून स्वर्गसुख हाती आले, पण कालांतराने ते नाश पावणार; मग ते घेऊन काय करायचे ? पैक्यासारख्या निर्जीव वस्तूत आपले मन किती गुंतून राहते ! पैसा हा भूतासारखा आहे; त्याच्याकडून काम करवून घेतले तर तो फार उपयोगी आहे. पण ते न केले तर तो उरावर बसतो ! आपण प्रापंचिक माणसे; आपण पैसा साठविला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा. पैशाचा आधार आहे असे वाटणे म्हणजे भगवंताचा आधार नाही असे वाटणे होय. आपल्याजवळचा पैसा आपण होऊन कुणाला द्यावा असे मी म्हणत नाही. पण चोराने तो चोरून नेला तर रडत बसू नये, किंवा कुणी मागायला आला तर त्याला 'नाही' म्हणू नये. त्याला काहीतरी द्यावेच. पैसा प्रपंचाला पुरेसा असावा. म्हणजे किती ? तर पेन्शन असेल त्यांना रोजच्या निर्वाहापुरता असला म्हणजे पुरेसा झाला; आणि पेन्शन नसेल त्यांना साधारण मध्यम स्थितीत दहापंधरा वर्षे पुरेल इतका असला म्हणजे पुरेसा झाला. याला अमुक एक असा हिशेब सांगता येणार नाही. आपल्या प्रपंचाला जेवढा जरूर आहे तेवढा पैसा आपल्याला मिळाला, की बस्स झाले. श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो असे थोडेच आहे ? आपल्याला अडचण नाही पडली की आपली श्रीमंतीच आहे ! पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्‍न मात्र आग्रहाने करावा, आणि नंतर होईल तसे होऊ द्यावे. आपण आतून निष्काम, निर्लोभ आणि निरिच्छ असावे. दुसर्‍याचे द्रव्य मला यावे अशी बुद्धी कधीही ठेवू नये. ज्याच्याजवळ पैसा विपुल आहे त्याला श्रीमंत अगर सावकार म्हणता येईल; ज्याच्याजवळ विद्वत्ता आहे त्याला विद्वान्‌ म्हणता येईल; ज्याच्याजवळ शेत आहे त्याला शेतकरी म्हणता येईल; परंतु यांच्यापैकी कोणाला मोठा म्हणता येईलच असे नाही. सावकार कंजूष असेल, विद्वान्‌ गर्विष्ठ असेल, किंवा शेतकरी असाच दुर्गुणी असेल. ज्याच्याजवळ सर्व गुण एकसमयावच्छेदेकरून असतील तोच खरा मोठा होय. सर्व गुण एका भगवंताच्या ठिकाणीच असू शकतील. म्हणून त्याला ज्यांनी आपलासा केला तेच खरे मोठे बनतात. अशा लोकांना संत म्हणतात. आपण संतांचे होऊन राहावे, त्यात आपले कल्याण आहे. सत्संगतीपासून सद्विचार आणि सद्‌भावना प्राप्त होतात. ज्याचे विचार चांगले तो मनुष्य खरा चांगला होय; आणि जिथे भगवंताचे अनुसंधान आहे तिथे राहणे हीच खरी सत्संगती होय.


१०६. पैशाचे नाव अर्थ, पण तो करतो मोठा अनर्थ.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

April 14, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १४ एप्रील २०१४

१४ एप्रिल

संत आपल्याला जागे करतात. 

 


प्रत्यक्ष विषयापेक्षा विषयी माणसाची संगत फार वाईट असते, हे ज्याप्रमाणे संसारात, तसेच परमार्थातही लागू आहे. संगतीचा परिणाम नेहमी मनावर होतो; म्हणून चांगल्या विचारांच्या माणसाची संगत धरावी. चांगलेवाईट हे नेहमी आपल्यावरूनच ओळखावे. स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच आपले चुकते. जगात संत असतील असे पुष्कळांना वाटतच नाही. संताला ओळखायला आपल्या अंगी थोडेतरी भगवंताचे प्रेम असायला पाहिजे. आपल्याला आपल्या ध्येयाचा विसर पडला, परंतु संतांनी आपल्याला जागे केले. चुकीची वाट चालत असताना, 'अरे, तू वाट चुकलास,' अशी जागृती संतांनी आपल्याला दिली. तेंव्हा, जिकडे पाठ होती तिकडे आपण तोंड केले आणि पुनः चालू लागलो, तर आपण योग्य स्थळी जाऊ.
संत आनंदरूप झाल्यावर स्वस्थ बसत नाहीत. ते ज्या लीला करतात त्या जगाच्या कल्याणासाठी असतात. आपण धडपड करून फुकट मरतो, त्यापेक्षा ते स्वस्थ बसून जिवंत राहतात, हे केव्हाही चांगलेच होय. संत आनंदरूप झालेले असल्यामुळे त्यांच्या वचनानुसार आपण जाऊ या. लोकांना उपदेश करण्यामध्ये संतांचा हेतू एकच असतो, आणि तो हा की, 'जे मला कळले आहे ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या.' संत आपल्या स्वार्थासाठी सांगत नसल्याने, त्यांचे म्हणणे आपल्याला खोटे कसे म्हणता येईल ? प्रपंच हा दुःखमय आहे हे कळल्यावर त्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. तो संतांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या वाचनाने कळतो. त्या ग्रंथात सांगितलेले आपण करावे. आपण ग्रंथामध्ये जे वाचतो ते जर आचरणात आणले नाही, तर त्या वाचनाचा उपयोग नाही. वाचनाचे मनन झाले पाहिजे. साधन व वाचन बरोबर चालावे.
ज्या संतांचा ग्रंथ आपण वाचतो त्यांच्या कृपेवाचून तो नीट समजणार नाही. ज्याच्यावर त्यांची कृपा आहे त्याला, अंगी विद्वत्ता नसताना देखील, त्या ग्रंथांचा बरोबर अर्थ अगदी स्वाभाविकपणे कळेल. विद्वान्‌ हा कल्पनेने सत्यस्वरूपाचे वर्णन करतो, पण संत मात्र निश्चयाने, खात्रीने, आणि अनुभवाने ते रूप काय आहे हे सांगतात. सत्पुरूषांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणें वृत्ती बनवणें हा खरा सत्समागम आहे.


१०५. संतांची आज्ञा पालन करणे म्हणजे संतसेवाच होय.


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

April 13, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १३ एप्रील २०१४

१३ एप्रिल

संतांचे ग्रंथ. 

 

संतांचे ज्ञानच असे असते की, त्यांना वेदांताचे मर्म आपोआप कळते. अमुक एक ग्रंथ कुणी लिहिला, केव्हा लिहिला, त्यामध्ये अमक्या पानावर काय आहे, या गोष्टी एक वेळ संतांना सांगता येणार नाहीत, पण त्या विषयाचे मर्म त्यांना बरोबर ठाऊक असते. आपण पोथीतले नुसते शब्द तेवढे वाचतो; त्यांचा अर्थ संतांच्या कृपेवाचून कळणे कठीण आहे. बापाचा निरोप लहान मूल आईला आपल्या बोबडया शब्दांत आणि स्वतःला कळला असेल तसा सांगत असते, तितपत पोथीतल्या शब्दांचा अर्थ आपल्याला सांगता येईल. संतांनी ग्रंथ लिहिले याचे कारण, ज्यांना बुद्धीने खात्री करून घ्यायची आहे त्यांनी ती करून घ्यावी आणि परमार्थ करावा. संतांच्या वचनाचा ओढूनताणून अर्थ करू नये, त्याचा सरळ अर्थ घ्यावा. ग्रंथ वाचीत असताना आपली मते बाजूला ठेवावीत; एक अक्षरावर दुसरे अक्षर लिहिले, तर पहिले दिसत नाही आणि समजत नाही, म्हणून शुद्ध मनाने ग्रंथ वाचावा. आपल्या वडिलांचे पत्र जर आपल्याला आले तर आपण त्यातले अक्षर अन्‌ अक्षर वाचतो. तसे, ज्ञानेश्वरी, दासबोध, हे ग्रंथ अगदी मनापासून वाचावेत. पुष्कळ लोक जे पोथी ऐकायला जातात ते लोकांनी बरे म्हणावे यासाठी, किंवा करमत नाही यासाठी, किंवा इतर उद्योग नाही म्हणून जातात. असे करणे योग्य नाही. खरे म्हणजे, संतांचे ग्रंथ वाचून स्वतःला काय करायला पाहिजे ते शोधून काढून तेवढे करणारे लोक थोडेच असतात. ते ग्रंथ वाचून त्यांचा अर्थ नीट समजणारे लोक त्यापेक्षा जास्त असतात; 'मोठया संताचा ग्रंथ आहे' म्हणून नुसता वाचणारे लोक त्याहून जास्त असतात; आणि त्याहीपेक्षा, ते ग्रंथ मुळीच न वाचणारे लोक फारच जास्त असतात !
जगाच्या प्रवाहाच्या उलट जायला संतांजवळ शिकायचे असते. संतांना व्यवहारापुरतीच देहाची स्मृती असते. ते देहाला सावलीप्रमाणे मानतात. सावलीला दुःख झालं म्हणणे केव्हाही अयोग्यच. म्हणूनच संतांच्या मनावर सुखदुःखाचा परिणाम होत नाही. संतांकडे लोक कितीतरी कष्ट करतात आणि ते लोक यांच्या नात्यागोत्याचेही नसतात. संत त्यांना काही देत नसताना ते इतके कष्ट करतात, याचे कारण संतांचा त्यांच्याविषयी असणारा खरा आपलेपणा होय. संत एकांतात जातात याचे कारण असे की, लोकांतात त्यांना भेटणारे निराळे असतात आणि एकांतात भेटणारे निराळे असतात. लोकांतात संतांची शांती बिघडते असे मुळीच नाही; पण एकांतात भेटणार्‍यांना लोकांतात भेटता येत नाही, म्हणून ते एकांतात जातात.



१०४. कोणत्याही संताचा ग्रंथ वाचताना, तो कृतीत आणण्याकरिता आहे, ही भावना ठेवून वाचावा.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

April 12, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १२ एप्रील २०१४

१२ एप्रिल

सदवस्तू साध्य करून घेण्याचा उपाय सत्संगती. 

 



एखाद्या दारूबाजाप्रमाणे विषयी मनुष्य वागत असतो. त्याला सर्व कळते, पण वळत नाही. एकीकडे स्वतःला तो परमात्म्याचा अंश म्हणवितो, आणि दुसरीकडे विषयांच्या आहारी जातो. खरोखर, भक्तीशिवाय सर्व काही वाया आहे. संताजवळ राहावे आणि भक्तीचे साधन करावे. आपल्याला काही करायचे उरले आहे असे जे वाटते, ते न वाटू लागले, म्हणजे साधनात प्रगती झाली असे समजावे. भगवंताची भक्ती घडायला गुरूसेवा हे एक मुख्य साधन आहे. जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणे गुरूला भागच पडते. वास्तविक, गुरू मनात काही इच्छाच येऊ देत नाही; म्हणून कामधेनूपेक्षाही गुरू श्रेष्ठ आहे.
अत्यंत तळमळीशिवाय भगवंताचा योग शक्य नाही. संतसमागम प्रारब्धाने होतो, पण 'सम' रीतीने जाता आले तर खरा 'समागम' घडतो. पण आमचा मार्ग विषय आहे; म्हणून संत भेटूनही त्याचा 'समागम' आपल्याला होत नाही. विषयांमध्ये धुंद असलेल्या आम्हांला पाहून संतांच्या मनात कालवाकालव होते; त्याची आपल्याला कल्पनाही येणार नाही. आपली बुद्धी आपल्याला समाधानप्रत नेत नाही, तर दुसर्‍याची मदत घेणे आवश्यक आहे. अशा वेळी, ज्यांची मदत आपण घेतो त्यांचे आपण ऐकायला नको का ? भगवंताच्या जिज्ञासेचा मार्ग आक्रमायला संतांनी सांगितले. संतांना जिज्ञासा मूळचीच असते. आपल्याला ती नाही, म्हणून ती उत्पन्न करणे भाग आहे. काही केल्याशिवायच सद्‌वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय, म्हणजे सत्संगती हा होय. सत्संगती अती अपूर्व काम करणारी आहे. ज्याचे भाग्य थोर असेल त्यालाच ती लाभेल. एखादा मनुष्य भोवर्‌यात सापडला तर त्याला बाहेर काढण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग असा की, दुसर्‌या चांगल्या पोहणार्‌याने त्या भोवर्‌यामध्ये उडी मारून तो फोडायचा आणि बुडत्याला बाहेर ओढून काढायचे. पण यासाठी शक्ती फार लागते. दुसरा मार्ग असा की, आपणच भोवर्‌यामध्ये बुडी मारून तळाशी जायचे आणि खालून बाहेर निघायचे. विद्वत्ता ही भोवर्‌यासारखी आहे. वर वर पाणी फिरत असते तरी तळाशी ते संथ असते. तसे, जे लोक वरवर विद्या शिकतात ते वादाच्या आणि मतांतराच्या चक्रात सापडतात; पण जे लोक खोल तळाशी जातात त्यांना खरे काय ते आपोआप कळते, आणि ते सगळीकडे एकच असते. विद्येच्या भोवर्‌यामध्ये सापडणार्‌यांना बाहेर ओढून काढण्याचे काम फार मोठया संतांचे असते. शहाण्याने त्या भानगडीत न पडावे. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हे खरे संतांचे काम होय.



१०३. कोणत्याही सत्पुरूषाची परंपरा रक्षण केली पाहिजे. त्यात आपले घुसडू नये.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

April 11, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन ११ एप्रील २०१४

११ एप्रिल

साधनांनी जे साधत नाही ते संतसहवासाने साधते. 


अवतारी संत आणि इतर संत यांच्यामध्ये फरक असतो. अवतारी संत हे ज्ञानेश्वर महाराजांसारखे किंवा समर्थांसारखे असतात. ते आपण होऊन येतात, आणि आपले काम झाले की जातात; मग ते राहात नाहीत. संतांनी जगातील राज्ये मिळविली नाहीत. पण त्यांनी स्वतःवर राज्य केले. चमत्कार करणे हे संतलक्षण नव्हे. चमत्कार सहजगत्या होतील तर होवोत, चमत्कार दाखवावा म्हणून संत चमत्कार करीत नाहीत. संतांची निंदा किंवा अपमान करू नये. त्यांची परीक्षाही पाहू नये. कोणाचेही वाईट चिंतू नये. दुसर्‍याचे हित करावे, हितच चिंतावे. उत्तम हित नामावाचून अन्य कशातही नाही. म्हणून अखंड भगवन्नाम जपणे ही संतसंगतच आहे. सद्विचार ही एक सत्संगतच आहे. ध्यान, स्मरण, मनन आणि सद्‌ग्रंथवाचन यांमुळे संतांची गाठ पडून त्यांच्याशी समागम होणे शक्य होईल.
संतसमागमात राहून विषय मागणे हे समागमाचे रहस्य नाही. एकुलत्या एका मुलाने अफूच्या गोळीसाठी हट्ट धरला, तर आई त्याला ती गोळी देईल का ? जर तिने ती दिली, तर ती खरी आईच नव्हे. त्याप्रमाणे, जो विषयाचे प्रेम देईल तो खरा संत नव्हे. संताला विषयाचे प्रेम असत नाही. इतकेच नव्हे, तर त्याचा माणूस विषयात राहिला तर त्याच्या हृदयाला पीळ पडतो. कुत्रा हाड चघळीत असताना आपल्याच तोंडातले रक्त पिऊन, ते त्या हाडातून येते आहे असे समजतो आणि शेवटी त्यातच मरतो. हे पाहून जितके वाईट वाटेल त्याच्या दसपट, नव्हे अनेकपट, आपण विषयमग्न असलेले पाहून संतांना वाईट वाटते.
संतांनी खरे भगवंताला जाणले. जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते. साधनांनी जे साधत नाही ते संताच्या सहवासात राहिल्याने साधते. मनुष्य जितका निःस्वार्थी तितकी त्याची भाषा व्यापक असते. तुमच्याआमच्या घरातले लोकसुद्धा आपले ऐकत नाहीत, पण संतांची वाणी सर्व जगावर परिणाम करते, कारण ती सर्वव्यापक असते. ती अत्यंत तळमळीची असते. याच अर्थाने श्रुती सनातन आहे. जगाचे कल्याण व्हावे म्हणून ऋषी बोलले, म्हणून त्या वाणीने जगाचे कल्याण व्हायचेच, आणि जगाचे कल्याण व्हावे असे वाटते तोपर्यंत ती वाणी राहायचीच. आहे त्यात समाधान मानणे, कोणाचाही द्वेष मत्सर न करणे, सर्व भगवद्‌रूप मानणे, निरभिमान राहणे, सदोदित भगवन्नामस्मरण करणे, आणि संत, सज्जन, सद्‌गुरू यांच्याविषयी पूज्यभाव ठेवणे, या गोष्टी आचरणात आणणे, हाच परमार्थ. यांत कोणती गोष्ट अवघड किंवा खर्चाची आहे ? आम्ही निश्चयाने ती करीतच नाही म्हणून समाधान येत नाही. या गोष्टींप्रमाणे आचरण ठेवले तर समाधान येईलच.

१०२. प्रपंचात कसे वागावे हे संत शिकवितात आणि वागून दाखवितात.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

April 10, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १० एप्रील २०१४

१० एप्रिल

सर्वस्वी राहावे रामास अर्पण ।


आता ऐका माझे वचन । मनाने व्हावे रामार्पण ॥
माझे नातेगोते एक राम । हा भाव ठेवून जावे रामास शरण ॥
अनन्य व्हावे भगवंती । जो कृपेची साक्षात्‌ मूर्ति ॥
रामा आता करणे नाही उरले जाण । तुला आलो मी अनन्य शरण ॥
सुखदुःखाचा दाता । सत्य नाही दुजा आता ॥
जाणिवेने जैसे घ्यावे । तैसे मनाने सुखदुःख भोगावे ॥
मी माझेपणाची जोपर्यंत धडपड जाण । तोपर्यंत नाही समाधान ॥
सर्वस्वी राहावे रामास अर्पण । हाच उपाय सांगती साधुजन ॥
रामाला अर्पण व्हावे कोण्या रीती । त्याचा मार्ग सज्जन सांगती ॥
प्रयत्‍नेविण राहो नये । फळाची आशा ठेवू नये ॥
भगवंताला विसरू नये । कर्तव्य या दृष्टीने कर्म करावे ॥
प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान । तेथे व्हावा प्रयत्‍नाचा उगम ॥
अखंड राखावे अनुसंधान । येणे कर्म होईल सहज रामार्पण ॥
वृत्ति राखावी अत्यंत शांत । हेच संताचे मुख्य लक्षण जाण ॥
जे जे घडेल काही । ते ते राम‍इच्छेने पाही ॥
असा करावा संसार । परि असावे खबरदार ॥
त्राता राम जाणुनी चित्ती । निर्भय करावी आपली वृत्ति ॥
थोर भाग्य उदया आले । रामराय घरी आले ॥
आता रामाचे व्हावे आपण । व्यवहार प्रपंच करावा जतन ॥
न दुज्याचा दोष पाहावा । त्याचा आपणापाशीच ठेवा ॥
देह आहे परतंत्र । मन राखावे भगवंताशी स्वतंत्र ॥
मनाने जो बांधला । परतंत्र वाटेल त्याला ॥
शरण गेला रामचरणी । त्याला नाही दुजी हानि ॥
अखंड करावे नामस्मरण । नीतिधर्माचे असावे आचरण ॥
बायकामुले, लहान थोर । यांनी न सोडावा रघुवीर ॥
काळ फार कठीण आला । बुध्दिभेद त्वरित झाला ॥
आता सांभाळावे सर्वांनी आपण । रामाविण न जाऊ द्यावा क्षण ॥
चालले तसेच चालावे । राम ठेवील तसे असावे ॥
माझा राम जोडला हे जाणले ज्याने । त्याला न उरले करणे ॥
राम ठेवील ज्या स्थितीत । त्यात समाधान मानावे ॥
रामास जे करणे असेल । ते तो करील ॥
सदा सर्वकाळ माझ्याशी वास । हाच धरावा हव्यास ॥
त्याला न जावे लागे कोठे । घरबसल्या राम भेटे ॥
जो करील रामपदांबुजचिंतन । तयास नाही यमाचे बंधन ॥
संताची सेवा केली । महद्‌भाग्य घरी आले ॥
एका परमात्म्याशिवाय नाही कोणास शरण । तोच खरा धन्य धन्य ॥
संताचे मर्जीने वागल्यास । कल्याण होईल खास ॥

१०१. अखंड राखावे अनुसंधान । येणे कर्म होईल सहज रामार्पण ॥

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

April 9, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ९ एप्रील २०१४

 ९ एप्रिल

संत हे भगवंताची आठवण देण्याचे कार्य करीत असतात.



ज्याला सत्याचे ज्ञान झाले तो सर्वज्ञच बनला; आणि जे या सत्याला धरून राहतात ते संत होत. संत आपल्याला मार्ग दाखवायला तयार असतात, परंतु आपला अभिमान आड येतो, आणि आपण संतांना नावे ठेवतो. एकजण संतांना उद्देशून म्हणाला, "तुम्ही आमचे नुकसान करता; अपकार करणार्‍यावरही उपकार करायला सांगून आम्हांला मेषपात्र करता." वास्तविक, आपल्या संतांनी कर्मांचा ढीग पाडला आहे, पण त्यांच्या आणि आपल्या कर्मांमध्ये फरक आहे. 'राम कर्ता' या भावनेने त्यांनी कर्म केले; आपण 'मी' पणाने करतो, म्हणून कर्म आपल्याला बंधनकारक बनते. संतांची कामगिरी कुणाला दिसत नाही; आणि आमची फक्त दिसण्यापुरतीच असते, त्यामुळे ती पुरी पडत नाही ! एखादा पुष्कळ ज्ञानी झाला, पण ते ज्ञान जर वृत्तीत उतरले नाही तर त्याचा काय उपयोग ? जगाचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी जो सुखदुःखाच्या जाळयात सापडला नाही त्याच्याकडे जावे. तो साक्षित्वाने राहून जगापासून अलिप्तच राहतो. कर्म करूनही तो अलिप्त राहतो. आपण मात्र सुखदुःखात गुरफटून जातो. संताचे अंतःकरण शुद्ध असल्यामुळे त्याची शिव्यांची भाषासुद्धा न बोचणारी, किंबहुना आशीर्वाद रूपच ठरते. सत्पुरूष काही विद्वान्‌ नसतात. अती विद्वान्‌ मनुष्य कोणी सत्पुरूष झालेला ऐकिवात नाही. कुणी आठव्या वर्षीच घरातून निघून जातो, तर कुणी लग्नातून पळून जातो, तर कुणाला लिहायला वाचायलाही येत नाही, असे लोक सत्पुरूष झालेले आढळतात. संतांनी देह सोडल्यावर सुद्धा लोकांना त्यांचे अस्तित्व भासते.
लहान मूल बाहेर खेळत असते, परंतु मध्येच त्याला आईची आठवण होऊन तिच्याकडे धावते. याचा अर्थ असा की, मुलाला आईचे सूक्ष्म स्मरण सतत असते. तसा भगवंताचा चटका, तशी त्याच्या अस्तित्वाची जाणीव, तशी त्याची निष्ठा, आपल्याजवळ पाहिजे. भगवंताची अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो. त्या स्थितीत त्याला कुणी संत भेटला की तो निवांत होतो. संत हे खरोखर आईसारखे आहेत. ते आपल्याला भगवंताची आठवण देण्याचे कार्य करीत असतात. सर्व जगावर संतांचे उपकार आहेत. त्यांनी परमात्म्याला सगुणात आणले आणि तो आपल्याला सुसेव्य केला; परमात्म्याला आपलासा करून घ्यायला नामस्मरण हे सोपे साधन दिले; एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, असे सोपे सद्‌ग्रंथ निर्माण केले; आणि यथाशक्ती अन्नदान करणे हेच कलियुगात उत्तम साधन आहे असे सांगितले. या चार गोष्टी आचरणात आणायचा प्रयत्‍न ज्याने केला, त्याला काही कमी पडणार नाही; नेहमी समाधानच राहील.


१००. जग संतांशिवाय असणे शक्य नाही; आम्हांला त्यांना ओळखता येत नाही.


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

April 8, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ८ एप्रील २०१४

 ८ एप्रिल

शंका न ठेवता नाम घ्यावे.



नामस्मरण करायला सांगितले की सबबी सांगतात. पण खरोखर, नामस्मरण करण्याच्या आड काहीच येत नाही. काम करीत असताना सुद्धा उगाचच इतर विचार मनात येतातच ना ? मग तसेच नामस्मरण करायला कोणती अडचण आहे ? उगाच दुसरे विचार करण्यापेक्षा भगवंताचे नाम घ्यावे हे बरे नाही का ? वेळ सापडताच तो व्यर्थ न घालविता नामस्मरण करावे; श्रद्धा ठेवून करावे. दोन प्रवासी पायी जात होते. त्यांना भूक लागली. जाताना एक आंबराई लागली. त्यांनी मालकाला विचारले, 'आंबे घेऊ का ?' मालक म्हणाला, 'पंधरा मिनिटांत जितके आंबे खाता येतील तितके खा.' दोघांपैकी एक होता, तो मालकाजवळ चौकशी करू लागला; या शेताला पटटी किती, मालक कोण, वगैरे पुष्कळ विचारपूस करू लागला. दुसरा मात्र भराभर आंबे खाऊ लागला. इतक्यात पंधरा मिनिटे झाली. मालकाने सांगितले, 'वेळ संपली, आता तुम्ही जा.' एकाचे पोट भरले, दुसरा मात्र उपाशी राहिला. या गोष्टीवरून हे ध्यानात घ्यायचे की, नुसते प्रश्न विचारण्यापेक्षा, श्रद्धा ठेवून नाम घेऊ लागावे. नामाचा अर्थ आपल्याला जरी कळला नाही, तरी तो भगवंताला कळतो. म्हणून नामाचे महत्त्व कळो वा न कळो, नाम घेत राहावे. ध्रुवाने काय केले ? नारदवचनावर विश्वास ठेवून नामस्मरण प्रेमाने करू लागला. तो इतर विचारांच्या, शंका कुशंकांच्या नादी लागलाच नाही. 'एक तत्त्व नाम' हेच त्याने धरले, म्हणून त्याला नारायण प्रसन्न झाला. संत निःस्वार्थी असतात. ते तळमळीने सांगतात. त्यावर आपण श्रद्धा ठेवावी आणि नाम घ्यायला सुरूवात करावी आणि अखंड नामातच राहावे.
नाम किती दिवस घेत राहावे ? नाम सोडावेसे वाटत नाही तोपर्यंत ते घ्यावे. नामात रंगून जाईपर्यंत नाम घ्यावे. नामस्मरणात रंगला की नाम सुटणारच नाही. भगवंताचे नाम हेच श्रेष्ठ आहे. त्या नामात रंगेल तोच खरा. चरित्र विसरले तरी चालेल पण नाम विसरू नये, कारण नामात सर्व चरित्र साठविलेले आहे. ज्ञान, उपासना, कर्म वगैरे मार्ग आहेत, पण सर्वांत नामस्मरण हे सोपे साधन आहे. एक मोठा किल्ला होता. तो अभेद्य होता. मुंगीलाही आत प्रवेश होणे अशक्य असा तट होता. पण त्याला एक मोठा दरवाजा होता. त्याला एक मोठे कुलूप होते. एकाला त्याची किल्ली मिळाली; मग प्रवेश सुलभ झाला. तसे नाम ही किल्ली आहे. परमार्थ कितीही कठीण असला तरी नामाने तो सुसाध्य असतो. नामावर प्रेम आणि श्रद्धा बसत नाही अशी तक्रार करतात. संतवचनावर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावे, त्यानेच समाधान होईल.


९९. आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा.
स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्याच, पण त्या वाचून अडून बसू नये.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

April 7, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ७ एप्रील २०१४

 
७ एप्रिल
आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही.


पुष्कळ वाचले, ऐकले, पण कृतीत जर उतरले नाही तर त्याचा काय उपयोग ? कृतीशिवाय समाधान नाही. श्रवण कोणी केले ? तर ज्यांनी त्याप्रमाणे कृती केली त्यांनी. संतांच्या सांगण्याचा आपण विचारच केला नाही, त्याचे मननच जर केले नाही, तर पुष्कळ सांगितले तरी त्याचा काय उपयोग ? देह हा अनित्य आहे, असे सर्व संतांनी एकमुखाने सांगितले आहे. तरीसुद्धा आम्हांला देहाचे प्रेम सुटत नाही, याला काय करावे ? संतांवर विश्वास नसेल तर स्वतःचा अनुभव पाहावा. देहापासून सर्व सुख आहे असे आपण विचाराने ठरविले, पण खरोखर अनुभव काय येतो हे पाहावे. आपण पाहतो ना, की लहानापासून मोठयापर्यंत आणि रावापासून रंकापर्यंत, मनुष्याची सारखी धडपड चालू असते, आणि ती म्हणजे समाधानासाठी. लहानाचे मोठे झालो, विद्या झाली, नोकरी मिळाली, पैसा-अडका मिळतो आहे, बायको केली, मुलेबाळे झाली; ज्या ज्या गोष्टीत समाधान मिळेल असे वाटले, त्या त्या करिता प्रयत्‍न केला. परंतु मग तरी समाधानाचा लाभ झाला का ? देहाच्या प्रेमाशिवाय प्रापंचिक गोष्टी चालणार नाहीत हे खरे; पण म्हणून देहाच्या सुखाकरिताच जन्मभर आटापिटा करायचा हे योग्य नव्हे. आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही. या देहाचे कौतुक करीत असताना दुसर्‍याची घरभरणी चालली आहे. त्याचा फायदा आपल्याला काहीच होत नाही. देह गेला की सगळे गेले !
कृतीशिवाय जे बोलतात त्यांचा नाश होतो. बोलावे असे वाटते तोपर्यंत बोलणे थांबविणे जरूर आहे. स्वतंत्रता आणि स्वैरवर्तन बाहेरून सारखीच दिसतात; पण त्यांच्यामध्ये फार फरक आहे. स्वतंत्रता ही पवित्र आहे, तर स्वैरवर्तन हे घाणेरडे आहे. लोकांच्या स्वतंत्रतेविषयीच्या कल्पना काहीतरीच असतात. खरे म्हणजे, माणसाला स्वतंत्रता फक्त स्वतःची उन्नती, म्हणजे आत्मोन्नती करण्यापुरतेच आहे. इतर बाबतीत, म्हणजे देहाच्या वगैरे बाबतीत, त्याला बंधनेच असतात, आणि ती आवश्यकच आहेत. देहासंबंधीचे बाप, मुलगा, नवरा, बायको, वगैरे म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य राहणारच, पण मनुष्यत्वाचे कर्तव्य असेल तर भगवंताचे होणे हे आहे. ऑफिसला जाणार्‍यांनी आपले कर्तव्य नीट बजावावे; घरातल्या मंडळींनी आपले काम मन लावून करावे; आणि हे सर्व करून राहिलेला वेळ भगवंताच्या नामात घालवावा. आपण एखादा व्यापार केला तर त्यामध्ये निव्वळ उत्पन्न हाच आपला खरा नफा असतो, त्याचप्रमाणे प्रपंचातला नफा म्हणजे भगवंताकडे आपले लक्ष किती लागले हा होय.


९८. जेथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे, तेथेच समाधानाची प्राप्ती होते.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

April 6, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ६ एप्रील २०१४

 ६ एप्रिल

संत हे चालते-बोलते देवच आहेत.



व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही, त्याला नाही परमार्थ करता येणार. व्यवहारात झालेल्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देणार नाही असा निश्चय करावा, आणि सद्‌गुरू आज्ञा प्रमाण मानून तो तडीस न्यावा. साधनावर जोर द्यावा. स्वतः कोण याची ओळख करून घ्यावी. भगवंतापरते कोणी नाही हे कळले म्हणजे मी कोण हे कळते. निर्गुण जरी समजले तरी सगुण नाही सोडू. माझ्या मुखी राम आला यापरते दुसरे भाग्य ते कोणते ? हृदयात स्फूर्ती येऊनच आपण बोलतो; मग आमच्या मुखात राम आला तर तो हृदयात नाही असे कसे म्हणावे ?
तुम्ही मला उपनिषदांतले सांगा म्हटले तर कसे सांगू ? ज्याने जे केले तेच तो सांगणार. एक गुरू आज्ञापालन याशिवाय दुसरे काहीच मी केले नाही, तर मी दुसरे काय सांगणार ? संताचा समागम केला म्हणजे आपण मार्गाला लागतो. आपण साधूला व्यवहारात आणतो, आणि नंतर तो आपल्याशी व्यवहाराने वागला म्हणजे त्याच्याजवळ समता नाही म्हणून उलट ओरड करतो ! संत हे देहाचे रोग बरे करीत नसून, त्या रोगांची भिती नाहीशी करतात. संत हे चालते-बोलते देवच आहेत. संतांच्या देहाच्या हालचालींना महत्त्व नाही. भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वांत मोठा उपकार होय. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच खरे संतांचे कार्य होय. संतांचा कोणताही मार्ग हा वेदांच्या आणि शास्त्रांच्या उलट असणे शक्यच नाही. संत सूर्यासारखे जगावर स्वाभाविक उपकार करतात. सूर्याचे तेज कमी होते आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात, पण संतांचे तेज मात्र वाढतेच आहे.
श्रीमंत आईबापांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा भीक मागताना पाहून आपल्याला त्याची कींव येते, त्याप्रमाणे मनुष्यजन्माला येऊन आपण दुःख करतो हे पाहून संतांना वाईट वाटते. एकूण योनी इतक्या आहेत की, त्यांमध्ये मनुष्यजन्म येणे कठीण आहे. मनुष्यजन्म येऊन भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान आहे. म्हणून अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा, त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावी. संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावे; पडण्याची, अडखळण्याची भितीच नाही. आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाक ऐकूच येत नाही. ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर असावे. संतवचनावर विश्वास ठेवू या, म्हणजे भगवत्प्रेम लागेलच. ते लागल्यावर विषयप्रेम कमी होईल. म्हणून संतांची संगत करणे एवढे जरी केले तरी कल्याणच होईल.

९७. संत-संगती आणि नामस्मरण यानेच भगवत्प्रेम येईल.


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

April 5, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ५ एप्रील २०१४

 ५ एप्रिल

संतांच्या संगतीचा परिणाम.



जडीबुटीवाल्याजवळ एक गोळी असते. ज्याच्या अंगात विष भिनले आहे अशा माणसाच्या जखमेवर ती गोळी नुसती ठेवतात. ती सर्व विष शोषून घेते. नंतर तिला धुतली की ती पूर्ववत्‌ होते. त्याचप्रमाणे सत्पुरूषाच्या संगतीत आपले पाप शोषून घेतले जाते, आणि पुनः तो सत्पुरूष स्वतः शुद्धच राहतो. सत्संगती मिळेल, पण ती टिकणे फार कठीण काम आहे. साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते तसलीच संगत आपण बघतो. मीच वाईट म्हणून मी वाईट लोकांची संगत धरतो. विषयात दोष नाही; म्हणजेच, नुसते विषय बाधक होत नाहीत, विषयी लोकांची संगत मात्र फार बाधक असते. संगतीने आपल्यावर बरावाईट परिणाम होतो. विषय मागूनही जो ते देत नाही, त्यांपासून परावृत्त करतो, तो संत. विषयतृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे, हा संतसंगतीचा परिणाम. ज्याची संगत केली असताना भगवत्प्रेम प्रकट होते तो संत जाणावा. अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. विषयाची गोडी फार; पण तो सुटावा असे वाटू लागले म्हणजे भजनपूजन करणार्‍यांची संगत धरावी. वाईट विचार मनात आले की नामाची जोड ठेवावी. आपला सर्वाठायी भगवद्‌भाव वाढू लागला म्हणजे संतांची प्रचीती येते. भगवंताच्या लीला पाहणार्‍यांनाच खरा आनंद मिळतो. म्हणून संत नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात. ते जे गातील तो संगीतातला रागच समजावा. तुकारामबुवा नुसते 'विठठ्‌ल विठठ्‌ल' म्हणत, पण त्याची गोडी आपल्या गाण्यामध्ये देखील नाही. खरोखर संताना आपल्याविषयी इतकी कळकळ असते, आपल्याला ती कळतही नाही. संत आपल्या हिताचे सांगतात, पण आपले मन विषयात वावरत असल्याने त्यांचे बोलणे आपल्या मनात पूर्णपणे ठसत नाही. औषध कडू असले तरी रोग झाल्यावर आपण ते घेतोच ना ? मग प्रपंचातल्या व्याधींनी त्रस्त होऊनही आपण संतांच्या हितकारक बोलण्याकडे का दुर्लक्ष करावे ? ज्याला भगवंताचे अधिष्ठान आहे त्याचे कडक बोलणेसुद्धा कुणाला लागणार नाही. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे, कारण 'सर्व ठिकाणी मीच आहे' ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही. आईपण जसे सगळीकडे सारखे, त्याचप्रमाणे सर्व संत एकच भाषा बोलतात. संतांनी मिळविलेले पद मिळविण्याचे साधन आपणही करतो; पण त्यांचे करणे निःसंशय असते, तर उलट आपण नेहमी शंकाच व्यक्त करीत असतो. डोळयांत खुपणारा खडा काढण्यासाठी त्यात लोणी घालतात; त्याने न खुपता खडा बाहेर पडतो आणि डोळा थंड होतो. त्याचप्रमाणे संतांची वाणी गोड, मऊ, हितकारक असते; तसे आपण बोलावे.

९६. आपली भूमिका थोडी तयार असल्यास सत्संगतीचा परिणाम होण्यास वेळ लागत नाही.


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

April 4, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ४ एप्रील २०१४

 ४ एप्रिल

संत कसे असतात ?



आपले शहाणपण बाजूला ठेवून जो संताला शरण जातो तोच खरा साधक. ज्याला सर्व सृष्टी रामरूप दिसते, आणि शिष्यालाही जो रामरूप पाहतो, तोच खरा गुरू. सदगुरू कधीही मिंधेपणाने वागत नाही, आणि त्याला भीतीचा लवलेशही नसतो. आपला शिष्य कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आहे हे संतांना कळते. देहबुद्धीचे लोक विषयाचे दास असतात, पण संत मात्र विषयावर मालकी गाजवतात. संतांजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले, किंवा त्याची आवड उत्पन्न झाली म्हणजे संताची प्रचीती आली असे समजावे. औषध काय आहे हे न कळतासुद्धा रोग्याने ते श्रद्धेने घेतले तर त्याला गुण येतो, किंवा एखाद्याला स्वयंपाक करता आला नाही तरी त्याला अन्नाची चव समजते आणि तो पोटभर जेवू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्याला ज्ञानाचा अनुभव येईल, पण शब्दाने त्याला तो सांगता येईलच असे नाही.
मीठ खारट आहे याचे जसे आपल्याला दुःख होत नाही, त्याचप्रमाणे जगामधल्या लढाया, हाणामार्‍या, सज्जनांचा छळ, संकटे, यांचे संतांना वाईट वाटत नाही. 'वाईट वाटत नाही' याचा अर्थ ते त्यांना आवडते असा मात्र मुळीच नव्हे. पण मीठ जसे खारटच असणार, तशा जगात या घडामोडी होणारच, जगाची रहाटीच अशी आहे, हे समजून तो दुःख करणार नाही. किंबहुना, मीठ फार झाले तर खारटपणा जसा सहन होत नाही, तसे त्यालाही होईल. इतकेच नव्हे, तर त्याचा प्रयत्‍नही जगातले वाईट कमी करण्याकडेच असतो.
विहिरीतल्या बेडकांना जशी समुद्राची कल्पना येत नाही तशी आपल्याला संतांची कल्पना येत नाही. संत हे पहिल्याने आपल्यासारखेच होते, परंतु अनुसंधानाच्या मार्गाने ते वर गेले. आपल्याला संत 'शोधण्याची' मुळीच जरूरी नाही. आपली इच्छा बलवत्तर असेल तर संतच आपला शोध करीत आपल्याकडे चालत येतील. आपली भावना कशी आहे इकडे संतांचे लक्ष असते. संत हा गुप्त पोलिसासारखा आहे; तो आपल्यामध्ये आपल्यासारखा राहतो, पण आपल्याला ओळखता येत नाही. संताला स्वतःच्या शरीरात काय चालले आहे ते सर्व दिसते; म्हणून तो रोगाची काळजी करीत नाही. संताला कर्म मागेपुढे करता येते पण ते टाळता येत नाही; ते कुणाला तरी भोगलेच पाहिजे. संत जे साधन सांगतात ते आपल्या शक्तीप्रमाणेच असते. संत जो बोध सांगतात, त्याचे आपण थोडेतरी पालन करू या.

९५. संत हा जसे बोलतो तसे वागतो. आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र त्याच्या उलट.


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

April 3, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३ एप्रील २०१४

 ३ एप्रिल

संतांना कसे ओळखावे ?

 

धान्यामध्ये काही असे खडे असतात की धान्यापासून ते वेगळे निवडता येत नाहीत. तांदळात पांढरे खडे असतात, ते निवडू गेले तरी निवडले जात नाहीत. त्याप्रमाणे साधू लोक हे आपल्यात असतात, त्यांना पाहू गेले तर ते आपल्यासारखेच संसारात वावरत असलेले दिसतात; पण त्याप्रमाणे आपण पाहू गेलो तर साधू ओळखता येईलच असे नाही. साधूचे एकच लक्षण सांगता येईल, ते हे की, जो सर्व ठिकाणी देवाला पाहू शकतो तो साधू. पण एवढयावरून आपल्याला तो ओळखता येईल का ? नाही; तर जेव्हा आपण साधू व्हावे, तेव्हाच आपल्याला साधूला ओळखता येईल.
जगात आपण कुणाचीच निंदा करू नये. आपण जेव्हा दुसर्‍याचे दोष पाहतो, म्हणजेच ते जेव्हा त्याच्याजवळ आहेत असे दिसतात, त्या वेळेस तेच दोष आपल्याजवळ सूक्ष्म रूपाने असतात असे समजावे; आणि आपण लगेच देवाला शरण जाऊन, 'हे माझे दुर्गुण काढून टाक', म्हणून त्याची करूणा भाकावी. आपण जेव्हा 'जगात न्याय उरला नाही' असे म्हणतो, त्या वेळेस आपल्याजवळ तो दोष आहे असे समजावे. म्हणून आपण कुणाचे दोष पाहू नयेत. आपण आपल्या स्वतःला आधी सुधारावे. चित्तशुद्धी केल्याशिवाय आपल्या मनात सर्व ठिकाणी भगवद्‍भाव उत्पन्न होणार नाही. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला दुसर्‍याचे दोष दिसतात, तेव्हा आपलेच चित्त अशुद्ध आहे असे समजून आपण परमात्म्याची करूणा भाकून त्याला शरण जावे, आणि 'माझे चित्त शुद्ध कर' अशी त्याला विनंती करावी. असे केले म्हणजे आपले चित्त शुद्ध होत जाते, आणि मग भगवंताची प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही.
जे मिश्रण आहे ते पचायला कठीण असते; उदा भाजणी. मिश्रण नसलेले एकच शुद्ध अन्न पचायला सोपे असते. हे जसे खरे, त्याचप्रमाणे आपले अंतःकरण अगदी शुद्ध असावे, म्हणजे ते सर्वांमध्ये लवकर मिसळते. पण आपल्या अंतःकरणामध्ये स्वार्थाचे मिश्रण असल्यामुळे ते सर्वांमध्ये समरस होऊ शकत नाही. शुद्ध अंतःकरणाच्या माणसाचे चालणे हळू, आणि बोलणे मृदू असते. तो सर्वांना प्रिय होतो. जगातले आपले समाधान किंवा असमाधान, ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून असते. 'माझ्याकरिता मी नसून, मी लोकांकरिता आहे. माझ्याकरिता जग नसून मी जगाकरिता आहे,' ही वृत्ती आपण ठेवावी.

९४. सर्व चराचर भगवद्‌रूप जो पाहतो तो साधू.


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

April 2, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २ एप्रील २०१४

 २ एप्रिल

सत्संगतीचे दोन प्रकार



सत्संगती अती अपूर्व काम करणारी आहे. संतांची संगत दोन प्रकारे होऊ शकते. एक, संतांच्या देहाची; दुसरी, संतांनी सांगितलेले साधन करीत राहण्याची. ह्यांपैकी पहिली, म्हणजे संताच्या देहाची संगती लाभणे फार कठीण आणि दुर्मिळ. कारण संत जरी खरा असला तरी त्याला ओळखणे कठीण असते, आणि पुष्कळदा त्याच्या बाह्य वागणूकीवरून मनात विकल्प येण्याचा संभव असतो; आणि एखाद्या भोंदूशीच गाठ पडली तर त्याच्या संगतीपासून नुकसान हे ठरलेलेच. म्हणून पहिला, म्हणजे संताच्या देहाच्या संगतीचा मार्ग, हा पुष्कळदा धोक्याचा ठरण्याचा संभव असतो. दुसर्‍या मार्गाने जाण्यात, म्हणजे त्याने सांगितलेले साधन करण्यात, बिलकूल धोका नसतो; कारण खरा संत काय किंवा भोंदू साधू काय, कोणीही झाला तरी तो दुसर्‍याला सांगताना खरे आणि बरोबर असेल तेच सांगेल. तो भोंदू असला तरी, आपला भोंदूपणा लपविण्याकरिता, जे बरोबर असेल तेच सांगणे त्याला जरूर असते. साधकाने शुध्द भावनेने ते साधन केले की सत्संगतीचा फायदा मिळून त्याचे काम होते. खर्‍या संताच्या देहाच्या संगतीचा लाभ जर दैववशात्‌ प्राप्त झाला तर मात्र काम बेमालूम होते. त्या वाहनाचा वेग हा आपला वेग होतो; फक्त त्या वाहनात निश्चल बसून राहणे एवढेच आपले काम असते. तसे आपण खर्‍या संताजवळ नुसते पडून राहावे. संताच्या संगतीत आपली कृती अशी काहीच नसते, नुसते अस्तित्त्व असते. त्यामुळे अहंकाराला वाव न राहून वासनेचा क्षय व्हायला फार मदत होते. तुकाराम महाराजांनी देवाजवळ धनसंपदा मागितली नाही, मुक्तीदेखील नको असे म्हटले, फक्त संतसंगती दे असे म्हटले.
संतसंगाने नाम घेण्याची बुद्धी येते. बुद्धीची स्थिरता ठेवणे हे फक्त नामानेच साधेल. नाम जरूर तेवढे ठेवते आणि बाकीचे नष्ट करून टाकते. आपण अनन्यभावाने नाम घ्यावे. नाम घेता घेता बुद्धीला स्थिरता येते; आणि मग मनात विकल्प न येता संतांच्या देहाच्या संगतीचा खरा फायदा घेता येतो. सत्संगतीत कष्टाशिवाय ईश्वरप्राप्ती होते. संतसंगतीत साधने आपोआप होत असतात. त्यांच्या पूजनाबरोबर पूजन, भजनाबरोबर भजन, श्रवणाबरोबर श्रवण, स्मरणाबरोबर स्मरण आपोआप होते. सत्संगतीत स्वतःची विस्मृती होते आणि नामस्मरण घडते. म्हणून प्रयत्‍नाने संतसंगती करावी. तिथे प्रारब्ध आणू नये. सत्संगतीत राहून नाम घेतले तर देहबुद्धीच्या कोंडीतून बाहेर पडता येते.



९३. संतांना जे आवडते ते आपल्याला आवडणे म्हणजे त्यांचा समागम करणे होय.


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या