September 30, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३० सप्टेंबर २०१४

३० सप्टेंबर

प्रपंचात असावी खबरदारी । मन लावावे रामावरी ॥

 

    

सर्वांचे राखावे समाधान । पण रामाकडे लावावे मन ॥
रामाला स्मरून वागावे जगात आपण । तेथे पश्चातापाला नाही कारण ॥
म्हणून कृतीस असावा साक्षी भगवंत । हा जाणावा खरा परमार्थ ॥
व्यवहार करावा व्यवहारज्ञानाने । परमार्थ करावा गुरूआज्ञेने ॥
कलि अत्यंत माजला । गलबला चोहोकडून झाला ।
चित्त ठेवावे रामावर स्थिर । कार्य घडते बरोबर ॥
स्वस्थ बसावे एके ठिकाणी । राम आणत जावा मनी ॥
प्रयत्‍नांती परमात्मा । ही खूण घालावी चित्ता । व्यवहारी ठेवावी दक्षता ॥
मागील झाले होऊन गेले । पुढील होणार ते होऊ द्यावे भले ।
त्याचा न करावा विचार । आज चित्ती स्मरावा रघुवीर ॥
आंतबट्ट्याचा नाही व्यापार । ज्याने घरी आणला रघुवीर ॥
नुसत्या प्रयत्‍नाने जग सुखी होते । तर दुःखाचे वारे न भरते ॥
म्हणून परमात्मा आणि प्रयत्‍न । यांची घालावी सांगड । म्हणजे मनी न वाटे अवघड ॥
जेथे वाटते हित । तेथे गुंतत असते चित्त ।
चित्त गुंतवावे भगवंतापाशी । देह ठेवावा व्यवहाराशी ॥
चित्ती ठेवावी एक मात । कधी न सुटावा भगवंत ॥
राम माझा धनी । तोच माझा रक्षिता जनी ।
हे आणून चित्ती । विषयाची योग्यतेने करावी संगति ॥

देह करावा रामार्पण । मुखी घ्यावे नामस्मरण ॥
संतांची संगति । रामावर प्रीति । तोच होईल धन्य जगती ॥
व्यवहार सांभाळून । करावा परमार्थ जतन ॥
राम ठेवावा हृदयात । जपून असावे व्यवहारात ॥
रामाचे चिंतन, नामाचे अनुसंधान । वृत्ति भगवत्परायण, साधुसंतास मान ।
आल्या अतिथा अन्नदान, । भगवंताला भिऊन वागणे जाण, ।
याविण परमार्थ नाही जाण ॥ प्रपंचात असावी खबरदारी । मन लावावे रामावरी ।
त्याचा राम होईल दाता । न करावी कशाचीहि चिंता ॥
करवंटीचे कारण । खोबरे राहावे सुखरूप जाण ।
तैसे आपले देहाचे संबंध ठेवून । चित्ती असावा रघुनंदन ॥
परमार्थ करावा जतन । मन करून रामाला अर्पण ॥
प्रपंची असावे सावध । कर्तव्यी असावे दक्ष । तरी न सोडावा रामाचा पक्ष ॥
प्रयत्‍नांती परमेश्वर हे सज्जनांचे बोल । मनी ठसवावे खोल ॥
पण आरंभी स्मरला राम । त्यालाच प्रयत्‍नांती राम ।
हा ठेवावा विश्वास । सुखे साधावे संसारास ॥
कर्तव्यात भगवंताचे स्मरण । हेच समाधान मिळवण्याचे साधन ॥
प्रयत्‍न करावा मनापासून । फळाची अपेक्षा न ठेवून ॥
कर्तव्यात असावे तत्पर । निःस्वार्थबुद्धि त्याचे बरोबर ॥
जोवर देहाची आठवण । तोवर व्यवहार करणे जतन ।
म्हणून प्रयत्‍न करावा कर्तव्य जाणून । यश देणे न देणे भगवंताचे अधीन ॥


२७४. दाता राम हे आणून चित्ती । आपण वर्तावे जगती ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

September 29, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २९ सप्टेंबर २०१४

२९ सप्टेंबर

प्रपंच हे साधन, परमार्थ हे साध्य. 

 मी प्रपंचासाठी नसून रामाकरता आहे, ही दृढ भावना ठेवावी. 'मी माझ्याकरता जगतो' असे न म्हणता 'रामाकरता जगतो' असे म्हणू या, मग रामाचेच गुण अंगी येतील. आपण प्रपंचाकरता जगतो, म्हणून प्रपंचाचे गुण अंगी येतात. म्हणून भगवंताकरता जगावे. प्रपंच हे साधन आहे, परमार्थ हे साध्य आहे. प्रपंच कुणाला सुटला आहे ? पण साधू त्याचा सदुपयोग करतात; आम्ही तसा करीत नाही, म्हणून परमार्थ साधत नाही. जगात तीन गोष्टी दुर्मिळ आहेत: मनुष्यजन्म, संतसमागम, आणि मुमुक्षत्व. मनुष्यजन्म हा परमार्थाकरताच आहे, विषयभोगासाठी नव्हे. परमार्थाची तळमळ लागली पाहीजे. तळमळ उत्पन्न झाल्यावर, मन शुद्ध झाल्यावर, राम भेटेलच. समई लावली पण तेल बरोबर् न घातले तर ती विझेल. स्मरणरूपी तेल वारंवार घालावे, मग परमार्थ-दिवा कायम राहील. परमार्थ हा मुख्यतः अनुभवाचा आहे. पंढरपूरला जायचे असेल तर वाट चालू लागले पाहिजे. मग वाटेत कुणीतरी वाट दाखवणारा भेटतोच; निदान पाट्या तरी आढळतात. आम्ही परमार्थमार्गावर प्रत्यक्ष चालूच लागत नाही, मग वाटाड्या कसा भेटणार् ? परमार्थमार्गावर गुरू खास भेटेलच. म्हणूनच रामाचे अखंड स्मरण ठेवून परमार्थाला लागू या.
आचार आणि विचार यांची सांगड असावी. पोथीत जे ऐकतो ते थोडेतरी कृतीत येणे जरूर आहे. पोथी वाचल्यानंतर, जेवढे कळले तेवढे तरी आचरणात आणायला काय हरकत आहे ? जे कळणार नाही तेही पुढे हळूहळू कळेल. घरातून बाहेर पडल्यावर एकदम मुक्कामाचे ठिकाण दिसत नाही. प्रथम एक रस्ता, मग दुसरा, मग तिसरा, असे करता करता आपण मुक्कामाला पोहोचतो. त्याप्रमाणे, पोथीतले सगळे कळले नाही, तरी जे कळले तेवढे तरी कृतीत आणू या. दृढ निश्चयाने एकएक मार्ग आक्रमीत गेलो तर मुक्कामाला खास पोहोचू. म्हणुन भगवत्स्मरणाला जपले पाहिजे. त्याला प्राणापेक्षाही जास्त समजून सांभाळावे. संत, सद्‍गुरू आणि शास्त्र यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवावा. तेथे बुद्धिभेद होऊ देऊ नये. याप्रमाणे वागले तर प्रपंच परमार्थरूपच होईल. मी रामाचा म्हणणे हाच परमार्थ, अहंबुद्धी ठेवणे हा प्रपंच. परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला; उलट्, प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच. संसाररूपी वृक्षाला अभिमानाचे पाणी आम्ही वारंवार घालतो म्हणून तो इतका फोफावला. हा मूळ अभिमानच नष्ट केला पाहिजे. खरा कर्ता ईश्वर असताना, जीव विनाकारणच 'मी कर्ता' असे मानतो. झाडाचे पान रामावाचून हलत नाही. देहाचा योगक्षेम तोच चालवितो. मी कर्ता नसून राम कर्ता ही भावना वाढविणे हीच खरी उपासना.


२७३. कर्तृत्व न घेईल तर जीव सुखदुःख भोगणार नाही.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

September 28, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २८ सप्टेंबर २०१४

२८ सप्टेंबर

अनुसंधानात राहिल्यावर अभिमान गळून जातो. 

 अभिमान सोडून जो गृहस्थाश्रम पाळील तोच खरा परमार्थी. अभिमान सोडल्याने गृहस्थाश्रम चांगला होतो. 'मी म्हणेन तसे होईल,' असे कधीही म्हणू नये. अभिमानाच्या पायावर उभारलेली इमारत डळमळीत होणारच. अभिमान हा देहाचा आणि तत्संबंधी विषयांचा असतो. अभिमानाचे मूळच काढून टाकावे; म्हणजे, मी देहाचा आहे म्हणतो, हेच काढून टाकावे. हा देह माझा नाही हे आपल्याला पटते, पण अखंड सहवासाने आपले त्यावर प्रेम जडते. एकदा देहावर प्रेम जडले मग अभिमान आला. त्याच्या पाठोपाठ लोभ, क्रोध येणारच. अभिमान म्हणजे 'मी कर्ता' ही भावना असणे. ही भावना टाकून काम केले, तर् व्यवहारात कुठे नडते ? आपल्या देहाचा आणि मनाचा फार निकटचा संबंध आहे. पण देह केव्हातरी जाणार असल्याने त्याला इतके महत्व नाही. नुसता जाडजुड देह कामाचा नाही. आपले मन तयार झाले पाहिजे. 'मी भगवंताचा आहे' हे एकदा मनाने जाणून घेतले, म्हणजे मग अभिमानरहित होता येते. नेहमी भगवद्‌भजनात राहण्याचा प्रयत्‍न करा, म्हणजे अभिमान शिवणार नाही. डोळ्यात पाणी आणून भगवंताला आळवावे, त्याला शरण जावे; भगवंत कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आपण आपल्या मर्यादा ओळखून वागावे. अमुक एक गोष्ट अमक्या तर्‍हेने घडावी असे जोपर्यंत आपल्याला वाटते आहे, तोपर्यंत व्यवहाराच्या मार्गाने जो योग्य प्रयत्‍न आहे तो आपण केला पाहिजे. पण प्रयत्‍न केल्यावर मात्र त्याचे फळ भगवंतावर सोपवावे, आणि जे काही घडेल त्यामध्ये समाधान मानावे.
आपले अंतःकरण नेहमी शुद्ध ठेवावे. रात्री निजण्यासाठी अंथरूणावर पडले असताना आपले अंतरंग शोधून पाहावे की, 'मी कुणाचा द्वेष-मत्सर करतो का ?' तसे असेल, तर ते मनातून जबरीने काढून टाकावे; ते थोडे जरी शिल्लक राहिले, तरी आपल्या परमार्थाच्या आड येणार आहे; आपल्या मनाने आपल्याला निश्च्ययाने असे सांगितले पाहिजे की, 'मी कुणाचाही द्वेष करीत नाही.' आपले अंतःकरण इतके शुद्ध आणि सरळ असावे की, आपण तर कुणाचा द्वेष-मत्सर करू नयेच नये, परंतु दुसरा कुणी आपला द्वेष करीत असेल ही कल्पनासुद्धा आपल्याला येता कामा नये. 'मी भगवंताचा आहे, या देहाचा नाही,' असे अखंड अनुसंधान् ठेवून, आपल्याला भगवत्स्वरूप का होता येणार नाही ? जो आतबाहेर भगवंताने भरून राहील किंवा त्या ज्ञानाने भरून राहील तोच खरा ज्ञानी होय' आणि जाणीव ज्याप्रमाणे देहाला व्यापून असते, त्याप्रमाणे भगवंताचे स्मरण ज्याचे मन व्यापून टाकील तोच खरा साधक, तोच खरा अनुसंधानी, आणि तोच खरा मुक्त समजावा.


२७२. विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

September 27, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २७ सप्टेंबर २०१४

२७ सप्टेंबर

स्मरण ही कृती आहे. 

 गुरूने सर्व करावे ही गोष्ट सत्य आहे, आणि तो करतो ही ही गोष्ट तितकीच सत्य आहे. पण आपण खरोखर सच्छिष्य आहोत की नाही हे पाहावे. देहातीत व्हायला, गुरूआज्ञेप्रमाणे वागणे यापरते दुसरे काय आहे ? 'मी देही नाही' असे म्हणत राहिलो तर केव्हातरी देहातीत होईन. दुसरा मार्ग म्हणजे 'भगवंत माझा' म्हणावे, म्हणजे देहाचा विसर पडतो. समर्थांचे नाव घेऊन सांगतो की आपला नीतिधर्म सांभाळा, आणि कोणताही प्रसंग आला तरी नामाला विसरू नका. 'मी जे जे करतो ते ते भगवंताकरिता करतो' असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय. कर्तेपण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते. भक्ताचे लक्षण म्हणजे भगवंतप्राप्तीशिवाय दुसरे काही नको असे वाटणे. भगवंतापासून आपल्याला जे दूर सारते ते खरे संकट होय. तोच काळ सुखात जातो की जो भगवत्स्मरणात जातो. खरोखर, स्मरण ही कृती आहे आणि विस्मरण ही वृत्ती आहे. भगवंताचे स्मरण करणे म्हणजे हवन करणे होय, आणि अभिमान नष्ट करणे म्हणजे पूर्णाहुती देणेच होय्. वृत्ती भगवंताकार झाली पाहिजे. आपल्याला ज्याची आवड असते त्याचे स्मरण आपोआप राहते. विषय अंगभूत झाले असल्याने त्यांचे स्मरण सहज राहते; पण भगवंताचे स्मरण आपण मुद्दाम करायला पाहिजे. हे करणे अगदीच सोपे नाही; परंतु ते फार कठीण देखील नाही. ते मनुष्याला करता येण्यासारखे आहे.
भगवंताची भक्ती ही सहजसाध्य आहे. ती अनुसंधानाने साध्य होते. अनुसंधान समजून केले पाहिजे; तिथे अनुभव लवकर येईल. पहार्‍यावर शिपाई जसा जागृत राहतो, त्याप्रमाणे अनुसंधान जागृत् ठेवले तर विषयांच्या संकल्पाचे पाय मोडतील. चोर चोरी करायला केव्हा येईल हे ओळखून, अनुसंधान चुकू देऊ नये. ताप आला की तोंड कडू होते, मग जिभेवर साखर जरी चोळली तरी तोंड गोड होत नाही. त्यासाठी अंगातला ताप गेला पाहिजे. त्याप्रमाणे, वरवर क्रिया करून दुःख नाहीसे होणार नाही. त्यासाठी अनुसंधानच पाहिजे. एक मुलगा परीक्षेसाठी मुंबईला आला. परीक्षा होईपर्यंत तो अडकून होता. परीक्षा संपली तेव्हा तो म्हणाला, 'आता मी मोकळा झालो बाबा !' नंतर चार दिवस तो मजेत मुंबईत हिंडला. त्याप्रमाणे, आपण अनुसंधान ठेवून प्रपंचाच्या आसक्तीतून मोकळे व्हावे, आणि मग मजेने संसार करावा; आपल्याला अगदी आनंदच मिळेल. उंबरठ्यावर दिवा ठेवला असताना ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला उजेड पडतो, त्याप्रमाणे भगवंताचे अनुसंधान हा उंबरठ्यावरचा दिवा आहे; त्याने परमार्थ आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल. प्रपंचामध्ये वागताना मनाने थोडे लक्ष द्यावे लागते, याला भगवंताचे अधिष्ठान असणे म्हणजेच अनुसंधान ठेवणे म्हणतात.


२७१. भगवंताच्या इच्छेने अकर्तेपणाने कर्म करणे, हेच अनुसंधान ठेवणे किंवा भक्ती करणे होय.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

September 26, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २६ सप्टेंबर २०१४

२६ सप्टेंबर

भगवंताला विसरणे ही आत्महत्याच. 

 एकदा एका माणसाने पक्वान्ने कशी तयार करावी हे शिकविण्याची शाळा काढली. त्या शाळेमध्ये तो मनुष्य शब्दांच्या साहाय्याने, निरनिराळी पक्वान्ने कशी तयार करायची, हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगे. पण त्या विद्यार्थ्यांना घरी भाकरी करून खाण्यापुरते पीठ देखील मिळत नसे; त्यांना त्या पक्वान्नांच्या ज्ञानाचा काय उपयोग होईल बरे ? त्याचप्रमाणे वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वान्नांच्या ज्ञानासारखे आहे. जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो, त्याला त्यापासून तसा काही फायदा होत नाही. जे ज्ञान व्यवहाराला लागू पडत नाही, ते ज्ञान खरे असले तरी आपल्याला उपयोगाचे नाही.
आपल्यात आणि संतांमध्ये फरक हाच की, आपण जगतासाठी देव मानतो, तर् संत देवासाठी जगत मानतात. खरे म्हणजे, जी गोष्ट आचरायला अतिसुलभ असते, ती समजावून सांगायला फार कठीण असते; ती खरी अनुभवानेच जाणायची असते. ज्याचा अनुभव दुसर्‍यावर अवलंबून आहे तो अपूर्ण समजावा; म्हणजेच, जेव्हा मिश्रणाने पदार्थाला चव येते तेव्हा ते दोन्ही पदार्थ अपूर्णच समजावेत. या जगात सर्व दॄष्टीने पूर्ण असा एक भगवंतच आहे; त्याला विसरणे ही आत्महत्याच आहे. तेव्हा नेहमी त्याच्या सान्निध्यात, म्हणजेच त्याच्या नामात, राहाण्याचा प्रयत्न करावा. सर्व कीर्तनांचे सार हेच असते. फक्त मांडणी निराळी.
रामरायांनी सर्व वानरांना सीतामाईचा शोध करायला सांगितले. जो तो 'हूं, हूं' करून शोधासाठी निघून गेला. परंतु मारूती अती बुद्धीमान्; त्याने 'सीतेला कसे ओळखायचे' म्हणून विचारले. त्यावर श्रीरामांनी तिचे पुष्कळ वर्णन केले. ती सुंदर आहे म्हणून सांगितले. परंतु स्त्री कशी दिसते हेच त्याला माहिती नाही ! तेव्हा श्रीरामप्रभू त्याला म्हणाले, "तुला मी काय सांगतो हे कळलेले दिसत नाही; तू आता एकच गोष्ट लक्षात ठेव, जिथे तुला रामनामाचा सारखा ध्वनी ऐकू येईल तिथे ती आहे म्हणून समज." तेव्हा ती खूण मारुतिरायाला पटली. ज्याला भगवंताच्या नामाची खूण मनापासून समजली त्याच्या जन्माचे सार्थक झाले, त्याचा परमार्थ सफल झाला, आणि त्याला जगात मिळवायचे बाकी असे काही राहिलेच नाही. मारुतिरायाची भक्ती फार मोठी. श्रीरामाला वाटले, याला आता काहीतरी 'चिरंजीव' असे दिल्याशिवाय याचे समाधान होणार नाही; म्हणून चिरंजीव असे हे आपले नाम त्याला त्याने दिले. त्यामुळे त्या नामाबरोबर मारुतीही चिरंजीव झाला.

२७०. सर्व संतांचे सांगणे आहे की, मनापासून भगवंताचे नाम घ्या आणि आपले कर्तव्यकर्म करा.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

September 25, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २५ सप्टेंबर २०१४

२५ सप्टेंबर

अखंड अनुसंधान ठेवण्याकरिता काय करावे ? 

 भगवंताने आपल्याला बुद्धी दिली आणि ती चालवून आपण काम करतो, म्हणजे भगवंतच आपल्याकडून सर्व कर्मे घडवीत असतो. त्याच्या प्रेरणेनेच सर्व घडते आहे, अशी भावना प्रत्येक कर्मात ठेवली, म्हणजे भगवंतावर प्रेम जडते. जे जे काही करायचे ते भगवंताकरिता करावे; म्हणजे पापपुण्याची बाधा आपल्याला होणार नाही. एकदा कबीराच्या घरी पाहुणे आले. घरात तर त्यांना जेवू घालायला काही नव्हते. आणि अतिथीला भगवत्स्वरूप पाहावे असे शास्त्र आहे, तेव्हा कबीराने त्यांना पुरेल इतक्याच धान्याची चोरी केली. चोरी करणे हे वाईट असले, तरी ती भगवंताकरिता केल्यामुळे तिचे पाप त्याला नाही लागले. निदान, कर्म झाल्यावर तरी भगवंताचे स्मरण करून ते त्याला अर्पण करावे, म्हणजे हळूहळू अभिमान कमी होऊन भगवंतावर प्रेम जडेल.
आपण भगवंताचे आहोत, जगाचे नाही, असा एकदा दृढ निश्चय करावा. आपण मनुष्य आहोत याची जाणीव जितकी दृढ असते तितका हा निश्चय दृढ असावा. तथापि हे साधणे कठीण आहे. त्याच्या खालोखालचा उपाय म्हणजे, जे काही घडते आहे ते भगवत्प्रेरणेने, त्याच्या सत्तेने आणि इच्छेने घडते आहे, अशी अंतःकरणपूर्वक भावना ठेवावी. आणि हेही साधत नसेल, तर वैखरीने अखंड नामस्मरण करावे. या अनुसंधानाच्या प्रक्रियेत मन भगवंताच्या ठिकाणी चिकटून असते. सध्या आपले उलट चालले आहे; आपण देहाने पूजा करतो, यात्राबित्रा करतो, पण मन मात्र प्रपंचाकडे ठेवतो. सासरी असलेली सून कुटुंबातल्या सर्वांकरिता कष्ट करते; नवर्‍याचे कदाचित् ती फारसे करीतही नसेल, पण अंतःकरणात मात्र ती फक्त त्याच्यासाठीच असते. तसे, प्रपंचात सर्वांकरिता सर्व करावे, पण मनात मात्र 'मी रामाचा आहे' ही अखंड आठवण ठेवावी. आपले स्टेशन ठरून आपण गाडीत बसल्यावर मध्ये अनेक गोष्टी घडतील; उभे राहावे लागेल, निरनिराळ्या तर्‍हेचे लोक भेटतील. पण स्टेशनावर उतरल्यानंतर त्या आनंदामध्ये मागचे सगळे आपण विसरून जातो. तसे भगवंताचे ध्येय निश्चित करावे. भगवन्नाम हे भगवत्कृपेसाठी घ्यावे, कामनापूर्तीसाठी नसावे; नामच ध्येय गाठून देईल. भगवंताप्रमाणे आपणदेखील, प्रपंचात असून बाहेर राहावे; आपल्या देहाकडे साक्षित्वाने पाहायला शिकावे. पण ते साधत नसेल, तर व्यापात राहून अनुसंधानात असावे. वाचलेले विसरेल, पाहिलेले विसरेल, कृती केलेली विसरेल, पण् अंतःकरणात घट्ट धरलेले भगवंताचे अनुसंधान कधी विसरायचे नाही.


२६९. कलियुगात अवतार नसला तरी 'नामावतार' आहे, आणि तोच खरा तारक आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

September 24, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २४ सप्टेंबर २०१४

२४ सप्टेंबर

कुटुंबात कसे वागावे ? 

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन

 देहात आल्यावर, आपले ज्याच्याशी जे कर्तव्य आहे ते बरोबर करावे. घरात अत्यंत समाधान असावे. मुलांनी वडील माणसांचे दोष पाहू नयेत. बाप जसा सच्छील आहे तसे मुलांनी व्हावे., म्हणजे कुळाची कीर्ति वाढते. मोठ्या माणसाने, पेन्शन घेतल्यावर मनाने भगवंताचे नोकर होऊन राहावे. बाईनेही पतीपरते दैवत न मानावे. सर्वांनी भगवंताच्या नामात राहावे. जो मनुष्य तरूणपणी स्वाभाविक रीतीने वागेल त्याला म्हातारपणीही स्वाभाविक रीतीने वागता येईल; म्हणजेच म्हातारपण त्याला मुळीच दुःखदायक होणार नाही. आपण अस्वाभाविक रीतीने, म्हणजेच आसक्तीने वागत असल्यामुळे, म्हातारपणी कर्तेपण कमी होते आणि आसक्ती मात्र टिकते; आणि ती तापदायक बनते. ज्या माणसाची आसक्ती किंवा आग्रह म्हातारपणी सुटलेला असतो, त्याचा देह जरी अशक्त झाला तरी तो सर्वांना हवासा वाटेल. अशक्तपणामुळे त्याला ऐकायला कमी येईल, त्याला दिसायला कमी लागेल, त्याला मागच्या गोष्टींची आठवण राहणार नाही, त्याची झोप कमी होईल; पण हे सर्व होऊनही त्याचा कोणी कंटाळा करणार नाही, आणि त्याला स्वतःलाही जीवनाचा कंटाळा येणार नाही. म्हातारपणी आपण कसे मीपणाने वितळून जावे ! पण मी सांगतो ना !, ही कर्तेपणाची वृत्ती नाहीशी करावी, म्हणजे मग दुःख नाहीच नाही.
प्रपंचात वागत असता प्रत्येकाने अंतर्मुख होऊन, आपले दोष काय आहेत ते हुडकून काढावेत आणि ते घालविण्याचा प्रयत्‍न करावा. वयाची सोळा ते पंचवीस वर्षे हा काल असा असतो की मनुष्याची बुद्धी वाढीला लागलेली असते. ती वाढ योग्य मार्गाने व्हायला बंधनाची अत्यंत आवश्यकता असते. बंधनात उत्तम बंधन म्हणजे आईबाप सांगतील त्याप्रमाणे वागणे हे होय; कारण आपले हित व्हावे यापलीकडे त्यांचा दुसरा हेतू नसतो. जगामध्ये प्रत्येक गोष्ट आपण स्वतःच्या अनुभवाने शिकणे कसे शक्य आहे ? म्हणून आईबापांच्या अनुभवाचा फायदा आपण करून घ्यावा. आपले आईबाप एखादे वेळी चुकणार नाहीत असे नाही, कारण चुकणे हा मनुष्याचा धर्मच आहे; परंतु आपल्याविषयी त्यांची जी हितबुद्धी असते, तिच्यामुळे त्यांची चूक आपले कायमचे नुकसान करणार नाही. कोणता काल कुणाच्या भाग्याने येतो हे सांगता येत नाही. म्हणून आपण कधी कष्टी होऊ नये. सत्कर्म जेवढे मोठे तेवढी विघ्ने अधिक; भगवंताचे अनुसंधान हे सर्वात मोठे सत्कर्म आहे. आपण निश्चयाने आणि निःशंकपणे त्याचे नाव घेऊ या आणि आनंदात राहू या.


२६८. आपले अवगुण शोधावेत व त्यांचा त्याग करून गुण घ्यावेत.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

September 23, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २३ सप्टेंबर २०१४

२३ सप्टेंबर

शास्त्रवचन, थोरवचन आणि आत्मसंशोधन. 

 एकदा उद्धवाने श्रीकृष्णाला विचारले की, "तू आपल्या मुखानेच सांग की आम्हाला तुझी प्राप्ती कशी होईल." तेव्हा परमात्मा म्हणाला, "भक्ती केल्यानेच माझी प्राप्ती होऊ शकते." भक्तीची तीन साधने आहेत - शास्त्रवचन, थोरवचन आणि आत्मसंशोधन. आपले सध्या सगळे विपरीत झाले आहे. शास्त्रवचन म्हणावे, तर आपण आता इतके सुधारक झालो आहोत की, हल्लीच्या ज्ञानाने आपल्याला पुराणावर विश्वास ठेवण्याची लाज वाटते, 'मी या गावंढळ बापाचे कसे ऐकू ? यापासून माझा काय फायदा होणार?' तसेच आत्मसंशोधनाचे. आपण शोधन करतो ते कसले, तर पांडव कुठे राहात होते ? रामाचा जन्म कोणत्या गावी झाला ? कौरव-पांडवांचे युद्ध कोणत्या ठिकाणी झाले ? मला सांगा, अशा संशोधनापासून आपला कसा फायदा होणार ? एक प्राध्यापक मला म्हणाले, "मी कृष्णाबद्दलचे पुष्कळ संशोधन केले आहे आणि कृष्णाचे जन्मस्थळ कोणते, निर्याणस्थळ कोणते, याची आता खात्री झाली." मी म्हणतो की, ते करतात ते ठिक आहे. पण संतांना कृष्णप्राप्तीसाठी, कृष्णजन्म कुठे झाला या प्रश्नाच्या खात्रीची जरूरी वाटली नाही; त्यांनी दृढ उपासना करून कृष्णाला आपलेसे केले. खरे म्हणाल तर कृष्णाचा जन्म उपासनेने हृदयातच झाला पाहिजे आणि तेच खरे जन्मस्थान आहे.
आपण जर आपले वर्तन पाहिले, मनातले विचार बघितले, तर आपल्याला असे आढळून येईल की, लोकांना जर ते कळले तर लोक आपल्याकडे ढुंकूनही पाहणार नाहीत; आणि असे असूनही आपण आपल्या संशोधनाचा आणि विचारांचा अभिमान बाळगतो, याला काय म्हणावे ? अशाने का आपल्याला भगवंताचे प्रेम लाभणार ? आपला परमार्थ कसा चालला आहे हे दुसर्‍या कुणी सांगण्याची गरजच नाही. आपल्याला तो पुरता ठाऊक असतो. अभिमान खोल गेलेला, विचारांवर ताबा नाही, साधनात आळशीपणा; मग अशा परिस्थितीत आपल्याला परमात्म्याचे प्रेम कसे लाभणार ? साधुसंतांनी यावर एकच उपाय सांगितला आहे, आणि तो म्हणजे पूर्ण शरणागती. रामाला अगदी विनवणी करून सांगा की, 'रामा, आता मी तुझा झालो; ह्यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन, आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्‍न करीन; तू मला आपला म्हण.' देव खरोखरच किती दयाळू आहे ! लोकांचे शेकडो अपराध पोटात घालूनही, शरण आलेल्याला मदत करायला तो सदैव सिद्धच असतो.


२६७. नाम घेण्यात एकतानता करावी आणि स्वतःला पूर्ण विसरून जावे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

September 22, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २२ सप्टेंबर २०१४

२२ सप्टेंबर

भक्ति म्हणजे ईश्वराविषयी अत्यंत प्रेम. 

 

 एखाद्या मोठ्या यंत्रामध्ये एक चक्र सुरू झाले की बाकीची सर्व चक्रे आपापल्यापरी हळू किंवा जलद फिरू लागतात. त्याचप्रमाणे आपल्या मनाचे आहे. मनाची एक शक्ती काम करू लागली की तिच्याबरोबर इतर सर्व शक्तीदेखील हालचाल करू लागतात. मनाला आपल्या शक्तीने ताब्यात आणणे फार कठीण आहे. ते थोर माणसालाच जमण्यासारखे आहे. पारा समोर टाकला तर दिसतो, पण काठीने मारला तर तो मारला जात नाही. त्याचप्रमाणे, मन आहे हे समजते, पण ते आवरता येत नाही. म्हणूनच भगवंताला शरण जावे, आरशावर घाण पडली म्हणून साफ करण्याचा प्रसंग आला. अंतःकरणाची घाण पुसण्याचे काम साधनाने होते. मिरच्या, मिरे, मीठ, इत्यादी पदार्थ एकत्र करून जसा सुंदर मसाला तयार करतात, त्याप्रमाणे भगवंताच्या प्राप्तीसाठी तीन गोष्टींचा मसाला पाहिजे. शुद्ध आचरण, शुद्ध अंतःकरण आणि भगवंताचे नामस्मरण, या त्या तीन गोष्टी आहेत. शुद्ध आचरण म्हणजे प्रामाणिकपणा, धार्मिक आचार आणि नीतीचे वर्तन. शुद्ध अंतःकरण म्हणजे अभिमान नसणे, द्वेषमत्सर नसणे, आणि सर्वजण सुखी असावेत अशी भगवंताची प्रार्थना करणे. भगवंताचे नामस्मरण म्हणजे भगवंताचा केव्हाही विसर न पडणे. नवर्‍याला देव आवडत नाही म्हणून बायकोने नामस्मरण सोडण्याचे कारण नाही. तिने नाम घेतले तर पत्‍नीधर्म सोडला असे होत नाही.
मनात येणारे भलतेसलते विचार हे नामाच्या प्रेमाला आडकाठी करतात. त्यांचा बंदोबस्त करण्याचा उपाय म्हणजे, या विचारांना थाराच देऊ नये म्हणजे झाले. एक मोठा पोलीस अंमलदार चोर पकडण्यात हुशार होता. तो असे करी की, चोर ज्या बाईच्या नादी असेल तिला फितुर करून घ्यायचा, म्हणजे चोर आपोआप नेमका सापडे. त्याचप्रमाणे आपले मन जिथे गुंतते तिथे भगवंताला ठेवला, की मन आपल्या ताब्यात आलेच म्हणून समजा. मनाचे संयमन करायला दोन उपाय आहेत: एक म्हणजे पातंजल योग, आणि दुसरा म्हणजे भगवंताची भक्ती. पातंजल योग म्हणजे युक्ताहारविहार, नियमित राहणे, आणि इंद्रियांचा निरोध करणे, भगवंताची भक्ती म्हणजे ईश्वराविषयी अत्यंत प्रेम. या प्रेमाची साधने कोणती तर भगवंताचे नामस्मरण, त्याचे कथाकीर्तन, साधुसमागम, आणि त्यातल्या त्यात सद्‌गुरूची कृपा, ही होत. भगवंताच्या स्मरणाशिवाय जी कर्मे होतात ती वाईट कर्मे होत. कोणताही खाण्याचा किंवा पिण्याचा पदार्थ भगवंताचे नाम घेतल्याशिवाय खायचा नाही, असा नेम ठेवला तर नाम आपोआप येते. कोणत्याही परिस्थितीत आपण नामस्मरणापासून ढळूच नये. जो नामात प्रपंच करील, त्याचा अभिमान नष्ट होऊन त्याला सुखसमाधानाचा लाभ झाल्यावाचून राहणार नाही.


२६६. अनावर मनाला नामाचे ओंडके बांधावे, म्हणजे भगवंताचे प्रेम येते.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

September 21, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २१ सप्टेंबर २०१४

२१ सप्टेंबर

अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी. 

 दुसर्‍याच्या मनातले ओळखणे ही फारशी मोठी विद्या नाही. ज्याच्या मनातले ओळखायचे आहे त्याच्या मनाशी एकरूप झाले की आपल्याला कळायला लागते; पण अंतःकरण शुद्ध असेल तरच हे साधेल. हे साधण्याच्या काही क्रिया असतात. त्या क्रिया चालू असतात तोपर्यंत ती शक्ती राहते. त्या क्रिया बंद झाल्या की ती नाहीशी होते. जो मनुष्य या शक्तीचा बाजार मांडतो, त्याच्याजवळ भगवंताची कृपा असेलच असे मात्र नाही; आणि ती नाही म्हणजे काहीच नाही ! मनोगत कळायला एकमेकांना एकमेकांची भाषा कळायला पाहिजेच असे नाही. समजा, तेलंगणातला एक भिकारी आपल्या दारी भीक मागायला आला आणि तो एक तेलंगी गाणे म्हणू लागला. त्या गाण्याचा अर्थ आपल्याला मुळीच कळत नाही; पण हा भीक मागतो आहे, हे आपण ओळखतो. त्याचप्रमाणे मनोगताचा भावार्थ कळतो. प्रत्यक्ष वाक्याचा अर्थ कळला नाही तरी हरकत नसते. ऐकणारा खर्‍या उत्सुकतेने आला असेल, तर सांगणार्‍याचा भावार्थ त्याला आपोआप कळेल. पण ऐकणारा तसा आला नसेल, तर सांगणार्‍याने स्पष्ट सांगूनसुद्धा त्याला कळायचे नाही. तत्वज्ञान हे कायम आणि कधीही न बदलणारे आहे. स्थलकालानुसार निराळ्या भाषेत ते मांडावे लागते इतकेच. समजा, आपण गाडीत बसून दिल्लीला चाललो. गाडी दर क्षणी पुढे पुढे जाते, पण आपण आपल्या जागेवर बसूनच असतो. त्याप्रमाणे परिस्थिती सारखी बदलत असते; पण आपण जर भगवंतालाच चिकटून राहिलो तर खात्रीने आपण आपल्या नियोजित स्थळी पोहोचू शकू; मग परिस्थिती कितीही बदलू दे !
देहाला आल्यावर आपले ज्याच्याशी जे जे कर्तव्य आहे ते बरोबर करणे हे रामचरित्राचे सार आहे आणि हे प्रत्येकाने जाणले पाहिजे. रामासमोर जाऊन, 'मी अमुक अमुक करीत आहे' असे त्याला सांगावे, आणि आपल्या कार्याला लागावे. भगवंताला स्मरून काम करीत असताना, जे योग्य दिसेल ते त्याच्याच इच्छेने आहे असे समजून काम करावे. जो असे करील त्याला समाधान झालेच पाहिजे. 'भगवत्कृपेने मी सर्व कॄत्ये करतो' म्हटले म्हणजे अभिमान कशाला वाढेल ? अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरूवात करावी. माझे चुकते कुठे हे पाहावे. तर्कशास्त्र शिकून तर्कटी बनू नये; तसेच संतांच्या अनुभवी वचनांकडे फर चिकित्सेने पाहू नये. संतांचे सांगणे अगदी सोप्या भाषेत असते. गंमत अशी की, 'भगवंत आहे की नाही' इथपासून लोक चिकित्सेला सुरूवात करतात, आणि मोठ्या घोटाळ्यात पडतात; आणि शेवटी, आहे तिथेच थांबण्याची त्यांच्यावर पाळी येते, म्हणजे, त्यांची प्रगती खुंटते. याकरिता भगवंताचे बूड कायम ठेवून चिकित्सा करावी.


२६५. देहरूप गावाहून रामरूप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

September 20, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २० सप्टेंबर २०१४

२० सप्टेंबर

प्रपंचाची आठवण । हेंच दुःखाचें कारण ॥ 

 

आपण रामापाशी मागावे एक । 'तुझे इच्छेने सर्व जगत चालते देख ।
त्यातील मी एक पामर । रामा, तुला कसा झालो जड ? ॥
रामा, अन्यायाच्या कोटी । तूच माय घाली पोटी ॥
मातेलागी आले शरण । त्याला नाही दिले मरण ।
ऐसे ऐकिले आजवर । कृपा करी तू रघुवीर ॥
दाता राम हे जाणून चित्ती । म्हणून आलो दाराप्रति ॥
आता रामा नको पाहू अंत । तुजवीण शून्य वाटे जगत ॥
ज्याचा ज्याचा मी केला स्वार्थ । ते ते झाले दुःखाला कारण ।
आता, रामा, कोठे जाऊ । तुला टाकून कोठे राहू? ॥
ऐसे कोठे पाहावे स्थान । जेथे होईल समाधान ? ॥
आता असो नसो भाव । मी रामा ! तुझा झालो देख ॥
आता कसे तरी करी । मी पडलो तुझ्या दारी ॥
आता लौकिकाची चाड । नाही मला त्याची आवड ।
हे ठसावे चित्ती । कृपा करी रघुपति ॥
आता मनास येई तसे करी । माझे मीपण हिरोनि जाई ॥

जोवर देहाची संगति । तोवर मी-माझे ही वृत्ति ।
राहील अभिमानाला धरून । तेथे न राहे कधी अनुसंधान ॥
काळोख अत्यंत मातला । घालवायला उपाय न दुजा सुचला ॥
होता सूर्याचे आगमन । काळोख जाईल स्वतः आपण ॥
प्रपंचातील संकटे अनिवार । माझ्या बोलण्याचा करावा विचार । आता कष्टी न व्हावे फार ॥
प्रपंचाची आठवण । हेच दुःखाचे कारण ॥
तेच घोकीत बसल्याने । न होई आनंदरूप स्मरण ॥
सुखदुःखाची उत्पत्ति । आपलेपणात आहे निश्चित ॥
स्वार्थ म्हणजेच आपलेपण । म्हणून माझे मीच दुःखाला कारण ॥
आपण आपलेपणाने वागत गेले । सुखदुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले ॥
अमुक व्हावे, अमुक होऊ नये, । याचे कसे होईल, त्याचे कसे होईल, ।
ही चित्ताची अस्वस्थता । याचे नाव चिंता ॥
सुखदुःखे चित्ताची न राहे स्थिरता । तीच त्याची खरी अवस्था ॥
सुखदुःख परिस्थितीवर नसते । आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते ॥
ज्यात एकाला सुख वाटते । तेच दुसर्‍याला दुःखाला कारण होते ॥
दुःखाचे मूळ कारण । जगत सत्य मानले आपण ॥
देहाने कष्ट केले फार । त्यातील फळाचा घेऊन आधार ॥
फळ नाही हाती आले । दुःखाला कारण ते झाले ॥
आपले चित्त झाले विषयाधीन । नाही दुःखास दुसरे कारण ॥
मागील गोष्टींची आठवण । पुढील गोष्टींचे चिंतन ।
हेच दुःखाला खरे कारण । याला एकच उपाय जाण ।
अखंड असावे अनुसंधान ॥ प्रपंच न मानावा सुखाचा । तो असावा कर्तव्याचा ॥
वृत्ति होऊ द्यावी स्थिर । चित्ती भजावा रघुवीर ॥२६४. रामा, सुखदुःख दोन्ही । केले अर्पण तुझे चरणी ॥
आता मनास येई तैसे ठेवी । याविण दुजे न मागणे काही ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

September 19, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १९ सप्टेंबर २०१४

१९ सप्टेंबर

भगवंताचे होण्यानेच काळाच्या पलिकडे जाता येते. 

 

    

आपल्या जीवनाचा सारखा विकास होतो आहे. म्हणून, आपण आज जिथे आहोत त्याच्या मागे काल होतो, आणि आज जिथे आहोत त्याच्या पुढे उद्या आपण जाऊ. हे जरी खरे, तरी आज आपण जे करायला पाहिजे ते न केले, तर एखाद्या वेळी उद्या मागे जाण्याचा प्रसंग आपल्यावर येईल. पुढचा जन्म हा आजच्या जन्मातूनच निर्माण होतो. तेव्हा आपण आज चांगले असलो तर, 'अन्ते मतिः सा गतिः' या नियमाप्रमाणे पुढचा जन्म आपल्याला चांगलाच येईल. काळ मुख्यतः तीन प्रकारचा असतो; कालचा, आजचा आणि उद्याचा. जो काळ होऊन गेला तो काही केले तरी परत येणार नाही; म्हणून त्याची काळजी करू नये. एखाद्याचे कोणी गेले तर आपण त्याला असे सांगतो की, "अरे, एकदा गोष्ट होऊन गेली; आता काय त्याचे ! आता दुःख न करणे हेच बरे." हे जे तुम्ही लोकांना सांगता, तसे स्वतः वागण्याचा प्रयत्‍न करा. मागे होऊन गेल्याची विवेकाने विस्मृती पाडता येते. तसेच, पुढे काय होणार हे माहीत नसल्यामुळे त्याची काळजी करू नये. आजचे आपले कर्तव्य आपण केल्यानंतर, 'जे व्हायचे ते होणारच' म्हणून स्वस्थ बसावे. मागची आठवण करू नये किंवा गेल्याचे दुःख करू नये, आणि उद्याची किंवा होणार्‍या गोष्टीची काळजी करू नये. सध्या, आपल्याला कालाच्या पलीकडे जाता येत नाही, आणि कालाच्या पलीकडे गेल्याशिवाय भगवंत मिळणार नाही, अशी अवस्था आहे. जगात घडामोडी सारख्या होत आहेत आणि आपली तळमळ कायम आहे ! आपल्याला जी तळमळ लागते ती आपल्या अपुरेपणामुळे, अपूर्णतेमुळे लागते.
कोणीही मनुष्य जन्माला आला की भगवंताला आनंद होतो, कारण सत्यस्वरूप प्रत्येकाला कळावे अशी भगवंताची इच्छा आहे, आणि हे कार्य फक्त मनुष्य जन्मामध्येच शक्य आहे, यासाठी भगवंत आपल्याला समजण्यासारखा आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. याकरिताच आपल्याला भाव, इच्छा, तळमळ, आच, मनातून उत्पन्न व्ह्यायला पाहिजे. पुष्कळ चांगला स्वयंपाक केला आणि मीठ घालायचे राहिले तर काय उपयोग ? भाव जर दुजा ठेवला तर भजन चांगले झाले असे कसे म्हणावे ? भक्तीचे नऊ मार्ग सांगितले आहेत. त्यातल्या कोणत्याही एकाचेच पूर्ण भाव ठेवून परिशीलन केले तरी त्यात बाकीचे आठ येतात. आपल्याला जे कळले ते आपल्या आचरणात आणावे, हे खरे ऐकणे होय. जो आपल्या रक्तामासात मिसळतो आणि रोजच्या वागण्यात आणता येतो तोच खरा वेदान्त होय; आणि आपल्या कर्तव्यामध्ये भगवंताचे स्मरण ठेवणे हेच सर्व वेदान्ताचे सार आहे.२६३. वेदान्त हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

September 18, 2014

श्री गुरुदेव दत्त


 घोरसंकटनिवारणपूर्वक श्रीदत्तप्रीतिकारकस्तोत्रम्

 सर्वांचे कल्याण करणारे हे श्लोक पंचक  नियमपूर्वक नित्यशः भक्तिभावाने जो पठण करील तो मनुष्य श्री दत्तमहाराजांना अत्यंतप्रिय होईलहे स्तोत्र  इथे  वाचता / ऐकता येईल 


श्री गुरुदेव दत्त  : !!

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १८ सप्टेंबर २०१४

१८ सप्टेंबर

गोंदवल्याच्या रामाचे वैशिष्ट्य ! 

 

 प्रत्येकाने गोंदवल्याच्या रामाचे एकदा तरी दर्शन घ्यावे असे मला फार वाटते. ह्या रामाचे वैशिष्ट्य असे आहे की, त्याच्यापुढे उभे राहिले म्हणजे आपल्या अवगुणांची तो जाणीव करून देतो. हेच काम विशेष महत्वाचे आहे; कारण दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्याच्या प्रयत्नाला लागेल. आपल्याला एखादा रोग झाला आहे असे समजले तरच मनुष्य त्यातून मोकळा होण्याच्या प्रयत्नाला लागेल; तसे, दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्यासाठी रामाची प्रार्थना करून शरण जाईल. शरणागतावर कृपा करणे हे रामाचे ब्रीदच असल्यामुळे तो त्याला त्यातून सोडवीलच, आणि त्याचे काम होऊन जाईल. चांगला वैद्य कोण ? तर जो रोग्याला भूक उत्पन्न होईल असे औषध देऊन नंतर त्याला भरपूर खायला देतो, आणि ते पचेल असे औषध देऊन त्याला निरोगी आणि सशक्त बनवितो, तो. तसाच माझा राम आहे. म्हणून प्रत्येकाने त्याला एकवार तरी पहावे असे मला मनापासून वाटते.
मंदिरामध्ये मुक्तद्वार असावे, पण ते कुणाला ? तर फक्त भगवंताच्या उपासकाला ! भगवंताच्या उत्सवाला थोडेच लोक जरी जमले, पण ते नामात राहणारे असले, तर तो खरा आनंद आहे. उगीच पुष्कळ लोक जमावेत हा हेतू नसावा. मंदिर हे भगवंताच्या उपासनेचे मुख्य स्थान आहे; म्हणून ते अगदी साधे असावे, आणि तिथे उत्तम उपासना चालावी. मंदिर नेहमी भिक्षेवरच चालावे. मंदिरातून व्रताची आणि ब्रीदाची माणसे उत्पन्न झाली पाहिजेत. भगवंताला उपासना प्रिय आहे. म्हणून सोन्याची मंदिरे बांधण्यापेक्षा दगडमातीच्या मंदिरामध्येच उपासना वाढविण्याचा प्रयत्न करावा.
भगवंताच्या इच्छेनेच सर्व चालले आहे ही भावना ठेवून, जे येईल त्याला नको म्हणू नये, आणि जे येत नाही त्याबद्दल दुःख करू नये. आपल्याला भगवंताचा विसर पडला आहे. त्याचे स्मरण होण्यासाठी आणि ते सतत टिकविण्यासाठी भगवंताचे उत्सव करणे जरूर आहे. एखाद्या माणसाला पुष्कळ नाती असून तो जसा वेगळा राहू शकतो, त्याप्रमाणे भगवंत सगळ्या ठिकाणी सत्तारूपाने राहूनही आपल्या हृदयात राहू शकतो. तो सूर्याच्या प्रकाशासारखा एके ठिकाणी राहून सर्व ठिकाणी सत्तारूपाने राहातो. ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निःसंशय असते, त्याला दगडाची मूर्तीदेखील देव बनते; भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे, तीमध्ये भेसळ उपयोगाची नाही. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेर वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील, त्याला परमार्थाचा अनुभव लवकर येईल. नामाचा अनुभव जसा घ्यायचा असतो, तसा भगवंताचा अनुभव अनुसंधानात येतो.

२६२. उपासक देहाला विसरला की उपास्यमूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

September 17, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १७ सप्टेंबर २०१४

१७ सप्टेंबर

परमेश्वर प्राप्तीची तळमळ हवी. 

 

 परमेश्वर आपल्याला खरोखरच हवा आहे का ? आणि तो कशासाठी ? बाकी, एवढे कष्ट करून तुम्ही येथे येता, तेव्हा भगवंत तुम्हाला नको आहे असे कसे होईल ? तुम्हाला खात्रीने तो हवा आहे; पण कशासाठी ? तर आपला प्रपंच नीट चालावा म्हणून ! असे जरी असले तरी त्यात वाईट नाही, त्यातूनच आपल्याला पुढला मार्ग सापडेल. परंतु केवळ परमेश्वरासाठीच परमेश्वर हवा असे ज्याला वाटत असेल तो खरोखर भाग्यवान होय. मोठमोठ्या साधुसंतांना खरोखरच तशी नड भासली; त्यांनी परमेश्वर आपलासा करून घेतला. तुकाराम, रामदास, यांना एका परमेश्वरावाचून दुसरे काहीही हवेसे वाटले नाही. भगवंताची नड फक्त संतांनाच निर्माण होऊ शकते. रामदासांना परमेश्वराच्या उपदेशाची फार गरज भासू लागली. त्यांनी आपल्याला उपदेश करण्यासाठी मोठ्या भावाला विनविले, परंतु भाऊ म्हणाला, ’बाळ, तू अजून लहान आहेस.’ रामदासांची तळमळ शमली नाही. त्यांनी लग्नाच्या आधीच पळ काढला. देवाच्या ध्यासात बारा वर्षे घालविल्यावर परमेश्वराने त्यांना उपदेश दिला, तेव्हाच त्यांची तळमळ शांत झाली. परमेश्वराची प्राप्ती ही वयावर, श्रीमंतीवर, जातिधर्मावर अवलंबून नाही; ती एका तळमळीवर अवलंबून असते. ही तळमळ असणे अत्यंत जरूरीचे आहे. ती तळमळ जर कशाने लागत असेल तर केवळ एका शरणागतीनेच होय. रामदासांनी रामाच्या पायावर डोके ठेवून सांगितले कि, "रामा मी देह अर्पण केला आहे. आता याची मला गरज नाही. तुझ्यावाचून जगणे मला अशक्य आहे." एवढे प्रेम, एवढे आपलेपण, एवढी तळमळ असल्यावर परमेश्वर किती वेळ दूर उभा राहणार !
परमेश्वर अत्यंत अल्पसंतुष्ट आहे. आपण त्याच्याजवळ एक पाऊल पुढे गेलो तर तो दोन पावले आपल्याजवळ येईल. परंतु आपल्याला त्याच्याकडे जायची तळमळच लागत नाही. आपले विकार, आपला अहंपणा, आपली देहबुद्धी, आपल्याला मागे खेचते. या सर्वांचे बंध तोडून जो परमेश्वराकडे जातो तो पुनः मागे फिरत नाही. परमेश्वर मातेसारखा अत्यंत प्रेमळ आहे. कोणत्या आईला आपले मूल जवळ घ्यावेसे वाटणार नाही ? परंतु मध्येच हे विकार आड येतात. खरोखर, भगवंताचे नाम हे मधला आडपडदा दूर सारते, आपली देहबुद्धीची आसक्ती दूर करते, परमेश्वराकडे जायची वाट मोकळी करते, आणि सरळ आपल्या हाताला धरून थेट परमेश्वरापर्यंत नेऊन पोहोचवते. हे नाम तुम्ही आपल्या हृदयात सतत जागृत ठेवा.


२६१. आपण नामाची जागृती ठेवली तर विकारांना बाहेर पडता येणार नाही.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

September 16, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १६ सप्टेंबर २०१४

१६ सप्टेंबर

भगवंताकडे मन लावावे व देह प्रारब्धावर सोपवावा. 

 खरोखर, प्रारब्धाचे भोग कुणालाही टळत नाहीत. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो, मनाशी नाही. देहास सुखदुःख प्रारब्धाने मिळते. दुःख कोणालाही नको आहे, पण ते येते. सुखाचेही तसेच आहे. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ. हे चांगले वा वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो, "मी देवाचे एवढे केले, मी अमक्या अमक्या सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते ?" पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे. त्याला देव किंवा संत काय करील ? समजा, आपल्याला काही पैशाची जरूरी आहे आणि आपल्या ओळखीचा माणूस किंवा अगदी जवळचा नातेवाईक एखाद्या मोठ्या बँकेचा मनेजर आहे; पण आपल्या स्वतःच्या नावावर बँकेत जर पैसे नसले तर तो काहीही करू शकत नाही. फारच झाले तर तो आपल्या स्वतःच्या खिशातून काही पैसे देईल. त्याचप्रमाणे, आपल्या प्रारब्धात जर सुख नसेल तर ते कुठून मिळणार ? संत फार तर जरूरीप्रमाणे आपले दुःख स्वतः सोसून आपला भार हलका करील इतकेच. म्हणून आपल्या प्रारब्धाने आलेल्या बर्‍यावाईट गोष्टी देहाने भोगाव्या आणि मनाने भगवंताचे स्मरण ठेवावे. खरा भक्त हा देहाला विसरलेला असल्याने देहाचे भोग भोगणे वा न भोगणे या दोन्हीची त्याला फिकीर नसते. म्हणून तो भोग टाळत नाही.
मनुष्याच्या देहाच्या अवयवात जसा कमीजास्तपणा असतो, त्याचप्रमाणे मनुष्याचे विकार आणि गुण पुर्वजन्माच्या संस्काराप्रमाणे, म्हणजेच प्रारब्धाप्रमाणे, कमीजास्त प्रमाणात येतात. आपल्या देहाला होणारे भोग आपल्या कर्माचेच फळ असते, पण ते अमुक कर्माचे फळ आहे असे कळत नसल्यामुळे आपण त्याला प्रारब्ध असे नाव देतो. जगातल्या घडामोडी जशा चालतात, तशाच आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धानेच चालतात. आपल्याला येणार्‍या आपत्ती आपल्या प्रारब्धाच्या असतात; त्या भगवंताच्या नसतात; त्या पाहुण्यासारख्या असतात. त्या जशा येतात तशा जातात देखील. आपण होऊन त्या आणू नयेत, आणि प्रारब्धाने आल्या तर त्यांना घाबरू नये. प्रारब्धाची आणि ग्रहांची गती देहापर्यंतच आहे, मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही. जो संताची किंवा सद्‍गुरूची आज्ञा पाळतो, त्याचे प्रारब्ध हे प्रारब्धरूपाने राहात नाही. भगवंताच्या अनुसंधानाची सवय लावून घ्यावी, म्हणजे आपण प्रारब्धावर विजय मिळवल्यासारखेच आहे.२६०. भगवंताचा जो झाला । त्याला देह प्रारब्धावर टाकता आला ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

September 15, 2014

१५ सप्टेंबर २०१४ ची ग्रह स्थितीरवि : सिंह  राशीत 

चंद्र : वृषभ रास  ( रोहिणी नक्षत्र २०३२. पर्यंत , नंतर मृग नक्षत्र )

मंगळ : वृश्चिक रास 

बुध : कन्या रास 

गुरु : कर्क रास 

शुक्र : सिंह रास 

शनी : तूळ रास 

राहू : कन्या रास 

केतू : मीन रास 


आज  जन्म झालेल्यांची ' वृषभ ' रास असेल 

आजची राशी कुंडली 

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १५ सप्टेंबर २०१४

१५ सप्टेंबर

अखंड अनुसंधान हेच संताच्या चरित्राचे मर्म. 

 

    

कोणत्याही देवाच्या उत्सवाचा मुख्य हेतू हा की, आपल्याला त्याचे स्मरण अधिकाधिक व्हावे. भगवंताचे स्मरण भगवंताच्या प्राप्तीसाठीच करायचे असते. भगवंताच्या नामाने सर्व प्रकारच्या दुरितांचा नाश आपोआप होतो. नाम घेऊन प्रापंचिक सुख मागणे म्हणजे कामधेनू मिळत असताना ती टाकून, गाढव मागण्यासारखे आहे. नामाने प्रत्यक्ष भगवंत घरी येत असताना पैसा, लौकिक किंवा संतती आपण मागितली, तर ते दुःखालाच कारण होते. नामात स्वतःला विसरायला शिकावे; असे स्वतःला विसरणे म्हणजे समाधीच समजावी. नाम घेत असताना स्वतःचा विसर पडणे ही सर्वोत्कृष्ट समाधी होय. जो नामामध्ये इतका रंगला की त्याला स्वतःचा विसर पडला, त्यालाच माझे चरित्र कळले; नुसत्या तर्काने ते कळणार नाही. सत्पुरुषाचे चरित्र हे जास्त मानसिक असते. त्याच्या चरित्रामध्ये देहाच्या हालचालींना दुय्यम महत्व असते, आणि चमत्कारांना तर फारच कमी महत्व द्यायला पाहिजे. देहाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे अखंड अनुसंधान असणे हेच संतांच्या चरित्राचे खरे मर्म आहे. आपण स्वतः भगवंताला चिकटल्याशिवाय दुसरा तसा चिकटलेला आहे किंवा नाही हे कळत नाही; म्हणून संताच्या चरित्रकाराने स्वतः नामामध्ये रंगून जावे आणि नंतर त्याची आज्ञा घेऊन चरित्र लिहावे. खरे म्हणजे संताचा चरित्रकार जन्माला यावा लागतो.
मी रामाचा उपासक आहे तरी मला शंकराचा भक्त फार आवडतो. शंकर आणि श्रीकृष्ण ही एकाच परमात्मस्वरूपाची दोन व्यक्त रूपे आहेत, हरिहरामध्ये भेद नाही असेच श्रृतिस्मृतीही सांगतात. श्रीशंकरालाही अत्यंत प्रिय असेलेले रामनाम आपण अखंड घ्यावे. श्रीशंकरापासून श्रीसमर्थांच्यापर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले, त्या सर्वांनी रामनाम कंठी धारण केले. रामनामाचा साडेतीन कोटी जप जो करील त्याला त्याच्या देवत्वाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. रामनामाचा आधार घेऊन सर्वांनी राम जोडावा. राम तुमचे कल्याण करील हा विश्वास बाळगावा.
मी देव पाहीला आहे; पण ज्या डोळ्यांनी देव पहायचा असतो ते हे डोळे नव्हेत. ते ज्ञानचक्षू असतात, आणि भगवंताचे नाम सतत घेत गेल्याने ते प्राप्त होतात. माझ्याकडे येऊन शिकायचे असेल तर ते हेच की, काळजी न करता, ’परमात्मा सर्व करतो’ ही भावना ठेवायला शिकावे. जिथे नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो, तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्वकाळ माझ्या संगतीचा लाभ घडेल.

२५९. ज्याच्या मुखी नाम आहे, त्याच्या हृदयामध्ये माझी वसती आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

September 14, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १४ सप्टेंबर २०१४

१४ सप्टेंबर

सत्पुरुषाची लक्षणे. 

 जो पुष्कळांना मनापासून आवडतो तो मनुष्य चांगला; असा मनुष्य अजरामर होतो. तो निःस्वार्थीपणाने राहून मनावर संयम ठेवतो. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसर्‍याला बुडविण्याचा दुष्टपणा त्याच्याकडून होणेच शक्य नाही. असा सत्पुरुष म्हातार्‍याला म्हातारा, पुरूषाला पुरूष, मुलाला मुलासारखा दिसतो; म्हणजेच जो ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे त्याचे त्याच्याशी वर्तन असते. असा मनुष्य कोणाविषयी काही निंदा किंवा स्तुती बोलत नाही. मान घ्यायला योग्य असूनही मानाची अपेक्षा तो करीत नाही. स्वतःच्या विकारांवर त्याचा पूर्ण ताबा असतो आणि दुसर्‍याच्या दुःखात तो त्यांना सुख देण्याचा प्रयत्‍न करीत असतो. तो सहजावस्थेत राहतो; म्हणजेच उपाधीमुळे बांधला जात नाही. असा योगी मनुष्य खरोखरच मुक्त समजावा. अशा लोकांनाच संत म्हणतात; आणि ते जी जी कर्मे करतात, ती ती भगवंताच्या प्रेरणेनेच आणि भगवंतासाठीच असल्यामुळे, त्या कर्मांच्यापासून जगाचे कल्याण घडते. संतांच्या प्रत्येक कर्मामध्ये तुम्हाला प्रेम, दया, परोपकार, निःस्वार्थीपणा आणि भगवंताची निष्ठा याच गोष्टी आढळून येतील.
अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरूवात करावी. माझे चुकते कुठे हे पाहावे. दुःख भोगण्याची मला पाळी आली, म्हणजे मार्ग चुकला म्हणावे, ज्याला सुखदुःख बाधत नाही तोच खरा समाधानी. ’मी रोज नामस्मरण करतो, चार वर्षे माझे भजन नाही चुकले , असे आपण म्हणतो; पण ’मी हे सर्व करतो’ अशी सारखी आठवण ठेवली तर काय उपयोग ? मी मेहनत घेतो पण थोडक्यात नासते, ते या अभिमानामुळे. जोपर्यंत अभिमान सोडून भगवंताचे स्मरण मी करीत नाही तोपर्यंत ते ’स्मरण’ कसे म्हणावे ? भगवंताशिवाय इतर जाणीव ठेवून, मी त्याच्याशी अनन्यपणे वागतो असे कसे म्हणता येईल ? मी तुम्हाला खरेच सांगतो, तुम्ही रामाकडे कर्तेपण द्या आणि त्याच्या इच्छेने वागा, तुमची देहबुद्धी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. खुणेने जावे, संतांनी सांगितलेल्या मार्गाने जावे, म्हणजे मार्ग सापडतो. खरी तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो. आणि खरी कळकळ असली म्हणजे त्यात प्रेम निर्माण होते. ’भगवंताने माझी आपत्ती दूर करावी, हे म्हणणे वेडेपणाचे आहे. संकटे, आपत्ती आल्या म्हणून भगवंताला विसरणे हे केव्हाही योग्य नाही. देहबुद्धीचा नाश नामाच्या स्मरणात आहे खास ! नामात प्रेम येत नाही याचा विचार करीत राहिलो तर नामाचाच विसर पडतो, हे कुठे ध्यानात येते ! उगीच विचार करीत नाही बसू. समुद्र ओलांडून जाण्याकरिता रामाचे नाव घेऊन जी वीट ठेवली ती राहिली, हे लक्षात ठेवा.


२५८. चमत्कार करणे हे संतलक्षण नव्हे, संत चमत्कार दाखवावा म्हणून चमत्कार करीत नाहीत.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

September 13, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १३ सप्टेंबर २०१४


१३ सप्टेंबर

शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ. 

 भगवंताला शरण जाण्यात देहबुद्धी आणि अभिमान आड येतो, परिस्थिती आड येत नाही. ती व्यसनाच्या आड कुठे येते ? अभिमान जाण्यासाठी उपाय म्हणजे, जे जे कराल ते ते भगवंताला अर्पण करावे. तोच कर्ता, आपण काहीच करीत नाही, अशी भावना ठेवावी; म्हणजे अभिमानही भगवंताला अर्पण करावा. आपण भगवंताशी काही ना काही कारणाने संबंध ठेवावा. त्याच्याशी बोलावे; त्याचे नाम घ्यावे. नामासारखे दुसरे खरे साधन नाही. वासरू घेऊन गेले म्हणजे जशी गाय पाठीमागून आपोआप येते, त्याप्रमाणे नाम घेतले की भगवंत त्यामागे येतो. ज्याला एकदा नामाची गोडी लागली त्याला प्रपंचाची भीती वाटू लागते. विषय त्याला कडू वाटू लागतात. परमात्म्याच्या नामाने संसार बिघडतो हे म्हणणे चुकीचे आहे. नाम घ्यायचे म्हणून कर्ममार्ग सोडू नये. नामाची गोडी ज्याला आली त्याचीच कर्मे सुटतात. नामाचा अनुभव नाही असे म्हणणे खोटे आहे; आपण ते जितके घ्यावे तितके घेतच नाही. नामात प्रेम येईल असे करावे. जन्माला आल्यासारखे नामाचे होऊन राहावे. भगवंत आपल्या नामस्मरणात आहे. शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ आहे; आणि भाव शुद्ध होण्यासाठी सत्समागमावाचून दुसरा उपाय नाही. एकदा त्याचे होऊन राहिले म्हणजे तोच सर्व उपाय काढतो. ’मी’ अमुक एक साधन करीन, असे म्हणू नये. ’परमेश्वरा, तूच माझ्या हातून करवून घेणारा आहेस,’ अशी दृढ भावना ठेवावी. समजा, आपण एक व्यापार केला, त्यासाठी एकाने आपल्याला भांडवल दिले, तर त्या माणसाला आपण कधीही विसरत नाही; त्याचप्रमाणे ज्या भगवंताने आपल्याला विद्या, पैसा, प्रकृती दिली, त्याला आपण कधीही विसरू नये. भगवंत हा सहजसाध्य आहे, सुलभसाध्य नाही. निसर्गाने जे आपल्याकडे येते ते ’सहज’ होय. म्हणून, सहजसाध्य याचा अर्थ, फलाची अपेक्षा नसणे आणि कर्तव्याचा अभिमान नसणे हा समजावा.
भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवले आहे त्यात समाधान मानून त्याचा विसर पडू न द्यावा. जो स्वतःपासून दूर आहे त्याला भगवंत दूर आहे. आपण मनुष्यजन्माला आलो हीच आपण भगवंताचे होण्याची खूण आहे. भोग आणि दुःख यात वेळ न घालविता, भगवंताकडे लक्ष दिले पाहीजे. याच जन्मात सुविचाराने आणि सद्‍बुद्धीने भगवंत आपलासा करणे, हेच आपले खरे कर्तव्य आहे. याकरिताच सतत त्याचे ध्यान करावे, आणि मनातून आपले भगवंताशी नाते जोडून ठेवावे, यासारखा दुसरा सुलभ उपाय नाही.


२५७. ’तुझ्या नामात मला गोडी दे’, हेच भगवंताजवळ मागावे.


September 12, 2014

१२ सप्टेंबर - संकष्टी चतुर्थी

मोरया रे मोरया गणपती बाप्पा मोरया 

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १२ सप्टेंबर २०१४


१२ सप्टेंबर

नाम अभिमानाचा नाश करते. 

 दुसर्‍याचे घर जळले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की, भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे. पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले, तेव्हा तो रडू लागला ! ’लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण’ असे नसावे. जे आपण दुसर्‍यास सांगतो तेच आपण आपणास सांगावे. माझे कर्तेपण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही. प्रत्येक कर्माचे वेळी त्याचे स्मरण करू या. नफ्याचे वेळी अभिमान उत्पन्न होतो, तोट्याचे वेळी दैव आठवते; म्हणून दोन्ही प्रसंगी कर्तेपण नसावे. देवाच्या हातात मी बाहुलीप्रमाणे आहे असे मानावे. खोटे कर्तेपण घेतल्यामुळे खरे रडावे लागते, लहान अर्भकाप्रमाणे निरभिमान असावे. मनुष्याचे हाती काही नाही, सर्व रामाचे हाती आहे. ’यश देणे न देणे तुझ्या हाती आहे’ असे म्हणून रामास शरण जावे. जगात अनेक शोध लागत आहेत, त्यात शरीरसुखभोगाच्या साधनांचेच शोध जास्त आहेत. परंतु खर्‍या सुखाचा शोध, शाश्वत समाधानाचा शोध, एक साधुसंतच करू शकतात, त्यांनी समाधानाची म्हणूण जी काही साधने सांगितली आहेत, त्यांचा अवलंब केला तर आपल्याला खात्रीने समाधान मिळेल. आज आपल्याला समाधान का मिळत नाही, तर आपला अभिमान त्याच्या आड येतो. कर्म करीत असताना, किंवा केल्यावर, त्याबद्दल अभिमान झाला नाही, तर आपल्याला भगवंताचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही. किती साध्या गोष्टीत आपला अभिमान डोके वर काढीत असतो पाहा ! एक गृहस्थ होते, त्यांना एक मुलगी होती. ती वयात आली, दिसायला ती साधारण बरी होती, जवळ पैसाही होता; परंतु त्या मुलीचे लग्न पाचसहा वर्षे कुठेही जमू शकले नाही. पुढे तिचे लग्न झाल्यावर तो म्हणाला, "माझ्या मुलीचे लग्न मी थाटात करून टाकले." त्यावर त्याला कोणी विचारले, "मग दोनचार वर्षे आधीच का नाही केलेत ?" तेव्हा तो म्हणाला, "त्या वेळी जमले नाही" मग आता जमले म्हण की. ’मी केले’ असे कशाला म्हणतोस ?" असो. अभिमान घालवायला, भगवंताला मनापासून शरण जाणे, हा उपाय साधुसंतांनी स्वतः अनुभवून सांगितला आहे. एकदा माणूस एखाद्या घराण्याला दत्तक गेला, की त्याच्या मुलाला काही त्या घराण्याचे नाव लावण्यासाठी पुन्हा दत्तक जावे लागत नाही. तसेच, एकदा रामाच्या पायावर डोके ठेवून, ’रामा, मी तुझा झालो आणि तू माझा झालास,’ असे अनन्येतेने म्हटल्यावर, त्यापुढे होणारे आपले प्रत्येक कर्म हे त्याचेच होईल. ते त्याला अर्पण करण्याची जरूरी नाही. म्हणून, होईल ते कर्म त्याचेच मानावे. कोणतेही कर्म अर्पण केले असताना ’अर्पण करणारा’ उरतोच; तर तसे न व्हावे.२५६. सत्कर्माने अभिमान मरत नाही, भगवन्नामाने आणि सत्संगतीने तो मरतो.

September 11, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ११ सप्टेंबर २०१४

११ सप्टेंबर

चिकित्सा मर्यादेपर्यंतच करावी. 

 भगवंत आपलासा करून घेण्याचा प्रयत्‍न करावा. अभिमान सोडून जर असा प्रयत्‍न चालू ठेवला तर सद्‌गुरूकृपा झाल्याशिवाय राहात नाही. अमुक एक साधन करीत जा म्हणून सद्‌गुरूने सांगितले, आपण ते अट्टाहासाने करू लागलो, पण आपले विचार जर आहेत तसेच राहिले, तर भगवंताचे प्रेम येणार कसे ? चारपाच वर्षे खूप कष्ट केले, विषय बाजूला ठेवले, पण अजून कसा अनुभव येत नाही असे म्हणू लागलो, तर साधनाचा जोर कमी होतो आणि निष्ठा घसरायला लागते. जे काही होणार ते सद्‌गुरूच्याच इच्छेने, त्याच्याच प्रेरणेने होते, अशी आपली ठाम श्रद्धा पाहिजे. साधनाचे प्रेम तो भगवंतच देतो, हे आपण विसरून जातो. आपण पूर्वी काही साधन करीत नव्हतो, ते आता करू लागलो, असा साधनाबद्दलचा अभिमान बाळगू लागलो तर काय उपयोग ? सद्‌गुरूच्या पायावर एकदा डोके ठेवले की काहींचे काम होते, यात सद्‌गुरू पक्षपात करतात असे कसे म्हणता येईल ? आपलेच कुठेतरी चुकत असले पाहिजे याचा विचार करावा. आजवर देवाचे नाव घेणे बरे असे वाटत होते, परंतु घ्यायचे काही जमले नाही; ते आता घेऊ लागलो हे त्याच्या कृपेने घेऊ लागलो हे नाही का समजू ?
प्रपंचात मनुष्याला धीर हवा. आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावे. फार चिकित्सा करण्याने नुकसान होते. विद्येचे फळ काय, तर आपल्या मनाला जे बरे वाटेल त्याची चिकित्सा न करता ते करायचे आणि आपल्याला जे करायचे नाही त्याची चिकित्सा करित बसायचे ! चिकित्सा मर्यादेपर्यंतच असावी. ती मर्यादेबाहेर गेली की आपण काय बोलतो हे आपले आपल्यालाच कळत नाही.
एक मुलगा रोज तालमीत जातो आणि चांगले दूध, तूप खातो; पण तो जर दिवसेंदिवस वाळू लागला आणि हडकुळा दिसू लागला तर त्याला काही तरी रोग आहे असे नक्की समजावे. त्याचप्रमाणे, सध्याच्या सुधारणेने माणूस पाण्यावर, हवेत, जिकडे तिकडे वेगाने जाऊ लागला आहे खरा, पण दिवसेंदिवस जास्त असमाधानी बनत चालला आहे; हे काही खर्‍या सुधारणेचे लक्षण नाही. परिस्थिती वाईट आली म्हणून रडू नका, कारण ती बाधतच नसते. कोणत्याही काळात, कशाही परिस्थितीत, आपल्याला आनंदरूप बनता येईल. आजपर्यंतचा आपला अनुभव पाहिला तर ’आपण केले’ असे थोडेच असते; म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपण आपले कर्तव्य तेवढे करावे, आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नये. अभ्यास केला तर थोड्या दिवसात हे साधेल.

२५५. ’कर्ता राम आहे’ असे ज्याला वाटले, त्याने सर्व काही साधले.


September 10, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १० सप्टेंबर २०१४

१० सप्टेंबर

रामापायीं ठेवा मन । नाम घ्यावें रात्रंदिन ॥    

राम हा तारक मंत्र निराकार । जपा वारंवार हेचि एक ॥
हेचि एक करा राम दृढ धरा । पुनरपि संसारा येणे नाही ॥
येणे नाही पुन्हा सांगितली मात । जानकीचा कांत आळवावा ॥
पार्वतीरमण जपे रामनाम । विषयाचे दहन तेणे झाले ॥
दीनदास म्हणे वाल्मीक तरला । पापी उद्धरीला अजामेळ ।
जयासी लागला रामनामचाळा । आठवी गोपाळा सर्वकाळ ॥
सर्वकाळ मति संतांचे संगती । जोडिला श्रीपति येणे पंथे ॥
तिन्ही लोकी श्रेष्ठ रामनाम एक । धरूनि विवेक जपे सदा ॥
हनुमंते केले लंकेसी उड्डाण । रामनाम ठाण हृदयामाझी ।
दीनदास म्हणे वानर तरले । नामी कोटि कुळे उद्धरती ॥
रामनामाविणे साधन हे जनी । बरळती प्राणी स्वप्नामाजी ॥
स्वप्नीचा विचार तैसा हा संसार । सोडुनि असार, राम ध्यावा ॥
रामनामध्वनी उच्चारिता वाणी । पापाची ते धुनी होय तेणे ॥
सिंधूचे मंथन रत्‍नांची खाण । तैसे हे साधन रामनाम ॥
वेदाचेही खंड योगाचे ते बंड । त्याचे काळे तोंड, दास म्हणे ॥
मन हेचि राम देही आत्माराम । जनी मेघश्याम पाहे डोळा ॥
पाहूनिया डोळा स्वरूपी मुरावे । वाचेसि असावे रामनाम ॥
नारायणनामे प्रल्हाद तरला । अजामिळ झाला एकरूप ॥
एकरूप झाले वसिष्ठ महामुनि । तया चापपाणि वश झाला ॥
दीनदास म्हणे स्मरे । संसाराची चिंता त्यासी नसे ॥
जनी जनार्दन रामाचे चिंतन । सत्याची ही खाण रामनाम ॥
गाईचे रक्षण भूतदया जाण । अतिथीसी अन्न घाला तुम्ही ॥
संताचा संग विषयाचा त्याग । रामनामी दंग होऊनिया राहे ॥
राम कृष्ण हरि एकचि स्वरूप । अवताराची लीला वेगळाली ॥
दिनदास सांगे लावूनिया ध्यान । तुम्ही आत्मज्ञान जतन करा ॥
यत्न परोपरी साधनाचे भरी । आवळे घेता करी तैसे होय ॥
तैसे होय, म्हणुनी करा, त्याग । साधावा तो योग रामनामे॥
रामनामी आस ठेवूनिया खास । वृथा न जाय श्वास ऐसे करा ॥
ऐसे करा तुम्ही संसारा असता । वाया आणिकपंथा जाऊ नका तुम्ही । येतो आता आम्ही, कृपा करा ॥
शेवटची विनवणी ऐका तुम्ही कानी । संसारजाचणी पडू नका ॥
रामपाठ तुम्हा सांगितला आज । आणिकाचे काज नाही आता ॥
नित्यपाठ करी माणगंगातीरी । होसी अधिकरी मोक्षाचा तू ॥
ब्रम्हचैतन्य नाम सद्गुरूचे कृपे । दीनदास जपे राम सदा ॥


२५४. मनी धरा राम हाती धरा काम । वाउगाचि श्रम करू नका ॥

September 9, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन -९ सप्टेंबर २०१४

९ सप्टेंबर

भगवंताचा विसर हेच मोठे पाप ! खरोखर भगवंताचे अस्तित्व जिथे पाहावे तिथे आहे. भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरिताच बुद्धीची देणगी आपल्याला मिळाली आहे. भगवंताचे मर्म ओळखायला, मी कसे वागावे हे पाहावे. ज्यांनी भगवंताला जाणले, त्यांनी भगवंताला काय आवडते हे सांगून टाकले आहे. ’सर्व विषयवासना सोडून भगवंताला शरण जावे’ हे त्यांच्या सांगण्याचे सार आहे. हे आप्तवाक्य आपण प्रमाण मानले पाहिजे; कारण स्वतः अनुभव घेऊन, म्हणजेच स्वतः मुक्त होऊन, त्यांनी आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखविला. जन्ममरणापासून जो आपल्याला मुक्त करतो तो खरा आप्त. जे भगवंताचे होऊन राहीले त्यांना जगाची भीती नाही वाटत. आपण विषयांना नेहमी शरण जातोच की नाही ? मग भगवंताला शरण जायला का भ्यावे ? खरोखर, सर्व चमत्कार करता येतात, पण भगवंताला शरण जाणे फार कठीण आहे.
नामस्मरण करू लागलो तर विषय हात धुऊन मागे लागतात. म्हणजे मी आतबाहेर विषयाने किती भरलेला आहे ! तथापि काही झाले तरी दृढनिश्चयाने नाम चालू ठेवावे. प्रपंच करीत असताना नाही का वाईट विचार मनात येत ? मग परमार्थ करीत असता तसे आले म्हणून भ्यायचे काय कारण ? प्रल्हादाने एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही सोडले नाही; त्या नामानेच तो तरला, त्या भावनेनेच तो उद्धरून गेला. म्हणून ही भावना वाढविण्याकरिता आपण नामाचे अखंड स्मरण ठेवावे. आपली पापे मनात आणू नयेत. माझा पूर्व संस्कार मी आपल्या बुद्धीनेच ठरवितो, नाही का ? स्वतःचे मनच स्वतःला खाते याला काय करावे ? काल झालेले आज नाही सुधारता येणार; पण चालू क्षण मात्र दवडू नका. निराश कधीच होऊ नका. प्रत्येक साधन आपल्या परीने श्रेष्ठच आहे. साधनाला पतिव्रतेसारखे मानावे. भगवंताचे होणे हे सर्व साधनांचे आणि धर्माचे मूळ आहे हे पक्के ध्यानात ठेवावे. प्रपंच पुरा होण्याकरिता आपण मरेपर्यंत काम करतो, मग भगवंताचे होण्याकरिता, भगवंत जोडण्याकरिता, थोडे कष्ट का घेऊ नयेत ? खरोखर भगवंताचा विसर पडणे ह्याहून दुसरे मोठे पाप नाही. देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी, आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी. वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा. ही वासना, म्हणजेच विषयांचे हवे-नकोपण जसजसे कमी होईल, तसतशी बुद्धी नामात स्थिर होत जाईल. अशा तर्‍हेने, ’तू आहेस, मी नाही’ ही स्थिती जेव्हा नामस्मरणाच्या योगाने आपली होईल, तेव्हाच परमेश्वर आपण जोडला किंवा मी परमेश्वराचा झालो असे सार्थपणाने म्हणता येईल. निदिध्यासाने आनंद-साक्षात्कार होणे हाच मोक्ष होय.२५३. भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की, बाकीच्याचा त्याग आपोआप होतो.

September 8, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ८ सप्टेंबर २०१४

 ८ सप्टेंबर

 थोडेच वाचावे, पण त्याचे मनन व आचरण करावे

 


 माया म्हणजे काय, तर जे परमात्म्याशिवाय असते ती माया. जे दिसते आणि नासते ती सर्व माया. आपण जोपर्यंत नामस्मरणात आहोत, तोपर्यंत आपण मायेच्या बाहेर आहोत, आणि जेव्हा त्याचे विस्मरण होते तेव्हा आपण मायेच्या अधीन आहोत असे समजावे. सर्व काही करण्यामध्ये आहे, सांगण्यात आणि ऐकण्यात नाही. निर्गुणाचे कितीही वर्णन केले तरी निर्गुणरूप समजायचे नाही. म्हणून सगुण रूपच आपण पाहावे आणि त्याचेच पूजन करावे. ’मी निर्गुणाची उपासना करतो’ असे जो म्हणतो, त्याला खरे म्हटले म्हणजे निर्गुण हे काय ते समजलेच नाही; कारण तिथे सांगायलाच कुणी उरत नाही. एकाने मला सांगितले की, "मी सर्व वेदांतग्रंथ वाचले आहेत." त्यावर मी त्याला म्हटले की, "तर मग तुम्हाला समाधान मिळालेच आहे!" त्यावर तो म्हणाला, "तेवढेच काय ते मिळाले नाही." मग एवढे वाचून काय उपयोग झाला ? आपल्याला त्या वेदांताला घेऊन मग काय करायचे आहे ? आपण आपली भोळीभाबडी भक्तीच करावी. देवाला अनन्य शरण जाऊन, त्याचे नामस्मरण करीत जावे, म्हणजे सर्व काही मिळते. जो जेवायला बसतो, तो ’माझे पोट भरावे’ असे कधी शब्दांनी म्हणतो का ? पण जेवण झाले की आपोआपच पोट भरते ! आपण ग्रंथामध्ये जे वाचतो ते जर आचरणामध्ये आणले नाही तर त्या वाचनाचा उपयोग काय ? म्हणून आपण फारसे वाचनाच्या वगैरे नादी लागू नये, कारण त्याने खरे साधन बाजूलाच राहते आणि त्या वाचनाचाच अभिमान वाटू लागतो. म्हणून थोडेच वाचावे आणि त्याचे मनन करावे. शरीराच्या अगदी लहान भागाला लागले तरी सबंध देहाला वेदना होतात, त्याप्रमाणे दिवसाची एक घटका जरी आपण भगवंताच्या स्मरणात घालविली तरी सबंध दिवस त्यामध्ये जाईल; आणि दिवसांचेच महिने, महिन्यांचेच वर्ष, आणि वर्षांचेच आपले आयुष्य बनलेले असते, या दृष्टीने आपले सर्व आयुष्य भगवंताच्या स्मरणात जाईल. प्रपंचाची आवड असू नये, पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी. प्रपंचातली कर्तव्ये करणे हे पवित्र आहे खरे पण त्यामध्ये गुंतून राहणे बरे नव्हे. म्हणून आपण मनाने भगवंताचे होऊन राहावे. आपण मनापासून भगवंताला स्मरले तर तो आपल्याला सुखासमाधानात ठेवल्याशिवाय राहणार नाही. प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणेच होय. देवाला मानावे आणि त्याला आवडेल तेच करावे, हेच परमार्थाचे सार आहे.

२५२. देह केव्हा जाईल याचा नियम नाही. म्हणून, ’वृद्धापकाळी नामस्मरण करू’ असे म्हणू नये.

September 7, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ७ सप्टेंबर २०१४


७ सप्टेंबर

पैसा नीतिधर्माने मिळवावा.काळजीचे काही कारण नसताना काळजीत राहण्याचे काहींना व्यसन असते. व्यवहारात काळजी हा मोठा विकल्प आहे. पैसा असल्यामुळे जर काळजी वाटू लागली, तर तो पैसाच दूर केला तर नाही चालणार ? पैसा टाकून देऊ नका, पण पैशाच्या प्रेमातही राहू नका. जिवापाड श्रम करून जो कमवायचा, तोच जर दुःखाला कारण होऊ लागला तर काय उपयोग ? पैसा काही आयुष्याचे सर्वस्व नव्हे, किंवा सर्वश्रेष्ठ ध्येय नव्हे. व्यवहारामध्ये जीवनाला पैसा आवश्यक आहे; आणि तो नीतीने वागून आपल्या पोटापुरता कमावणे जरूर आहे. पैसा मिळवावा हे व्यवहारदृष्ट्या योग्यच आहे, पण जर तो मिळाला नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे असे कोणी समजू नये. पैसा आला तर भगवंताच्या इच्छेने आला, आणि यदाकदाचित तो गेला, तर भगवंताच्या इच्छेने गेला, असे म्हणून, आपले समाधान बिघडू देऊ नये. पैसा गेला म्हणून काही अब्रू जात नाही; आपली अब्रू आपल्या आचरणावर अवलंबून असते. अशी म्हण आहे की, ’पैसा पुरून उरावा इतका मिळावा.’ पण आपल्याला जगात काय आढळते ? जीवनामध्ये पैसा आपल्याला पुरतो आणि आपल्या उरावर नाचतो. हे काही ’पुरून उरणे’ नव्हे. याच्या उलट, आपण त्याला पुरावे आणि त्याच्या छातीवर नाचावे. मनुष्य नेहमी म्हणतो की, ’माझ्या मुलाबाळांची तरतूद मला केली पाहिजे; मी काय, आज आहे आणि उद्या नाही.’ पण आपण जसे खात्रीचे नाही, तशी आपली मुलेबाळे तरी कुठे खात्रीची आहेत ? ही गोष्ट माणसाच्या लक्षातच येत नाही.
पैशाबद्दल रामचंद्राला उदासपण आले, असे योगवसिष्ठात वर्णन आहे. तसे ते आपल्यालाही लागू आहे; फरक एवढाच की, रामाचे उदासपण पैसा ’असणेपणाचे’ होते, आणि आपले उदासपण पैसा ’नसणेपणाचे’ आहे. पैसा नसल्याबद्दल आपल्याला उदासपण आहे, कारण तो प्रपंचातल्या सुखाचे साधन वाटते. पण त्याबरोबरच भगवंत हवा असेही आपल्याला वाटते. आता, आपण आपल्या पैशाचे बरोबर दोन भाग करू. आपल्याला प्रपंचाला लागेल इतका पैसा प्रामाणिकपणे मिळवून आपण जगावे. जास्तीची हाव करू नये. हा झाला आपला पैसा; अर्थात, राहिलेला सगळा दुसर्‍याचा. त्याचा लोभ करू नये. श्रीमंत मनुष्य हा पैशासाठी, म्हणजे लक्ष्मीसाठी, सर्व जीवन खर्च करतो. पण ती त्याचा मुळासकट नाश करते. म्हणून नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी मिळवली, की ती आपला नाश न करता, आपल्या आनंदाला कारण होते.

२५१. पैसा हा नीतिधर्मानेच मिळवावा; तो वाटेल त्या मार्गाने मिळवणे इष्ट नाही.

September 6, 2014

श्री गणपतीस्तोत्रजयजयाजी गणपती, मज द्यावी विपुल मती ।
करावया तुमची स्तुती, स्फूर्ती द्यावी मज अपार ।।

तुझे नाम मंगलमूर्ती, तुज इंद्रचंद्र ध्याती ।
विष्णु शंकर तुज पुजिती, अव्यया ध्याती नित्यकाळी ॥

तुझे नाम विनायक, गजवदना तू मंगलदायक ।
सकल विघ्ने कलिमलदाहक, नामस्मरणे भस्म होती ॥

मी तव चरणांचा अंकीत, तव चरणामाजी प्रणिपात ।
देवाधीदेवा तू एकदंत, परिसे विज्ञापना एक माझी ॥

माझा लडीवाळ तुज करणे, सर्वांपरी तू मज सांभाळणे ।
संकटामाजी रक्षीणे, सर्व करणे तुज स्वामी ॥

गौरिपुत्रा तू गणपती, परिसावी सेवकांची विनंती ।
मी तुमचा चरणार्थी, रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया ॥

तूच माझा माय बाप, तूच माझा देवराय ।
तूच माझी करिशी सोय, अनाथनाथ गणापती ॥

गजवदना श्री लंबोदरा, सिध्दीविनायका भालचंद्रा
हेरंबा शिवपुत्रा, विश्वेश्वरा अनाथबंधू ॥

भक्तपालका करी करुणा, वरदमूर्ती गजानना ।
परशुहस्ता सिंदुरवर्णा, विघ्ननाशका विश्वमूर्ती ॥

विश्ववदना विघ्नेश्वरा, मंगलाधीशा परशुधरा ।
पापमोचना सर्वेश्वरा, दीनबंधु नमन माझे ॥

नमन माझे विघ्नहर्ता, नमन माझे एकदंता ।
नमन माझे गिरिजासुता, तुज स्वामिया नमन माझे ॥

नाही आशा स्तुतिची, नाही आशा तव भक्तिची ।
सर्व प्रकारे तुझिया दर्शनाची, आशा मनी उपजली ॥

मी केवळ मूढ अज्ञान, ध्यानी तुझे सदा चरण ।
लंबोदरा मज देई दर्शन, कृपा करी जगदीशा ॥

मतीमंद मी बालक, तूची सर्वांचा चालक ।
भक्तजनांचा पालक, गजमुखा तू होसी ॥

मी दरिद्री अभागी स्वामी, चित्त जडावे तुझिया नामी ।
अनन्यशरण तुजला मी, दर्शन देई कृपाळुवा ॥

हे गणपतीस्त्रोत्र जो करी पठण, त्यासी स्वामी देई अपार धन ।
विद्यासिध्दीचे अगाध ज्ञान, सिंदुरवदन देईल पै ॥

त्यासी पिशाच्च भूत प्रेत, न बाधिती कदाकाळात ।
स्वामिची पुजा करोनी यथास्तित, स्तुतिस्त्रोत्र हे जपावे ॥

होईल सिध्दी षण्मास हे जपता, नव्हे कदा असत्य वार्ता ।
गणपतीचरणी माथा, दिवाकरे ठेविला ॥

इती श्री गणपतीस्तोत्रं संपूर्णम्।
श्री गजाननार्पणमस्तु।

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ६ सप्टेंबर २०१४

६ सप्टेंबर

' राम कर्ता ' या भावनेने समाधान मिळते. 

 

 पहाटेची वेळ खरोखर फार चांगली. ह्या वेळी कोणी मानसपूजा करीत असतील तर फारच उत्तम. दुसरे कोणी या वेळी झोपेत असतील, तर आणखी कोणी मनोराज्येही करीत असतील. पहाटेपासून तो रात्रीच्या झोपेपर्यंत, मग तो राजा असो किंवा रंक असो, सर्वांची एकच धडपड चालू असते, आणि ती म्हणजे समाधान मिळवायची. प्रत्येकाच्या जीवनाला समाधानाची ओढ लागलेली असते. वास्तविक, खरे समाधान हे कशावरही अवलंबून नाही. ते ’राम कर्ता’ ही भावना बाळगल्यानेच मिळू शकते. समाधान मिळवायचे एक अत्यंत सोपे साधन सर्व संतांनी स्वतः अनुभव घेऊन आपल्याला सांगितले आहे, आणि ते म्हणजे नामस्मरण. खरी तहान लागली म्हणजे सहजपणे कोणत्याही नदीचे पाणी प्याले तरी तहान भागते. त्याचप्रमाणे खरी तळमळ असली, म्हणजे सहजपणे नामस्मरण होऊन समाधानाची प्राप्ती होते. पहाटेच्या वेळी केलेला अभ्यास चांगला होतो असे म्हणतात. तेव्हा या नामस्मरणाच्या अभ्यासाला आपण पहाटेपासून सुरूवात करू या. काकड आरती झाली म्हणजे देवाचे स्मरण संपवावे असे नाही, किंवा सारखी काकड आरतीच करावी असेही नाही. भगवंताचे अखंड स्मरण आणि भाव पाहिजे, यात सर्व काही आले. मला खात्री आहे, तुम्ही आवडीने आणि तळमळीने हा अभ्यास चालू ठेवाल, तर राम तुमचे कल्याण करील.
नाम घेत असताना इतर विचार मनात येत राहतात, अशी सर्वांचीच तक्रार आहे, परंतु असे पाहा, एखादा मनुष्य रस्त्याने चालला असला की, ’तुला रस्त्यात कोण कोण भेटले ?’ तर तो म्हणतो, ’माझे लक्षच नव्हते.’ त्याप्रमाणे आपण नाम घेत असताना या विचारांकडे दुर्लक्ष करावे. त्यांच्या पाठीमागे जाऊ नये, किंवा त्यांच्याबद्दल विचार करीत वेळ फुकट घालवू नये. ’मला विचार विसरला पाहीजे, विसरला पाहीजे,’ असे म्हणून का त्याचे विस्मरण होणार आहे ? नामाकडेच जास्त लक्ष द्यावे, म्हणजे विचारांचा आपोआप विसर पडतो, आणि पुढे ते येईनासे होतात.
एकदा वाट चुकल्यावर ती चुकीची वाट परत उलट दिशेने चालावी लागते; आणि मग योग्य रस्ता आल्यावर त्या रस्त्याला लागायचे, हाच अभ्यास; आणि हे सर्व ध्येय गाठेपर्यंत चालू ठेवणे हीच तपश्चर्या, ब्रम्हानंदबुवांनी खरी तपश्चर्या केली. ते एवढे विद्वान, परंतु त्यांनी आपली सर्व बुद्धी रामचरणी लावली. जगातल्या इतर गोष्टींपेक्षा हे केल्याने आपले खचितच कल्याण होईल असे वाटले, म्हणून त्यांनी हा मार्ग पत्करला, आणि त्याला सर्वस्वी वाहून घेतले. तेव्हा, मोठे साधक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण संशयरहित होऊन चालावे, त्यात आपले कल्याण आहे.

२५०. नामात राहा आणि राम कर्ता ही भावना दृढ करा.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

September 5, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ५ सप्टेंबर २०१४

५ सप्टेंबर

नाम म्हणजे जादूचा दिवाच. 

 

 एकदा एक बाई सोवळे नेसून स्वयंपाक करीत होती. बाईचे मूल झोपून उठल्यावर, अंथरूणातच ’आई, मला घे,’ म्हणून रडू लागले. आई म्हणाली, ’बाळा, मी तुला घ्यायला आतुर झाले आहे रे, पण तू कपडे तेवढे काढून ये’. परंतु मुलगा कपडे काढायला तयार होईना, आणि ’आई, आई’ म्हणून रडू लागला. तेव्हा शेजारच्या बाईने येऊन मुलाचे कपडे काढले, आणि मग आईने मुलाला पोटाशी घेतले. आपलेही त्या लहान मुलाप्रमाणे झाले आहे. वासना, विकार, अहंभाव इत्यादींचे कपडे न काढताच आपण परमेश्वराला भेटायची इच्छा करतो, मग त्याची नि आपली भेट कशी होणार ? परमेश्वर मातेप्रमाणेच अत्यंत प्रेमळ आणि ममताळू आहे, त्याला आपल्याला भेटायची अतिशय इच्छा आहे; परंतु जोपर्यंत आपण आपल्या अंगावरची अपवित्र आवरणे काढून टाकीत नाही, तोपर्यंत परमेश्वर आपल्याला जवळ घेत नाही.
संत आपल्याला परमेश्वराकडे जायचा रस्ता सांगतात. त्या मार्गाने गेलो तर आपल्याला खचितच भगवंताची प्राप्ती होईल. आपण पुराणात वाचलेच असेल की, श्रीकृष्णाकडे दुर्योधन आणि अर्जुन गेले असताना, श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितले की, ’ज्याला मी हवा असेन त्याला माझे सैन्य आणि इतर गोष्टी मिळणार नाहीत’. हे ऐकून, दुर्योधनाने त्याचे सर्व सैन्य मागून घेतले. अर्जुनाला खरा आनंद झाला की आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळते आहे, कारण तो हे जाणून होता की, एका परमेश्वरावाचून बाकी सर्व व्यर्थ आहे. प्राणावाचून हजारो शरीरांचा काय उपयोग ?
कोणी आपल्याला सांगतीलही की परमेश्वर साता समुद्रापलीकडे आहे, तो शेषशायी आहे. तेव्हा आपल्यासारख्या सामान्य माणसाला तो प्राप्त होणे अत्यंत कठीण आहे. परंतु संतांनी आपल्यावर फार मोठे उपकार करून ठेवले आहेत. त्यांनी नामरूपी जादूचा दिवाच आपल्या हाती दिला आहे; त्यात सत्संगतीचे तेल घातले म्हणजे झाले. हा दिवा विझू नये म्हणून फार काळजी घ्यावी लागते. मी त्रिवार सत्य सांगतो की, नीतीने वागून जो नामात राहील त्याला नामाचे प्रेम लागल्याशिवाय राहणार नाही. नीती हा सर्वांचा पाया आहे. त्या पायाशिवाय इमारत टिकू शकणार नाही. तीन गोष्टी अत्यंत जपा : परस्त्री मातेसमान माना, परधन आणि परनिंदा विष्ठेसारखी माना, आणि कशाही परिस्थितीत नामस्मरणाला सोडू नका; तुम्हाला भगवंताचे प्रेम खात्रीने लागेल.

२४९. मुखात नाम ठेवावे आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या